संक्रांत_तिळगुळ घ्या गोड गोड बोला
जानेवारी महिन्यात वातावरणात थंडी असते आणि याच वेळ येते संक्रांत .संक्रांतीला तिळगुळाचे खूप महत्त्व असते. तीळ हे आयुर्वेदिक औषध पणस्वयंपाक घरातील खूप महत्त्वाचे व अविभाज्य अंग आहे. तीळ आणि गुळाचा समावेश केला की गोडवा येतो असे म्हटले जाते. तिळात असलेली स्निग्धता, गुळात असलेली शक्ती आपले सामर्थ्य वाढते.सामर्थ्य वाढले की उत्साह वाढतो. कुठल्याही कठीण परिस्थितीत सामोरे जाणे सोपे पडते .मग ती शारीरिक असो की मानसिक असो. सामर्थ्य असली की कुणाबरोबरही वाईट वागण्याची गरज पडत नाही. समोरच्याने आपल्याबरोबर काही चुकीचे केले तरी त्याच्याशी भांडायची गरज पडत नाही. उलट आपण त्याला गोड शब्द समजावून सांगू शकतो. आपल्या सोबत सकारात्मकताअसली तर ती व्यक्ती सर्वांसोबत चांगली वागते.
या ऋतूत थंडी असल्यामुळे तिळाच्या उष्णतेचा त्रास होत नाही .त्यामुळे पचनशक्ती वाढते ,बुद्धी वाढते. तीळ हे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहे. गुळ हे पचनशक्ती वाढवते. आमाशय, मुलाचे शोधन करते. जेवणात रुची वाढवते. हृदयासाठी उत्तम आहे. पित्त वाताचे क्षमण करते. ऍनिमिया कमी करतो .साखरेपेक्षा गूळ कधीही उत्तम आहे .म्हणूनच तिळगुळ देऊन म्हणायचे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला .
संक्रांतीला वाण वाटण्याची प्रथा आहे.परंतु आजच्या आधुनिक काळातील स्त्रियांनी अंधश्रद्धा आणि जुन्या पाखंडी रूढी परंपरा न पाळण्याचे आवाहन एकमेकींना केले पाहिजे. अर्थहीन परंपरा नको. घर आणि नोकरी दोन्ही यशस्वी सांभाळणे हे महत्त्वाचे आहे .भावनेपेक्षा डोक्याने विचार करणे आवश्यक आहे. त्या परंपरा सोडण्याचाही आपण आता संकल्प केला पाहिजे .नागपंचमीला तवा ठेवायचा नाही असे म्हणतात ,कैची वापरायची नाही असे म्हटले जाते. हेच डॉक्टरांनी म्हटले तर शस्त्रक्रिया कशा होतील ?यासाठी महिलांनी बदलणे आवश्यक आहे .महिलांनी बदलने याचा अर्थ स्वैराचार करावा असा होत नाही. मुळात गरजेच्या नाही, त्यांचा काही उपयोग नाही, त्या प्रथांना तिलांजली दिलेलीच बरी .या निमित्ताने आपण अंधश्रद्धा आणि वाईट झालेली ती प्रथा परंपरा मोडून काढल्या पाहिजे. एका सशक्त समाजाच्या निर्मितीत मोलाची भूमिका आपण बजावली पाहिजे.
आपण असती कसं अथवा नास्तिक असलो तरी बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार केला पाहिजे .विज्ञानवादी युगाच्या आपण स्त्रिया प्रत्येकीने बदललेच पाहिजे .वाण म्हणजे जिवातील देवत्वाला तन ,मन आणि धन यांनी शरण जावे. मग हे भांडीकुंडी न देता शिक्षणाचे पुस्तकाचे वाण असले पाहिजे .सावित्रीबाई फुले यांनी प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचे वाण दिले. त्यामुळे आज प्रत्येक स्त्री अभिमानाने गौरवाने वाटचाल करू शकते .प्रत्येक क्षेत्रात तिने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. वाण द्यायचे असेल तर शिक्षणाचे द्यावे .पुस्तकातून आपण तत्त्वज्ञान, मुल्ये, विज्ञान शिकतो .वाचनाने ज्ञान वाढते. तणाव दूर होतो .जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस पुस्तके देतात .हा वाणवसा घ्यायला हवा .त्याचप्रमाणे महिलांनी एकमेकींचा आदर सन्मान करण्याचे सुद्धा वाण दिले पाहिजे .आपण बघतो की महिलाच महिलेची शत्रू आहे .सासू सून, ननंद भावजय ,जावा जावा यांच्यात हेवा ,द्वेषाची भावना दिसते .कुणाविषयी कटु भावना , द्वेषभावना ठेवू नये. क्षमाशील असावे. एकमेकींच्या सन्मानाचा वाणवसा स्वीकारला पाहिजे. हळदी कुंकवाचा मान फक्त सौभाग्यवतींचा हा विषय आता डबिबंध झालेला आहे .महिलांनीच महिलांना वैचारिक वाण वाटत खुला केला आहे. उजेडाच्या गावात आनंदाचे हे वैचारिक वाण वाटताना सणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहू या .आज महिला सक्षमीकरणाची खूप आवश्यकता आहे .विधवा घटस्फोटीत परित्यक्ता गरजू यांना या हळदीकुंकू मध्ये सहभागी करणे आवश्यक आहे. स्थानिक संस्कृतीनुसार देशभरात सर्व ठिकाणी हा सण सकारात्मक मानला जातो .वाईटावर सत्याचा विजय ,नव्याची सुरुवात ,संक्रमणाचा जल्लोष ,कृषी संस्कृतीतील समर्पण भाव या अर्थाने हा सण साजरा करतात. या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. वाईट गुण सोडून चांगल्या कडे जाणे. सदगुणांमध्ये संक्रमण करणे म्हणजे संक्रांत होय .संत तुकारामांनी ओवीत सांगितले आहे, "देव तीळी आला, गोड गोड जीव झाला ".मकर संक्रमणाचा उत्सव आहे .हा सण सौभाग्यवती पुरताच मर्यादित राहू नये . यामध्ये विधवा स्त्रियांना पण याच्यात सामील करता यायला पाहिजे .वाणाच्या निमित्ताने नुसती भेटवस्तू न देता अनुभवी महिलांनी आपल्यातील ज्ञानाची शिदोरी इतर महिलांना दिली पाहिजे .समाजात वापरताना कसे वागले पाहिजे ,कुठे जाताना आपला पेहराव कसा असावा ,घरी कुठले काम कार्य करत असताना सर्वांशी समरसतेने बोलले पाहिजे, अशा गोष्टींचे आदान प्रदान केले पाहिजे .तेव्हाच या संक्रांतीचा उद्देश सफल होईल .नुसत्या जुना प्रथांना पुढे नेणे म्हणजे संक्रांत साजरी करणे असा अर्थ न घेता योग्य तो बदल करून संक्रांत साजरी करावी असे वाटते.
सौ प्रणोती हरीश कळमकर
गुरुदेव नगर नागपूर
मो. 9834209457

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा