साधेपणाबरोबर अनुभवांची विविधता आणि भावनिक प्रामाणिकपणा यांमुळे नवोदित कवींचे काव्यसंग्रह नेहमीच आपलेसे वाटतात. यामुळेच आपणही व्यक्त व्हायला पाहिजे असे वाटायला लागते. कारण या व्यक्ती आणि त्यांचे लेखन कुठेतरी आपल्याही मनात घर करून गेलेले असते. मुळात ऊर्जानगर, चंद्रपूर येथील असलेल्या आणि सध्या कोराडी नागपूर येथे वास्तव्यात असलेल्या कवयित्री सौ. सुरेखा शेषराव बोरकर यांचा 'गुलाब आणि इतर कविता' हा पहिलावहीला काव्यसंग्रह या परंपरेत एक मोलाची भर घालणारा आहे. त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.कौटुंबिक पार्श्वभूमी आणि खडतर आयुष्य यातून त्यांचा काव्यप्रवास सुरू झालेला आहे..
वाचनाची आवड आणि दैनंदिन जीवनातील निरीक्षणांतून जन्माला आलेली सौ. सुरेखा बोरकर यांची कविता म्हणूनच रसिकांच्या मनाला थेट भिडते.
कौटुंबिक पार्श्वभूमी आणि लेखन प्रेरणा
कोणत्याही कलाकृतीचा उगम हा कलाकाराच्या जीवनप्रवासात दडलेला असतो. सौ. सुरेखा बोरकर यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. सिंदी (रेल्वे) येथील नगर परिषदेच्या शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर, अगदी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतरचा कौटुंबिक प्रवास सांभाळला. लग्न झाल्यानंतर ऊर्जानगर सारख्या सुशिक्षित कॉलनीत आल्यावर त्यांच्यातील सुप्त वाचक आणि लेखक अधिक जागृत झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेत आलेला पहिला क्रमांक हा त्यांच्या लेखनाचा टर्निंग पॉईंट ठरला. मैत्रिणींच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली आणि 'दैनिक पुण्यनगरी'मध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची 'भरारी' ही पहिली कविता त्यांच्या साहित्यिक प्रवासाची नांदी ठरली.
काव्यसंग्रहाचे स्वरूप आणि संरचना
'गुलाब आणि इतर कविता' या संग्रहात एकूण ५४ कवितांचा समावेश आहे. हा संग्रह त्यांनी आपले आई-वडील, शिक्षकवृंद आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित केला आहे. या संग्रहाला लाभलेली कवी आणि समीक्षक श्री. राजू गरमडे सर (ऊर्जानगर, चंद्रपूर) यांची प्रस्तावना पुस्तकाचे वाङ्मयीन मूल्य अधोरेखित करणारी आहे. आर. के. प्रकाशन आणि शब्दशिल्प साहित्य समूहाचे प्रमुख कलाम अहमद खान यांनी या संग्रहाच्या प्रकाशनाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळलेली आहे. या काव्यसंग्रहाच्या अंतरंगात डोकावतांना असे लक्षात येते की, सौ. सुरेखा बोरकर यांची कविता ही केवळ कल्पनाविलास नाही, तर ती मानवी जीवनातील सुख-दुःख, नातेसंबंध, स्त्रीशक्ती आणि समाजातील बदलत्या मूल्यांवर भाष्य करणारी कविता आहे. त्यांच्या कवितेचे प्रमुख पैलू खालीलप्रमाणे सांगता येतील:
अध्यात्म आणि अंतर्मुखता: कवयित्रीला लहानपणापासूनच भजनाची आणि अध्यात्माची आवड आहे. हीच सात्त्विकता त्यांच्या काव्यातूनही प्रकट झालेली दिसून येते. मनाला शांतता देणारी त्यांची विचारसरणी स्पष्ट करताना ते म्हणतात,
"मन पणती पणती, तेवें प्रकाशित ज्योती.
मन रमता एकांती, लाभे ह्या मनाला शांती."
असं जीवनाचे छोटसं सूत्र घेऊन ते आपलं लेखन कार्य करीत आहेत.
जीवनातील सुख-दुःख : समतोल दृष्टिकोन
सुख आणि दुःख हातात हात घालून प्रत्येकाच्या जीवनात वावरत असते. त्याची तीव्रता प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात प्रत्ययाला येत असते. जीवनातील याच चढ-उतारांकडे अत्यंत परिपक्वतेने कसे पाहावे, याचा संदेश त्यांच्या कवितेतून सहज प्रत्ययास येतो. त्यांची 'सुख-दुःख' ही कविता वाचताना असे लक्षात येते की, सुखात हुरळून न जाता आणि दुःखात खचून न जाता चक्रासारख्या फिरणाऱ्या आयुष्याला सामोरे जावे. सल्ला त्या देतात. त्या म्हणतात,
"थोड्याशा सुखाने, भान हरपून जाऊ नये,
थोड्याशा दुःखाने, मनात हुरहुर वाटू नये."
प्रयत्नवादाचा पुरस्कार
जीवन किती खडतर असले तरी प्रयत्नांती परमेश्वर या भूमिकेचा म्हणजेच प्रयत्न वादाचा पुरस्कार आपल्या कवितेतून कवियत्रीने केलेला आहे. मानवी जीवनात प्रयत्नांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे सांगताना त्या 'प्रयत्न' या कवितेत, अपयशाने खचून न जाता पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देतात.
"जरी येता अपयश, मन दुःखी जीवनात.
अविरत स्वप्रयत्ने, पुन्हा मोद आयुष्यात" अशी स्पष्ट भूमिका मांडताना दिसतात.
स्त्रीशक्ती आणि अस्तित्वाचा गौरव
'तेजस्विता' या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने स्त्रीच्या आदिशक्ती रूपाचा आणि तिच्या कर्तृत्वाचा गौरव केला आहे. संपूर्ण कुटुंबाला सांभाळणाऱ्या स्त्रीचा समाजाने आदर केला पाहिजे, हा विचार मांडताना त्या लिहितात,
"आदिमाया आदिशक्ती, महाशक्तीचेच रूप,
नारी म्हणजे शक्तीचे, शुद्ध ऊर्जेचे स्वरूप."अशा अत्यंत साध्या पण आशयघन शब्दांमध्ये स्त्रीच्या कर्तृत्व शक्तीवर त्या प्रकाश टाकतात. आजच्या विज्ञानयुगात माणूस भौतिकदृष्ट्या जवळ आला असला, तरी मनातील अंतरे वाढली आहेत. समाजात गरीब-श्रीमंत अशी दरी निर्माण झाली असून माणुसकी संपत चालली आहे, याबद्दल कवयित्री 'माणुसकी' या कवितेतून खंत व्यक्त करते. मानवी गर्दीत भेदाभेद नष्ट व्हावा आणि माणुसकीचा झरा पुन्हा ओसंडून वाहावा, ही त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे.
लोकनिंदेची पर्वा न करता ध्येय गाठण्याचा संदेश: संत तुकाराम महाराजांच्या 'निंदकाचे घर असावे शेजारी' या उक्तीचा आधार घेत, बोरकर यांनी 'लोक म्हणोत काहीही' या कवितेत वाचकांना निंदकांकडे दुर्लक्ष करून आपले ध्येय गाठण्याचा मौलिक सल्ला दिला आहे.
"लोक काय म्हणतील, नाही करावा विचार,
सांगा त्यांचे काय जाते, फुशारकी मारी फार."
ध्येय निश्चित करुनी, यश शिखर गाठावे..." ही त्यांची भूमिका या संग्रहाच्या निमित्ताने अत्यंत पारदर्शीपणे स्पष्ट झालेली आहे.
काव्यशैली आणि भाषिक सौंदर्य
सौ. सुरेखा बोरकर यांची भाषा अत्यंत साधी, सरळ आणि सर्वसामान्य वाचकांना समजेल अशी आहे. त्यांच्या रचनेमध्ये नाद आणि लयबद्धता आहे, ज्यामुळे कविता वाचताना एक आनंद मिळतो. विविध व्हॉट्सॲप आणि फेसबुक समूहांच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाइन काव्यस्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली आहेत, ज्याची प्रचिती या संग्रहातील कवितांच्या प्रगल्भतेतून येते.
'गुलाब आणि इतर कविता' हा केवळ एक कवितासंग्रह वाटत असला तरी तो एका सामान्य गृहिणीचा साहित्यिक 'भरारी' घेण्याचा पुढील यशाकडे वाटचाल करणारा प्रवास आहे. संसारातील जबाबदाऱ्या सांभाळत, पती श्री. शेषराव बोरकर, मुलगी सौ. अंकिता भस्मे आणि मुलगा अभिजीत यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे कवयित्रीने ही सुंदर साहित्यकृती मराठी रसिकांसमोर आणली आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींवर साधक-बाधक चर्चा करत, वाचकांना योग्य मार्गदर्शन करणारी ही कविता आहे. समाजात सुख, शांती नांदावी हीच या काव्यामागची मुख्य भावना आहे.
मराठीत आपल्या पहिल्याच संग्रहातून उमटवलेला हा ठसा अत्यंत आश्वासक आहे. शब्दांच्या जागा प्रतिमा प्रतीके आणि मात्रा सांभाळल्या तर ही कविता आणखी प्रबल आणि प्रगल्भ होईल अशी अपेक्षा आहे. कवयित्री सौ. सुरेखा बोरकर यांच्या या पहिल्या साहित्यकृतीचे मनःपूर्वक स्वागत आणि त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
काव्यसंग्रह : गुलाब आणि इतर कविता
कवियत्री : सौ. सुरेखा बोरकर
प्रकाशक : शब्दशिल्प प्रकाशन नागपूर
मूल्य : 100 रुपये
प्रा. संजय पंजाबराव गोहणे
अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय
काटोल रोड, नागपूर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा