शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

    


 मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. जगातली अशी कोणतीच गोष्ट नाही की मनुष्याने करून दाखवली नाही. माणसाने सर्व गोष्टीवर आपल्या तल्लख बुद्धीने जगावर विजय मिळविला आहे. आजचे युग म्हणजे धावपळीचे युग. या धावपळीच्या युगात प्रत्येकाला पुढे जायचे आहे. पण पुढे जाण्याच्या शर्यतीत मात्र माणसाला स्वतःचे भान उरले नाही. इतका गर्क झाला आहे मानव. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे'. साने गुरुजींनी मानवी प्रेमाबद्दल सांगताना म्हणतात. प्रेम काय आहे? त्याची किंमत काय आहे? माणसाला याचा पुरेपूर विसर पडला आहे. एकमेकांमधला सुसंवाद काळाच्या ओघाने हरवत चालला आहे आणि बहूतांशी हरवला आहेच. 

     परिणामी माणसे एकमेकांपासून दूर झाली आहेत. आणि भावना व्यक्त होत नसल्यामुळे तणावाचे वातावरण वाढत आहे. या गर्कतेतून तसेच निर्माण झालेल्या किचकट समस्येतून बाहेर निघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे आई-वडील, बहिण-भाऊ, कुटुंब, मित्र परिवार, जवळचे स्नेही, आप्तेष्ट, शेजार धर्म आणि प्राणी मात्र हीच खरी प्रेमाची परिभाषा होय. साने गुरुजी "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" या त्यांच्या प्रार्थनेतून समस्त जगाला व मानव जातीला हे सांगत आहेत की, माणसाने आपली मर्यादा न सोडता मर्यादेत राहून इतरांसाठी प्राणीमात्र, गोरगरीब गरजू, अंध, अपंग अशांना सुखः, समाधान, आधार, आनंद देऊन त्यांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे हसू आणावे.

     तीच खरी माणुसकी व तोच खरा माणुसकीचा धर्म व खरे प्रेम होय. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात गर्क आहे. मात्र, एक सेकंद जरी वेळ प्राणीमात्रांना, गरजूंना दिला तरी प्रेमाची खरी आणि निर्मळ परिभाषा पूर्ण होते. एखाद्याच्या आधाराची आपण काठी बनावी, एखाद्या गरिबाची भूक भागवून त्याचे पोट भरावे त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे, आनंदाचे हसू फुलवावे, एखाद्याला कामात मदत करुन त्याच्या जड कामाचे ओझे हलके करावे. ही जी लहान लहान प्रयत्न वा गोष्टी आहेत. याच गोष्टी माणूस किंवा माणुसकीचे उदाहरण क्षणोक्षणी ज्वलंतपणे देत असतात. माणुसकी धर्म जपता आला कि मग, समाजात, जगात वाद, धर्मांधता, कर्मकांड जन्म घेणारच नाहीत. ईश्वराने एकच धर्म बनवला तो म्हणजे फक्त माणुसकी धर्म. याहून इतर कोणताच धर्म मोठा नाही वा श्रेष्ठ नाही. 

     खरी मानवी मुल्ये यातून स्पष्ट होत असतात. मानवी मूल्यांचा साक्षात्कार यातूनच घडत असतो. म्हणून धावपळीच्या जगात सुद्धा प्रत्येकाने मानवी मूल्य जपावी वा जोपासावीत. मनापासून मानवी मूल्य जपता आली की मग जगाची सुंदरता अनुभवायला वेळ लागत नाही. प्रेम या शब्दाचा अर्थ फक्त प्रेम शब्दापुरताच मर्यादित नसून तो मानवी कृती दडला आहे. 


प्रेम म्हणजे मदतीचा हात  

प्रेम म्हणजे आधार 

प्रेम म्हणजे एकमेकांच्या सुखः दुःखातला सहभाग 

प्रेम म्हणजे संकट काळातली साथ 

प्रेम म्हणजे आपलेपणाची जाणीव 

प्रेम म्हणजे आत्मीयतेने जपता येणारा माणुसकी धर्म.

     साने गुरुजींची प्रार्थना ही फक्त ओळ नसून प्रार्थनेतील अतिव्यापक विचारधारा आहे. आणि हीच विचारधारा प्रत्येक जण आपल्या आत असलेल्या माणुसकीत रुजवली, रोवली की सुंदर प्रेमळ देश, सुंदर प्रांत, सुंदर प्रेमळ समाजाची निर्मिती होते. शांततेच्या दिशेने वाटचाल करणारे जग निर्माण होऊ शकते. म्हणूनच, आज धावपळीच्या युगात प्रत्येकाने "जगाला प्रेम अर्पावे" ही प्रार्थना मनात रुजवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच प्रेमळ जग, प्रेमळ राष्ट्र तसेच सुंदर जगाचे चित्र दिसेल. जगाला प्रेम अर्पण करणे हाच खरा माणूसकिचा धर्म होय. 





सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

९९६००२८८९९ देगलूर. जि. नांदेड.

आज पालक आणि विद्यार्थी मरण हेच सरकारी धोरण.


आज देशात पेपर फुटी, परीक्षा रद्द, नवीन परीक्षा, ,वसतिगृह समस्या, शाळा फी समस्या, क्लास समस्या, विद्यापीठ समस्या, कोणतं विद्यापीठ,खाजगी कि सरकारी,कोणतं कॉलेज ,कोणती चांगली, कोणतं वाईट कुठं काय शिक्षण करायचं,शिक्षणात असलेला गोंधळ मुळे मुलं त्या साठी रास्ता रोको तर कुठं हक्क मिळवण्या करता विद्यार्थी आंदोलन करताय.तसेच पाटी दप्तर, बॅग,मोबाईल, लॅपटॉप , टॅब.असा शैक्षणिक खर्च ते शाळेची फी, ट्युशन फी, शाळा प्रवेश फी, प्रवेश मिळतं नाही म्हणून वर अजून डबल फी, अश्या अंनत समस्या म्हणजे शिक्षण झालंय. पोरगं जन्माला आलं तेव्हा पासून 'ते पोरगं लग्न करतो तो पर्यंत समस्या मग ते मुलगा असो वा मुलगी समस्या आहेत. काही जण तर अशी बघितलेत कि पोरं पैदा करायच्या अगोदर हया समस्या चा विचार करतं असतात कि काय?जन्माला घालायचं कि नाही. जन्माला घातलंच तर कुठं शिक्षण करायचं काय शिकवायचं काय बनवायचं असंच विचार करता करता मुलं जन्माला घालणं विसरून जातात कि काय कधी असं वाटतं. पिढी बद्धलतेय काळ बदलतोय. आता विद्यार्थी पालक,तरुण पिढीतील समस्या बदल बदलतांना दिसताय.नवं तरुणाईतली मुलं जलद विचार जलद मार्ग काढतं, जलद स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण घेतं असतांना दिसते. शिक्षण घेतं असतांना पालक समस्या ग्रस्त असतो तसंच विध्यार्थी सुद्धा दिसतो. दोघे काय करावं कसं मार्ग काढावा कसं जगावं त्रस्त दिसते. खरं तर सरकार ने शिक्षण मोफत केलं असतं. जनतेला तर हया समस्या उद्भवल्या नसत्या.काही प्रमाणात दिसल्या असत्या पण कमी असत्या असं वाटतं. मुलं जन्माला आली तेव्हा पासून मुलं अन पालक चिंता ग्रस्त दिसतात. शिक्षण वारे देशात समस्या अंनत घेऊन आल्या असंच वाटतं. हे सर्व अन सर्व गेल्या पंचवीस तीस वर्ष्या पासून चे नेते पुढारी जे सरकार चालवतात ते त्यांच्या मुळेच शिक्षण त्यांनी महाग केलं शिक्षण पैसा कमवण्या साधन बनवलं ह्या लोकांनी पुढार्यांनी असं झालंय. शिक्षण मोफत असतं कुठलं पण असो तर हया समस्या कमी असत्या पण यांनी सरकारी शाळा बुडवल्यात अन स्वतः शिक्षण उधोग सुरु केला.

भारतातील  शिक्षण क्षेत्र  नासले आहे किंवा नासवले गेले आहे, याचे दुर्दैवी चित्र सध्या दिसतं. शिक्षण क्षेत्राचा बाजार मांडणाऱ्या पेपरफुटीने सरकार,मंत्री खाजगी क्लास,यांचे अत्यंत घाणेरडे रूप जनतेला कसं लुटायचं ते चित्र दिसतंय.   नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार.देशातील शालेय शिक्षणाचे जे वस्तुनिष्ठ चित्र मांडले आहे ते अत्यंत भेसूर आहे. देशातील शाळांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे आणि शाळेत प्रवेश घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना अर्ध्यातच शिक्षण सोडावे लागते. सरकारकडे असलेल्या नोंदीनुसार देशातील प्रत्येक दहा विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार विद्यार्थी बारावीपर्यंत जातच नाहीत. म्हणजेच बारावीपूर्वीच या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटते. दहापैकी चार म्हणजे विद्यार्थ्यांच्या गळतीचे हे प्रमाण तब्बल ४० टक्के इतके आहे. देशात एक लाखाहून अधिक शाळा 'एकशिक्षकी' आहेत. म्हणजे एकाच शिक्षकाने अख्खी प्राथमिक शाळा चालवायची. पहिलीपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सगळे विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक ! शिक्षणाची याहून क्रूर चेष्टा ती काय असू शकते? हे झाले शिक्षकांचे. शिवाय विद्यार्थी संख्येची स्थिती देखील अजबच. देशात काही शाळा अशा आहेत ज्यामध्ये एकही विद्यार्थी नाही. म्हणजे विद्यार्थ्यां शिवाय

केवळ एक शिक्षक असलेल्या

शाळांची संख्या आठ हजारांच्या घरात आहे. गेल्या काही वर्ष्यात देशातील लाखावर शाळा बंद पडल्या. कमी पटसंख्येमुळे शाळांचे विलीनीकरण किंवा पुनर्गठन हे एक कारण असले तरी वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत देशातील शाळांची संख्या वाढण्याऐवजी  लाखाने कमी व्हावी हे नक्कीच चांगले लक्षण नाही.  शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत टिकवून ठेवण्यात देशातील शिक्षण व्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे. प्राथमिक शाळेतील प्रवेशाचे प्रमाण ९०.९ टक्के इतके असताना उच्च माध्यमिक स्तरावर म्हणजे बारावीच्या वर्गापर्यंत पोहोचण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे हे प्रमाण जेमतेम ५८.४ टक्के इतके खाली घसरले. म्हणजेच प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेणारे ४० टक्के विद्यार्थी बारावीपूर्वी शिक्षण सोडून देतात. कारणे काहीही असोत.देशातील गरिबी आणि शिक्षणावरील वाढता खर्च हे याचे मुख्य कारण. प्राथमिक शिक्षणाच्या तुलनेत उच्च माध्यमिकचा खर्च पाच पटीने अधिक आहे. शिवाय वाढत जाणारे शैक्षणिक शूल्क, परीक्षा शुल्क आणि प्रवास व इतर खर्च यांचा बोजा पालक सहन करू शकत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्ध्यातच खुंटते हे वास्तव समोर दिसत असताना सरकारचे शिक्षण खाते विद्यार्थ्यांची ही गळती रोखण्यासाठी काही करतांना दिसतं नाही. शालेय शिक्षणाचा अहवाल  धक्कादायक आहे.  लोकसंख्या वाढते आहे आणि दुसरीकडे शाळा मात्र धडाधड बंद होत आहेत. प्राथमिक शाळेत येणारे दहापैकी चार विद्यार्थी बारावीपर्यंत पोहोचतच नाहीत आणि पोहचलीच तर शाळेत शिकतं नाहीत नुसतीच ऍडमिशन घेतात अन खाजगी क्लास ला शिक्षण जातात. "शाळा ओस अन क्लास भरघोस." क्लास का चालतात तर 10 वी नंन्तर कॉलेज शिक्षण ला पुढील इंजिनियर.डॉ. ई. होण्यासाठी  कॉलेज शिक्षण ला किंमत नाही. सरकार घेतं असलेल्या परीक्षा पास झाला तर ऍडमिशन हि कुठली व्यवस्था सरकार ने केली तेच समजतं नाही. म्हणून मुलं अकरावी बारावी शाळेत जातंच नाहीत. जाऊन उपयोग पण नाही कारण तेथील मिळालेल्या मार्क यांना किंमत नाही पुढील ऍडमिशन ला. खरं तर ह्याच मार्क वर पुढील शिक्षण व्हायला पाहिजे पण तसं झालं तर हया परीक्षा नाही तर खायला कसं मिळणार सरकार ला असंच दिसतं. शाळा बाह्य परीक्षेला किंमत शाळेला नाही असंच दिसतं. म्हणून तर जेई, नीट, सीईटी, अश्या  परीक्षा अन पेपर फुटी हे समीकरण दिसतं.सोबत नोकरी लागण्याच्या परीक्षा सुद्धा.  पेपर काढायचा अन काढनाऱ्यानेचं पैसे घेऊन पेपर लीक करायचा. नुसता बाजार मांडला असंच आहे.  मुलं  आत्महत्या करतात तर कुठं मुलं डिप्रेशन ला जातात. असं म्हटलं जातं शिक्षण केल्यानं  शांत, संयमी मुलं घडतात. बुद्धिमत्ता वाढते. आपल्या देशात उलट दिसतं शिक्षण ने आत्महत्या अन डिप्रेशन मुलांना दिले हि कुठली शिक्षण व्यवस्था. पालकांना वाटतं मुलाने खूप हुशार झालं पाहिजे. मुलांना वाटतं आपण खूप मोठं झालं पाहिजे.त्या साठी  खूप अभ्यास केला पाहिजे. नुसता अभ्यास एक अभ्यास करतांना काही मुलं दिसतात. मुलास कधी कमी मार्क पडलेत तर  पालक दुखावतात. मी बघितलंय एक मुलगी अभ्यासात खूप हुशार होती. खूप चांगले मार्क मिळवायची.पण कधी तिने   95% मिळाले तर 5%का कमी पडलेत म्हणून पालक चिडायचे ओरडायचे . कधी 97 % मिळाले तर 3% टक्के का कमी पडलेत म्हणून ओरडायचेत. 97 % चा आनंद मानायचं सोडुन 3% का कमी पडलेत याच्यावर चिडचिड करणं कमी मार्क मिळाल्याचे दुःख करणं.  मूर्ख पालक असता काही जे मिळालेत त्यात आनंदी नाही तर जे नाही त्याचं दुःख. विचित्र पणा सगळा नाहीतर काय? आपली मुलगी हुशार याचं कौतुक नाही तर दोन चार,मार्क कमी ते दुःख. शेवटी त्या मुलीनं मानसिक डिप्रेशन मध्ये जात आत्महत्या हा मार्ग अवलंबुन टाकला.काय मिळवलं त्या पालकांनी. अत्यन्त अनाकलनीय एकीकडे  असं दृश्य तर दुसरीकडे अत्यन्त महागडे शिक्षण. विदारक परिस्थिती दिसते. बालवाडी पासून पैसा पुरवताना" जनता त्रस्त अन शाळा चालक मस्त " खाजगी शाळा दुकानांचा सुळसुळाट. अन  सरकारी शाळा शुकशुकाट असे हाल. सरकारी अनास्था का तर शाळेची घासरलेली स्थिती. गुरुजी चांगले तेथे विध्यार्थी नाहीत कुठं विध्यार्थी तिथं शिक्षक शिकवतं नाही. फुकट पगार घेणारे शिक्षक असं सरकारी स्थिती. तर दुसरीकडे जनतेला लुटणारी खाजगी शाळा दुकानं होय जनता लुटायची दुकाना सारखीच खिसा भरण्यासाठीचा उधोग म्हणजे शाळा, कॉलेज, खाजगी विद्यापीठ, खाजगी इंजिनियरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, अश्या सर्व.खाजगी दवाखाना तसं खाजगी मेडिकल कॉलेज. विध्यार्थी पालक लुटण्याचं ते सर्वात महागडे ठिकाण. शिक्षण सोबत महाग असेल तर दवाखाना. दवाखाना महाग म्हणून डॉ होणं महाग. डॉ. इंजिनियर सारख्या विविध क्षेत्रात  शिक्षण घेणं म्हणजे सामान्य माणसाने सारं विकून मुलाचं शिक्षण करणं किंवा श्रीमंत मुलांनी करोडो रुपये खर्च करून डॉ. इंजिनियर होणं. ज्यांनी करोड टाकलेत ते का तर अब्ज कमवण्या साठी असंच दिसतं. खर्च करा अन कमवा भले लोकं मरोत असंच सारं विदारक चित्र दिसतं. अरे "शिक्षण मोफत दया उपचार मोफत करा" "जनता सुखी  तुम्ही पण सुखी राहा". पण नाही." मुलांचं अन पालकांचे रक्त पिणारे रक्त पिपासू" खाजगी सर्व नाही पण सारी शिक्षण संस्था, खाजगी क्लास  अन सरकारी यंत्रणा दिसताय. असो लिहायला खूप आहे बरेच मुद्धे राहुन गेलेत तूर्तास इतकंच लेख मर्यादा म्हणून संपवतो.सरकार ने बोध घेतं सरकारी शाळा बळकट करण्या कडे लक्ष दिलं पाहिजे. समस्या कमी कश्या होतील ते बघितलं तर बरं होईल.


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो.9922239055

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

महाराष्ट्राची शान: फेटा - दिपक सालोमन शिरसाठ



​"कपाळी चंदनाचा टिळा अन् डोक्यावर मानाचा फेटा,

रांगड्या या महाराष्ट्राची न्‍यारीच आहे ढब अन् ऐट मोठी!"

​भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे दर बारा कोसांवर भाषा बदलते, संस्कृती बदलते आणि त्यासोबतच लोकांचा पेहरावही बदलतो. पंजाबमध्ये शीख बांधवांच्या अस्मितेचे प्रतीक असलेली 'पगडी' किंवा 'दस्तर' असो, राजस्थानचा रंगीबेरंगी साफा असो, म्हैसूरचा भरजरी पेठा असो, वा आसाम आणि दक्षिण भारतातील पारंपरिक शिरोभूषणे असोत – प्रत्येक प्रांताने आपल्या डोक्यावरील वस्त्राला एक वेगळे आणि मानाचे स्थान दिले आहे. शरीराच्या सर्व अवयवांमध्ये 'मस्तक' हे सर्वोच्च आणि श्रेष्ठ मानले जाते, म्हणूनच या मस्तकाचे रक्षण करणारे आणि त्याला शोभा देणारे शिरोभूषण हे केवळ फॅशन नसून त्या संस्कृतीचे मस्तक असते. या संपूर्ण भारताच्या पटलावर जेव्हा आपण 'महान अशा राष्ट्राकडे' म्हणजेच आपल्या महाराष्ट्राकडे पाहतो, तेव्हा इथल्या मातीचा कण अन् कण ज्या एका वस्त्राने अधिक देखणा आणि रुबाबदार होतो, ते वस्त्र म्हणजे – 'फेटा'.

​फेटा घालण्याची परंपरा महाराष्ट्रात आजची नाही, तर तिला शतकांचा इतिहास लाभला आहे. वैदिक काळापासून ते पारतंत्र्याच्या कालखंडापर्यंत मस्तकावर पागोटे किंवा शिरस्त्राण घालण्याची प्रथा भारतात होती. परंतु, महाराष्ट्राच्या मातीत फेट्याला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त झाले ते शिवशाही आणि पेशवाईच्या काळात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांचा फेटा किंवा पागोटे हे केवळ संरक्षणाचे साधन नव्हते, तर ती गनिमी काव्याची आणि युद्धाची ढालही होती. युद्धाच्या वेळी डोक्याला दुखापत होऊ नये म्हणून फेट्याचे वेढे विशिष्ट पद्धतीने घातले जायचे. शिवकाळात फेट्याला 'पागोटे' म्हटले जाई. पुढे पेशवाईच्या काळात या पागोट्याचे रूप अधिक सुबक, राजेशाही आणि देखणे झाले. 'पुणेरी पगडी'चा उदय याच काळात झाला. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा जोतीराव फुले यांच्यासारख्या महापुरुषांनी फेटा आणि पगडीला समाजकारणाचे आणि राष्ट्रवादाचे माध्यम बनवले. आपले आजोबा, पणजोबा आणि त्यांच्याही आधीच्या पिढ्या फेट्याशिवाय घराबाहेर पडत नसत. त्या काळात घरातून अनवाणी निघणे चालत असे, पण उघड्या डोक्याने बाहेर पडणे हा अपशकुन किंवा आदराच्या विरोधात मानला जाई.

​महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर फेटा हा तिथल्या सामाजिक रचनेचा एक अविभाज्य भाग आहे. गावातील 'पाटील', कारभारी किंवा ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा पांढराशुभ्र धोतर-कुर्ता, खांद्यावर घोंगडी आणि डोक्यावर तांबडा किंवा पांढरा फेटा बांधून चावडीवर किंवा ग्रामपंचायतीत येत, तेव्हा त्यांचा तो रुबाब पाहूनच समोरच्या व्यक्तीचा आदर द्विगुणित होत असे. ग्रामीण भागात फेटा हा केवळ वयाचे प्रतीक नाही, तर तो अधिकाराचा आणि वजनाचा म्हणजेच वचकाचा दर्शक आहे. गावातील भांडण-तंटे सोडवताना, न्यायनिवाडा करताना फेटा बांधलेली ज्येष्ठ माणसे जी शिस्त आणि आदर निर्माण करायची, ती आजच्या आधुनिक पोशाखात कुठेही पाहायला मिळत नाही. फेट्याचा तो जरब आणि त्याची ती विशिष्ट ठेवण समोरच्याला शांत राहण्यास आणि आदराने बोलण्यास भाग पाडत असे.

​आपण अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये पाहतो—विशेषतः कौटुंबिक आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांमध्ये—जेव्हा एखादा गरीब शेतकरी किंवा मुलीचा वडील सावकाराच्या किंवा मुलाच्या वडिलांच्या (व्याही) पाया पडतो, तेव्हा तो आपल्या डोक्यावरील फेटा किंवा पगडी काढून समोरील व्यक्तीच्या चरणांवर ठेवतो. हा प्रसंग पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यात नकळत पाणी येते. याचे कारण काय? कारण फेटा म्हणजे निव्वळ पाच-सहा मीटरचे कापड नाही; तो त्या माणसाचा 'आत्मसन्मान' आहे, त्याची पत आहे, त्याची समाजातली इज्जत आहे. जेव्हा एखादा पुरुष आपला फेटा दुसऱ्याच्या चरणावर ठेवतो, तेव्हा तो स्वतःचे मस्तक, स्वतःचा अहंकार आणि स्वतःची अब्रू समोरच्याच्या स्वाधीन करत असतो. नवरी मुलीलाही आपल्या वडिलांच्या डोक्यावरचा फेटा हा त्यांचा स्वाभिमान वाटतो. म्हणून, जर तो फेटा कोणासमोर झुकला, तर तो संपूर्ण कुटुंबाचा आणि त्या मुलीच्या अस्तित्वाचा अपमान समजला जातो. चित्रपटांमधील हे चित्रण वास्तववादी समाजाचेच प्रतिबिंब आहे, ज्यावरून फेट्याचे मूल्य किती अथांग आहे हे सिद्ध होते.

​महाराष्ट्रात प्रांतानुसार फेट्यांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकार त्या त्या भागाची वेगळी ओळख सांगतो. यामध्ये अत्यंत शिस्तबद्ध, सुबक आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जाणारा 'पुणेरी फेटा' आहे; तर दुसरीकडे अत्यंत रुबाबदार, मोठा आणि धारदार तोऱ्याचा 'कोल्हापुरी फेटा' आहे, जो बांधलेला माणूस दुरूनही वेगळा उठून दिसतो. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची आठवण करून देणारा, युद्धासाठी आणि कष्टासाठी सोयीचा असलेला पारंपरिक 'मावळी फेटा' जसा प्रसिद्ध आहे, तसाच विदर्भातील लग्नसमारंभात प्रामुख्याने वापरला जाणारा आणि वैशिष्ट्यपूर्ण जरीची किनार असलेला 'नागपुरी किंवा वऱ्हाडी फेटा' देखील आपले वेगळेपण टिकवून आहे.

​या फेट्यांच्या विविध प्रकारांइतकेच त्यांच्या रंगांचेही मोठे महत्त्व आणि समाजात एक वेगळीच वचक आहे. फेट्यांचा प्रत्येक रंग हा मानवी भावना आणि सामाजिक प्रसंगांचे प्रतिनिधित्व करतो. उदाहरणार्थ, शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेला 'केशरी किंवा भगवा फेटा' शिवजयंती, महाराष्ट्र दिन किंवा राष्ट्रीय-धार्मिक उत्सवांमध्ये संपूर्ण आसमंत उजळून टाकतो आणि मराठी अस्मिता जागी करतो. याउलट, शांतता, शुद्धता आणि प्रगल्भ अनुभवाचे प्रतीक असलेला 'पांढरा फेटा' हा ज्येष्ठ व्यक्ती, राजकीय नेते किंवा सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयमी व्यक्तिमत्त्वाला शोभा देतो. लग्नसमारंभ आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून 'हळदी किंवा पिवळ्या रंगाचा फेटा' वापरला जातो, जो शुभकार्यातील आनंद द्विगुणित करतो. तर लग्नकार्यात वऱ्हाडी मंडळींच्या उत्साहाला आणि आनंदाला उधाण आणण्यासाठी 'गुलाबी किंवा लाल रंगाचा फेटा' परिधान केला जातो. हे सर्व रंग केवळ डोक्याची शोभा वाढवत नाहीत, तर त्या त्या प्रसंगाचे गांभीर्य आणि महत्त्व अधोरेखित करतात.

​काही वर्षांपूर्वीपर्यंत फेटा हे केवळ पुरुषांचे मक्तेदारीचे वस्त्र मानले जात होते. परंतु, बदलत्या काळासोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीने एक अत्यंत सुंदर वळण घेतले आहे. आजकाल लग्नकार्यात, ढोल-ताशा पथकांमध्ये, राजकीय रॅलींमध्ये आणि शिवजयंतीसारख्या भव्य मिरवणुकांमध्ये महिला देखील तितक्याच ताकदीने आणि आनंदाने फेटा परिधान करताना दिसतात. नववारी साडी, डोळ्यांवर गॉगल, कपाळी चंद्रकोर आणि डोक्यावर भगवा फेटा बांधून जेव्हा महाराष्ट्राची लेक बुलेटवरून किंवा मिरवणुकीत चालते, तेव्हा ती साक्षात रणरागिणी वाटते. फेट्याने स्त्रियांच्या सौंदर्याला एक वेगळीच प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला आहे. आज फेटा हा लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन 'मराठी अस्मितेचे' सामूहिक प्रतीक बनला आहे.

​आजचा तरुण जरी जीन्स, टी-शर्ट आणि पाश्चात्त्य कपड्यांमध्ये वावरत असणारा असला, तरी जेव्हा सण-उत्सव येतो, तेव्हा त्याला आपल्या मातीची ओढ लागते. आज २१ व्या शतकातही तरुणांमध्ये फेटा बांधण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचे तर, फेटा बांधल्याशिवाय सणाचा 'फील' येत नाही. लग्नसमारंभात फेटा बांधून काढलेले फोटो आणि व्हिडिओ तरुणाई अभिमानाने मिरवते. हीच फेट्याची खरी ताकद आहे; त्याने काळाच्या ओघात स्वतःचे अस्तित्व गमावले नाही, उलट ते अधिक आधुनिक आणि लोकप्रिय केले.

​फेटा हे केवळ डोक्यावर परिधान करायचे वस्त्र नाही, तर ती महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, परंपरा आणि मानवी मूल्यांची गुंफण आहे. फेटा आपल्याला ताठ कण्याने जगायला शिकवतो. तो आपल्याला आठवण करून देतो की, आपले मस्तक कोणत्याही अन्यायासमोर झुकता कामा नये, आणि त्याच वेळी ते इतरांच्या आदरासाठी नेहमी तत्पर असावे. आज फेट्याची शान देश-विदेशात पोहोचली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे स्वागतही फेटा बांधून केले जाते, यातच या वस्त्राचे जागतिक मोठेपण सामावले आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, राखावी नेहमी फेट्याची लाट अन् न्‍यारीच त्याची तोड, मराठी मनाला संस्कृतीच्या या फेट्याची लागली अक्षुण्ण गोड!

​जय महाराष्ट्र!

​लेखक: दिपक सालोमन शिरसाठ, अहिल्यानगर 

मो क्रमांक 98 50 83 53 18

शुक्रवार, १० जुलै, २०२६

कबीरांचे दोहे - ज्ञान, सत्य आणि मानवतेचा संदेश



माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात, जेव्हा त्याला स्वतःकडे पुन्हा नव्याने पाहावे लागते. बाहेरची दुनिया, समाजातील रचना, धर्म, परंपरा, ओळख आणि प्रतिष्ठा यांचा गोंगाट इतका वाढलेला असतो की माणूस स्वतःचा आवाजच ऐकू शकत नाही. अशा वेळी काही विचार असे असतात जे आरसा बनून समोर उभे राहतात—आणि त्या आरशात माणूस स्वतःलाच पाहू लागतो. कबीरांचे दोहे हे अशाच आरशासारखे आहेत. ते केवळ शब्द नाहीत; ते प्रश्न आहेत, इशारे आहेत आणि कधी कधी कठोर सत्य सांगणारे आराखडे आहेत.

कबीरांनी समाजाला उपदेश देण्यापेक्षा जागृती दिली. त्यांनी कोणत्याही एका धर्माची चौकट स्वीकारली नाही, कोणत्याही रूढीला अंधपणे मान्यता दिली नाही. त्यांनी जे पाहिले, जे अनुभवले आणि जे सत्य वाटले, तेच थेट शब्दांत मांडले. त्यामुळे त्यांच्या वाणीत कृत्रिमता नाही, तर जीवनाचा कच्चा पण खराखुरा अनुभव दिसतो. जात-पात धर्म कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देणारे महान संत निर्भिड विचारवंत संत कबीरांनी विवेकाची आणि मानवतेची शिकवण दिली

जातिभेदावर कठोर प्रहार

"जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान।

मोल करो तलवार का, पड़ा रहने दो म्यान॥"


या दोह्यात कबीर स्पष्टपणे सांगतात की माणसाची ओळख जन्माने नव्हे तर गुणांनी ठरते.

समाजाने व्यक्तीला तिच्या जातीवरून नव्हे तर तिच्या विचारांवरून ओळखले पाहिजे.

जसे तलवारीचे महत्त्व तिच्या धारेला असते, तसेच माणसाचे मूल्य त्याच्या ज्ञान आणि कर्मात असते.

हा विचार आजही सामाजिक भेदभावावर थेट प्रश्न उपस्थित करतो.


वेळेची जाणीव आणि कृतीशीलता


"काल करे सो आज कर, आज करे सो अब।

पल में प्रलय होएगी, बहुरि करेगा कब॥"


कबीर येथे विलंब करण्याच्या मानवी सवयीवर कठोर प्रहार करतात.

काम पुढे ढकलणे म्हणजे संधी गमावणे आहे.

वेळ सतत पुढे जात राहते आणि परत येत नाही.

म्हणून वर्तमान क्षणाचा योग्य उपयोग करणे हेच यशाचे गमक आहे.


आत्मपरीक्षणाची शिकवण


"बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय।

जो मन खोजा आपना, मुझसे बुरा न कोय॥"


दुसऱ्यांमध्ये दोष शोधताना आपण स्वतःकडे पाहणे विसरतो.

कबीर सांगतात की सर्वात मोठा दोष हा बाहेर नसून आत आहे.

स्वतःच्या चुका स्वीकारणे हीच खरी सुधारणा आहे.

आत्मपरीक्षणाशिवाय व्यक्तिमत्त्वाचा विकास शक्य नाही.



वाणी आणि संवादाचे सामर्थ्य


"ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोय।

औरन को शीतल करे, आपहुं शीतल होय॥"


शब्द हे केवळ आवाज नाहीत, ते नाती घडवणारी किंवा तोडणारी शक्ती आहेत.

गोड, संयमी आणि नम्र वाणी समाजात शांतता निर्माण करते.

अहंकार सोडून बोलल्याने स्वतःलाही मानसिक स्थैर्य मिळते.

कबीर येथे संवादाची नैतिकता शिकवतात.


खरे ज्ञान आणि प्रेम


"पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय।

ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय॥"


पुस्तकी ज्ञान आवश्यक आहे, पण ते पुरेसे नाही.

प्रेम, करुणा आणि माणुसकी ही खरी विद्वत्ता आहे.

जो माणूस प्रेम समजतो, तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो.

हा दोहा शिक्षणाची व्याख्या बदलून टाकतो.



गुरुचे स्थान


"गुरु गोविंद दोऊ खड़े, काके लागूं पाय।

बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय॥"


गुरु हा जीवनाला दिशा देणारा प्रकाश आहे.

तोच अज्ञान दूर करून ज्ञानाचा मार्ग दाखवतो.

ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच स्पष्ट करतो.

म्हणून कबीर गुरुचे स्थान अत्यंत उच्च मानतात.


समाधान आणि संतुलन


"साईं इतना दीजिए, जामे कुटुम समाय।

मैं भी भूखा न रहूँ, साधु न भूखा जाय॥"


या दोह्यात कबीर लोभावर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देतात.

गरजेपुरते मिळाले की माणूस समाधानी राहू शकतो.

अतिरिक्त इच्छा माणसाला अस्वस्थ करते.

समाधान हेच खरे सुख आहे.



संयम आणि निसर्गाचा नियम


"धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय।

माली सींचे सौ घड़ा, ऋतु आए फल होय॥"


यश लगेच मिळत नाही, त्यासाठी वेळ आणि प्रयत्न लागतो.

निसर्गही प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडवतो.

संयम आणि सातत्य हेच प्रगतीचे मूलभूत घटक आहेत.

घाई केल्याने प्रक्रिया बिघडते.



संगतीचा प्रभाव


"कबिरा संगत साधु की, ज्यों गंधी की बास।

जो कुछ गंधी दे नहीं, तो भी बास सुवास॥"


चांगल्या लोकांच्या सहवासात माणूस नकळत बदलतो.

संगती व्यक्तिमत्त्व घडवते किंवा बिघडवते.

सज्‍जनांच्या सहवासाचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो.

म्हणून योग्य संगती निवडणे महत्त्वाचे आहे.

विचारांचा सामाजिक प्रभाव

कबीरांचे विचार केवळ आध्यात्मिक नाहीत, तर सामाजिक क्रांती घडवणारे आहेत. त्यांनी जातिभेद, अंधश्रद्धा आणि दांभिकतेवर थेट हल्ला केला. त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढे अनेक समाजसुधारकांवर दिसून येतो.  यांच्या समतेच्या विचारांमध्ये कबीरांची छाया स्पष्ट दिसते.

तसेच  यांच्या न्याय, समता आणि मानवाधिकारांच्या तत्त्वज्ञानातही या विचारांचा प्रभाव जाणवतो. हा प्रभाव थेट परंपरेचा नसून विचारांच्या सातत्याचा आहे—जिथे कबीर, बुद्ध आणि फुले यांच्या मानवतावादी विचारधारेतून आधुनिक समतावादी समाजदृष्टी विकसित झाली.

कबीरांचे दोहे म्हणजे केवळ काव्य नाही, तर जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. आपल्या दोहयातून त्यांनी समता, न्याय, बंधुता, प्रेम ,सत्य, श्रमाची प्रतिष्ठा, विवेकाचा मार्ग दाखवला प्रत्येक दोहा माणसाला थांबवतो, विचार करायला लावतो आणि स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. त्यांच्या वाणीत कठोरता आहे, पण त्या कठोरतेतही माणुसकी आहे. म्हणूनच शेकडो वर्षांनंतरही कबीरांची वाणी तितकीच जिवंत, प्रभावी आणि आवश्यक आहे. ती आजही समाजाला जागं करते आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची आठवण करून देते. समाजाला सामाजिक एकता आणि विवेकशील जीवनाची प्रेरणा देतात. त्यांच्या मानवतावादी विचारांचा वारसा समतेवर आधारित समाज निर्माण करण्याचा आपण संकल्प करून विचारांना आत्मसात करूया.




✍️. मनिषा कांबळे यवतमाळ

बुधवार, ८ जुलै, २०२६

दशकपूर्ती सोहळा


( आज 9 जुलै... डॉ. रितेश आणि डॉ ऋतुजा यांच्या लग्नाच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त )


डॉ रितेश डॉ.ऋतुजा लग्नाचा 

आज असे दशकपूर्ती सोहळा 

कळमकर कुटुंब देई शुभेच्छा 

करा सोहळा आगळा वेगळा !!


सप्तपदींनी बांधलेले असे 

हे अतूट निर्मळ प्रेम बंधन 

एकाच ठोक्यावर चालणारी 

तुमच्या हृदयाची स्पंदन !!


संसार वेलीवर फुलली 

दोन गोंडस गोजिरी फुले 

संसारी नसे कमी काही

सुख  समृद्धी घरी झुले !!


सदैव शिदोरी संस्कारांची 

मार्ग सत्याचा दाखवी

परिश्रमाला पंख लावुनी 

जीवनी आनंद मिळवी !!


नाते तुमचे असे निर्मळ 

झऱ्यासम झुळझुळ वाहे 

सुखदुःखाच्या वाटांमध्ये 

सदैव सोबत हृदयात राहे !!


वादळ असो वा पाऊस 

हात आता कायम राहावे 

आठवणींच्या या पानावर 

सदैव आनंदी क्षण असावे!!


सौ. प्रणोती हरीश कळमकर 

स्वप्नशिल्प, गुरुदेव नगर,नागपूर

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

समीक्षण _“ सृजनशीलतेचा समीक्षात्मक पुष्पगुच्छ “

 


      मा.प्रणोतीताईंच्या “ चैतन्यझरा “ व “ स्मृतिगंध “ या दोन पुस्तकांचे प्रकाशन ११ जून २०२५ ला जन्मदिवस व विमोचन असा दुग्ध शर्करा योग जुळून आला आणि सर्व मान्यवर व आप्तेष्टांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रकाशन समारंभ संपन्न झाला.

     प्रणोती ताईंनी सर्वांना पुस्तके भेट दिली व काहीतरी लिहा पुस्तकांवर असा आग्रह केला. त्यांच्या प्रेमाखातर सर्वांनी समीक्षण केले आणि एक सुंदर समिक्षणात्मक ग्रंथच तयार झाला त्याचे नाव आहे “ चैतन्यस्मृतींचा सौंदर्यबोध “ नावातूनच याचे रहस्य उलगडत जाते…. चैतन्यझरा या पुस्तकातील चैतन्य शब्द व स्मृतिगंध या पुस्तकातील स्मृति हा शब्द घेऊन “ चैतन्यस्मृती “ हा सुंदर शब्द तयार झाला.यामध्ये वेगवेगळ्या कवी,कवयित्री, लेखक, लेखिकांनी व जे कधी लिहित नव्हते त्यांनीही आपआपल्या नजरेतून सौंदर्यबोध घेत त्या भावनांना लेखणीने कागदावर उतरवून सुरेख कलाकृती तयार केली आणि यांचा संग्रह म्हणजेच “ चैतन्यस्मृतींचा सौंदर्यबोध “ होय. यांचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक आहे. पुस्तकाचा पित रंग हा तेजाचे प्रतीक आहे आणि दोन पुस्तकांचा काळा रंग हा त्याला अंधारातून चैतन्यरूपाने शब्दांचा झरा व स्मृतींचे गेलेले रंग व त्यातूनही उरलेला गंध प्रतित करतो.या वाटांना हा संग्रह पिवळ्या रंगाने उजळून टाकतो व आशावादी होत कवयित्री पुढील साहित्य प्रवासासाठी नव्या दमाने मार्गस्थ होते. 

    चैतन्यझरा या नावाप्रमाणेच त्यात अनेक कवितांमधून चैतन्य पाझरते. स्मृतीगंध या लेखसंग्रहातून आपल्या जीवनातील कडू गोड अनुभवांचे वर्णन केले व त्या स्मृती कायम कोरलेल्या आहेत. या दोन्ही पुस्तकांच्या समीक्षणाचा ग्रंथ “ चैतन्यसमृतीचा सौंदर्यबोध “ आहे.

    या पुस्तकाला संपादक म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, समाजसेविका, अनेक पुरस्कारांच्या मानकरी, संपुर्ण महाराष्ट्रात ‘पोरी जरा जपून ‘ फेम नावाने ओळखल्या जाणाऱ्या मा.प्रा. विजयाताई मारोतकर लाभल्या आहेत हे खरंच खूप मोठे भाग्य आहे.अनेक कवी, कवयित्री,लेखक व लेखिकांनी या पुस्तकांचे समीक्षण लिहिले आहे. एकूण ४२ समीक्षांचा समावेश या ग्रंथात आहे.  विजयाताईंनी संपादकीय लेखात लिहिले आहे की  आयुष्याने आपल्यापुढे मांडलेल्या सारीपाटावर गोट्या त्या योग्य वेळेला योग्य ठिकाणी ठेवताच आल्या पाहिजेत तरच हा बुद्धिबळाचा डाव जिंकता येणे शक्य आहे….जीवनाचे मोठे तत्वज्ञान त्यांनी लिहिले आहे त्यांच्या ज्ञानपुर्ण सागरातून काही शब्दांचे मोती दिलेत सर्वांना.

   अर्पणपत्रिकेत त्यांच्या आई व सासुबाई यांचा उल्लेख आढळतो यावरून लेखिका दोघींनाही समान न्याय देते व प्रेम करते याचा प्रत्यय येतो. म्हणून लिहावेसे वाटते….


लेक लाडकी आईची 

सुन सासुची गुणाची 

नाते बांधले प्रेमाने 

आस नव्हती धनाची 

   

    डॅा.वीणा राऊत यांनी त्यांच्या स्वभावातील कृतज्ञ भाव अधोरेखित केला आहे.त्या म्हणतात हा भाव लेखिकेने कृतज्ञता, मैत्री, कुटुंब नाते व निसर्ग इ. विषय हाताळून जतन केलाय.

डॅा.सुनंदा जुलमे यांनी त्यांच्या समीक्षणात लेखिकेच्या व्यक्तिचित्रण ह्या विशेष आवडीचा उल्लेख केला आहे. अनेक थोर व्यक्तींचे चरित्र रेखाटले आहेत त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता जिजाऊ , आशा भोसले, शांता शेळके यांचा समावेश आहे. मा.डॅा. स्मिता मेहेत्रे यांनी “ धन्य ती कवित्वकळा “ असा सुंदर उल्लेख केला आहे. त्यांना त्यांच्या आई, बाबांकडून साहित्याचे बाळकडू मिळाले असे सुंदर उद्गार त्यांनी काढले आहेत.

मा. सरोज अंदनकर यांना त्यांच्या कविता आत्मविश्वास व त्यातून निर्माण होणाऱ्या बळाच्या वाटतात.प्राचार्या उज्ज्वला अंधारे यांना कवयित्रीच्या कविता मनात खोल झिरपून प्रेमाचा ओलावा निर्माण करणाऱ्या वाटतात.डॅा.लीना निकम यांना हे पुस्तके म्हणजे विचार, भावना आणि अनुभव यांची पुष्परूपी सुंदर गुंफण वाटते.शब्दांचे मृदु स्पर्श व आशयपुर्ण लेख हेच सौंदर्य जाणवते.डॅा सागर गुडमेवार यांना स्मृतीगंध या पुस्तकात सुमनांपरी मंद गंध जाणवतो. विश्वबंधुत्व या भावनेनी प्रेरित होऊन अपर्णाताई यांना ग्रंथात मानवतावादी विचारांचा प्रभाव दिसतो. पल्लवी उमरे यांना कवयित्रीच्या कविता निराशेच्या गर्तेतून बाहेर काढून आशावादी जीवनदायी भासतात.श्रद्धा बुरले यांना कवितासंग्रह वास्तवाचे धडे देणाऱ्या वाटतात. विकास गजापुरे यांना कविता स्त्रीवादी व त्यांना अन्यायाच्या खोल दरीतून दूर होण्यास प्रेरणा देणाऱ्या वाटतात. मन चैतन्याने भरते अशी दिलखुलास दाद अरूणाताई भोंडे देतात. सुखासाठी धडपडत असताना इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवता आले पाहिजे व तो देता आला तर जो आनंद मिळतो तो अमूल्य असतो असे मत डॅा.माधव शोभणे व्यक्त करतात.डॅा.भारतीताई खापेकर यांनी त्यांच्या परीवर्तनवादी विचारांचे कौतुक केले आहे. विद्या निनावे यांना कवयित्रिच्या अंधश्रद्धा , रूढी आणि परंपरा यांवर प्रकाश टाकणारे लेखन आवडले. कुटुंबवत्सल भाव जपणारी कविता मनाला स्पर्शून जाते असं त्या सांगतात.डॅा.शील बागडे यांना कवयित्रीच्या कविता भावना, संवेदना, धार्मिक मतमतांतरे, व्रतवैकल्ये, जीवनाचे तत्त्वज्ञान मार्मिकपणे काव्यात गुंफलेले दिसतात.निमाताई बोडखे यांना ‘पाहूणी की आश्रित ‘या लेखात स्त्रीमनाची वेदना वर्णन केलेली आढळते. पुरूप्रधान संस्कृतीत स्त्रीचे घर कोणते ? हा मोठा यक्षप्रश्न अजूनही पडतो…यातूनच समाजाच्या पुरातन विचारांचे प्रतिबिंब उमटते. प्रा.डॅा.गोपाल चव्हाण हे स्मृतीगंध ह्या लेखसंग्रहाविषयी लिहितात “ साहित्य कृतीत लेखिकेचे प्रतिबिंब उमटते “ लेख प्रबोधनात्मक व संदेश देणारे आहेत. मा. मंदाताई खंडारे यांना कवयित्रीचा उल्लेख ‘ हळव्या मनाची संवेदनशील कवयित्री ‘ अशी उपमा दिली आहे. सेवानिवृत्त झाल्यावर दारे खुली केली कवयित्रीने. मनाला गारवा देणारे आल्हाददायक सुगम संगीत ऐकून मन हलकफुलकं व्हावे तशीच अनुभूती मा. गोविंद साल्पे यांना मिळते .अंधश्रद्धा दुर करून नविन विचार रूजु व्हावेत असे सुंदर विचार त्यांनी मांडले आहेत. मोनाली पोफरे यांना मराठी भाषेचा अभिमान असलेली कविता भावली. साधना काळबांडे यांना कवितासंग्रह  आशयपुर्ण व दर्जेदार सौंदर्याने नटलेला वाटतो.डॅा.काळे यांना जीवनाकडे कवयित्रीचा बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक,सृजनशील व तात्विक वाटतो.भावभावनांचा सुरेख संगम वाटतो. जयश्री धात्रक यांना स्मृतीगंध हा लेखसंग्रह विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांची जणू पुष्पानी गुंफलेली मालाच वाटते. जया काकडे यांना विविध पैलूना लेखिकेने उजाळा दिला आहे असे वाटते. मा.विलास गजभिये यांना प्रवासवर्णन केलेले लेख आवडले.मा. विजयाताई ब्राह्मणकर यांना लेख जाणीवपूर्वक समृद्ध करणारे वाटतात. डॅा. तुषार झाडे यांनी “ समृद्ध अनुभव विश्व “ असा सुंदर उल्लेख केला आहे. माधुरी मते काव्यसंग्रह कवयित्रीच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट्यपुर्ण दर्शन घडवणारा आहे असे लिहितात. घनश्याम कातोरे यांना आध्यात्मिक, सामाजिक, ऐतिहासिक व पर्यटन याविषयी इत्यंभूत माहिती पसंतीस उतरली.डॅा ऋतुजा गोमासे यांनी आईवरील “ अभिमान “ हा खूप भावपूर्ण लेख लिहिला आहे. आई शिक्षिका असल्याने तिला शाळेच्या व मुलांच्या व्यस्ततेत स्वतःचा छंद जोपासतां आला नाही याचे दुःख हळव्या मनाची लेक व्यक्त करते. सेवानिवृत्तीनंतर तिने स्वतःला यात झोकून दिले व विशेष ओळख निर्माण केली असे ती अभिमानाने सांगते. आईच्या त्यागामुळेच आम्ही दोघेही बहिण भाऊ घडलो हे ती कृतज्ञतेने लिहिते.

  शेवटी मी ग्रंथाविषयी एवढेच म्हणेन…..


चैतन्यस्मृतींचा सौंदर्यबोध

नावासम सुंदर समीक्षाग्रंथ

जीवनाचा दडला खरा अर्थ 

वाहे ज्ञाननदी शांत थोडी संथ 


  हा ग्रंथ नक्कीच वाचकांनी वाचावा असाच आहे. तो सर्वांच्या पसंतीस उतरेल याची मला खात्री आहे.

     आज साहित्य क्षेत्रात त्यांचे नाव खूप प्रसिद्ध झाले आहे.४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत असेच आणखी एकापेक्षा एक सरस व दर्जेदार साहित्य त्यांच्या लेखणीतून उभे राहो अशी आशा करते. प्रणोतीताई यांना आतापर्यंत एकूण ८ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुढेही त्यांना अनेक पुरस्कार मिळोत व त्यांच्या चैतन्यमयी व आोघवत्या शब्दातुन समाजाला प्रेरणा देणाऱ्या व आनंदी रचनांची निर्मिती होवो व अनेक पुस्तके त्यांची प्रकाशित होवोत यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देते.



         ©डॅा.शील बागडे

           ३/६/२०२६

            नागपूर

बुधवार, १ जुलै, २०२६

जीवनाचे वरदान-लेखक : पूज्य भिक्खू धम्मरक्षित

 


लेखक : पूज्य भिक्खू धम्मरक्षित

संपर्क : ९९३५८२७९६२

जीवन ही केवळ जन्म आणि मृत्यू यांदरम्यानची कालमर्यादा नाही; जीवन म्हणजे प्रत्येक श्वासातून उमलणारी एक अद्भुत संधी आहे. ही संधी केवळ स्वतःसाठी जगण्याची नसून स्वतःला जाणण्याची, इतरांना समजून घेण्याची, प्रेम करण्याची, करुणा विकसित करण्याची आणि मानवतेचा अर्थ जगण्याची आहे. म्हणूनच जीवनाला वरदान म्हटले जाते. वरदान हे कधीच सहज मिळत नाही. ते मिळाल्यानंतर त्याचे मोल जाणणाऱ्यालाच त्याचे खरे सौंदर्य अनुभवता येते. ज्याला जीवनाचे मूल्य कळले, त्याला प्रत्येक दिवस हा नव्या शक्यतांचा उगवता सूर्य वाटतो; आणि ज्याला ते उमगले नाही, त्याच्यासाठी अमूल्य आयुष्यही तक्रारींच्या सावलीत हरवून जाते.

निसर्ग हा जीवनाचा पहिला गुरु आहे. पहाटेचा सूर्य कोणताही भेदभाव न करता सर्वांवर सारखाच प्रकाश टाकतो. नदी स्वतःसाठी वाहत नाही; ती असंख्य जीवांची तहान भागवते. वृक्ष स्वतःची फळे खात नाही; तो इतरांना सावली, फळे, फुले आणि प्राणवायू देतो. ढग स्वतःसाठी पाऊस साठवत नाहीत; ते पृथ्वीवर बरसून जीवन फुलवतात. निसर्गातील प्रत्येक घटक देण्याचा, समर्पणाचा आणि संतुलनाचा संदेश देतो. म्हणूनच मानवाने निसर्गाकडून केवळ साधने नव्हे, तर जगण्याचे तत्त्वज्ञान शिकण्याची गरज आहे.

मानवी जीवनाचा सर्वात मोठा गुण म्हणजे विचार करण्याची क्षमता. पशू भूक भागवतो, पक्षी घरटे बांधतो; पण मनुष्य स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधतो. "मी कोण आहे?", "माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे?", "मी समाजासाठी काय करू शकतो?" असे प्रश्न त्याला अस्वस्थ करतात. हे प्रश्नच त्याला सामान्य जीवनातून असामान्य जीवनाकडे घेऊन जातात. जेव्हा माणूस स्वतःपुरता विचार न करता इतरांच्या दुःखाशी एकरूप होतो, तेव्हा त्याच्या जीवनाला खऱ्या अर्थाने मूल्य प्राप्त होते.

भगवान बुद्धांनी मानवी जीवनाला दुर्लभ संधी म्हटले आहे. दुःख आहे, हे त्यांनी सांगितले; परंतु त्याचबरोबर दुःखावर मात करण्याचा मार्गही दाखवला. करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि समत्व या मूल्यांनी जीवन समृद्ध होते. राग, लोभ, मत्सर आणि अहंकार मनाला कैद करतात; तर प्रेम, संयम, कृतज्ञता आणि क्षमा मनाला मुक्त करतात. म्हणून जीवनाचे वरदान जपायचे असेल, तर मन शुद्ध करणे आवश्यक आहे.

आज विज्ञानाने जग जवळ आणले आहे; पण अनेक मने एकमेकांपासून दूर गेली आहेत. साधने वाढली, पण समाधान कमी झाले. घरे मोठी झाली, पण मनातील माणुसकी अनेकदा लहान होताना दिसते. अशा काळात जीवनाचे खरे वरदान म्हणजे पैसा, पद किंवा प्रसिद्धी नसून विश्वास, नाती, आरोग्य, शांत मन आणि सद्सद्विवेकबुद्धी होय. ही संपत्ती मिळविण्यासाठी कोणत्याही बाजारात जाण्याची गरज नसते; ती आपल्या आचरणातून निर्माण करावी लागते.

एका बियामध्ये विशाल वृक्ष दडलेला असतो. योग्य माती, पाणी, प्रकाश आणि काळ मिळाला की ते बी हजारो जीवांना आधार देणाऱ्या वृक्षात रूपांतरित होते. माणसाचेही तसेच आहे. त्याच्या अंतःकरणात प्रेम, करुणा आणि प्रज्ञेची बीजे असतात. त्यांना योग्य संस्कार, योग्य विचार आणि सत्कर्मांचे पाणी मिळाले, तर त्याचे जीवन स्वतःपुरते न राहता अनेकांच्या जीवनाला दिशा देणारे वरदान ठरते. म्हणून प्रत्येक जन्म हा केवळ जगण्यासाठी नसतो; तो जगाला काहीतरी चांगले देण्यासाठी असतो.

जीवनाचे सौंदर्य संकट नसण्यात नाही; संकटांवर मात करण्याच्या धैर्यात आहे. नदीला खडक भेटतात म्हणून ती वाहणे सोडत नाही; उलट त्यांनाच वळसा घालत समुद्रापर्यंत पोहोचते. फुलाला काट्यांची साथ असते, तरी ते सुगंध देणे थांबवत नाही. आकाशात ढग येतात, पण सूर्य कायमचा लपून राहत नाही. निसर्गातील हे प्रत्येक दृश्य मानवाला सांगते की अडचणी या शेवट नसतात; त्या नव्या उमेदीची सुरुवात असतात. जीवनाचे वरदान ओळखणारा माणूस प्रत्येक अनुभवातून शिकतो, प्रत्येक अपयशातून उभा राहतो आणि प्रत्येक दिवसाला नव्या आशेने सामोरा जातो.

याच जाणिवेतून जीवनाची खरी श्रीमंती जन्माला येते. जी व्यक्ती स्वतःच्या आनंदाबरोबर इतरांच्या आनंदाचाही विचार करते, जी दुःखी माणसाला धीर देते, जी निसर्गाचे रक्षण करते, जी सत्य आणि करुणेचा मार्ग स्वीकारते, तीच व्यक्ती जीवनाच्या वरदानाचे ऋण फेडत असते. कारण जीवन हे केवळ आपल्याला मिळालेले दान नसते; ते पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर करून देण्याची जबाबदारीही असते.

जीवनाचा प्रवास म्हणजे केवळ श्वासांची मोजदाद नव्हे, तर अनुभवांची, नात्यांची आणि जाणिवांची अखंड शृंखला आहे. या प्रवासात माणूस अनेक टप्प्यांतून जातो—बालपणातील निरागसता, तारुण्यातील उर्मी, प्रौढपणातील जबाबदारी आणि वृद्धत्वातील आत्मचिंतन. प्रत्येक टप्पा काहीतरी शिकवतो आणि प्रत्येक शिकवण माणसाच्या अस्तित्वाला अधिक समृद्ध बनवते. जीवन हे वरदान आहे, कारण ते आपल्याला स्वतःला घडवण्याची आणि इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याची संधी देते.

मानवी जीवनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बदलण्याची क्षमता. एकाच परिस्थितीत दोन माणसे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ शकतात. एक माणूस अडचणींना शाप मानतो, तर दुसरा त्यांना संधी मानतो. उदाहरणार्थ, एका गरीब कुटुंबातील मुलगा जर परिस्थितीला दोष देत बसला, तर त्याचे आयुष्य तक्रारीतच संपते; पण त्याच परिस्थितीत दुसरा मुलगा जर शिक्षणाला शस्त्र बनवून पुढे गेला, तर तोच इतिहास घडवू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. सामाजिक विषमता, गरिबी आणि अपमान यांच्यातून त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला आणि अखंड संघर्षातून स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे जीवन बदलले. हे दाखवते की जीवनाचे वरदान परिस्थितीत नाही, तर त्याला दिलेल्या प्रतिसादात आहे.

निसर्गाकडे पाहिले तर जीवनाचे दुसरे महत्त्वाचे सत्य समजते—संतुलन. सूर्य सतत तेज देतो, पण कधीही जळून नष्ट होत नाही; नदी सतत वाहते, पण कधी थकत नाही; झाड सतत देते, पण कधी रिकामे होत नाही. हे संतुलन मानवाने शिकणे आवश्यक आहे. आधुनिक जीवनात माणूस सतत घेण्याच्या मागे लागला आहे—अधिक पैसा, अधिक सुख, अधिक प्रसिद्धी. पण देण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. त्यामुळेच मानसिक असंतोष वाढत आहे. जेव्हा माणूस देण्यास सुरुवात करतो—प्रेम, वेळ, मदत, करुणा—तेव्हा त्याच्या आयुष्याला एक वेगळीच शांतता मिळते. एका लहानशा गावातील शिक्षकाचे उदाहरण घ्या. तो स्वतः गरीब होता, पण त्याने अनेक विद्यार्थ्यांना शिकवले. त्या विद्यार्थ्यांपैकी काही डॉक्टर झाले, काही अभियंते झाले, काही समाजसेवक झाले. त्या शिक्षकाचे नाव कदाचित मोठ्या पुस्तकांत नसेल, पण त्याचे जीवन अनेकांच्या यशात जिवंत आहे. हेच खरे जीवनाचे वरदान आहे.

भगवान बुद्धांनी जीवनाचे स्वरूप अत्यंत खोलवर समजावून सांगितले आहे. त्यांनी सांगितले की दुःख हे जीवनाचा भाग आहे, पण त्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्गही अस्तित्वात आहे. एका राजवाड्यातील सुखसंपन्न जीवन सोडून त्यांनी जेव्हा समाजातील दुःख पाहिले, तेव्हा त्यांच्या मनात करुणेचा उदय झाला. त्यांनी तप, ध्यान आणि ज्ञानाच्या माध्यमातून मानवाला “मध्यम मार्ग” दिला. हा मार्ग अतिरेक टाळून संतुलित जीवन जगण्याचा आहे. त्यांच्या शिकवणीनुसार, राग हा अग्नी आहे जो आधी स्वतःला जाळतो आणि मग इतरांना; तर करुणा हे पाणी आहे जे स्वतः थंड राहून इतरांना शांत करते. जीवनाचे वरदान तेव्हाच फुलते, जेव्हा माणूस करुणेचा स्वीकार करतो.

एका कुटुंबाचे उदाहरण पाहू. एका घरात दोन भावंडे होती. एकाने नेहमी स्पर्धा आणि ईर्षा ठेवली, सतत इतरांशी तुलना केली आणि असमाधानी राहिला. दुसऱ्याने मात्र स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले, कुटुंबाला आधार दिला आणि नात्यांना जपले. काही वर्षांनी पहिला भाऊ मानसिक तणावात अडकला, तर दुसरा समाजात आदराने जगू लागला. परिस्थिती एकच होती, पण दृष्टिकोन वेगळा होता. जीवनाचे वरदान हे बाह्य परिस्थितीत नसून अंतःकरणातील दृष्टिकोनात आहे, हे या उदाहरणातून स्पष्ट होते.

आजच्या काळात तंत्रज्ञानाने माणसाला वेग दिला आहे, पण शांतता हिरावून घेतली आहे. मोबाईल, इंटरनेट, स्पर्धा यामुळे माणूस सतत व्यस्त आहे, पण अंतर्मुख होण्यास विसरला आहे. एका शहरातील यशस्वी व्यावसायिकाचे उदाहरण घ्या—तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी होता, पण त्याला कुटुंबासाठी वेळ नव्हता. मुलांशी संवाद तुटला, नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. एका क्षणी त्याला समजले की पैसा आहे, पण शांतता नाही. मग त्याने जीवनशैली बदलली, कुटुंबासाठी वेळ द्यायला सुरुवात केली आणि मानसिक समाधान मिळवले. हे उदाहरण दाखवते की जीवनाचे वरदान हे केवळ बाह्य यशात नाही, तर आंतरिक समाधानात आहे.

निसर्गातील एक साधे उदाहरण पाहू. पावसाचा थेंब समुद्रात पडतो तेव्हा त्याची ओळख संपते असे वाटते, पण प्रत्यक्षात तो समुद्राचा भाग बनतो. त्याचप्रमाणे, माणूस जेव्हा अहंकार सोडून समाजाशी एकरूप होतो, तेव्हा त्याचे जीवन व्यापक अर्थ प्राप्त करते. एकटेपणा हे दुःखाचे मूळ आहे, तर एकात्मता हे समाधानाचे स्रोत आहे. म्हणूनच जीवनाचे वरदान समजण्यासाठी “मी” या संकुचित विचारातून बाहेर पडून “आपण” या व्यापक भावनेत प्रवेश करणे आवश्यक आहे.

ग्रामीण भागातील एका महिलाचे उदाहरणही महत्त्वाचे आहे. ती अत्यंत साध्या परिस्थितीत राहत होती, पण तिने आपल्या मुलांना शिक्षण दिले. स्वतः कष्ट करून, इतरांकडून मदत घेऊन तिने मुलांना शिकवले. पुढे तिची मुले उच्च शिक्षण घेऊन समाजात स्थिर झाली. त्या महिलेने कधी मोठे नाव कमावले नाही, पण तिचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा ठरले. हे दाखवते की जीवनाचे वरदान हे प्रसिद्धीत नसून, केलेल्या चांगल्या कार्यात आहे.

जीवनाचा अंतिम अर्थ म्हणजे समर्पण. जेव्हा माणूस स्वतःच्या स्वार्थापलीकडे जातो, तेव्हा त्याच्या जीवनाला खरी उंची मिळते. एका डॉक्टराचे उदाहरण घ्या, जो मोठ्या शहरात राहू शकला असता, पण त्याने ग्रामीण भागात सेवा करण्याचा निर्णय घेतला. तिथे त्याने अनेकांचे प्राण वाचवले. त्याला कदाचित मोठी प्रसिद्धी मिळाली नाही, पण त्याचे नाव लोकांच्या हृदयात कायम राहिले. हेच जीवनाचे खरे वरदान आहे.

जीवन हे नदीसारखे आहे—सतत वाहणारे, अडथळ्यांना पार करणारे, आणि शेवटी समुद्रात विलीन होणारे. या प्रवासात जर आपण प्रेम, करुणा, कर्तव्य आणि समर्पण जपले, तर आपले जीवन स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही प्रकाशमान होते. म्हणूनच जीवनाचे वरदान हे केवळ मिळवण्यासाठी नसून, ते जगण्यासाठी आणि वाटण्यासाठी आहे.




खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...