"कपाळी चंदनाचा टिळा अन् डोक्यावर मानाचा फेटा,
रांगड्या या महाराष्ट्राची न्यारीच आहे ढब अन् ऐट मोठी!"
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे दर बारा कोसांवर भाषा बदलते, संस्कृती बदलते आणि त्यासोबतच लोकांचा पेहरावही बदलतो. पंजाबमध्ये शीख बांधवांच्या अस्मितेचे प्रतीक असलेली 'पगडी' किंवा 'दस्तर' असो, राजस्थानचा रंगीबेरंगी साफा असो, म्हैसूरचा भरजरी पेठा असो, वा आसाम आणि दक्षिण भारतातील पारंपरिक शिरोभूषणे असोत – प्रत्येक प्रांताने आपल्या डोक्यावरील वस्त्राला एक वेगळे आणि मानाचे स्थान दिले आहे. शरीराच्या सर्व अवयवांमध्ये 'मस्तक' हे सर्वोच्च आणि श्रेष्ठ मानले जाते, म्हणूनच या मस्तकाचे रक्षण करणारे आणि त्याला शोभा देणारे शिरोभूषण हे केवळ फॅशन नसून त्या संस्कृतीचे मस्तक असते. या संपूर्ण भारताच्या पटलावर जेव्हा आपण 'महान अशा राष्ट्राकडे' म्हणजेच आपल्या महाराष्ट्राकडे पाहतो, तेव्हा इथल्या मातीचा कण अन् कण ज्या एका वस्त्राने अधिक देखणा आणि रुबाबदार होतो, ते वस्त्र म्हणजे – 'फेटा'.
फेटा घालण्याची परंपरा महाराष्ट्रात आजची नाही, तर तिला शतकांचा इतिहास लाभला आहे. वैदिक काळापासून ते पारतंत्र्याच्या कालखंडापर्यंत मस्तकावर पागोटे किंवा शिरस्त्राण घालण्याची प्रथा भारतात होती. परंतु, महाराष्ट्राच्या मातीत फेट्याला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त झाले ते शिवशाही आणि पेशवाईच्या काळात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांचा फेटा किंवा पागोटे हे केवळ संरक्षणाचे साधन नव्हते, तर ती गनिमी काव्याची आणि युद्धाची ढालही होती. युद्धाच्या वेळी डोक्याला दुखापत होऊ नये म्हणून फेट्याचे वेढे विशिष्ट पद्धतीने घातले जायचे. शिवकाळात फेट्याला 'पागोटे' म्हटले जाई. पुढे पेशवाईच्या काळात या पागोट्याचे रूप अधिक सुबक, राजेशाही आणि देखणे झाले. 'पुणेरी पगडी'चा उदय याच काळात झाला. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा जोतीराव फुले यांच्यासारख्या महापुरुषांनी फेटा आणि पगडीला समाजकारणाचे आणि राष्ट्रवादाचे माध्यम बनवले. आपले आजोबा, पणजोबा आणि त्यांच्याही आधीच्या पिढ्या फेट्याशिवाय घराबाहेर पडत नसत. त्या काळात घरातून अनवाणी निघणे चालत असे, पण उघड्या डोक्याने बाहेर पडणे हा अपशकुन किंवा आदराच्या विरोधात मानला जाई.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर फेटा हा तिथल्या सामाजिक रचनेचा एक अविभाज्य भाग आहे. गावातील 'पाटील', कारभारी किंवा ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा पांढराशुभ्र धोतर-कुर्ता, खांद्यावर घोंगडी आणि डोक्यावर तांबडा किंवा पांढरा फेटा बांधून चावडीवर किंवा ग्रामपंचायतीत येत, तेव्हा त्यांचा तो रुबाब पाहूनच समोरच्या व्यक्तीचा आदर द्विगुणित होत असे. ग्रामीण भागात फेटा हा केवळ वयाचे प्रतीक नाही, तर तो अधिकाराचा आणि वजनाचा म्हणजेच वचकाचा दर्शक आहे. गावातील भांडण-तंटे सोडवताना, न्यायनिवाडा करताना फेटा बांधलेली ज्येष्ठ माणसे जी शिस्त आणि आदर निर्माण करायची, ती आजच्या आधुनिक पोशाखात कुठेही पाहायला मिळत नाही. फेट्याचा तो जरब आणि त्याची ती विशिष्ट ठेवण समोरच्याला शांत राहण्यास आणि आदराने बोलण्यास भाग पाडत असे.
आपण अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये पाहतो—विशेषतः कौटुंबिक आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांमध्ये—जेव्हा एखादा गरीब शेतकरी किंवा मुलीचा वडील सावकाराच्या किंवा मुलाच्या वडिलांच्या (व्याही) पाया पडतो, तेव्हा तो आपल्या डोक्यावरील फेटा किंवा पगडी काढून समोरील व्यक्तीच्या चरणांवर ठेवतो. हा प्रसंग पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यात नकळत पाणी येते. याचे कारण काय? कारण फेटा म्हणजे निव्वळ पाच-सहा मीटरचे कापड नाही; तो त्या माणसाचा 'आत्मसन्मान' आहे, त्याची पत आहे, त्याची समाजातली इज्जत आहे. जेव्हा एखादा पुरुष आपला फेटा दुसऱ्याच्या चरणावर ठेवतो, तेव्हा तो स्वतःचे मस्तक, स्वतःचा अहंकार आणि स्वतःची अब्रू समोरच्याच्या स्वाधीन करत असतो. नवरी मुलीलाही आपल्या वडिलांच्या डोक्यावरचा फेटा हा त्यांचा स्वाभिमान वाटतो. म्हणून, जर तो फेटा कोणासमोर झुकला, तर तो संपूर्ण कुटुंबाचा आणि त्या मुलीच्या अस्तित्वाचा अपमान समजला जातो. चित्रपटांमधील हे चित्रण वास्तववादी समाजाचेच प्रतिबिंब आहे, ज्यावरून फेट्याचे मूल्य किती अथांग आहे हे सिद्ध होते.
महाराष्ट्रात प्रांतानुसार फेट्यांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकार त्या त्या भागाची वेगळी ओळख सांगतो. यामध्ये अत्यंत शिस्तबद्ध, सुबक आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जाणारा 'पुणेरी फेटा' आहे; तर दुसरीकडे अत्यंत रुबाबदार, मोठा आणि धारदार तोऱ्याचा 'कोल्हापुरी फेटा' आहे, जो बांधलेला माणूस दुरूनही वेगळा उठून दिसतो. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची आठवण करून देणारा, युद्धासाठी आणि कष्टासाठी सोयीचा असलेला पारंपरिक 'मावळी फेटा' जसा प्रसिद्ध आहे, तसाच विदर्भातील लग्नसमारंभात प्रामुख्याने वापरला जाणारा आणि वैशिष्ट्यपूर्ण जरीची किनार असलेला 'नागपुरी किंवा वऱ्हाडी फेटा' देखील आपले वेगळेपण टिकवून आहे.
या फेट्यांच्या विविध प्रकारांइतकेच त्यांच्या रंगांचेही मोठे महत्त्व आणि समाजात एक वेगळीच वचक आहे. फेट्यांचा प्रत्येक रंग हा मानवी भावना आणि सामाजिक प्रसंगांचे प्रतिनिधित्व करतो. उदाहरणार्थ, शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेला 'केशरी किंवा भगवा फेटा' शिवजयंती, महाराष्ट्र दिन किंवा राष्ट्रीय-धार्मिक उत्सवांमध्ये संपूर्ण आसमंत उजळून टाकतो आणि मराठी अस्मिता जागी करतो. याउलट, शांतता, शुद्धता आणि प्रगल्भ अनुभवाचे प्रतीक असलेला 'पांढरा फेटा' हा ज्येष्ठ व्यक्ती, राजकीय नेते किंवा सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयमी व्यक्तिमत्त्वाला शोभा देतो. लग्नसमारंभ आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून 'हळदी किंवा पिवळ्या रंगाचा फेटा' वापरला जातो, जो शुभकार्यातील आनंद द्विगुणित करतो. तर लग्नकार्यात वऱ्हाडी मंडळींच्या उत्साहाला आणि आनंदाला उधाण आणण्यासाठी 'गुलाबी किंवा लाल रंगाचा फेटा' परिधान केला जातो. हे सर्व रंग केवळ डोक्याची शोभा वाढवत नाहीत, तर त्या त्या प्रसंगाचे गांभीर्य आणि महत्त्व अधोरेखित करतात.
काही वर्षांपूर्वीपर्यंत फेटा हे केवळ पुरुषांचे मक्तेदारीचे वस्त्र मानले जात होते. परंतु, बदलत्या काळासोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीने एक अत्यंत सुंदर वळण घेतले आहे. आजकाल लग्नकार्यात, ढोल-ताशा पथकांमध्ये, राजकीय रॅलींमध्ये आणि शिवजयंतीसारख्या भव्य मिरवणुकांमध्ये महिला देखील तितक्याच ताकदीने आणि आनंदाने फेटा परिधान करताना दिसतात. नववारी साडी, डोळ्यांवर गॉगल, कपाळी चंद्रकोर आणि डोक्यावर भगवा फेटा बांधून जेव्हा महाराष्ट्राची लेक बुलेटवरून किंवा मिरवणुकीत चालते, तेव्हा ती साक्षात रणरागिणी वाटते. फेट्याने स्त्रियांच्या सौंदर्याला एक वेगळीच प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला आहे. आज फेटा हा लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन 'मराठी अस्मितेचे' सामूहिक प्रतीक बनला आहे.
आजचा तरुण जरी जीन्स, टी-शर्ट आणि पाश्चात्त्य कपड्यांमध्ये वावरत असणारा असला, तरी जेव्हा सण-उत्सव येतो, तेव्हा त्याला आपल्या मातीची ओढ लागते. आज २१ व्या शतकातही तरुणांमध्ये फेटा बांधण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचे तर, फेटा बांधल्याशिवाय सणाचा 'फील' येत नाही. लग्नसमारंभात फेटा बांधून काढलेले फोटो आणि व्हिडिओ तरुणाई अभिमानाने मिरवते. हीच फेट्याची खरी ताकद आहे; त्याने काळाच्या ओघात स्वतःचे अस्तित्व गमावले नाही, उलट ते अधिक आधुनिक आणि लोकप्रिय केले.
फेटा हे केवळ डोक्यावर परिधान करायचे वस्त्र नाही, तर ती महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, परंपरा आणि मानवी मूल्यांची गुंफण आहे. फेटा आपल्याला ताठ कण्याने जगायला शिकवतो. तो आपल्याला आठवण करून देतो की, आपले मस्तक कोणत्याही अन्यायासमोर झुकता कामा नये, आणि त्याच वेळी ते इतरांच्या आदरासाठी नेहमी तत्पर असावे. आज फेट्याची शान देश-विदेशात पोहोचली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे स्वागतही फेटा बांधून केले जाते, यातच या वस्त्राचे जागतिक मोठेपण सामावले आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, राखावी नेहमी फेट्याची लाट अन् न्यारीच त्याची तोड, मराठी मनाला संस्कृतीच्या या फेट्याची लागली अक्षुण्ण गोड!
जय महाराष्ट्र!
लेखक: दिपक सालोमन शिरसाठ, अहिल्यानगर
मो क्रमांक 98 50 83 53 18
