शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

महात्मा फुले : सर्वकष गुलामगिरीवर हल्ला करणारे थोर समाजक्रांतिकारक


 दि.२८ नोव्हेंबर २०२५ क्रांतिसूर्य महात्मा जांतीराव फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त लेख

-------------------------------------------------------

महात्मा फुलेंच्या । कार्याला नमन ।

करांनी वंदन । स्मृतिदिनी ॥


       थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ,स्वतःचे संपूर्ण आयुष्य समाजसुधारणा आणि सत्यशोधनासाठी समर्पित करणारे महान व्यक्तिमत्त्व,भारतातील सामाजिक गुलामगिरीच्या विरूद्ध बंड पुकारणारे आणि सर्वंकष गुलामगिरीवर हल्ला करणारे क्रांतिकारक, बहुजनांचे मुक्तिदाता,  स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक,कृषितज्ज्ञ,अर्थतज्ज्ञ,आधुनिक नाटककार,निबंधकार, आद्य शिवचरित्रकार,पुणे नगरीचे आयुक्त,सत्यशोधक क्रांतिपूर्य महात्मा जोतीराव फुले यांना आज दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी असलेल्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

          महात्मा फुले यांचा जन्म पुणे येथे सन : १८२७ सालातील एप्रिल महिन्याच्या ११ तारखेला झाला.समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करणे हे त्यांचे ध्येय होते.स्त्री-शिक्षणाचे महत्त्व त्यांनी सर्वात आधी ओळखले. दि.१ जानेवारी १८४८ मध्ये त्यांनी पुणे येथील भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला त्यांनी विद्येचे द्वार उघडे केले.ही शाळा सुरू करून त्यांनी एका नव्या शैक्षणिक युगाचा ओनामा केला.त्यांच्या या कार्यात त्यांची भार्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी खंबीरपणे साथ तर दिलीच शिवाय महात्मा फुलेंच्या निधनानंतरही त्यांचे कार्य स्वतःच्या अंतापर्यंत सुरू ठेवले.महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन स्वतः स्थापन केलेल्या शाळेमध्ये शिक्षिका बनविले. त्यांनी सुद्धा ते कार्य अंगावर दगड ,धोंडे व शेणाचा मारा सहन करून पूर्णत्वास नेले ; म्हणूनच सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.

        फुले दाम्पत्यांनी अस्पृश्यता आणि जातिभेदाविरुद्ध तीव्र लढा दिला होता.शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हितासाठी त्यांनी फार मोठे कार्य तत्कालीन काळात करून शेतकरी व कष्टकरी यांना न्याय मिळवून दिला. दि.२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली. सत्यावर आधारित जीवन जगण्याची शिकवण समाजाला देणे हा सत्यशोधक समाजाचा उद्देश होता.

‘विद्येविना मती गेली,

 मतीविना नीती गेली, 

नीतीविना गती गेली, 

गतीविना वित्त गेले, 

वित्ताविना शूद्र खचले, 

इतके अनर्थ एका अविद्येने केले.’

या त्यांच्या सुविचारातील त्यांच्या मनातील तत्त्वज्ञान आजही शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते.

       महात्मा फुले यांना 'महात्मा' ही पदवी मुंबईतील कष्टकरी जनतेच्या वतीने मुंबईतील लोकांनी,मुख्यत्वे रावबहादूर वड्डेदार (रावबहादूर बेडेकर) यांच्या हस्ते दि.११ मे १८८८ रोजी मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथील वडगांव गादी रघुनाथ (रघुनाथ महाराज) सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात ​त्यांच्या महान सामाजिक कार्याची  दखल घेऊन मुंबईतील जनतेने जोतीराव फुले यांना "महात्मा" ही पदवी प्रधान केली.त्यांनी रुढीवादी विचारांना आव्हान दिले आणि मानवतेला सर्वोच्च स्थान दिले.प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे हा त्यांचा महत्त्वपूर्ण विचार आहे . त्यांचा हा पुरोगामी आणि आधुनिक विचार आजही प्रेरणादायी आहे .

              क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी लिहिलेल्या विविध प्रकाशित व अप्रकाशित पुस्तकातून - नाटकातून स्वतःचे परिवर्तनवादी  विचार बहुजन समाजापर्यंत पोहोचविण्याचा सतत प्रयत्न केला.महात्मा फुले यांचे महत्त्वाचे प्रकाशित साहित्य :

(१) नाटक तृतीय रत्न - इ.स. १८५५ - या नाटकात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व,अज्ञान व अंधश्रद्धेवर टीका केलेली आहे.हे मराठीतील पहिले आधुनिक सामाजिक नाटक मानले जाते.(२) छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा - जून - १८६९ छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व शौर्य या वाड्यात त्यांनी वर्णन केले आहे .(३)पोवाडा -विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी -जून - १८६९ - या पोवाड्यातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील ब्राह्मण शिक्षकांची मक्तेदारी आणि शूद्रांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. (४)ब्राह्मणांचे कसब - इ.स. १८६९ - या पुस्तकात त्यांनी ब्राह्मण पुरोहितांकडून होणारी फसवणूक आणि धार्मिक कर्मकांडांवर टीका केली.(५) गुलामगिरी -इ.स.१८७३ - या पुस्तकात त्यांनी शूद्र-अतिशूद्रांच्या गुलामगिरीचे ऐतिहासिक आणि सामाजिक विश्लेषण अतिशय मार्मिकपणे केले आहे .हे पुस्तक त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांना समर्पित केले. (६) शेतकऱ्याचा असूड -१८ जुलै १८८३ - या पुस्तकात त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाचे व दुर्दशेचे चित्रण,त्यांच्या समस्या आणि उपाय दिलेले आहेत. आज शेतकऱ्यांच्या घराघरात या पुस्तकाचे वाचन होणे आवश्यक आहे म्हणजे तशा प्रकारची शेती करून आजचा शेतकरी समृद्ध व सुखी होईल व आत्महत्येपासून परावृत्त होईल.(७) काव्य - अखंडादी काव्य  रचना - इ.स.१८८७ - या 'अखंडातून' जातीभेद, धर्म आणि कर्मकांडांवर टीका आहे.आज प्रत्येक अखंड सुविचार बनलेला आहे.

"एक दिन तरी मद्य वर्ज करा ।

 तोच पैसा भरा ग्रंथासाठी ॥"

ग्रंथाचे मोल सांगणारा हा अखंड आज प्रत्येक ग्रंथालयात सुविचाराच्या स्वरूपात आपल्याला दिसतो.असे विविध विषयावरील त्यांचे अखंड सर्वांनाच प्रेरणा देत राहणार आहेत.लेख मोठा होण्याच्या भयास्तव मी येथे ते देऊ शकत नाही.यासाठी वाचकांनी महात्मा फुलेंची अखंडादी काव्यरचना जरूर वाचावी.(८) सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक -एप्रिल - १८८९ मध्ये महात्मा फुले यांनी त्यांचे हे अखेरचे पुस्तक लिहिले .हे 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक'  पक्षाघाताच्या (अर्धांगवायूच्या) आजारात असताना लिहिलेले आहे.​आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना पक्षाघाताची बाधा झाली होती,ज्यामुळे त्यांचा उजवा हात निकामी झाला होता.​आपला उजवा हात निकामी झाला असतानाही त्यांनी निराश न होता डाव्या हाताने हे महत्त्वाचे पुस्तक लिहून पूर्ण केले. शूद्रादी- अतिशूद्रांसह सर्व मानवांच्या हितासाठी त्यांनी हा ग्रंथ रचला. या संवादात्मक पुस्तक धर्म, पाप,पुण्य इत्यादी विषयांवर असून त्यातून त्यांनी स्वतःला अभिप्रेत असलेल्या 'सार्वजनिक सत्यधर्माची' तत्त्वे स्पष्ट केलेली आहेत.महात्मा फुले यांचा दि.२८ नोव्हेंबर १८९० मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तक पुत्र यशवंत फुले यांनी हे पुस्तक १८९१ मध्ये प्रकाशित केले.

            वरील आठ प्रकाशित पुस्तकाच्या व्यतिरिक्त इतर लेखन व निवेदन त्यांनी लिहिलेली आहेत.(९) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट - २० मार्च १८७७ .(१०) दुष्काळविषयक पत्रक - दि .२४ मे १८७७ (११) हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन - दि.१९ ऑक्टोबर १८८२ यात त्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी केली होती.(१२) सत्सार भाग १ व २ -इ.स. १८८५ - महात्मा फुले यांनी 'सत्सार' हे मासिक निबंधांच्या स्वरूपात दोन अंकामध्ये प्रकाशित केले.​यामध्ये त्यांनी प्रामुख्याने बहुजन समाजावरील मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी ​ब्राह्म समाज आणि प्रार्थना समाज यांच्या विचारधारेवर चर्चा,​वेगवेगळ्या जातींतील लोकांपासून जन्मलेल्या मुलांची सामाजिक स्थिती,​आर्यभट्टांचे (आर्य लोकांचे) विचार व विचारधारा तर ​दुसऱ्या भागात त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.​थोडक्यात, त्यांच्या सत्यशोधक चळवळीचे आणि सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्याचे विचार स्पष्ट करणारे एक महत्त्वाचे साहित्य म्हणजे सत्सार होय.(१३) इशारा (ग्रंथ) -ऑक्टोंबर इ.स. १८८५ -इशारा ​हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या वैचारिक लढ्यातील एक महत्त्वाचा भाग आहे .ज्यामध्ये सत्य, समता आणि मानवी हक्क यावर आधारित समाज निर्मितीवर भर दिला गेला होता.'इशारा' हा ग्रंथ सुधारणेच्या नावाखाली समाजातील मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव नसलेल्यांना महात्मा फुले यांनी दिलेला कडक इशारा होता. (१४) ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर -२९ मार्च  १८८६ .(१५) सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी (जून - १८८७)अप्रकाशित ग्रंथ: अस्पृश्यांची कैफियत .अशी महात्मा फुले यांची विविधता पूर्ण परिवर्तनवादी साहित्य संपदा आहे .

            सन : १८९० सालातील नोव्हेंबर महिन्याच्या २८ तारखेला महात्मा फुले यांचा मृत्यू झाला पण त्यांचे सर्व क्षेत्रातील कार्य समाजाला आजही प्रेरणा देत आहे.महात्मा फुले यांचा विचार त्यांच्या आज असलेल्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त आचरणात आणून आदरांजली अर्पण करू या.

महात्मा फुलेंचा । आज स्मृतीदिन । 

करांनी वंदन । कोटी कोटी ॥


    महात्मा फुले राज्यस्तरीय

 आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

   अभंगकार व साहित्यिक

 प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, अमरावती.८०८७७४८६०९.

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

स्त्रीशिक्षण आणि समाजजागृतीचे प्रवर्तक : महात्मा जोतिबा फुले-प्रा.डॉ.दीपक सुभाषराव सूर्यवंशी

 


स्त्रीशिक्षण आणि समाजजागृतीचे प्रवर्तक : महात्मा जोतिबा फुले


महात्मा जोतिबा फुले यांची १३५ वी पुण्यतिथी. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा आढावा घेतांना तत्कालीन भारतीय समाजात प्रचलित असणारी समाज, शिक्षण व्यवस्था आणि तिचे स्वरूप लक्षात घेणे आवश्यक आहे. दीन दलितांचे कैवारी, नवसमाजरचनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते,स्त्री शिक्षणाचे जनक,मानवतावादाचे पुजारी,युगप्रवर्तक महात्मा फुले यांचे कार्य कालातीत आहे. शिक्षणातूनच खरे समाजपरिवर्तन होते, आधी शिक्षण दिले पाहिजे, याचं विचारधारेतून १८ व्या शतकात भारतात सर्वत्र इंग्रजांचे साम्राज्य पसरले होते. दीन-दलित,बहुजन व स्त्रियांना योग्य शिक्षण-समानतेचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील समाजसुधारकांचा उदय झाला,यामध्ये सर्वात अगोदर क्रम लागतो, तो महात्मा जोतीराव गोविंदराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा. तद्नंतर याचं परंपरेत राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे,डॉ.बापूजी साळुंखे, डॉ.पंजाबराव देशमुख यांच्याच कार्याची प्रेरणा घेऊन मराठवाड्यात शिक्षण प्रचार व प्रसाराचे कार्य शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी केले आहे. बहुजन समाज शिक्षणाच्या परिप्रेक्षात आणण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. भारतीय समाजाचा इंग्रजी समाज संस्कृतीशी संबंध आलेला होता, अनेक जुन्या चालीरीती प्रथा-परंपरा अनिष्ट कर्मकांड अशा बाबींचा सामान्य नागरिकांसमोर प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेक अडचणी निर्माण होत होत्या, या सर्व अवलोकन करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य उत्तम रीतीने केले आहे   



                महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अलौकिक व व्यापक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर असे म्हटले,तसेच दुसरे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना हिंदुस्थानचा वॅशिंग्टन असे म्हटले आहे.उपेक्षित दीन दलित तरुणांना त्यांच्या सामाजिक जीवनात माणूस म्हणून त्यांना वागणूक देण्यात यावी.यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अविरत परिश्रम घेतले. ज्योतिबांचे पूर्वज सातारा येथील कटगुण येथे राहत असत, त्यावेळी त्यांचे आडनाव गोरे असे लावले जाई. पुढे ते पुण्यात स्थायिक झाले. तेथे ज्योतिबांचे वडील गोविंदराव भाजीपाला- फुलांचा व्यवसाय करू लागले.त्यांचा हा व्यवसाय त्या काळामध्ये नावारूपाला आला.यामुळे त्यांचे फुले हेच आडनाव कायमस्वरूपी झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायात स्थिर झाल्याने ते पुणे येथे स्थायिक झाले. गोविंदरावांनी धनकवडीच्या झगडे पुण्यातील चिमणाबाई सोबत विवाह केला. त्यांना दोन मुले झाली. त्यातील थोरला राजाराम व धाकटा ज्योतिबा म्हणजेच महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक आणि दलितोद्धाराचे काम करणारे ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षी ज्योतिबा शाळेत जाऊ लागले. परंतु शूद्राने शाळेत शिक्षण घेणे महापाप असे तत्कालीन सामाजिक परिस्थितीत मानले जात असे. याचवेळी त्यांच्या वडिलांना एका मुसलमान व इंग्रज गृहस्थाने शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून सांगितले. हे ऐकून महात्मा फुले यांना त्यांच्या वडिलांनी शिक्षण घेण्यासाठी इंग्रजांच्या ख्रिस्ती मिशनरी शाळेत टाकले. याच पाश्चिमात्य विचारवंत थॉमस पेन यांचे राईट ऑफ मेन हे पुस्तक वाचनात आले ,त्यावेळी त्यांना कळले की तत्कालीन समाजातील व धर्मातील दारिद्र्य विषमता ही ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहे.या काळात त्यांच्यापुढे प्रसंग अनुभवता आला ते परांजपे नावाच्या एका मित्राच्या लग्नात गेले होते. मात्र गरीब-शूद्र असल्याने लग्नात वरातीमागून जाताना त्यांना हाकलून देण्यात आले. तेव्हापासून या प्रसंगावर त्यांनी खूप चिंतन केले,त्यातूनच समाजात असणारी प्रचंड विषमता याविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली महात्मा फुले यांनी प्रचलित हिंदू समाजातील मतलबी रुढीचा प्रथा-परंपरांचा अंधश्रद्धेचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर लहुजी वस्ताद कडून शारीरिक व्यायामाचे धडे गिरवले, समाजात असणारी गरीबी श्रीमंतीची दरी दिवसेंदिवस वाढत जाते,हे केवळ विशिष्ट वर्गातील सत्ता प्रभावामुळे सामान्य लोकांच्या जीवनात प्रचंड मोठी गुलामगिरी येताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपले भावी आयुष्य त्यातील दिशा ठरवून दिले.कोणत्याही सरकारी नोकरी शिवाय सामाजिक कार्य करायचे असा त्यांनी निर्धार केला. भारतीय समाजातील दारिद्र्य दूर करण्यासाठी एकमेव पर्याय आहे.तो म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहात सर्व सामान्य व्यक्तीला आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुढे १८४७ पर्यंत महात्मा फुले यांनी शिक्षण घेतले त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि १८४८ मध्ये पुणे येथे मुलींची भिडेवाडयात पहिली स्वतंत्र शाळा काढली. तत्कालीन पडलेल्या समाजाला त्यांचे कार्य रुचले नाही, अनेक लोकांनी विरोध केला तरी परंतु त्याची पूर्वतयारी म्हणून महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला सर्वप्रथम शिक्षण दिले, सावित्रीबाईंनी आपल्या पतीच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात मनापासून केले, याचा परिणाम म्हणून १८५१ मध्ये दुसरी शाळा अनुक्रमे मुलींसाठी शाळा काढली आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या परंपरेला शाळेच्या माध्यमातून सुरुवात झाली ,तत्कालीन त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या सर्वच शाळा अत्यंत व्यवस्थितपणे चालवल्यामुळे त्याची दखल घेऊन तत्कालीन इंग्रज अधिकारी सर मेजर कँडी यांनी सरकारतर्फे ७५ रुपये अनुदान त्यांना दिले.,१८६२ बालहत्याप्रतिबंधक गृह काढले, १८६८ अस्पृशांसाठी घरचा पाण्याचा हौद खुला केला. भारतीय समाजाला प्रगती कडे घेऊन जायचे असेल तर भ्रामक रुढी, प्रथा, परंपरा, अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता व कर्मकांड इ. गोष्टींचे उछाटन करणे आवश्यक आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. तसेच आपल्याला ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांची कास धरावी लागेल. सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक,अस्पृश्य वर्गाच्या कार्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला ,स्वातंत्र्य, समता, बंधुता, बुद्धिप्रामाण्यवाद यासाठी ते पडू लागले ,सतीची प्रथा विवाह अंधश्रद्धा निर्मूलन अशा समाजविधायक कार्यात त्यांनी प्रचंड मोठे योगदान दिले.ते खऱ्या अर्थाने बोलके सुधारक नसून कर्ते सुधारक होते ,केवळ शाब्दिक विरोध न करता आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी म्हणून अनेक ठिकाणी बालहत्या प्रतिबंधक गृह ही संस्था सुद्धा सुरू केली. त्याचबरोबर दैन्य दारिद्र्यात खितपत पडलेले जे बहुजनांसाठी घरातील पाण्याचा हौद खुला केला, भारतीय समाजाचा अन्नदाता पोशिंदा असणारा शेतकरी वर्ग हा खऱ्या अर्थाने मागासलेला आहे, वर्षानुवर्ष अज्ञान अंधश्रद्धा चालीरीती रूढी प्रथा परंपरा व गुलामगिरीत अडकलेला आहे.असंघटित असल्याने त्यांचे अतोनात हाल होतात हे ओळखून त्यांना एकत्रित आणण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली. महात्मा फुले यांनी सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून शेतकऱ्यांचा आसूड १८८३,गुलामगिरी १८७३, ब्राह्मणांचे कसब १८५५ शिवाजी महाराजांचा पोवाडा ,सार्वजनिक सत्यधर्म ,इशारा ,अखंड व सत्सार १८५५ ,तृतीय रत्न हे नाटक आदी ग्रंथाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या समाजास अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानरुपी प्रकाशात आणण्यासाठी समाजजागृती केली.मूलगामी तर्कशुद्ध लेखन केल्याचे गुलामगिरी या ग्रंथातील “विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली।

गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले” यावरून लक्षात येते.



खरे तर शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे.दलित-अस्पृश्य, स्त्रिया, शेतकरी,मजूर व बहुजन समाज यांच्यासाठी अनाथाश्रम, स्थापन केले.आपल्या सर्वांचा असलेला समाजाचा कणा असलेला घटक म्हणजे शेतकरी होय, याची जाणीव त्यांना होते .त्यामुळे विशेषतः शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, असा अट्टाहास त्यांनी केला होता. स्वातंत्र्य, समता,लोकशाही ,विज्ञान ,इतिहास आणि संस्कृती यावर भर देऊन सामाजिक विचारांची क्रांती केली वयाच्या ६० व्या वर्षी त्यांना मुंबई येथील सामान्य जनतेचे वतीने रावबहादुर वडेकर यांनी महात्मा ही पदवी बहाल केली.

प्राथमिक शिक्षण व्यवहारात उपयोगी पडेल, अशाप्रकारचे असावे. अशा प्रकारच्या शाळांना निरीक्षण समिती स्थापन करून त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे. स्थानिक कराच्या ५०% खर्च प्राथमिक शिक्षण व्यवस्थेवर करावा. वयाच्या १२ वर्षापर्यंत शिक्षण सक्तीचे व मोफत उपलब्ध करून घ्यावे. तसेच महार मांग, व मागासवर्गीयाकरिता सरकारने वेगळ्या शाळा सुरू कराव्यात.शालेय विद्यार्थ्यांना सहली व प्रोत्साहनपर बक्षीस,शिष्यवृत्ती देण्यात यावे. तसेच पारंपरिक शिक्षणापेक्षा प्रशिक्षित शिक्षकांची सुविधा करण्यात यावी.तसेच जिथे प्रमाणपत्रित शिक्षकांची जिथे नियुक्ती झालेली नसेल तिथे मुळीच अनुदान देण्यात येऊ नये.”

शिक्षणाच्या माध्यमातून जे ज्ञान मनुष्याला होते, शिक्षणाअभावी व्यक्ती हा पशुसमान आहे, त्यावरच वैचारिक प्रगल्भता ज्ञानावरच अवलंबून असते. असा माणूस हा एकप्रकारे पाषाणाच असतो.उचभ्रू समाजाने शिक्षण व ज्ञानाचे दरवाजे शूद्र अतिशूद्रांसाठी बंद असल्याने त्यांना त्यांच्या अवस्था अत्यंत बिकट झालेल्या होत्या.ज्योतिबानी दूरगामी शिक्षणाची व्यवस्था ब्रिटीशांकडून तशी अपेक्षा व्यक्त केली होती.त्यांनी तत्कालीन असलेल्या शिक्षणविषयक झिरपता सिध्दांताला विरोध केला होता आणि स्वतंत्र अशा सार्वत्रिक शिक्षणाची संकल्पना मांडली होती,पुढे त्याची अंमलबजावणीसाठी अलीकडच्या काळातील शासनाने प्रयत्न केले आहेत.सर्व समावेशक सर्वांसाठी विशद केली होती.

एकूणच महात्मा फुले हे त्रेसष्ट वर्ष चंदनासारखे भारतीय समाजाच्या उत्थानासाठी प्रवास करीत राहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि लोकशाही मुळातवर सातत्याने भर दिला.स्त्री आणि पुरुष यांच्यातील मतभेद त्यांना मान्य नव्हता.ते नेहमी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना अधिकार असावेत ,एक स्त्री शिकली तर कुटुंब साक्षर होते, ते असे मानीत, जन्मतः स्त्री आणि पुरुष हे स्वतंत्र आहेत.त्यांना निवडीसाठी समान संधी आहे.मत मांडण्याचा स्त्रियांनाही सारखेच हक्क आहेत. शिक्षक हा समाजाला दिशा देणारा महत्त्वाचा घटक असून शिक्षकाची जबाबदारी केवळ शाळेपुरती मर्यादित नाही, त्याचा समाजाशी घनिष्ठ संबंध निर्माण होणे तितकेच आवश्यक असते. तसेच शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक समाजशास्त्र ही संकल्पना महत्त्वाची असून शिक्षण व समाज यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास असणे आवश्यक असल्याचे मत मांडले. ते म्हणत आपण सर्वजण एकाच निर्मिकाची लेकुरे आहोत.मग आपुल्याच निर्मिकाची (देवाची) भेट (दर्शन) घेताना मध्यस्थांची गरज नसते.ज्या प्रमाणे आई- वडिलांना भेटायला कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थांची गरज नसते. त्यांच्या या असीम कार्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपले गुरू मानले. संत वचनाप्रमाणे “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” अशा या अविरतपणे समाजपरिवर्तनासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी २८ नोव्हेंबर १८९० रोजी जगाचा निरोप घेतला.


प्रा.डॉ.दीपक सुभाषराव सूर्यवंशी

( प्राध्यापक, मराठी विभाग)

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब जि.धाराशिव 

deepaks2021@gmail.com

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

“वाचनगंध” — शब्दांच्या सुगंधातून उमलणारी क्रांती.



 *“वाचनगंध” — शब्दांच्या सुगंधातून उमलणारी क्रांती..*


वाचन ही कृती नसून संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला नवा प्राण फुंकण्याचं कार्य लेखिका प्रीती जगझाप यांनी “वाचनगंध” या त्यांच्या चित्रकथेतून केलं आहे.ही कथा म्हणजे बालमनाच्या अंतःकरणात जागा होणाऱ्या ज्ञानाच्या ज्योतीची गोष्ट आहे.

अथर्व आणि आरोही ही दोन नावे जरी लहान वाटली, तरी त्यांच्यात एक मोठा अर्थ आहे.तो म्हणजे “वाचन हीच क्रांती, सृजन हीच साधना.”शाळेच्या चिखलात उगवणारी ही दोन फुलं आपल्या संवेदनांना सुगंधित करतात. बाईंच्या प्रेरणेने त्यांच्यात जो वाचनाचा पेटलेला ज्वालामुखी तो फक्त पुस्तकापुरता नाही तर तो विचारांच्या अभ्युदयाचा आरंभ आहे. “कोण बनेल वाचनवीर” हा उपक्रम म्हणजे अक्षरांचा उत्सव आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचं जनमस्थान आहे.प्रीती जगझाप यांच्या लेखणीत एक आश्चर्य आहे. साधेपणातून झरतं सौंदर्य आहे. त्यांच्या ओळींमध्ये ध्वनी नाही, पण अर्थाचा घणाघात आहे.त्या वाचनाला खेळ बनवतात, आणि खेळाला विचार. मुलं कविता लिहितात, चित्रं काढतात, आणि शेवटी त्या शब्दफुलांचा सुगंध गावभर दरवळतो.मंत्र्यांच्या कार्यक्रमात हार फुलांना खूप महत्त्व दिल्या जाते.पण शेवटी फुलांच्या सुगंधापेक्षा शब्दांचा सुगंध अधिक काळ टिकतो ते मंत्रीमहोदयांना पटल आहे.तोच सुगंध मंत्रीमहोदय आपल्या सोबत घेऊन जातात हे ही त्यात नमुद केलं आहे."शब्दफुलांचं महत्त्व अधिक काळ टिकतो" ही ओळच या कथेचं आत्मसुत्र आहे.

वाचणगंध या पुस्तकातून मुलांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळत आहे. मुलांचे प्रोत्साहन आणि कौतुक करून लेखिकेने त्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे. लेखिकेने वाचनाला केवळ एक छंद न मानता ते जीवन समृध्द करणारे साधन म्हणून पाहीले आहे. या पुस्तकाची भाषाशौली साधी सरळ आणि ओघवती आहे. वाचनाचा आनंद आणि यातून निर्माण होणारे विचारप्रवाह वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहचतात, लेखिकेने विषयाची निवड अर्थपुर्ण आणि प्रेरणादायी मांडली आहे. वाचनसंस्कृती वाढविण्याचा कटाक्ष प्रयत्न यात दिसून येत आहे.वाचकाला विचार करायला लावणारी मांडणी यात आहे.वाचणाची गोडी वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी वाचनगंध ही एक मार्गदर्शन आणि प्रेरणादायी कथा आहे.ही कथा म्हणजे वाचन संस्कृतीचा बालमहाकाव्य आहे.

जिथे बाईंची प्रेरणा म्हणजे झाड, आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न म्हणजे फळं आहे असं ही कथा शिकवून जाते. 

         वाचाल तर वाचाल!

       शब्दांतून विचार जन्मतो,                              

        विचारांतून समाज घडतो.

 

प्रीती जगझाप,यांच लेखन म्हणजे

म्हणजे पाण्याच्या थेंबातून झऱ्याची निर्मिती.त्यांच कार्य म्हणजे मुलांच्या मनात पेटवलेली अक्षरज्योत जी एके दिवशी समाजाचा दीप बनेल.अशा

शब्दकन्येला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा तिच्या प्रत्येक चित्र कृतीतून प्रत्येक विद्यार्थी असाच फळू दे नी फुलू दे..




- संगीता बांबोळे-बोरकर,

गोंडपिंपरी,चंद्रपूर

 Mo.9405718463

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

प्रा.जावेद पाशा यांचे शिवाजी महाराज, डॉ. आम्बेडकर और मुस्लिमों की भूमिका या ग्रंथाचे प्रकाशन




 प्रा.जावेद पाशा यांचे शिवाजी महाराज, डॉ. आम्बेडकर और मुस्लिमों की भूमिका या ग्रंथाचे प्रकाशन

शब्दशिल्प/नागपूर_प्रा. जावेद पाशा सर यांच्या शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर और मुस्लिमों की भूमिका या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 23 नोव्हेंबर, रोज रविवार रोजी दुपारी ४ वाजता डॉ आंबेडकर भवन, उरिवेला कॉलनी नागपूर येथे करण्यात आले. यावेळी लेखक व विचारवंत जावेद पाशा कुरेशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष - जनार्दन मून, उद्घाटक - नागेश चौधरी, प्रकाशन हस्ते  प्रा. विनय मिरासे तसेच वक्ते _यामिनी चौधरी, महेंद्र गोस्वामी, प्रा. रमेश बिजेकर इत्यादी उपस्थित होते.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

माझी अंदमान यात्रा - एक प्रवासवर्णन - सौ. रेखा देशमुख



 माझी अंदमान यात्रा - एक प्रवासवर्णन 

करावे पर्यटन, मन होते प्रसन्न 

म्हणूनच घ्यावा अनुभव, प्रत्येकाने. 

पर्यटन मध्ये की सर्वांचाच आवडता विषय. मला नवनवीन स्थळ पाहायला खूप आवडतात. विशेषतः  निसर्गरम्य स्थळे, समुद्रकिनारे हे माझे आवडते ठिकाणं. शाळेमध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे पाठ शिकवताना सावरकरांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा, त्यांना पोर्ट ब्लेअर मधील ज्या सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आले होते तो जेल, ते तीर्थस्थान पाहायला मिळावे, सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर पाय ठेवून तेथे नतमस्तक व्हावे अशी माझी बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती. पण नोकरीच्या काळात ती इच्छा पूर्ण करता आली नाही. मात्र माझी ही इच्छा शेवटी पूर्ण झाली. अंदमान म्हटलं की नुसत्या नावानेच अंगावर शहारा येतो. आपल्या डोळ्यासमोर सेल्युलर जेल आणि त्याचा काळा इतिहास क्षणभर उभा राहतो. भारताला स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना समर्पित या स्मारक स्थळी त्यांना झालेल्या कठोर कारावासाची आठवण येते. खरंतर प्रत्येक भारतीयाने इथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ज्यांनी देशासाठी प्राण दिले अशा भारताच्या अनेक सुपुत्रांपुढे नतमस्तक व्हायलाच हवं.  या कठोर शिक्षेला ते कसे सामोरे गेले असतील? त्यांचे योगदान कणखरपणा धैर्य आणि सहिष्णुतेला खरोखरंच नमन करावेसे वाटते.

 राजविलास ट्रॅव्हल्स अँड टुरिस्ट कडून मी अंदमान निकोबार टूरवर जाऊन आले. ते प्रवास वर्णन मी ललितलेखातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.

अंदमान निकोबारची बेटे हा भारतीय केंद्रशासित प्रदेश आणि पोर्ट ब्लेअर ही इथल्या एकूण ५७२ बेटांची राजधानी. बंगालच्या खाडीच्या पश्चिमेला आणि अंदमान समुद्राच्या पूर्वेला ही बेटे वसलेली आहेत. तर ग्रेट निकोबार मधील इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. पर्यटनासाठी अंदमान अतिशय सुंदर आहेच, पण भारतीयांसाठी हा एक मानाचा तुरा आहे अंदमानला अतिशय स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे लाभले आहेत.

 दि. १८ मार्च २०२३ शनिवारला दुपारी दोन वाजता आम्ही नागपूर येथून ट्रेन नं. १२०६८ चेन्नई- जयपूर एक्सप्रेस ने प्रस्थान केले व दि. १९ ला रविवारी नऊ वाजता आम्ही चेन्नई येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. चेन्नईला हॉटेलमध्ये फ्रेश होऊन जेवण करून आम्ही चेन्नई मधील महत्त्वाची स्थळे पाहण्यासाठी निघालो. सर्वप्रथम आम्ही चेन्नईमध्ये स्नेक पार्क पाहिला. तिथे विविध प्रकारच्या सापांच्या प्रजाती पाहायला मिळाल्या. नंतर आम्ही गव्हर्मेंट म्युझियम पाहिले. तदनंतर विवेकानंद हाऊस पाहायला गेलो. समोरच विवेकानंद यांची भव्य संगमरवरी मूर्ती मनाला आनंद देते. विवेकानंद हाऊसची इमारत दोन मजली आहे. तेथील चित्रकला, विवेकानंदांचे फोटो, त्यांच्या पावन स्मृती पाहताना आम्ही भारावून गेलो. तिथेच आम्ही विवेकानंदांच्या जीवनावर आधारित सुद्धा पाहिला. त्यानंतर आम्ही चेन्नई मधील प्रसिद्ध मरीना बीच पाहायला गेलो. मरीना बीच भारतातील सर्वाधिक लांबीचा म्हणजेच १३ किलोमीटर लांब पसरलेला नैसर्गिक समुद्रकिनारा आहे. वाह!! खूपच छान! असे शब्द हा समुद्रकिनारा पाहताना आपसूकच तोंडातून निघतात. तेथे समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आम्ही बराच वेळ थांबलो. पण मन मात्र तिथून निघत नव्हते. त्यानंतर आम्ही हॉटेलवर आलो आणि जेवण वगैरे करून तिथे मुक्काम केला.

 दुसऱ्या दिवशी दि. २० ला सोमवारी सकाळी सात वाजता चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलो. चेन्नई वरून ८.५० मिनिटांनी विमानाने पोर्ट ब्लेअर ला प्रस्थान केले. ११.३० ला आम्ही पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो.  तिथून सरळ हॉटेलवर जाऊन तिथे नाश्ता केला आणि लगेच पोर्ट ब्लेअर मधील स्थळे पाहायला सज्ज झालो. पोर्ट ब्लेअर मध्ये आम्ही सर्वात प्रथम कॉर्बिन कोव्ह बीच हा अंदमान मधील सुंदर व स्वच्छ निसर्ग सौंदर्याने नटलेला बीच पाहायला गेलो. तेथील समुद्राच्या फेसाळत्या लाटांचा मनमुराद आनंद लुटला. मोटर बोटीची सैर केली. तेथून आम्ही पोर्ट ब्लेअर मधील सेल्युलर जेल पाहायला गेलो. एकेकाळी स्वप्नातील स्थान आज मी प्रत्यक्ष पाहत होते. माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. गेटमधून आत प्रवेश करताच आम्हाला गाईडने इत्यंभूत माहिती द्यायला सुरुवात केली. त्यांच्या सांगण्यानुसार सेल्युलर जेलमध्ये एकूण ६९४ खोल्या आहेत. ऑक्टोपस प्रमाणे मध्यभागी एक मनोरा व त्यातून निघणाऱ्या सात शाखा प्रत्येक शाखेला तीन मजले आणि प्रत्येक मजल्यावर २१ कोठड्या असं गाईड सांगत होता. त्याच्या म्हणण्यानुसार आता मात्र यातल्या तीन शाखा पर्यटक पाहू शकतात. आम्ही सावरवीर सावरकरांना ज्या कोठडी ठेवण्यात आले होते ती कोठडीत पाहिली. तेव्हा अक्षरशः हृदय भरून आले.



 सावरकरांनी लिहिलेल्या गीताचे स्मरण झाले.

 ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला... 

भूमातेच्या चरणातला तुझ धुता, मी नित्य पाहिला होता...

 मज वदलासी अन्य देशी चल जाऊ. सृष्टीची विविधता पाहू... 

तई जननी- हृदय- विरह शंकीतही झाले,परि तुवा वचन तिज दिधले...

मार्गज्ञ स्वये मीच पुष्टी वाहीन, त्वरित या परत आणीन...

         -   कवी स्वातंत्र्यवीर सावरकर 

किती सुंदर काव्यपंक्ती. प्रत्येक शब्द न शब्द अगदी हृदयाचा ठाव घेणारा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते, त्या कोठडीच्या भिंतीवर एक तैलचित्र आहे. ते खालील प्रमाणे .

"जगातील एकमेव ऐतिहासिक सत्य"

हिंदुस्थानातील जनतेला ब्रिटिश राजवटी विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा महामंत्र दिल्याबद्दल सश्रम कारावासाची जन्मठेप भोगत असताना याच कोठडीच्या भिंतीवर खिळे आणि कांटे यांची लेखणी करून "कमला" हे महाकाव्य लिहिणारे महाकवी, राजबंदी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर.तेथील संपूर्ण परिसर दाखवताना गाईड आम्हाला महत्वपूर्ण माहिती देत होता. क्रांतिकारकांना दिली जाणारी वागणूक, कोठडीतले त्यांचे जीवन त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा, त्यांनी चालवलेला कोलू, नारळाच्या दोऱ्या कशा तयार कराव्या, त्यांना दिलेले काम ठराविक वेळेत पूर्ण झाले नाही तर त्यांना भोगावी लागणारी फटक्यांची शिक्षा ही सर्व आम्ही निःशब्द  होऊन ऐकत होतो.

 

दिव्यत्वाची जेथ प्रचिती 

तेथे कर माझे जुळती 

जड अंतकरणाने आम्ही तेथून निघालो. कारण पुन्हा रात्री नऊ वाजता आम्हाला क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित शो पहायला यायचं होतं. 

आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली. थोडी शॉपिंग केली आणि पुन्हा नऊ वाजता सेल्युलर जेलमधील लाईट अँड साऊंड शो पाहायला आलो. ओम पुरी यांच्या आवाजातील आत्मकहाणी ऐकताना अश्रू आवरत नव्हते.

 दुसऱ्या दिवशी दि. २१ ला मंगळवारी आम्ही पोर्ट ब्लेअर वरून बोटीने रॉस आयलँड ला आलो. रास आयलँड म्हणजेच नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप. आपल्या नौसेनेच्या अधिपत्याखाली येत असल्याने येथे आपल्याला अभिमान वाटेल अशा एका वेगळ्या शिस्तीचा अनुभव येतो. ब्रिटिश काळात अंदमान मधील प्रशासकीय मुख्यालय असलेले हे बेट आता ऐतिहासिक वारसा स्थळ आहे. इथे ब्रिटिशकालीन इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. तेथे मोटर गाडीने फिरण्याची व्यवस्था होती. आजही तेथे इमारतीच्या भिंती उभ्या आहेत ज्यांना झाडाच्या मुळांनी जखडून ठेवले आहे.

 आजूबाजूला अथांग पाणी, घनदाट झाडी असे नयनरम्य दृश्य आम्ही डोळ्यात साठवून घेत होतो. रॉस आयलँड, नाॅर्थ बे आयलँड, वायफर आयलँड चा बोटीने प्रवास, स्कुबा डायविंग, वॉटर स्पोर्ट या सर्वांचा आम्ही आनंद घेतला. समुद्राच्या पाण्याखाली सुंदर सुंदर कोरल्स, समुद्री वनस्पती बघताना मन आनंदून जात होते. तृप्त मनाने आम्ही पुन्हा हॉटेलला परतलो.

दुसऱ्या दिवशी दि. २२ ला बुधवारी पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक आयलँड चा लक्झरी क्रूझने केलेला तीन तासाचा समुद्राचा रोमांचक प्रवास, क्रूझ वरील नृत्याचा घेतलेला आनंद, खरंच शब्दांतीत आहे. 

पुढे हॅवलॉक येथून गाडीने आशिया खंडातील सर्वात सुंदर बीच म्हणजे राधानगरी बीच पाहायला गेलो. राधानगरी बीच हा समुद्रकिनारा आपल्या स्वच्छ पांढऱ्या वाळू , निळ्याशार पाण्याचे सुंदर रंग आणि हिरव्यागार झाडींमुळे प्रसिद्ध आहे. खास करून येथील संध्याकाळचे सूर्यास्त दृश्य हे मनमोहक असते. राधानगरी बीच खरोखरंच अंदमान मधील अत्यंत सुंदर असा बीच आहे. या बीचवर आम्ही समुद्राच्या लाटांचा मनमुराद आनंद घेतला. असं वाटत होतं की, समुद्राच्या पाण्याशी खेळतच राहावं, तेथील विहंगम दृश्य पाहतच राहावं. परंतु मनाला आवरतं घेत आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो आणि तेथे मुक्काम केला. 


दि.२३  ला गुरुवारी आम्ही हॅवलाॅक आयलँड, एलिफंट बीच, काला पत्थर बीच चा आनंद घेतला. तेथील समुद्राचे मनोहारी  दृश्य मी केवळ पाहत नव्हते तर जगत होते. त्यानंतर बोटीने आम्ही निल आयलँडला पोहोचलो.निल आयलँड(शहीद द्वीप) चा अत्यंत सुंदर समुद्रकिनारा पाहताना मनाला जणू आनंदाचे उधाण आले होते. येथे रंगीबेरंगी प्रवाळ खडक आणि समृद्ध सागरी जीवन जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.

दि.२४  ला शुक्रवारी आम्ही इथला सर्वात सुंदर किनारा म्हणून ओळखला जाणारा लक्ष्मणपुर, भरतपूर ला भेट दिली. जल क्रीडा प्रेमींसाठी उत्तम ठिकाण शांत आणि स्वच्छ पाण्यात स्कूबा डायव्हिंग, स्नाॅर्कलिंग आणि ग्लास बॉटम बोट राईड चा आनंद घेता येतो. तेथील प्रवाळ खडक पाहताना सागरी जीवसृष्टी जवळून अनुभवता येते. नील बेटावरील सर्वात लांब समुद्रकिनारा म्हणजे लक्ष्मणपूर बीच. शांततेसाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण. इथली नैसर्गिक खडक रचना आणि सुंदर शंख शिंपले पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतात. समृद्ध प्रवाळ खडक आणि रंगीबेरंगी सागरी जीवसृष्टी मुळे प्रसिद्ध असलेला एलिफंट बीच हा समुद्रकिनारा स्नार्कलिंग आणि स्कुबा डायविंग साठी उत्तम आहे. याशिवाय येथे स्पीड बोट राईड आणि बॅनाना बोट राईड सारख्या रोमांचक खेळाचा आनंद घेता येतो. आश्चर्यकारक पांढऱ्या वाळूचे किनारे आणि निळ्याशार समुद्राने नटलेले स्वराज द्वीप म्हणजेच हॅवलाॅक आयलँड. हे बेट अंदमानमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. आलिशान रिसॉर्ट्स, साहसी जल क्रीडा आणि निवांत वातावरण आपल्याला निश्चितच आवडते. येथील नैसर्गिक पूल, सनसेट पॉईंट आम्ही पाहिला. या प्रवासाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे आलेले जे पर्यटक होते त्यापैकी बरेच फॉरेनर होते. त्यातही एक कॅलिफोर्नियाचे कपल हनिमूनला आले होते. ते त्यांनीच आम्हाला सांगितले. वारंवार ते आय लव इंडिया म्हणत होते. त्यांचे ते भारत देशावरील प्रेम पाहून खरंच खूप छान वाटले.

 पुन्हा नील आयलँड ते पोर्ट ब्लेअर लक्झरी क्रूझने आम्ही पोर्ट ब्लेअर ला आलो. तेथे रात्री तेथे मुक्काम केला. दि. २५ ला शनिवारी सकाळी पोर्ट ब्लेअर विमानतळावर आलो. सकाळी १० वाजताच्या विमानाने आम्ही दुपारी १.५० वाजता चेन्नई विमानतळावर पोहोचलो. तेथून गाडीने हॉटेलवर आलो.  तेथे जेवण घेतले. आराम केला व रात्री १० वाजता तामिळनाडू एक्सप्रेसने परतीचा  प्रवास सुरू केला. दि. २६ ला रविवारी दुपारी १.५० वाजता आम्ही नागपूरला आलो व तिथून गाडीने आपापल्या घरी आलो. अशा रीतीने माझी अंदमान यात्रा माझ्यासाठी नक्कीच अविस्मरणीय होती आणि राहील सुद्धा.



 सौ. रेखा देशमुख

अमरावती

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना कोणार्क सूर्य मंदिर- पल्लवी उमरे,मुंबई-शब्दशिल्प-दीपोत्सव-२०२५

 स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना कोणार्क सूर्य मंदिर

पल्लवी उमरे,मुंबई



 नुकताच भारताच्या ओरीसा राज्यातील भुवनेश्वर पासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले  जगप्रसिद्ध कोणार्कचे सूर्य मंदिर बघण्याचा योग आला. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेले जगप्रसिद्ध हे कोणार्कचे सूर्य मंदिर अत्यंत सुंदर देखणे आणि अगदी रथाच्या आकारातील वर्ल्ड   हेरिटेज मध्ये समावेश असलेली सुंदर कलात्मक वास्तू आहे .बंगालच्या खाडीला लागुन इशान्य पूर्व दिशेला हे देखणे भव्य मंदिर आहे. 

     तेराव्या शतकात (१२३८-६४) या कालावधीत गंगवंशाचा शासक राजा नरसिंह देव यांनी हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित म्हणून बनवले .यामागेही बर्‍याच कहाण्या आहेत. हे मंदिर सूर्याच्या रथाच्या आकारात बनलेले आहे या       मंदिराला समोर सात घोडे ओढत आहेत अशी प्रतिमा आहे. सात घोडे म्हणजे सात वार, आणि रथाचे  २४ चक्र, त्याला २४ आरे आहेत त्यापैकी चार चक्र घड्याळाच्या रूपात काम करत असे.या आरीवर पडणारी उन्हाची सावली यावरून त्या काळी अचूक वेळ ठरवत असे.याला कोणार्क चक्र असेही म्हणतात.

कोणार्क सूर्यमंदिर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. कलींग शैलीच्या स्थापत्य शैलीचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. 

 मंदिराच्या विशाल भिंतीवर चारी बाजूंनी सुरेख दगडी कोरीव काम ,सुंदर देखण्या मूर्ती आणि कलाकृतींचे दर्शन घडते जे  प्राचिन संस्कृतीचा, शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे . कुठे देवीदेवतांच्या तर कुठे कामायन दर्शविणार्‍या  कामूक मुर्ती आहेत. त्यापैकी बर्‍याच मूर्ती खजिराहो मंदिराची आठवण करून देतात. सूर्यमंदिराचे आर्किटेक्चर खूप सुंदर आहे.हे  मंदिर पूर्णपणे सूर्यदेवाला समर्पित आहे काळा ग्रॅनाईटने बांधले असल्यामुळे याला (ब्लॅक पॅगोडा) असेही म्हणतात .वर्ल्ड हेरिटेज वास्तूमध्ये याचा समावेश होतो इथे दुपारी इथे बारा नंतर सूर्याची किरणे प्रखर आणि तीव्र असतात. देशविदेशातून दररोज हजारो लोक हे मंदिर बघायला येतात. 

असे म्हणतात की पूर्वी या मंदिरात सूर्य देवाची मूर्ती होती.  परंतु बांधकामात चुंबकीय शक्ती  वापरल्याने मूर्तीवर परिणाम होऊन मूर्तीचा र्हास झाला.मंदिराच्या मुख्य वास्तूकाराच्या मुलाने मंदिराचे बांधकाम सुरू असताना इथे आत्महत्या केली.म्हणून या      मंदिरात पूजा केली जात नाही.सूर्याचे पहिले किरण       मंदिराच्या गाभार्‍यात पडत असे. ११८ वर्षापासून मंदिराचा मुख्य दरवाजा बंद आहे. शत्रूचे हल्ले आणि नैसर्गिक आपदेमुळे मंदिर बरेचसे खंडीत झाले असले तरी मंदिराची सुंदरता कुठेही कमी होत नाही. पुरातत्त्व विभागासाठी हा संशोधन आणि अध्ययनाचा विषय आहे. 

ओरिसा सरकारने या  मंदिराचे संरक्षण आणि जतन केले आहे. ओरिसाच्या मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटनस्थळ आहे. मंदिराच्या जवळ एक किलोमीटर अंतरावर समुद्र लागून आहे. जगन्नाथपुरी कडे जाताना वाटेत हा सुंदर समुद्र खळखळताना बघता येतो. मंदिराचे परिसरात दुपार नंतर थंड समुद्री वार्‍यामुळे छान वातावरण तयार होते, आणि प्रवासाचा शीण निघून जातो. जवळच ३५ किलोमीटरवर जगन्नाथपुरी धाम आहे. हे सुद्धा भगवान श्रीकृष्णाला समर्पित सुंदर मंदिर आहे. 



पल्लवी उमरे,मुंबई

Mo. ९७६६०७६४२४

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...