गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

कथा : हिस्सा : सौ.विद्या निनावे


"मंदे लवकर लवकर उरकव नं.. आज तुहा हात काही चालून नाही राहिला वाटते.. उशीर होईल आटप लवकर "

"करून तं रायली काम..  जो वेळ लागाचा तोच लागल ना " मंदाने नवऱ्याला सुनवलं. 

"करून राहिली ..पण कशी रमत गमत..  कोर्टात जाचं हाये ना.. मायबाई तो कोर्ट आपल्यासाठी थांबून राहील काय ? "

"तुमाले त जास्तच घाई सुटली वाटते कोर्टात जाआची " ती फणकाऱ्याने बोलली .

"काय म्हणलं घाई सुटली.. अवं थो हक्क हाये आपला.. असा सोडून देशीन काय ? " महादेव आता जरा नरमाईनं बोलला. आज खरच मंदाचा हात पाहिजे तसा चालत नव्हता जुन्या गोष्टी आठवून तिच्या पापण्या सतत ओल्या होत होत्या.. काम करता करताच तिने कितीदा पदर डोळ्याला लावला होता. लहानपणीच्या आठवणीने तिचं मन गहिवरून आलं .


"भातकं घेऊन मांगतलं अनं  खाऊन काऊन  नायी रायला रे ?" मायनं मंगेशला विचारलं .

"खातो ना ते मंदी आल्यावर "

"मंदी बी बापासंग गेली हाय.. तिलेही काही घेऊन देईनच ना तुझ्या बाप.. तू आपलं खा ..ते आपलं खाईन " आजी नं सल्ला देल्ला. 

"बरं खातो .."

आज आठवडी बाजाराचा दिवस.. त्यामुळे शेतात लावलेले दोडके ,कारले, चवळीच्या शेंगा, कोहळा, लवकी घेऊन मंगेश मायसोबत बाजारात विकायला गेला होता. मंगेशचं गणित चांगलं पक्कं होतं ..भरभरा हिशोब करायचा त्यामुळे दर आठवडी बाजारात त्याची आई त्याला घेऊन जायची आणि बाजार संपल्यावर काहीतरी खाऊ घेऊन द्यायची. आजही तिने त्याला बटाटेवडे घेऊन दिले होते. पण मंदाला सोडून खाणं त्याला जीवावर यायचं, म्हणून तो तिची वाट पाहत थांबला होता.

" घे आली मंदि ..काय आणलं ओ त्या..? " मंदाच्या  हातातील पुडका पाहून आजीनं विचारलं .

"काय घेऊन देऊ म्हणलं त तिनं राखी घेऊन मांगतली.." मंदाच्या बाबा ने भिंतीला पाठ टेकत सांगितले. 

" हो राखी आहे वाटते सोमवारी.. मले यादच नोयती " मंदाच्या आईने चुलीतल्या काड्या ओढता ओढता सांगितले. बाजारातून आल्यावर ती स्वयंपाकाला लागली होती .

"भाऊ कुठं  गेला? मले राखी दाखवाची हाये  त्याले " मंदा खूप आनंदाने उड्या मारत म्हणाली .

"तो तिकडं गेला.. नाम्याच्या घराकडे गेला असन.. पाय कुठं गेला त.." आजीनं बोट दाखवत सांगितले. इतक्यात मंगेशच घरी आला .

"पाय तुझ्यासाठी राखी घेतली म्या.. आवडली का तुले सांग बरं ? " त्याच्या हातावर राखी ठेवत मंदा त्याचा हात निरखून बघत होती.

" हो हे त एक नंबर हाये व मंदे ! " मंगेश  राखी बघून आनंदून गेला.

"हे घे.. कवाची तुह्यी  वाट पाहून रायलो " मंगेशने खिशातली पुडी काढत मंदाच्या हातात ठेवली .

"काय व्हय हे ? " मंदाचा बालसुलभ प्रश्न.

"आलू बोंडे होये.. तुले आवडते नं ?" म्हणत मंगेशने एक आलुबोंडा मंदाला दिला आणि एक स्वतः घेतला .

"देवा या बहीण भावाचं पीरम असंच ठेव.. कधी त्यायची ताटातून नको होऊ देऊ " आजीने खाटल्यावरूनच देवाला हात जोडले. 

मंगेश दहा वर्षाचा तर मंदा आठ वर्षाची.. दोघेही बहिण भाऊ एकमेकांना टाकून काही खात नसत. मंदाला शाळेत सरस्वती पूजनाला गोळ्या मिळाल्या कि ती घरी येऊन फ्राॅकच्या कोपऱ्यात गोळी धरून दोन तुकडे करायची आणि मंगेशला एक तुकडा द्यायची. दोघांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम होते. 


आज तो प्रसंग आठवून मंदाला गलबलून आलं आणि पुन्हा पापणकडा ओलावल्या.

"कायले तरी सरकार नं हा कायदा काढला असंन बहिण भावाच्या समान वाटणीचा ! " ती रागातच पुटपुटली .

होय आज तिच्या वडिलांच्या शेतामधला अर्धा हिस्सा तिला मिळणार होता. त्यासाठी तिच्या नवऱ्याने किती खटपट केली होती. तिला भावाकडून हिस्सा घेणे मान्य नव्हते  पण नवऱ्यापुढे तिचं काहीच चाललं नाही. वडिलांच्या माघारी मंगेशने कष्टाने शेतमळा छान फुलवला होता. तीन एकरात ज्वारी,कापूस, भुईमूग, तुरीची लागवड करत होता तर एका एकरात भाजीपाला पिकवत होता. बरं चाललं होतं त्याचं. भाजीपाला गावातल्याच व्यापाऱ्यांना विकायचा त्यामुळे आठवडी बाजारात दुकान लावायची गरज पडत नव्हती. आणि शेतात लक्ष देता येत होतं. दर दिवाळीला तो मंदाला साडी घ्यायचा.. भाच्यांना कपडे घ्यायचा.. त्याची बायको कुरकुर करायची पण तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता. आई वडिलांच्या माघारी भाऊ आपलं माहेरपण जपतो म्हणून मंदाही खूप खुश होती. भावजयही डाळ दाणा, नवाळीचा भाजीपाला, चने , तीळ, धने आवर्जून द्यायची. मंदा देवाला हात जोडायची आणि म्हणायची " देवा माझ्या भाऊ वयनीचं  हे गोकुळ असच भरभरून ठेव.. त्यायले कायी कमी नोको पडू देऊ " भाऊ वहिणीचं असं आदरातिथ्य पाहून ती समाधानाने काठोकाठ भरून जायची . मंदा साठी महादेवचं स्थळ आलं .. पाच एकर शेती , पाच सहा गाई म्हशी, दोनच भाऊ.. लहान भावाचं किराणा दुकान.. सगळं चांगलं आहे असं पाहून वडिलांनी मंदाचं लग्न उरकवलं होतं. सासरीही शेतीवाडी, दूधदुभतं, किराणा दुकान.. कशाची कमी नव्हती. दिराचं लग्न झालं.. त्याची बायकोही तिला मान द्यायची. सगळं छान सुरू होतं पण अचानक दिराला दारूचं व्यसन लागलं आणि त्यात हळूहळू त्याने किराणा दुकान गमावलं. भावा भावांची भांडण व्हायला लागली आणि एक दिवस त्याने "माया हिस्स्याचं वावर मले पायजे " म्हणून भावाच्या मागे तगादा लावला. त्याची बायकोही वाटणीसाठी भांडण करायला लागली . शेवटी अडीच एकर वावर अन् दोन गाई, दोन म्हशी त्याला महादेवनं दिल्या. आता ते दोघे वेगळे राहू लागले .महादेव कडे अडीच एकर वावर ,दोन गाई , दोन म्हशी, एक कालवड एवढंच राहिलं होतं. धनधान्यांनं  दूधदभत्यानं भरलेलं घर आता असं खाली  झालेलं पाहून त्याला वाईट वाटत होतं . पोरं शिक्षण घेत होते. त्यांच्या भविष्याची चिंता त्याला सतावत होती. 

" काहून काय चा विचार करून राहिले ? " मंदाने विचारात गढलेल्या महादेवला विचारले. 

"मंदे आपल्या पोटी दोन पोरं हाये..  त्यायच्या भविष्याची चिंता मले सतावून रायली.. अडीच एकरात ते काय खातीन अन् काय ठेवतीन सांग तूच ? "

"तुमी कायले चिंता करता.. तो भगवंत आहे ना.. पायते सगळं.. चोच देल्ली तं घास बी तोच देते.. तुम्ही उबारी जीवाले घोर नोका लावून घेऊ " 

"तसं नाही व मंदे.. पन चिंता तं वाटतेच नं.. याच्याही दोन वाटण्या केल्या त एकेकाले कितीक येईन.. एक सव्वा एकर !"

" शिकून रायले ना पोरं ..करतीन कायी कामधंदा "

"पण कायच्या भरोशावर.. मी काय मनतो.. तू आपल्या भावाले तूहा हिस्सा माग नं.. तसंही बापाच्या प्रॉपर्टीत पोरीले समान हिस्सा भेटते "  महादेवनं सुतोवाच आपला विचार बोलून दाखवला .

"काहीही काय बोलून राहिले वं तुमी.. मी काही हिस्साबिस्सा मांगनार नाही सांगून ठेवतो.." मंदा नवऱ्यावर खवळून बोलली. 

"अवं मायमाझे जराक पोरायचा इचार कर.. आपलं तं गेलं आयुष्य.. पन पोराचं कसं जाईन ?"  महादेव मंदाला समजुतीच्या सुरात बोलला .

त्या रात्री मंदाला झोपच लागली नाही. भावाला वाटणी मागायची.. त्यासाठी तिचं मन तयार होत नव्हतं. महादेव तिला परोपरीने समजावत होता. कधी कधी तो वाटणीवरून मंदाशी वाद घालायचा. रोजची भांडणे, वाद, अबोला ..त्याचा आता मंदाला कंटाळा आला होता. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली होती. शेवटी भावाकडे जाऊन त्याच्या कानावर ही गोष्ट घालावी म्हणून ती माहेरी जायला तयार झाली .


"मंदे एकटीच आली का वं बाई.. जावईबापू दिसत नाही.. सगळं ठीक हाये नं ?" मंगेशने मंदाला काळजीने प्रश्न केला .

" हा सगळं ठीक हाय ..त्यायनच पाठोलं मले " मंदाने भितभितच  सांगितले.

"अव वने.. बाई आली हाय.. पाय धुवाले  पाणी आण " मंगेशने वनिताला आवाज देऊन सांगितले. मंदाला एकटी आलेली पाहून वनितालाही जरा धक्काच बसला पण ती काहीही बोलली नाही. घरात जाऊन हात पाय धुण्यासाठी पाणी घेऊन आली. "बाई हात पाय धुवा तुमी.. मी चहा मांडतो " वनिताने पाण्याचा गडवा मंदाच्या हातात दिला. मंदाने गडव्यातील पाणी पायावर टाकले ..त्यातले थोडे पाणी चेहऱ्यावर मारले. आता तिला जरा ताजेतवाने वाटत होते. मंगेशने तोंड पुसायला टावेल दिला.. तोपर्यंत वनिता चहा घेऊन बाहेर आली. तिघांनी चहा घेतला .

"बरं मंदे तू आराम कर.. मी वावराकडून येतो चक्कर मारून " असे म्हणून मंगेश शेतावर गेला .

वनिताने तिला खाट टाकून दिली. घरातून एक चादर आणून त्यावर टाकली.

" बाई आराम करा तुमी मी सयपाकाचं  पायतो " असं म्हणून ती स्वयंपाक खोलीकडे गेली. मंदा प्रवासाने खरच थकली होती त्यामुळे तिचा पटकन डोळा लागला .

" बाई उठता का.. झाल पडली " वनिताने तिला आवाज दिला.

तशी ती उठून बसली .मंगेश खाट टाकून अंगणात बसला होता . त्याने शेतातून तिच्यासाठी काशी कोहळ , वांगे ,कारले ,तुरीच्या शेंगा आणल्या होत्या. ती आतमध्ये गेली.. वनीताचा स्वयंपाक होतच आला होता. देवाजवळ देव्हाऱ्यात ती दिवा वात करत होती. मंदाने तोंडावरून पाणी घेतले आणि देवाला नमस्कार केला.. बाजूलाच आई-बाबांच्या फोटोकडे पाहून नमस्कार केला आणि मनातल्या मनात त्यांची माफी मागितली. थोड्यावेळाने  मंगेश ही आत मध्ये आला . गावातल्या, शेतातल्या, पिक पाण्याच्या गोष्टी करता करताच त्यांची जेवणं झाली. त्या दिवशी तिने काही वाटणीची गोष्ट काढलीच नाही. रात्री तिला झोपच येत नव्हती. वाटणीचा विषय कसा काढायचा म्हणून ती खूप अस्वस्थ होती. कधीतरी तिचा डोळा लागला . दुसऱ्या दिवशी चहापाणी झाल्यावर मंगेशनेच तिला विचारले ,

" मंदे सगळं ठीक आहे ना बाई .. कालपासून पायतो तू काहीतरी लपवून रायली असं वाटून राहिलं.." मंगेशच्या अचानक आलेल्या प्रश्नाने ती भांबावली .

"अ..हो सगळं ठीक हाय "

"मंग जवाईबापू काहून नाही आले.. अन् त्यायनच पाठवलं म्हणत होती तू ? "

"हो त्यायनच पाठोलं..

तिने आवंढा गिळतच  सांगितले.

" काय झालं सांग मले.." मंगेशने तिला धीर दिला .

"भाऊ.. ते मले वावरातला हिस्सा मांग मनते " सांगताना तिचा कंठ भरून आला. दरवाज्याच्या कोपऱ्यात उभी राहून वनिता सगळं ऐकत होती .

"काय वावरात हिस्सा.. पण आम्ही काय खाऊ.. पोराचं शिक्षण हाय.. लगनयव हाये कायच्या भरोशावर कराचं आमी ? " वनिता एका दमात सगळं बोलून गेली. मंगेश तर एकदम चूपच होऊन गेला .काय बोलावं त्याला कळेना. तो उठून तसाच बाहेर गेला. वनिता ही आतल्या खोलीकडे वळली. आज तिला माहेर परकं झाल्यासारखं वाटलं.. तिने आंघोळ केली आणि गावाला परत जाण्यासाठी आवराआवर सुरू केली. वनीताने स्वयंपाक केला होता. तिने ताट वाढून आणले पण मंदाच्या घशात आज घास जात नव्हता. ज्या भावाला सोडून आपण कधी काही खाल्लं नाही त्यालाच आज हिस्सा मागण्याची वेळ आली याचे तिला खूप वाईट वाटले. तिने कसेबसे दोन घास पोटात ढकलले. वनीताने तिच्यासाठी शेंगा , कोहळं , वांगे , कारले एका पिशवीत भरून ठेवले होते. तिला जाणवत होते की नवऱ्याच्या सांगण्यावरून ही हिस्सा मागत आहे .

"बाईचं जीवन हे असंच असते बाई.. नवरा म्हनन ते आयका लागते ..आता काय करता ..?" वनिता च्या बोलण्याने मंदाला गहिवरून आले आणि ती तिच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडायला लागली. वनिताने तिला पाठीवरून हात फिरवून समजावले .

"भाऊ नाही आला का ?"

"नाही आले.. कुठे गेले त माहित नाही बा.."  मंदाने जड अंतकरणाने घराचा निरोप घेतला. पुन्हा या घरात यायला मिळेल की नाही या भावनेने तिचा कंठ दाटून येत होता. तिला बसस्टॅन्ड पर्यंत सोडायला वनिता सोबत आली. शेवटी भावाची भेट झालीच नव्हती .


घरी आल्या आल्या महादेव ने प्रश्न केला, 

"काय म्हने.. मानला का तुह्या  भाऊ ?"

"कायीच बोलला नाही.. भाहीर  चालला गेला.." मंदाने भाबडेपणाने सांगितले .

"असा कसा बोलत नाही.. वकिलाकडूनच नोटीस पाठवतो त्याले.." महादेव रागाने लाल झाला होता .आता हा काय करणार म्हणून मंदाचे हात पाय थरथर कापत होते . दुसऱ्या दिवशी महादेवने तालुक्याला जाऊन वकिलाचा सल्ला घेतला. खूप खटपट करून त्याने वकिलाकडून मंगेशला कायदेशीर  नोटीस पाठवली आणि शेतात समान हिस्सा मिळवण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला . आज त्याचीच कोर्टात सुनावणी होती . मंदा महादेव सोबत कोर्टात गेली. ती  भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे मंगेश तिचा भाऊ कुठे दिसतो का बघत होती. थोड्या वेळाने मंगेश वनिता सोबत तिथे आला पण मंदाकडे न पाहताच समोर निघून गेला. थोड्या वेळाने त्यांची पेशी सुरू झाली. मंगेशने काहीही न बोलता मालमत्तेचे कागदपत्र कोर्टात सादर केले. हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार मंदाला शेतात समान हिस्सा मिळाला.

" बाई तुम्ही हे चांगलं नाही केलं.. आमाले  कोर्टकचेरी दाखवली व.. तुमच्या हिश्यासाठीच हे वकिलाकडे गेले होते.. तुमाले हिस्सा द्यायचा त्यायचाही विचार होता.. पोराच्या ऍडमिशन साठी बाहेरगावी गेले.. त्याच्यानं जरा उशीर झाला होता. पण तुम्ही तं डायरेक्ट नोटीसल धाडली बाई.. एवढा भरोसा नाही होता का तुमचा भावावर ?"

ते ऐकताच मंदाच्या डोळ्याला धारा लागल्या. ती माफी मागायला पुढे झाली पण तोपर्यंत मंगेश कोर्टातून निघून गेला होता. आज वारसा हक्काने तिला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा तर मिळाला होता पण राखीचा धागा कायमचा तुटला होता. 



सौ.विद्या निनावे 

नागपूर

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

शब्दशिल्प/कुही : राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय, कुही येथे करिअर कट्टा विभागांतर्गत सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवक दिन (संकल्प दिवस) उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात करिअर कट्टा अधिवेशनामध्ये सहभागी झालेल्या कु. प्रगती गाडगे तसेच अकोला येथे आयोजित आव्हान शिबिरासाठी निवड झालेल्या कु. मानसी शेंडे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्त्व, युवकांच्या जीवनातील त्यांची प्रेरणा तसेच राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात करिअर कट्टा अधिवेशन, बारामती येथे सहभागी झालेल्या कु. साक्षी लांजेवार (कायदे व शिस्त पालन मंत्री) यांनी अधिवेशनातील स्वयंसिद्धा उपक्रमांतर्गत महिलांसाठी आयोजित मार्गदर्शन सत्राचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला.

तसेच कु. प्रगती गाडगे (महिला व बालकल्याण मंत्री) यांनी करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा अनुभव, अभ्यासाचा नियमित दिनक्रम तसेच यशासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गजानन मांडेकर यांनी करिअर कट्टा विभागाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. प्रविण लामखाडे व तालुका समन्वयक प्रा. डॉ. गायत्री कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा मुख्यमंत्री कु. श्रुती तलवारे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चारित्र्यनिर्मिती व सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मोलाची मदत झाली.

सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील संघर्षाच्या कथा

 


पुस्तकाचे नाव.. सप्टेंबरची रात्र/ अनुवाद

लेखक..सत्यनारायण 

अनुवादक…सचिन बेंडभर

प्रकाशक.. निखिल प्रकाशन

पाने..152

किंमत…325 रूपये

आवृत्ती..2024 दुसरी

पुस्तक क्रमांक.256

परिचय कर्ता. प्रा कुंडलिक शांताराम कदम.


सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील संघर्षाच्या कथा

            पुणे जिल्ह्यातील युवा लेखक सचिन बेंडभर यांनी मराठी साहित्यामध्ये विपुल असे लेखन आहे. आज पर्यंत त्यांची पन्नास पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यामध्ये बालसाहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह कादंबरी आणि अनुवाद असे लेखन आहे.. त्यांच्या लेखनाची दखल घेऊन महाराष्ट्रातील अनेक नामवंत संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले आहे.

सप्टेंबरची रात्र हे पुस्तक मूळ राजस्थानी लेखक सत्यनारायण यांनी लिहले आहे. लेखक सचिन बेंडभर यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. अनुवाद केल्यामुळे इतर भाषेतील साहित्य मराठी भाषेतील वाचकांना वाचनासाठी उपलब्ध होत असते. इतर भाषेतील साहित्याचा आस्वाद घेता येतो. त्या भाषेत ते साहित्य असल्याने त्या राज्यातील चालीरिती, संस्कृती व इतर सामाजिक बाबी आपल्याला त्या साहित्यकृतीच्या माध्यमातून कळत असतात. या पुस्तकाचा चांगला अनुवाद लेखकांनी केला आहे.यात राजस्थानी कथाचा मराठी अनुवाद केला आहे.

      गुत्ता नावाची कथा दारूच्या गुत्त्यावर काय चालते याचे खुप वास्तव वर्णन यात केले आहे. तेथे नेहमी येणारे लोक यांची एक वेगळी ओळख असते. यातील मी माथुर या व्यक्तीरेखेमधून जीवनाचे एक वास्तव सत्य लेखकाने समोर आणले आहे.

 हे राम या कथेत मंदिराचा पुजारी असणाऱ्या व्यक्तींची भुकेने झालेली अवस्था अगदी भावनिक पातळीवर विचार करायला लावते. भूक ही भूक असते तिला कोणतेही अन्न चालते हे यातून सिद्ध होते.

          निळ्या लिफाफ्यातील बंद भीती यात गतकाळात जीवनात घडलेल्या घटना आणि सद्य परिस्थिती यावर आधारित ही कथा आहे. गतकाळात घडलेल्या गोष्टीचा म्हणजे निळ्या लिफाफा याचा असणारा संबंध यात दाखवला आहे.

    अकरा वाजून साठ मिनिटे ही सरकारी नोकरी मिळण्यासाठी अठ्ठावीस वर्षाची मर्यादा असते. एका तरुणाची ही मर्यादा पुर्ण होण्यासाठी काही तास राहिलेले असतात.तो कालावधी जसा जसा जवळ येत होता तशी त्याची होणारी अवस्था यात मांडली आहे.

यात उनाड नावाची एक छोटी लघुकथा आहे, ती खुप काही सांगून जाते,ती कथा…

आईने त्याला जन्म दिला. बाबांचीसुदधा हिच इच्छा होती. दोघांनी संभाळ करून मोठं केलं.

आता तो मोठा झाला होता. पण त्याने ते सगळं काही केलं, जे आजपर्यंत सर्व करत आलेत. त्याने ते सगळं केले, जे आत्तापर्यंत घरातल्या कुणीच केलं नव्हतं. तो म्हणाला, मी माझ्या पदधतीने माझं जीवन जगणार! जे चांगलं वाटेल ते करेन. लोकांनी त्यांच्या बाबांना सांगितलं, हा उनाड झालाय. बाबांनी आईला, आईने भावांना आणि भावांनी सगळ्यांना.

आता तो कुटुंबासाठी घातक होता. अशुभ होता.. "माझ्या मुलीला झोप येत नाही. कारण तो रोज तिच्या स्वप्नात येतो," एक दिवस शेजाऱ्याने त्याच्या बाबांना सांगितलं.

गोष्ट सगळीकडे पसरली. त्याला हाकलून दिलं गेलं. त्या दिवसापासून ती मुलगीच नाही, तो सर्वांच्याच स्वप्नात येतो.

  भाकर ही लघुकथा स्वप्न आणि भाकरी मिळवण्यासाठी माणसाची धडपड आणि जीवनाचा शेवट यावर भाष्य करते.

उचापती या कथेत लेखकाने कस असावं आणि इतरांचे जीवन कस समजावून घ्यावे हे सांगितलं आहे. 

      पुढच्या वेळी एक वेगळी प्रेमकहाणी आहे. खुप वर्षांनी तो तिला भेटायला जातो. पण न भेटताच परत येतो. गतकाळाचे सुंदर आणि भावनिक वर्णन यात केले आहे.

पुस्तकाचे नाव असणारी सप्टेंबरची रात्र ही भावनिक आणि विरहाची कथा आहे.

विनिता एक अधुरी प्रेमकथा आहे.

    सुगंधासाठी भाकरीचे एक भयानक वास्तव मांडणारी कथा आहे. सफाई काम करून भाकरी गोळा करून आणणाऱ्या आईला  तिचा मुलगा फत्तू जे काही विचारतो ते वाचून मन हेलावून जाते.

आईबरोबर काम करण्यासाठी गेल्यावर फत्तूला एका ठिकाणी एक वेगळा सुगंध येत असतो. तो आल्यावर तो आईला विचारतो, आई हा कसला सुगंध आहे

त्यावर आई उत्तर देते,

हा भाकरीचा सुगंध आहे, आईने सांगितले. "आपल्या भाकरीला हा सुगंध का नाही येत?"

"कारण हा सुगंध गरम तयार झालेल्या भाकरीचा आहे. आपल्या भाकरी शिळ्या आणि तुकड्यांमध्ये असतात आईने त्याला समजावत त्यांच्या डोळ्यांत पाहीलं."

त्यानंतर तो आईने आणलेल्या भाकरीच्या तुकड्यांना जोडून गोल बनवायचा प्रयत्न करायचा. कधी कधी तशीच शाबुत गोल भाकरी दिसायची तेव्हा तो आनंदी व्हायचा. पण तेव्हा एकच प्रश्न निर्माण व्हायचा की हिला गरम कसं करायचं. आईच्या अनुपस्थितीत एकदोनदा त्याने प्रयत्न केला पण तो सुगंध लांबच राहिला, पण भाकरी जळाली. फत्तु वैतागून गेला. एक दिवस उन्हात गरम केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. भाकरीच्या त्या सुगंधात फत्तु हरवून जायचा. त्याला वाटायच दिवसेंदिवस शिळ्या होत जाणाऱ्या त्या तुकड्यांमधून तो सुगंध निघून जातोय. तो नेहमी स्वप्नातून जागा व्हायचा. त्या सुगंधाच्या मागे मागे. त्या सुंगधाला पकडण्यासाठी.

सकाळी उठायचा तर त्या सुगंधात हरवलेला असायचा. काही दिवस तो शाळेतही गेला. तेव्हा एक दिवस गुरूजी बोलले, आपल्या मेहनतीने कमवलेल्या भाकरीचा सुगंध काही वेगळाच असतो. तो मन लावून अभ्यास करायचा. मोठे झाल्यावर त्या सुगंधाचा नक्की शोध घेईन.

मुंबई नगरीचे सर्वाना आकर्षण असते. मुंबई नावाची एक कथा यात आहे.

    यातील कथा वाचताना कथा, सामाजिक भावनिक तर आहेतच पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील भाकरीच्या शोधातील आहेत.


प्रा. कुंडलिक शांताराम कदम

तळेगाव ढमढेरे, तालुका. शिरूर

पुणे.

* *मकर संक्रांत वैज्ञानिक दृष्टिक्षेपातील सण असूनही महिलांची कुचंबना कशासाठी?*



 *मकर संक्रांत वैज्ञानिक  दृष्टिक्षेपातील सण असूनही महिलांची कुचंबना  कशासाठी?*  


 *सत्यशोधक*

 *भूमिपुत्र वाघ* मो. 9172972482

 

 ( विज्ञानाच्या अनेक कसोट्यांवर पारखून सत्य शोधून अज्ञानपणाच्या मस्तकावर सत्याच्या आसुडाचे घाव घालणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री ज्योतिबा फुले यांना त्रिवार वंदन.)


 मित्रांनो,

भारतीय संस्कृती खूप चांगली आहे,असं म्हणून आपण आपल्यातले अज्ञानपण, अवैज्ञानिकता,अधार्मिकता लपवितो हे खरे पातक आहे असे मी समजतो.

 या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक रूढी व परंपरा ह्या अवैज्ञानिक, अधार्मिक आहेत याचाही परामर्श वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणाऱ्या, पुरोगामीत्वाचा विचार करणाऱ्यांनी तरी  समजून घ्यायला पाहिजे. तसे न होता चालत आलेल्या रुढी परंपरेला गुलामी सारखं स्वीकारतो असेच दिसते..

 प्रत्येक रीती -रिवाज,परंपरा धार्मिकता,अधर्मिकता याचं चिंतन करायला हवं.विचार करायला हवा.त्यातला चांगुलपणा शोधून स्वीकार करायला हवा.असं होताना दिसत नाही. ते दिसावं आपल्यात डोळसपणा यावा,म्हणून महात्मा फुले यांनी आपल्या जीवनाचं समर्पण केलं.त्यांचं नाव घेऊन आपण भाषण करत असतो,परंतु आपल्या विचारात व आचरनात बदल दिसतो.आपण  तसं कधीच वागत नाही.त्याचं दुःख मात्र तुम्हाला सांगावसं वाटतय.

 या देशामध्ये असे अनेक सण-उत्सव आपण पाहत असतो. अनुभवतो आणि साजराही करून जातो.साधा विचारही करत नाही की या सण उत्सवाचा कुटुंबातल्या, समाजातल्या इतर लोकांच्यावरती, विशेषतः विधवा महिलांच्या वरती काय परिणाम होत असेल? त्याच्या मनाला वेदना होत असतील काय? त्याचं निरीक्षण आपण कधी करतो का?त्याचा विचार आपण कधी करतो का?त्याचं दुःख वाटून घेता नाही आलं नाही तरी त्यांना सामावून घेऊ शकू का? अशा दृष्टीकोनातून विचार जरी करायला लागलो तरी ज्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सज्ञानाचा तिसरा डोळा आपणास बहाल केला. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली असे होईल.

 मित्रांनो आज आपण मकर संक्रात या सणाचा परामर्श घेणार आहोत. हा सण वैज्ञानिक आहे. म्हणून त्याचे स्वागत करणार आहोत.त्यासोबत स्त्रियांच्यामध्ये भेदभाव निर्माण करणारा सण आहे, यास दुजोरा देऊन चालणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केला तर हा सण साजरा करावाच लागेल. यातील नेमकी वैज्ञानिकता काय आहे ते आपण पाहू.

    21 डिसेंबर  हा दिवस दक्षिण गोलार्धात  सर्वात मोठा तर राञ लहान आसते.या उलट स्थिती उत्तरगोलार्धात आसते.या तारखेनंतर उत्तर गोलार्धात दिवस मोठा होत जातो तर राञ लहान होत जाते.14 जानेवारी रोजी सुर्य धनुराशीतुन मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून मकरसंक्रात  साजरी केली जाते.  नवधान्य हरभरा, वटाना, गहु(ओंब्या) ,बोरे ,ऊस यांनी सौभाग्यवती एकमेकींची ओटी भरतात ,सौभाग्यवती चुडे भरतात, तीळगुळ देऊन तोंड गोड करतात. जीवनातील अंधार  कमी होऊन सुख येवो अशा शुभेच्छा देतात.सुर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात कना-कनाने, तिळातिळाने वाढत जातो. मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे भ्रमण करण्याची प्रक्रिया सुरू होते.यावेळी आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात थंडी असल्यामुळे तिळगुळा सारखे उष्ण पदार्थ खावेत.ते इतरांना द्यावेत.थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची त्वचा कोरडी पडते. तेव्हा उष्ण आणि तेलगट पदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीराला लागणाऱ्या गरजा भागविला जातात.हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोनातला आणि ऋतू बद्दलत जाणारा काळ,असेही आपण संबोधले तरी चालेल.आणि तें सत्य आहे.म्हणून अशावेळी एकमेकांना उष्ण आणि गोड पदार्थ देऊन आनंद उत्सव साजरा केला जातो. आर्थिक दृष्ट्या कमकुवत,शारीरिक दृष्ट्या गरजू आणि विकलांग लोकांना ज्यांच्याकडे नाही अशांनाही मदत केली जाते.आणि केली जावी.मित्र-मैत्रिणींना गोडधोड खाऊ घालून भेटीगाठी घेऊन तिळगुळ दिले जातात.त्यास वाण लुटणे हाही शब्दप्रयोग या दिवशी केला जातो.

 इतका चांगला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा हा सण

 असा हा सुखद आनंद देणारा,आनंद द्विगुणीत करणारा सर्वांसाठी उपयोगी असणारा सण,

मला प्रश्न पडतो मग या सणांमध्ये विधवांना का नाकारलं गेलं? का त्यांना बहिष्कृत केले गेलं?त्यांच्या दुःखावर का फुंकर मारली जाते? मग वाटते की मनुवादी आणि पुरुषी अहंकाराचा प्रकोप तर या महिलांच्या वरती झालेला नसावा. ते पाहणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्रात तर या सणा दिवशी घरा घरात गोडधोड जेवण केलं जातं. तिळा गुळाचे अनेक पदार्थ तयार केले जातात.देवाला नैवेद्य दाखविला जातो.अशावेळी सर्व महिला एकत्र येतात.हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतो.विशेषता विठ्ठल रुक्मिणी मंदिर किंवा देवीच्या मंदिरात जास्तीत जास्त महिला जात असतात.एकमेकांना हळदीकुंकू लावतात.भेटीगाठी होतात.तिळा गुळापासून तयार केलेले अनेक पदार्थ एकमेकीना मोठ्या आदराने दिले जातात.आदर सत्कार केला जातो.गोड धोडाचे नवे वाण लुटले जातात...

 आता मला सांगा एवढा आनंदाचा निसर्गाच्या संक्रमणाचा सण असताना विधवांना का नाकारलं?का त्या देवाला भेटू शकत नाहीत? ते हळदीकुंकू लावू शकत नाहीत का ? त्या वाण,खण,नारळ,गोड पदार्थ देऊ शकत नाहीत का? त्या देवाला नारळ पडू शकत नाहीत का?

 आमची संस्कृती सांगते की, देवाला नारळ फोडल्यानंतर पुन्य मिळतं, मग आम्ही महिलांना का बहिष्कृत करतो? सगळेच प्रश्न आमच्या अंगवळणी पडून गेलेत का?याचा विचार का करत नाही? याचा अभ्यास का करत नाही?आम्ही स्वतःला शिक्षक,प्राध्यापक, इंजिनियर,डॉक्टर, समाजसेवक म्हणून संबोधून घेत असताना. याची वेदना,याची तीव्रता,आपल्या मनापर्यंत का पोहोचत नाही.मग मनाला प्रश्न पडतो,आमच्या मनाला/विवेकबुध्दिला गंज तर चढलेला नसेल??? आणि जर आम्ही सुज्ञ असु,विचारवंत असु,तर मग मनाला चढलेला गंज कधी घासून काढणार आहोत.???आणि मग असे नसू तर सुशिक्षित म्हणून घेणाऱ्यानी आपली गंजाळलेली बुद्धी गहाण ठेवायची का?

 मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी विधवा आहे. विचारा तिला.तिला बोलतं करा.समजून घ्या तिच्या भावना.ती काय सांगते ऐका.ती जेव्हा बोलायला लागेलना!!! तेव्हा ऐकताना तुमच्या मनामध्ये हलकल्लोळ माजेल.तेव्हा आपण निरुत्तर होऊन जाऊ. शिव,शाहू,फुले,आंबेडकरांचे नाव घेण्यापुरते आम्ही शिल्लक आहोत का?असेच म्हणावे लागेल ना!!!!

 एकीसाव्या शतकाकडे जात असताना आपण समाज बदलाचं स्वप्न पाहू शकलो नाही,समाज बदलऊ शकलो नाही,समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पेरू शकलो नाही, तर येणारा काळ आम्हाला कसा माफ करेल??? हा प्रश्न आज तरी अधांतरीच आहे.......

०००००

आई_वसुधा वैभव नाईक

 


*आई*


आ - आत्मा 

ई  - ईश्वर 

आत्मा  + ईश्वर = आई

असे आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत.

   पण ही जी व्याख्या आहे ही मुलांच्या वयापरत्वे बदलत जाते.

   मूल लहान असेल तर ते मुलाची सावली असते. जरा मूल मोठं व्हायला लागलं तर मुलाची सावली प्लस मुलाची बाई/ शिक्षक होते. मुलांना शिस्त लावणारी प्रेमळ आई होते.

    मूल जरा मोठे झाले म्हणजे पाचवी ते सातवी मध्ये गेले की त्याला अक्कल यायला लागते. स्वतःच्या पायावर तो उभे राहून स्वतंत्र विचार करायला शिकत असतो. यावेळी आईला विचारतो पण स्वतःच्या मनातच खरे करतो. मग अशावेळी त्याचा निर्णय चुकला तर आई त्याला पाठीशी घालते किंवा समजावून सांगते किंवा जरा मार देऊन सांगते. इथे मुलाला शिस्त लागते. काही मुलं आपल्याच तोऱ्यात असतात ती आईचे मनावर घेत नाहीत आणि समजूनही घेत नाहीत.ती जरा वेगळ्या मार्गाला लागतात. मित्र-मैत्रिणी,वाद- संवाद असे मार्ग अवलंबतात. आई, शाळेतल्या बाई यांचे ऐकेनासे होतात.

    आता मुलं आठवी ते दहावी मध्ये आलेले, ही मुलं अभ्यास तर करतात पण दहावीच्या दृष्टिकोनातून काही मुलं खरंच उत्कृष्ट अभ्यास करतात आणि काही मुलं जी आहेत ती वाईट मार्गाला म्हणता येणार नाही पण शारीरिक आकर्षणात अडकतात. मुलींशी जास्त बोलतात, मुली मुलांशी जास्त बोलतात आणि मग तिथूनच प्रेमाचे जाळे तयार होते पण मुलांना काही कळत नाही की हे प्रेम नाही हे आकर्षण आहे. इथे मग शाळेतल्या बाई किंवा आई रागावल्या तर त्यांना खूप राग येतो. ते कोणाचेच ऐकेनासे  होतात. पण जीवनात ठेच लागली की मग बरोबर सरळ होतात.

   आता हेच मला कॉलेजला जायला  लागली.मित्र-

मैत्रिणींमध्ये मजा करू लागली.

 आपल्याच घरात काही सांगेनासे झाले. स्वतःच्याच मनाचे खरे असे वागू लागली. आपलेच मला चुकले तरी आई पाठीशी घालत असते. काही माऊली आपल्या मुलांना वठणीवर आणण्यासाठी धडा सुद्धा शिकवतात. कॉलेज झाले की नोकरीला लागतात. आणि नोकरी लागली की मग लग्न होतात मुलांची.

    इथून पुढे खरी गंमत आईची होते. आईने काही सांगू दे इथे त्याच आईला अक्कल नसते.

 ती बावळट असते. तिला काहीच समजत नसते.प्रसंगी आईच्या मनाचा विचार न करता खूप रागात उलटे बोलले जाते.

    इथे एखादी आई जरा रागिष्ट असेल तर तिथल्या तिथे फटकन उत्तर देते. पण एखादी आई अगदी सहनशील असेल तर ती फक्त रडत बसल्याशिवाय काही करू शकत नाही. याचे कारण तिचे आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे आणि ती आपल्या मुलांचं मन दुखवू शकत नाही परंतु मुलांना हे समजत नाही की आपल्या आईचं मन आपण मन दुखवू नये लहानपणापासून तिने आपली काळजी घेतलेली आहे आणि अजूनही यापुढे ती काळजी घेणार आहेत जोपर्यंत तिचे हात पाय चांगले आहेत तोपर्यंत ती काळजीच घेणार आहे आपल्या मुलांची लहान मुलां प्रमाणे. तर माझे एकच सांगणे आहे या नव्या पिढीला आपल्या आई-वडिलांना उलट बोलू नका. त्यांच्या मनाचा विचार करा त्यांच्याकडून काही चुकलं तर समजून सांगा पटकन बोलणे रागात बोलणे हे योग्य नाही. या माऊलीमुळे तुम्ही या जगामध्ये आलेला आहात त्या माऊलीचा आदर करा. तिला आदराने वागवावे एवढीच तिची अपेक्षा असते बाकी कोणतीही अपेक्षा नसते.

    तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की प्रेमिकासाठी त्या मुलाने आपल्या आईला हृदय मागितले. आईने हृदय  मुलाला कापून दिले. तर ज्या वेळी हा मुलगा ते हृदय घेऊन आपल्या प्रेमिकाकडे जात असतो, तो ठेच लागून खाली पडतो तेव्हा सुद्धा त्या हृदया मधून आवाज येतो की लागलं का रे बाळा तुला? या गोष्टीवरून तुम्ही लक्षात घ्या की आपली आई आपल्यावर किती प्रेम करते आईला दुखवू नका एवढेच माझे म्हणणे आहे. वृद्धापकाळात तिची सेवा करा. तिला घालून पाडून बोलू नका. तिचे मन जपा. एक आदर्श मुलगा होऊन दाखवा. एक आदर्श मुलगी होऊन दाखवा.

  आईचा आदर्श समोर ठेवू

  तिची वृद्धापकाळात काळजी घेऊ....


 _वसुधा वैभव नाईक

 धनकवडी, जिल्हा- पुणे 

मो. नं. 9823582116

संक्रांत_तिळगुळ घ्या गोड गोड बोला

 



संक्रांत_तिळगुळ घ्या गोड गोड बोला

जानेवारी महिन्यात वातावरणात थंडी असते आणि याच वेळ येते संक्रांत .संक्रांतीला तिळगुळाचे खूप महत्त्व असते. तीळ हे आयुर्वेदिक औषध पणस्वयंपाक घरातील खूप महत्त्वाचे व अविभाज्य अंग आहे. तीळ आणि गुळाचा समावेश केला की गोडवा येतो असे म्हटले जाते. तिळात असलेली  स्निग्धता, गुळात असलेली शक्ती आपले सामर्थ्य वाढते.सामर्थ्य वाढले की उत्साह वाढतो. कुठल्याही कठीण परिस्थितीत सामोरे जाणे सोपे पडते .मग ती शारीरिक असो की मानसिक असो. सामर्थ्य असली की कुणाबरोबरही वाईट वागण्याची गरज पडत नाही. समोरच्याने आपल्याबरोबर काही चुकीचे केले तरी त्याच्याशी भांडायची गरज पडत नाही. उलट आपण त्याला गोड शब्द समजावून सांगू शकतो. आपल्या सोबत सकारात्मकताअसली तर ती व्यक्ती सर्वांसोबत चांगली वागते.

    या ऋतूत थंडी असल्यामुळे तिळाच्या उष्णतेचा त्रास होत नाही .त्यामुळे पचनशक्ती वाढते ,बुद्धी वाढते. तीळ हे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहे. गुळ हे पचनशक्ती वाढवते. आमाशय, मुलाचे शोधन करते. जेवणात रुची वाढवते. हृदयासाठी उत्तम आहे. पित्त वाताचे क्षमण करते. ऍनिमिया कमी करतो .साखरेपेक्षा गूळ कधीही उत्तम आहे .म्हणूनच तिळगुळ देऊन म्हणायचे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला .

       संक्रांतीला वाण वाटण्याची प्रथा आहे.परंतु आजच्या आधुनिक काळातील स्त्रियांनी अंधश्रद्धा आणि जुन्या पाखंडी रूढी परंपरा न पाळण्याचे आवाहन एकमेकींना केले पाहिजे. अर्थहीन परंपरा नको. घर आणि नोकरी दोन्ही यशस्वी सांभाळणे हे महत्त्वाचे आहे .भावनेपेक्षा डोक्याने विचार करणे आवश्यक आहे. त्या परंपरा सोडण्याचाही आपण आता संकल्प केला पाहिजे .नागपंचमीला तवा ठेवायचा नाही असे म्हणतात ,कैची वापरायची नाही असे म्हटले जाते. हेच डॉक्टरांनी म्हटले तर शस्त्रक्रिया कशा होतील ?यासाठी महिलांनी बदलणे आवश्यक आहे .महिलांनी बदलने याचा अर्थ  स्वैराचार करावा असा होत नाही. मुळात गरजेच्या नाही, त्यांचा काही उपयोग नाही, त्या प्रथांना तिलांजली दिलेलीच बरी .या निमित्ताने आपण अंधश्रद्धा आणि वाईट झालेली ती प्रथा परंपरा मोडून काढल्या पाहिजे. एका सशक्त समाजाच्या निर्मितीत मोलाची भूमिका आपण बजावली पाहिजे. 

    आपण असती कसं अथवा  नास्तिक असलो तरी बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार केला पाहिजे .विज्ञानवादी युगाच्या आपण स्त्रिया प्रत्येकीने बदललेच पाहिजे .वाण म्हणजे जिवातील देवत्वाला तन ,मन आणि धन यांनी शरण जावे. मग हे भांडीकुंडी न देता शिक्षणाचे पुस्तकाचे वाण असले पाहिजे .सावित्रीबाई फुले यांनी प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचे वाण दिले. त्यामुळे आज प्रत्येक स्त्री अभिमानाने गौरवाने वाटचाल करू शकते .प्रत्येक क्षेत्रात तिने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. वाण द्यायचे असेल तर शिक्षणाचे द्यावे .पुस्तकातून आपण तत्त्वज्ञान, मुल्ये, विज्ञान शिकतो .वाचनाने ज्ञान वाढते. तणाव दूर होतो .जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस पुस्तके देतात .हा  वाणवसा घ्यायला हवा .त्याचप्रमाणे महिलांनी एकमेकींचा आदर सन्मान करण्याचे सुद्धा वाण दिले पाहिजे .आपण बघतो की महिलाच महिलेची शत्रू आहे .सासू सून, ननंद भावजय ,जावा जावा यांच्यात हेवा ,द्वेषाची भावना दिसते .कुणाविषयी कटु भावना , द्वेषभावना ठेवू नये. क्षमाशील असावे. एकमेकींच्या सन्मानाचा वाणवसा स्वीकारला पाहिजे. हळदी कुंकवाचा मान फक्त सौभाग्यवतींचा हा विषय आता डबिबंध झालेला आहे .महिलांनीच महिलांना वैचारिक वाण वाटत खुला केला आहे. उजेडाच्या गावात आनंदाचे हे वैचारिक वाण वाटताना सणापुरते गोड  न राहता आयुष्यभर गोड राहू या .आज महिला सक्षमीकरणाची खूप आवश्यकता आहे .विधवा घटस्फोटीत परित्यक्ता गरजू यांना या हळदीकुंकू मध्ये सहभागी करणे आवश्यक आहे. स्थानिक संस्कृतीनुसार देशभरात सर्व ठिकाणी हा सण सकारात्मक मानला जातो .वाईटावर सत्याचा विजय ,नव्याची सुरुवात ,संक्रमणाचा जल्लोष ,कृषी संस्कृतीतील समर्पण भाव या अर्थाने हा सण साजरा करतात. या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. वाईट गुण सोडून चांगल्या कडे जाणे. सदगुणांमध्ये संक्रमण करणे म्हणजे संक्रांत होय .संत तुकारामांनी ओवीत सांगितले आहे, "देव  तीळी आला, गोड गोड जीव झाला ".मकर संक्रमणाचा उत्सव आहे .हा सण सौभाग्यवती पुरताच मर्यादित राहू नये . यामध्ये विधवा स्त्रियांना पण याच्यात सामील करता यायला पाहिजे .वाणाच्या निमित्ताने नुसती भेटवस्तू न देता अनुभवी महिलांनी  आपल्यातील ज्ञानाची शिदोरी इतर महिलांना दिली पाहिजे .समाजात वापरताना कसे वागले पाहिजे ,कुठे जाताना आपला पेहराव कसा असावा ,घरी कुठले काम कार्य करत असताना सर्वांशी समरसतेने बोलले पाहिजे, अशा गोष्टींचे आदान प्रदान केले पाहिजे .तेव्हाच या संक्रांतीचा उद्देश सफल होईल .नुसत्या जुना प्रथांना पुढे नेणे म्हणजे संक्रांत साजरी करणे असा अर्थ न घेता योग्य तो बदल करून संक्रांत साजरी करावी असे वाटते.


सौ प्रणोती हरीश कळमकर

 गुरुदेव नगर नागपूर 

मो. 9834209457

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

शब्दशिल्प दीपोत्सव_२०२५

 


                                                          
  Shabdashilp Deepotsav-2025
अंक वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व लिंक ओपन करा...ओपन व्हायला थोडी प्रतीक्षा करा.
https://drive.google.com/file/d/1BtUaiUzvAYUsQZed2eVIOAHpUX1jYtS0/view?usp=sharing



"जिद्द पेरताना" सामाजिक दायित्व सांभाळणारी कादंबरी

  अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा येथील राजेश चौरे यांनी " जिद्द पेरताना "  ही सामाजिक, भावनिक, गुंतागुंतीची व तरु...