शनिवार, २० जून, २०२६

'युगंधरा आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमुकुटमणी पुरस्कार' कवी संतोष चिले यांना प्रदान !

 


​शब्दशिल्प/सिंधुदुर्ग / गोवा_साहित्य, संस्कृती आणि समाजसेवा या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक मा. कवी संतोष चिले यांना युगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे यंदाचा प्रतिष्ठेचा 'युगंधरा आंतरराष्ट्रीय
स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमुकुटमणी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गौरवामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​युगंधरा आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यलेखन स्पर्धेमध्ये कवी संतोष चिले यांनी आपल्या प्रतिभेच्या दिव्य तेजाने, शब्दांच्या वैभवशाली सामर्थ्याने आणि राष्ट्रनिष्ठ विचारांच्या प्रखर अभिव्यक्तीने साकारलेल्या अद्वितीय काव्यनिर्मितीबद्दल त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.

​भारदस्त आणि छंदबद्ध लेखनशैली, कवी संतोष चिले यांच्या कवितांमध्ये प्रकर्षाने वापरले जाणारे वजनदार, सखोल आणि 'जड शब्द' वाचकांच्या मनाला थेट भिडतात व त्यांच्या रचनेला एक वेगळीच उंची देतात.

​त्यांची कविता केवळ मनोरंजन करत नाही, तर पर्यावरण संरक्षण, अमली पदार्थ विरोधी जनजागृती, हुंडा पद्धतीचे निर्मूलन आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सामाजिक आणि वास्तववादी ज्वलंत विषयांवर आपल्या लेखणीतून ते सातत्याने प्रहार करीत असतात.

​यापूर्वीही त्यांना साहित्य, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल अत्यंत मानाचा 'छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 'दादासाहेब राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार' देखील प्रदान करण्यात आला. त्यातच आता मिळालेला हा 'युगंधरा आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमुकुटमणी पुरस्कार' त्यांच्या अविरत साहित्यसाधनेची खूप मोठी पावती ठरला आहे.

​"आपली साहित्य साधना अशीच निरंतर फुलत राहो आणि आपल्या लेखणीतून राष्ट्रप्रेम, संस्कृतीनिष्ठा व मानवकल्याणाचे अमृतझोत अखंड प्रवाहित होत राहोत," अशा शब्दांत प्रतिष्ठानतर्फे त्यांना मंगलकामना देऊन संतोष चिले यांच्या दैदीप्यमान यशाबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

​या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऐतिहासिक गौरवाबद्दल महाराष्ट्र आणि गोव्यातील साहित्य वर्तुळातून कवी संतोष चिले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...