गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

कथा : हिस्सा : सौ.विद्या निनावे


"मंदे लवकर लवकर उरकव नं.. आज तुहा हात काही चालून नाही राहिला वाटते.. उशीर होईल आटप लवकर "

"करून तं रायली काम..  जो वेळ लागाचा तोच लागल ना " मंदाने नवऱ्याला सुनवलं. 

"करून राहिली ..पण कशी रमत गमत..  कोर्टात जाचं हाये ना.. मायबाई तो कोर्ट आपल्यासाठी थांबून राहील काय ? "

"तुमाले त जास्तच घाई सुटली वाटते कोर्टात जाआची " ती फणकाऱ्याने बोलली .

"काय म्हणलं घाई सुटली.. अवं थो हक्क हाये आपला.. असा सोडून देशीन काय ? " महादेव आता जरा नरमाईनं बोलला. आज खरच मंदाचा हात पाहिजे तसा चालत नव्हता जुन्या गोष्टी आठवून तिच्या पापण्या सतत ओल्या होत होत्या.. काम करता करताच तिने कितीदा पदर डोळ्याला लावला होता. लहानपणीच्या आठवणीने तिचं मन गहिवरून आलं .


"भातकं घेऊन मांगतलं अनं  खाऊन काऊन  नायी रायला रे ?" मायनं मंगेशला विचारलं .

"खातो ना ते मंदी आल्यावर "

"मंदी बी बापासंग गेली हाय.. तिलेही काही घेऊन देईनच ना तुझ्या बाप.. तू आपलं खा ..ते आपलं खाईन " आजी नं सल्ला देल्ला. 

"बरं खातो .."

आज आठवडी बाजाराचा दिवस.. त्यामुळे शेतात लावलेले दोडके ,कारले, चवळीच्या शेंगा, कोहळा, लवकी घेऊन मंगेश मायसोबत बाजारात विकायला गेला होता. मंगेशचं गणित चांगलं पक्कं होतं ..भरभरा हिशोब करायचा त्यामुळे दर आठवडी बाजारात त्याची आई त्याला घेऊन जायची आणि बाजार संपल्यावर काहीतरी खाऊ घेऊन द्यायची. आजही तिने त्याला बटाटेवडे घेऊन दिले होते. पण मंदाला सोडून खाणं त्याला जीवावर यायचं, म्हणून तो तिची वाट पाहत थांबला होता.

" घे आली मंदि ..काय आणलं ओ त्या..? " मंदाच्या  हातातील पुडका पाहून आजीनं विचारलं .

"काय घेऊन देऊ म्हणलं त तिनं राखी घेऊन मांगतली.." मंदाच्या बाबा ने भिंतीला पाठ टेकत सांगितले. 

" हो राखी आहे वाटते सोमवारी.. मले यादच नोयती " मंदाच्या आईने चुलीतल्या काड्या ओढता ओढता सांगितले. बाजारातून आल्यावर ती स्वयंपाकाला लागली होती .

"भाऊ कुठं  गेला? मले राखी दाखवाची हाये  त्याले " मंदा खूप आनंदाने उड्या मारत म्हणाली .

"तो तिकडं गेला.. नाम्याच्या घराकडे गेला असन.. पाय कुठं गेला त.." आजीनं बोट दाखवत सांगितले. इतक्यात मंगेशच घरी आला .

"पाय तुझ्यासाठी राखी घेतली म्या.. आवडली का तुले सांग बरं ? " त्याच्या हातावर राखी ठेवत मंदा त्याचा हात निरखून बघत होती.

" हो हे त एक नंबर हाये व मंदे ! " मंगेश  राखी बघून आनंदून गेला.

"हे घे.. कवाची तुह्यी  वाट पाहून रायलो " मंगेशने खिशातली पुडी काढत मंदाच्या हातात ठेवली .

"काय व्हय हे ? " मंदाचा बालसुलभ प्रश्न.

"आलू बोंडे होये.. तुले आवडते नं ?" म्हणत मंगेशने एक आलुबोंडा मंदाला दिला आणि एक स्वतः घेतला .

"देवा या बहीण भावाचं पीरम असंच ठेव.. कधी त्यायची ताटातून नको होऊ देऊ " आजीने खाटल्यावरूनच देवाला हात जोडले. 

मंगेश दहा वर्षाचा तर मंदा आठ वर्षाची.. दोघेही बहिण भाऊ एकमेकांना टाकून काही खात नसत. मंदाला शाळेत सरस्वती पूजनाला गोळ्या मिळाल्या कि ती घरी येऊन फ्राॅकच्या कोपऱ्यात गोळी धरून दोन तुकडे करायची आणि मंगेशला एक तुकडा द्यायची. दोघांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम होते. 


आज तो प्रसंग आठवून मंदाला गलबलून आलं आणि पुन्हा पापणकडा ओलावल्या.

"कायले तरी सरकार नं हा कायदा काढला असंन बहिण भावाच्या समान वाटणीचा ! " ती रागातच पुटपुटली .

होय आज तिच्या वडिलांच्या शेतामधला अर्धा हिस्सा तिला मिळणार होता. त्यासाठी तिच्या नवऱ्याने किती खटपट केली होती. तिला भावाकडून हिस्सा घेणे मान्य नव्हते  पण नवऱ्यापुढे तिचं काहीच चाललं नाही. वडिलांच्या माघारी मंगेशने कष्टाने शेतमळा छान फुलवला होता. तीन एकरात ज्वारी,कापूस, भुईमूग, तुरीची लागवड करत होता तर एका एकरात भाजीपाला पिकवत होता. बरं चाललं होतं त्याचं. भाजीपाला गावातल्याच व्यापाऱ्यांना विकायचा त्यामुळे आठवडी बाजारात दुकान लावायची गरज पडत नव्हती. आणि शेतात लक्ष देता येत होतं. दर दिवाळीला तो मंदाला साडी घ्यायचा.. भाच्यांना कपडे घ्यायचा.. त्याची बायको कुरकुर करायची पण तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता. आई वडिलांच्या माघारी भाऊ आपलं माहेरपण जपतो म्हणून मंदाही खूप खुश होती. भावजयही डाळ दाणा, नवाळीचा भाजीपाला, चने , तीळ, धने आवर्जून द्यायची. मंदा देवाला हात जोडायची आणि म्हणायची " देवा माझ्या भाऊ वयनीचं  हे गोकुळ असच भरभरून ठेव.. त्यायले कायी कमी नोको पडू देऊ " भाऊ वहिणीचं असं आदरातिथ्य पाहून ती समाधानाने काठोकाठ भरून जायची . मंदा साठी महादेवचं स्थळ आलं .. पाच एकर शेती , पाच सहा गाई म्हशी, दोनच भाऊ.. लहान भावाचं किराणा दुकान.. सगळं चांगलं आहे असं पाहून वडिलांनी मंदाचं लग्न उरकवलं होतं. सासरीही शेतीवाडी, दूधदुभतं, किराणा दुकान.. कशाची कमी नव्हती. दिराचं लग्न झालं.. त्याची बायकोही तिला मान द्यायची. सगळं छान सुरू होतं पण अचानक दिराला दारूचं व्यसन लागलं आणि त्यात हळूहळू त्याने किराणा दुकान गमावलं. भावा भावांची भांडण व्हायला लागली आणि एक दिवस त्याने "माया हिस्स्याचं वावर मले पायजे " म्हणून भावाच्या मागे तगादा लावला. त्याची बायकोही वाटणीसाठी भांडण करायला लागली . शेवटी अडीच एकर वावर अन् दोन गाई, दोन म्हशी त्याला महादेवनं दिल्या. आता ते दोघे वेगळे राहू लागले .महादेव कडे अडीच एकर वावर ,दोन गाई , दोन म्हशी, एक कालवड एवढंच राहिलं होतं. धनधान्यांनं  दूधदभत्यानं भरलेलं घर आता असं खाली  झालेलं पाहून त्याला वाईट वाटत होतं . पोरं शिक्षण घेत होते. त्यांच्या भविष्याची चिंता त्याला सतावत होती. 

" काहून काय चा विचार करून राहिले ? " मंदाने विचारात गढलेल्या महादेवला विचारले. 

"मंदे आपल्या पोटी दोन पोरं हाये..  त्यायच्या भविष्याची चिंता मले सतावून रायली.. अडीच एकरात ते काय खातीन अन् काय ठेवतीन सांग तूच ? "

"तुमी कायले चिंता करता.. तो भगवंत आहे ना.. पायते सगळं.. चोच देल्ली तं घास बी तोच देते.. तुम्ही उबारी जीवाले घोर नोका लावून घेऊ " 

"तसं नाही व मंदे.. पन चिंता तं वाटतेच नं.. याच्याही दोन वाटण्या केल्या त एकेकाले कितीक येईन.. एक सव्वा एकर !"

" शिकून रायले ना पोरं ..करतीन कायी कामधंदा "

"पण कायच्या भरोशावर.. मी काय मनतो.. तू आपल्या भावाले तूहा हिस्सा माग नं.. तसंही बापाच्या प्रॉपर्टीत पोरीले समान हिस्सा भेटते "  महादेवनं सुतोवाच आपला विचार बोलून दाखवला .

"काहीही काय बोलून राहिले वं तुमी.. मी काही हिस्साबिस्सा मांगनार नाही सांगून ठेवतो.." मंदा नवऱ्यावर खवळून बोलली. 

"अवं मायमाझे जराक पोरायचा इचार कर.. आपलं तं गेलं आयुष्य.. पन पोराचं कसं जाईन ?"  महादेव मंदाला समजुतीच्या सुरात बोलला .

त्या रात्री मंदाला झोपच लागली नाही. भावाला वाटणी मागायची.. त्यासाठी तिचं मन तयार होत नव्हतं. महादेव तिला परोपरीने समजावत होता. कधी कधी तो वाटणीवरून मंदाशी वाद घालायचा. रोजची भांडणे, वाद, अबोला ..त्याचा आता मंदाला कंटाळा आला होता. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली होती. शेवटी भावाकडे जाऊन त्याच्या कानावर ही गोष्ट घालावी म्हणून ती माहेरी जायला तयार झाली .


"मंदे एकटीच आली का वं बाई.. जावईबापू दिसत नाही.. सगळं ठीक हाये नं ?" मंगेशने मंदाला काळजीने प्रश्न केला .

" हा सगळं ठीक हाय ..त्यायनच पाठोलं मले " मंदाने भितभितच  सांगितले.

"अव वने.. बाई आली हाय.. पाय धुवाले  पाणी आण " मंगेशने वनिताला आवाज देऊन सांगितले. मंदाला एकटी आलेली पाहून वनितालाही जरा धक्काच बसला पण ती काहीही बोलली नाही. घरात जाऊन हात पाय धुण्यासाठी पाणी घेऊन आली. "बाई हात पाय धुवा तुमी.. मी चहा मांडतो " वनिताने पाण्याचा गडवा मंदाच्या हातात दिला. मंदाने गडव्यातील पाणी पायावर टाकले ..त्यातले थोडे पाणी चेहऱ्यावर मारले. आता तिला जरा ताजेतवाने वाटत होते. मंगेशने तोंड पुसायला टावेल दिला.. तोपर्यंत वनिता चहा घेऊन बाहेर आली. तिघांनी चहा घेतला .

"बरं मंदे तू आराम कर.. मी वावराकडून येतो चक्कर मारून " असे म्हणून मंगेश शेतावर गेला .

वनिताने तिला खाट टाकून दिली. घरातून एक चादर आणून त्यावर टाकली.

" बाई आराम करा तुमी मी सयपाकाचं  पायतो " असं म्हणून ती स्वयंपाक खोलीकडे गेली. मंदा प्रवासाने खरच थकली होती त्यामुळे तिचा पटकन डोळा लागला .

" बाई उठता का.. झाल पडली " वनिताने तिला आवाज दिला.

तशी ती उठून बसली .मंगेश खाट टाकून अंगणात बसला होता . त्याने शेतातून तिच्यासाठी काशी कोहळ , वांगे ,कारले ,तुरीच्या शेंगा आणल्या होत्या. ती आतमध्ये गेली.. वनीताचा स्वयंपाक होतच आला होता. देवाजवळ देव्हाऱ्यात ती दिवा वात करत होती. मंदाने तोंडावरून पाणी घेतले आणि देवाला नमस्कार केला.. बाजूलाच आई-बाबांच्या फोटोकडे पाहून नमस्कार केला आणि मनातल्या मनात त्यांची माफी मागितली. थोड्यावेळाने  मंगेश ही आत मध्ये आला . गावातल्या, शेतातल्या, पिक पाण्याच्या गोष्टी करता करताच त्यांची जेवणं झाली. त्या दिवशी तिने काही वाटणीची गोष्ट काढलीच नाही. रात्री तिला झोपच येत नव्हती. वाटणीचा विषय कसा काढायचा म्हणून ती खूप अस्वस्थ होती. कधीतरी तिचा डोळा लागला . दुसऱ्या दिवशी चहापाणी झाल्यावर मंगेशनेच तिला विचारले ,

" मंदे सगळं ठीक आहे ना बाई .. कालपासून पायतो तू काहीतरी लपवून रायली असं वाटून राहिलं.." मंगेशच्या अचानक आलेल्या प्रश्नाने ती भांबावली .

"अ..हो सगळं ठीक हाय "

"मंग जवाईबापू काहून नाही आले.. अन् त्यायनच पाठवलं म्हणत होती तू ? "

"हो त्यायनच पाठोलं..

तिने आवंढा गिळतच  सांगितले.

" काय झालं सांग मले.." मंगेशने तिला धीर दिला .

"भाऊ.. ते मले वावरातला हिस्सा मांग मनते " सांगताना तिचा कंठ भरून आला. दरवाज्याच्या कोपऱ्यात उभी राहून वनिता सगळं ऐकत होती .

"काय वावरात हिस्सा.. पण आम्ही काय खाऊ.. पोराचं शिक्षण हाय.. लगनयव हाये कायच्या भरोशावर कराचं आमी ? " वनिता एका दमात सगळं बोलून गेली. मंगेश तर एकदम चूपच होऊन गेला .काय बोलावं त्याला कळेना. तो उठून तसाच बाहेर गेला. वनिता ही आतल्या खोलीकडे वळली. आज तिला माहेर परकं झाल्यासारखं वाटलं.. तिने आंघोळ केली आणि गावाला परत जाण्यासाठी आवराआवर सुरू केली. वनीताने स्वयंपाक केला होता. तिने ताट वाढून आणले पण मंदाच्या घशात आज घास जात नव्हता. ज्या भावाला सोडून आपण कधी काही खाल्लं नाही त्यालाच आज हिस्सा मागण्याची वेळ आली याचे तिला खूप वाईट वाटले. तिने कसेबसे दोन घास पोटात ढकलले. वनीताने तिच्यासाठी शेंगा , कोहळं , वांगे , कारले एका पिशवीत भरून ठेवले होते. तिला जाणवत होते की नवऱ्याच्या सांगण्यावरून ही हिस्सा मागत आहे .

"बाईचं जीवन हे असंच असते बाई.. नवरा म्हनन ते आयका लागते ..आता काय करता ..?" वनिता च्या बोलण्याने मंदाला गहिवरून आले आणि ती तिच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडायला लागली. वनिताने तिला पाठीवरून हात फिरवून समजावले .

"भाऊ नाही आला का ?"

"नाही आले.. कुठे गेले त माहित नाही बा.."  मंदाने जड अंतकरणाने घराचा निरोप घेतला. पुन्हा या घरात यायला मिळेल की नाही या भावनेने तिचा कंठ दाटून येत होता. तिला बसस्टॅन्ड पर्यंत सोडायला वनिता सोबत आली. शेवटी भावाची भेट झालीच नव्हती .


घरी आल्या आल्या महादेव ने प्रश्न केला, 

"काय म्हने.. मानला का तुह्या  भाऊ ?"

"कायीच बोलला नाही.. भाहीर  चालला गेला.." मंदाने भाबडेपणाने सांगितले .

"असा कसा बोलत नाही.. वकिलाकडूनच नोटीस पाठवतो त्याले.." महादेव रागाने लाल झाला होता .आता हा काय करणार म्हणून मंदाचे हात पाय थरथर कापत होते . दुसऱ्या दिवशी महादेवने तालुक्याला जाऊन वकिलाचा सल्ला घेतला. खूप खटपट करून त्याने वकिलाकडून मंगेशला कायदेशीर  नोटीस पाठवली आणि शेतात समान हिस्सा मिळवण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला . आज त्याचीच कोर्टात सुनावणी होती . मंदा महादेव सोबत कोर्टात गेली. ती  भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे मंगेश तिचा भाऊ कुठे दिसतो का बघत होती. थोड्या वेळाने मंगेश वनिता सोबत तिथे आला पण मंदाकडे न पाहताच समोर निघून गेला. थोड्या वेळाने त्यांची पेशी सुरू झाली. मंगेशने काहीही न बोलता मालमत्तेचे कागदपत्र कोर्टात सादर केले. हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार मंदाला शेतात समान हिस्सा मिळाला.

" बाई तुम्ही हे चांगलं नाही केलं.. आमाले  कोर्टकचेरी दाखवली व.. तुमच्या हिश्यासाठीच हे वकिलाकडे गेले होते.. तुमाले हिस्सा द्यायचा त्यायचाही विचार होता.. पोराच्या ऍडमिशन साठी बाहेरगावी गेले.. त्याच्यानं जरा उशीर झाला होता. पण तुम्ही तं डायरेक्ट नोटीसल धाडली बाई.. एवढा भरोसा नाही होता का तुमचा भावावर ?"

ते ऐकताच मंदाच्या डोळ्याला धारा लागल्या. ती माफी मागायला पुढे झाली पण तोपर्यंत मंगेश कोर्टातून निघून गेला होता. आज वारसा हक्काने तिला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा तर मिळाला होता पण राखीचा धागा कायमचा तुटला होता. 



सौ.विद्या निनावे 

नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...