बालकांच्या हातातील रोपांची निगा आणि मोठ्यांच्या हातातील कुऱ्हाडाचा घाव—या दोन टोकांच्या प्रतिमांमधील हा विरोधाभास केवळ एका चित्रापुरता मर्यादित नसून आपल्या एकूणच जीवनशैलीतील ढोंगीपणा दर्शवतो. एका बाजूला आपण विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचे धडे देतो आणि दुसऱ्या बाजूला महामार्ग, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या नावाखाली हजारो-दशकानुवर्षे जुनी झाडे एका रात्रीत जमिनीदोस्त करतो. ज्या मुलांना आपण 'झाडे जगवा' असा संदेश देतो, तीच मुले आपल्या डोळ्यांसमोर ती झाडे तोडली जाताना पाहतात. या दुटप्पी धोरणामुळे बालमनावर अत्यंत नकारात्मक आणि दिशाहीन परिणाम होतो. हा केवळ विचारांचा गोंधळ नसून, आपल्या कृती आणि विचारांमधील कमालीची विसंगती आहे, जी भावी पिढीच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
केवळ वृक्षनाश नव्हे, तर यातून परिसंस्थेचा अंत होतो. जेव्हा एखादे जुने झाड तोडले जाते, तेव्हा केवळ लाकूड नष्ट होत नाही; तर त्या झाडावर आश्रयाला असणारे असंख्य पक्षी, दुर्मिळ कीटक, मधमाशा आणि संपूर्ण जैवविविधता नष्ट होत असते. जुनी, डौलदार झाडे ही नैसर्गिक एअर कंडिशनरचे काम करतात. ती तोडल्यामुळे आज आपली शहरे 'अर्बन हीट आयलंड' (उष्णतेची बेटे) बनत आहेत. परिणामी, वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि तीव्र दुष्काळ यांसारख्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.
कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी रस्ते, रेल्वे, इमारती आणि उद्योग यांसारख्या पायाभूत सुविधांची आवश्यकता नाकारता येत नाही; मात्र हा विकास निसर्गाचा आणि पर्यावरणाचा बळी देऊनच साधला पाहिजे का, हा मूळ प्रश्न आहे. 'शाश्वत विकास' ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. जपान किंवा युरोपियन देशांप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जुनी झाडे न तोडता त्यांचे पुनर्रोपण करणे शक्य आहे. परंतु, इच्छाशक्तीचा अभाव, प्रशासकीय अनास्था आणि सोयीस्कर राजकारण यामुळे पर्यावरणाचा समतोल जाणीवपूर्वक बिघडवला जात आहे.
पर्यावरणाचे रक्षण न करता होणारी कोणतीही प्रगती ही शेवटी विनाशाकडेच नेणारी ठरते. "मुलांनी रोपे लावायची, त्यांची जोपासना करायची आणि मोठ्यांनी तीच झाडे तोडायची—मग मुलांनी रोपे लावायची तरी कशासाठी?" हा अत्यंत मार्मिक आणि विचार करायला लावणारा सवाल आज प्रत्येक संवेदनशील नागरिकाच्या मनात निर्माण होतो. आज आपण आपल्या भावी पिढीला शुद्ध हवा, निर्मळ हवा आणि हिरवागार परिसर वारशाने देण्याऐवजी सिमेंटची जंगले, विषारी हवा आणि प्रदूषित वातावरण देत आहोत. हा केवळ पर्यावरणाचा नाश नव्हे, तर येणाऱ्या पिढीच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारारशी आणि त्यांच्या भविष्याशी केलेला अक्षम्य विश्वासघात आहे.
पर्यावरण संवर्धन ही आता निव्वळ कागदोपत्री मोहीम किंवा छंदाची गोष्ट राहिलेली नाही, तर ती आपल्या अस्तित्वाची आणि जीवाची लढाई बनली आहे. जर आपण आज वेळीच सावध होऊन विकासाच्या या विनाशकारी मॉडेलवर फेरविचार केला नाही, तर भविष्यात मानवाला पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर बाळगून जगण्याची वेळ येईल. बालकांच्या हातातील रोपांचे चीज करायचे असेल आणि खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम भविष्य घडवायचे असेल, तर विकासाच्या नावाखाली चाललेली निसर्गाची ही कत्तल तात्काळ थांबवावीच लागेल.
संजय गरबड मराठे
कवी,स्तंभलेखक


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा