बॅकेतील आकडेमोडीशी खेळता खेळता शब्दांचा सारीपाट मांडणाऱ्या अशोक बी. कांबळे या कवीच्या 'विचारांच्या पलीकडे' या काव्यसंग्रहाकडे पाहिले की, खरंच याची प्रचिती येते. खरं तर हा मित्र माझ्या सहवासाच्या पलीकडे जावून एक काळ लोटला होता. मी सन १९८६ ते १९९६ या कालावधीत एटापल्ली या आदिवासी तालूक्यात कार्यरत असतांना या मित्राशी ओळख व मैत्री झाली होती.ती आजतागायत कायम आहे. पण मध्यंतरीच्या काळात पोटापाण्यासाठी आपापले क्षेत्र निवडून आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो, ते तब्बल ४० वर्षानंतर आमची भेट नियतीने नव्हे; थोबाडपुस्तकाने घालून दिली. थोबाडपुस्तक म्हणजे 'फेसबुक'. मला या थोबाडपुस्तकाचे काही फारसे समजत नाही. पण माझ्या दुसऱ्या एका मित्राने मला याची थोडीफार ओळख करुन दिली. आणि मी ते हाताळू लागलो. व त्यात हा जुना हरवलेला मित्र गवसला. मागील वर्षी फेसबुकवरुन माझ्या संपर्कात आला. आणि नागपूरच्या 'साहित्य विहार' संस्थेच्या मला मिळालेल्या पुरस्काराच्या निमीत्ताने त्याची माझी पुनश्च भेट झाली. व त्याच भेटीचं फलीत म्हणजे त्यांनी मला दिलेला व आज समीक्षणाच्या रुपाने येणारा 'विचारांच्या पलीकडे' हा कविता संग्रह.
'विचारांच्या पलीकडे एक गांव असतं, त्यालाही एक नाव असतं,
मनामध्येच त्याला ठाव असतं,
त्याच नावाचं श्रध्दा व अंधश्रध्दा असतं'.
या ओळी पाहिल्या की, कवी नवोदित आहे. हे लगेच लक्षात येतं. ट ला ट जुळवण्याचा हा कवीचा प्रयत्न फसलेला असल्याचं निदर्शनास येतं. कवीच्याच ओळीत-
'विचारांच्या पलीकडे एक गांव असतं,
त्यालाही एक नाव असतं
मनामध्येच त्याला ठाव असतं,
श्रध्दा व अंधश्रध्दा त्याचं नांव असतं'
असं सुटसुटीत लिहीता आलं असतं कदाचीत.
कवी नवोदित. आणि त्याचे प्रकाशक आणखीनच नवोदित.किंवा कवीच्या नवखेपणाचा फायदा घेवून त्याला गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. कवीला प्रेरणा देण्याच्या नावाखाली प्रकाशनाचा व्यवसाय हा एकच उद्देश डोळ्यासमोर असलेले. पण तेही निटसे जमलेले नाही. पुस्तकांचे पेजेस एकामेकात मिसळलेले. प्रस्तावना व मनोगत एकमेकांत गुंतलेले. जसे नवोदित जोडपे नको त्या ठिकाणी एकमेकांच्या मिठीत नको त्या अवस्थेत अवघडून असल्यासारखे. पहिल्या पानावर पुस्तकाची प्रस्तावना सुरु केल्यानंतर ते अर्धवट सोडून दुसरे पान मनोगताचे. आणखी तिसरे पान अर्धवट प्रस्तावनेचे. पुस्तकाची बांधणी तर अगदीच तकलादू.नाही म्हणायला पुस्तकाचे मुखपृष्ट आणि मलपृष्ठ सुरेख आहे तेही कवींच्या चिरंजीवांची कृपा म्हणून. त्याबद्दल चि. अमितचे कौतुक करावेच लागेल. यात प्रकाशकाची आणि मुद्रकाची भुमिका 'पुस्तक काढून टाकू', असे असलेलीच. कदाचीत आर्थिक बाजूही त्याला कारणीभूत असू शकते. असा हा कवितासंग्रह एकूण पंचावन कवितांनी समृध्द आहे.
कवीमित्र अशोक कांबळे यांनी लिहीलेल्या कवीतेतून नवोदिताची झलक दिसत असली तरी आदरणीय कवीवर्य ए. के. शेख सर यांची प्रस्तावना व प्रदिप अडकिणे यांची समीक्षा ही एक जमेची बाजू आहे. बुडत्याला काठीचा आधार देणारी. नाहीतर नमनालाच घडाभर तेल ओतावं अशा शुभेच्छांचा मारा व अभिप्रायांनी पुस्तकाची सुरुवातच कंटाळवाणी झालेली आहे. पुस्तकातील कवीच्या पहिल्या कवितेला पोहचेपर्यंत या शुभेच्छांनीच गुदमरायला होतं. खरा वाचक हा आपल्या वाचनाची सुरुवातच प्रस्तावने पासून करतो आणि कवितेपर्यंत पोहचून त्यात गुंतून जातो. असे चित्र असते. पण इथे चित्र वेगळेच.पहिल्या कवितेपर्यंत पोहचतांनाच पुस्तक बाजूला ठेवण्याची वेळ येते. नवोदित कवीला खुप वाटते की आपलं कोणी कौतुक करावं, त्यांच्या शुभेच्छा, आशिर्वादाचा हात आपल्या पाठीशी असावा. पण किती ?किती शुभेच्छा असाव्यात सुरुवातीलाच, याचा काही ताळमेळ? (या शुभेच्छा कविता संग्रहाच्या शेवटही देता आल्या असत्या, पाठीवर कौतुकाची थाप असल्यागत.) खरंच सारं विचारांच्या पलीकडेच आहे.
प्रस्तावनाकार शेख सरांनी त्यांच्या प्रस्तावनेत एक छान वाक्य लिहीलेले आहे- 'कविता लिहीण्याची प्रक्रिया जेंव्हा सुरु होते, तेंव्हा एखादी ओळ आपल्याला सुचते.ती ओळ म्हणजे त्या क्षणाचं देणं असतं' अगदी खरं आहे सरांचं. या क्षणाचं सोनं करण जमलं तर कवी पुढे नावारुपास येण्यास अधिक वाव असतं. त्याला इतर सहकाऱ्यांकडून मिळालेलं नेमकं मार्गदर्शन हे त्याचं पाठबळ असतं आणि तिच त्याच्या पुढील काव्यप्रवासाची सुखद सुरुवात असते. पण कवींनी या परिस्थितीत हुरळून न जाता आपली वाट कशी सुकर होईल, याचा अभ्यास व सराव करणे, हेही महत्वाचं आहेच.
कवी अशोक हे प्रतिभावंत कवी आहेत, हे त्यांच्या कविता वाचल्यानंतर लक्षात येते.पण त्यांची प्रतिभा आणि प्रतिमा सजविण्यासाठी जे स्पंदन आवश्यक होते, ते त्यांना वेळीच मिळविता आले नाही. त्यामुळे त्यांच्या कविता नवोदिताच्या चक्रव्युहातच फसून राहिलेल्या आहेत. पुढील काव्यप्रवासाच्या दृष्टीने त्या आवर्तनातून त्यांनी बाहेर पडणे अत्यंत आवश्यक आहे.इतरही अनेक कवी व कवितांचा त्यांनी आकलन आणि आस्वाद घेणे आवश्यक आहे. तथापी त्यांच्या काही कवितांचं कौतुक करणेही आवश्यकच आहे.
कवी अशोक यांचे पत्नीवरील प्रेम कौतुकास्पद आहे. 'आधार मायेचा' या कवितेतील पहिल्याच कडव्यात कवी पत्नीप्रेमाने भारुन सहजपणे म्हणतात- 'साथ आहे तुझी, दुधातली साय, ममतेची माय, पत्नी माझी'. एवढं प्रेमाचं सोज्वळ रुप क्वचीतच पाहायला मिळतं. पण 'नवरा म्हणजे खुट्याचा बैल असतो' (कविता-नवरा म्हणजे) असे ही प्रेमळ पत्नी आपल्या नवऱ्याविषयी बोलू शकेल का, याला उतर 'अगदीच नाही' असेच असेल. पण कविता लिहीण्याच्या नादात आणि संग्रहातील क्रम ठरवितांना मात्र गफलत झालेली असल्याने हे चाणाक्ष वाचकांच्या चटकन लक्षात आल्यावाचून राहत नाही. पण या बैलोबाची पुन्हा पत्नीप्रेमाने गुगली झाल्याचे दिसून येते. तो पुढील कवितेत पुन्हा -
'गुलाबी थंडीत घ्यावे,
शाल गरम कश्मीरी,
येईना सर गं त्याला,
कवेची ऊब गं भारी' म्हणत तिच्या कवेत ऊब घेवून मदमस्त होतांना दिसतो. तो 'गारवा' कवितेतून प्रेयसीचा पुन्हा ऊबदार स्पर्श अनुभवतो तर 'गंधाळलेल्या वाटेवर' आपल्या देवकीसह (सौ. वहिणी बरं का) प्रेमाची गाणी गातो. संसार वेलीवर उमललेल्या दोन फुलांना जपण्याचे आश्वासनही देतो. प्रितीच्या पाखरांना निमंत्रण धाडण्याची गरज नाही, तर प्रितीगंधाचा सुवास हेच त्यांचे आमंत्रण असल्याची प्रतिमा साकारतांना कवी भावविभोर झालेला दिसतो. 'माझ्या आकडेवारीच्या जगात तु काय पाहिलंस माझ्यात' असा प्रेमळ प्रश्नही तो आपल्या पत्नीला विचारतो तर तिच्या ओठांच्या स्पर्शात साऱ्या जगाच्या आनंदाची अनुभुतीही अनुभवतो. फेसाळलेल्या सागराच्या उंच लाटांनी मनात उठलेल्या वादळांना शमविण्यासाठी पुन्हा तिच्या कवेचाच आधार घेतो.(कविता- सागरी किनारा) तर सासरची आणि माहेरची अशा दोन्ही घरातील तूच 'स्वयंसिध्दा' असल्याची कबूलीही देवून तिचे ऋण फेडण्याचे प्रयत्नही करतो. स्वप्नांच्या चंदेरी दुनियेत अनुभवलेले क्षण कितीही गोड असले तरी एकदा जाग आली की बाकी काही उरत नाही, हे सांगायलाही कवी विसरत नाही.(कविता- बाकी काही नाही).इति प्रेमपुराणम् संपुर्णम्. बापरे ..! मोजून झडनभर प्रेमकवितांचा हा खजिना तर! खरंच भाग्यवान आहे त्याची प्रेयसी म्हणा किंवा अर्धांगिनी म्हणा किंवा बायको म्हणा किंवा आमच्या वहिनी म्हणा. अरे हो एक सांगायचचं राहिलं. आमच्या 'जोडीदार' या प्रातिनिधीक कवितासंग्रहादेखील त्यांची एक पस्तीसाव्या लग्नाच्या वाढदिवसाची कविता आहे बरं का, 'पस्तीस वसंताचं नातं- देविकासाठी'.
आता कोणी म्हणेल कवीला प्रेमकविता लिहायला आणि समीक्षकाला या प्रेमकवितांची मजा लुटायला बरी सवड मिळाली.तर तसे नाही. प्रेमकविता लिहीतांना हा कवी मायेची ममता देखील तेवढयाच ममतेने चित्तारतोय. हे सांगायला मी विसरणार नाही.मग ती माता शिवयारांची असो की त्यांची स्वत:ची. ममतेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न कवी या कवितेतून करतो. म्हणून 'मातोश्री' या कवितेतून 'माता व्हावी ऐसी, शिवाजी घडावा जैसी' असे सांगतांनाच 'ऐशा माता व्हाव्या, संस्कार ऐसे व्हावे, माणूसकीची मशाल, प्रत्येक ह्रदयी जागावे'. असेही कवी सांगतो. आई कवितेत- 'किती करते ममता, सारी भावंडे समान, मुला मुलींचे नसते, तिच्या जवळ मापन'. आई मुलामुलीत कुठलाही भेद करीत नाही तर सर्वांना प्रेमाने- मायेने जवळ घेते. कवेत घेते. सर्वांवर सारखेच प्रेम करते. त्यांच्या चोचीत चारा भरवतांना आपलं प्रेमही भरभरुन भरवित असते. तेंव्हाच मुलांना 'आईच्या कुशीत' शिरुन प्रेमाची ऊब घेता येते. जगण्याचे धडे मिळतात, आत्मविश्वासाचं बळं मिळते. भगीरथानं गंगेला धरित्रीवर आणलं आणि या अशोकानं आपल्या 'भगिरथाबाई' आईला कवितेत आणलं ते तिची महती सर्वांना पटवून देण्यासाठीच, याची प्रचिती येते. तसेच आपल्या लग्न झालेल्या मुलीला प्रेमानं 'जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा' असे मुसमुसत सांगतांना कवी भावविभोर झाल्याचेही दिसून येतो.
मातेसोबतच मातीची महती गायलाही कवी विसरत नाही. माता आणि माती मानवी जिवनातील अविभाज्य अंग आहेत. माता जन्म देते तर माती जगण्याचं बळ देते. या मातीची गाथा, मातीची महती गातांना कवी म्हणतो- 'धरणी शोषून घेते पाणी,
माळ रानावर होई शेती,
दगडालाही पाझर फुटतो,
उन्नत शेती सुपीक माती'.
ही माती जेंव्हा गर्भार होते तेंव्हा धरतीमातेच्या उरावरील समस्त प्राणीमात्रांना नवजीवन मिळते. 'घामाच्या थेंब थेंब धारेचे सिंचन,
गर्भार झाली माती आली वर,
रोपे आली वर टाळी वाजवित'.
हीच टाळी समस्त प्राणीमात्रांच्या जगण्याची आशा पल्लवित करते. आणि पुढे ती भोजनाच्या थाळीत अन्नाच्या रुपाने समोर येते. निसर्गवर्णन आणि ऋतूमानाच्या कविताही कवींनी लिहील्या असून या कवितांमध्येही कवीने चांगलीच रंगत भरली आहे.
श्रध्दा आणि अंधश्रध्दा यावर भाष्य करायलाही कवी विसलेले नाहीत. त्यांच्या मते श्रध्दा ही अंधश्रध्देची जननी आहे. बरोबर आहे. देवावर विश्वास ठेवणे ही श्रध्दा, तर देवाच्या नावावर बुवाबाबांवर श्रध्दा ठेवून आंधळेपणाने आणि अविचाराने वागणे, ही अंधश्रध्दा. भोळ्या जनतेच्या बुवा बाबा, तांत्रिक मांत्रिक यांच्यावरील अंधश्रध्देपोटी त्यांची दुकानदारी चालते, हे अगदी बरोबर आहे. जे जे वास्तव आहे,त्यावर विश्वास ठेवणे ही खरी श्रध्दा आहे. अंधश्रध्दा निर्मुलनाचे कार्य करणाऱ्या महामानवांचे कार्य हे विचारांच्या पलीकडचे आहे, आणि ते आपणही आत्मसात करायला हवे, असे सांगतांनाच शाम मानव,नरेंद्र दाभोळकर इ.विचारवंतांना प्रणाम करायला कवी विसरत नाहीत. मिसाईल मॅन कवितेत ते भारताचे राष्ट्रपती अब्दूल कलाम यांना श्रध्दांजली वाहायलाही विसरत नाहीत.
सिमेवरील जवानांचे या देशाप्रती योगदान व त्यांची देशसेवेप्रती असलेली श्रध्दा यावर कवी नतमस्तक होतो. 'मातृभूमी' या कवितेत -
'होऊ दे आघात किती,नाही कुणाचीच भिती,
मातृभूमी रक्षण्याशी आमची निधडी छाती'
असे छातीठोकपणे सांगतांना कवीचे ऊर अभिमानाने भरुन येते. आणि शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी-
'खरी श्रध्दांजली द्यायची असेल,
सिमेवर पेटवा रान सुडाचे,
घडधडू द्या आता तोफा बंदूका,
भस्म होई मनसुबे दुष्मनांचे' असे ठणकावून सांगतो. सच्चे दान कोणते यावर कवी 'दानधर्म' कवितेतून सांगतात ‘देशासाठी दान सैनिक करती,
सिमेवर देती बलिदान'. सैनिकांच्या या देहदानावर आमचा मान, अभिमान सर्वकाही आहे. बाकी सारे दान मिथ्या आहेत.
भारतीय संविधानाने भारतीयांना दिलेले अधिकार, प्रजासत्ताक दिनाचे महत्व, रमाबाई आंबेडकरांचे कार्य, त्यांनी भोगलेल्या व्यथा आणि याची परतफेड म्हणून बाबासाहेबांनी त्यांना अर्पिलेले थाट्स आन् पाकिस्तान ग्रंथ याची नोंद कवी जाणीवपुर्वक करुन त्यांच्याप्रती आपले ऋण फेडण्याचे प्रयत्न करतात. प्रज्ञासुर्याला मानवंदना करतात. रमाबाईपुढे नतमस्तक होतात. भारतीय संविधानाचा अभिमान बाळगतात. अनैतिक संबंध कायदा ४९७ वर कविता लिहीणारा माझ्या माहितीप्रमाणे हा पहिलाच वैदर्भीय कवी आहे.
निवडणूकीच्या निमीत्ताने पांढरे डगले घालून हातपाय जोडणाऱ्या आणि नंतर मतदारांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या बगलाभगतांचे वर्णनही कवी मोठ्या खुबीने करतात. व संग्रहाच्या शेवटी त्यांना प्रश्नही विचारतात-
'माझ्या अंगणात तुहं काय काम रं,
तु आस्वासन देणारा, तुहं खरं नाय रं'.
आणि म्हणूनच माझ्या या चार ओळी अशोकासाठी-
अशोका दोस्ता, तुझ्याच मते,
गर्भात गुदमरु देऊ नकोस कवितेला, प्रसव वेदनेचा आनंद उपभोगू दे
नवकवी नावाच्या काव्यमातेला
प्रसवू दे शब्दांना जरी असतील ते
अपंग अबोल अधुरे अनामिक
सुदृढ असेल तर फारच छान
नसेलच तर पाजायला बाळकडू आण
मात्र, जन्माआधी होवू नये गर्भपात कवितेचा
किंवा गर्भातच मरु नये ही गोंडस प्रतिमा.
कवितेला आकार येवू दे, जन्म घेवू दे
मगच ठरवू ती कुपोषित आहे की सुदृढ
आणि करु या तिचे पालनपोषण, औषधोपचार.
देवून आपण परिक्षणाचे डोज आणि समीक्षणाचे संस्कार.
घेवू या आपण काळजी संवर्धनाची,
तिच्या, त्याच्या आणि आपल्याही जाणिवांना
बळकट करण्याची.
000
- चुडाराम बल्हारपुरे .
भ्रमणध्वनी-९६२३६६३४३५
"विचारांच्या पलीकडे" (कवितासंग्रह), कवि – अशोक बी. कांबळे
प्रकाशक- शिवानी पब्लिकेशन, मुंबई, किंमत- रु. १००/- फक्त.
000