मंगळवार, २३ जून, २०२६

समतेचा आणि भक्तीचा वारसा जपणाऱ्या रुख्मिणी मातेच्या पालखीचे अंबानगरीत जल्लोषात स्वागत

 



माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते स्वागत

शब्दशिल्प/अमरावती_श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे आषाढी एकादशी सोहळ्यासाठी प्रस्थान करणाऱ्या माता रुख्मिणीच्या पवित्र पालखीचे अंबानगरीतील बियाणी चौकात माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर तसेच खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. सर्वधर्मीय नागरिक, वारकरी, भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा स्वागत सोहळा सामाजिक एकात्मतेचा आणि समतेचा संदेश देणारा ठरला.

श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या रुख्मिणी मातेच्या पालखीची यंदाची ४३२ वी परंपरागत वारी भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. अनेक शतकांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक मानली जाते.

रुख्मिणी मातेच्या पालखीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मानाचे स्थान प्राप्त व्हावे तसेच शासकीय पूजनाचा सन्मान मिळावा यासाठी माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून आज रुख्मिणी मातेच्या पालखीला पंढरपूर येथे मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे अमरावती शहरात पालखी आगमनानंतर बियाणी चौकात स्वागत करण्याची परंपराही त्यांनीच सुरू केली असून ती आजही अविरतपणे सुरू आहे.

बियाणी चौकात भक्तीरसाला उधाण

सायंकाळी पालखीचे बियाणी चौकात आगमन होताच टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “जय जय रुख्मिणी माते” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकऱ्यांच्या मुखी विठ्ठलनाम आणि वातावरणात भक्तीचा दरवळ असा मंगलमय सोहळा अनुभवण्यास मिळाला.


माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांचा वारकऱ्यांसोबत भक्तिभावाचा सहभाग

पालखी स्वागत सोहळ्यानंतर माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत भक्तिरसात सहभागी होत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावर घेत वारकरी परंपरेप्रती असलेली आपली निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केली.


सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविणारा सोहळा

तिवसा विधानसभा मतदारसंघातील तसेच अमरावती शहर व ग्रामीण भागातील विविध समाजघटकांचे नागरिक, वारकरी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व धर्म, पंथ आणि समाजातील नागरिकांच्या सहभागामुळे हा सोहळा सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा ठरला.

डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या स्वागत सोहळ्याला खासदार बळवंत वानखडे, अमरावती काँग्रेस जिल्हाध्यक्ष बब्लूभाऊ देशमुख , माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, शहर पोलीस आयुक्त राकेश ओला, निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, अमरावती पोलिस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, अमरावती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष मोरे, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, अनिल अग्रवाल, सुरेश रतावा, संजय शिरभाते, जयंतराव देशमुख, अभय देशमुख, श्याम बेलसरे, श्रीकांत बोंडे, गजानन देशमुख, मुकद्दर पठान, दिलीप सोनोने, नाना नागमोते, अविनाश भडांगे, महेश राऊत, विनोद वानखडे, शरद वानखडे, मुकुंद पुणसे, पंकज देशमुख,संदीप आमले, संजय चौधरी, अभिजीत बोके, जितेंद्र ठाकूर, शैलेष काळबांडे, प्रतिभाताई गौरखेडे, अनिकेत देशमुख, वैभव वानखडे, रितेश पांडव, वीरेंद्र भट, किशोर चांगोले, सतीश पोजगे, रवी हांडे, संजय मार्डीकर, संजय कळसकर, सचिन ठोके, सुनील जुनघरे, प्रणव गौरखेडे, नरू विघ्ने, अंजली ठाकरे आदी मान्यवर सहकुटुंब उपस्थित होते. तसेच शहरातील भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


_____अविनाश गोंडाणे अमरावती 9923264193

रविवार, २१ जून, २०२६

गुलाब आणि इतर कविता': कौटुंबिक भावबंध व सामाजिक जाणिवांचा श्राव्य काव्यप्रवास

 


साधेपणाबरोबर अनुभवांची विविधता आणि भावनिक प्रामाणिकपणा यांमुळे नवोदित कवींचे काव्यसंग्रह नेहमीच आपलेसे वाटतात. यामुळेच आपणही व्यक्त व्हायला पाहिजे असे वाटायला लागते. कारण या व्यक्ती आणि त्यांचे लेखन कुठेतरी आपल्याही मनात घर करून गेलेले असते. मुळात ऊर्जानगर, चंद्रपूर येथील असलेल्या आणि सध्या कोराडी नागपूर येथे वास्तव्यात असलेल्या कवयित्री सौ. सुरेखा शेषराव बोरकर यांचा 'गुलाब आणि इतर कविता' हा पहिलावहीला काव्यसंग्रह या परंपरेत एक मोलाची भर घालणारा आहे. त्यासाठी मनःपूर्वक  शुभेच्छा.कौटुंबिक पार्श्वभूमी आणि खडतर आयुष्य यातून त्यांचा काव्यप्रवास सुरू झालेला आहे..

 वाचनाची आवड आणि दैनंदिन जीवनातील निरीक्षणांतून जन्माला आलेली सौ. सुरेखा बोरकर यांची कविता म्हणूनच रसिकांच्या मनाला थेट भिडते.


कौटुंबिक पार्श्वभूमी आणि लेखन प्रेरणा


कोणत्याही कलाकृतीचा उगम हा कलाकाराच्या जीवनप्रवासात दडलेला असतो. सौ. सुरेखा बोरकर यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. सिंदी (रेल्वे) येथील नगर परिषदेच्या शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर, अगदी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतरचा कौटुंबिक प्रवास सांभाळला. लग्न झाल्यानंतर ऊर्जानगर सारख्या सुशिक्षित कॉलनीत आल्यावर त्यांच्यातील सुप्त वाचक आणि लेखक अधिक जागृत झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेत आलेला पहिला क्रमांक हा त्यांच्या लेखनाचा टर्निंग पॉईंट ठरला. मैत्रिणींच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली आणि 'दैनिक पुण्यनगरी'मध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची 'भरारी' ही पहिली कविता त्यांच्या साहित्यिक प्रवासाची नांदी ठरली.


​काव्यसंग्रहाचे स्वरूप आणि संरचना


'गुलाब आणि इतर कविता' या संग्रहात एकूण ५४ कवितांचा समावेश आहे. हा संग्रह त्यांनी आपले आई-वडील, शिक्षकवृंद आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित केला आहे. या संग्रहाला लाभलेली कवी आणि समीक्षक श्री. राजू गरमडे सर (ऊर्जानगर, चंद्रपूर) यांची प्रस्तावना पुस्तकाचे वाङ्मयीन मूल्य अधोरेखित करणारी आहे. आर. के. प्रकाशन आणि शब्दशिल्प साहित्य समूहाचे प्रमुख कलाम अहमद खान यांनी या संग्रहाच्या प्रकाशनाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळलेली आहे. या काव्यसंग्रहाच्या अंतरंगात डोकावतांना असे लक्षात येते की, सौ. सुरेखा बोरकर यांची कविता ही केवळ कल्पनाविलास नाही, तर ती मानवी जीवनातील सुख-दुःख, नातेसंबंध, स्त्रीशक्ती आणि समाजातील बदलत्या मूल्यांवर भाष्य करणारी कविता आहे. त्यांच्या कवितेचे प्रमुख पैलू खालीलप्रमाणे सांगता येतील:

​अध्यात्म आणि अंतर्मुखता: कवयित्रीला लहानपणापासूनच भजनाची आणि अध्यात्माची आवड आहे. हीच सात्त्विकता त्यांच्या काव्यातूनही प्रकट झालेली दिसून येते.  मनाला शांतता देणारी त्यांची विचारसरणी  स्पष्ट करताना ते म्हणतात,

​"मन पणती पणती, तेवें प्रकाशित ज्योती.

मन रमता एकांती, लाभे ह्या मनाला शांती."

असं जीवनाचे छोटसं सूत्र घेऊन ते आपलं लेखन कार्य करीत आहेत.



जीवनातील ​सुख-दुःख : समतोल दृष्टिकोन


सुख आणि दुःख हातात हात घालून प्रत्येकाच्या जीवनात वावरत असते. त्याची तीव्रता प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात प्रत्ययाला येत असते. जीवनातील याच चढ-उतारांकडे अत्यंत परिपक्वतेने कसे पाहावे, याचा संदेश त्यांच्या कवितेतून सहज प्रत्ययास येतो. त्यांची 'सुख-दुःख' ही कविता वाचताना असे लक्षात येते की, सुखात हुरळून न जाता आणि दुःखात खचून न जाता चक्रासारख्या फिरणाऱ्या आयुष्याला सामोरे जावे. सल्ला त्या देतात. त्या म्हणतात,

​"थोड्याशा सुखाने, भान हरपून जाऊ नये,

थोड्याशा दुःखाने, मनात हुरहुर वाटू नये."


​प्रयत्नवादाचा पुरस्कार


जीवन किती खडतर असले तरी प्रयत्नांती परमेश्वर या भूमिकेचा म्हणजेच प्रयत्न वादाचा पुरस्कार आपल्या कवितेतून कवियत्रीने केलेला आहे. मानवी जीवनात प्रयत्नांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे सांगताना त्या 'प्रयत्न' या कवितेत, अपयशाने खचून न जाता पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देतात.

​"जरी येता अपयश, मन दुःखी जीवनात.

अविरत स्वप्रयत्ने, पुन्हा मोद आयुष्यात" अशी स्पष्ट भूमिका मांडताना दिसतात.


​स्त्रीशक्ती आणि अस्तित्वाचा गौरव


 'तेजस्विता' या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने स्त्रीच्या आदिशक्ती रूपाचा आणि तिच्या कर्तृत्वाचा गौरव केला आहे. संपूर्ण कुटुंबाला सांभाळणाऱ्या स्त्रीचा समाजाने आदर केला पाहिजे, हा विचार मांडताना त्या लिहितात,

​"आदिमाया आदिशक्ती, महाशक्तीचेच रूप,

नारी म्हणजे शक्तीचे, शुद्ध ऊर्जेचे स्वरूप."अशा अत्यंत साध्या पण आशयघन शब्दांमध्ये स्त्रीच्या कर्तृत्व शक्तीवर त्या प्रकाश टाकतात. आजच्या विज्ञानयुगात माणूस भौतिकदृष्ट्या जवळ आला असला, तरी मनातील अंतरे वाढली आहेत. समाजात गरीब-श्रीमंत अशी दरी निर्माण झाली असून माणुसकी संपत चालली आहे, याबद्दल कवयित्री 'माणुसकी' या कवितेतून खंत व्यक्त करते. मानवी गर्दीत भेदाभेद नष्ट व्हावा आणि माणुसकीचा झरा पुन्हा ओसंडून वाहावा, ही त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे.

​लोकनिंदेची पर्वा न करता ध्येय गाठण्याचा संदेश: संत तुकाराम महाराजांच्या 'निंदकाचे घर असावे शेजारी' या उक्तीचा आधार घेत, बोरकर यांनी 'लोक म्हणोत काहीही' या कवितेत वाचकांना निंदकांकडे दुर्लक्ष करून आपले ध्येय गाठण्याचा मौलिक सल्ला दिला आहे.

​"लोक काय म्हणतील, नाही करावा विचार,

सांगा त्यांचे काय जाते, फुशारकी मारी फार."

ध्येय निश्चित करुनी, यश शिखर गाठावे..." ही त्यांची भूमिका या संग्रहाच्या निमित्ताने अत्यंत पारदर्शीपणे स्पष्ट झालेली आहे. 


​काव्यशैली आणि भाषिक सौंदर्य


सौ. सुरेखा बोरकर यांची भाषा अत्यंत साधी, सरळ आणि सर्वसामान्य वाचकांना समजेल अशी आहे. त्यांच्या रचनेमध्ये नाद आणि लयबद्धता आहे, ज्यामुळे कविता वाचताना एक आनंद मिळतो. विविध व्हॉट्सॲप आणि फेसबुक समूहांच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाइन काव्यस्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली आहेत, ज्याची प्रचिती या संग्रहातील कवितांच्या प्रगल्भतेतून येते.

'गुलाब आणि इतर कविता' हा केवळ एक कवितासंग्रह वाटत असला तरी तो एका सामान्य गृहिणीचा साहित्यिक 'भरारी' घेण्याचा पुढील यशाकडे वाटचाल करणारा प्रवास आहे. संसारातील जबाबदाऱ्या सांभाळत, पती श्री. शेषराव बोरकर, मुलगी सौ. अंकिता भस्मे आणि मुलगा अभिजीत यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे कवयित्रीने ही सुंदर साहित्यकृती मराठी रसिकांसमोर आणली आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींवर साधक-बाधक चर्चा करत, वाचकांना योग्य मार्गदर्शन करणारी ही कविता आहे. समाजात सुख, शांती नांदावी हीच या काव्यामागची मुख्य भावना आहे.

​मराठीत आपल्या पहिल्याच संग्रहातून उमटवलेला हा ठसा अत्यंत आश्वासक आहे. शब्दांच्या जागा प्रतिमा प्रतीके आणि मात्रा सांभाळल्या तर ही कविता आणखी प्रबल आणि प्रगल्भ होईल अशी अपेक्षा आहे. कवयित्री सौ. सुरेखा बोरकर यांच्या या पहिल्या साहित्यकृतीचे मनःपूर्वक स्वागत आणि त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!

काव्यसंग्रह : गुलाब आणि इतर कविता 

कवियत्री : सौ. सुरेखा बोरकर 

प्रकाशक : शब्दशिल्प प्रकाशन नागपूर 

मूल्य  : 100 रुपये


प्रा. संजय पंजाबराव गोहणे

अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय 

काटोल रोड, नागपूर



शनिवार, २० जून, २०२६

'युगंधरा आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमुकुटमणी पुरस्कार' कवी संतोष चिले यांना प्रदान !

 


​शब्दशिल्प/सिंधुदुर्ग / गोवा_साहित्य, संस्कृती आणि समाजसेवा या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक मा. कवी संतोष चिले यांना युगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे यंदाचा प्रतिष्ठेचा 'युगंधरा आंतरराष्ट्रीय
स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमुकुटमणी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गौरवामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​युगंधरा आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यलेखन स्पर्धेमध्ये कवी संतोष चिले यांनी आपल्या प्रतिभेच्या दिव्य तेजाने, शब्दांच्या वैभवशाली सामर्थ्याने आणि राष्ट्रनिष्ठ विचारांच्या प्रखर अभिव्यक्तीने साकारलेल्या अद्वितीय काव्यनिर्मितीबद्दल त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.

​भारदस्त आणि छंदबद्ध लेखनशैली, कवी संतोष चिले यांच्या कवितांमध्ये प्रकर्षाने वापरले जाणारे वजनदार, सखोल आणि 'जड शब्द' वाचकांच्या मनाला थेट भिडतात व त्यांच्या रचनेला एक वेगळीच उंची देतात.

​त्यांची कविता केवळ मनोरंजन करत नाही, तर पर्यावरण संरक्षण, अमली पदार्थ विरोधी जनजागृती, हुंडा पद्धतीचे निर्मूलन आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सामाजिक आणि वास्तववादी ज्वलंत विषयांवर आपल्या लेखणीतून ते सातत्याने प्रहार करीत असतात.

​यापूर्वीही त्यांना साहित्य, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल अत्यंत मानाचा 'छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 'दादासाहेब राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार' देखील प्रदान करण्यात आला. त्यातच आता मिळालेला हा 'युगंधरा आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमुकुटमणी पुरस्कार' त्यांच्या अविरत साहित्यसाधनेची खूप मोठी पावती ठरला आहे.

​"आपली साहित्य साधना अशीच निरंतर फुलत राहो आणि आपल्या लेखणीतून राष्ट्रप्रेम, संस्कृतीनिष्ठा व मानवकल्याणाचे अमृतझोत अखंड प्रवाहित होत राहोत," अशा शब्दांत प्रतिष्ठानतर्फे त्यांना मंगलकामना देऊन संतोष चिले यांच्या दैदीप्यमान यशाबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

​या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऐतिहासिक गौरवाबद्दल महाराष्ट्र आणि गोव्यातील साहित्य वर्तुळातून कवी संतोष चिले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



गुरुवार, १८ जून, २०२६

अंगणवाडी मदतनीस



   " सही पोषण देश रोशन " महाराष्ट्राचं कुपोषण दूर करणारी "अंगणवाडी मदतनीस" . मंडळी अंगणवाडी मदतनीसची लाख मोलाची कामगिरी आज आपण विचारात घेणार आहो . आपल्याला वाटते अंगणवाडी मदतनीस म्हणजे अंगणवाडी स्वच्छ करणारी मुलांना आहार शिजवून खायला देणारी जेम तेम झाडूपोछा करणारीच बाई . पण मंडळी महाराष्ट्राच्या कुपोषण नियंत्रणात तिचा लाख मोलाचा वाटा आहे. खंत हीच की तिच सर्व क्रेडिट अंगणवाडी सेविकेला मिळतं. सद्या महाराष्ट्र अंगणवाडी मदतनीसला फक्त सात हजार येवढं मानधन मिळत आहे. इतक्या तुटपुंज्या पगारावर ती कसं बस घर चालवत असणारं हे मात्र नक्की. 

मला ना अंगणवाडी मदतनीस आणि घरकाम करणारी गृहिणी यांची सारखीच अवस्था आहे असं वाटते कारण पुर्ण घराची काळजी घेऊन सर्वांच्या भरणपोषणाची काळजी घेऊन देखील घरात तिची किंमत शून्यच असते. ऑफिस वरुन दमून आलेला नवरा ऑफिस च्या टेंशनमुळे तुला काय घराची जबाबदारी सांभाळावी लागते का म्हणून रागावतोच. ती ऐकून घेते कारण ती व्यक्ती घरात कमवणारी असते. पण दिवसभर घर सांभाळून विनामोबदला काम करणारी गृहिणी तिला काडी ची सुद्धा किंमत दिली जात नाही. अगदी तसच मदतनीस ताईच्या बाबतीत होते. ती अंगणवाडी उघडते व अंगणवाडी स्वच्छ करते. दरवाजा समोर सडा टाकते व रांगोळी काढते. अगदी स्वच्छ आणि सुंदर परिसर ठेवते. अंगणवाडीच्या भिंतीवर ती खेळणी, बाराखडी, पाढे पाठांतर करण्याचे तक्ते सुटसुटीतपणे लावते व अंगणवाडीच्या भिंती जिवंत करते. भिंती बोलू लागतात कारण तिने त्या मनापासून सजवलेल्या असतात. मुलांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करते. मुलांना पोषण आहार शिजवून देते. हात धुवून जेवायला बसवते. मुले नीट जेवण करतील याची दक्षता घेते. काही मुलं डाव्या हाताने जेवण करतात त्यांना उजव्या हाताने जेवण करण्याची सवय लावते. जेवण करताना श्लोक म्हणायला लावते. व छोटे छोट घास करून कसं जेवायचं हे शिकवते. 

 मुलांची वजन करताना सेविकेला हातभार लावते. मुलांना उचलून वजन काट्याच्या पिशवीत बसवून वजन करते. लसीकरणासाठी लाभार्थ्यांना बोलवून आणते. THR ची पाकीट वाटप करते. पोषण ट्रॅकर मद्ये अंगणवाडी उघडते. त्यात लाभार्थ्यांचे THR भरण्यासाठी सेविकेला मदत करते. सेविकेला मातृवंदनाचे फॉर्म भरण्यात मदत करते. लाभार्थ्यांचे अप्पर आयडी बनवण्यात मदत करते. लाभार्थ्यांचे फेस ओथेनटीकेशन करण्यात मदत करते व एफ आर एस करण्यात देखील मदत करते. गृहभेटीसाठी सेविकेसोबत गृहभेट करते. सेविका रजेवर असल्यास मुलांना पूर्व शालेय शिक्षण देते. अमृत आहार शिकवते व लाभार्थ्यांना वाटप करते. आहार वाटप झाल्यावर पुन्हा छानपैकी अंगणवाडी स्वच्छ करते. उद्याच्या आहाराचे नियोजन करते. भांडी स्वच्छ घासून ठेवते. मुलांचा शिधा निवडून चोकारून ठेवते. 

अशी कितीतरी कामे अंगणवाडी मदतनीस करत असते पण शासन तिच्या कार्याची कधीच दखल घेत नाही . तिला तुटपुंजे मानधन दिले जाते. अवघ्या साडे सात हजार रुपयात ती पुर्ण महिना घर चालवते. पण तिचे मानधन शासन वाढवत नाही ही खेदाची बाब आहे. खर तर पोटात अन्न च नसेल तर लेकरू शाळा तरी कसं शिकणार.शिक्षण घेण्यासाठी पोटात अन्न तर हवं. आणि आपल्या आई प्रमाणे आपल्या पोषण आहाराची काळजी घेणारी मदतनीस तिचं कार्य लाख मोलाचं असलं तरी तिला तांदळातील खड्यासारख निवडलं जात. ती कधीच तिच्या वर होणाऱ्या या अन्यायावर आवाज उठवत नाही . मला वाटत नाही की कुणीही तिच्या कार्याची आजवर दखल घेतली असणार. कारण हे सत्य आहे घरात अन्न शिजवून कुटुंबाचा उदर निर्वाह करणाऱ्या बाईला जशी काडीची किंमत हा समाज देत नाही अगदी तसच प्रशासन देखील अंगणवाडी मदतनीस च्या कार्याची किंमत करत नाही. लोकांना वाटते व मला वाटते की शासनाला ही वाटते की मदतनीस फक्त आहार शिजवते प्रत्यक्षात मात्र 3 ते 6 वयोगटातील मुलांच आरोग्य, वजन,लस, पोषण तपासते. 

लोकांना वाटते काम कमी म्हणून पगार कमी प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड गोळा करून ऑनलाईन एन्ट्री, घरभेट, व पोषण सभे मद्ये देखील तिचा सहभाग असतो . लोकांना वाटते ती कमी शिकलेली आहे पण ती WHO चे growth chart वाचते, कुपोषण ओळखते, गर्भवतींची काळजी घेते. सेविकेप्रमाणे मदतनीस देखील प्राथमिक आरोग्य सैन्य आहे जी बालमृत्यू कमी करण्यास मदत करते.गरीब आईला मदतनीस च सांगतेस की बाळाला हिरवी भाजी दे, शिजलेले ताजे अन्न खायला दे, लस चुकवू नकोस, कुपोषण, बालविवाह, लसीकरण साठी पहिला रिपोर्ट मदतनीस देते कारण तिच दररोज मुलांना अंगणवाडी बोलवून आणते. कोणता लाभार्थी आजारी आहे.हे ही तिलाच आधी माहीत होते.व योग्य आहार, घराची स्वच्छता, गर्भवती किंवा स्तनदा माता आजारी पडल्यास घरच्यांनी सुद्धा तिच्याकडे लक्ष देणे गरजेचे असते हे समजून सांगते लस घेण्याचा सल्ला देखिल ती देते .लोकांना वाटते की आहार शिजवून वाटप करते भांडी घासते झाडू पोछा करते हे तर बायकांचं काम घरगुती काम म्हणून तिच कार्य गांभीर्य म्हणून घेतलं जात नाही. 

शासनाला राष्ट्र घडवणारे डॉक्टर दिसतात शिक्षक दिसतात पण देशाच कुपोषण दूर करणारी मदतनीस दिसत नाही. तिला सन्मान देखील शासन देऊ शकत नसेल तर हा जाणूनबुजून तिच्यावर झालेला अन्याय आहे. शासनाने तिच्या कार्याची दखल घ्यावी व तिच मानधन वाढवावं. तिला सन्मानजनक वागणूक मिळावी म्हणून यापुढे तिच्या पडला मदतनीस हे नाव न देता बालसंगोपिका किंवा बाल संगोपन सहायक किंवा अंगणवाडी सहायक हे नाव देण्यात यावं कारण आजवर ती तूटपुंज्या पगारात काम करत आली आहे. पण यानंतर तरी प्रशासनाने तिच्या कार्याची दखल घेऊन तिचे मानधन वाढवून तिला सन्मानजनक वागणूक द्यावी . कारण देशाचं कुपोषण नष्ट करण्यात तिचा खारीचा वाटा आहे. बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी ती नेहमी तत्पर आहे . निर्दोष लसीकरण मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी तीच सहकार्य मोलाचं आहे. म्हणून अंगणवाडी मदतनीसला योग्य न्याय मिळालाच पाहिजे. शासनाने योग्य निर्णय घेऊन तिची पिळवणूक थांबवावी हीच आशा बाळगते व इथेच पुर्ण विराम घेते पुन्हा भेटू नव्या आशयासोबत.


    - रेखा उत्तमराव राऊत 

    मु . खंडणी, ता मारेगाव 

    जि . यवतमाळ



बुधवार, १७ जून, २०२६

स्वराज्यजननी राजमाता माँसाहेब जिजाऊ

 


वंदन राजमाता माँसाहेबांना ।

नमन करू या तव चरणांना ॥

जिजाऊ सत्कर्माची करू अर्चना ।

स्मरण करू जिजाऊंच्या स्मृतिंना ॥


         युगपुरुष घडविणारी माउली,हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणारी स्वराज्यप्रेरक, संकल्पाचे दुसरे नाव राष्ट्रमाता, राजे शिवरायांच्या व राजे संभाजींच्या शिल्पकार,एक वंदनीय प्रेरणा,स्वराज्याचा पाया रचणाऱ्या स्वराज्यजननी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना त्यांच्या दि.१७ जून २०२६ ला असलेल्या ३५२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

       स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा जन्म दि.१२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तेथील भुईकोट राजवाड्यात झाला.वडील निजामशाहीतील एक मातब्बर सरदार लखुजीराव जाधव तर ​आई म्हाळसाबाई (गिरिजाबाई) या माता-पित्यांच्या सुसंस्कारामध्ये त्यांचे बालपण गेले.

      राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांचा विवाह हा केवळ दोन घराण्यांचा संबंध नव्हता,तर तो महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासाला एक अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरला.ती दोन बलाढ्य घराण्यांची सोयरिक होती.जिजाऊ या सिंदखेडराजाचे प्रसिद्ध व पराक्रमी मराठा सरदार लखुजीराजे जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या सुकन्या होत्या.जाधव घराणे हे देवगिरीच्या यादवांचे वंशज मानले जात होते.शहाजीराजे हे वेरूळचे पराक्रमी सरदार मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांचे सुपुत्र होते. भोसले घराणे हे देखील निजामशाहीतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि वीर घराणे होते.इतिहासकारांच्या नोंदीनुसार जिजाबाई आणि शहाजीराजे यांचा विवाह इ.स. १६०५ च्या सुमारास अत्यंत बालवयात झाला.हा भव्य विवाह सोहळा दौलताबाद (देवगिरी) येथे अत्यंत शाही थाटामाटात पार पडला. लखुजीराजे जाधव आणि मालोजीराजे भोसले हे दोघेही एकाच वेळी निजामशाहीत बलाढ्य सरदार म्हणून कार्यरत होते.दोन तोडीस तोड आणि सामर्थ्यशाली घराण्यांमध्ये जवळीक निर्माण व्हावी, या हेतूने हा विवाह निश्चित करण्यात आला होता. विवाहानंतर जिजाऊ ही भोसले कुळाची 'भाग्यलक्ष्मी' बनून सासरी आल्या.त्यांचे सुरुवातीचे काही काळ सुखाचे गेले,परंतु पुढे निजामशाहीच्या दरबारातील अंतर्गत  राजकारणामुळे आणि 'खंडागळे यांच्या हत्तीच्या' वादामुळे जाधव आणि भोसले या दोन्ही घराण्यांमध्ये तीव्र राजकीय वैर निर्माण झाले.या कौटुंबिक आणि राजकीय संघर्षात जिजाऊंनी अत्यंत धैर्याने पती शहाजीराजांना साथ दिली.या ऐतिहासिक विवाहातूनच पुढे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महान सुपुत्रांचा जन्म झाला.शहाजीराजांचे शौर्य आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार,यामुळेच पुढे 'हिंदवी स्वराज्य' स्थापनेचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊ शकले.

        " धैर्यशील माता ।

           स्वराज्य प्रेरक ।   

           ध्यानीमनी एक ।

           ध्येयवाद ॥

       राजमाता जिजाऊ यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे संस्कार दिले.

        " शिवबांची गुरू ।

           शिवबांची माता ।

           सुराज्याच्या वाता ।

           पेटविल्या ॥ "

जिजामातेने शिवरायांना एक आदर्श राजा म्हणून घडविले.

          " सिंदखेडराजा ।

            एक मातृतीर्थ ।

            जीवनाचा अर्थ ।

            कळतसे ॥ "

        दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात 'जिजाऊ जन्मोत्सव' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सिंदखेडराजा त्यांच्या जन्मगावी तर जिजाऊ जन्मोत्सव अतिशय आनंदात, उत्साहात व जल्लोशात लाखो लोकांच्या साक्षीने संपन्न होतो शेकडो पुस्तकांच्या स्टॉलवरून माँसाहेब जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावरील हजारो पुस्तके विकल्या जातात.


       स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांचे कार्य केवळ एका पुत्राला घडविण्यापुरते मर्यादित नव्हते,तर त्यांनी संपूर्ण स्वराज्याचा पाया रचला होता.त्यांचे कार्य अद्वितीय होते.परकीयांच्या गुलामगिरीत पिचलेल्या जनतेला मुक्त करण्यासाठी 'स्वराज्य' स्थापन करण्याचे फार मोठे स्वप्न माँसाहेब जिजाऊंनी बघितले होते.बालपणी शिवबांवर रामायण,महाभारतातील कथांच्या माध्यमातून शौर्य आणि न्यायाचे संस्कार त्यांनी केले.

       " जिजाऊ मातेचे ।  

संस्कार जीवन ।

 शिवबा पावन । 

 घडविले ॥ "

शिवरायांना केवळ युद्धकलाच नव्हे,तर राजकारण,अर्थकारण आणि समाजकारणाचे बाळकडू सुद्धा पाजले. शहाजीराजे कर्नाटकात असताना पुण्याच्या जहागिरीची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी समर्थपणे सांभाळली.उद्ध्वस्त झालेल्या पुण्यात जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून रयतेत फार मोठा विश्वास निर्माण केला होता.पुण्याच्या कारभारात त्या स्वतः बसून रयतेचे प्रश्न सोडवत असत आणि अचूक न्यायनिवाडा करीत असत.

     " स्वराज्य रक्षण ।

       नीती अधिष्ठान ।

       खरे प्रतिष्ठान ।

        माँसाहेब ॥ "

छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर असताना स्वराज्याचा संपूर्ण कारभार जिजाऊ अत्यंत दक्षतेने सांभाळत. छ.शिवाजी महाराज जेव्हा आग्रा येथे कैदेत होते,तेव्हा स्वराज्याचे रक्षण आणि प्रशासन जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते आणि त्यांनी ते अतिशय उत्कृष्टपणे सांभाळले.त्या कुशल प्रशासक होत्या,हे त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येते.ओसाड जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना सवलती दिल्या आणि शेतीला प्रोत्साहन दिले.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या मनात असलेले स्वराज्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत झाले.रयतेसाठी विहिरी,तलाव आणि मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला.महिलांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची शिकवण त्यांनी महाराजांना दिली.पती शहाजीराजांच्या निधनानंतर सती न जाता,स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देऊन त्यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले होते. तथा सर्व जाती-धर्माच्या मावळ्यांना स्वराज्याच्या कार्यासाठी एकत्र जोडले. शिवरायांच्या लष्करी प्रशिक्षणावर आणि विश्वासू मावळ्यांच्या निवडीवर त्यांचे बारीक लक्ष असे.त्या अत्यंत प्रगत विचारांच्या होत्या आणि त्या केवळ कर्मावर विश्वास ठेवत.युद्धतंत्रात 'गनिमी कावा' वापरण्याबाबत त्यांनी शिवरायांना नेहमी प्रोत्साहन दिले.

         " शंभू शिवबांची ।

           संस्कारांची मूर्ती ।

           गाऊ सर्व कीर्ती ।

           जिजाऊंची ॥  

    सईबाईंच्या निधनानंतर नातू संभाजी राजांनाही त्यांनी आईच्या मायेने वाढविल आणि घडविले.संभाजी राजांना सर्व क्षेत्रातील ज्ञान देण्याच्या त्यांच्या प्रयासामुळे संभाजी राजांनी जीवनाच्या शेवटपर्यंत अनेक युद्ध जिंकून स्वराज्य रक्षण केले.अफझलखानाचे संकट असो वा पन्हाळ्याचा वेढा जिजाऊ कधीही डगमगल्या नाहीत,उलट त्यांनी महाराजांना धीरच दिला. स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळावी यासाठी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आग्रह त्यांनी केला आणि योग्य नियोजन करून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न  केला.त्या केवळ 'वीरमाता' किंवा 'वीरपत्नी' नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या 'राजमाता' आणि खऱ्या अर्थाने 'मार्गदर्शक' होत्या.​

       " राजमाता एक ।

         स्वराज्य जननी ।

         कर्माची कहाणी ।

         वर्णू किती ॥ "

राजमाता जिजाऊंच्या या कार्यामुळेच आज महाराष्ट्र आणि हिंदवी स्वराज्य ताठ मानेने उभे आहे.राजमाता जिजाबाई शहाजीराव भोसले यांचा इतिहास आणि त्यांचे जीवन अखंड महाराष्ट्रासाठी स्फूर्तीदायक आहे.राजमाता जिजाऊ सारखे सुसंस्कार आजच्या मतांनी आपल्या मुला मुलींवर केले पाहिजे.

          " मुलामुलींवर ।

            जिजाऊ संस्कार ।

            थोर ते विचार ।

            आचरावे ॥ "

     दरवर्षी १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी केली जाते.राजमाता जिजाऊ स्मृतिदिन दरवर्षी दि.१७ जून रोजी संपन्न होतो.दि.१७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी त्यांचे महानिर्वाण झाले.छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष घडवून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना त्याच्या ३५२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥


        " जिजाऊ कर्मांना । 

          करितो नमन ।

          करांनी वंदन । 

          कोटी कोटी ॥


       

  प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,

      अमरावती. ०८७७४८६०९

      

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या उत्तर पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी राजेंद्रकुमार शेळके यांची निवड.

 


शब्दशिल्प/पुणे_नारायणगाव नगरीचे रहिवासी व ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी पत्रकार राजेंद्रकुमार  ज्ञानेश्वर शेळके यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने उत्तर पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली. श्री राजेंद्रकुमार शेळके हे एक प्रतिथयश कवी लेखक असून त्यांनी श्री विघ्नहर्ता ग्रुपच्या वृत्तीने अनेक राज्यस्तरीय काव्यस्पर्धेंचे आयोजन केले आहे. आजवर त्यांना अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून अनेक कार्यक्रम त्यांचे पुणे आकाशवाणी केंद्रावर प्रसारित झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट, उप प्राचार्य डॉ. के. डी. सोनावणे, ज्युनिअर विभाग उपप्राचार्य  अमृत बनसोडे, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वृंद तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, उप सचिव एल. एम. पवार, सह सचिव प्रशासन ए. एम. जाधव आदी संस्था पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.



मंगळवार, १६ जून, २०२६

जीवनाची पूंजी-पू. भिक्खू धम्मरक्षित


माणूस आपल्या जीवनात अनेक प्रकारची संपत्ती जमा करण्याचा प्रयत्न करतो. कोणी धनाला जीवनातील सर्वात मोठी पूंजी मानतो, कोणी प्रतिष्ठेला, कोणी सत्तेला तर कोणी भौतिक सुख-सुविधांना. परंतु जेव्हा जीवनाच्या गहन सत्याचा विचार केला जातो, तेव्हा लक्षात येते की या सर्व संपत्तींचे महत्त्व मर्यादित आहे. धन, वैभव, पद आणि प्रतिष्ठा काळानुसार बदलू शकतात, नष्ट होऊ शकतात किंवा हिरावून घेतले जाऊ शकतात. जी संपत्ती कधीही नष्ट होत नाही ती म्हणजे – सदाचार, ज्ञान, करुणा, प्रेम, विश्वास, संतोष आणि आत्मिक शांती.

   भगवान बुद्धांनी मानवी जीवनाचे खरे मूल्य समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की माणसाचे खरे धन त्याच्या अंतःकरणात दडलेले असते. जर मन निर्मळ असेल, विचार श्रेष्ठ असतील आणि कर्म पवित्र असतील, तर तीच सर्वात मोठी संपत्ती आहे. बुद्धांनी बाह्य संग्रहापेक्षा अंतर्गत विकासाला अधिक महत्त्व दिले. त्यांच्या मते जीवनातील सर्वात मोठी पूंजी म्हणजे जागरूकता, करुणा आणि प्रज्ञा होय.

    आजचे युग भौतिकवादाचे युग आहे. माणूस अधिकाधिक धन कमावण्याच्या शर्यतीत गुंतलेला आहे. तो जीवनातील यशाचे मोजमाप बँक खात्याने, महागड्या घरांनी, मोठ्या गाड्यांनी आणि उच्च पदांनी करतो. परंतु हेही सत्य आहे की धनवान असूनही अनेक लोक तणाव, भीती, असंतोष आणि एकाकीपणाने ग्रस्त असतात. दुसरीकडे, मर्यादित साधनसंपत्ती असलेले अनेक लोक संतोषी आणि आनंदी जीवन जगतात. यावरून स्पष्ट होते की खर्‍या सुखाचा आधार बाह्य वस्तू नसून अंतर्गत समृद्धी आहे.

   जीवनाची पूंजी ती आहे जी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला श्रेष्ठ बनवते. सत्य, अहिंसा, दया, मैत्री, सहनशीलता आणि संयम यांसारखे गुण व्यक्तीला समाजात सन्मान मिळवून देतात. हे गुण केवळ स्वतःचे जीवन सुखी बनवत नाहीत, तर इतरांच्या जीवनातही प्रकाश पसरवतात. म्हणूनच महान व्यक्तींना त्यांच्या धनामुळे नव्हे, तर त्यांच्या चारित्र्यामुळे आणि कर्मांमुळे स्मरणात ठेवले जाते.

  बुद्धांनी शिकवले की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कर्मांचा निर्माता आहे. चांगली कर्मे भविष्यातील सुखाचा पाया घालतात, तर वाईट कर्मे दुःखाचे कारण बनतात. म्हणून जीवनाची खरी पूंजी म्हणजे सत्कर्मांचा संचय होय. ही पूंजी मृत्यूनंतरही व्यक्तीच्या स्मृतींमध्ये आणि प्रभावामध्ये जिवंत राहते.

  आजच्या काळात स्पर्धा आणि स्वार्थाची भावना वाढत असताना बुद्धांचे विचार अधिकच महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचा संदेश आपल्याला सांगतो की जीवनाचे उद्दिष्ट केवळ भौतिक यश मिळवणे नसून आत्मिक विकास आणि मानवतेची सेवा करणेही आहे. जीवनातील यशाचे मोजमाप धनाच्या प्रमाणाने नव्हे, तर मनःशांती आणि इतरांप्रती असलेल्या करुणेने केले पाहिजे.  म्हणूनच जीवनाची खरी पूंजी ती नाही जी तिजोरीत बंद असते, तर ती आहे जी हृदयात आणि चारित्र्यात साठवलेली असते. हीच पूंजी व्यक्तीला महान बनवते आणि त्याच्या जीवनाला अर्थपूर्णता प्रदान करते.


१. 'अत्तदीपो भव, अत्तसरणो भव.'

अर्थ – स्वतःच स्वतःचा दीप बना, स्वतःच स्वतःचा आधार बना.


२. 'नहि वेरेन वेरानि, सम्मन्ति ध कुदाचनं।

अवेरेन च सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो?'

अर्थ – वैराने वैर कधीच संपत नाही; प्रेम आणि मैत्रीनेच ते संपते.


३. 'मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया।'

अर्थ – मन हे सर्व कर्मांचे अग्रदूत आहे; मनच प्रधान आहे.


४. 'अप्पमादो अमतपदं, पमादो मच्चुनो पदं।'

अर्थ – जागरूकता अमरत्वाचा मार्ग आहे आणि प्रमाद हा मृत्यूचा मार्ग आहे.


५. 'सब्बपापस्स अकरणं, कुसलस्स उपसम्पदा।

सचित्तपरियोदपनं, एतं बुद्धानुसासनं?'

अर्थ – पापांपासून दूर राहणे, सत्कर्म करणे आणि मन शुद्ध ठेवणे हीच बुद्धांची शिकवण आहे.

  मानवी जीवन हे अनेक अनुभव, संघर्ष आणि यशांचे संगम आहे. प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुखी आणि यशस्वी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. या प्रयत्नांमध्ये तो विविध प्रकारच्या संपत्ती मिळवतो. परंतु प्रश्न असा आहे की जीवनाची खरी पूंजी कोणती? केवळ धनसंपत्तीच जीवनाची पूंजी आहे का? की अशी काही अमूल्य मूल्ये आहेत जी धनापेक्षाही अधिक मौल्यवान आहेत?


जर आपण इतिहासातील महान व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास केला, तर लक्षात येईल की त्यांच्या महानतेचा पाया धन नव्हता, तर त्यांचे आदर्श, विचार आणि चारित्र्य होते. भगवान बुद्ध, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक महापुरुषांनी आपल्या जीवनातून सिद्ध केले की खरी संपत्ती माणसाच्या अंतःकरणात असते.

  ज्ञान माणसाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढते. धन चोरी होऊ शकते, नष्ट होऊ शकते; परंतु ज्ञान कधीही नष्ट होत नाही. बुद्धांनी ज्ञानाला मुक्तीचा मार्ग म्हटले आहे. त्यांच्या मते योग्य ज्ञान व्यक्तीला योग्य निर्णय घेण्याची क्षमता देते. शिक्षित आणि विवेकी व्यक्ती जीवनातील कठीण परिस्थितींना अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकते.

  ज्ञान व्यक्तिमत्त्वाचा विकास करते. ते आत्मविश्वास देते आणि समाजात सन्मान मिळवून देते. म्हणूनच ज्ञानाला जीवनातील सर्वात स्थिर आणि मौल्यवान पूंजी मानले जाते.

  चारित्र्य हा माणसाचा खरा अलंकार आहे. धनवान व्यक्ती चारित्र्यहीन असेल तर त्याला सन्मान मिळत नाही. उलट साधे जीवन जगणारा चारित्र्यवान व्यक्ती समाजात आदर प्राप्त करतो.

  बुद्धांनी शील अर्थात नैतिक आचरणावर विशेष भर दिला. त्यांच्या मते सत्य बोलणे, हिंसेपासून दूर राहणे, चोरी न करणे आणि संयमी जीवन जगणे यामुळे व्यक्तीचे चारित्र्य घडते. चारित्र्य ही अशी पूंजी आहे जी आयुष्यभर साथ देते आणि मृत्यूनंतरही व्यक्तीची ओळख जिवंत ठेवते.

  करुणा हा बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा मूलाधार आहे. त्यांनी सर्व प्राणिमात्रांप्रती प्रेम आणि दयेची भावना बाळगण्याचा उपदेश केला. करुणा व्यक्तीला संवेदनशील बनवते आणि इतरांच्या दुःखाची जाणीव करून देते.

   आज समाजात वाढणारी हिंसा, द्वेष आणि कटुता यांचे मुख्य कारण करुणेचा अभाव आहे. जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये करुणा आणि मैत्रीचा विकास केला, तर समाज अधिक शांततापूर्ण आणि आनंदी होईल. त्यामुळे करुणा ही जीवनातील अमूल्य पूंजी आहे.

  बुद्धांनी सांगितले की तृष्णाच दुःखाचे मूळ कारण आहे. माणूस जितके अधिक मिळवण्याची इच्छा करतो, तितकाच तो अधिक असंतुष्ट होतो. संतोष म्हणजे प्रगती थांबवणे नव्हे, तर जे उपलब्ध आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणे होय.

संतोषी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक शांत आणि आनंदी असते. तिला छोट्या-छोट्या गोष्टींतही आनंद मिळतो. म्हणूनच संतोषाला सुखी जीवनाचा पाया म्हटले जाते.

  वेळ ही जीवनातील अशी पूंजी आहे जी एकदा निघून गेली की पुन्हा परत येत नाही. बुद्धांनी जागरूकता आणि वेळेच्या सदुपयोगावर विशेष भर दिला. जो व्यक्ती वेळेचा आदर करतो तो जीवनात यश प्राप्त करतो.

  वेळेचा योग्य उपयोग ज्ञानप्राप्ती, आत्मविकास आणि समाजसेवेसाठी केला पाहिजे. वेळेचा अपव्यय ही जीवनातील सर्वात मोठी हानी आहे.

  आरोग्याशिवाय जीवनातील कोणतीही उपलब्धी अर्थपूर्ण ठरत नाही. निरोगी शरीर आणि निरोगी मन ही व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती आहे. बुद्धांनी मध्यम मार्गाचा उपदेश करून संतुलित जीवनशैलीचा संदेश दिला.

  योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि सकारात्मक विचार हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. आरोग्याचे रक्षण करणे म्हणजे जीवनाच्या पूंजीचे रक्षण करणे होय.

  कुटुंब, मित्र आणि समाजाशी असलेले चांगले संबंध जीवन आनंदी बनवतात. प्रेम, विश्वास आणि सहकार्यावर आधारित नाती व्यक्तीला मानसिक बळ देतात.

  धनाने सर्व काही विकत घेता येते, परंतु खरे प्रेम आणि विश्वास विकत घेता येत नाही. त्यामुळे चांगले संबंध हीसुद्धा जीवनातील महत्त्वाची पूंजी आहे. जो व्यक्ती नात्यांना महत्त्व देतो, तो जीवनात अधिक संतोष आणि आनंद प्राप्त करतो.

  बुद्धांनी मनःशांतीला सर्वात मोठे सुख म्हटले आहे. अध्यात्म व्यक्तीला स्वतःमध्ये डोकावण्यास आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यास मदत करते.

  ध्यान, आत्मचिंतन आणि नैतिक जीवनाच्या माध्यमातून व्यक्ती अंतःशांती प्राप्त करू शकते. हीच शांती जीवनातील सर्वोच्च पूंजी आहे कारण ती बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसते.

  जीवनाची खरी पूंजी धन, पद आणि प्रतिष्ठा नसून ज्ञान, चारित्र्य, करुणा, संतोष, आरोग्य, वेळ, चांगले संबंध आणि आत्मिक शांती ही आहे. भगवान बुद्धांच्या शिकवणी आपल्याला हाच संदेश देतात की माणसाने बाह्य संग्रहापेक्षा अंतर्गत विकासावर भर द्यावा. जो व्यक्ती स्वतःमध्ये सद्गुणांचा विकास करतो, तोच खर्‍या अर्थाने समृद्ध असतो.

  म्हणून आपण अशी जीवनपूंजी जमा केली पाहिजे जी कधीही नष्ट होत नाही आणि जी स्वतःबरोबरच समाजाच्या कल्याणाचाही आधार बनते. हाच बुद्धांचा संदेश आहे, हाच जीवनाच्या यशाचा खरा अर्थ आहे आणि हीच मानवी जीवनातील सर्वात मोठी पूंजी आहे. ?

-पू. भिक्खू धम्मरक्षित


पुस्तक समीक्षा : इतिहास, प्रेरणा आणि स्वप्नपूर्तीचा काव्यमय दस्तऐवज — ‘वसंत गीतांजली’



कविता ही केवळ शब्दांची सजावट नसून ती मानवी मनातील संवेदना, विचार आणि अनुभवांचा सजीव प्रवाह असते. समाजातील वास्तव, इतिहासातील प्रेरणा, व्यक्तींचे संघर्ष आणि भविष्याची स्वप्ने जेव्हा शब्दरूप घेतात, तेव्हा कविता जन्म घेते.  आणि मग ती केवळ भावनांचा आविष्कार  नसून काळाचा दस्तऐवज बनते, मूल्यांची पेरणी करते आणि विचारांना दिशा देते. अशाच व्यापक साहित्यप्रवाहाचा एक अर्थपूर्ण संगम म्हणजे ‘वसंत गीतांजली’.
‘वसंत गीतांजली’ हा  काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातील एका महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली काव्यात्मक श्रद्धांजली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे , शेतकऱ्याचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा ध्यास हे ध्येय हृदयासी बाळगणारे ,लोकनेते वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित हा संग्रह प्रेरणा, इतिहास आणि मानवी मूल्यांचा सखोल आविष्कार घडवतो.
या संदर्भात बंजारा समाजाचे आद्य दैवत संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा,  प्रभावही महत्त्वाचा ठरतो.
"सत्य मार्गाने चला".  "साधेपणात जग जिंका" "मानवतेची सेवा करा"
त्यांच्या उपदेशपर परंपरेतून घडलेली मूल्यव्यवस्था, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची भावना हीच पुढे वसंतराव नाईक  यांच्या सारख्या  महान नेतृत्वात प्रतिबिंबित होताना दिसते. त्यांचे ग्राम विकासाचे कार्य हे त्या मूल्य परंपरेची आधुनिक रूप मानता येते.त्यामुळे हा काव्यसंग्रह केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून एका व्यापक सामाजिक-आध्यात्मिक परंपरेचाही सन्मान ठरतो.

शीर्षकातील अर्थ आणि प्रतीकात्मकता
‘वसंत’ म्हणजे नवचैतन्य, नवसृजन आणि परिवर्तनाचे प्रतीक; तर ‘गीतांजली’ म्हणजे भावनांचे समर्पण. या दोन संकल्पनांचा संगम म्हणजे ‘वसंत गीतांजली’.या शीर्षकातून कवीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो—वसंतराव नाईक यांना केवळ राजकीय नेता म्हणून नव्हे, तर समाजपरिवर्तन घडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शिल्पकाराच्या रूपात पाहणे. त्यांच्या कार्यातून ग्रामीण महाराष्ट्रात आलेले नवचैतन्य म्हणजेच ‘वसंत’ आणि त्या कार्याला दिलेले काव्यमय समर्पण म्हणजे ‘गीतांजली’.म्हणूनच या काव्यसंग्रहाला दिलेले' वसंत गीतांजली 'हे नाव आणि संग्रहाला दिलेले मुखपृष्ठ हे वाचकाचे लक्ष वेधून घेते.

लेखक आणि स्वप्नांची कहाणी
या काव्यसंग्रहाचे मूळ लेखक स्वर्गीय सुधाकर पवार हे संवेदनशील कवी आणि सामाजिक जाणिवा असलेले साहित्यप्रेमी व्यक्तिमत्त्व होते. वसंतराव नाईक यांच्या सोबत समाज सेवा करण्याचे त्यांना अहोभाग्य लाभले होते. त्यामुळेच  त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, कृतज्ञता आणि सामाजिक जाणिवा या कवितांमधून स्पष्टपणे व्यक्त होतात.परंतु त्यांच्या हयातीत हा संग्रह प्रकाशित होऊ शकला नाही. त्यामुळे या ग्रंथाला अपूर्ण स्वप्नांचा भावनिक संदर्भ लाभतो. हे अपूर्ण स्वप्न पुढे पूर्ण केले त्यांच्ये सुपुत्र  पत्रकार ,कवी, लेखक सुरज पवार यांनी. वडिलांच्या हस्तलिखिताला प्रकाशित स्वरूप देताना त्यांनी केवळ पुस्तक प्रकाशित केले नाही, तर एका पित्याच्या साहित्यिक वारशाचे जतन केले. त्यामुळे हा संग्रह एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेल्या भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक ठरतो.


संग्रहाची रचना आणि आशय
या संग्रहात एकूण अकरा कविता आहेत. या कविता वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याचे विविध पैलू उलगडतात—लोकाभिमुख नेतृत्व, ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण, सामाजिक न्याय आणि व्यापक राष्ट्रनिर्मितीचा दृष्टिकोन. याशिवाय   कवी.बा.पू.राठोड (शांतीकुमार ), अजय चव्हाण (शब्दसखा) रावजी राठोड (तांडेलकार ) या कवींच्याही रचनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा संग्रह केवळ एका व्यक्तीच्या अभिव्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर सामूहिक आदरभावनेचा साहित्यिक दस्तऐवज बनतो.

कवितांचा आशयात्मक आढावा
वसंतरावजी | नाईक महान. |
जणू भाग्यवान |आम्हासाठी. |

भुकेल्याजीवाला| पुरविले धान्य| 
कार्य असामान्य | नाईकांचे. ||
‘नाईक साहेब’

या  अभंगातून वसंतराव नाईक यांचे लोकाभिमुख नेतृत्व, साधेपणा आणि जनतेशी असलेली नाळ प्रभावीपणे उभी केली आहे. सत्ता म्हणजे अधिकार नव्हे तर सेवा आहे, ही भावना यात ठळकपणे जाणवते.

वसंता तू महाराष्ट्राचा गोर नायक 
गोर गणाचा तू थोर नायक 
तुझे स्वप्न फुल्याच्या हरितात
हिरव्या बोलीचा तुला प्रणिपात
 
वसंत वारा या कवितेतून निसर्ग आणि नेतृत्व यांचा प्रतीकात्मक संगम या कवितेत दिसतो. वसंत ऋतू जसा नवचैतन्य निर्माण करतो, तसेच नाईक साहेबांच्या कार्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात विकासाची नवी ऊर्जा निर्माण झाली, हा विचार यात व्यक्त होतो.

शेतकऱ्यांच्या बांधावरून 
अभिवचन राष्ट्राला 
कटीबद्ध स्वयंपूर्णतेला अथवा 
द्या फाशी मजला

‘अभिवचन राष्ट्राला’ ही कविता राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देते. प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रनिर्मितीत योगदान आवश्यक आहे, हा प्रेरणादायी संदेश यात आहे.

"दिग्रस भूमीची इतिहास गाथा 
जमला बंजाराचा जत्था 
अर्ध शतकापूर्वी जाहले 
प्रथम बंजारा महासंमेलन
वसंतरावजी नाईक यांनी 
फडकविले बंजारा निशान"

‘इतिहास गाथा’ या कवितेतून इतिहास हा केवळ भूतकाळ नसून वर्तमानाला दिशा देणारा आणि भविष्य घडवणारा प्रेरणास्रोत आहे, ही ठोस भूमिका या कवितेत मांडली आहे.

इतर कवितांचा आशय- संग्रहातील इतर कवितांमधूनही जशी वसंत सौरभ , निधी ध्यास, जय बंजारा , मसीहा , हाजुसंग जय बंजारा हिंदी , हिरवी रंगावली  या सर्व कविता मधून
ग्रामीण विकासाची तळमळ, शेतकऱ्यांविषयीची बांधिलकी, सामाजिक न्यायाची भावना आणि लोककल्याणाचा व्यापक दृष्टिकोन, आणि वसंतराव नाईक यांचे महात्म , त्यांच्या विषय असलेला आदरभाव, त्यांची गौरव गाथा हे सर्व पैलू ठळकपणे दिसतात.

भाषाशैली
या  काव्य संग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे साधी, सरळ सोपी आणि प्रभावी भाषा. अलंकारिकतेचा अतिरेक टाळून भावनांचा थेट आविष्कार साधला आहे. त्यामुळे या कविता सामान्य वाचकांपर्यंत सहज पोहोचतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात.

मान्यवरांचे योगदान
या पुस्तकाला अनेक  दिग्गज मान्यवरांचे शुभेच्छा संदेश लाभले आहेत.  त्यामुळे या काव्यसंग्रहाला चार चांद लागले आहे. म्हणूनच या साहित्यकृतीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.
विशेषत प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक  पंजाबराव चव्हाण साहेब यांची प्रस्तावना हा या संग्रहाचा आत्मा आहे. ती केवळ परिचय नसून कवितांचे सखोल साहित्यिक विश्लेषण करणारी मार्गदर्शक भूमिका बजावते.

साहित्यिक मूल्य
‘वसंत गीतांजली’ हा संग्रह केवळ व्यक्तिस्तुती करत नाही, तर—मूल्यांची मांडणी करते
नेतृत्वाची व्याख्या स्पष्ट करते ग्रामीण वास्तव अधोरेखित करतेआणि समाजाला विचार करायला भाग पाडते
अशा प्रकारे हा संग्रह साहित्य आणि समाज यांना जोडणारा दुवा ठरतो.

निष्कर्ष
एकूणच ‘वसंत गीतांजली’ हा काव्यसंग्रह म्हणजे लोकनेते वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याला वाहिलेली काव्यात्मक श्रद्धांजली आहे. स्वर्गीय सुधाकर पवार यांच्या अपूर्ण राहिलेल्या साहित्यिक स्वप्नांची पूर्तता आणि सुरज पवार यांच्या प्रयत्नांतून जपलेला हा वारसा म्हणजे एक सांस्कृतिक दस्तऐवज आहे.
इतिहास, प्रेरणा, साहित्य, राष्ट्रभावना आणि मानवी मूल्यांचा असा दुर्मिळ संगम या संग्रहात दिसतो.
ही केवळ कविता नाही—हा एका विचाराचा प्रवास आहे, एका युगाचा दस्तऐवज आहे आणि एका स्वप्नाच्या पूर्णत्वाचा काव्यमय उत्सव आहे.
जो येणाऱ्या नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल तरुण पिढीला नवी दिशा आणि प्रेरणा देईल. सुरज पवार संपादित
वसंत गीतांजली या काव्यसंग्रहाला माझ्या खूप खूप शुभेच्छा...
 🙏जय सेवालाल 

"वसंत गीतांजली "
प्रकाशक - वारकरी प्रकाशन मुंबई
कवी - स्व. सुधाकर पवार
संपादक - सुरज पवार 
समीक्षक-  मनिषा कांबळे यवतमाळ 
मूल्य  - 175


—  ✍️ मनिषा आनंदराव कांबळे यवतमाळ


विठ्ठलाचे निस्सीम भक्त : संत गोरोबा काका

 

   "फिरत्या चाका वरती
  देसी मातीला आकार, 
    विठ्ठला तू वेडा कुंभार
      विठ्ठला तू वेडा कुंभार... "

 हे भावगीत आपण सतत सकाळच्या प्रहरी ऐकतो. मन प्रसन्न होऊन आध्यात्मिक भावना वृंदिगत होते. मनातील नकार नाहीसे होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. 

हे भक्तीगीत आहे मराठवाड्यातील (उस्मानाबाद) धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावातील संत गोरोबा काका बद्दल आदरभाव व्यक्त करणारे. वारकरी संप्रदायातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत तुकाराम ,संत एकनाथ यांचे समकालीन संत म्हणजे संत गोरा कुंभार. तेर हे गाव तेरणा नदीकाठी वसलेले. या तेरचे प्राचीन नाव तगर आहे असे सांगितले जाते.प्राचीन काळी तगर गाव जमिनीत गडप झाले होते असी ही माहिती मिळते. तेर पंचक्रोशीत बारा वाडी व तेरावे तेर गाव असून तेरणा नदीकाठी वसलेले आहे. संत गोरोबा काका महाराज यांचा जन्म तेर येथे झाला. वडील माधवबुवा कुंभार व आई रखुमाई. कुंभार घराण्यात जन्मलेले संत गोरोबा काका विठठ्लाचे मोठे भक्त होते. आईवडिलाप्रमाणे पारंपरिक व्यवसाय करायचे. मातीपासून मडके बनवणे. 

"माती पाणी उजेड वारा

तूच मिसळसी सर्व पसारा

आभाळच मग आकारा

तुझ्या घटांच्या उतरंडीला

नसे अंत ना पार.. "

कविवर्य  ग. दी. माडगूळकर यांचे भक्तीगीत संत गोरोबा काका महाराज यांच्या कुंभार या व्यवसाय कलाकृतीबद्दल प्रेम, भाव व श्रद्धा व्यक्त करणारे आहे. 

"घटा घटाचे रूप आगळे

   प्रत्येकाचे दैव वेगळे

   तुझ्या विना कोणा ना कळे

     मुखी कुणाच्या पडते लोणी

     कुणी मुखी अंगार...... "

गोरोबा काकाचे आईवडील धार्मिक वृत्तीचे होते. संपूर्ण कुटुंब काळेश्वर या ग्रामदैवताचे उपासक होते. कुंभाराचे काम करून उदरनिर्वाह चालवायचे. त्यांना आठ आपत्य झाले पण दुर्दैवाने ते जगले नाहीत.मुलांच्या मृत्यूचे भयानक दु:ख होते. पण सांगितले जाते की साक्षात पांडुरंग परमात्मा माधवबुवाच्या घरी आले.  माधवबुवांना दु :खाचे कारण विचारले व मृत्यू पावलेल्या सात ही मुलांना जीवंत करून स्वर्गात पाठवणी केली. पण आठव्या मुलाला स्वर्गात न पाठवता पृथ्वीवर ठेवले.  (मातीत पुरलेले)गोरीतून बाहेर काढल्यामुळे त्यांचे नाव "गोरा" ठेवले.  लहानपणी अतिशय हुशार व सतत विठ्ठलाची भक्ती करणारे गोरोबा काका एक महान संत झाले. विठ्ठलाचे निस्सीम भक्त, अनेक अभंग लिहिले. माती तुडवीत विठ्ठल....विठ्ठल म्हणत स्वतः चे बाळ मातीत तुडवले. पंढरीच्या पांडुरंगाने ते जीवंत केले. गोरोबा काका हे सर्व संतामध्ये वयाने मोठे असल्यामुळे सर्व संत गोरोबास "काका" म्हणतात. 

संताची परिक्षा घेण्याचा अधिकार संत गोरोबा काकांना प्राप्त झाला. कोणाचे मडके ( डोके)किती पक्के आहे याचे परीक्षण गोरोबा काकांनी केले.  सर्व वैष्णव संत संप्रदायातील संतांचे गुरुजी म्हणून संत गोरोबा काकांना ओळखले जाते. 

संत गोरोबाचा विवाह संतीशी झाला. त्यांना एक सुंदर, गोंडस बाळ झाले. नंतर रामी यांच्या बरोबर दुसरे लग्न झाले. काकांना दोन पत्नी होत्या. रांगत बाळ मातीत आले आणि आपले देहभान विसरून ते काकांनी मातीत तुडवले. काकांनी पत्नीच्या शरीराला हाताचा स्पर्श झाला म्हणून दोन्ही हात तोडले. मडके भाजणा-या आव्यात (भट्टी) मांजरी मेली ती ही पांडुरंगाने जीवंत केली. गोरोबा काकांना हात दिले. अनेक अख्यायिका आहेत. काकांनी बनवलेली विट पाण्यावर तरंगते. पांडुरंगाची श्रद्धा, निष्ठेने भक्ती करणारे महान संत गोरोबा काका होते.  शके १२३९ चैत्र कृष्ण त्रयोदशीला २० एप्रिल १३१७ रोजी संत गोरोबा काकांनी समाधी घेतली. (उस्मानाबाद ) धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीकाठी तेर याठिकाणी काकांची समाधी आहे. भव्य दिव्य मंदिर आहे. सतत भजन कीर्तन, हरिनाम सप्ताह, प्रवचन धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम सुरू असतात. प्रती एकादशीला वारकरी पायी चालत दिंडीसह तेरला येऊन संत गोरोबा काकाच्या समाधीचे दर्शन करतात.समाधीजवळ महादेवाचे प्राचीन काळापासूनचे मंदिर आहे.अनेक भाविक भक्त दर्शन करण्यासाठी येतात. संत गोरोबा काकाचे अनेक अभंग आहेत. रसाळ वाणीचा झरा म्हणजे संत गोरोबा काकाचे अभंग होत. सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अभंग आहेत. 

 "निर्गुणाचा संग धरिला जो आवडी|

  तेणें केले देशोधडी आपणियाशी||"

निर्गुणाचा संग धरल्यावर काय अवस्था होते हे अभंगांच्या माध्यमातून सांगितले आहे. 

"मज रूप नाही नाव सांगू काई|

झाला बाई काई बोलू नये||

बोलता आपली जिव्हा पैं खादली|

खेचरी लागली पाहतां पाहतां||"

असे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. अभंगातून आपले परखड विचार समाजाला सांगण्याचे महान कार्य संत गोरोबा काकांनी केले आहे. 


रत्नाकर बाबुराव पाटील 

       [सहशिक्षक]

 विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली 

ता.जि.धाराशिव



रविवार, १४ जून, २०२६

मानवतेचे प्रचारक : मानव उध्दाराकरीता मानवी मुल्यांचा प्रसार करणारा कवितासंग्रह !

 


मानवतेकरीता लिहिणारे कवी मोजकेच आहेत. फुले, पाने, नदी, डोंगर, निसर्ग यावर लिहिणारे कवी खचाखच भरलेले आहे. मानव मुक्तीसाठी लिहिणे फार धैर्याचे काम आहे. कवी सुरेश भिवगडे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी आहेत. वर्धा जिल्ह्यातील आंबेडकरी जाणिवा घेऊन लिहिणारे काही कवी. कवी प्रकाश बनसोड, गझलकार विद्यानंद हाडके, कवी संजय ओरके, कवी प्रशांत ढोले,कवी अरविंद पाटील,कवी रसपाल शेंदरे, मानवतेचे प्रचारक कवितासंग्रहाला आयु. यशोदाताई व्यंकटेश आत्राम आर्वी जि. वर्धा यांची मोजक्या शब्दात प्रभावी प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत कविच्या स्वभावाचे व त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा आढावा सांगितला आहे. या परिस्थितीवर मात करुन ते संपूर्ण वेळ समाज कार्याला देतात व कवी सुरेश भिवगडे धम्मप्रसारक आहेत. त्यांच्या कवितासंग्रहाबद्दल त्या म्हणतात  धर्मद्वेषाच्या आगीत पेट घेत असताना मानवतेला हाक देणारी कविता म्हणजेच मानवतेचे प्रचारक.

प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांताने

तुम्ही अविद्येचे मूळच नष्ट करण्याचा मार्ग शोधिला. 

(इतिपी सो भगवा) 

 "इतिपि सो भगवा.." ही कविता गौतम बुद्धांच्या गुणांचे वर्णन करणारी ही रचना आहे. महाकारुणिक बुद्धांनी तृष्णेच्या साखळ्या तोडल्या आणि दुःखाचे मूळ शोधून दुःखमुक्तीचा मार्ग दिला.अरहं संबोधीच्या उच्च अवस्थेला पोहोचलेले, संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी घालवले. तृष्णेत अडकलेल्या मानवाला भवसागर पार करण्याचा मार्ग दाखवला.विद्याचरणसंपन्न प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत देऊन अविद्येचे मूळ नष्ट करण्याचा मार्ग शोधला.ही कविता "इतिपि सो भगवा अरहं सम्मासंबुद्धो" या बुद्धवंदनेवर आधारित आहे. प्रत्येक कडव्यात बुद्धांच्या एका गुणाचे स्तवन केले आहे.ही  कविता बुध्दाचे त्याग ज्ञान आणि करुणेचा संदेश देते. दुख संपवायचा असेल तर तृष्णा सोडून धम्माच्या मार्गावर चालावे लागेल.

आपण वंदन करु

या महामानवाला

आपण वंदन करु

महामानवाच्या कार्यकर्तृत्वाला

सम्यक संकल्प घेऊ

पुढे नेऊ बाबासाहेबांच्या रथाला (क्रांतीभूमी) 

 "क्रांतीभूमी"  ही कविता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आणि त्यांच्याशी जोडलेल्या महत्त्वाच्या स्थानांना वंदन करणारी ही रचना आहे.बाबासाहेबांनी जिथे जन्म घेतला, संघर्ष केला, त्या सर्व क्रांतीभूमींना वंदन करायला ही कविता सांगते.समतेचा लढा महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह आठवते, जिथे मनुस्मृती जाळून पाण्याचा हक्क प्रस्थापित केला.स्वाभिमानाची प्रतिज्ञा येवला येथे घेतलेली 'मी हिंदू म्हणून मरणार नाही' ही ऐतिहासिक प्रतिज्ञा यात आहे.राजगृहात रमाई माऊलींनी केलेला त्याग आणि तिथेच घेतलेला अंतिम श्वास याचे स्मरण करते.दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा, 22 प्रतिज्ञा आणि पंचशील देऊन मिळवलेले स्वातंत्र्य अधोरेखित करते.थोडक्यात, कवितेचा संदेश आहे की बाबासाहेबांचे उपकार विसरू नका. त्यांनी गुलामगिरीतून कोट्यवधी कुळांना मोकळे केले. त्यांच्या संघर्षाच्या भूमीला वंदन करणे म्हणजे त्यांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारणे.हे कवी सुरेश भिवगडे या कवितेतून सांगतात.


ते निघालेत धर्माच्या नावाने

माणसांचे मुडदे पाडायला

तु मात्र निघ मानव सेवेसाठी

महाकारुणिक बुध्दाच्या मैत्रीचा धागा घेऊन

(मानवतेचे प्रचारक) 


"मानवतेचे प्रचारक" कविता  धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेला विरोध करून माणुसकीचा प्रचार करण्याचा संदेश ही कविता देते.ते लोक धर्माच्या नावाने माणसांचे मुडदे पाडायला निघाले आहेत. पण तू बुद्धाच्या मैत्रीचा आणि करुणेचा धागा घेऊन मानवसेवेसाठी निघ .ते माणसा-माणसात भिंती उभ्या करतात, धर्मद्वेषाचे विष पाजतात. पण तू समतादूत होऊन बंधुभावाची पेरणी कर आणि वैमनस्य नष्ट कर.सगळीकडे धर्मद्वेषाची आग पेटलेली असताना तू मानवतेचा शितल झरा घेऊन जा.ते राष्ट्र धर्मनिष्ठ करायला निघाले आहेत, पण तू अखंड आणि बलशाली भारत ठेवण्यासाठी सज्ज हो.

थोडक्यात, ही कविता सांगते की धर्माच्या नावावर भांडणारे लोक विषमता पेरतात. त्याला उत्तर द्वेषाने नाही, तर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे मैत्री, करुणा आणि समतेने द्यायचे. खरा प्रचारक तो जो माणसाला जोडतो, तो तोडत नाही. या कवितेतून मानवतेचे खरे प्रचारक कवी सुरेश भिवगडे आहेत.

हीच विष पेरणारी 

माणसे धर्माच्या नावाने

पसरवितात वर्णवाद, जातीभेदाचे विष 

(विष पेरणारी माणसे) 


या कवितेत कवी सुरेश भिवगडे सांगतात की  खरी समस्या आपल्यातच लपलेला शत्रू आहे. द्वेष आहे जो आपसात फुट पाडतो. आणि धर्म जातिच्या नावाने माणुसकी संपवतो. त्यांना ओळखणे आणि सावध राहणे हा संदेश या कवितेतून  दिला आहे.

राब राब राबली माझी ती माऊली

दुःखातही माझ्या झाली ती सावली (माय) 

प्रत्येक कवी आई वर कविता लिहितोच. कवी सुरेश भिवगडे काही वेगळे नाही त्यांनी आईने सोसलेले दुःख तिचे फेडता न येणारे पांग. माय या कवितेतून सांगितले आहे. 

बाबा माझे होते

अंधारात जळावे दिप असे (बाबा) 

आई बरोबर बाबाचे महत्व सांगणारी कविता  त्यांनी लिहिलेली आहे. बाबांनी महापुरुषांचा आदर्श दिला. ज्ञानाचा वारसा दिला. हा आयुष्यात मोठा ठेवा देवून बाबा गेले. पण हृद्यायात बाबा नेहमीच राहतील. असे कवी सुरेश भिवगडे  अभिमानाने सांगतात.

फेकून गुलामीचे जोखड

जन्मभरासाठी 'उलगुलान' हा

सुरुच असणार (उलगुलान) 

अन्यायाविरुद्ध केलेल्या बंडाचा आणि विद्रोहाचा आवाज यात आहे. 'उलगुलान' म्हणजे मोठा उठाव किंवा महाबंड.हा शब्द बिरसा मुंडा  यांच्या लढ्याशी जोडला जातो.गुलामी आणि सहनशीलता जोवर आम्ही त्यांच्या सत्तेखाली अन्याय, अत्याचार सहन करत होतो, तोवर त्यांनी आम्हाला साधू-संताची उपमा दिली. मुकपणे सगळे अपमान सहन केले.पण जेव्हा आम्ही बंडाचे निशाण रोवले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, तेव्हा मात्र आम्हाला 'विद्रोही' ठरवले गेले. आमच्या लाचारीवर हसणारे लोक आम्ही लढलो तर बदनाम करू लागले. अन्यायाविरुद्ध लढल्यामुळे जर आम्ही 'विद्रोही' ठरलो,  गुलामीचे जोखड फेकून दिल्यावर आता जन्मभरासाठी 'उलगुलान' म्हणजे महाबंड हाच आमचा सुरूच राहणार. थोडक्यात, कविता सांगते की अन्याय सहन करणाऱ्याला जग चांगले म्हणते. पण जेव्हा तो अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हा त्याला विद्रोही ठरवले जाते. पण एकदा बंडाची ठिणगी पेटली की ती विझत नाही. स्वाभिमानासाठी केलेला विद्रोह हीच खरी ओळख आहे.हे या कवितेतून कविने सांगितले आहे.

किती दिवस जळत राहशील अशीच

तुझ्या जळण्याचा ही इथे आनंदोत्सव होतो

(पुरुषप्रधान संस्कृती)


ही कविता "पुरुषप्रधान संस्कृती" वर एक जोरदार आघात आहे. स्त्रीवर होणारे अत्याचार - बलात्कार, विनयभंग, ऍसिड अॕसिड हल्ले - याकडे समाज कसा उत्सवासारखा बघतो हे कवयित्री सांगते. "तुझ्या जळण्याचा ही इथे आनंदोत्सव होतो" ही ओळ समाजाच्या बधिरतेची जाणीव करुन देते. कविता नराधमांना थेट सवाल करते: "किती दिवस जळत राहशील अशीच?", "किती बळी जाणार आहे?". पुरुषी अहंकार आणि वासनेच्या नावाखाली किती चेहेरे विद्रूप करणार, याचा जाब विचारते.


समतेने जगण्याचा अधिकार तुलाही आहे  तू ही समान आहेस.  रडत बसू नकोस. अन्याय सहन करू नकोस. तू अबला नाहीस. ऊठ, लढ, आणि पुरुषप्रधान व्यवस्थेने आखलेल्या रेषा ओलांडून स्वतःचं स्वतंत्र, सन्मानाचं आयुष्य सिद्ध कर.ही कविता शोकगीत नाही, तर क्रांतीची घोषणा आहे. एकुण ९३ कविता या कवितासंग्रहामध्ये आहे. काही कविता दिर्घ तर काही अल्पाक्षरी आहेत. हा कवितांचा नजराणा कवी सुरेश भिवगडे यांनी आपल्याला मोठ्या विश्वासाने मानवतेचे प्रचारक होण्यासाठी सोपविला आहे. हा कवितासंग्रह मानवतेच्या प्रचारक साठी महत्वपुर्ण आहे.मानवतेचे प्रचारक हा कवी सुरेश भिवगडे  यांचा पहिला कवितासंग्रह आहे. याचे मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे मार्शल संजय ओरके, पुलगाव यांनी मोठ्या प्रतिभेने काढलेली आहे. त्यामुळे कवितासंग्रहाला दर्जा प्राप्त झाला आहे. ब्लर्ब प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी पाठराखण केली आहे. निळाई प्रकाशन नागपूर यांनी हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. 

 कवी सुरेश भिवगडे यांची भाषा थेट आणि अस्सल आहे. अलंकारापेक्षा अनुभव बोलतो. शब्दात घोषणाबाजी नाही तर विचारांची धार आहे. धर्माच्या नावाखाली देशात फुट पाडू राजनीती पाहता मानवतेचे प्रचारक सारख्या कवितासंग्रह ही काळाची गरज बनतो. 


✍️रत्ना यशवंत मनवरे अमरावती. 

मो. न. 7350592336



शनिवार, १३ जून, २०२६

श्री स्वामी समर्थ : भक्ती, श्रद्धा आणि अद्वैताचा दिव्य संदेश


स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय आणि लोकमान्य संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावातच एक विलक्षण सामर्थ्य दडलेले आहे. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा त्यांचा आश्वासक संदेश आजही प्रत्येक भक्ताच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करतो. स्वामी समर्थांचे जीवन हे केवळ अध्यात्मिक नव्हे, तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाला दिशा देणारे आहे.

स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. काही विद्वानांच्या मते ते दत्तात्रेय यांचे अवतार होते. त्यांच्या जीवनाची सुरुवात गूढतेने भरलेली आहे. त्यांनी अनेक वर्षे भारतभर भ्रमण केले आणि विविध ठिकाणी लोकांना धर्म, अध्यात्म आणि जीवनाचे खरे तत्त्वज्ञान शिकवले. शेवटी त्यांनी अक्कलकोट येथे स्थायिक होऊन आपले कार्य पुढे चालू ठेवले. त्यामुळे त्यांना ‘अक्कलकोट स्वामी’ म्हणूनही ओळखले जाते.

स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे, परंतु प्रभावी होते. ते कोणत्याही प्रकारच्या आडंबरावर विश्वास ठेवत नसत. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून एक वेगळीच आध्यात्मिक शक्ती जाणवत असे. त्यांनी नेहमीच लोकांना साधेपणा, प्रामाणिकपणा आणि करुणा यांचा मार्ग दाखवला.

ओवी :

भक्तांच्या अंतरी वसे, स्वामी समर्थ नाम

भिऊ नकोस म्हणती ते, देताती धीरधाम ?

स्वामी समर्थांच्या शिकवणीचा मुख्य आधार होता.श्रद्धा आणि सबुरी. ते म्हणत की, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी माणसाने धैर्य सोडू नये. प्रत्येक संकट ही एक परीक्षा असते आणि त्यातूनच माणूस अधिक सक्षम बनतो.

ओवी :

संकट येती जीवनात, नकोस होऊ खिन्न

स्वामी कृपेने दूर होती, दुःखांचे ते छिन्न ?

त्यांनी कर्मयोगाचा पुरस्कार केला. माणसाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि फळाची अपेक्षा ठेवू नये, असा त्यांचा उपदेश होता. हा विचार आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त आहे.

ओवी :

कर्म करावे निष्ठेने, नको फळाची आस

स्वामी कृपेने लाभे, जीवनात समाधान खास ?

स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक चमत्कार घडल्याच्या कथा प्रचलित आहेत. अनेक भक्तांनी त्यांच्या कृपेने रोगमुक्ती, संकटातून सुटका आणि मानसिक शांती अनुभवली आहे. मात्र स्वामी समर्थांनी कधीच चमत्कारांचा दिखावा केला नाही. त्यांनी नेहमीच श्रद्धा आणि विश्वास यावर भर दिला.

स्वामी समर्थांच्या दरबारात कोणताही भेदभाव नव्हता. जाती, धर्म, पंथ, श्रीमंती किंवा गरीबी यावरून त्यांनी कधीही कोणालाही वेगळे मानले नाही. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक माणूस समान होता.

ओवी :

नाही भेद कुणाचा, नाही उंच-नीच भाव

स्वामी चरणी एकच, मानवतेचा ठाव ?


त्यांच्या शिकवणीत प्रेम, दया आणि क्षमा यांचे महत्त्व अधोरेखित होते. त्यांनी लोकांना सांगितले की, दुसर्‍यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांना मदत करणे हाच खरा धर्म आहे.

ओवी :

दुःखात धावून जावे, धरावे त्यांचे हात

स्वामी म्हणती सेवा हीच, भक्तीची खरी वाट ?

स्वामी समर्थांनी नामस्मरणाला विशेष महत्त्व दिले. त्यांच्या मते, नामस्मरणाने मन शुद्ध होते आणि आत्मिक शांती मिळते. ‘श्री स्वामी समर्थ’ हा जप आजही लाखो भक्तांच्या ओठांवर असतो.

ओवी :

नाम घेताच स्वामींचे, शांत होई मन

दुःख सारे हरपती, मिळे आत्मज्ञान ?

अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे प्रमुख कार्यक्षेत्र असून तेथे त्यांची समाधी आहे. आजही हजारो भाविक तेथे दर्शनासाठी येतात. तेथे जाऊन भक्तांना एक वेगळीच ऊर्जा आणि शांती अनुभवायला मिळते.

स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन दिला. ते म्हणत की, प्रत्येक संकटामागे काहीतरी चांगले लपलेले असते. फक्त ते ओळखण्याची दृष्टी असावी.

ओवी :

अंधाराच्या पाठीशी, प्रकाशाची चाहूल

स्वामी म्हणती धीर धर, जाईल दुःखाची भूल ?

आजच्या आधुनिक युगात माणूस ताणतणाव, स्पर्धा आणि अस्थिरतेमध्ये अडकलेला आहे. अशा वेळी स्वामी समर्थांचे विचार अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यांच्या शिकवणीमुळे मनाला स्थैर्य मिळते आणि जीवन अधिक सुंदर बनते.



ओवी :

ताणतणावाच्या काळी, घ्यावे स्वामी नाम

शांत होईल अंतरी, मिळेल सुखधाम ?

स्वामी समर्थांनी लोकांना आत्मविश्वासाने जगण्याचा मार्ग दाखवला. ते म्हणत की, प्रत्येक माणसात अपार शक्ती असते. फक्त त्या शक्तीला ओळखून योग्य दिशेने वापरले पाहिजे.

त्यांच्या जीवनातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो साधेपणा, प्रामाणिकपणा, धैर्य, सेवा आणि प्रेम. या मूल्यांमुळेच माणूस खर्‍या अर्थाने महान बनतो.

ओवी :

साधेपणात मोठेपण, प्रेमात खरी ताकद

स्वामी म्हणती याच मार्गे, मिळते जीवनाची गोडी ?

शेवटी असे म्हणता येईल की, स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते एक जिवंत तत्त्वज्ञान होते. त्यांच्या नावात, त्यांच्या कृपेत आणि त्यांच्या शिकवणीत एक अद्भुत शक्ती आहे, जी आजही लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देत आहे.

समारोप ओवी :

स्वामी समर्थ नाम, अमृताचा झरा 

भक्तीच्या या वाटेवर, सुखाचा सागर खरा ?

 जय जय श्री स्वामी समर्थ 



सौ. किरण महादेव चौधरी 

नवेगाव-कॉम्प्लेक्स-गडचिरोली


शुक्रवार, १२ जून, २०२६

पाड्यावरची माणसं : विक्रम गांगुर्डे

 


 उद्या कुठही जायचं नाही ना कसलं काम करायचं असं मी शनिवार च्या संध्याकाळी ठरवूनच टाकलं होत. रेखा ला बजावून सांगितलं , मला सकाळी उठवायची कुठलीही तसती घेऊ नको , उद्या रविवारी आहे मी निवांत मन सोक्त झोपेल . तिला बोललो आणि तोंडावर चादर ओढली. इतक्यात फोन वाजला , पलीकडचा आवाज ओळखीचा वाटला " हॅलो, अरे झोपला का ? "      "कोण ?"

"गड्या विसरला का काय ?"  मी अंदाज केला आवाज तर ओळखीचाच आहे पण , कोण असेल काही वेळातच लक्षात आलं, हा दर्शन वाटतो  "हा बोल दर्शन तुझा नंबर सेव्ह नाही ना ..

म्हणून ओळखले नाही. काय म्हणतो बोल ना..."

" उद्या येणार का ट्रेकला? मस्त फिरुन येऊ ."

" नको यार, नको तो ट्रेक, मागच्या वेळी कावनई किल्ल्यावर गेलो होतो, खूप हाल झाले होते."

" तुम्ही पावसाळ्यात गेला होता ना,

हाल होणारचं. आता थोडा पावसाळा आहे."

" तरी पण, नको."

मी दर्शन ला नाही म्हटलो.

दर्शन आणि मी वर्ग मित्र. योगायोगाने कधी तरी भेटायचो.आता बरेच दिवस झाले होते असा योग आला नव्हता. दर्शन चा फोन कट होत नाही तोच,अर्णव चा फोन आला.अर्णव चा नंबर सेव्ह होता. मी पटकन उचलला आणि बोललो, " बोल अर्णव."

" अरे झोपला काय?"

" नाही रे."

" मग उद्या काय प्लॅनिंग आहे?"

" काही नाही."

असं म्हणताच अर्णव बोलला,

" येतो का मग किल्ल्यावर? मजा करू."

" नको ... नको यार ."

मी नाही म्हणत होतो.

तो आग्रह करीत होता.

" आरे चाल, निसर्ग सौंदर्याचा कधी कधी आनंद घे ."

मी माझी नकार घंटा वाजवीत होतो.तर, अर्णव त्याचा आग्रह सोडत नव्हता.आमचं फोन वर बोलणं ऐकून रेखा मध्येच बोलली,

" जा ना.. एवढे मित्र आग्रह करता तर ..!"

अर्णव लगेच बोलला,तो अशी संधी सोडत नव्हता.  " आरे वहिनी म्हणत्या मग, तुला कशाची रे अडचण? एकदा गृहमंत्र्यांनी परवानगी दिली म्हणजे तु मोहीमेवर जायला सज्ज हो."

रेखा हसत होती. मी अर्णव कडे चौकशी केली.कोण कोण आहे? जाण्याचं साधन काय,का बस प्रवास आहे? महत्वाचे म्हणजे,स्पाॅट कुठला ठरला. त्याने मला चार पाच जणांचे नावं सांगितले. स्पाॅट सांगितला. अर्णव आणि दर्शन एकाच बिल्डिंग मध्ये रहायचे.सोबतच ऑफिसला जायचे.सारा प्लॅन त्यांचाच होता.

सातमाळा डोंगररांगेतील महाराष्ट्रात  उंचीला दुसऱ्या क्रमांकावर असलेला आणि इतिहासाचा साक्षीदार किल्ले धोडप ठरला होता.मीही खुश झालो . यापूर्वी मी गावातील मुलांबरोबर फिरुन त्यावर फिरुन आलो होतो.पून्हा जायचं म्हणजे,माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता.अर्णव, दर्शन, दर्शनचा भाचा , मी आणि त्यांच्या बिल्डिंग मध्ये राहाणारा निशांत. आम्ही सगळे सुट्टीत भटकंती करणारे. पण, आम्हाला ट्रेकिंगची पाहिजे तशी माहिती नाही.जायचं म्हणून जायचं.आम्ही खास ट्रेकर्स नव्हतो.

ठरलेल्या वेळेत आम्ही धोडप किल्ला सर करायला निघालो.

रविवारी हे चार जण मला सकाळी घ्यायला लवकर आले.

दर्शन कडे फोर व्हीलर होती.

खाणं, पाणी घेतलं होतं.  चार चाकीत बसुन नाशिक मधुन धोडप किल्ल्याच्या दिशेने निघालो होतो.

पाऊस नुकताच थांबला होता.थंडीने अजून तरी हातपाय पसरले नव्हते. सकाळी तेवढा गार वारा लागला होता.  सकाळी नाशिकहून जरा लवकरच निघालो होतो. सकाळी लवकर गेलो म्हणजे दुपारपर्यंत किल्ला फिरून खाली येण्याचा प्लॅनिंग होता. पिंपळगावच्या टोल नाक्या मागे गाडी आली आणि फूस्स आवाज आला. दर्शन गाडी चालवित होता." ईला याच वेळी पंचर व्हायचं होतं का? "मोठ्याने तो ओरडला. तसे आम्ही सारे खाली उतरलो. सकाळचे साडेआठ वाजले होते. स्टेफनी सोबत बरी होती. अर्णव आणि दर्शन ने स्टेफनी बदलली आणि पुन्हा आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. अर्ध्या तासात आम्ही वडाळी भोई ला पोहोचलो. धोडंबे रस्त्याने कन्हेरवाडी गावाला वळसा घालून पुढे हट्टी गावाच्या चाफ्याच्या पाड्यात आलो. तसं म्हणायच तर चाफ्याचा पाडा हेच किल्ल्याच्या पायथ्याला असलेलं गाव.दुपारचे बारा वाजले होते.एका झाडाखाली गाडी उभी केली. मारुती मंदिराच्या समोरच्या पारावर जूणीजाणती माणसं पत्ते कुटत बसली होती.मंदिराच्या बाजूला काही विरगळ अस्ताव्यस्त पडेल होती.त्याचं कुणाला काही माहिती नव्हती.त्या माणसांपैकी एकानं विचारलं, " कोण गावची मंडळी? किल्यावर चाल ने का? जरा संभाळून जावा, किल्यावर रान खूप माजला. तसा वाटा आहे. भ्याचं काही नाय. पण,आपला संभाळून जावा." अर्णव ने त्या बाबाला विचारले,"बाबा किल्ल्यावर जायला किती वेळ लागेल?" 

"तुम्ही काय तरणा गडी. एक तासात फिरून याल."

दुसरा म्हातारा बोलला, " थोडा झपाझपा चालला त लवकर याल नाही तर दोन तासही कमी पडत्या."

दोन्ही म्हातार्यांचं बोलणं ऐकून आम्ही पुढच्या वाटेला लागलो.

आमच्या सारखे भटके रोजच त्या किल्ल्यावर होते. रोज ते म्हातारे हेच सांगायचे. चाफ्याचा पाडा सोडून आम्ही बरेच चालत आलो होतो. उघड्यावर वीर मारुती आणि काही सतीशीळा नजरेत पडल्या. मारुतीरायाचं दर्शन घेतलं. हीच पाऊलवाट आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाईल असा विश्वास होता. पण, किल्ल्याच्या पायथ्याशी खूप गुरांच्या पडल्या होत्या. कधी कुठल्या वाटेने जावा हे कळत नव्हतं. मी रस्ता आठवू लागलो. माझ्या मागे बाकीचे होते. खाण्याचं आणि पाण्याच्या बाटल्या बॅगेत होत्या. आम्ही मोठ्या  हिमतीने किल्ला चढू लागलो. हिरवीगार झाडी, वाढलेले गवत एखाद्या अनामिक चित्रकाराने रंगवल्यासारखे चित्र भासत होते. पूर्वीच्या काळची प्रवेशद्वार, त्याला भक्कम असणाऱ्या पायऱ्या, बुरुज पाहून मन प्रसन्न होत होतं.कोरीव पाण्याची टाके, एका गुहेत असणारे गड देवतेचे मंदिर. पेशवे काळात याच गडावर माधवराव पेशव्यांनी रघुनाथ दादा पेशवे यांच मोडून काढलं होतं. त्या काळात धोडप चा तुरुंग म्हणून वापर केला जायचा. पहिल्या सुरत लूटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याची इतिहासात नोंद सापडते. पायथ्याशी असणारे मोठे गाव धोडंबे हे त्या काळची राजधानी होती. तसं ती ऐतिहासिक खाचही पाहीली.ती एक नैसर्गिक चमत्कार म्हणायची. आनंदाने गड भ्रमंती केली.सोबत आणलेलं जेवण संपवलं.परतीच्या प्रवासाला निघालो. बालेकिल्ल्याच्या पोटात काही तरी असेल या आशेने निशांत आणि अर्णव तीकडे जायला निघाले.मी त्यांना नाही म्हटले. आपल्याला खूप उशीर झाला. तर, दर्शन बोलला , " पून्हा पून्हा हा योग येत नाही मीत्रा... आलो तर बघून घेऊ." माझा नाईलाज झाला.मीही त्यांच्या मागे चालू लागलो. बालेकिल्ल्याच्या पोटाजवळ गेलो.पाहण्यासारखं काही नव्हतं. पून्हा वापस फिरलो.कारवीचं रान माजलं होतं.गडावर आम्हा चार पाच जणांव्यतीरीक्त कुणी नव्हतं.बालेकिल्ल्या पासून वापस फिरलो तेव्हा सूर्य मावळतीला झुकला होता.गवतात रस्ता दिसत नव्हता.सकाळी आलो ती वाट मिळत नव्हती. जिकडे वाट मिळेल तीकडे चालत होतो. आपण वाट भटकलो हे मला मनोमन वाटत होतं.पण, मी कुणाला काही बोललो नाही. एकमेकांच्या आधाराने चालत राहीलो. दर्शन बोलला, " आपण सकाळी आलो,ती वाट वाटत नाही. आपण वाट भटकलो वाटतो." अर्णव बोलला, " नाही रे बरोबर आहे." निशांत बोलला, " ही च वाट आहे, काही पण नको बोलू." दर्शन चा भाचा तेरा चौदा वर्षांचा होता.तो घाबरु लागला. मी त्याला म्हटले घाबरु नकोस..

आम्ही त्या जंगलात बराच वेळ भटकत होतो.सहा वाजून गेले होते.आता तर रस्ता बिलकुल कळत नव्हता. लवकर अंधार पडत होतं..कारण दिवाळी नंतर शाळू दिवस असतात.रातकिडे किरकिर करत होते.गडदेवतेच्या गुहेत रात्र काढावी तर गुहा वरती राहीली होती.काय करावं सुचत नव्हतं.मोबाईल शुटींग आणि गाणे ऐकण्यात डिस्चार्ज झाले होते.फक्त निशांत च्या मोबाईल ची बॅटरी शिल्लक होती तीही थोडी फार.पण त्या डोंगरात मोबाईल ला रेंज नव्हती. मागे दोन हजार तेवीस साली हरिश्चंद्र गडावर असेच पुण्याचे पर्यटक रस्ता भटकले होते.पाऊस, धुकं असल्याने त्यांना तीन दिवस कुठलीच मदत मिळाली नव्हती.त्यावेळी त्यांच्यातील एकाचा मृत्यू झाला तर एक अत्यवस्थ झाला होता.तेव्हा कुण्या येणाऱ्या पर्यटकांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा कुठे रेस्क्यू टिम ने त्यांना खाली आणलं. ही गोष्ट मला आठवली.काय करावं हे मला तर सुचत नव्हतं.आपलं असं होईल का? मी मनाला प्रश्न केला. मी स्वतः स्वतः ची समजूत काढत त्यांच्या मागे चालत होतो.भटकता भटकता वाट मिळाली त्या वाटेने समोर उजेड दिसत होता.उजेड आपल्या कडे येत आहे हे पाहून काळजात धस्स झालं.किल्ल्यावर बर्याच पर्यटकांचा या ना त्या कारणाने मृत्यू झाल्याच्या बातम्या पेपरात वाचल्या असल्याने भीतीने आम्ही पाचही जण घाबरून गेलो." आता आपण लूटले जाणार, आपलं काही खरं नाही." असं दर्शन बोलू लागला.मी धीर देत होतो. " नाही घाबरु नका, चालत रहा.आपल्याला  वाट मिळाली ना..!" 

सकाळपासून फिरत असल्याने शरीरा बरोबर मनाची ताकद संपली होती.खाण्यासाठी काही उरलं नव्हतं.चहुबाजूनं गवत माजलेलं असल्याने रात्री च्या वेळी रातकिड्यांची किरकिरी व्यतिरिक्त दुसरा कुठला आवाज कानावर येत नव्हता. मधुनच एखादं पाखरू आवाज करायचं.लांब दिसणारा उजेड जवळ आला होता.छातीत धडधड वाढली होती.मोठ्या चार्जिंग बॅटरीचा उजेड त्या जंगलात दुरवर पसरत होता. बॅटरी हातात असलेली व्यक्ती गप्पक्यान आमच्या समोर उभी राहिली. आम्ही घाबरलो. " कुठलं तुम्ही?"

मी पटकन बोललो, " नाशिक चे."

" इतक्या रातीला काय करत्या रानात? भ्या नाय वाटत."

" नाही आम्ही रस्ता चुकलो होतो."

मी उत्तर द्यायच्या पहिले त्याने प्रश्न केला. " किल्ल्यावर गेलते?"

" हो, किल्ल्यावर गेलो होतो." माझ्या बोलण्यानं तो बोलला, " बरा झाला, मला मिळल्या.चला माझ्या मागं मागं." त्या व्यक्तीच्या बोलण्यानं आम्ही त्याच्या कडे पाहत गप्प त्याच्या मागं चालू लागलो.रात्रीचे नऊ केव्हा वाजले कळले नाही. त्या व्यक्तीच्या आधाराने किल्ला उतरत होतो.मध्येच एखादा विचित्र आवाज यायचा. ती व्यक्ती म्हणायची," भेवु नका, म्या हाय तुमच्या साथीला काय बी येणार नाय.चालत राहायचा.  त्या व्यक्तीच्या आधाराने आम्ही किल्ला उतरुन चाफ्याच्या पाड्यात आलो.

सारे थकलो होतो.सगळेचे सगळे गाडीजवळ गेलो. दर्शनचा भाचा तर गाडीत जाऊन बसलाही होता.आम्ही त्या व्यक्तीचे आभार मानले.आम्ही पण गाडीत बसलो. पोटात भुकेच्या उंदरांनी थयथयाट सुरू केला होता.दर्शन गाडीला शेल मारीत होता पण, गाडी काही चालू होत नव्हती.धक्का मारुन पाहीला तरीही नाही. आधीच थकलो होतो त्यात गाडी चालु होईना‌.मोठ्या संकटात सापडलो.बरं त्या सुनसान ठिकाणी कुणी मॅक्यानीकही नव्हता.कारण डोंगरात दरीखोर्यात राहणारी ती माणसं. तीथं हे ज्ञान कुठलं असणार. दोन चार लोक भराभरा जमा झाले. " काय व्हयनं,मोटर चालू नाही व्हत का?"

त्यातला एक बोलला, " तुमले आता  कारागीर मिळणार नाय." दुसरा बोलला , " ये त्या रामा डोशाना परग्या हाय का पहाय तं.. त्यो व्हता गॅरेज मा धोडंब्याला." मध्येच कुणीतरी बोलला," नाय त्यो घरी नसल."  " आरं जाई तं पहाय." तो पळत गेला पण,तो घरी नव्हता. पून्हा एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. " त्या क्रिष्ण्याला बलव पाहु." त्याला आवाज देताच तोही पळत आला. पहाता पहाता लहान मोठ्यांची गर्दी झाली.बाया, माणसं ही गाडीभौती गराडा घालून उभी राहिली. क्रिष्णानी बोटं घालून पाहीले. त्याला जमले नाही.गाडी काही चालू होइना.काय करावा कळत नव्हतं.ज्या बाबाने आम्हाला किल्ल्यावरुन आणलं तो बाबा गाडीजवळ उभाच होता." गड्या भो,आजना रात राही जा, तांबड्यात एखादा कारागीर धोडांब्यातून आणू म्हणजे तुमनी गाडी तो रीपीयर करल मग तुम्ही जावा. अशा कुठं जाल? कशाबी रात काढी घ्या." आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो.

सारे लोक जावु नका असं म्हणत होते.आम्ही घरच्यांशी संपर्क करू शकत नव्हतो.मोबाईला रेंज नव्हती.

मोबाईल चार्ज करण्यासाठी त्या पाड्यावर लाईट नव्हती.

अखेर आम्ही रहाण्याचा निर्णय घेतला.आमच्याकडे कपडे नव्हते ना काही खायला.आम्ही मारुतीच्या मंदिरात रात्र काढण्याचं ठरवलं.

असंही आपण रात्री घरी एकदिडपर्यंत मोबाईल पहात जागतो. आजही तसंच समजून रात्र काढु असं आम्ही सगळ्यांनी ठरवून टाकलं. पण, किल्ल्यावरुन आम्हाला खाली आणणारी ती व्यक्ती तो बाबा मंदिरात आला.निशांत आणि दर्शनचा भाचा केव्हाच आडवा पडला होता.  " चला रं आमन्या घर, कव्हर बशी रहाशा.ह्या बारक्या पोराले भूक लागी व्हई.चला दोन दोन घास खावा.तुमले नाही पटनं तर मंदिरात येई झोपा."  आम्हाला खूप भूक लागली होती. कुठलेही आढेवेढे न घेता आम्ही त्या बाबाच्या मागे गेलो.

बाबाच घर म्हणजे एक झोपडी.एका बाजूला बकर्यांसाठी जागा केलेली तर एका बाजूला त्यांचा संसार. तेथेच करणं आणि खाणं.त्या आजीच्या मायेच्या घासा पुढं तुमचं फाईव्ह स्टार हाॅटेलचं पाचीपक्वानाचं जेवण थीटं. पोटात दोन घास पडताच आडवा पडलो. पण, झोप लागत नव्हती. पाय खुप दुखायचे. आजीनं गरम पाणी आणलं. " पोरावो शकी घ्या पाय दुखायचे राहुन जातील." ना ओळख होती ना कुठला नातेसंबंध. ती फक्त होती माणूसकी. गरम पाण्यात पाय शेकल्यावर थोडं बरं वाटलं. 

दर्शनने गाडीचा विचार केला नाही. सारे घरच्या सारखे झोपी गेलो. तांबडं फुटताच बाबानं बाजूला राहाणार्या नाताला उठवलं." उठ रं त्या धोडंब्याला जाय. अन् कोणी कारागीर घीई ये, त्या लोकासनी गाडी बंद पडणी. " कुठलेही आढेवेढे न घेता तो उठला. एवढ्या पहाटे तो पळत धोडांब्याला गेला. सतरा अठरा वर्षांचा मुलगा. आम्ही थकलेलो असल्याने सकाळी निवांत उठलो. चेहऱ्यावर कुठली चिंता, भीती नाही. त्या रात्री आमची कुणी चौकशी केली नाही. सकाळी मात्र आम्हाला पाहील्यावर येणारा जाणारा विचारु लागला. कोण पाव्हणं? 

कुठलं? आम्हाला ज्यांनी रात्री गडावरुन खाली आणलं, रात्री सहारा दिला ते धोंड्यादादा आणि कोंड्याआई. तसा धोंड्यादादा नेहमी लोकांना मदत करायचा. पासष्टी कडे झुकलेला हा गृहस्थ.उंच , धिप्पाड, पिळदार मिशा. समोर आला तर, एखाद्या पहाडा सारखा वाटायचा. गडावर गेलेल्या माणसांवर त्याचं लक्ष असायचं.खूप वेळ झाला म्हणजे ते वाट चूकले असं  समजून तो बॅटरी हातात घेऊन त्यांना सुखरूप पाड्यावर घेऊन येत असे.कुठलं साधन नसेल तर रात्र भर आपल्या झोपडीत खाऊ घालून मुक्कामी ठेवायचा.दुसर्या सकाळी त्यांना तो पाठवीत असे.ट्रेकर्सवाल्यांच ते हक्काचं ठिकाण झालं होतं.

कोंड्याआई तशीच होती.रात्री आमच्या विषयी बरीच कुजबुज झाली.ज्यांना माहिती नाही असे सकाळी कोंड्याआईला विचारीत होते.वाघदेवाच्या मंदिराच्या मागे राहाणारी फशी धोंड्याआईला विचारु लागली , " कोण ऊनेल वं धोंड्याआई,संज्या ना बाहास बोलना,तुना घर कोणी पाव्हणा वना ?"

" हा वं पाव्हणं ऊनेल शेरातला हाय."

धोंड्याआईचं उत्तर ऐकलं तरी फशी  झोपडीत डोकवु लागली.

" अवं ये फशे त्याबी माणसांचं हाय नवं. काय न्याहाळी रायनी."

" काय नाय वं, पाही रायनू कितला हाय." 

" का वं चहा पेवाले घी जाती का?" 

धोंड्याआई अशी बोलल्यावर फशी बोलली, " अशी कशी बाय बोलस तु , घी जासु न काय." 

धोंड्याआई हसायला लागली. 

" फशे, बुकटी हाय वं थोडी..?" 

" नाय गडे, धोंड्याआई. कालदिस सरणी.कोणी गेला बी नाय त्या दूकानात.जाईल धोडंब्यात तवा." 

फशी नाही म्हटल्यावर धोंड्याआई सकाळी सकाळी याच्या त्याच्या कडे चहा पावडर मागु लागली. अखेर एका घरी तीला ती मिळाली. घरात असलेला गुळ जो कधीतरी एखाद्या सणाला आणला होता तो राहीलेला तीने वापरला. 

आपल्या सुनेला मोठ्याने आवाज दिला, " ये तारे बकरी पावय नवं वढं, दुध थोडा काढ." 

" नाय वं आत्या, बकरु पिऊन गेला. "   " अवं थोडा लक्ष ठिवायचा ना. "

ताराला बोलल्यावर धोंड्याआई विचार करु लागली." आता काय करवा? शेरातले ह्या लोक काळा चहा कसा देवाना ? "

अशी स्वतः बडबड करीत राहीली. पून्हा एकदा ताराला बोलली," पहाय वं कोणाचा जनेल बकरी, थोडा बी मिळला तं गंज  झाला. धवळा दिसला पायजे. " धोंड्याआईची धावपळ चहासाठी चालली हे आम्ही समजलो होतो. सकाळचे आठ वाजले. धोडंब्याला गेलेला धोंड्यादादाचा नातु अजून काही आला नव्हता. चाफ्याच्या पाड्या पासून धोडांबे गाव दहा बारा किलोमीटर होते. जाण्याला एक तास लागणार होता. बरं लवकर गेला असेल तर, गॅरेज एवढ्या सकाळी कोण खोलणार?

पण, धोंड्यादादा सारखा चकरा रस्त्यावर मारीत होता. त्याची नजर ही रस्त्याला खिळली होती. 

पाड्यावर ची सारी मंडळी गाडी भौती जमा झाली होती. दिवाळी नंतर ची शेतीच्या कामांची ती लगबग. कुणाची भाताची सोंगणी, कुणाची गहू, हरभर्याची पेरणी. ओहळाच्या खेटुन ज्याची शेती तोच गहू करायचा. बाकी शेती पावसावर आधारित. निसर्गानं भरभरून दान त्या पाड्याच्या झोळीत टाकलं तरी प्रगती शुन्य होती. दुधासाठी तारा बकरी शोधीत होती तर कोंड्याआईची दुधाच्या चहासाठी तगमग चालू होती.आम्ही केव्हाच उठून बसलो होतो. तोंडावर पाणी मारुन निघण्याची तयारी केली. पण कोंड्याआईची चहासाठी झालेली तळमळ पाहवत नव्हती. 

" आमना कशा, आठोडा ना बजार, गेला गेला नाय गेला चाली जास. जर गेलाच तर, त्याल मीठ घ्यावाना. बाकी घीदा नही घीदा चाली जास." आमच्या कडे पाहून कोंड्याआई बोलत होती. शहरातले लोक कसे दिसतात, कसे असतात म्हणून लहान मुलांना आम्हाला पाहाण्याची मोठी उत्सुकता लागली होती. ते आम्हाला सारखे डोकावून पाहात होते. " हायी पोराबी मधी मधी गोंडा घोळत रायनी.त्या बी माणसा हाय ना..! 

शिंगा दिसत्या का त्याहीला. जा पळा वढं."  कोंड्याआईच्या ओरडण्याने पोरं वाकडे तिकडे तोंड करून पळाले.

" नाय म्हतारे, बकरी कोन बी जनेल." तारा फिरुन आली आणि कोंबड्या आईला बोलली. 

तेवढ्यात एक सात आठ वर्षांचा मुलगा हातात ग्लास घेऊन आला,  " पळ, पळ मिळला कारं थोडा दुध? बरा झाला." कोंड्याआई मोठ्या नं बोलली. त्याच्या हातातून ग्लास घेतल्यावर कोंड्याआईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मोठ्या प्रेमाने तीनं दुधाचा चहा पाजला. जणू त्या दुधासोबत मायेचा गोडवा मिसळला होता. धोडंब्याहून कारागीर आला होता. आम्ही सगळे गाडीजवळ होतो. कारागीर काय झालं ते चेक करीत होता. कारागीर आल्यावर धोंड्यादादा आता घरी आला. 

आम्हाला नाशिक ला येण्याची आता घाई झाली होती. धोंड्यादादा घरी आल्यावर कोंबड्या आईनं कोंबडा धरायला लावला. कोंबडा मारण्याचा त्यांचा बेत ठरला होता. कोंड्याआई धोंड्यादादाला बोलली, " धरा ना वं त्या कोंबडा, कापी टाका. खाई जाती त्या."

धोंड्यादादा कोंबड्या मागं पळू लागला. पण, त्याला दम लागला होता. त्याच्याकडून पळलं जात नव्हतं. तेवढ्यात बज्या दिसला.

" बज्या पळ रं,धर त्या कोंबडा." 

कोंड्याआई बोलताच तो कोंबड्या मागं पळू लागला. " दमव थोडा त्येला." कोंबडा झाडावर चढून गेला. " नाय वं त्या झाडावर गेला कसा धरू?" 

बज्याही थकला होता.

धोंड्यादादाकडे पाहून कोंड्याआई बोलली, " तुमी काय बाबा, तुमी धरा ना . त्या परघ्याच्या हाती लागल का त्या. कोंबडा..?" 

कोंबडा न मिळाल्याने तो बेत रद्द झाला असावा. आमची गाडी दुरुस्त झाली होती. आम्ही आमच्या बॅगा घ्यायला धोंड्यादादाच्या घरी आलो. " गड्या भो आजना रोज राही जा. काही रातले खाया मिळला नाही." कोंड्याआई मोठ्या उत्साहाने आम्हाला बोलली. 

" नको आई तुम्ही आमच्या साठी जे केलं ते भरपूर झालं. पून्हा कधी तरी येऊ." असं मी म्हणत त्यांचा निरोप घेतला. 

" कोण पाव्हणं उनेल वं ?" असं पाड्यावरची प्रत्येक बाई कोंड्याआईला विचारायची. ती प्रत्येकीला एकच उत्तर द्यायची. 

" शेरातले नवं त्या, मोटरगाडी बंद पडणी म्हणून राहीनात. असा बराच चुकारेल येतसं." 

आम्ही गाडीत बसलो. सगळा पाडा आमच्या भौती जमा झाला. 

सकाळची कामाची घाई त्यांची त्या दिवशी मंदावली होती. गाडी सुरू झाली. सगळ्यांना हात करीत निरोप घेतला. 

कोण ते? कसलं त्यांच्यात आणि आमच्यात नातं? रात्री वाट चुकलेल्या गड फिरणाऱ्या भटक्यांना सुखरूप वाट दाखवणारा धोंड्यादादा. 

कोंड्याआईची दुधाच्या चहासाठी चाललेली धडपड. तो गुळाचा चहा. गाडीसाठी पाड्यावरच्या लोकांची उठाठेव. पहाटे कारागीर आणण्यासाठी गेलेला धोंड्यादादाचा नातु. हे सारं गाडीत बसल्यावर नजरेसमोर येत होतं. खरंच ममतेने भरलेली ही माणसं. पैशाच्या तराजूत कधीच तोलली जाणार नव्हती. कुणाच्याही मदतीला धावणारी ही माणसं. शहरातील माणूसकी चा ओलावा संपत चाललेली मतलबी माणसं आणि खेड्यात राहणारी साधी भोळी माणसं

ज्यांच्या नसानसात माणूसकी भरली आहे. 

कुठल्या नात्याची, कुठल्या संबंधाची. पण त्यांनी दिलेल्या प्रेमापुढे आज सारं कमी पडलं होतं........ 

_ विक्रम गांगुर्डे, दुधखेड , नाशिक

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...