शुक्रवार, २० मार्च, २०२६

ईद - उल -फित्र ;-आनंदाचा ,बक्षिस ; प्राप्तीचा दिवस ।।।


इस्लाम हा अरबी शब्द  मूळ अर्थ " शांती ' असा होतो."  शांतीच्या मार्गावर चालणारा "   धर्म ", त्या शब्दांचा " इमान"  शब्ध  वापरण्यात आलेला त्याचा अर्थ ही "  शांती "च होतो .

   भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज युनोच्या संमेलनांमधे  सहभागासाठी गेल्या होत्या .त्या वेळेस आपल्या शेजारील राष्ट्राला व सर्व जगातील नेत्यांसमोर खडे बोल सुनावले ,  इस्लाम चा  हिंदी भाषेमधील अर्थ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या ओघवत्या शैलीत सुनावले की "  इस्लाम शब्दाचा अर्थ  शांती होता है "  शांती " और अंग्रेजी पीसफूल  होता है , आपको पता है ,  और याद भी होना चाहिऐ  " असे बोलून भाषणाची सुरुवात केली होती. 

इस्लाम लोकांना अल्लाह (ईश्वरा) चे भय बाळगण्याचे आणि समर्पण करण्याचा आदेश देतो.  दबाव  ,दडपणाखाली ,  दुसऱ्या माणसाकडे शरणागती कधीही ही इस्लामला मान्य नाही धमक्या दहशत इस्लामच्या मूळ उद्देश आत्म्याशी बिलकुल विसंगत आहे .

ईसलाम चे सामाजिक मूल्य असे की आपल्यासमोर कोणीहीं दिसताच, त्याला अदरयुक्त मनाने "" " अस्सलामु आलैकुम व रहमतुल्ला  व बरकातहु "'  म्हणून प्रत्येक मुस्लिम बांधव एकमेकांना आदराने दुश्मनलाही नमस्कार घालतात याचा अर्थ असा होतो  "  तुमच्यावर आल्लाहाची शांती असो , कृपादृष्टी व दया  असो बरकत असो "   या वाणीत  किती जिव्हाळा , विश्वास , प्रेम भावना आधारित नमस्काराची परंपरा इस्लामने दिली आहे.   नंतर लागलीचच उत्तरादाखल समोरील  बांधव त्या प्रश्न कर्त्यास  प्रेमपुर्वक आदरयुक्त  उत्तर देतो की , " वालेकुमसस्सलाम  व रहमतुल्ला व बरकातहु  " याचा अर्थ  तसाच  ,"  माझ्याप्रमाणे तुझ्यावरही  आल्लाहाची शांती व कृपादृष्टी असू दे  व बरकात आसो."'  या उत्तराने समोरच्या  मनाला किती  प्रेम ,वात्सल्य , मनाला किती गोड वाटत असेल .  समोरचा माणूस आपलें हीं चांगलेच चिंतित आहेत.  आपुलकीने मिळालेल्या उत्तराने किती हायसे वाटत असणार , मग तो कितीही मोठा मनुष्य असो , गरीब,  भिकारी  नोकरचाकर  मालक असो  किंवा एक गुन्हेगार असो ,  मित्रांनो तुमच्या किती सात जन्माचा दुश्मन असो तो तुम्हाला अशाच प्रकारे सलाम करणार  आणि उत्तर  हीं   याचप्रकारे देणार  . किती प्रेमाची भावना इस्लामने जगाला दिली आहे  ..प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल.  सांगितले आहे "  कोणी उच्च नाही , कोणी श्रेष्ठ नाही ,कोणी मालक नाही , कोणी काळा नाही , कुणी गोरा नाही  सर्व समान ऐक आल्लाहाचे लेकरे आहोत. हीच समतेची शिकवण प्रेषीत मुहम्मद स्व. नीं आचरनातुन , कृतीतुन जगाला  पाहवयास मिळालं .    



खास विशेष तुमचा मित्र , नातेवाईक जवळचा मित्र कोणी खूप दिवसांनी आला तर त्याचे स्वागत एकमेकास आलिंगन देऊन गळे भेटतात, यामुळे  एकमेकांच्या हृदयात मनात , मना मध्ये मिसळले जातात व  विरोध नाहीसा होऊन  कट्टर दुश्मन असेल तर  समेट घडवून आणला जातो त्यावेळेस एकमेकांची गळाभेट होऊनच आपला दुश्मनी संपवतात .

प्रेषीत मुहम्मद स्व. सांगितले  ," तुम्ही तीन दिवसांपेक्षा जास्त काळ अबोल राहता कामा नये नाहीतर तुम्ही मुसलमानच नाही ,."

 प्रेषित मुहम्मद स्व, सांगतात, " तुम्ही एकमेकांत समेट घडवून आणा आणि हेच अल्लाह (भगवंत ) ला   समेट घडवून  आणणारे जास्त प्रिय आहेत "

 शांती , स्नेहभाव,   परोपकार , प्रेम आणि करुणा ,सहानुभूती श्रद्धावंताची यांची खास वैशिष्ट्ये असतात .

  प्रेषीत मुहम्मद स्व. म्हणतात  ," अल्लाह (ईश्वर र) ने. जगातील लोकांना वरदान व आशीर्वाद म्हणून तुम्हाला ( पैगंबर मुहम्मद स्व ) ला  जगात शांती व समेट कायम करण्यासाठीच पाठवले आहेत ." ( सुराहा अल-आंबिया अ.१०७).

 पुन्हा प्रेषीत मुहम्मद स्व.म्हणतात  "  सर्व प्राणीमात्र हीं एकाच ईश्वराची लेकरे आहेत म्हणून त्याने निर्माण केलेल्या मानवाशी प्रेम करतो सर्व मानवजातीस सामाजिक न्याय देतो याकडे त्यांचा कटाक्ष असतो , आणि अल्लाह (ईश्वर) काही देण्यात जाती पाती ,वर्ग  कसलाही भेदभाव करीत नाही आपण जर एखादे पुण्य चं काम केले असेल ,  तर   ते कणभरही वाया जात नाही ." 

दिव्य कुरआनमध्ये म्हणतात की ,"ज्याने अनुरेणू  इतके सत्कर्म केले असेल त्याचे फळ त्याला  अवश्य   तितकेच मिळेल ; आणि, ज्याने  इतके दुष्कर्म ,कुकर्म ,वाईट कर्म त्याचे फळ त्याला  त्याचप्रमाणे भेटतील".

                        आपल्या प्रपंचाची घडी व्यवस्थित ठेऊन  आजूबाजूच्या गरिबांकडे लक्ष देऊन त्यांना मदत केली, जकात सदकाह व फितत्राह यांचा गरजू, पीडित, बेसहारा ,अनाथ ,विधवा यांना देऊन , दानधर्म देऊन एक सामाजिक बांधिलकी   योगदान,  कार्य  केले हे सर्व करताना  प्रत्येक क्षणी ईश्वराचे भान ठेवले आपल्या हातून कळत नकळत काही चूक तर झाली नाही ना हे क्षनोक्षनी  आठवण ठेवत  हे कार्य केले .मदत करून आपण एक भारतीय बांधव आहोत . आपण सर्व भाई भाई आहोत असे मनापासून भावना व्यक्त करुन साथ दिली. पहाटे पासून.ते संध्याकाळ पर्यंत जेवढे काही करता आले तेवढी समाज सेवा ही ईश्वर सेवा आहे हे तन-मन-धनाने सर्व जगामध्ये आदराने व मनाने   करून  सर्व जगाला आपण कोणत्याही लोभाची,अपेक्षाची ईच्छा नसतानाही केली, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता प्रेषीत.मोहम्मद सल्ल. च्या शिकवणीतून   आपल्या आचरणाने कर्तव्य पार पाडले व भारतामधील मुस्लिम विरोधी मीडिया मुसलमानांविरुद्ध आग ओकत असताना  व  मुसलमानांना बदनामी करत  असताना  , कोणताही प्रतिकार न करता , शांत ,सहन करत ,सामाजिक शातंता भंग पावणार नाही याची दक्षता घेत ,  हणोक्षणी आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिलं ." 

  इस्लाम आदर और अपनापन का नाम है "    डोळ्यांनी  जगाने पाहिलेच असणार,  प्रत्येक  मुसलमान बंधू बाराही महिने  करीत असतो , मुसलमान  जीवन पद्धती आहेत  ,  मुसलमान असाच असतो  , व्यवहारातून आचरणातून सर्व  जगाने बघितले.



आज  ईद उल फित्र चा बक्षीस ईनाम प्राप्तीचा  दिवस आहे,   अल्लाहा बक्षीस  देणारच , कोणाला  किती  किती तेच ठरवणारे आहेत .

   प्रेषीत मुहम्मद स्व. म्हणतात  " अल्लाह ( भगवंत )आपल्याला ७०  आई पेक्षा ही जास्त प्रेम करतो ,'"

आई   लेकराला एवढे प्रेम करीत असेल तर , तो अल्लाहा  आहे हो, " अल्लाहा जीवसृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू वर आई सारखेच प्रेम करतात.

संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, 

    "अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारु अल्ला खिलावे। 

अल्ला बगर नहीं कोय अल्ला करे सोहि होय ॥१॥


मर्द होये वो खडा फीर। नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥२॥


सब रसों का किया मार। भजनगोली एक हि सार ।

इमान तो सब ही सखा। थोडी तो भी लेकर ज्या ॥ ३॥


जिन्हो पास नीत सोये। वोहि बसकर तिरोवे । 

सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥४॥


सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे। हगवनी भरी नहि धोवे ॥५॥


मेरी दारु जिन्हें खाया। दिदार दरगां सोहि पाया । 

तल्हे मुंढी घाल जावे। बिगारी सोवे क्या लेवे ॥६॥


बजारका बुझे भाव। वो हि पुसता आवे ठाव । 

फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥७॥


याचा अर्थ अर्थ काय तर तुकोबा म्हणतात... 


अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खिलावे। अल्ला बगर नही कोय अल्ला करे सोहि होय ॥१॥


"रे माणसा, अल्लाच देतो, अल्लाच देववतो. अल्लाच दवादारू पाजतो आणि खाऊही घालतो. अल्लाशिवाय जगात कोणीही नाही. अल्ला करेल तेच होते, असे सतत म्हणतोस ना? मग आता काय सांगतो ते ऐक!"


मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥२ ॥


"अरे, ह्या दारूने तुला धड उभेही रहाता येत नाही. जो मर्द असतो तोच ताठ उभा रहातो, हे विसरलास काय? नामर्दाला ते जमत नाही हे तुला ठाऊक नाही काय? केवळ दिल खुश व्हावे म्हणून नशा करून हा तीन पैशाचा काय तमाशा लावलायसं तू?"


सब रसोंका किया मार। भजनगोली एक हि सार । 

इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥ ३॥


"अरे भल्या माणसा, तुला रसपानच करायचे आहे ना? मग सर्व रसांचा रस, रससार असे हरीभजन तू कर... तुझ्या अंतरात्म्यात थोडेसे जरी इमान शिल्लक असेल तर माझ्या मित्रा, थोडेसे तरी भजन करून बघ !"


जिन्हो पास नीत सोये। वोहि बसकर तिरोवे। 

सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥४॥


"जवानीने मदमस्त झाला आहेस तू, भ्रमिष्टा बनला आहेस, पण लक्षात ठेव, ज्याने नीतीला झोपविले, आणि अनीतीने वागत राहिला, त्याला कर्माचे फळ, त्याच्या पापाचे फळ चुकलेले नाही. त्याला सारे काही भोगावेच लागते. जवानीत करशील मस्ती, अन उतारवयात पाठीमागून लाथा खाशील!"


सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे। हगवनी भरी नहि धोवे ॥५॥


"अरे मूर्ख...! ही सारी जवानी निघून जाईल आणि मग गधड्या माती खाशील! अरे गावंढळ माणसा, म्हातारपणी तुझी हगवण धुवायलाही कुणी भेटाचये नाही रे.... अशी अवस्था होईल ह्या दारूपायी!"


मेरी दारु जिन्हें खाया। दिदार दरगां सोहि पाया । 

तल्हे मुंढी घाल जावे। बिगारी सोवे क्या लेवे ॥६॥


"ये, भाबड्या जीवा, ये... माझी हरीभजनाची दारू जो पिईल, ती ईश्वर भक्तीची नशा चाखेल तोच दर्याचा खरा दीदार होईल. तोच खरा ईश्वराच्या जवळ जाईल. तोच ईश्वराच्या प्रेमाला पात्र राहील.... जगाच्या वासनेची दारू पिऊन खाली मुंडी घालून किती चालत राहाशील रे? अरे, बिगारी कामगार जर झोपून राहिला तर तो छदाम तरी कमावेल का?"

     

बजारका बुझे भाव। वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥७॥

       

"पण तेच तू करतो आहेस, अशाने बाजार बुडेल. तुला कोणी विचारणार नाही. तू काहीच प्रयत्न नाही केलेस तर तुला देव काय फुकटात भेटणार आहे काय?"

  🌷🌹 ईद-उल-फित्र च्या रमजान ईद च्या खूप खूप शुभेच्छा...

        


लेखक डॉ. सलीम  शाईदा सिकंदर शेख.

         बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना,

           श्रीरामपूर.

              ९२७१६४००१४,

🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

गुरुवार, १९ मार्च, २०२६

महाड सत्याग्रह : सामाजिक क्रांतीची सोनेरी पहाट

 


"तहानलेल्या पाखरांवर, तुम्ही कसे उपकार केले

ओंजळीने पाणी पिताच, सारे तळे चवदार केले।"

बाबासाहेब म्हणजे विद्रोहाचा युटोपिया. बाबासाहेब म्हणजे क्रांती. जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले एक तडफदार, तेजस्वी आणि युगनिर्माण करणारे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्ञान, स्वाभिमान, धैर्य आणि परिवर्तनाची प्रचंड ऊर्जा सामावलेली होती. त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखवले.

याच बाबासाहेबांनी तहानलेल्यांना, भुकेल्यांना आणि शतकानुशतके अन्याय सहन करणाऱ्या समाजबांधवांना चवदार तळे येथे 20 मार्च 1927 रोजी आपल्या ओंजळीने पाणी पाजले. हा प्रसंग केवळ एका तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा नव्हता; तो मानवी अस्मितेचा, समानतेचा आणि स्वाभिमानाचा ऐतिहासिक उद्गार होता.

महाड सत्याग्रहाचा उद्देश केवळ पाणी मिळवणे हा नव्हता. तो होता — “आम्ही सुद्धा इतर माणसांप्रमाणे माणूस आहोत आणि आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे” हे ठामपणे जगासमोर सिद्ध करणे. त्या काळात अस्पृश्य म्हणून हिणवले जाणारे लोक समाजाच्या काठावर ढकलले गेले होते. त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा, विहिरीतून पाणी घेण्याचा, मंदिरात प्रवेश करण्याचा, शिक्षण घेण्याचा — अशा अनेक मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले गेले होते.



ज्यांना बहिष्कृत म्हणून ओळखले जात होते, ज्यांचे जीवन गावकुसाबाहेरच्या झोपड्यांत मर्यादित होते, ज्यांना स्पर्श करणेही पाप मानले जात होते — अशा लोकांच्या मनात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करणे अत्यंत आवश्यक होते. बाबासाहेबांनी याच गोष्टीचा विचार करून महाड येथे आंदोलन उभे केले.

“आम्हालाही पाणी पिण्याचा अधिकार आहे; तो मिळत नसेल तर आम्ही तो स्वतः मिळवू,” या निर्धाराने त्यांनी आपल्या समाजबांधवांसह चवदार तळ्याकडे कूच केली. हजारो लोक त्यांच्या मागे उभे राहिले होते. त्यांच्या डोळ्यांत आशा होती, मनात भीती होती; पण त्याहून मोठा होता स्वाभिमानाचा जाज्वल्य ज्वालामुखी.

या ऐतिहासिक कृतीपूर्वी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना उद्देशून एक प्रभावी भाषण केले. ते म्हणाले —

“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आपण अमर होणार नाही. आपण आतापर्यंत ते पाणी प्यायलो नव्हतो तरी आपण मेलो नव्हतो. आपण तळ्यावर जातोय ते केवळ पाणी पिण्यासाठी नाही, तर आपणही माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी आहे.”

या शब्दांनी उपस्थित जनसमुदायाच्या मनात नवी चेतना निर्माण झाली. बाबासाहेब पुढे म्हणाले की, समाजाची उन्नती करायची असेल तर प्रथम स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. स्वतःच्या विचारांत, वागण्यात आणि आचारात परिवर्तन केल्याशिवाय बाह्य बदल साध्य होऊ शकत नाहीत.

त्यांनी काही महत्त्वाच्या सामाजिक सुधारणांवर भर दिला —

मृत जनावरांचे मांस खाण्याची प्रथा सोडणे, इतरांनी टाकलेले उष्टे खाण्याची सवय सोडणे, आणि स्वतःच्या स्वाभिमानाची जाणीव ठेवणे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, उन्नतीसाठी तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत — स्वतःची मदत (Self-help), स्वाभिमान (Self-respect) आणि स्वज्ञान (Self-knowledge).

तसेच त्यांनी पालकांना उद्देशून सांगितले —

“जोपर्यंत पालकांना आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा चांगले जीवन जगावे असे वाटत नाही, तोपर्यंत त्या पालकांमध्ये आणि जनावरांमध्ये फारसा फरक राहणार नाही.”

ही वाक्ये केवळ टीका नव्हती; ती जागृतीची ठिणगी होती.

त्या काळातील सामाजिक परिस्थिती अत्यंत अमानवी होती. पाणी हे जीवनाचे मूळ आहे, परंतु अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना पाण्यालाही स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. नद्या, विहिरी, तळी — हे सर्व समाजाच्या उच्चवर्णीय घटकांच्या ताब्यात होते. एकीकडे जनावरे सहजपणे पाणी पिऊ शकत होती, तर दुसरीकडे माणसाला पाण्याचा थेंब मिळण्यासाठी अपमान सहन करावा लागत होता — ही किती मोठी शोकांतिका होती!

अशा परिस्थितीत, निसर्गदत्त संसाधनांवर सर्वांचा समान अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी महाड सत्याग्रह उभा राहिला.



20 मार्च 1927, दुपारची वेळ. सूर्यकिरणांनी उजळलेले चवदार तळे जणू एखाद्या नव्या युगाच्या साक्षीदारासारखे चमकत होते. त्या पाण्याकडे बाबासाहेब पुढे सरसावले. त्यांनी आपल्या ओंजळीत पाणी घेतले आणि ते प्राशन केले. हाच तो ऐतिहासिक क्षण होता, ज्याने सामाजिक क्रांतीला नवे वळण दिले.

या घटनेने माणूस आणि माणूस यांच्यातील भेदाभेद मोडून काढण्याचा मार्ग दाखवला. लाखो-कोट्यवधी लोकांच्या मनात स्वाभिमानाची जाणीव निर्माण झाली. बाबासाहेबांनी दिलेला संदेश स्पष्ट होता —

“हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.”

या सत्याग्रहात महिलांचाही मोठा सहभाग होता. त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह या लढ्यात भाग घेतला. हे आंदोलन केवळ पुरुषांचे नव्हते, तर संपूर्ण समाजाचे होते. महिलांनी दाखवलेले धैर्य आणि सहभाग ही या चळवळीची मोठी ताकद होती.

महाड सत्याग्रहानंतर समाजात प्रचंड खळबळ उडाली. उच्चवर्णीयांनी या घटनेचा विरोध केला, परंतु या विरोधामुळेच चळवळीला अधिक धार मिळाली. पुढे याच महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करण्यात आले, ज्यामुळे सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा अधिक तीव्र झाला.

बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले होते —

“तुम्ही अस्पृश्य आहात” ही मानसिकता सर्वात आधी सोडा.

कारण खरे स्वातंत्र्य हे मनातून सुरू होते.

त्यांच्या विचारांनी समाजबांधवांच्या रक्तात क्रांतीची बीजे पेरली. “समानता की जय, शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. हा केवळ आवाज नव्हता; तो स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा आणि नव्या जीवनाचा उद्घोष होता.

महाड सत्याग्रह हा गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचा पहिला मोठा टप्पा होता. तो केवळ पाण्यासाठी नव्हता; तो माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी होता. या आंदोलनाने दलित चळवळीला नवे स्वरूप दिले आणि पुढील अनेक सामाजिक चळवळींसाठी प्रेरणास्थान ठरले.

आज शंभर वर्षे उलटून गेली असली तरी जातिवादाचे विष अजूनही काही प्रमाणात समाजात दिसून येते. त्यामुळे महाड सत्याग्रहाचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

बाबासाहेबांनी सत्याग्रहाला शस्त्र म्हणून वापरले, पण ती लढाई अहिंसेची होती — स्वाभिमानाची होती. ती लढाई एका दिवसाची नव्हती, तर युगानुयुगे चाललेल्या अन्यायाविरुद्धची होती. त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणजे संघर्ष, शिक्षण आणि संघटन यांचा संगम.

त्यांचा स्पष्ट विचार होता — समानता आणायची असेल तर खालच्या स्तरावरच्या लोकांना वर आणले पाहिजे. समाजातील विषमता दूर केली पाहिजे. जातीभेद नष्ट केले पाहिजेत. आणि प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे.

महाड सत्याग्रह ही केवळ ऐतिहासिक घटना नाही; ती एक विचारधारा आहे, एक प्रेरणा आहे, एक क्रांतीची ज्योत आहे. ती आपल्याला सतत सांगते — अन्यायाविरुद्ध लढा द्या, स्वाभिमान जपा आणि समानतेसाठी प्रयत्न करा.

आजच्या पिढीने या सत्याग्रहाचा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. कारण समाजातील खरी प्रगती ही केवळ आर्थिक किंवा तांत्रिक प्रगतीने होत नाही; ती होते विचारांच्या परिवर्तनाने.

महाड सत्याग्रह आपल्याला शिकवतो की,

स्वाभिमानाशिवाय जीवन निरर्थक आहे आणि समानतेशिवाय समाज अपूर्ण आहे.



प्रा. डॉ. वैशाली धनविजय/डोंगरे

नागपूर

9423110813

मंगळवार, १७ मार्च, २०२६

तुलना नको, मुलांचं कौतुक करा...त्यांना सपोर्ट द्या.


     कुणालला परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून स्वप्नील त्याला खुप ओरडला, त्याला मारलं. अरे, बघ त्या जाधव काकांच्या मुलाने 87% घेतले, देशपांडे काकांच्या मुलीने बघ 85% घेतले, माझ्या ऑफिसातील सेवकाच्या मुलाने 90% घेतले. आणि आमच्या मुलाने फक्त 75% घेतले. व्वा! छान. आता तुला मारू नको तर काय तुझा लाड करू का? तुला आत्ता एवढे कमी टक्के आले. मग वार्षिक परीक्षेत काय दिवे लावणार तु?. स्वप्नील कुणालवर हात उचलणार तेवढ्यात प्रतिभाने स्वप्निलचा हात धरला. आणि प्रतिभाने स्वप्निलची चांगलीच कान ऊघाडणी केली. 

   "अरे, तु त्याला का ओरडतोस. बघ किती घाबरलाय तो. अरे सातव्या वर्गातला तो. त्याच्याने जेवढं होईल तेवढंच करेल ना तो. तो त्याच्या पद्धतीने करतोय ना अभ्यास. इतरांच्या मुलांची उदाहरणं देऊन तु आपल्या मुलाला का बिघडवतोयस?. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहतात. कळतंय का तुला?. आपणंच आपल्या लहान मुलांना टोमणे देऊन बोललो तर किती वाईट परिणाम होतात मुलावर. इतरांच्या मुलांची उदाहरणं देणं, इतरांच्या मुलांबरोबर आपल्या मुलांची तुलना करणं, त्यांच्यासमोर आपल्या मुलांना कमी लेखणं या गोष्टींचं मुलांना खुप वाईट वाटतं, मुलं त्या गोष्टी मनाला लावुन घेतात. 

     परिणामी याचे अभ्यासावर परिणाम होतात. आपली मुलं ज्या गोष्टींमध्ये शार्प आहेत. त्या गोष्टींचं कौतुक कर. स्वप्नील अरे, हे बघ कुणाल इतकी सुंदर चित्र काढतो, प्रत्येक खेळात तो बेस्ट आहे, परवा शाळेत याला Best Chess Champion अवॉर्ड मिळाला. Writing Skill छान आहे. एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्याची सगळी चांगली गुणं आहेत आपल्या मुलात. एकदा कमी मार्क मिळाले म्हणून त्याला एका अपराध्या सारखं जज करणं हे कितपत योग्य आहे?. मुलांना असं ओरडून बोलणे, मारणे हे चुकीचं आहे. 



     आपल्या मुलांनी छोटीशी उडी जरी मारली तरी त्याचं भरभरून कौतुक करत आपणंचं त्याला प्रोत्साहीत केलं पाहिजे. त्याला सपोर्ट केलं पाहिजे. इतरांच्या मुलांशी तुलना करून आपली मुलं मोठी होत नाहीत उलट खचतात. इतरांची मुलं घेऊदेत उंच झेप आपण मात्र आपल्या मुलाच्या छोट्या उडीला सपोर्ट करूयात. तेव्हा खऱ्या अर्थाने तो पुढे जाईल. प्रतिभाच्या बोलण्याने स्वप्नीलला त्याची चूक लक्षात आली. कुणालला जवळ घेत त्याला लाडाने कुरवाळत सॉरी म्हणाला. तुझ्याने जेवढं होईल तेवढंच कर म्हणत त्याच्या इतर गोष्टींचं भरभरून कौतुक करू लागला.

     मुलं लहान असो वा मोठी. इतरांच्या मुलांबरोबर त्यांची तुलना केली की मग मुलं आतमधून खचतात. निराश होतात. मुलांनाही चांगलं ठाऊक असतं की आपल्यात कोणते कलागुण आहेत. पण इतरांच्या मुलांबरोबर त्यांची तुलना होऊ लागली की मुलं स्वतःमधले कला गुण विसरतात वा जाणूनही ते बाजूला सारत असतात. आईवडील आमचं कौतुक करत नाहीत. त्यांना इतरांच्याच मुलांचं कौतुक वाटतं. खरे पाहता यामुळे मुलं खचतात. एकंदरीत काय तर तुलना केल्याने मुलं मोठी होत नाहीत. तुलना करावयाचीच असेल तर तुलना करीत असताना आईवडिलांनी आपल्या मुलांना गोड भाषेत समजावून सांगावे. त्याला त्या विषयात 95 गुण मिळाले. 



      जर तुलाही तेवढे गुण हवे असतील तर तुलाही जास्त अभ्यास करावा लागेल. प्रत्येक प्रश्न रिपीट रिपीट करुन चांगला समजून घ्यावा लागेल. अशा भाषेत मुलांना समजून घेत बोललो तर मुलं नक्कीच पुढे जात राहतील. त्याला जास्त गुण मिळाले कारण तो हुशार आहे. तुला कमी गुण मिळाले तु "ढ" आहेस. अशा भाषेत जर मुलांना बोललो तर मुलांवर, त्यांच्या अभ्यासावर वाईट परिणाम होतातच. आपण मुलांना फक्त जाणीव करुन द्यावयाची असते. ते असं कर. ते तसं कर. मुलांना जी भाषा समजते त्याच भाषेत जर आपण त्यांच्याशी बोललो तर मुलांना आपली भाषा पटकन समजते. आणि मुलं अभ्यासाच्या दिशेने योग्य ती वाटचाल करतात. मग इतरांच्या मुलांशी तुलना करण्याची गरज पडत नाही. 

       



सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे 

देगलूर. 9960028899

बुधवार, ४ मार्च, २०२६

यह धरती ही परिवार है - वसुधैव कुटुंबंकम



 रमजान मुबारक 2026 रोजा नं. 14 वा,


       #  THE WORLD IS ONE FAMILY # 


दिव्य कुरआन म्हणते कीं,  "लोकांनो ! आम्ही तुम्हाला    ( सर्वाना ) एक नर ( पुरुष ) व एक नारी ( स्त्री ) पासून निर्माण केले आहेत ,  मग तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे यासाठी ,  तुमच्या विविध वंश जाती व काबिले बनवले ,   परुंतु अल्लाह ( ईश्वर, परमेश्वरच्या ) च्या नजरेत तोच सर्वाधिक सन्माननीय ( प्रतिष्ठित ' श्रेष्ठ , सन्माननीय )   असणार आहेत ,    जो चारित्र्य संपन्न  ( चरित्र्याने श्रेष्ठ )  असणारा आहेत किंवा असावा. (दिव्य कुरआन पारा नं :- 26 वा, सुरह नं 49 वा, सुरह अल - हुजूरात आ. नं. 13 वी ).

             जागतिक फुटबॉल संघटना फिफा नें  फुटबॉल विश्व कप अजिंक्य पद स्पर्धा 2022 चे आयोजन 22 नोव्हेंबर 2022 रोजी अरेबीयन द्विप कल्पातील  - " दोहा - कतार -"  या देशात आयोजित केले होतें,   " अल - खोर  "  या शहरातील "  अल - बयान  " नावाच्या स्टेडियम मध्ये उदघाट्न समारंभाचे आयोजन अतिशय वेगळ्याच पद्धतीने ठेवलं होतं, त्यामध्ये अतिशय वेगळ्याच पद्धतीचा संदेश देवून संपन्न झाला,  उदघाट्नामध्ये अमेरिकेच्या हॉलिवूड  फिल्म स्टार मॉर्गन फ्रीमेन ला दोहा कतार नें फिफा वर्ल्ड कप चा ब्रँड  अबेसेडर ( Brand  Ambasador -राजदूत )  करून  त्याबरोबरच  दोहा कतर चाच  ज्याला जन्मापासूनच - जन्मजात  कॉउडल रेग्रेशन सिनड्रॉम ( स्पिनल कॉर्ड  ) अर्थातच मेदूरज्जा चा अति दुर्मिळ आजाराने ट्रस्थ ज्यामध्ये कमरे पासून खाली बारीक बारीक पाय व वरील सर्व शरीर नॉर्मल  अशा विचित्र आजार असलेल्या व्यक्ती - घाणीम - अल - मुफ्ताह  ला  सह राजदूत ( co brand ambasador )बनवलं.

अर्थात  असा हा सशक्त लोकांनी खेळायचा हा खेळ प्रकार पळू पळू दमछाक  घामाघूम शारीरिक कसोटी घेणारा हा खेळ प्रकार परुंतु त्यातूनच सर्व जगाला एक संदेश देण्यासाठी असा विचित्र विकृत आजाराने त्रस्त असलेल्याला जाणूनबुजून ब्रँड आंबेसेटर केलं.. 

याच दोहा कतर च्या फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेत कोणत्याही खेळाडू किंवा तत्सम लोकांना दारू भेटणार नाहीत. अर्थातच संपूर्ण दारू बंदी आदेश.

  म्हणून  फूटबॉल खेळाची आवड असलेल्या   जगातील बहुतेक देशातील प्रामुख्याने प्रमुखांचा या सर्व गोष्टीना तीव्र विरोध.



     जगातील 200 देशात 500- च्या हीं अधिक संख्येने अंतराष्ट्रीय टीव्ही चॅनेलमध्ये कोटींच्या संख्येत याच देही याच डोळ्यांनी  लाईव्ह  प्रक्षेपण  विविध जातींच्या फुटबॉल प्रेमि समोर  "  दिव्य कुरआन "च्या  सुरहा हुजूरात च्या नंबर 13 च्या स्लोक आयतीचे सर्व जगासमोर लाईव्ह  हाफिज घानिम अल मिफ्ताही व हॉलिवूड स्टार मॉर्गन फ्रीमन नी मोठ मोठया आवाजात उदघोष करीत वाचून उदघाट्न केले. 

                           अखिल मानवजातीला उद्देशून सृष्टीच्या निर्माण कर्ता अल्लाह ( ईश्वर ) नें तीन महत्वाचे  तात्विक विवेचन केलेलं आहेत,महत्वाचं संदेश जगासाठी दिला आहेत.

      जगात विविध ठिकाणी विश्वव्यापी उपद्रव चालू आहेतत म्हणून  त्यास शांत करण्यासाठी संयोजकांनी अल्लाह ( परमेश्वर ) चा विश्व शांती चा " सर्व धर्म समतेचा " विश्वव्यापी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहेत.

           त्या संदेशातील तीन तात्विक मुद्दे, (1)तुम्हा सर्वांचे मूळ एकच आहेत, तुम्हाला एकाच स्त्री व एकाच पुरुष पासून तुमची निर्मिती - वंश अस्तित्वात आला आहे व आज जगात तुमचे जे जे वंश आढळतात ते वास्तविकपणे  एकाच आई - वडिलांपासून त्यांचा प्रारंभ झालेला होता, त्यांच एका वंशाच्या शाखा आहेत.     




            (2)  मूळ स्वरूपाच्या दृष्टीने एकच असताना देखील तुमचे राष्ट्र आणि जाती व कुळात विभागलं जाणे स्वाभिवकच होते,  परुंतु,  या   भिन्नता - विविधतेची निवड  कदापी ही अशी नव्हते कीं , त्याच्या  आधारावर उच्च- निच्च - कनिष्ठ - श्रेष्ठ, स्पृश - अस्पृश्य असले भेदभाव केले जावे ,   एका वंशाने दुसऱ्या वंशावर आपले श्रेष्ठव गजवावे  ,    एका वर्णच्या लोकांनी दुसऱ्या वर्णच्या लोकांना तुछ समजावं  ,   एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर हुकमत गजवावी.    निर्माण कर्त्या अल्लाह नें ज्या कारणास्तव मानवी समूहाना राष्ट्र व वंशाच्या स्वरूपात उभारले  ते केवळ इतकेच कीं त्यांच्या परस्पर दरम्यान सहकार्य व ओळखिची ही स्वाभाविक  खून (चिन्ह, सिम्बॉल,दिशादर्शक ) होती.

            (3) तिसरं म्हणजे, या माणसा दरम्यान श्रेष्ठ -उच्च-  सन्माननीय व्यक्ती अल्लाह जवळ जो कोणी प्राप्त असेल तर तो फक्त्त नैतिकता व नीतिमत्ता  व उच्च  मुल्लय  व  दर्जा साठी झटणाऱ्या व्यक्ती.   आणि, तेच अल्लाह जवळ सर्व श्रेष्ठ असणारे आहेत.

                   येवढ्या मोठया जागतिक पातळीवरील मंचावर एका पाय नसलेल्या हाफिज घानिम -अल - मुफ्ताह  नें  पवित्र दिव्य कुरआन मधील " सुरहा हुजूरात "   या  जगतिक "  एकता अखंडते - बंधूभाव " चा संदेश- असलेल्या  स्लोक (आयात )चे फुटबॉल  विश्व कप अजिंक्य स्पर्धा मध्ये सर्व जगाला -विश्वाला फक्त्त एकच संदेश द्यायांचा होता कीं "  संपूर्ण जग हें एकच आहेत  -- एकाच स्त्री व एकाच पुरुष ची निर्मिती आहेत ,, " आप आपसात - भेदाभेद करू नका.

अर्थातच :- " वसूदैव कुटुंबं कम - वसूधैव कुटुंबं कम " 

                " THE WORLD IS ONE FAMILY "

        ." वसूदैव कुटुंबंकम " हें संस्कृत चे सूत्र आहेत, 

   त्याचा अर्थ हा सर्व " जग हा एकच परिवार आहेत," 

               "   संपूर्ण धरती ही परिवार आहेत "...

‌पवित्र  दिव्य कुरआन मध्ये  असंख्य  आयतींमध्ये सांगितलेला  " जागतिक शांती - समता - एकात्मता- अखंडता "  

(मित्रांनो लेख आवडल्यास मित्र व नातेवाईकांना अवश्य पाठवावे, त्यांना ही फायदा होईल.. प्रतिक्रिया अवश्य कळवा )


लेखन :-  डॉक्टर  सलीम शाईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना 

श्रीरामपूर जिल्हा :- अहमदनगर 

मोबाईल :- 9271640014

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷

मंगळवार, ३ मार्च, २०२६

झाडीबोली स्वाभीमानाचा तारा निखळला


     पूर्व विदर्भातील लोकमाणसाची जी मायबोली आहे त्या झाडीबोलीला सन्मान मिळावा म्हणून  झाडीबोलीला आपला श्वास मानून अविरत खपणारे, झाडीबोलीचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी सदा तत्पर असणारे आचार्य ना.गो.थुटे सर जाणे म्हणजे झाडीबोली बरोबरच संबंध बोली चळवळीची, बोली माणसांची कधीही भरुन न निघणारी हाणी आहे.झाडीबोलीशी सलगी करुन जमेल ते आयुष्य खर्ची घालण्याचे काम त्यांनी केले.बोलीमहर्षी डॉ.हरिश्चंद्र बोरकरांसोबत सुसंगत घडवून आपल्याला व पर्यायाने अनेक कवी,लेखकांने घडविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.अँड लखनसिंह कटरे,डॉ.राजन जयस्वाल,हिरामण लांजे,अंजनाबाई खुणे या पहिल्या फळीतील आचार्य ना.गो.थुटे होते.झाडीबोलीला उंचीवर नेण्यासाठी व झाडी माणसांचा स्वाभीमान जागृत करण्यासाठी या आचार्यांनी दिवस रात्र एक केले.बोली संगठन करुन एक मोट बांधली.मातीचा गंधाला सुंगंधीत करुन झाडीबोलीला अव्वल स्थानावर पोहचविण्या-यांमध्ये आचार्य ना.गो.थुटे सर नेहमी अग्र राहिले.ही त्यांची  अविरत कार्यकुशलता अनेकांनी मान्यही केली आहे. झाडीबोली चळवळीला सतत बळ देवून गतीमान करण्याचे काम त्यांनी आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत केले.त्यांचे साहित्य मानवतावादी असून बोलीचा सुगंध ते चौफेर उधळत असत.झाडीबोली आपली माय आहे,तिचे रक्षण-संवर्धन करायचे ! हा पण त्यांनी आयुष्यभर पाळला.आमच्यासारख्या कित्येकांना त्यांनी मायेचा हात देऊन लेखनप्रवृत्त केले. झाडीबोली साहित्य मंडळ असो,सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच असो,अक्षर साहित्य मंडळ असो, फिनिक्स साहित्य मंडळ असो किंवा विदर्भ साहित्य संघ असो ते सा-या संस्थेशी बांधीलकी ठेवून होते. 'कविता' साहित्यप्रकार त्यांचा मुख्य पिंड असला तरी इतरही वाड्मयप्रकारात ते लिलया संचार करत. कवितेबरोबर कथा, व्यक्तिचित्रे, कादंबरी,ललित गद्यातही त्यांनी आपल्यापरिने भर टाकली. आपल्या लेखनीने,कार्याने व निरागस स्वभावाने ते सर्वांचे पितामह झाले होते.कुठेही आणि केव्हाही साहित्य व्यवहारासाठी ते सदा तत्पर राहिलेत.किंतु-परंतुचा जंतू कधी त्यांना शिवला नाही. जीवनव्यवहारात साहित्योपचार किती महत्वपूर्ण आहे,हे ते जाणून होते.सततच्या लेखन व चिंतनाने त्यांची जीवनदृष्टी समृध्द झाली होती.

    माझ्या ४८ व्या वाढदिवसी त्यांनी वरो-याहून येऊन मला अनेक आशीर्वाद दिल्याचे आठवते.गळाभेट घेऊन प्रेमाचा वर्षाव करत छोटेखानी कार्यक्रमाची आखणी आमच्या घरी त्यांनी केली होती.एका पितामह साहित्यमहर्षीने माझ्यासारख्या एका फकिराची केलेली वाहवा संस्मरणीय राहिली.अतिशय नम्र स्वभाव,लाघवी बोलणे, शालिन वागणे असे वलयाकिंत व्यक्तित्व आणि सहज सुलभ मैत्रीभाव दृढ करणारे गेल्याची वार्ता कळली आणि मन सुन्न झाले.माणसं जन्माला येतात आणि जातात,अनेक स्मरणातही राहत नाही. आचार्य थुटे सर शरिराने गेले पण आपल्या कार्याने सर्वांच्या मनात कायम राहतील.त्यांच्या कीर्तीची पतंग दिंगतात उडत राहणार आहे,हे नक्की!

    तसे पाहिले तर आचार्य ना.गो.थुटे सर अनेक साहित्य संस्कृती मंडळाचे प्राचार्यच होते.त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांना लिहते केले. आयोजन,नियोजन कसे करायचे,ते त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.काटली येथील ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनासाठी त्यांनी भ्रमणध्वनीवरुन अध्यक्ष झाल्याच्या अनेक शुभेच्छा मला दिल्या होत्या. साहित्यासाठी व माणसं जोडण्यासाठी आपला संबंध जीवन समर्पित करणारे, चळवळीचे मर्म जाणून गतीचक्र फिरविणारे, अंत:करणात 'शुध्दतेचा वाहता झरा ' ठेवणारे आदर्श स्फूर्तीपुंज म्हणजे आचार्य थुटे सर होत.झाडीबोली क्षितीजा मंडळावरचा एक स्फुर्तीपुंज तारा गळून पडल्याचे अतीव दुःख आहे.या उमदया, क्रियाशील व ऊर्जावान व्यक्तिमत्वाला आपण आज मुकलो आहोत.सर सतत स्मरणात राहतील.शिक्षकी क्षेत्र आणि साहित्य विश्व पुलकित करणा-या या सारस्वत पूत्राला माझी विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली 


: डॉ. धनराज खानोरकर, ब्रह्मपुरी.जि-चंद्रपूर

काटली येथील ३३ वे झाडीबोली साहित्य संमेलन अध्यक्ष

मो.९४०३३०४५४३

रमजान मुबारक 2026 रोजा नं. 13 वा-विश्वाचा स्वामी एकच आहे.



 रमजान मुबारक 2026 रोजा नं. 13 वा 

मंगळवार, दिनांक 03-02-2026

विषय :- विश्वाचा स्वामी एकच आहे. 

( पैगंबर ! हें लोकं अल्लाह - परमेश्वर - ईश्वरा विषयी विचारतात ), तुम्हीं त्यांना सांगा, " तो अल्लाह एकच आहेत (1), तो स्वयंपूर्ण - सर्वांपासून निरपेक्ष आहेत (2), न तो कोणाला जन्म देतो. ना तो कोणापासून जन्माला आलेला आहेत (3),आणि त्याचा सारखा दुसरा कोणीच नाहीं (4). दिव्य कुरआन ( सुरहा नं. 112, अल - इखलास आ 1 ते 4 ).

------------,

              वेदांचा आढावा पहिला तर त्यात देखील एकेश्वर वादाची कल्पना जागोजागी मांडण्याचा प्रत्यय येतो.

    (1)  " एको विश्वस्य भुवनस्य राजा ! "( ऋग्वेद 6-36-4).

      (अर्थात :- या संपूर्ण ब्रम्हंडाचा राजा एकच आहे.)

      (2) " एक एवं नमस्थो बिक्षवंस्य ! " ( अथर्व वेद 2-2-1).

(अर्थात :- एक ईश्वरच स्तुती आणि नमस्कार करण्यास पात्र आहे.)

      (3) " नत्वावार अन्यो दिव्यो न पार्थिवॊ न जातो वा जानिश्यते ! " ( यजूर्वेद : 27/36).

(अर्थात :- हें ईश्वर, तुज सारखा कोणी इहलोकात आणि पृथ्वीवर नाहीं , ना तुज समान जन्मला नी जन्मणार. ).

-------

    #   बायबल मध्ये म्हटले आहेत की, मीच प्रथम आहे आणि मीच अंतिम आहे आणि माझ्या शिवाय कोणीच ईश्वर नाहीं. ( इसाह मसीहा 46: 6 ).

------------,

    # " माझ्या शिवाय कोणीच प्रभू नाहीं, मीच मारतोय आणि मीच जिवंत करतो. मीच आजार देतो आणि मीच बरा करतो आणि असा कोणीच नाही जो तुम्हाला माझ्यापासून मुक्त करेल ( देऊतेरोनॉमी DEUTERONOMY 32: 39 ).

--------------,

   # " तु आपल्या ईश्वरास सजदा कर ( ईश्वरासमोर नतमस्तक हो ) आणि केवळ त्याचीच उपासना कर " ( म्यॅथेंव - Mathew 4: 10 ).

---------------,

कालच्याच लेखात आपण"  विश्वाचा निर्माता अल्लाह परमेश्वर कौन व कसा " यावर विस्तृत मंथन केलं होतं. पुढे आपण 

               या ब्राह्मडात लाखों च्या संख्येणे सौर मंडले आहेत, सर्वांची रचना वेग वेगळी असली तरी ते सर्व एका विशिष्ट नियमाच्या अधीन राहूनच आपल्या आपल्या क्षेत्रात कक्षेतच भ्रमन करीत आहेत. एका मिली सेकंदाची वेळ हीं चुकवत नाहीं एवढी अद्भुत अदुतीय आश्चर्य कारक पणे फिरत आहेत. निश्चितच या सर्व अदभूत अप्रतिम आणि अचूक अशा ब्राह्मनंडाचा शिल्पकार रचियता चालवणारा कोणी ना कोणी नक्कीच असणार. आणि एवढ्या मोठया सृष्टीला आखीव रेखीव तंतोतंत वेळेत हाताळणारा शिल्पकार हा कोणीतरी एकच एकटा च असू शकतोस.कारण एका पेक्षा जास्त निर्माण कर्ते निर्माता असले तर गोंधळ निर्माण होईल व्यस्थीत काहीच चालू शकत नाहीत, म्हणून त्याचा एकच स्वामी निर्मिक आणि शासक असल्याचे आपल्याला प्रत्ययास बघवयास मिळते दिसते.

जगातील अधिकाश प्रामुख्याने प्रमुख संत -महंत -महाराज- प्रवचन कार, प्रबोधनकार, व्याखते, तज्ञ, संशोधनकार, साहित्यक, कवी,  शायर,  यांनी वेळोवेळी  आप आपल्या प्रबोधनात भगवंताचीच कल्पना मांडली आहेत, व प्रमुख धर्मानी एकेश्वराची कल्पना स्विकारल्याची प्रत्यय त्यांच्या पवित्र धर्म ग्रंथातुन होतो. ईश्वर परमेश्वर अल्लाह हीं एकच आहेत परंतु त्यांना आप आपल्या बोली भाषाने, वेग वेगळ्या नावाने पुकारण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी भगवन्त, ईश्वर, परमेश्वर,गॉड,स्वामी, निर्मिक, निर्माता, अल्लाह - रब.  इत्यादी, इत्यादी. 

म्हणून या भुमंडलाच चिकित्सक नजर टाकल्यास निश्चितच आपल्याला कणा - कणात -  चरा -चरात निर्मात्याचे अस्तित्व जाणवत रहते आश्यर्य चकित झाल्या शिवाय रहात आणि शेवटी वाटतं  की या सर्व सृष्टीला चालवणारा- कंट्रोल करणारा कोणी ना कोणी असणाराच.

महात्मा ज्योतीराव फुले आपल्या पोवाड्यात म्हणतात,

         " सर्वांचा निर्मिक आहे एक धनी !!

                त्याचे भय मनी  !! धरा सर्व  !!. 1 !!.

                 न्यायाने वस्तूचा उपभोग ग्यावा  !! 

                  आनंद करावा  !! भांडू नये !! 2 !! 

                  निर्मिकानें जर एक पृथ्वी केली  !! 

                 वही भार भली  !! सर्वपत्राचा  !!1!!

                 तृणवृक्षभार पाळी आम्हासाठी !!

                 फळे तो गोमटी !! छायेसह !! 2 !!

                  सुख सोयीसाठी गरगर फेरे  !!

                  रात्रंदिन सारे !! तीच करी  !!  3 !!

                  मानवाचे धर्म नसावे अनेक !! 

                 निर्मिक तो एक !! ज्योती म्हणे !! 4 !!.

( महात्मा फुले समग्र वाडमय (607-608) महाराष्ट्र शासन )

           विश्वाचा निर्माता -निर्मिक स्वामी  एकच आहे.


       ( मित्रांनो लेख आवडला तर मित्र -  नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांना हीं फायदा होईल.. प्रतिक्रिया अवश्य कळवा )



लेखन :- डॉ. सलीम शाहिदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना 

श्रीरामपूर 

जिल्हा :- अहमदनगर ( अहिल्यानगर )

मोबाईल :-   9271640014   

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...