अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा येथील राजेश चौरे यांनी " जिद्द पेरताना " ही सामाजिक, भावनिक, गुंतागुंतीची व तरुणाईच्या उंबरठ्यावरील मानसिक पातळीवर होणाऱ्या बदलांचे वर्णन करणारी कादंबरी ,शब्दमुद्रा प्रकाशन यांनी प्रकाशित करून खऱ्या अर्थाने साहित्य सेवा केलेली आहे
चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या कुंचल्यातून चितारलेले मुखपृष्ठ व नांदेडचे 'गोंडर'कादंबरीकार अशोक कुबडे यांची लाभलेली प्रस्तावना आणि कविवर्य इंद्रजीत घुले यांनी केलेली जिद्द पेरताना या कादंबरीची पाठराखण यामुळे कादंबरीला विशेष मोल प्राप्त झाले आहे.
सामाजिक जीवन विषयातील नाविन्यता हे या कादंबरीचे वैशिष्ट्ये आहे.
सामाजिक,भावनिक गुंतागुंतीची व तरुणाईच्या उंबरठ्यावरील होत असलेल्या मानसिक स्थितीची मनोविश्लेषणात्मक पद्धतीने मांडलेली दीर्घकथा म्हणजे "जिद्द पेरताना " ही कादंबरी.
कादंबरीची सुरुवातच हिरवागार निसर्ग, खळाळत वाहणारे नदीचे झुळझुळ पाणी, डोंगरामागून आकाशात झेपावणारा लालसर सूर्याचा गोळा हे सर्व पाहून बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या निसर्ग कवितेतील निसर्गाचे जिवंत चित्रण लेखकाने उभे केले आहे असा भास होतो त्यामुळे वाचक बेधुंद होऊन निसर्गाच्या क्रीडेमध्ये रमनाम होऊन कादंबरी वाचताना वाचनाचा आनंद घेत घेत पुढे जात असतो.
कादंबरीत जागोजागी येणाऱ्या निसर्गाच्या वर्णनाचा आस्वाद घेताना जणू आपण एखादा चित्रपट पाहत असल्याचा भास होतो.
लेखकांनी भाऊच्या हाटेल समोर बसलेला वेडा मुलगा म्हणजेच 'साथी' हा या कादंबरी नायक आहे.
भाऊ आपल्या प्रेमळ स्वभावाने वेड्या साथीला वडापाव खायला देऊन आपलंस करतो. कालांतराने तो भाऊचे ऐकून स्वच्छ राहायला लागतो हेच कादंबरी लेखकाचे पहिले यश आहे .यात भाऊच्या मित्रांची मदत तर मिळतेच मात्र भाऊचा सर्वसमावेशक स्वभाव यातून दिसून येतो.
कादंबरीकार राजेश चौरे एखाद्या अनुभवी लेखकांसारखेच कथानक आपल्या दृष्टी पटलावरून सरकवत असतात.
कोणतेही औषध न देता फक्त मानसिक आधारावर एखादी वेडसर व्यक्ती बरी होऊ शकते हे या कादंबरीचे खरे सूत्र आहे.
भाऊंनी केलेल्या सुधारणेनंतर आता मात्र आमुलाग्र बदल झालेला साथी सिनेमातील हिरो दिसावा असा वाटतो.
अचानक शेतातील विहिरीवर पाणी भरायला गेलेली गुंजन कामकरी मुलगी पाय घसरून विहिरीत पडते आणि प्राणाची बाजी लावून साथी तिचा जीव वाचवितो ,इथूनच खऱ्या अर्थाने कादंबरीतील प्रेम प्रकरणाला अंकुर फुटते.
हॉटेल समोर बसून राहणाऱ्या वेड्यासाठी भाऊच्या सामाजिक दायित्वाने परिपूर्ण बरा करण्याचा घाट बांधून यशस्वीपणे त्याला बरा करतो आणि यूपीएससीची परीक्षा द्यायला सांगतो. भाऊंनी गुंजन आणि साथीची करून दिलेली भेट मानवी जीवनाला आशेची व आशयाची किनार निर्माण करते.
शेतकरी कामकरी स्त्रियांचे शेतीतील वर्णन करताना लेखकाने केलेले ऊस मळ्यातील वर्णन अत्यंत मनाला भावणारे आहे.
भाऊ आणि गुंजन यांचे भावा बहिणीचे प्रेम जसे गुंजन भाऊला घास चारून देणे हे डोळ्यात भरण्यासारखेच आहे.
भाऊ गुंजन ची आई बीमार असतानाही मदत करतो. साथी भाऊ आणि गुंजनचा कृतज्ञ आहे कारण या दोघांमुळेच यूपीएससीच्या परीक्षेचा व निकालाचा दिवस साथीला पाहायला मिळालेला आहे असे म्हणतो.
लेखकाने जिद्द पेरताना कादंबरीमध्ये वापरलेली भाषा ही बोलीभाषा, गावाकडील भाषा आणि प्रमाण भाषा अशाप्रकारे सर्व समावेशक भाषा चा वापर केलेला आहे, यामुळे कादंबरीचे सौंदर्य खुलून दिसून येते.
मात्र कादंबरीत काही ठिकाणी विसंगती सुद्धा आढळते जसे गुंजन चा भाऊ दहावीनंतर तलाठी बनतो.
हॉटेल चालवणारा भाऊ गावात केव्हा कॉलेज आणतो तेही कळत नाही. मात्र दोन्हीही घटना कादंबरीतील पात्रांशी जुडणाऱ्या आहे हे विशेष.
वेळसर साथी ने आपल्या कलेक्टरची परीक्षा पास झाल्याचे श्रेय गुंजन आणि भाऊला देतो यातून कृतज्ञता दिसून येते व हिच मनोधारणा आजच्या काळाची गरज आहे म्हणूनच यूपीएससीची परीक्षा पास झाल्यानंतर कलेक्टर झाल्याचा पेढा शेतातील कामकरी स्त्रियांसोबत सर्वांनाच दिला जातो आणि आनंद साजरा करतो.
26 जानेवारीला सत्कार व स्वागत समारंभासाठी सरपंच ,आमदार, खासदार ,तहसीलदार व भाऊ स्टेजवर बसलेले असताना सर्वांनीच भाऊच्या सत्कार्याचे कौतुक केलंल आहे.
साथी भाषण देताना भाऊने मला कसं घडवले याचे सविस्तर वर्णन करतो व प्रत्येकाने वेड्या लोकांना मदतीचा हात द्यावा हे अंतकरणातून सांगतो हेच या कादंबरीचे आशय सूत्र आहे असे मला वाटते.
एकादा सिनेमा काढावा एवढे चांगले कथानक या कादंबरीचे आहे .
लेखकाने साथी व गुंजन यांची अत्यंत उत्कटपणे प्रेम कथा रेखाटलेली आहे. तसेच सरपंचाची बहीण प्रिया व भाऊ यांचेही प्रेम नितळपणे दाखविलेले आहे. कादंबरीतील भाऊला शिक्षणाचे परिपूर्ण ज्ञान नसले तरीही साथीला तो कलेक्टर बनवतो आणि यूपीएससीतून कलेक्टर झाल्यानंतर गावामध्ये वेड्यांचे आश्रम काढण्याचे आवाहन साथी आपल्या भाषणातून करतो.
सीता काकुने साथीवर लावलेली माया आणि त्याचे कौतुक करून कपाळावर घेतलेले चुंबन हे दृश्य बघून गुंजनचा झालेला लालेलाल लाजलेला चेहरा लेखकाने छान रेखाटलेला आहे.
यासोबतच शेतात काम सुरू असताना अचानक बदललेला वादळवाऱ्यातील पावसाचे सुंदर वर्णन एखाद्या सिनेमातील दृश्यासारखे आपल्या मनाचा ठाव घेते आणि आपल्याला कादंबरीचा हिस्सा बनण्यास भाग पाडते. हे जिद्द पेरताना या कादंबरीची भक्कम बाजू आहे.
साथीला पोस्टमनद्वारे आलेल्या इंटरव्यू काल कादंबरीच्या कथानकाला वळण देणारा ठरतो. प्रिया व मैत्रिणींचे भाऊशी होळी -रंगपंचमी-धुलीवंदन खेळणे आणि बुचकळ्या भरून रंग लावणे यातून मिळणारा आनंद शब्दातीत आहे.
कादंबरीचे कथानक सर्वसाधारण लोकांसाठी आशादायी ठरणारे आहे.
साथी, साथीचे सख्खे मोठे भाऊ ,वहिनी यांचे बिघडलेले संबंध व शेवटी त्यांना झालेला पश्चाताप कादंबरी वाचकाला समाधान देऊन जातो.
साथी च्या कॉलेजच्या जीवनातील पूजा हिचे सात्विक प्रेमाचे सुंदर वर्णन लेखकाने केले आहे .
यशराज सूर्या पाटील विजयनगरचा श्रीमंत घराण्यातील होतकरू तरुणाची ही एक कथा आहे. यशराजचा साथी कसा झाला व साथी चा कलेक्टर कसा झाला हे समजून घेण्यासाठी आपल्याला "जिद्द पेरताना " कादंबरी वाचणे अगत्याचे ठरते.
यातूनच सरपंचाची बहीण प्रिया व भाऊ यांच्या नितळ प्रेमाचे केलेले वर्णन मनाला भावणारे आहे.
जिद्द पेरताना कादंबरीतील साथी कलेक्टर झाल्यानंतर वेड्यांचा अनाथ आश्रम काढतो आणि त्याला "यशराज अनाथ आश्रम" हे नाव देतो आणि दुर्दैव असं की याच अनाथाश्रमामध्ये पूजा हिला भरती करावे लागते हे लेखकाने लीलया रेखाटलेले आहे.
लेखकाने मात्र पात्रांशी खूप चांगली सांगळ घातलेली आहे एका वेळ्याने अनाथ आश्रम खोलून आपल्या अनाथ वेळ्या मैत्रिणीला तिथे ठेवून तिची सेवा करतो हेच या कादंबरीचे फलस्वरूप आहे.
शेवटी शेतातला बंगला गुंजन आणि साथी यांच्यासाठी फुलांनी सजलेला होता यातून साथीच्या नवीन जीवनाची सुरुवात मनामध्ये प्रफुलित करणारी आहे.
साथी , प्रिया, गुंजन, पूजा,
गुंजनचे आई वडील व पुजाचे आई-वडील हे सर्व प्रेमळ माणसे भाऊला आयुष्यात मिळाली त्यामुळे भाऊच्या जीवनाची सोने झाले व कादंबरीला सोनेरी रूप प्राप्त झाले.
गुंजन चा भाऊ जो तलाठी बनतो तो भाऊच्या समजावण्यावरून पूजाशी लग्न करतो आणि एक संपूर्ण चौकट पूर्ण होते.
कादंबरीच्या शेवटी प्रिया हर्षवर्धन सूर्यवंशी सुद्धा तहसीलदार होते आणि भाऊची सारी स्वप्न पूर्ण होतात.
अशाप्रकारे" जिद्द पेरताना " हे कादंबरी तुमच्या माझ्या सर्वांच्या मनात जिद्द पेरण्याचा मानस तयार करते हेच या कादंबरीचे खरे यश आहे असे मला वाटते.
कादंबरीकार राजेश चौरे यांच्या या नूतन पहिल्या कादंबरीस भरभरून मनःपूर्वक शुभेच्छा!!
प्रा. विठ्ठल चौथाले
मुक्काम पोस्ट- चामोर्शी
जिल्हा- गडचिरोली
Mob- 9420756038












