सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२६

'मन के हारे हार हैं, मन के जीते जीत रे'



     ईश्वराने आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे. याहून इतर कोणतीच गोष्ट सुंदर असू शकत नाही. माणूस जन्म म्हणजे अतिशय कठीण कसरत. पण ही कठीण कसरतंच आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवते. जोपर्यंत आपण कठीण परिश्रम करत नाही तोपर्यंत यश मिळणे वा मिळवणे फारच कठीण, म्हणून प्रयत्नांना कष्टाची जोड असावीच लागते. इतरांकडे बघून शिकण्यासारखे बरेच काही असते मात्र आपण त्यांच्याकडून काय घ्यावे काय घेऊ नये हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. एखादी गोष्ट करत असताना त्या आधी त्याची सखोल माहिती घेणे अत्यावश्यक असते. 

     माणूस कोणतीही गोष्ट एका दिवसात करू शकत नाही मात्र, एक दिवस नक्कीच करू शकतो. दिव्यांग व्यक्ती सह्याद्री पर्वत सर करतात म्हणजे त्याांच्यामध्ये जी ध्येय ऊर्जा असते ती अव्वल असते. जी व्यक्ती मैदानात उतरून खेळातून आपले कौशल्य दाखवत असते, त्याच व्यक्तीला त्याा मैदानामध्ये हरवणारे ही उपस्थित असतात, पण हरणारा खेळाडू पुन्हा नव्या जोमाने, जोशाने खेळून जिंकून दाखवतो. पण जी व्यक्ती मनाने, बुद्धीने पूर्णपणे हारते, ती कधीच जिंकू शकत नाही. जी कांही आपली बौद्धिक ताकत असते त्यावरच सगळे अवलंबून असते. चांगले विचारच माणसाला ध्येय निश्चिती करण्यास भाग पाडतात वा ध्येयापर्यंत पोहोचवू शकतात.

     माणसाची खरी हार तेव्हा होत नाही जेव्हा तो विजयी वा यशस्वी होत नाही. माणसाची खरी हार तर तेव्हा होते जेव्हा ती व्यक्ती यशस्वी होण्याचे ध्येयच आखत नाही. केस पांढरे झाले किंवा शरीर थकले म्हणून माणूस म्हातारा होत नाही. तर, जेव्हा नवे लक्ष आखण्याच्या मार्गावर तो मार्गक्रमण करीत नाही खऱ्या अर्थाने माणूस तेव्हा म्हातारा होतो. आपल्या दृढ निश्चया पुढे कोणतीच गोष्ट अशक्य वा असंभव नसते. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करण्याची तयारीच दाखवत नाही, त्या गोष्टीबद्दल दृढ निश्चयच करत नाही. तोपर्यंत यश हे आपले नसते. जी व्यक्ती विचाराने, बुद्धीने मजबूत असते त्या व्यक्तीला बाहेरच्या कोणत्याच गोष्टी म्हणजे टेंशन, डिप्रेशन, नर्व्हसनेस जिंकण्यासाठी रोखूच शकत नाहीत. विजय त्यााच व्यक्तीचा होतो. जी व्यक्ती मनाने व विचारांनी मजबूत असते. आयुष्य जगत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. 

     संकटे पेलत असताना यशाच्या नव्या सोनेरी वाटा शोधाव्या लागतात. पण जर, माणूस संकटांना घाबरून विचारांच्या कमकुवत घरात दडून बसला तर मग संकटे मोठी वाटायला लागतातंच, माणसाची ध्येयनिश्चिती खचू लागते. आणि मग इथूनच हार आणि जीत यांचा प्रवास सुरू होतो. जर, आपले ध्येय पक्के नसेल तर अर्थात आपली ध्येय निश्चिती लांब आहे आणि ध्येय लांब वा दूर म्हटले की मग आपली हार निश्चित आहे. आणि एकदा का आपण हार मानली की मग ही हार मानण्याची सवय लागून जाते. 

     छोट्या छोट्या गोष्टींना घाबरून जर आपण आपले ध्येय बदलले तर मग आपले मन पुन्हा पुन्हा आपल्याला हेच सांगते की "अशा संकटांना घाबरून तू कधीच हार मानली आहेस". मग आयुष्यात काही करून दाखवायचे वय निघून जाते. आणि तिथूनच असफलतेचा, कमकुवत, अयशस्वी व्यक्तीचा प्रवास सुरू होतो. आपण जो इतिहास वाचतो तो इतिहास आपल्यासारख्याच कोण्या एका व्यक्तीने रचलेला असतो. मग आपण आपला इतिहास रचुन आपल्या इतिहासाचे साक्षीदार का नाही होऊ शकत.? जोपर्यंत आपण करत नाही. तोपर्यंत आपल्याला कोणतेच ध्येय वा ध्येय निश्चितीची इच्छा होत नाही. एक विकलांग व्यक्ती सह्याद्री पर्वत सर करू शकतो, समुद्र पार करू शकतो, पुरे वाळवंट चालू शकतो. तर मग सक्षम व्यक्ती कोणतेही प्रयत न करता नशिबाला दोष देत बसणे हे कितपत योग्य आहे?. माणूस शरीराने नाही विचारांनी विकलांग असतो.

     आपल्या प्रबळ इच्छाशक्तीचा वापर पुरेपूर रित्या कसा करावा हे आपल्याच हातात असते. संत कबीर आपल्या दोह्यात म्हणतात, "माणसाचे नशीब नाही विचार खराब असतात. प्रत्येक गोष्टीत जो बदल घडत असतो त्या बदलाला न घाबरता पुढे जात राहणे हाच तर सर्वांत मोठा बदल असतो. आपण स्वतः मध्ये केलेला. आणि हाच बदल आपल्याला यशाचा नवाकोरा आरसा व त्यातील आपला नवा चेहरा दाखवत असतो. जी व्यक्ती आत मधून मनाने, विचाराने मजबूत असते ती व्यक्ती नवी आव्हाने स्वीकारत असते. प्रत्येक गोष्टीचे उत्साहाने स्वागत करण्यास सज्ज वा तत्पर असते. हार मानणे म्हणजेच हारने होय. 

     आपण ज्या क्षणी ठरवतो की "मला जिंकायचे आहे" त्याच क्षणी आपणा जिंकतो. असे म्हटले जाते की, वाघापेक्षा हरीण जास्त वेगाने धावते, मात्र हरणाच्या मनात सदैव ही भीती असते की, वाघ कधी एकदा माझ्या मागे येऊन मला पकडेल या विचाराने हरिण धावताना हजार वेळेस मागे वळून बाजू पाहत असते. हरणाच्या मनातली ही भीती हरणाला हरवत असते. आणि हरण हारते ही. आकाशाला गवसणी घालत असताना मी तिथे पर्यंत पोहोचू शकेल का? ही भीती मनात न ठेवता, न बाळगता उंच आकाशी झेप घ्यावी, उत्तुंग भरारी घ्यावी. यश निश्चित आहे. हार मानत असलो तर मग जगणे अपयशाने भरून जाईल. 

     जीत कुठेच नाही हे म्हणत बसल्यास अपयश मनात घर करून बसेल. मी करत असलेले काम नकीच चांगले होणार. मी यशस्वी होणारच. हा विश्वास जर आपणच स्वतःला दिला तर मग अपयश कधीच यशस्वी नशिबाचे दार ठोठावणार नाही. आयुष्य म्हणजे वाहत्या नदी सारखे आहे. नदीचा प्रवाह वेगाने वाहत असतो त्यााच प्रवाहात आपण तरंगत राहिलो तरच यशाचा अधांग महासागर पाहू शकू. कोणतेही काम करताना त्याा कामाची, आपल्या ध्येयाची, प्रयत्नांची ची, विश्वासाची उंची वाढवावी. मग यश सदैव आपल्यासाठी आपले

असते. 


"मन के हारे हार है 

मन के जीते जीत रे 

कहे कबीर हरी पाईये 

मन ही की परतीत" 


अर्थ: आयुष्यात हार जीत हे तर केवळ आपल्या मनाचे खेळ आहेत. म्हणजे, एखादे कार्य करण्याआधीच आपण जर हार मानली तर आपण त्या कार्यात निश्चितच हारतोत. पण, आपले ध्येय गाठताना आपण पुन्हा पुन्हा पडून उठतो स्वतःला सांभाळत. खऱ्या अर्थाने तेव्हाच आपण त्याा कामात पूर्णपणे यशस्वी होतो. आणि हे यश आपल्याला खूप आनंद देत असते. आपण हरलो वा जिंकलो हे ठरवणारे इतर कोणीही नसतात. सर्व गोष्टी आपल्यावरच निर्भर करतात.



सौ. मनीषा विशाल सोन्नेकर/सोनकांबळे. 

9960028899

देगलूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

"जिद्द पेरताना" सामाजिक दायित्व सांभाळणारी कादंबरी

  अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा येथील राजेश चौरे यांनी " जिद्द पेरताना "  ही सामाजिक, भावनिक, गुंतागुंतीची व तरु...