गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवे शैक्षणिक दालन खुले

 


शब्दशिल्प/ पुणे_इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर संस्थेने शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात कळंब येथे विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले आहे.या स्कूल चे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान च्या अध्यक्षा आनंदी रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्था उपाध्यक्ष प्रकाश कदम,सचिव विरसिंह रणसिंग,विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त राही रणसिंग,विद्याचरण पुरंदरे,प्राचार्य डॉ अशोक काळंगे,उपप्राचार्य डॉ प्रशांत शिंदे ,प्रा.ज्ञानेश्वर गुळीग ,मुख्याध्यापक प्रमोद भोंग इ मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. 

उद्घाटन प्रसंगी संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, तसेच इंग्रजी माध्यमातून जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.आजच्या काळात इंग्लिश माध्यमाचे शिक्षण अत्यंत गरजेचे बनले आहे.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी केवळ भाषेच्या अडचणीमुळे मागे पडतात. ही दरी कमी करण्यासाठी अशा शाळांची आवश्यकता असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ अशोक काळंगे  मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी शिस्त, परिश्रम आणि सातत्य यांचा अंगीकार करून यशस्वी होण्याचे आवाहन केले. तसेच पालकांनीही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.विद्याचरण पुरंदरे यांनी या नवीन इंग्लिश मीडियम स्कूलमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रशांत शिंदे व आभार प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रा.सुहास भैरट,प्रा.रामचंद्र पाखरे,प्रा.विलास बुवा,प्रा.ज्योस्त्ना गायकवाड,प्रा.विनायक शिंदे इ मान्यवर, शिक्षकवृंद,पालक उपस्थित होते.

कविता : १ मे : दिनविशेष

 


नमू या महाराष्ट् ...!


जननी साहसी विरांची 

हुतात्म्यांच्या बलिदानाची ,

खाण असे नररत्नांची

छत्रपती शिवरायांची..||१||


अभिमान जगी सांगते 

पैजा जिंकूणी अमृतांच्या ,

नभांगणी फडकतात 

अभंगाच्या गाथा संतांच्या..||२||


अंगणात ही सजलेला 

समतेचा मोहक सडा. ,

उभा रक्षण्या कणखर 

सह्याद्रीचा कातळ कडा..||३||


 इथे गौरवात नांदूनी 

जाती धर्मांचा भेद नसे ,

प्राणाहूणी प्रिय अस्मिता 

देश बांधवा श्रेष्ठ असे..||४||


जपला संस्कृती वारसा 

ज्ञान विज्ञान कला प्रेमी ,

धन्य जन्म इथे घेऊनी 

नमू या महाराष्ट्र भूमी..||५||



श्री अशोक भगवंत वाघमारे 

पुणे 

मो.९०७५५५७२०६

_______

*बुद्ध जन्म*

 बुद्ध जन्मास आले या भुवरी

 महामायेच्या पोटी राजा शुद्धोधनाच्या  घरी 

सजली नगरी, सजल्या भगिनी 

वृक्षलता बहरल्या अंगणी 

 पक्षी गुंजारव करी सुमधुर स्वरांनी 

आनंदगंध पसरला या  त्रिभुवनी ll 1ll

 शोध घेतला बुद्ध जन्माचा असित मुनीने जम्बुदीप स्थळी 

 दिव्य तेजाने बाळ चमकतो समजले शाक्य कुळी 

 पाहिले बाळाचे रूप डोळे भरुनी

 दिव्य पुरुषासमान दिसले बत्तीस लक्षणी ll 2ll

 असित मुनी वदले बालक सम्यक संबुद्ध   होणार 

 बुद्धत्व प्राप्त करून धम्मचक्र प्रवर्तन करणार

 जगा ,लोक कल्याणाचा  सद्धधम्म सांगणार 

धम्मज्ञान आदी मध्यम आणि अंत कल्याणकारी असणार 

ll 3 ll

अनंत युगानंतर भूतलावर श्रद्धेय बुद्ध अवतरणार 

खरी ठरली असित मुनींची वाणी 

कल्याण साधण्या मानवाचे मिळाली बुद्धधम्म पर्वणी 

प्रज्ञाशील करुणा हृदयात जपूनी

 बुद्धाने मानवास दिली नवसंजीवनी  ll 4 ll

_अस्मिता राहुल बागडे, नागपूर

मो.9422492383

__________

कामगार दिन


हार्दिक शुभेच्छा । कामगार दिनी ।। 

सदिच्छा वाणी । सर्वांसाठी ||१||


जीवन जगतो । स्वतः कामगार ।।

घामाची ती धार । प्रामाणिक ।।२।।


भारतात एक । शक्ती मुलाधार ।

 राष्ट्राचा आधार । कामगार ।।३।।


दुजाचे ते ओझे । घेई खांद्यावर ।।

 नेई कामगार । निर्धाराने ।।४।।


कामगार आहे । नाही तो गुलाम ।। 

करावा सलाम । नित्य त्यासी ।।५।।


जीवनाचे दुःख । करूनिया नष्ट ।। 

शारीरिक कष्ट । रात्रंदिन ।।६।।


सुखाचे जीवन । दुःखात शोधतो ।। 

राबतो कष्टतो । कामगार ।।७।।


ठेवावी ही जाण । कामगार दिन ।।

करू नये दीन । सर्वानीच ।।८।।


कामगारांशी या । वर्तन प्रेमाचे ।। 

जीवन सुखाचे । करू सर्व ।।९।।


एक मे हा दिन । कामगार दिन ।।

द्यावा तया मान। लोकांनीच ॥१०॥


      समता गौरव पुरस्कार प्राप्त 

     प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,

    अमरावती : ८०८७७४८६०९

____________

महाराष्ट्र दिन


हार्दिक शुभेच्छा । महाराष्ट्र दिनी ।।

सदिच्छा वाणी । सर्वांनाच ।१।।


सिंदखेड राजा । भूमि जिजाऊंची ।। 

माता शिवाजींची । महाराष्ट्री ।।२।।


हिंदवी स्वराज्य । संस्थापक राजे ।। 

जय घोष वाजे । आसमंती ।।३।।


सर्व क्षेत्री पुढे । मुंबई विभाग ।।

सागर अथांग । पहूडला ।।४।।


बघा अलिबाग । देखणा किनारा ।। 

सागरी जंजीरा । शोभनीय ।।५।।


जगात प्रसिद्ध । एक सरोवर ।। 

सुंदर लोणार । विसावले ।।६।।


नागपूरी संत्री । प्रसिद्ध जगात ।।

महाराष्ट्रात या । नावाजली ।।७।।


कळसुबाईचे । उंच ते शिखर ।।

 कुठे ? ते नगर । महाराष्ट्री ।


     समता गौरव पुरस्कार प्राप्त 

     प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,

    अमरावती : ८०८७७४८६०९

___________

*अस्मिता महाराष्ट्राची*


महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एक एप्रिलचा दिवस उजाडला,  

106 हुतात्म्यांच्या शहीद बलिदानातून सह्याद्रीचा डोंगर गर्जला.


छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी गाजवले,  

महाराष्ट्राच्या भूमीवर शौर्य.  

बलाढ्य सैनिक शत्रूचे असूनही,  

कधी मराठ्यांचे खचले नाही धैर्य.


विजयी पताका घेऊन आजही गर्जतो सह्याद्रीचा डोंगर.  

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत रयत राहावी आनंदात,  

म्हणूनच पोवाडा गायला जातो घरोघरी.


संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यासाठी दिला थोर महापुरुषांनी नारा,  

मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी लढला महाराष्ट्र सारा.


श्री छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, महात्मा जोतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची शान.  

आम्ही मराठी, महाराष्ट्राचे, याचा आहे आम्हाला अभिमान.


*कवी : गोपाळ धारपवार 

पनवेल

______

महिमा महाराष्ट्राचा


काय वर्णू तुझे गुण

माझ्या महाराष्ट्र देशा

मृत्तिका तुझी ही चंदन

गंधाळल्या दाही दिशा /


श्रृषी मुनींच्या जन्माने

ही भूमी पावन झाली

साधू संतांच्या स्पर्शाने

कणकण उद्धारली /


शेतकरी पिकवते

घामाच्या थेंबातून मोती

पिकं टाळा वाजवते

पक्षी गोड गीत गाती /


वारा मधूर संगीताने

झुलवतो पर्ण सारे

नाद ऐकून झऱ्यांचा

फुलती कळांचे पिसारे /


जणू सौंदर्याची खान

लेण्या वनराई भव्य

लेखक कवींनी रेखाटली

महिमा महाराष्ट्रची दिव्य /


नाना कला अवगत

केल्या इथल्या लोकांनी

वारकरी संप्रदाय नाचे 

तुका अभंग होऊनी  /


शाहू, फुले, शिवबाने

घेतले थोर किती कष्ट

भारताचा शोभतसे 

सोनेरी मुकूट महाराष्ट्र /


 _ ज्योती बन्सोड( ग्रामगीताचार्य )

बेलोना, नरखेड

________

सोहळा ..

जय जय जय महाराष्ट्र
दाटून  आतून  उमाळा 
उन्हाळ्याच्या दिवसात 
शुभेच्छांचा  पावसाळा 

शुभेच्छाही  इंग्रजीतून
ओसंडून  भळा  भळा
ओन्ली  मराठी  साठी
ॲरेंजकेला खासमेळा

पाहूआज मराठीमुव्ही
केवढा मला कळवळा
सोशल नेटवर्क  वरती
पोस्ट  करूया सोहळा

इंग्रज  घुसती  अंगात
उद्या मार्गपुन्हा वेगळा
छान इव्हेंट मॅनेंजमेन्ट
दिवस  रंगला आगळा

समजून घे महाराष्ट्रास
डोळ्यात नीर घळाळा
ते एकशे सहा हुतात्मे 
जाणवी त्यांच्या कळा

संतांची  वीराची  भूमी
मातीचा  इथल्या लळा
जन्मलो वाढलो  इथेचं 
सौभाग्य शोभे कपाळा

समृध्द संस्कृती वारसा
लाभला सुखामृत मळा
भीम शिव राम सावित्री 
वाचता जीव होई खुळा

- हेमंत मुसरीफ पुणे 
    9730306996
_________________

खरा सिध्दार्थ ..

कैक  पिढ्यां उध्दारी
बुध्द बनला सिध्दार्थ
संसार सुख  त्यागिले
दीनदलीताचे सुखार्थ

तथागता ज्ञान प्राप्ती
बोधिवृक्षा अन्वितार्थ
गौतमास बौध्दावस्ता
जाणले जीवनगतार्थ

बौद्ध  धर्म आचारणी
अनेक जीवन कृतार्थ
संग्रह नको हव्यासाने
अल्प साधने चरितार्थ

दश पारमिता आचार
कळे जगणे मतितार्थ
स्वतः होऊनि  विरक्त 
साधला जग  परमार्थ

शील समाधि न्  प्रज्ञा
तीन अंगे धम्मा  सार्थ
धम्म् पाया आर्य सत्य
पालन करा नि:स्वार्थ

अष्टांगिक मार्गाचरणा
जाणून अंतरी भावार्थ
शांतीक्षमा सत् करुणा
जगणे  सकल जिवार्थ

मुके जीव हिंसा हत्या
नाही कुठला पुरूषार्थ
असूया ईर्षा मोहमाया
कारण  वेदना दुःखार्थ

- हेमंत मुसरीफ पुणे. .
    9730306996

पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार शिवराज साने सर (संगीतकार ) यांना प्रदान

 


शब्दशिल्प/पुणे_ऊरूळी कांचन येथील डॉ मनीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार 27 एप्रिल 2026 रोजी डॉ मनीभाई देसाई यांच्या 106 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला. संगीत व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री शिवराज साने सर यांना ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेली 20 वर्षे ऊरूळी कांचन आणि परीसरात संगीत क्लासेस सुरू करून नाममात्र दरात संगीत शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.

 महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम सादर केले साने संगीत क्लासेसच्या माध्यामातून आकाशवाणी रेडिओ केंद्रवर कार्यक्रम सादर केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांमध्ये ना. रविंद्र साठे (खादी ग्रामोद्योग मंत्री ) जयश्री पाटील (पी.एस. आय. राष्ट्रपती पदक विजेते)  अदी मान्यवर उपस्थित होते. 


या कार्यक्रमाचे स्थळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह टिंबर मार्केट पुणे येथे होते. व आयोजन ह.भ.प. डॉ रविंद्र भोळे ( हिंदू रत्न पुरस्कार विजेते) प्रमुख राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा साळवे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ नार्मन नार्टन सर यांनी केले.

तथागत गौतम बुद्धांची शिकवण

 


=======================                                  तथागत गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमध्ये लुंबिनी येथे इसवी सन पूर्व ५६३ ला झाला. वडील शुद्धोदन व आई मायादेवी. वडील क्षत्रिय राजा होते. गौतमचा जन्म झाला की सातव्या दिवशी आईचा मृत्यू झाला. मावशी व शुध्दोदनची दुसरी पत्नी राणी महाप्रजापती गौतमीने गौतमचे पालन पोषण केले. गौतम बुद्धांचे नाव सिध्दार्थ होते. बौद्ध साहित्यात त्यांना शाक्यमुनी, गौतम, शाक्य सिंह अशा विविध नावांनी ओळखले जाते. असे सांगितले जाते की," मायादेवी ही कोलियन वंशाची राजकन्या होती. मायादेवी ही गरोदर अवस्थेत माहेरी जाताना लुंबिनी गावी बुद्धाला जन्म दिला." सम्राट अशोकांनी या ठिकाणी स्तंभ बांधला. गौतम बुद्धांच्या जन्मानंतर त्यांची जन्म तारीख लिहण्यासाठी दोन विद्वान मान्यवरांना बोलवले. त्यापैकी एकाने भविष्य वाणी केली की,

 *"हे बालक महान माणूस होईल. संसाराचा त्याग करून संन्यास घेईल.*" 

भाकित ऐकुन राजा शुध्दोदन चिंतीत झाले. यशोधरा सोबत वयाच्या सोळाव्या वर्षी गौतमचे लग्न झाले. सुखाचा संसार सुरू झाला. यशोधरा व सिद्धार्थ यांना मुलगा झाला. त्याचे नाव राहूल ठेवण्यात आले. सिध्दार्थने गुरू विश्वामित्र यांच्या कडे वेद,उपनिषदाचा अभ्यास केला. राजेशाही, युद्ध शास्त्राचे शिक्षण, कुस्ती, घोडदौड, बाण व रथ हे सर्व शिक्षण घेतले. गौतम बुद्ध मुलाच्या जन्मानंतर दु:खाने सांगतात, " आज माझ्या बंधनाच्या साखळीतील आणखी एक कडी वाढली आहे."गौतम बुद्ध आपल्या सारथी मित्रासोबत फिरायला जायचे. त्यांनी जगातील अनेक दु:ख पाहिले. ते विरक्त झाले. संसारात त्यांचे मन रमेना. मनात अलिप्ततेची भावना प्रबळ झाली. अचानक एका रात्री आई वडील पत्नी,मुलगा,राजसत्ता सोडून जंगलात निघून गेले.वयाच्या २९व्या वर्षी घर सोडून गेले.आपले मौल्यवान कपडे,दागिने काढली व केस कापली व भगव्या रंगाची कपडे परिधान करून संन्यासी झाले.सत्य व ज्ञानाच्या प्राप्ती साठी कठोर तपश्चर्या केली.सारनाथ येथील बौद्ध गया नावाच्या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञान संपादनाचा विचार करू लागले. सलग सात दिवस चिंतन,मनन केले वैशाख महिन्यात पौर्णिमेच्या आठव्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले .                                                   

*माणसाची वासना दुख:चे मूळ आहे*.                                                

इच्छा व वासना दमन करून मन शांती मिळते. वयाच्या ३५ व्या वर्षी ज्ञान प्राप्त झाले आणि सिध्दार्थ बुद्ध झाला. बोधगया येथे ज्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले तो बुद्ध वृक्ष म्हणून ओळखला जातो. 

बौद्ध धर्माची आधारशिला म्हणजे चार उदात्त सत्ये.                                       

 *महात्मा बुध्दाच्या मते जग हे दु:खाचे घर आहे*.                                

भगवान गौतम बुद्ध ज्यांनी आपल्या महान विचारांनी,शिकवणीने जगाला एक नवीन मार्ग दाखवला.समाजात अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात लाग मोलाचे योगदान आहे.गौतम बुद्धांच्या विचारांचे पालन करून अनेक लोक जीवनात यशस्वी झाले.गौतम बुद्ध एक महान भारतीय तत्वज्ञ,वैज्ञानिक,धार्मिक नेते,थोर समाजसुधारक,बौद्ध धर्माचे संस्थापक होते.जगातील सर्वात महान 

व्यक्तीमत्व,प्रभावशाली व्यक्ती,,जगभरात १ अब्ज ८० कोटी अनुयायी आहेत.बुद्ध ही नाव नसून ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध शब्दाचा अर्थ                                                       

*अकाशा एवढा प्रचंड ज्ञानी*.             

जगाच्या इतिहासात महामानवात  तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धाच्या धम्माला, संघाला शरण जा. 

*"बुद्धम् शरणम् गच्छामी*

*धम्मम् शरणम् गच्छामी*

*संघम् शरणम् गच्छामी"*

=======================

रत्नाकर बाबुराव पाटील

[सहशिक्षक ]

विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,

शिंगोली ता. जि. धाराशिव

चला करु साजरा : महाराष्ट्र दिन सोहळा

 


=======================                                  *"सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा*, 

*दरी-दरीतून नाद गुंजतो महाराष्ट्र माझा*, 

*जय जय महाराष्ट्र माझा ,महाराष्ट्र माझा."* 

१ मे हा दिवस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून  "महाराष्ट्र दिन" साजरा करतात.१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी मातीतील मराठी माणसाच्या अस्मितेचा, उल्हासाचा व कामगारांच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो."कामगार दिन" म्हणून ही या दिवसाला ओळखले जाते.तिरंगा ध्वज फडकविला जातो. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. या १०६ शहीद हुतात्म्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. बलिदान दिलेल्या शहिदांना आदरांजली समर्पित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. १ मे महाराष्ट्र राज्य स्थापन दिवस. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश सुपूर्द केला. नव महाराष्ट्र राज्याचे नेतृत्वाची संपूर्ण जबाबदारी सोपवली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक वारसा फार मोठा आहे. देश स्वतंत्र करण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक, सैनिक, शूरवीर लोकांनी आपले प्राण पणाला लावून बलिदान दिले आहे. शूरवीर लोकांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होय. राज्यांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणेचा इतिहास मोठा आहे. या राज्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा अनमोल ठेवा आहे. महाराष्ट्र हा साधुसंत, ऋषीमुनींचे राज्य आहे. शूरवीर , साहसी व धाडसी नरवीरांचे राज्य आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेला निर्भय व निर्भिड बनवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. महाराष्ट्र ही त्याग व बलिदानाची, देशप्रेम व पराक्रमाची परंपरा लाभलेले राज्य आहे. महाराष्ट्र राज्य ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, चक्रधरस्वामी या सारख्या महान संताच्या अवताराने पवित्र भूमि आहे. कृष्णा, कोयणा, गोदावरी नदीच्या पवित्र जलराशीने पावन राज्य महाराष्ट्र. साहित्यिक क्षेत्रात ही महान लेखक, कवी या राज्याला वरदान आहे. सामाजिक विचार रुजवण्यासाठी महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांचे योगदान अनमोल आहे. महाराष्ट्र राज्याचे वर्णन करताना गोविंदाग्रज म्हणतात. 

*"मंगल देशा, पवित्र देशा!*

*महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा!* 

*श्री महाराष्ट्र देशा!* 

असे सुंदर वर्णन काव्यातून साकारले आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. संत ज्ञानेश्वर महाराज अभंगातून मराठी भाषेचे महात्म्य सांगतात. 

*"माझा म-हाठाचि बोलू कवतुके|*

*परी अमृतातेंहि पैजा जिंके||*"

कविवर्य आपल्या काव्यरचनेद्वारा मराठी भाषेचे महत्त्व विशद करतात

*"माझ्या मराठी मातीचा लावा        ललाटास टिळा,* 

*हिच्या संगाने जागल्या दरीखो-यातील शिळा.|"*

महाराष्ट्र राज्याला महात्मा गांधी कार्यकर्त्यांचे "मोहळ" म्हणतात. 

महाराष्ट्राच्या मातीचे महात्म्य, गुणवर्णन अनेक प्रतिभावंत इतिहासकारांनी केले आहे. 

*"काळ्या छातीवरी कोरली,                       अभिमानाची लेणी*

*पोलादी मनगटे खेळती*, 

      *खेळ जीव घेणी.*

*दारिद्र्याच्या उन्हात शिजला*, 

*निढळाच्या घामाने भिजला*

*देश गौरवासाठी झीजला*. 

अशा महाराष्ट्राचा १ मे हा स्थापना दिवस आहे. या राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिले त्या वीर सुपुत्रांना कोटी कोटी प्रणाम. 

*"भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणा-या नभा*, 

*अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा.* 

========================

रत्नाकर बाबुराव पाटील    

  {सहशिक्षक}

विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा, 

शिंगोली ता. जि. धाराशिव

*मो. ९४०३३९४८१८*.

लेखक खाजाभाई बागवान लिखित सांस्कृतिक सावल्या समीक्षण ग्रंथास प्रा. रसूल सोलापुरे संस्थेचे साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

 


शब्दशिल्प/पुणे_प्रा. रसूल सोलापुरे संस्था महाराष्ट्र तर्फे देण्यात येणारा *प्रा. रसूल सोलापुरे संस्थेचे साहित्य पुरस्कार २०२६* ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष खाजाभाई बशीर बागवान यांच्या समीक्षण ग्रंथाला जाहीर झाला आहे. त्यांच्या *“सांस्कृतिक सावल्या.. मागोवा मुस्लिम मराठी स्त्री साहित्याचा”* या पुस्तकाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणार आहे.  संस्थेच्या अध्यक्ष प्रा. रसूल सोलापुरे यांनी ही माहिती दिली.खाजाभाई बशीर बागवान यांच्या कार्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. 

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे सचिव अय्युब नल्लामंदू, उपाध्यक्ष प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर तसेच सहसचिव अनिसासिकंदर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 “सांस्कृतिक सावल्या” या ग्रंथात मुस्लिम मराठी स्त्री साहित्याचा मागोवा घेतला असून, त्यातून सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांची सखोल चिकित्सा केली आहे. या अभ्यासामुळे मराठी साहित्य क्षेत्रात नवा दृष्टिकोन निर्माण झाला आहे.  सांस्कृतिक सावल्यास जाहीर झालेला हा तिसरा पुरस्कार आहे.

ग्रामगीता

  



तिस तारखेचा  l हा जन्मदिवस l

आला उदयास l तुकडोजी l l


शिंप्याच्या घरात l मंजुळा मातेच्या l

उदरी रत्नाचा  l जन्म झाला l l


अमरावतीत l यावली गावात l

आले राष्ट्रसंत  l भुईवरी l l


अत्यंत हलाखी  l परिस्थिती त्यांची l

माणिक जन्माची l ही जयंती l l


भक्तीत जीवन l अर्पण केलेत l

ध्यानस्थ झालेत l खंजरीत l l


तेव्हाआडकोजी l महाराजांनाच l

साक्षात्कारच  l झाला होता l l


ते नतमस्तक l गुरु चरणात l

तल्लीन झालेत l खंजरीत l l


खंजरीचा साद l निघे शब्दमुखी l

प्रवचन लोकी l जागृतीचे l l


माणूस द्या  मज माणूस द्या अरे

भीक मागतो रे l जनासाठी l l


या सामुदायिक l प्रार्थने मधून l

केले  अभियान l स्वच्छतेचे l l


विडा उचलला l बाल संस्काराचा 

परिवर्तनाचा l नाद होता l l


लोकांना भजन l कीर्तन मार्गाने

भक्ती माध्यमाने l जनसेवा l l


विठ्ठल चरणी l गेले भजनाला l

निरोप घेतला l पंढरीत l l


गुरुदेव सेवा l मंडळी जमली l

घरोघरी गेली l ग्रामगीता l l


जीवन खोब्रागडे 

टेक्नो रेसिडेन्सी, नागपूर

राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 117 वी जयंती उत्साहात साजरी

 


         " स्पंदन "  वार्षिकांकाचे प्रकाशन 

शब्दशिल्प/कुही :- येथील राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 117 वी जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थी प्रतिभेची ओळख असलेल्या " स्पंदन " या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले.

मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री गजानन मांडेकर होते डाॅ.मिनाक्षी झाडे डाॅ.गायत्री कुकडे श्री राहूल बोरकर यांचे संपादनात अंक निर्मीती करण्यात आली.

      ऊपस्थीतांनी अंकाबद्दल आनंद व्यक्त करतांना विद्यार्थ्यांच्या लेखनगुणाचे कौतुक केले.

       या वेळी  डाॅ.लामखाडे, डाॅ.चव्हाण, डाॅ. दिपक केने श्री दिनेश घाटोळ, डाॅ.करंभे , प्रा.मनिषा पडोळे,प्रा.खेडीेकर, प्रा.सोमकुवर, मनिषा धवड यांची ऊपस्थीती होती.

    तप्त ऊन्हात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ऊपस्थीत होते.यावेळी हर्षदा क्षीरसागर या विद्यार्थ्यीनीने राष्ट्रसंताची " ही का भक्ती खरी " ही रचना सादर केली. 

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम मनकवडे, विजय देशमुख, संजय टेकाम, भरत वानखेडे, टेकेश्वर देशमुख यांनी परीश्रम घेतले. 

   संचलन कु.स्नेहा भिवगडे तर आभारप्रदर्शन कु.साक्षी लांजेवार या विद्यार्थीनीने केले.

       कु.प्रणाली पडोळे हिने गायलेल्या राष्ट्रसंताच्या " तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा  " या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बुधवार, २९ एप्रिल, २०२६

भक्ति शक्ति साहस की त्रिवेणी को कृति कुसुम सम्मान_ 2026


शब्दशिल्प/इंदौर _संभाग पुस्तकालय संघ इंदौर द्वारा श्री मध्यभारत हिंदी साहित्य समिति सभागार इंदौर में 23 अप्रैल 2026 कों विश्व पुस्तक एवं काॅपीराइट दिवस पर  बढ़ते लेखकों पर संतोष तों लगातार कम होते पाठकों पर गम्भीर चिंता जाहिर की गई। मोबाइल और इंटरनेट से हमें काफी फ़ायदे हैं पर पुस्तकों से पाठकों को दूर करने में भी इनकी ही अहम भूमिका रही है। अतः मोबाइल के साथ पुस्तकों के पठन-पाठन पर भी जोर दिया गया। साथ ही देश भर से प्राप्त पुस्तकों में से चयनित लेखकों की कृत्यों को इसी भव्य समारोह में साहित्यकारो से खचाखच भरे सभागार में सम्मानित किया गया जहां मेरी द्वितीय कृति   *भक्ति शक्ति साहस की त्रिवेणी*  यात्रा संस्मरण कों विश्व कापीराइट दिवस पर में *कृति कुसुम सम्मान 2026*  प्रदान किया गया है। मित्र और साहित्यिक मित्रों ने हर्ष व्यक्त किया।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रभक्तीचा बुलंद आवाज व ग्रामविकासाचा दीपस्तंभ

 


(राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या दि.३० एप्रिल २०२६ रोजी असलेल्या ११७ व्या जयंतीनिमित्त व ग्रामजयंती निमित्त लेख)


 भजनातील क्रांतिकारी शब्दातून स्वातंत्र्याची प्रेरणा जनसामान्यांमध्ये निर्माण करणारे राष्ट्रसंत,ग्रामसुधारणेचे व्रत घेतलेले थोर समाज सुधारक,राष्ट्रभक्तीचा बुलंद आवाज व ग्रामविकासाचा दीपस्तंभ आणि राष्ट्रभक्त कवी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या दि.३० एप्रिल २०२६ रोजी असलेल्या ११७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥ ग्रामजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥

        माणिक बंडोजी ठाकूर हे राष्ट्रसंतांचे तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव. सन -१९०९ सालातील एप्रिल महिन्याच्या तीस तारखेला यावली, जि.अमरावती येथे झाला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरू वरखेड अडकोजी महाराज यांनी माणिकला 'तुकड्या' हे नाव दिले,तेव्हापासून ते तुकडोजी म्हणून ओळखले जाऊ लागले.

​      राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजसुधारणेचे कार्य फार मोठ्या प्रमाणात केले.समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रहार केला. जातीभेद,अस्पृश्यता आणि कर्मकांडांविरुद्ध आवाज उठविला.त्यांनी कोणत्याही एका विशिष्ट जातीचा,पंथाचा धर्म न सांगता 'मानवता धर्म'  आणि 'विश्वधर्म' सांगितला.​त्यांच्या मते, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे आणि समाजाची सेवा करणे हाच खरा धर्म आहे.मानवता धर्म आणि विश्वबंधुत्व

​महाराजांनी 'ग्रामगीता' या ग्रंथातून मांडले."मानवता हाच खरा धर्म" असल्याचे त्यांनी आयुष्यभर आपल्या कीर्तनांतून, भजनातून आणि लेखनातून पटवून दिले.​त्यांनी सर्व धर्मीयांना एकत्र आणण्यासाठी 'सामुदायिक प्रार्थना' सुरू केली. त्यांच्यामते, "ग्रामसेवा हीच खरी देशसेवा आणि देवपूजा" आहे. गाव स्वच्छ ठेवणे,व्यसनांपासून दूर राहणे आणि गावाला स्वावलंबी बनविणे हा प्रत्येक नागरिकाचा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.​खरा धर्म हा विवेकनिष्ठ असावा,असे त्यांचे मत होते.त्यांनी कर्मकांडे, अंधश्रद्धा आणि जातीभेदाला कडाडून विरोध केला.त्यांच्या मते, माणसाला नीतीमान बनवणारा विचार म्हणजे धर्म.तुकडोजी महाराजांचा धर्म म्हणजे 'सर्वधर्मसमभाव' आणि 'श्रमनिष्ठा' यांचा संगम होय. त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून आजही हा 'सेवाधर्म' जगभर पोहोचविला जातो.महाराजांनी लिहिलेला 'ग्रामगीता' हा ग्रंथ म्हणजे ग्रामीण विकासाचा महाग्रंथ मानला जातो. खेड्यांचा विकास कसा करावा?,स्वच्छता कशी राखावी?,स्वावलंबी कसे जगावे? हे या ग्रंथात सांगितले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 'ग्रामगीता' या ग्रंथाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताच्या पुनरुत्थानाचा विचार मांडला आहे. त्यात त्यांनी 'ग्रामनाथां'साठी जे तत्त्वज्ञान दिले आहे,ते अत्यंत व्यावहारिक आणि प्रगतशील आहे.​गावाची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष देवाची सेवा करणे होय.

​ग्राम-स्वराज्य आणि स्वावलंबन

​ग्रामनाथांनी गावाला स्वावलंबी बनवण्यासाठी झटले पाहिजे, हे त्यांचे प्रमुख सूत्र होते.

​ गावातील गरजा गावातील उत्पादनांतूनच पूर्ण व्हाव्यात.

​ग्रामनाथांसाठी त्यांनी अत्यंत कडक शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत गावात जात-पात आणि अंधश्रद्धा आहे, तोपर्यंत गावाचा विकास होऊ शकत नाही.सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना आणि सहभोजन करावे.जुन्या जाचक रूढी सोडून विज्ञानाची कास धरावी.​गावाचे नेतृत्व करणाऱ्या 'ग्रामनाथाने' स्वतः चारित्र्यसंपन्न असावे.​दारू, गांजा, जुगार यांसारख्या व्यसनांनी गाव उद्ध्वस्त होते, म्हणून ग्रामनाथांनी गावाला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा.​संयमित जीवन आणि सदाचार हेच सुखी गावाचे आधारस्तंभ आहेत.​शिक्षण ही केवळ पदवी नसून ते जीवन जगण्याची कला असावी.​गावातील प्रत्येक मूल शाळेत गेले पाहिजे.​शिक्षण हे शेती आणि उद्योगाशी जोडलेले असावे, जेणेकरून तरुण गावातच राहून प्रगती करू शकतील.​तुकडोजी महाराजांनी 'सामूहिक प्रार्थना' हे गावाच्या एकतेचे साधन मानले.​जेव्हा गावातील सर्व लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात, तेव्हा त्यांच्यातील भेदाभेद मिटतात आणि संघटनशक्ती वाढते.​एक विचाराने चालणारे गाव हेच 'सुखी गाव' होऊ शकते. तुकडोजी महाराजांचे तत्त्वज्ञान सांगते की, "गाव सुधरेल तरच देश सुधरेल." ग्रामनाथांनी केवळ स्वतःचा स्वार्थ न पाहता 'सर्वांगीण ग्रामविकास' हेच आपले जीवनध्येय मानावे, हाच ग्रामगीतेचा मूळ संदेश आहे. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना गुरुकुंज मोझरी,जि.अमरावती येथे त्यांनी केली,ज्याद्वारे आजही सामाजिक आणि शैक्षणिक कार्य सुरू आहे.राष्ट्रसंतांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार व प्रसार प्रामाणिकपणे केला जातो.



                   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या खंजिरी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात स्वातंत्र्याची आणि समाजसुधारणेची मोठी लाट निर्माण केली होती. त्यांच्या भजनांमध्ये फक्त भक्तीच नव्हे तर राष्ट्रभक्ती फार मोठ्या प्रमाणात होती.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात त्यांची अनेक भजनं अत्यंत लोकप्रिय झाले होती.क्रांतीचे वारे घराघरांत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले. इंग्रजांना देश सोडावाच लागेल,असा इशारा तुकडोजी महाराजांनी अनेक भजनातून दिला होता.

"या भारतात बंधुभाव नित्य वसू दे "

​हे फक्त भजन  नव्हते तर भारताच्या सामाजिक एकात्मतेचे 'राष्ट्रगीत' मानले जाते.स्वातंत्र्यासोबतच तो टिकवण्यासाठी लागणारी एकता त्यांनी यात मांडली आहे.​"नांदोत सुखे गरीब-अमीर एकमताने" त्यांच्या भजनांतून त्यांनी 'देव' आणि 'देश' यांना एकरूप केले. त्यांच्या शब्दांत इतकी शक्ती होती की,१९४२ च्या 'छोडो भारत' चळवळीत त्यांच्या भजनांनी प्रेरित होऊन अनेक तरुण तुरुंगात गेले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढले.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आधी मनातील गुलामगिरी आणि अंधश्रद्धा नष्ट करणे गरजेचे आहे, असे ते सांगत असत. त्यांनी सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून लोकांमध्ये जात-पात विसरून 'एक राष्ट्र' म्हणून जगण्याची प्रेरणा दिली.

ते म्हणतात की,

​"हर देश में तू, हर भेष में तू,

तेरे नाम अनेक, तू एक ही है..."

​१९४२ च्या क्रांतीमध्ये चिमूर आणि आष्टी येथील लढ्यात तुकडोजी महाराजांच्या 

"आता उठा रे, कंबर कसा रे,

 उठा आता या वेळेला" 

या भजनाने स्वातंत्र्याची ऊर्जा भारतीय जनतेमध्ये निर्माण केली; म्हणूनच तत्कालीन ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर बंदी घालून त्यांना तुरुंगात डांबले होते.

       ​राष्ट्रसंतांची भजने ही फक्त गाणी नव्हती तर  तो एक 'स्वातंत्र्याचा मंत्र' होता, स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करणारी ऊर्जा होती.जी आजही आपल्याला कर्तव्यदक्ष राहण्याची प्रेरणा देत आहे आणि पुढे देत राहील .



        सन -१९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी त्यांनी सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध देशभक्तीपर भजने गायली.​राष्ट्रसंतांच्या खंजिरी भजनांनी सामान्य माणसांवर खूप प्रभाव पडला होता.मराठी आणि हिंदी भाषेतून त्यांनी प्रासादिक शब्दात जगण्याचे तत्त्वज्ञान सांगितल्यामुळे ते जनसामांन्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले.समाजपरिवर्तन घडण्यास ते कारणीभूत ठरले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराज यांचे सागराएवढे सर्व समावेशक कार्य बघून त्यांना 'राष्ट्रसंत' या पदवीने सन्मानित केले. तेव्हापासून राष्ट्रसंत म्हणून ते ओळखले जाऊ लागले. 'जपानमध्ये झालेल्या विश्वशांती परिषदेत त्यांनी 'आत्मबोध' या विषयावर विचार मांडले,ज्याचे जगभर कौतुक झाले.​​"देव मंदिरात नसून तो मानवात आहे आणि खरी भक्ती ही देशसेवा व समाजसेवेत आहे.हा त्यांचा विचार आज आचरणात आणणे काळाची गरज आहे ."​तुकडोजी महाराजांनी दिलेला 'ग्रामोद्धाराचा' मंत्र आजही भारताच्या अनेक क्षेत्रातील प्रगतीसाठी अनमोल आहे .

        ३० एप्रिल राष्टसंतांचा जन्मदिवस हा त्यांच्या नावाने साजरा न करता तो ग्रामजयंती म्हनून साजरा करावा. ग्रामाग्रामात सर्वांनी ग्रामस्वच्छतेचे,श्रमदानाचे कार्यक्रम घेऊन रामधूनच्या माध्यमातून प्रबोधन करावे. ही उत्तुंग संकल्पना त्यांनी आपल्या अनुयायांसमोर मांडली व स्वतः ग्रामाग्रामात अशाप्रकारचे कार्यक्रम घेऊन स्वतः सांगितलेल्या संकल्पनेचे प्रत्यक्ष आचरण केले.भारतातील प्रत्येक ग्राम सुधारले पाहिजे हा त्यामागचा उद्देश होता.राष्ट्रसंत आपल्या भजनात सांगत असत,

" गावागावासी जागवा। 

भेदभाव हा समूळ मिटवा।

उजळा ग्रामोत्रतीचा दिवा। तुकड्या म्हणे।। "

            भारतातील ग्रामा ग्रामातील ग्रामवासियांना जागवणारे व राष्ट्रप्रेमाची ज्योत जनतेमध्ये निर्माण करणारे थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ११७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ॥



राज्यस्तरीय साहित्य माणिक पुरस्कार प्राप्त 

             साहित्यिक व कवी

     प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,

      अमरावती.८०८७७४८६०९

मानवतेचे पुजारी_ सौ. संगीता संतोष ठलाल

 



मानवतेचे पुजारी या धरतीवर जन्माला आले

साऱ्या मानव जातीचा उध्दार केले


कीर्तन केले, अभंग, भजन रचिले 

समाजासाठी मोलाचे योगदान दिले


नाव तयांचे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 

त्यांची जयंती साजरी करा हो आज


ग्रामगीता ग्रंथ लिहिले समाजासाठी 

जगले नाही एकही दिवस स्वतः साठी


गावाच्या विषयी आदर करून फार घेतले

 देशाच्या विकासासाठी कष्ट सहन केले


हातात खंजेरी, मुखात गोड वानी 

त्यांच्याकडे बघून धन्य झाली माता धरणी


मानवतेचे पुजारी असे पुन्हा होणे नाही 

अजूनही त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार मिळाले नाही


ही शोकांतिका आजही दिसून येत आहे 

जंयतीला, पुण्यतिथीला त्यांना पुजले जात आहे


वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अजूनही कळले नाही 

त्यांना वाचायला कोणाकडे ही वेळ नाही


वं. राष्ट्रसंत जगी अजरामर होऊन गेले 

एक क्रांतिकारक आत्मा जगाला मिळाले


तुकडोजी महाराजांची गाथा वाचावे 

त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत रहावे


देशाचे हीत, समाजासाठी भले योगदान 

या होऊन गेलेल्या महा विभूतीला करते मी वंदन


सौ. संगीता संतोष ठलाल

 मु. कुरखेडा जि. गडचिरोली

मो. ७८२१८१६४८५

डोंबिवलीत रंगले शब्दसाजचे ३रे राज्यस्तरीय साहित्य संमेलन

 


 शब्दशिल्प/डोंबिवली (बबनराव आराख)_डोंबिवली पूर्व येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे तिसरे राजस्तरीय साहित्य संमेलन उत्साही वातावरणात पार पडले. 

वृषाली जोशी, मानसी आंब्रे आणि वैभव बटावले यांनी आयोजित केलेल्या सदर साहित्य संमेलनात राज्यभरातून अनेक साहित्यिक सहभागी झाले होते. सुनीता परब आणि त्यांच्या चमूने स्वरचित स्वागत गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. योगिता खानविलकर आणि संगीता कासले यांनी सुबक व सुरेख रांगोळी साकारून सारस्वतांची नेत्रांची पारणे फेडली.

ज्येष्ठ साहित्यिक वाणी वेणूमाधव केरकलमट्टी यांनी तिसऱ्या भव्य दिव्य साहित्य संमेलनाचे अधक्ष्यपद भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक रमेश पाटील यांनी पदभार सांभाळला. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात काव्यगंध प्रकाशनाच्या तीन पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे आणि संमेलन अध्यक्षांच्या  हस्ते करण्यात आले. ज्यात शब्दसाज विशेषांक (प्रातिनिधिक विशेषांक ), शब्दांकुर (श्री विनोद डंबे लिखित काव्यसंग्रह ), व काव्यामृत (श्री. रघुनाथ भिसे लिखित काव्यसंग्रह ) समाविष्ट होते. प्रत्येक सारस्वताने मंत्रमुग्ध करणाऱ्या कवितेच्या सरी सभागृहात बरसवल्या. 

या संमेलनात एक आकर्षण बिंदू ठरला तो म्हणजे सन्माननीय संतोष जाधव आणि सन्मानीय मानसी आंब्रे यांनी सादर  केलेल्या 'सखाराम बाइंडर' या जेष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्या लघुनाटिकेचे काही क्षण. 

सदर कार्यक्रमास लाभलेले आयोजक व नियोजक मंडळ यांच्या अथक प्रयत्नाने कार्यक्रम बहारदार आणि उत्स्फूर्त पणे पार पडला, त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मानाचे शिलेदार म्हणून गौरविण्यात आले. ज्यामध्ये मुख्यत्वे अविनाश ढळे, योगिता खानविलकर, प्रियांका कुटे, सुनीता परब, विद्या थोरात, इंदिरा शिंगणे, रघुनाथ भिसे,विनोद डंबे, संगीता कासले आणि संतोष जाधव यांचा समावेश होता. संतोष जाधव, स्मिता शिंदे,जीवा मोरे,विवेक जोशी आणि विकास पाटील यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शब्दसाज साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या काव्य अभिवाचन स्पर्धेचा विजेता पुरस्कार सुनीता परब आणि दीपाली साबळे यांना प्राप्त झाला.

सोबत तुझी..!

 


(आज लग्न वाढदिवस निमित्त)


सोबत तुझी , मजला असे

संकटातही , वाट ती दिसे..


येई अंगात , प्रेमाचे बळ 

सोसावया ते ,संसारी झळ..


सुखदुःखाची , वादळे येती 

तूझ्या सोबती ,परीक्षा घेती..


संसारी गाडा ,ओढण्या साथ

कष्टाने दिली ,संकटा मात..


तूच प्रेरणा ,बायको माझी 

सदैव राहो ,सोबत तुझी..


लेखक /कवी - निवृत्ती ए.पाचपोर

तिवडी बुलढाणा 8805178858

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

 


थोर समाजसुधारक, सप्तखंजरी वादक, अशा या महामानवाचा जन्म ३० एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत एका शिंप्याच्या घरात मंजुळा मातेच्या उदरात रत्ना_ सारखा चकाकनारा "माणीक" जन्माला आला.

   कष्टमय जीवन जगत असताना कशातच लक्ष लागत नव्हते. परमेश्वर भक्तीत तल्लीन होऊन जायचे अशातच आडकोजी महारा_ जांचा साक्षात्कार झाला आणि गुरू चरणी नतमस्तक झाले.

   गुरूचा ध्यास , खंजरीची साद आणि मुखातून वेदरुपी शब्द भजनामध्ये परिवर्तीत झाले आणि लोकांपर्यंत पोहोचले.

   किर्तन, प्रवचन,भजन या अनेक 

माध्यमातून गावा_गावातुन लोकांना जागृत केले.

   " माणूस द्या मज माणूस द्या"हि भिक मागता प्रभू दिसला."हा नारा त्यांनी माणसां माणसांपर्यंत पोहोचविला.दुसरी जनजागृती त्यांनी सामुदायिक प्रार्थनेतुन केली.

गावागावात कीर्तनाचे कार्यक्रम तसेच गाव स्वच्छता अभियान, प्रभात फेरी, बालसंस्कार, यासारखे धडे मुलांना दिले   ग्रामगीते सारखा ग्रंथ जगापर्यंत पोहोचविला. सर्वधर्मसमभाव जागृतीसाठी त्यांनी ग्रामगीता लिहिली.आणी घराघरापर्यंत पोहोचविली .गुरूदेव सेवा मंडळ उभे केले .लोकांना भजन ,ध्यान यासारख्या भक्तीमधून हरिनामाचा ध्यास आणि आत्मीय समाधान या ओळीतून व्यक्त केले.

 "अपने आत्म के चिंतन मे हरदम 

   जागूत रहना है| ओहम सोहम    श्वास से अपने अंतरदृष्टी निरखना है  

प्रत्येक व्यक्ती हा भगवंत स्वरूप आहे ही जाणीव करून सर्वांनी

एकत्रित येऊन माणूस माणसाला ओळखेल आणि प्रेमाने राहील. 


  संत शिरोमणी गाडगे महाराज सुद्धा कीर्तनातून लोकांना गावागावात जाऊन उपदेश दयायचे. पहिले गाव स्वच्छ करायचे आणि तिथेच कीर्तन करायचे हा त्यांचा नित्यक्रम होता. साध्या सोप्या भाषेत लोकांना पटवून द्यायचे.

दुसऱ्यांचे दुःख दूर करायचे गरिबाला मदत करायचे पण स्वतः पुत्र मरण पावला असतांनाही  किर्तन बंद केले नाही तर चार ओळी मधुनच लोकांना संदेश दिला .

   "ऐसे किती गेले कोटयान कोटी 

    काय रडु एकासाठी "

असे संत होणें नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खंजरी सुध्दा हाच संदेश वेळोवेळी  देत होती. मुत्युसमयी लोकांच्या डोळ्यात अश्रू असावेत पण त्यासोबतच आपल्या सत्कर्माची कीर्ती घराघरात गाजली पाहिजे अशी भावना सतत मनात असावी.

  " विधाता मृत्यू हो ऐसे हजारो लोक रोते है |सफल हो जिंदगी सबकी | की कीर्ती घर घर मे गाते हो ||

 अशा या महानायकाने जीवनभर सेवा करत सत्कर्माचा मार्ग "ग्रामगीता," या महान ग्रंथातुन

दिला. संसाराच्या मोहपाशात अडकुन न राहता प्रभुचा ध्यास धरावा तो मनाला आनंद, समाधान देतो.शेवटी एकट्यानेच पुढच्या प्रवासाला जायचं आहे.  ना साथी ना सोबती एक अकेला .......

चौघांच्या खांद्यावर निघाला.

   अहंकार सोडून उरलेलं आयुष्य सत्कारणी लावा."ग्रामसेवा" हीच

माझी पुजा आहे.मानवाने अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून बंधुत्वाने राहावे. 

 माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हा संदेश जगाला देऊन शेवटचं भजन विठ्ठल चरणी पंढरपूर येथे सादर केले आणि जगाचा निरोप घेतला.

"  झाला शेवट गोड हा

    देवे पुरविली कोड

    नाही पडली आटा आंटी

    हरी उभा राहणे पाठी "

या थोर राष्ट्रसंताने"ग्रामगीता" हा

ग्रामविकासाचा  अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ  जगाला अर्पण केला .

  या आध्यात्मिक आणि समाजसुधारक नेत्याला राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली .

  अशा विरसंताना माझे कोटी कोटी प्रणाम 🙏


प्रतिभा सुनील मावलकर 

अकोला

सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे संत : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

 


=======================                                  महाराष्ट्र ही साधुसंताची भूमी म्हणून ओळखली जाते.अनेक संतानी या पवित्र मातीत अवतार घेतले आहेत. संत तुकाराम, एकनाथ, ज्ञानेश्वर, गाडगेबाबा या संताप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज थोर संत होऊन गेले. तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ ला यावली जि. अमरावती येथे झाला. वडील बंडोजी इंगळे व आई मंजुळाबाई .तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे.अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी अनेक कीर्तन व भजनांचा उपयोग केला. मराठी व हिंदी भाषेत काव्यलेखन केले. आत्मसंयमी विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. तुकडोजी महाराजांनी इ. स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली खंजिरी भजन प्रकारच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. तुकडोजी महाराज महान समाज सुधारक, स्वातंत्र्य सेनानी, कवी, गायक होते. तुकडोजी महाराजांचे गुरू आडकोजी महाराज होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी साहित्य रचना केली. अंधश्रद्धा व जातिव्यवस्था निर्मूलन करण्यासाठी कार्य केले. अंधश्रद्धा व जातिभेद समाजाला लागलेला कलंक आहे.तो कलंक धुवून काढण्यासाठी गावोगावी जाऊन समाज प्रबोधन करीत. आधुनिक काळातील एक महान संत म्हणून तुकडोजी महाराज यांची ओळख आहे. विदर्भ जरी जन्मभूमि असली तरी महाराष्ट्रभर फिरून समाज जागृती केली. राज्यचं नव्हे तर संपूर्ण देशभर प्रवास करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. जपान देशात जाऊन सर्वांना विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. सन १९४२ भारत छोडो आंदोलनात त्यांना अटक झाली. 

"आते है नाथ हमारे "

हे त्यांचे पद स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती देणारे गीत होते. भारत हा खेड्यांचा देश आहे. खेडे म्हणजे ग्राम किंवा ग्रामीण भागातील लोकांचा विकास झाला पाहिजे. ग्रामीण विकास झाला की राष्ट्रीय विकास होतो. समाजातील सर्व प्रकारच्या लोकांचा विकास कसा करता येईल. त्यांचा उद्धार करण्यासाठी अहोरात्र योगदान दिले.ग्रामोन्नती, ग्रामकल्याण त्यांच्या विचार सरणीचा केंद्रबिंदू होता. संपूर्ण भारत देशातील खेड्यांची दैयनिय स्थितीचा  विचार केला. खेडे गाव सुधारल्याशिवाय देश सुधारू शकत नाही. ही भावना मनात घर करून होती. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याबद्दल उपाय योजना तयार करीत. देवाबद्दल भोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात. सर्वधर्म समभाव हे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचे  विचार विश्वाचे वैशिष्ट्य होते. सामुदायिक प्रार्थना महाराजांना आवडत होती. तुकडोजी महाराज एकेश्वरवादाचे पुरस्कार करते होते. विवेकनिष्ठ जीवनदृष्टीवादी होते, धार्मिक कर्मकांडाला कडाडून विरोध केला. महिला उन्नती व्हावी म्हणून सतत कुटुंब, समाज, राष्ट्र व्यवस्था ही स्त्रीयांवर कशी अवलंबून असते हे कीर्तनातून जनसामान्यांना सांगत. स्त्रीला अज्ञानात, गुलामगिरीत ठेवणे अन्यायकारक आहे. देशाची युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. तरुण हे बलाची उपासना करणारे असावे. राष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी तरूण पिढीवर आहे. बल किंवा ताकदवान युवा शक्ती राष्ट्रीय मनोबल वाढवते. समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करून नीतिमान व सुसंस्कृत जनता कशी होईल ते महत्त्वाचे आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झोपडीत सुद्धा सर्व सुख मिळते हे सांगतात. 

 *"राजा सजी महाली,सौख्ये कधी मिळाली.|* 

*ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या.||*

*भूमिवरी पडावे,ता-याकडे पहावे|*

*प्रभू नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या.||*

*येता तरी सुखी या ,जाता तरी सुखी जा|*

*कोणावरी ना बोझा या झोपडीत माझ्या||*

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. 

=======================

*रत्नाकर बाबुराव पाटील*                   

          {पर्यवेक्षक}                                     

विद्यानिकेतन माध्यमिक                            

आश्रमशाळा शिंगोली 

ता.जि.   धाराशिव

मो. ९४०३३९४८१८.

_____

2

खंजिरी भजनातून प्रबोधन:  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

=======================                                  महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी, कवि, गायक, महान प्रबोधनकार, संत तुकडोजी महाराजांच्या अनमोल कार्याचा उजाळा देण्याचा माझा प्रयत्न. माणिक बंडोजी इंगळे हे मुळचे नाव असणारे "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज" म्हणून ओळखले जातात. खंजिरी भजन व कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचे अनमोल कार्य केले. 

खंजिरी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक छोटे से चर्मवाद्य आहे.गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते.लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठराविक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात.या चकत्या एकमेकावर आपटून नाद निर्माण होतो. खंजिरी एका हातात धरून दुसऱ्या हाताने आघात करून वाजवली जाते.लोकसंगीतात खंजिरीचा नियमित वापर केला जातो. खंजिरी हे वाद्य तुकडोजी महाराज त्यांच्या भजनात वाजवीत असत. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिव्यवस्था दूर करण्यासाठी भजन व कीर्तनाचा प्रभावी वापर केला. ज्यांनी आत्मसंयमी विचार ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषेत अनेक काव्यरचना केल्या. तुकडोजी महाराजांनी इ. स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार समाज प्रबोधन करण्यासाठी निवडला. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू होते. गुरू आडकोजी महाराजांनी त्यांचे मूळचे नाव माणिक हे बदलून तुकडोजी ठेवले. विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्रात व देशभर पर्यटन करून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. जपान सारख्या प्रगत देशात जाऊन सर्वांना विश्वबंधूत्वाची शिकवण दिली. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात तुकडोजी महाराजांना अटक झाली. 

*"आते है नाथ हमारे|"*

हे त्यांचे पद स्वातंत्र्य चळवळीत स्फूर्ती गीत ठरले. भारत हा खेड्यांचा देश आहे. ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होतो. हीच भावना व श्रद्धा तुकडोजी महाराजांची होती. समाजातील सर्वच लोकांचा उद्धार कसा होईल या विचारसरणीमूळे चिंता वाटत होती. ग्रामोन्नती व ग्रामीण कल्याण हेच त्यांचे लक्ष होते. भारतीय खेड्यांचा त्यांना चांगला अभ्यास होता.

ग्रामीण विकासाच्या विविध समस्यांवर मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याबद्दल उपाय योजना सांगीतल्या.अमरावतीजवळ मोझरी च्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील लक्षणीय कार्य आहे. ग्रामगीतेचे लेखन त्यांच्या जीवन कार्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याबद्दल विविध उपाय योजना सुचविली. ग्राम सुशिक्षित, सुसंस्कृत, संपन्न व्हावेत. देशाच्या गरजा गावांनी भागवाव्यात. ग्रामउद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे. गावातील देवभोळेपणा, जुनाट अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात. 

सर्वधर्मसमभाव यासाठी सामुदायिक सर्वधर्म प्रार्थनेचा पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ दृष्टीने एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे होते. अनावश्यक कर्मकांडाला विरोध केला. 

खंजिरी भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. अखिल भारतीय पातळीवर साधु संघटनेची स्थापना केली. महिला उन्नती व्हावी यासाठी अनमोल योगदान दिले. कुटुंब, समाज, राष्ट्रव्यवस्था स्त्रीवर अवलंबून असते. 

देशाचे तरूण हीच राष्ट्रीय संपत्ती असते. तरूणाने बलाची उपासना करावी. समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करावे. तरुण पिढी व्यसनमुक्त असावी. व्यसन हे राष्ट्राला लागलेला कलंक आहे. ऐहिक व पारलौकिक गोष्टींचा सुरेख संगम तुकडोजी महाराजांच्या साहित्यात सापडतो. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात तुकडोजी महाराजांचे खंजिरी भजन ऐकले व प्रसन्न होऊन राष्ट्रसंत ही उपाधी बहाल केली. 

तुकडोजी महाराजांचे  महानिर्वाण अश्विनी कृष्ण पंचमी ३१ ऑक्टोबर १९६८ रोजी झाले. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली,

सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली अशा अनेक साहित्य रचना लिहिल्या.अशा महान परम पूज्य राष्ट्रसंतांच्या चरणी कोटी कोटी वंदन. 

=======================

रत्नाकर बाबुराव पाटील            

{सहशिक्षक} 

विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,

शिंगोली ता.जि. धाराशिव

श्रद्धा सबुरीच्या पावन भूमीत रंगला.. 'तो भाव भक्तीचा भुकेला' अनोखा कथाकथन प्रयोग

 


शब्दशिल्प/अहिल्यानगर :- 28 वे राष्ट्रसंत गाडगे महाराज मराठी साहित्य संमेलन शिर्डी येथे नुकतेच संपन्न झाले. संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक राजेंद्र फंड विराजमान होते. स्वागताध्यक्ष आचार्य डॉ. शंकर अंदाणी , प्रमुख पाहुण्या सुमन देसाई, पुरस्कार वितरण अध्यक्ष माया नवथर, आयोजक विलास पाटील कोल्हापूर हे मान्यवर होते. साहित्य संमेलनात व्याख्यान, कथाकथन, कवी संमेलन, राष्ट्रसंत गाडगे महाराज पुरस्कार, इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. 

साईबाबांच्या श्रद्धा अन् सबुरीच्या पावन भूमीत, संमेलनमध्ये कथालेखक बाळासाहेब देशमुख यांनी 'तो भावभक्तीचा भुकेला' ही धार्मिक कथा सादर करण्यात आली.

संसारात प्रपंच करता,करता वसुधा  आपलं गुरुमंत्र सदोदित ओठांमध्ये म्हणत राहते. परमात्मा पांडुरंगाची पंढरपूरकडे जाणारी दिंडी, आपल्या घरी येणार,याचे तिला अप्रूप होते. घरी येणाऱ्या संतांच्या, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तिने तयारी केलेली. ऐनवेळी तिने केलेला चिवडा तिच्या जाऊबाईंनी नाकारला. तेव्हा तिला सासूबाईची आठवण झाली. 18 पुराणे आणि शेकडो पोथ्या श्रवण केलेली सासू तिला म्हणत असे  'देवाला आपलेसे करण्यासाठी दोन हाताचा नमस्कार आणि दोन फुले मनोभावे वाहिली ,की ती देवाला पावतात. माणसांची श्रद्धा डोळस असायला हवी. बेगडी, नकली श्रद्धा उपयोगाची नाही. शबरीची उष्टी बोरे श्रीरामाने खाल्ली. गरीब सुदाम्याचे चिमूटभर पोहे देखील श्री कृष्णाने मोठ्या आवडीने खाल्ले. हा भाव भक्तीचा महिमा बाळासाहेब देशमुख यांनी आपल्या कथेद्वारे मांडला. त्यावेळी सर्व सभागृह कथाकथनाने मंत्रमुग्ध झालेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक श्री रंगनाथ वाडेकर यांनी केले. महाराष्ट्राच्या विविध भागातून साहित्यिक मोठ्या संख्येने संमेलनात हजर होते.

छत्रपती संभाजीनगरात ‘स्टार ग्लोबल सोशल अवॉर्ड’ने मनिषा कांबळे यांचा गौरव

 


( कला, साहित्य , सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल )

शब्दशिल्प/छत्रपती संभाजीनगर_किल्ले टुरिझम फेस्टिव्हल फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित “स्टार ग्लोबल पुरस्कार वितरण २०२६” हा भव्य आणि दिमाखदार पुरस्कार

सोहळा  मराठवाडा  महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी विभाग या सभागृहात छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडला.

 समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्याला मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या सोहळ्यात प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सुनील गायकवाड (माजी खासदार, लातूर) यांची उपस्थिती लाभली. तसेच मा. कृष्णकुमार दडके, सुप्रसिद्ध टीव्ही चित्रपट अभिनेत्री मा. लीना पंडित, हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते मा. रमेश अग्रवाल,( जयदेव फेम )ज्येष्ठ अभिनेते व निर्माते मा. दिलीप घेवंदे, तसेच ज्येष्ठ साहित्यिका मा. डॉ. मंगल पांचाळ यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या प्रतिष्ठित सोहळ्यात यवतमाळ येथील सुप्रसिद्ध कवयित्री, साहित्यिक, समीक्षक लेखिका, सूत्रसंचालक,  नाट्य कलाकार मनिषा आनंदराव कांबळे यांना त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी “स्टार ग्लोबल सोशल अवॉर्ड” प्रदान करण्यात आला.

मनिषा कांबळे यांनी २००४ पासून आपल्या लिखाणाला सुरुवात केली असून  आपल्या लेखणीतून समाजातील वेदना, वास्तव आणि परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे मांडला आहे. त्यांच्या  लिखाणामध्ये, तसेच कवितांमध्ये फुले- शाहू- आंबेडकर विचारसरणीचा प्रभाव दिसून येतो, ज्यातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. समता न्याय बंधुता या मूल्यांचा जतन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर त्यांनी अनेक वर्तमानपत्रातून परिवर्तनशील लिखाण करून तसेच राज्य नाट्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांचा "सूर्याचा सूर्य "हा काव्यसंग्रह प्रकाशित असून   "जगत आहोत" हे त्यांचे आगामी प्रकाशन आहे


कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे १०० मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या सन्मानामुळे मनिषा कांबळे यांच्या कार्याला नवी उभारी मिळणार असून, भविष्यात त्या साहित्य, संस्कृती आणि समाजकार्यात अधिक मोठे योगदान देतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. आणि त्यांचे कौतुक केले या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांच्याकडे अभिनंदनचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशांची श्रेय आपल्या परिवाराला देतात...

तितिक्षा' : अस्वस्थ करणा-या घटनांचं अधोरेखण

   'तितिक्षा' हा नागपूर येथील सुदर्शन पनतोडे यांचा दुसरा कवितासंग्रह. पहिला कवितासंग्रह 'स्पर्शिका' हा मागील वर्षी प्रकाशीत झाला होता. त्यावरही मी लिहिले होते.या कवितासंग्रहाने कविला सन्मान मिळवून दिला. कवी पत्र सूचना कार्यालय, प्रकाशन विभाग,भारत सरकार येथे कार्यरत होते.शेवटी अप्पर महासंचालक ,पसूका,माहिती व प्रसारण मंत्रालय,छत्तीसगड येथून २०२० साली सेवानिवृत्त झालेत. 'तितिक्षा' या काव्यसंग्रहात हिंदी-७ मराठीतील-४८ काव्यरचनांचा समावेश आहे. त्यांच्या सर्व काव्यरचना या दोन ओळींचं कडवं असलेल्या मुक्तछंदातील आहेत. त्यांची कविता म्हणजे जीवनात अस्वस्थ करणा-या घटना आणि आंतर मनातील भाव-भावनांचं प्रकटीकरण आहे. त्यांनी जे अनुभवलं, त्यांनी अवती-भोवती जे बघितलं,अनुभवलेले मानवी स्वभावाचे विविध पैलू,स्वभाव, राहणीमान,वर्तन, कर्म, तसेच शासन,प्रशासन, व्यवस्था यांच्या कार्याचा संक्षीप्त आढावा घेतल्याचे जाणवते. विविध म्हणीचाही या कवितेत अंतर्भाव केलेला जाणवतो. कविची अभिव्यक्ती ही डोळसपणे मानवी जगणं अनुभवते. आणि अगदी मोजक्या शब्दात शब्दबद्ध करते.त्यांच्या रचनेतील काही शब्द जरा जड असल्याचे जाणवतात. तो त्यांचा अभ्यासाचा,चिंतनाचा व बुद्धिमत्तेचा भाग असावा. त्यामुळे कविता निश्चितच भारदस्त वाटते. आशय आकलनाच्या अनुषंघाने कधिकधी ती दुर्बोधतेकडे झुकतांना दिसते. गझलेच्या शेरासारखाच प्रत्येक दोन ओळीत वेगवेगळा आशय दडला असल्याचे जाणवते. कविने विविध विषयाला,आशयाला हात घातलेला आहे. कधी ते मानवी स्वभावाला, अवगुणाला हळूच चिमटा काढतांना दिसतात. ते कवितेत आक्रस्ताळेपणाने व्यक्त होत नाहीत. तर अगदी शांतपणे दोषांवर बोट ठेवतांना दिसतात.  कवी जेव्हा एखाद्या विषयावर व्यक्त होतात, तेव्हा ते वाचकाला बोचतांना दिसत नाही. कविता शांतपणे व हळूवारपणे आपलं म्हणनं मांडत जाते.ती कुणालाही दुखवितांना दिसत नाही. कदाचित हा कविचा स्वभाव असावा. कधी कधी कविच्या स्वभावानुसार कविता शब्दांचा हात धरून प्रवास करीत असते. पनतोडे यांची कविता उताविळ नाही तर वैचारीक वर्तुळ असलेली, शांत स्वभावाची आशयघन कविता आहे. तिच्यात विद्रोह नाही. ती भूतकाळाचा परामर्श घेत वर्तमानाचा हात धरून चालते. अलिकडच्या विज्ञानयुगात, स्पर्धायुगात मानव यंत्र झाला असल्याचे निदर्शनात येते.आपल्या माणसांशी त्यांचा संवाद कमी झालेला आहे. लोक आपल्या कामात, आधुनीक यंत्रात, जसे मोबाईल,लॅपटाॅप, संगणक, नोकरी, पॅकेज यामध्ये हरवलेले दिसतात. तो घरातल्या घरात कुटुंबातील व्यक्तींशी बोलत नाही. संवाद साधत नाही. असे कविला वाटते.


"साधन संवादाचे असेल जरी शेजारी पाजारी

एका घरात चार खोल्या,अन् संवादाचा रथ होई भारी !" ( ढालकरी) 


हे अलिकडच्या पिढीचे वास्तव चित्रण कवी आपल्या कवितेतून उजागर करतो. मानवी जीवनात,मानवी मनात क्षणोक्षणी विविध बाबतीतील इच्छा,आकांक्षा,अपेक्षा निर्माण होत असतात. आपण त्या सर्वच इच्छांना पूर्णत्वास नेवू शकत नाही. परंतु मनात नाना विचारांचे चक्र सारखे गतीमान होत असते. काही प्रश्न पडतात, काही समस्या उद्भवतात,काही घटना घडत असतात. या विषयीच्या विचाराने मानवी मन बेचैन होतं. योग्य कर्तृत्वाला चालना मिळत नाही. अशावेळी आपण भरकटत जातो. यावर कवी आपल्या कवितेतून प्रकाश टाकतांना दिसतो....


" आहे मनात जी तितिक्षा,करावी तिची प्रतीक्षा

आहे मनात जी अपेक्षा,करावी तिची समीक्षा !"

(तितिक्षा)

भ.बुद्धाने आपल्या प्रज्ञेने ,मानवाच्या दु:खमुक्तीचे कारण,उत्तर व प्रयत्नाचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण मिळविले, विजय मिळविला. बुद्धाने प्रज्ञेच्या भरवश्यावर आपले ध्येय गाठले आणि समस्त मानव जातीला कल्याणाचा मार्ग सांगीतला. कवी म्हणतात आपण अपेक्षांची समीक्षा करायला हवी. मन शांत करायला हवे. तरच आपल्याला आपल्या उत्थानाचा योग्य मार्ग गवसतो. 

माय ही कुणाचीही असो. ती स्वाभिमानी असते, कष्टाळू असते, ती आपल्या कुटुंबाप्रती प्रामाणीक असते. ते मायविषयी नागपूरी भाषेतील 'बाबूच्या घरी' या कवितेत व्यक्त होतांना म्हणतात.

" आहो तोवर करीन मी कष्ट

एक करीन पक्क,खाईन नाही उष्ट!"


अशी स्वाभिमानी व कष्टाळू माय कविने रेखाटली आहे. कवी शब्दांना आभाळमाया प्रदान करणारा आहे. तो शब्दांचं सोनं करतो. अचूक मांडणी अचूक शब्दांद्वारे करतो. ज्याने भले केले त्याच्याविषयी कृतज्ञताभाव मनात जपला पाहिजे. कृतघ्न होऊ नये. कोणत्याही माणसाचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे नसावे, असे कविला वाटते. हा महत्वाचा संदेश आहे. पक्क(खरा) इतिहास विसरून जाऊन न्यूनगंडाचे भूत माणसा माणसाच्या मानगुटावर बसले की काय ? अशी भितीही कवी व्यक्त करतांना दिसतो. मानवाने वेळीच सजग झाले पाहिजे. प्रज्ञेचा सूर्य सदैव आपल्या विचारात नि कर्मात प्रकाशीत ठेवला पाहिजे. तरच तो तरतो. चिंता करून माणूस सुखी होत नाही. प्रत्येक समस्येवर,संकटावर,दु:खावर मार्ग ,उपाय आहे. विचलीत न होता ,धाडसाने सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे‌ असे कवीला वाटणे स्वाभाविक आहे.


" आमंत्रण-निमंत्रण पाठवले,दिवस होते सुगीचे

खास मेजवानी म्हणून,घरच्यांनाच वगळले होते!

(दिव्याखाली अंधार)


काही लोकांना सुखात असले की,वाद-विवाद झाले की,आपल्याच माणसांचा त्यांना विसर पडतो. स्वार्थी बणतात. लोकांना खूप ज्ञान सांगतात.पण स्वत: मात्र तशी कृती करतांना दिसत नाहीत.  यालाच दिव्याखालचा अंधार म्हणतात. कवी नेमकं मानवाच्या अशाच अवगुणांवर बोट ठेवतो. कविच्या काही रचनांमध्ये खयाल,आशय आकलनाच्या बाबतीत स्पष्टतेची जरी उणीव जाणवत असली तरी कवितेत सूचकभाव  मात्र निश्चितच आहे.

         'आदिकारण' ही रचना काही माणसांच्या स्वभावातील दुटप्पीपणा अधोरेखीत करते. आमच्या लोकांची कधी कधी फसगत होते. आम्ही आमचा मार्ग,हक्क,अधिकार विसरून कुणाच्या सांगण्यावरून भावनेच्या भरात वाहवत जातो. आणि आमचं नुकसान करून बसतो.आम्ही सदैव आमच्या ध्येयापुर्तीच्या मार्गावर चाललं पाहिजे. हेच कविला सुचवायचे आहे. प्रत्येक माणसात कमी-अधिक प्रमाणात प्रतिभा असते.विविध कला,विषय,क्षेत्रान्वये ती वेगवेगळी असू शकते. पण त्यात सुसूत्रता असली पाहिजे. भावभावनांचा कल्होळ होऊन ,अनाठायी शब्दांच्या भडिमारात प्रतिभेचा किंवा सर्जनाचा,नव कलाकृतीचा कोंडमारा होऊ नये.आत्मस्तुती ठरू नये. योग्य शब्दांच्या उपयोजनातून सकस आणि साजेशी कलाकृती जन्माला आली पाहिजे. आणि जो कलाकार यात यशस्वी ठरतो तोच खरा कलाकार.

          कित्येक माणसं विज्ञानयुगात निसर्गाला कमी लेखतांना दिसतात. उन्मातामुळे त्याच्या चक्राकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. त्याचे विपरीत परीणाम कधी कधी समस्त मानव जातीला, पशू, पक्ष्यांना,झाडा-झुडपांनाही सहन करावे लागतात. निसर्गचक्रात आपण आवश्यकतेपेक्षा ढवळाढवळ करता कामा नये. परंतु निसर्ग सृष्टीचे अनंत उपकार आपण विज्ञानाने लावलेल्या शोधांमुळे, सुखसोईंमुळे विसरत चाललो आहोत.आपण सदैव निसर्गाशी मैत्रीचे नाते ठेवले पाहिजे. त्यातील घटकांचे आभार मानले पाहिजे.त्याच्याविषयी कृतज्ञ असलो पाहिजे. त्यांच्याविषयी आपल्या मनात मंगलमैत्री भावना बाळगली पाहिजे. आपण अकुशल कर्म केले  तर दु:खच आपल्या वाट्याला येवू शकतात. आणि या स्पर्धेच्या युगात,स्वार्थाच्या बाजारात तुमच्या दु:खाला कुणीही विचारीत नाहीत. 'दु:खसमूह' यात कवी जनतेला सजगतेचा इशारा देतांना म्हणतात....

" ही माझी करणी कशी? नियतीनेही केला एक सवाल

सुख-दु:खाचे ओझे तुमचेच, मी कां वाहू माझ्या मनात ?" ( दु:खसमूह) 


माणूस जीवनात हताश होतो. कारण त्याला आपल्या जीवनातील दु:खापेक्षा,विवंचनेपेक्षा, समस्या, संकटांपेक्षा काहीही महत्वाचं वाटत नाही. हळूहळू तो हतबल होत जातो. इथे असामान्य काहीतरी आहे, ध्येयाचं शीखर गाठायचं आहे, सुखाची सर त्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येवू पाहते. आयुष्यात बेरजेच्या क्षणांचे गणित करण्यापेक्षा तो आपल्या आयुष्यात काय गमावले या वजाबाकीचाच अधिक विचार करतो. मनात नकारात्मक भाव बाळगतो.  त्यामुळे त्याची मती मंद होत जाते. क्रयशक्ती,विचारशक्ती कमी होत जाते. तो जेव्हा सकारात्मकतेचा विचार करण्यापेक्षा नकारात्मक विचार जास्त करतो. तेव्हा तो जीवनात यशस्वी होत नाही. याचं गमक कवी 'विप्रकृष्ट' या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. कविने आपली अभिव्यक्ती आपल्याला सोप्या वाटणा-या मनासारख्या प्रकरात व्यक्त करावी. पण कोणत्याही काव्यप्रकाराची हुजरेगिरी करू नये. असेही त्याला वाटते. कविच्या या मताशी मी सहमत आहो.

        अलिकडे समाजात दुफळीचे,विभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शहाणे, दीड शहाणे ,कुणी कुणाचे ऐकूण घ्यायला तयार नाही. अनेक चळवळींना दुफळीने ग्रासले आहे. पण एकीने जे साध्य होईल ते बेकीने होणार नाही. असे परखड मतही कवी व्यक्त करतात. अशाच आशयाचा 'आनंदकंद' या कवितेत बाप-लेकाचा संवाद आपल्याला वाचायला मिळतो. याचबरोबर 'ओळखा बघू' या कवितेत मेंढरांप्रमाणे जगणा-या माणसांच्या मानवी प्रवृत्तीवरही प्रखर शब्दात कवी ताशेरे ओढतांना दिसतात.

" जे विसरले काळाची गरज,ती मेंढरं होती,

तेच छद्मी पशुपालक लबाडीने काहीतरी सोलत होती,

मेंढरेच ती आरामाने चारा खात होती,आरामाने अज्ञान रवंथ करीत होती !" (ओळखा बघू)

       या ओळी वाचल्यावर ही कविता कुणासाठी आहे? हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. 

आपल्या कुटुंबाची ,स्वत:ची चिंता ही प्रत्येकालाच असते, ती आयुष्याचा एक भाग झाली असून यापासून कुणीही सुटलं नाही. परंतु चिंता करून चितेवर जाण्याआधी आपण त्यातून जीवनाच्या यशस्वितेचा मार्ग शोधला पाहिजे. त्याविषयी हिंदी भाषेतील 'संभ्रम' या कवितेत कवी व्यक्त होतांना म्हणतात...

"चिंता है, पर चिंता से यहा कौन बचा

कारण कई, आपसी मनमुटाव से कौन बचा!"



पर्यावरणाच्याविषयी अलिकडे कुणी बोलत नाही‌. वाढत्या जल,वायू,ध्वनी प्रदुषणावर कुणाचे नियंत्रण नाही‌. त्यामुळे आम्ही आपल्या जीवनात अनेक आजारांना निमंत्रण देत आहोत. वारेमाप कोणत्या ना कोणत्यातरी कारणावरून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वृक्षरोपण व वृक्षसंगोपणाकडे पद्धतशीर दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढले आहे. पशू पक्ष्यांचे जीवन अस्थीर झाले आहे.त्यांची संख्या कमी झाली आहे. निसर्गाचं चक्र बदललेलं आहे.वेळी- अवेळी पाऊस पडतो,उष्णतामान वाढले. त्यामुळे शेत पिकांची नासाडी होत असल्याने शेतक-यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागते. त्याचे जगणे असह्य झाले आहे. याबाबत कविच्या कवितेच्या दोन ओळी महत्वाच्या वाटतात....

" पेड़ की एक टहनीपर,किसी ने कुल्हाडी चलाई

किसी ने भी नही कहा,किस की शामत आई !"

(मूढ़ता) 

  

         एकूणच कवी संवेदनशील मनाचे आहेत. त्यांना मानवाच्या अतिरेकी वागण्याच्या प्रत्येक परीणामाची जाणीव आहे. याचा परीणाम भविष्यात कुणावर,किती,कसा होईल ? याची जाण आहे. त्यांनी आपल्या जाणीवा आपल्या वाचनातून,अनुभवातून, अवलोकन, चिंतन, मननाद्वारे कवितेमधून मांडण्याचा प्रामाणिक केलेला प्रयत्न. ही या कवितासंग्रहाची जमेची बाब आहे.दोन ओळीच्या चरणातील मुक्तछंदातून कमीत कमी शब्दात त्यांनी मानवी व व्यवस्थेतील अवगुणांचे प्रकटीकरण केले आहे. त्यांच्या कवितेत शब्दांचा पसारा दिसत नाही. अधिक विद्रोह किंवा आक्रोश,आक्रसस्ताळेपणा दिसत नाही. शांततेने ते व्यक्त होत जातात. ही विशेषता त्यांच्या कवितेची आहे. या कवितासंग्रहाची समर्पक व न्यायपुर्ण शब्दात प्रस्तावना जेष्ठ गझलकार,कवी प्रा. हृदय चक्रधर सर नागपूर यांनी लिहिली आहे. सदर पुस्तक शब्दशिल्प प्रकाशन,नागपूरचे कलाम अहमद खान यांनी प्रकाशीत केले असून पुस्तकाचा दर्जा आंतर-बाह्य अप्रतिम आहे. कवी सुदर्शन पनतोडे यांचे या सकस साहित्यकृतीसाठी अभिनंदन करतो व पुढील लेखनासाठी हार्दिक मंगलकामना देतो.


अरुण हरिभाऊजी विघ्ने

मु.रोहणा,आर्वी,जि.वर्धा

मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६ अंकाचे खासदार-आमदारांच्या उपस्थितीत स्वागत

 


_स्त्री शक्ती मंचाचा प्रेरणादायी उपक्रम_

शब्दशिल्प/अमरावती : ‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६’ या वार्षिकांकाचे स्वागत खासदार बळवंत वानखेडे, आमदार गजानन लवटे आणि तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील दाळू यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. छत्रपती संभाजीनगर येथून सुरू झालेला हा साहित्यिक उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारला असून, विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र आणणारा समृद्ध परिवार म्हणून ओळख निर्माण करत आहे. स्त्री शक्ती मंचाचा हा सलग चौथा अंक असून, मुख्य संपादक चंद्रकांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांतील कार्यकारी संपादकांनी मोलाचे योगदान दिले. अमरावती जिल्ह्याच्या वतीने समीक्षा वाकोडे यांनी कार्यकारी संपादक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवून साहित्यिक योगदान दिले आहे. या अंकात महाराष्ट्रातील शंभरहून अधिक साहित्यिकांचे लेखन प्रकाशित करण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, प्रशासकीय व राजकीय अशा विविध स्तरांवरील विषयांना स्पर्श करत या अंकाने आपले वैशिष्ट्य सिद्ध केले आहे. मागील चार वर्षांपासून कर्तबगार महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, यंदाचा अंक स्त्रियांना नवे आत्मभान आणि प्रेरणा देणारा ठरत आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक स्त्री शक्ती मंचाला  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._

भुसावळात दिलीप घाेडेस्वारांनी आंबेडकरी चळवळ प्रवाहीत ठेवून कार्यकर्तेही घडवले




साहित्य जगत |  एकदिवसीय आशादीप साहित्याेत्सवात कवी वा. ना. आंधळेंचे गाैरवाेद‌्गार


शब्दशिल्प/भुसावळ : सत्तर ते नव्वदच्या दशकात आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून भुसावळ ओळखले जायचे. ही चळवळ निरंतर प्रवाहीत ठेवून कार्यकर्ते घडवण्याचे काम स्वर्गीय दिलीप घाेडेस्वार यांनी केले. बुद्ध धम्माचा निस्सीम अनुयायी म्हणून ते ख्यातकीर्त राहिले. त्यांची साहित्य साधना अफाट आहे, अशी भावना एरंडाेलचे कवी वा. ना. आंधळे यांनी येथे व्यक्त केली. 

भुसावळच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात रविवारी प्रज्ञा हंसराज बागुल यांनी एकदिवसीय आशादीप साहित्याेत्सव आयाेजित केला हाेता. त्यात अध्यक्षस्थानावरून कवी आंधळे हे बाेलत हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. मिलिंद बागुल, प्रवीण कांबळे, प्रा. गाैतम निकम, कवयित्री पुष्पा साळवे, सुमंगल अहिरे, सुरेश भालेराव, डाॅ. भारत सातपुते यांची उपस्थिती हाेती. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, ललित लेखनाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आंबेडकरी चळवळीचे लेखक कवी स्मृतीशेष दिलीप घाेडेस्वार यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. त्यांची कन्या प्रज्ञा बागुल यांच्या ‘संदर्भ जगण्याचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ‘हा काव्यसंग्रह मानवी जीवनाचे भावभावनांचे कंगाेरे उलगडणारा आहे. किंबहुना, बापाप्रती कृतज्ञतेची भावना त्यातून व्यक्त हाेते’ असे मत डाॅ. सातपुते यांनी मनाेगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे रसाळ सूत्रसंचालन मुंबईच्या कविता माेरवणकर यांनी केले. यशस्वीतेसाठी आशा घाेडेस्वार, प्रज्ञा बागुल, सविता घाेडेस्वार, पुजा घाेडेस्वार व परिवाराने परिश्रम घेतले.


चळवळ घराघरात पाेहाेचवली...

लेखक दिलीप घाेडेस्वार यांच्या लेखणीतून प्रसवलेले साहित्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. सत्तर ते नव्वदच्या दशकात त्यांनी चळवळीच्या अनुषंगाने देशभरात प्रकाशित हाेणारे साहित्य खान्देशात पाेहाेचवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली आहे. म्हणूनच तर व्रतस्थ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. समाजजीवनात वावरताना प्रतिकुलता त्यांना कधीच आडवी आली नाही. स्वाभिमान कधीच डगमगला नाही. नम्रतेची कास त्यांनी साेडली नाही. त्यांचा हाच वारसा कन्या प्रज्ञा बागुल या समर्थपणे पुढे नेत आहेत, अशी भावना कवी आंधळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली. 

घाेडेस्वार हे चळवळ जगले....

कवी, लेखक दिलीप घाेडेस्वार हे आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत चळवळ जगले. आंबेडकरी विचारांशी त्यांनी कधीच फारकत घेतली नाही. आंबेडकरी विचारांचे वाहक म्हणून त्यांनी उमेदीचा काळ खर्ची घातला. पद, प्रतिष्ठा, पैसा या गाेष्टींना त्यांनी कधीच महत्व दिले नाही. नागपूरपासून ते मुंबईपर्यंत त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा हाेता. भुसावळला त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे वेगळी ओळख मिळाली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारीता अशा विविध क्षेत्रात त्यांचा मित्रमेळा हाेता. माणसं जाेडण्याची कला त्यांना अवगत हाेती, असे नागपूरचे लेखक प्रवीण कांबळे यांनी नमूद केले. 



वडीलांचा वारसा पुढे नेतेय.....

चळवळीत काम करीत असलेल्या वडीलांमुळे अनेक सेवाव्रतींचा सहवास कुटुंबाला लाभला आहे. त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा जीवापाड जपून ठेवली आहे. त्यांचे जे अप्रकाशित साहित्य आहे ते हळूहळू प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी दिलेल्या बाळकडूच्या बळावरच वेगवेगळ्या भाषेत लिखाण करण्यावर भर दिला आहे. आशादीप साहित्याेत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यात कविसंमेलन, चर्चासत्र, परिसंवाद असे विविध कार्यक्रम घेण्याचा मानस आहे. भुसावळांनी दिलेले प्रेम शब्दातीत आहे, असे मत प्रज्ञा बागुल यांनी व्यक्त केले.

सोमवार, २७ एप्रिल, २०२६

संजय मुकुंद राव निकम यांनी लुधियांना पंजाब येथील सुप्रसिद्ध कवयत्री, लेखिका, डॉ.जसप्रीत कौर /फलक यांच्या पंजाबी काव्य संग्रह कॅनवास के पास या कविता संग्रहाचा मराठी भाषा अनुवाद केला



 शब्दशिल्प/नाशिक_दि.28/7/2026,मंगळवार,मालेगाव येथील प्रख्यात राष्ट्रीय कवी, लेखक, परीक्षक, समीक्षक संजय मुकुंद राव निकम यांनी लुधियांना पंजाब येथील सुप्रसिद्ध कवयत्री, लेखिका, डॉ.जसप्रीत कौर /फलक यांच्या पंजाबी काव्य संग्रह कॅनवास के पास या कविता संग्रहाचा मराठी भाषा अनुवाद केला आहे. जसप्रीत कौर यांचे हे राष्ट्रीय -आंतर राष्ट्रीय स्तरावरील 5 वे पुस्तक आहे. त्यांचे लेखन विविधांगी आहे. वाचकाच्या मनाला भुरळ पाडणारे आहे. साहित्य आणि  भाषेच्या कसोटीवर खरं उतरणारे आहे. प्रतिभा आणि  प्रतिमेचा सुंदर मिलाफ त्यांच्या काव्यात वाचकाला पाहायला मिळतो. असे प्रतिपादन राष्ट्रीय कवी, लेखक समीक्षक संजय निकम. मालेगाव जि. नाशिक, महाराष्ट्र यांनी केले.तसेच डॉ. जसप्रीत कौर यांना पुस्तकं प्रकाशना साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.



खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...