
शब्दशिल्प/कुही : राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय, कुही येथे करिअर कट्टा विभागांतर्गत सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवक दिन (संकल्प दिवस) उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात करिअर कट्टा अधिवेशनामध्ये सहभागी झालेल्या कु. प्रगती गाडगे तसेच अकोला येथे आयोजित आव्हान शिबिरासाठी निवड झालेल्या कु. मानसी शेंडे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्त्व, युवकांच्या जीवनातील त्यांची प्रेरणा तसेच राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात करिअर कट्टा अधिवेशन, बारामती येथे सहभागी झालेल्या कु. साक्षी लांजेवार (कायदे व शिस्त पालन मंत्री) यांनी अधिवेशनातील स्वयंसिद्धा उपक्रमांतर्गत महिलांसाठी आयोजित मार्गदर्शन सत्राचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला.
तसेच कु. प्रगती गाडगे (महिला व बालकल्याण मंत्री) यांनी करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा अनुभव, अभ्यासाचा नियमित दिनक्रम तसेच यशासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गजानन मांडेकर यांनी करिअर कट्टा विभागाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. प्रविण लामखाडे व तालुका समन्वयक प्रा. डॉ. गायत्री कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा मुख्यमंत्री कु. श्रुती तलवारे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चारित्र्यनिर्मिती व सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मोलाची मदत झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा