बुधवार, १४ जानेवारी, २०२६

सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील संघर्षाच्या कथा

 


पुस्तकाचे नाव.. सप्टेंबरची रात्र/ अनुवाद

लेखक..सत्यनारायण 

अनुवादक…सचिन बेंडभर

प्रकाशक.. निखिल प्रकाशन

पाने..152

किंमत…325 रूपये

आवृत्ती..2024 दुसरी

पुस्तक क्रमांक.256

परिचय कर्ता. प्रा कुंडलिक शांताराम कदम.


सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील संघर्षाच्या कथा

            पुणे जिल्ह्यातील युवा लेखक सचिन बेंडभर यांनी मराठी साहित्यामध्ये विपुल असे लेखन आहे. आज पर्यंत त्यांची पन्नास पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यामध्ये बालसाहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह कादंबरी आणि अनुवाद असे लेखन आहे.. त्यांच्या लेखनाची दखल घेऊन महाराष्ट्रातील अनेक नामवंत संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले आहे.

सप्टेंबरची रात्र हे पुस्तक मूळ राजस्थानी लेखक सत्यनारायण यांनी लिहले आहे. लेखक सचिन बेंडभर यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. अनुवाद केल्यामुळे इतर भाषेतील साहित्य मराठी भाषेतील वाचकांना वाचनासाठी उपलब्ध होत असते. इतर भाषेतील साहित्याचा आस्वाद घेता येतो. त्या भाषेत ते साहित्य असल्याने त्या राज्यातील चालीरिती, संस्कृती व इतर सामाजिक बाबी आपल्याला त्या साहित्यकृतीच्या माध्यमातून कळत असतात. या पुस्तकाचा चांगला अनुवाद लेखकांनी केला आहे.यात राजस्थानी कथाचा मराठी अनुवाद केला आहे.

      गुत्ता नावाची कथा दारूच्या गुत्त्यावर काय चालते याचे खुप वास्तव वर्णन यात केले आहे. तेथे नेहमी येणारे लोक यांची एक वेगळी ओळख असते. यातील मी माथुर या व्यक्तीरेखेमधून जीवनाचे एक वास्तव सत्य लेखकाने समोर आणले आहे.

 हे राम या कथेत मंदिराचा पुजारी असणाऱ्या व्यक्तींची भुकेने झालेली अवस्था अगदी भावनिक पातळीवर विचार करायला लावते. भूक ही भूक असते तिला कोणतेही अन्न चालते हे यातून सिद्ध होते.

          निळ्या लिफाफ्यातील बंद भीती यात गतकाळात जीवनात घडलेल्या घटना आणि सद्य परिस्थिती यावर आधारित ही कथा आहे. गतकाळात घडलेल्या गोष्टीचा म्हणजे निळ्या लिफाफा याचा असणारा संबंध यात दाखवला आहे.

    अकरा वाजून साठ मिनिटे ही सरकारी नोकरी मिळण्यासाठी अठ्ठावीस वर्षाची मर्यादा असते. एका तरुणाची ही मर्यादा पुर्ण होण्यासाठी काही तास राहिलेले असतात.तो कालावधी जसा जसा जवळ येत होता तशी त्याची होणारी अवस्था यात मांडली आहे.

यात उनाड नावाची एक छोटी लघुकथा आहे, ती खुप काही सांगून जाते,ती कथा…

आईने त्याला जन्म दिला. बाबांचीसुदधा हिच इच्छा होती. दोघांनी संभाळ करून मोठं केलं.

आता तो मोठा झाला होता. पण त्याने ते सगळं काही केलं, जे आजपर्यंत सर्व करत आलेत. त्याने ते सगळं केले, जे आत्तापर्यंत घरातल्या कुणीच केलं नव्हतं. तो म्हणाला, मी माझ्या पदधतीने माझं जीवन जगणार! जे चांगलं वाटेल ते करेन. लोकांनी त्यांच्या बाबांना सांगितलं, हा उनाड झालाय. बाबांनी आईला, आईने भावांना आणि भावांनी सगळ्यांना.

आता तो कुटुंबासाठी घातक होता. अशुभ होता.. "माझ्या मुलीला झोप येत नाही. कारण तो रोज तिच्या स्वप्नात येतो," एक दिवस शेजाऱ्याने त्याच्या बाबांना सांगितलं.

गोष्ट सगळीकडे पसरली. त्याला हाकलून दिलं गेलं. त्या दिवसापासून ती मुलगीच नाही, तो सर्वांच्याच स्वप्नात येतो.

  भाकर ही लघुकथा स्वप्न आणि भाकरी मिळवण्यासाठी माणसाची धडपड आणि जीवनाचा शेवट यावर भाष्य करते.

उचापती या कथेत लेखकाने कस असावं आणि इतरांचे जीवन कस समजावून घ्यावे हे सांगितलं आहे. 

      पुढच्या वेळी एक वेगळी प्रेमकहाणी आहे. खुप वर्षांनी तो तिला भेटायला जातो. पण न भेटताच परत येतो. गतकाळाचे सुंदर आणि भावनिक वर्णन यात केले आहे.

पुस्तकाचे नाव असणारी सप्टेंबरची रात्र ही भावनिक आणि विरहाची कथा आहे.

विनिता एक अधुरी प्रेमकथा आहे.

    सुगंधासाठी भाकरीचे एक भयानक वास्तव मांडणारी कथा आहे. सफाई काम करून भाकरी गोळा करून आणणाऱ्या आईला  तिचा मुलगा फत्तू जे काही विचारतो ते वाचून मन हेलावून जाते.

आईबरोबर काम करण्यासाठी गेल्यावर फत्तूला एका ठिकाणी एक वेगळा सुगंध येत असतो. तो आल्यावर तो आईला विचारतो, आई हा कसला सुगंध आहे

त्यावर आई उत्तर देते,

हा भाकरीचा सुगंध आहे, आईने सांगितले. "आपल्या भाकरीला हा सुगंध का नाही येत?"

"कारण हा सुगंध गरम तयार झालेल्या भाकरीचा आहे. आपल्या भाकरी शिळ्या आणि तुकड्यांमध्ये असतात आईने त्याला समजावत त्यांच्या डोळ्यांत पाहीलं."

त्यानंतर तो आईने आणलेल्या भाकरीच्या तुकड्यांना जोडून गोल बनवायचा प्रयत्न करायचा. कधी कधी तशीच शाबुत गोल भाकरी दिसायची तेव्हा तो आनंदी व्हायचा. पण तेव्हा एकच प्रश्न निर्माण व्हायचा की हिला गरम कसं करायचं. आईच्या अनुपस्थितीत एकदोनदा त्याने प्रयत्न केला पण तो सुगंध लांबच राहिला, पण भाकरी जळाली. फत्तु वैतागून गेला. एक दिवस उन्हात गरम केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. भाकरीच्या त्या सुगंधात फत्तु हरवून जायचा. त्याला वाटायच दिवसेंदिवस शिळ्या होत जाणाऱ्या त्या तुकड्यांमधून तो सुगंध निघून जातोय. तो नेहमी स्वप्नातून जागा व्हायचा. त्या सुगंधाच्या मागे मागे. त्या सुंगधाला पकडण्यासाठी.

सकाळी उठायचा तर त्या सुगंधात हरवलेला असायचा. काही दिवस तो शाळेतही गेला. तेव्हा एक दिवस गुरूजी बोलले, आपल्या मेहनतीने कमवलेल्या भाकरीचा सुगंध काही वेगळाच असतो. तो मन लावून अभ्यास करायचा. मोठे झाल्यावर त्या सुगंधाचा नक्की शोध घेईन.

मुंबई नगरीचे सर्वाना आकर्षण असते. मुंबई नावाची एक कथा यात आहे.

    यातील कथा वाचताना कथा, सामाजिक भावनिक तर आहेतच पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील भाकरीच्या शोधातील आहेत.


प्रा. कुंडलिक शांताराम कदम

तळेगाव ढमढेरे, तालुका. शिरूर

पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...