नमू या महाराष्ट् ...!
जननी साहसी विरांची
हुतात्म्यांच्या बलिदानाची ,
खाण असे नररत्नांची
छत्रपती शिवरायांची..||१||
अभिमान जगी सांगते
पैजा जिंकूणी अमृतांच्या ,
नभांगणी फडकतात
अभंगाच्या गाथा संतांच्या..||२||
अंगणात ही सजलेला
समतेचा मोहक सडा. ,
उभा रक्षण्या कणखर
सह्याद्रीचा कातळ कडा..||३||
इथे गौरवात नांदूनी
जाती धर्मांचा भेद नसे ,
प्राणाहूणी प्रिय अस्मिता
देश बांधवा श्रेष्ठ असे..||४||
जपला संस्कृती वारसा
ज्ञान विज्ञान कला प्रेमी ,
धन्य जन्म इथे घेऊनी
नमू या महाराष्ट्र भूमी..||५||
श्री अशोक भगवंत वाघमारे
पुणे
मो.९०७५५५७२०६
_______
*बुद्ध जन्म*
बुद्ध जन्मास आले या भुवरी
महामायेच्या पोटी राजा शुद्धोधनाच्या घरी
सजली नगरी, सजल्या भगिनी
वृक्षलता बहरल्या अंगणी
पक्षी गुंजारव करी सुमधुर स्वरांनी
आनंदगंध पसरला या त्रिभुवनी ll 1ll
शोध घेतला बुद्ध जन्माचा असित मुनीने जम्बुदीप स्थळी
दिव्य तेजाने बाळ चमकतो समजले शाक्य कुळी
पाहिले बाळाचे रूप डोळे भरुनी
दिव्य पुरुषासमान दिसले बत्तीस लक्षणी ll 2ll
असित मुनी वदले बालक सम्यक संबुद्ध होणार
बुद्धत्व प्राप्त करून धम्मचक्र प्रवर्तन करणार
जगा ,लोक कल्याणाचा सद्धधम्म सांगणार
धम्मज्ञान आदी मध्यम आणि अंत कल्याणकारी असणार
ll 3 ll
अनंत युगानंतर भूतलावर श्रद्धेय बुद्ध अवतरणार
खरी ठरली असित मुनींची वाणी
कल्याण साधण्या मानवाचे मिळाली बुद्धधम्म पर्वणी
प्रज्ञाशील करुणा हृदयात जपूनी
बुद्धाने मानवास दिली नवसंजीवनी ll 4 ll
_अस्मिता राहुल बागडे, नागपूर
मो.9422492383
__________
कामगार दिन
हार्दिक शुभेच्छा । कामगार दिनी ।।
सदिच्छा वाणी । सर्वांसाठी ||१||
जीवन जगतो । स्वतः कामगार ।।
घामाची ती धार । प्रामाणिक ।।२।।
भारतात एक । शक्ती मुलाधार ।
राष्ट्राचा आधार । कामगार ।।३।।
दुजाचे ते ओझे । घेई खांद्यावर ।।
नेई कामगार । निर्धाराने ।।४।।
कामगार आहे । नाही तो गुलाम ।।
करावा सलाम । नित्य त्यासी ।।५।।
जीवनाचे दुःख । करूनिया नष्ट ।।
शारीरिक कष्ट । रात्रंदिन ।।६।।
सुखाचे जीवन । दुःखात शोधतो ।।
राबतो कष्टतो । कामगार ।।७।।
ठेवावी ही जाण । कामगार दिन ।।
करू नये दीन । सर्वानीच ।।८।।
कामगारांशी या । वर्तन प्रेमाचे ।।
जीवन सुखाचे । करू सर्व ।।९।।
एक मे हा दिन । कामगार दिन ।।
द्यावा तया मान। लोकांनीच ॥१०॥
समता गौरव पुरस्कार प्राप्त
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती : ८०८७७४८६०९
____________
महाराष्ट्र दिन
हार्दिक शुभेच्छा । महाराष्ट्र दिनी ।।
सदिच्छा वाणी । सर्वांनाच ।१।।
सिंदखेड राजा । भूमि जिजाऊंची ।।
माता शिवाजींची । महाराष्ट्री ।।२।।
हिंदवी स्वराज्य । संस्थापक राजे ।।
जय घोष वाजे । आसमंती ।।३।।
सर्व क्षेत्री पुढे । मुंबई विभाग ।।
सागर अथांग । पहूडला ।।४।।
बघा अलिबाग । देखणा किनारा ।।
सागरी जंजीरा । शोभनीय ।।५।।
जगात प्रसिद्ध । एक सरोवर ।।
सुंदर लोणार । विसावले ।।६।।
नागपूरी संत्री । प्रसिद्ध जगात ।।
महाराष्ट्रात या । नावाजली ।।७।।
कळसुबाईचे । उंच ते शिखर ।।
कुठे ? ते नगर । महाराष्ट्री ।
समता गौरव पुरस्कार प्राप्त
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती : ८०८७७४८६०९
___________
*अस्मिता महाराष्ट्राची*
महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एक एप्रिलचा दिवस उजाडला,
106 हुतात्म्यांच्या शहीद बलिदानातून सह्याद्रीचा डोंगर गर्जला.
छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी गाजवले,
महाराष्ट्राच्या भूमीवर शौर्य.
बलाढ्य सैनिक शत्रूचे असूनही,
कधी मराठ्यांचे खचले नाही धैर्य.
विजयी पताका घेऊन आजही गर्जतो सह्याद्रीचा डोंगर.
सह्याद्रीच्या डोंगरकपारीत रयत राहावी आनंदात,
म्हणूनच पोवाडा गायला जातो घरोघरी.
संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यासाठी दिला थोर महापुरुषांनी नारा,
मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी लढला महाराष्ट्र सारा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, महात्मा जोतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची शान.
आम्ही मराठी, महाराष्ट्राचे, याचा आहे आम्हाला अभिमान.
*कवी : गोपाळ धारपवार
पनवेल
______
महिमा महाराष्ट्राचा
काय वर्णू तुझे गुण
माझ्या महाराष्ट्र देशा
मृत्तिका तुझी ही चंदन
गंधाळल्या दाही दिशा /
श्रृषी मुनींच्या जन्माने
ही भूमी पावन झाली
साधू संतांच्या स्पर्शाने
कणकण उद्धारली /
शेतकरी पिकवते
घामाच्या थेंबातून मोती
पिकं टाळा वाजवते
पक्षी गोड गीत गाती /
वारा मधूर संगीताने
झुलवतो पर्ण सारे
नाद ऐकून झऱ्यांचा
फुलती कळांचे पिसारे /
जणू सौंदर्याची खान
लेण्या वनराई भव्य
लेखक कवींनी रेखाटली
महिमा महाराष्ट्रची दिव्य /
नाना कला अवगत
केल्या इथल्या लोकांनी
वारकरी संप्रदाय नाचे
तुका अभंग होऊनी /
शाहू, फुले, शिवबाने
घेतले थोर किती कष्ट
भारताचा शोभतसे
सोनेरी मुकूट महाराष्ट्र /
_ ज्योती बन्सोड( ग्रामगीताचार्य )
बेलोना, नरखेड
________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा