मानवतेकरीता लिहिणारे कवी मोजकेच आहेत. फुले, पाने, नदी, डोंगर, निसर्ग यावर लिहिणारे कवी खचाखच भरलेले आहे. मानव मुक्तीसाठी लिहिणे फार धैर्याचे काम आहे. कवी सुरेश भिवगडे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी आहेत. वर्धा जिल्ह्यातील आंबेडकरी जाणिवा घेऊन लिहिणारे काही कवी. कवी प्रकाश बनसोड, गझलकार विद्यानंद हाडके, कवी संजय ओरके, कवी प्रशांत ढोले,कवी अरविंद पाटील,कवी रसपाल शेंदरे, मानवतेचे प्रचारक कवितासंग्रहाला आयु. यशोदाताई व्यंकटेश आत्राम आर्वी जि. वर्धा यांची मोजक्या शब्दात प्रभावी प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत कविच्या स्वभावाचे व त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा आढावा सांगितला आहे. या परिस्थितीवर मात करुन ते संपूर्ण वेळ समाज कार्याला देतात व कवी सुरेश भिवगडे धम्मप्रसारक आहेत. त्यांच्या कवितासंग्रहाबद्दल त्या म्हणतात धर्मद्वेषाच्या आगीत पेट घेत असताना मानवतेला हाक देणारी कविता म्हणजेच मानवतेचे प्रचारक.
प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांताने
तुम्ही अविद्येचे मूळच नष्ट करण्याचा मार्ग शोधिला.
(इतिपी सो भगवा)
"इतिपि सो भगवा.." ही कविता गौतम बुद्धांच्या गुणांचे वर्णन करणारी ही रचना आहे. महाकारुणिक बुद्धांनी तृष्णेच्या साखळ्या तोडल्या आणि दुःखाचे मूळ शोधून दुःखमुक्तीचा मार्ग दिला.अरहं संबोधीच्या उच्च अवस्थेला पोहोचलेले, संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी घालवले. तृष्णेत अडकलेल्या मानवाला भवसागर पार करण्याचा मार्ग दाखवला.विद्याचरणसंपन्न प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत देऊन अविद्येचे मूळ नष्ट करण्याचा मार्ग शोधला.ही कविता "इतिपि सो भगवा अरहं सम्मासंबुद्धो" या बुद्धवंदनेवर आधारित आहे. प्रत्येक कडव्यात बुद्धांच्या एका गुणाचे स्तवन केले आहे.ही कविता बुध्दाचे त्याग ज्ञान आणि करुणेचा संदेश देते. दुख संपवायचा असेल तर तृष्णा सोडून धम्माच्या मार्गावर चालावे लागेल.
आपण वंदन करु
या महामानवाला
आपण वंदन करु
महामानवाच्या कार्यकर्तृत्वाला
सम्यक संकल्प घेऊ
पुढे नेऊ बाबासाहेबांच्या रथाला (क्रांतीभूमी)
"क्रांतीभूमी" ही कविता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आणि त्यांच्याशी जोडलेल्या महत्त्वाच्या स्थानांना वंदन करणारी ही रचना आहे.बाबासाहेबांनी जिथे जन्म घेतला, संघर्ष केला, त्या सर्व क्रांतीभूमींना वंदन करायला ही कविता सांगते.समतेचा लढा महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह आठवते, जिथे मनुस्मृती जाळून पाण्याचा हक्क प्रस्थापित केला.स्वाभिमानाची प्रतिज्ञा येवला येथे घेतलेली 'मी हिंदू म्हणून मरणार नाही' ही ऐतिहासिक प्रतिज्ञा यात आहे.राजगृहात रमाई माऊलींनी केलेला त्याग आणि तिथेच घेतलेला अंतिम श्वास याचे स्मरण करते.दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा, 22 प्रतिज्ञा आणि पंचशील देऊन मिळवलेले स्वातंत्र्य अधोरेखित करते.थोडक्यात, कवितेचा संदेश आहे की बाबासाहेबांचे उपकार विसरू नका. त्यांनी गुलामगिरीतून कोट्यवधी कुळांना मोकळे केले. त्यांच्या संघर्षाच्या भूमीला वंदन करणे म्हणजे त्यांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारणे.हे कवी सुरेश भिवगडे या कवितेतून सांगतात.
ते निघालेत धर्माच्या नावाने
माणसांचे मुडदे पाडायला
तु मात्र निघ मानव सेवेसाठी
महाकारुणिक बुध्दाच्या मैत्रीचा धागा घेऊन
(मानवतेचे प्रचारक)
"मानवतेचे प्रचारक" कविता धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेला विरोध करून माणुसकीचा प्रचार करण्याचा संदेश ही कविता देते.ते लोक धर्माच्या नावाने माणसांचे मुडदे पाडायला निघाले आहेत. पण तू बुद्धाच्या मैत्रीचा आणि करुणेचा धागा घेऊन मानवसेवेसाठी निघ .ते माणसा-माणसात भिंती उभ्या करतात, धर्मद्वेषाचे विष पाजतात. पण तू समतादूत होऊन बंधुभावाची पेरणी कर आणि वैमनस्य नष्ट कर.सगळीकडे धर्मद्वेषाची आग पेटलेली असताना तू मानवतेचा शितल झरा घेऊन जा.ते राष्ट्र धर्मनिष्ठ करायला निघाले आहेत, पण तू अखंड आणि बलशाली भारत ठेवण्यासाठी सज्ज हो.
थोडक्यात, ही कविता सांगते की धर्माच्या नावावर भांडणारे लोक विषमता पेरतात. त्याला उत्तर द्वेषाने नाही, तर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे मैत्री, करुणा आणि समतेने द्यायचे. खरा प्रचारक तो जो माणसाला जोडतो, तो तोडत नाही. या कवितेतून मानवतेचे खरे प्रचारक कवी सुरेश भिवगडे आहेत.
हीच विष पेरणारी
माणसे धर्माच्या नावाने
पसरवितात वर्णवाद, जातीभेदाचे विष
(विष पेरणारी माणसे)
या कवितेत कवी सुरेश भिवगडे सांगतात की खरी समस्या आपल्यातच लपलेला शत्रू आहे. द्वेष आहे जो आपसात फुट पाडतो. आणि धर्म जातिच्या नावाने माणुसकी संपवतो. त्यांना ओळखणे आणि सावध राहणे हा संदेश या कवितेतून दिला आहे.
राब राब राबली माझी ती माऊली
दुःखातही माझ्या झाली ती सावली (माय)
प्रत्येक कवी आई वर कविता लिहितोच. कवी सुरेश भिवगडे काही वेगळे नाही त्यांनी आईने सोसलेले दुःख तिचे फेडता न येणारे पांग. माय या कवितेतून सांगितले आहे.
बाबा माझे होते
अंधारात जळावे दिप असे (बाबा)
आई बरोबर बाबाचे महत्व सांगणारी कविता त्यांनी लिहिलेली आहे. बाबांनी महापुरुषांचा आदर्श दिला. ज्ञानाचा वारसा दिला. हा आयुष्यात मोठा ठेवा देवून बाबा गेले. पण हृद्यायात बाबा नेहमीच राहतील. असे कवी सुरेश भिवगडे अभिमानाने सांगतात.
फेकून गुलामीचे जोखड
जन्मभरासाठी 'उलगुलान' हा
सुरुच असणार (उलगुलान)
अन्यायाविरुद्ध केलेल्या बंडाचा आणि विद्रोहाचा आवाज यात आहे. 'उलगुलान' म्हणजे मोठा उठाव किंवा महाबंड.हा शब्द बिरसा मुंडा यांच्या लढ्याशी जोडला जातो.गुलामी आणि सहनशीलता जोवर आम्ही त्यांच्या सत्तेखाली अन्याय, अत्याचार सहन करत होतो, तोवर त्यांनी आम्हाला साधू-संताची उपमा दिली. मुकपणे सगळे अपमान सहन केले.पण जेव्हा आम्ही बंडाचे निशाण रोवले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, तेव्हा मात्र आम्हाला 'विद्रोही' ठरवले गेले. आमच्या लाचारीवर हसणारे लोक आम्ही लढलो तर बदनाम करू लागले. अन्यायाविरुद्ध लढल्यामुळे जर आम्ही 'विद्रोही' ठरलो, गुलामीचे जोखड फेकून दिल्यावर आता जन्मभरासाठी 'उलगुलान' म्हणजे महाबंड हाच आमचा सुरूच राहणार. थोडक्यात, कविता सांगते की अन्याय सहन करणाऱ्याला जग चांगले म्हणते. पण जेव्हा तो अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हा त्याला विद्रोही ठरवले जाते. पण एकदा बंडाची ठिणगी पेटली की ती विझत नाही. स्वाभिमानासाठी केलेला विद्रोह हीच खरी ओळख आहे.हे या कवितेतून कविने सांगितले आहे.
किती दिवस जळत राहशील अशीच
तुझ्या जळण्याचा ही इथे आनंदोत्सव होतो
(पुरुषप्रधान संस्कृती)
ही कविता "पुरुषप्रधान संस्कृती" वर एक जोरदार आघात आहे. स्त्रीवर होणारे अत्याचार - बलात्कार, विनयभंग, ऍसिड अॕसिड हल्ले - याकडे समाज कसा उत्सवासारखा बघतो हे कवयित्री सांगते. "तुझ्या जळण्याचा ही इथे आनंदोत्सव होतो" ही ओळ समाजाच्या बधिरतेची जाणीव करुन देते. कविता नराधमांना थेट सवाल करते: "किती दिवस जळत राहशील अशीच?", "किती बळी जाणार आहे?". पुरुषी अहंकार आणि वासनेच्या नावाखाली किती चेहेरे विद्रूप करणार, याचा जाब विचारते.
समतेने जगण्याचा अधिकार तुलाही आहे तू ही समान आहेस. रडत बसू नकोस. अन्याय सहन करू नकोस. तू अबला नाहीस. ऊठ, लढ, आणि पुरुषप्रधान व्यवस्थेने आखलेल्या रेषा ओलांडून स्वतःचं स्वतंत्र, सन्मानाचं आयुष्य सिद्ध कर.ही कविता शोकगीत नाही, तर क्रांतीची घोषणा आहे. एकुण ९३ कविता या कवितासंग्रहामध्ये आहे. काही कविता दिर्घ तर काही अल्पाक्षरी आहेत. हा कवितांचा नजराणा कवी सुरेश भिवगडे यांनी आपल्याला मोठ्या विश्वासाने मानवतेचे प्रचारक होण्यासाठी सोपविला आहे. हा कवितासंग्रह मानवतेच्या प्रचारक साठी महत्वपुर्ण आहे.मानवतेचे प्रचारक हा कवी सुरेश भिवगडे यांचा पहिला कवितासंग्रह आहे. याचे मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे मार्शल संजय ओरके, पुलगाव यांनी मोठ्या प्रतिभेने काढलेली आहे. त्यामुळे कवितासंग्रहाला दर्जा प्राप्त झाला आहे. ब्लर्ब प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी पाठराखण केली आहे. निळाई प्रकाशन नागपूर यांनी हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.
कवी सुरेश भिवगडे यांची भाषा थेट आणि अस्सल आहे. अलंकारापेक्षा अनुभव बोलतो. शब्दात घोषणाबाजी नाही तर विचारांची धार आहे. धर्माच्या नावाखाली देशात फुट पाडू राजनीती पाहता मानवतेचे प्रचारक सारख्या कवितासंग्रह ही काळाची गरज बनतो.
✍️रत्ना यशवंत मनवरे अमरावती.
मो. न. 7350592336
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा