हे भावगीत आपण सतत सकाळच्या प्रहरी ऐकतो. मन प्रसन्न होऊन आध्यात्मिक भावना वृंदिगत होते. मनातील नकार नाहीसे होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
हे भक्तीगीत आहे मराठवाड्यातील (उस्मानाबाद) धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावातील संत गोरोबा काका बद्दल आदरभाव व्यक्त करणारे. वारकरी संप्रदायातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत तुकाराम ,संत एकनाथ यांचे समकालीन संत म्हणजे संत गोरा कुंभार. तेर हे गाव तेरणा नदीकाठी वसलेले. या तेरचे प्राचीन नाव तगर आहे असे सांगितले जाते.प्राचीन काळी तगर गाव जमिनीत गडप झाले होते असी ही माहिती मिळते. तेर पंचक्रोशीत बारा वाडी व तेरावे तेर गाव असून तेरणा नदीकाठी वसलेले आहे. संत गोरोबा काका महाराज यांचा जन्म तेर येथे झाला. वडील माधवबुवा कुंभार व आई रखुमाई. कुंभार घराण्यात जन्मलेले संत गोरोबा काका विठठ्लाचे मोठे भक्त होते. आईवडिलाप्रमाणे पारंपरिक व्यवसाय करायचे. मातीपासून मडके बनवणे.
"माती पाणी उजेड वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत ना पार.. "
कविवर्य ग. दी. माडगूळकर यांचे भक्तीगीत संत गोरोबा काका महाराज यांच्या कुंभार या व्यवसाय कलाकृतीबद्दल प्रेम, भाव व श्रद्धा व्यक्त करणारे आहे.
"घटा घटाचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्या विना कोणा ना कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी
कुणी मुखी अंगार...... "
गोरोबा काकाचे आईवडील धार्मिक वृत्तीचे होते. संपूर्ण कुटुंब काळेश्वर या ग्रामदैवताचे उपासक होते. कुंभाराचे काम करून उदरनिर्वाह चालवायचे. त्यांना आठ आपत्य झाले पण दुर्दैवाने ते जगले नाहीत.मुलांच्या मृत्यूचे भयानक दु:ख होते. पण सांगितले जाते की साक्षात पांडुरंग परमात्मा माधवबुवाच्या घरी आले. माधवबुवांना दु :खाचे कारण विचारले व मृत्यू पावलेल्या सात ही मुलांना जीवंत करून स्वर्गात पाठवणी केली. पण आठव्या मुलाला स्वर्गात न पाठवता पृथ्वीवर ठेवले. (मातीत पुरलेले)गोरीतून बाहेर काढल्यामुळे त्यांचे नाव "गोरा" ठेवले. लहानपणी अतिशय हुशार व सतत विठ्ठलाची भक्ती करणारे गोरोबा काका एक महान संत झाले. विठ्ठलाचे निस्सीम भक्त, अनेक अभंग लिहिले. माती तुडवीत विठ्ठल....विठ्ठल म्हणत स्वतः चे बाळ मातीत तुडवले. पंढरीच्या पांडुरंगाने ते जीवंत केले. गोरोबा काका हे सर्व संतामध्ये वयाने मोठे असल्यामुळे सर्व संत गोरोबास "काका" म्हणतात.
संताची परिक्षा घेण्याचा अधिकार संत गोरोबा काकांना प्राप्त झाला. कोणाचे मडके ( डोके)किती पक्के आहे याचे परीक्षण गोरोबा काकांनी केले. सर्व वैष्णव संत संप्रदायातील संतांचे गुरुजी म्हणून संत गोरोबा काकांना ओळखले जाते.
संत गोरोबाचा विवाह संतीशी झाला. त्यांना एक सुंदर, गोंडस बाळ झाले. नंतर रामी यांच्या बरोबर दुसरे लग्न झाले. काकांना दोन पत्नी होत्या. रांगत बाळ मातीत आले आणि आपले देहभान विसरून ते काकांनी मातीत तुडवले. काकांनी पत्नीच्या शरीराला हाताचा स्पर्श झाला म्हणून दोन्ही हात तोडले. मडके भाजणा-या आव्यात (भट्टी) मांजरी मेली ती ही पांडुरंगाने जीवंत केली. गोरोबा काकांना हात दिले. अनेक अख्यायिका आहेत. काकांनी बनवलेली विट पाण्यावर तरंगते. पांडुरंगाची श्रद्धा, निष्ठेने भक्ती करणारे महान संत गोरोबा काका होते. शके १२३९ चैत्र कृष्ण त्रयोदशीला २० एप्रिल १३१७ रोजी संत गोरोबा काकांनी समाधी घेतली. (उस्मानाबाद ) धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीकाठी तेर याठिकाणी काकांची समाधी आहे. भव्य दिव्य मंदिर आहे. सतत भजन कीर्तन, हरिनाम सप्ताह, प्रवचन धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम सुरू असतात. प्रती एकादशीला वारकरी पायी चालत दिंडीसह तेरला येऊन संत गोरोबा काकाच्या समाधीचे दर्शन करतात.समाधीजवळ महादेवाचे प्राचीन काळापासूनचे मंदिर आहे.अनेक भाविक भक्त दर्शन करण्यासाठी येतात. संत गोरोबा काकाचे अनेक अभंग आहेत. रसाळ वाणीचा झरा म्हणजे संत गोरोबा काकाचे अभंग होत. सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अभंग आहेत.
"निर्गुणाचा संग धरिला जो आवडी|
तेणें केले देशोधडी आपणियाशी||"
निर्गुणाचा संग धरल्यावर काय अवस्था होते हे अभंगांच्या माध्यमातून सांगितले आहे.
"मज रूप नाही नाव सांगू काई|
झाला बाई काई बोलू नये||
बोलता आपली जिव्हा पैं खादली|
खेचरी लागली पाहतां पाहतां||"
असे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. अभंगातून आपले परखड विचार समाजाला सांगण्याचे महान कार्य संत गोरोबा काकांनी केले आहे.
रत्नाकर बाबुराव पाटील
[सहशिक्षक]
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली
ता.जि.धाराशिव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा