गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

चला करु साजरा : महाराष्ट्र दिन सोहळा

 


=======================                                  *"सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा*, 

*दरी-दरीतून नाद गुंजतो महाराष्ट्र माझा*, 

*जय जय महाराष्ट्र माझा ,महाराष्ट्र माझा."* 

१ मे हा दिवस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून  "महाराष्ट्र दिन" साजरा करतात.१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी मातीतील मराठी माणसाच्या अस्मितेचा, उल्हासाचा व कामगारांच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो."कामगार दिन" म्हणून ही या दिवसाला ओळखले जाते.तिरंगा ध्वज फडकविला जातो. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. या १०६ शहीद हुतात्म्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. बलिदान दिलेल्या शहिदांना आदरांजली समर्पित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. १ मे महाराष्ट्र राज्य स्थापन दिवस. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश सुपूर्द केला. नव महाराष्ट्र राज्याचे नेतृत्वाची संपूर्ण जबाबदारी सोपवली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक वारसा फार मोठा आहे. देश स्वतंत्र करण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक, सैनिक, शूरवीर लोकांनी आपले प्राण पणाला लावून बलिदान दिले आहे. शूरवीर लोकांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होय. राज्यांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणेचा इतिहास मोठा आहे. या राज्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा अनमोल ठेवा आहे. महाराष्ट्र हा साधुसंत, ऋषीमुनींचे राज्य आहे. शूरवीर , साहसी व धाडसी नरवीरांचे राज्य आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेला निर्भय व निर्भिड बनवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. महाराष्ट्र ही त्याग व बलिदानाची, देशप्रेम व पराक्रमाची परंपरा लाभलेले राज्य आहे. महाराष्ट्र राज्य ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, चक्रधरस्वामी या सारख्या महान संताच्या अवताराने पवित्र भूमि आहे. कृष्णा, कोयणा, गोदावरी नदीच्या पवित्र जलराशीने पावन राज्य महाराष्ट्र. साहित्यिक क्षेत्रात ही महान लेखक, कवी या राज्याला वरदान आहे. सामाजिक विचार रुजवण्यासाठी महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांचे योगदान अनमोल आहे. महाराष्ट्र राज्याचे वर्णन करताना गोविंदाग्रज म्हणतात. 

*"मंगल देशा, पवित्र देशा!*

*महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा!* 

*श्री महाराष्ट्र देशा!* 

असे सुंदर वर्णन काव्यातून साकारले आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. संत ज्ञानेश्वर महाराज अभंगातून मराठी भाषेचे महात्म्य सांगतात. 

*"माझा म-हाठाचि बोलू कवतुके|*

*परी अमृतातेंहि पैजा जिंके||*"

कविवर्य आपल्या काव्यरचनेद्वारा मराठी भाषेचे महत्त्व विशद करतात

*"माझ्या मराठी मातीचा लावा        ललाटास टिळा,* 

*हिच्या संगाने जागल्या दरीखो-यातील शिळा.|"*

महाराष्ट्र राज्याला महात्मा गांधी कार्यकर्त्यांचे "मोहळ" म्हणतात. 

महाराष्ट्राच्या मातीचे महात्म्य, गुणवर्णन अनेक प्रतिभावंत इतिहासकारांनी केले आहे. 

*"काळ्या छातीवरी कोरली,                       अभिमानाची लेणी*

*पोलादी मनगटे खेळती*, 

      *खेळ जीव घेणी.*

*दारिद्र्याच्या उन्हात शिजला*, 

*निढळाच्या घामाने भिजला*

*देश गौरवासाठी झीजला*. 

अशा महाराष्ट्राचा १ मे हा स्थापना दिवस आहे. या राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिले त्या वीर सुपुत्रांना कोटी कोटी प्रणाम. 

*"भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणा-या नभा*, 

*अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा.* 

========================

रत्नाकर बाबुराव पाटील    

  {सहशिक्षक}

विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा, 

शिंगोली ता. जि. धाराशिव

*मो. ९४०३३९४८१८*.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...