गुरुवार, १८ जून, २०२६

अंगणवाडी मदतनीस



   " सही पोषण देश रोशन " महाराष्ट्राचं कुपोषण दूर करणारी "अंगणवाडी मदतनीस" . मंडळी अंगणवाडी मदतनीसची लाख मोलाची कामगिरी आज आपण विचारात घेणार आहो . आपल्याला वाटते अंगणवाडी मदतनीस म्हणजे अंगणवाडी स्वच्छ करणारी मुलांना आहार शिजवून खायला देणारी जेम तेम झाडूपोछा करणारीच बाई . पण मंडळी महाराष्ट्राच्या कुपोषण नियंत्रणात तिचा लाख मोलाचा वाटा आहे. खंत हीच की तिच सर्व क्रेडिट अंगणवाडी सेविकेला मिळतं. सद्या महाराष्ट्र अंगणवाडी मदतनीसला फक्त सात हजार येवढं मानधन मिळत आहे. इतक्या तुटपुंज्या पगारावर ती कसं बस घर चालवत असणारं हे मात्र नक्की. 

मला ना अंगणवाडी मदतनीस आणि घरकाम करणारी गृहिणी यांची सारखीच अवस्था आहे असं वाटते कारण पुर्ण घराची काळजी घेऊन सर्वांच्या भरणपोषणाची काळजी घेऊन देखील घरात तिची किंमत शून्यच असते. ऑफिस वरुन दमून आलेला नवरा ऑफिस च्या टेंशनमुळे तुला काय घराची जबाबदारी सांभाळावी लागते का म्हणून रागावतोच. ती ऐकून घेते कारण ती व्यक्ती घरात कमवणारी असते. पण दिवसभर घर सांभाळून विनामोबदला काम करणारी गृहिणी तिला काडी ची सुद्धा किंमत दिली जात नाही. अगदी तसच मदतनीस ताईच्या बाबतीत होते. ती अंगणवाडी उघडते व अंगणवाडी स्वच्छ करते. दरवाजा समोर सडा टाकते व रांगोळी काढते. अगदी स्वच्छ आणि सुंदर परिसर ठेवते. अंगणवाडीच्या भिंतीवर ती खेळणी, बाराखडी, पाढे पाठांतर करण्याचे तक्ते सुटसुटीतपणे लावते व अंगणवाडीच्या भिंती जिवंत करते. भिंती बोलू लागतात कारण तिने त्या मनापासून सजवलेल्या असतात. मुलांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करते. मुलांना पोषण आहार शिजवून देते. हात धुवून जेवायला बसवते. मुले नीट जेवण करतील याची दक्षता घेते. काही मुलं डाव्या हाताने जेवण करतात त्यांना उजव्या हाताने जेवण करण्याची सवय लावते. जेवण करताना श्लोक म्हणायला लावते. व छोटे छोट घास करून कसं जेवायचं हे शिकवते. 

 मुलांची वजन करताना सेविकेला हातभार लावते. मुलांना उचलून वजन काट्याच्या पिशवीत बसवून वजन करते. लसीकरणासाठी लाभार्थ्यांना बोलवून आणते. THR ची पाकीट वाटप करते. पोषण ट्रॅकर मद्ये अंगणवाडी उघडते. त्यात लाभार्थ्यांचे THR भरण्यासाठी सेविकेला मदत करते. सेविकेला मातृवंदनाचे फॉर्म भरण्यात मदत करते. लाभार्थ्यांचे अप्पर आयडी बनवण्यात मदत करते. लाभार्थ्यांचे फेस ओथेनटीकेशन करण्यात मदत करते व एफ आर एस करण्यात देखील मदत करते. गृहभेटीसाठी सेविकेसोबत गृहभेट करते. सेविका रजेवर असल्यास मुलांना पूर्व शालेय शिक्षण देते. अमृत आहार शिकवते व लाभार्थ्यांना वाटप करते. आहार वाटप झाल्यावर पुन्हा छानपैकी अंगणवाडी स्वच्छ करते. उद्याच्या आहाराचे नियोजन करते. भांडी स्वच्छ घासून ठेवते. मुलांचा शिधा निवडून चोकारून ठेवते. 

अशी कितीतरी कामे अंगणवाडी मदतनीस करत असते पण शासन तिच्या कार्याची कधीच दखल घेत नाही . तिला तुटपुंजे मानधन दिले जाते. अवघ्या साडे सात हजार रुपयात ती पुर्ण महिना घर चालवते. पण तिचे मानधन शासन वाढवत नाही ही खेदाची बाब आहे. खर तर पोटात अन्न च नसेल तर लेकरू शाळा तरी कसं शिकणार.शिक्षण घेण्यासाठी पोटात अन्न तर हवं. आणि आपल्या आई प्रमाणे आपल्या पोषण आहाराची काळजी घेणारी मदतनीस तिचं कार्य लाख मोलाचं असलं तरी तिला तांदळातील खड्यासारख निवडलं जात. ती कधीच तिच्या वर होणाऱ्या या अन्यायावर आवाज उठवत नाही . मला वाटत नाही की कुणीही तिच्या कार्याची आजवर दखल घेतली असणार. कारण हे सत्य आहे घरात अन्न शिजवून कुटुंबाचा उदर निर्वाह करणाऱ्या बाईला जशी काडीची किंमत हा समाज देत नाही अगदी तसच प्रशासन देखील अंगणवाडी मदतनीस च्या कार्याची किंमत करत नाही. लोकांना वाटते व मला वाटते की शासनाला ही वाटते की मदतनीस फक्त आहार शिजवते प्रत्यक्षात मात्र 3 ते 6 वयोगटातील मुलांच आरोग्य, वजन,लस, पोषण तपासते. 

लोकांना वाटते काम कमी म्हणून पगार कमी प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड गोळा करून ऑनलाईन एन्ट्री, घरभेट, व पोषण सभे मद्ये देखील तिचा सहभाग असतो . लोकांना वाटते ती कमी शिकलेली आहे पण ती WHO चे growth chart वाचते, कुपोषण ओळखते, गर्भवतींची काळजी घेते. सेविकेप्रमाणे मदतनीस देखील प्राथमिक आरोग्य सैन्य आहे जी बालमृत्यू कमी करण्यास मदत करते.गरीब आईला मदतनीस च सांगतेस की बाळाला हिरवी भाजी दे, शिजलेले ताजे अन्न खायला दे, लस चुकवू नकोस, कुपोषण, बालविवाह, लसीकरण साठी पहिला रिपोर्ट मदतनीस देते कारण तिच दररोज मुलांना अंगणवाडी बोलवून आणते. कोणता लाभार्थी आजारी आहे.हे ही तिलाच आधी माहीत होते.व योग्य आहार, घराची स्वच्छता, गर्भवती किंवा स्तनदा माता आजारी पडल्यास घरच्यांनी सुद्धा तिच्याकडे लक्ष देणे गरजेचे असते हे समजून सांगते लस घेण्याचा सल्ला देखिल ती देते .लोकांना वाटते की आहार शिजवून वाटप करते भांडी घासते झाडू पोछा करते हे तर बायकांचं काम घरगुती काम म्हणून तिच कार्य गांभीर्य म्हणून घेतलं जात नाही. 

शासनाला राष्ट्र घडवणारे डॉक्टर दिसतात शिक्षक दिसतात पण देशाच कुपोषण दूर करणारी मदतनीस दिसत नाही. तिला सन्मान देखील शासन देऊ शकत नसेल तर हा जाणूनबुजून तिच्यावर झालेला अन्याय आहे. शासनाने तिच्या कार्याची दखल घ्यावी व तिच मानधन वाढवावं. तिला सन्मानजनक वागणूक मिळावी म्हणून यापुढे तिच्या पडला मदतनीस हे नाव न देता बालसंगोपिका किंवा बाल संगोपन सहायक किंवा अंगणवाडी सहायक हे नाव देण्यात यावं कारण आजवर ती तूटपुंज्या पगारात काम करत आली आहे. पण यानंतर तरी प्रशासनाने तिच्या कार्याची दखल घेऊन तिचे मानधन वाढवून तिला सन्मानजनक वागणूक द्यावी . कारण देशाचं कुपोषण नष्ट करण्यात तिचा खारीचा वाटा आहे. बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी ती नेहमी तत्पर आहे . निर्दोष लसीकरण मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी तीच सहकार्य मोलाचं आहे. म्हणून अंगणवाडी मदतनीसला योग्य न्याय मिळालाच पाहिजे. शासनाने योग्य निर्णय घेऊन तिची पिळवणूक थांबवावी हीच आशा बाळगते व इथेच पुर्ण विराम घेते पुन्हा भेटू नव्या आशयासोबत.


    - रेखा उत्तमराव राऊत 

    मु . खंडणी, ता मारेगाव 

    जि . यवतमाळ



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...