बुधवार, १७ जून, २०२६

स्वराज्यजननी राजमाता माँसाहेब जिजाऊ

 


वंदन राजमाता माँसाहेबांना ।

नमन करू या तव चरणांना ॥

जिजाऊ सत्कर्माची करू अर्चना ।

स्मरण करू जिजाऊंच्या स्मृतिंना ॥


         युगपुरुष घडविणारी माउली,हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणारी स्वराज्यप्रेरक, संकल्पाचे दुसरे नाव राष्ट्रमाता, राजे शिवरायांच्या व राजे संभाजींच्या शिल्पकार,एक वंदनीय प्रेरणा,स्वराज्याचा पाया रचणाऱ्या स्वराज्यजननी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना त्यांच्या दि.१७ जून २०२६ ला असलेल्या ३५२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

       स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा जन्म दि.१२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तेथील भुईकोट राजवाड्यात झाला.वडील निजामशाहीतील एक मातब्बर सरदार लखुजीराव जाधव तर ​आई म्हाळसाबाई (गिरिजाबाई) या माता-पित्यांच्या सुसंस्कारामध्ये त्यांचे बालपण गेले.

      राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांचा विवाह हा केवळ दोन घराण्यांचा संबंध नव्हता,तर तो महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासाला एक अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरला.ती दोन बलाढ्य घराण्यांची सोयरिक होती.जिजाऊ या सिंदखेडराजाचे प्रसिद्ध व पराक्रमी मराठा सरदार लखुजीराजे जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या सुकन्या होत्या.जाधव घराणे हे देवगिरीच्या यादवांचे वंशज मानले जात होते.शहाजीराजे हे वेरूळचे पराक्रमी सरदार मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांचे सुपुत्र होते. भोसले घराणे हे देखील निजामशाहीतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि वीर घराणे होते.इतिहासकारांच्या नोंदीनुसार जिजाबाई आणि शहाजीराजे यांचा विवाह इ.स. १६०५ च्या सुमारास अत्यंत बालवयात झाला.हा भव्य विवाह सोहळा दौलताबाद (देवगिरी) येथे अत्यंत शाही थाटामाटात पार पडला. लखुजीराजे जाधव आणि मालोजीराजे भोसले हे दोघेही एकाच वेळी निजामशाहीत बलाढ्य सरदार म्हणून कार्यरत होते.दोन तोडीस तोड आणि सामर्थ्यशाली घराण्यांमध्ये जवळीक निर्माण व्हावी, या हेतूने हा विवाह निश्चित करण्यात आला होता. विवाहानंतर जिजाऊ ही भोसले कुळाची 'भाग्यलक्ष्मी' बनून सासरी आल्या.त्यांचे सुरुवातीचे काही काळ सुखाचे गेले,परंतु पुढे निजामशाहीच्या दरबारातील अंतर्गत  राजकारणामुळे आणि 'खंडागळे यांच्या हत्तीच्या' वादामुळे जाधव आणि भोसले या दोन्ही घराण्यांमध्ये तीव्र राजकीय वैर निर्माण झाले.या कौटुंबिक आणि राजकीय संघर्षात जिजाऊंनी अत्यंत धैर्याने पती शहाजीराजांना साथ दिली.या ऐतिहासिक विवाहातूनच पुढे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महान सुपुत्रांचा जन्म झाला.शहाजीराजांचे शौर्य आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार,यामुळेच पुढे 'हिंदवी स्वराज्य' स्थापनेचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊ शकले.

        " धैर्यशील माता ।

           स्वराज्य प्रेरक ।   

           ध्यानीमनी एक ।

           ध्येयवाद ॥

       राजमाता जिजाऊ यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे संस्कार दिले.

        " शिवबांची गुरू ।

           शिवबांची माता ।

           सुराज्याच्या वाता ।

           पेटविल्या ॥ "

जिजामातेने शिवरायांना एक आदर्श राजा म्हणून घडविले.

          " सिंदखेडराजा ।

            एक मातृतीर्थ ।

            जीवनाचा अर्थ ।

            कळतसे ॥ "

        दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात 'जिजाऊ जन्मोत्सव' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सिंदखेडराजा त्यांच्या जन्मगावी तर जिजाऊ जन्मोत्सव अतिशय आनंदात, उत्साहात व जल्लोशात लाखो लोकांच्या साक्षीने संपन्न होतो शेकडो पुस्तकांच्या स्टॉलवरून माँसाहेब जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावरील हजारो पुस्तके विकल्या जातात.


       स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांचे कार्य केवळ एका पुत्राला घडविण्यापुरते मर्यादित नव्हते,तर त्यांनी संपूर्ण स्वराज्याचा पाया रचला होता.त्यांचे कार्य अद्वितीय होते.परकीयांच्या गुलामगिरीत पिचलेल्या जनतेला मुक्त करण्यासाठी 'स्वराज्य' स्थापन करण्याचे फार मोठे स्वप्न माँसाहेब जिजाऊंनी बघितले होते.बालपणी शिवबांवर रामायण,महाभारतातील कथांच्या माध्यमातून शौर्य आणि न्यायाचे संस्कार त्यांनी केले.

       " जिजाऊ मातेचे ।  

संस्कार जीवन ।

 शिवबा पावन । 

 घडविले ॥ "

शिवरायांना केवळ युद्धकलाच नव्हे,तर राजकारण,अर्थकारण आणि समाजकारणाचे बाळकडू सुद्धा पाजले. शहाजीराजे कर्नाटकात असताना पुण्याच्या जहागिरीची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी समर्थपणे सांभाळली.उद्ध्वस्त झालेल्या पुण्यात जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून रयतेत फार मोठा विश्वास निर्माण केला होता.पुण्याच्या कारभारात त्या स्वतः बसून रयतेचे प्रश्न सोडवत असत आणि अचूक न्यायनिवाडा करीत असत.

     " स्वराज्य रक्षण ।

       नीती अधिष्ठान ।

       खरे प्रतिष्ठान ।

        माँसाहेब ॥ "

छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर असताना स्वराज्याचा संपूर्ण कारभार जिजाऊ अत्यंत दक्षतेने सांभाळत. छ.शिवाजी महाराज जेव्हा आग्रा येथे कैदेत होते,तेव्हा स्वराज्याचे रक्षण आणि प्रशासन जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते आणि त्यांनी ते अतिशय उत्कृष्टपणे सांभाळले.त्या कुशल प्रशासक होत्या,हे त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येते.ओसाड जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना सवलती दिल्या आणि शेतीला प्रोत्साहन दिले.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या मनात असलेले स्वराज्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत झाले.रयतेसाठी विहिरी,तलाव आणि मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला.महिलांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची शिकवण त्यांनी महाराजांना दिली.पती शहाजीराजांच्या निधनानंतर सती न जाता,स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देऊन त्यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले होते. तथा सर्व जाती-धर्माच्या मावळ्यांना स्वराज्याच्या कार्यासाठी एकत्र जोडले. शिवरायांच्या लष्करी प्रशिक्षणावर आणि विश्वासू मावळ्यांच्या निवडीवर त्यांचे बारीक लक्ष असे.त्या अत्यंत प्रगत विचारांच्या होत्या आणि त्या केवळ कर्मावर विश्वास ठेवत.युद्धतंत्रात 'गनिमी कावा' वापरण्याबाबत त्यांनी शिवरायांना नेहमी प्रोत्साहन दिले.

         " शंभू शिवबांची ।

           संस्कारांची मूर्ती ।

           गाऊ सर्व कीर्ती ।

           जिजाऊंची ॥  

    सईबाईंच्या निधनानंतर नातू संभाजी राजांनाही त्यांनी आईच्या मायेने वाढविल आणि घडविले.संभाजी राजांना सर्व क्षेत्रातील ज्ञान देण्याच्या त्यांच्या प्रयासामुळे संभाजी राजांनी जीवनाच्या शेवटपर्यंत अनेक युद्ध जिंकून स्वराज्य रक्षण केले.अफझलखानाचे संकट असो वा पन्हाळ्याचा वेढा जिजाऊ कधीही डगमगल्या नाहीत,उलट त्यांनी महाराजांना धीरच दिला. स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळावी यासाठी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आग्रह त्यांनी केला आणि योग्य नियोजन करून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न  केला.त्या केवळ 'वीरमाता' किंवा 'वीरपत्नी' नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या 'राजमाता' आणि खऱ्या अर्थाने 'मार्गदर्शक' होत्या.​

       " राजमाता एक ।

         स्वराज्य जननी ।

         कर्माची कहाणी ।

         वर्णू किती ॥ "

राजमाता जिजाऊंच्या या कार्यामुळेच आज महाराष्ट्र आणि हिंदवी स्वराज्य ताठ मानेने उभे आहे.राजमाता जिजाबाई शहाजीराव भोसले यांचा इतिहास आणि त्यांचे जीवन अखंड महाराष्ट्रासाठी स्फूर्तीदायक आहे.राजमाता जिजाऊ सारखे सुसंस्कार आजच्या मतांनी आपल्या मुला मुलींवर केले पाहिजे.

          " मुलामुलींवर ।

            जिजाऊ संस्कार ।

            थोर ते विचार ।

            आचरावे ॥ "

     दरवर्षी १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी केली जाते.राजमाता जिजाऊ स्मृतिदिन दरवर्षी दि.१७ जून रोजी संपन्न होतो.दि.१७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी त्यांचे महानिर्वाण झाले.छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष घडवून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना त्याच्या ३५२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥


        " जिजाऊ कर्मांना । 

          करितो नमन ।

          करांनी वंदन । 

          कोटी कोटी ॥


       

  प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,

      अमरावती. ०८७७४८६०९

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...