वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवती..
येणे सुखे रुचे ,एकांताचा वास
नाही गुणदोष अंगा येत .या संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या भावमधुर काव्यातून वृक्षवल्लीला आपले सगे सोयरे म्हणून गौरविले आहे.त्यामुळेच या ओळी प्रत्येकाच्या ओठावर येतात.निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येक जण हा आनंद अनुभवत असतो.आणि तोच आनंद तुकाराम महाराजांनी सुद्धा अनुभवला.वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान आहे.हे प्रत्येकाला माहित आहे.या धरित्रीने आपल्याला दिलेला अनमोल खजिनाच जणू.मनुष्य हा जरी स्वतःच्या गरजा स्वतःच पूर्ण करीत असला तरी अन्न वस्त्र व निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा मात्र वृक्षवल्ली म्हणजेच निसर्गच भागवितो. ' कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी 'असे म्हणणारे संत सावता माळी निसर्गाशी किती एकरूप झाले होते हे दिसून येते.'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे ,क्षणात फिरुनी ऊन पडे ',निसर्गाचे वर्णन करणारी ही बालकवीची कविता खरच निसर्गाचे वेगळेच रूप दर्शविते.यावरून त्यांचं निसर्गावर किती प्रेम आहे हे दिसून येते.नास्ती मुलं वन औषधं, या युक्तीप्रमाणे असे एकही मूळ नाही जे उपयोगी नाही.प्रत्येक झाडाचे वेलीचे प्राणीमात्रांना आणि मनुष्यांना उपयोगी आहे.मानव आणि वनस्पती हे निसर्गाची लेकरे आहे.पण आज माणूस निसर्गापासून दूर जात आहे.
प्रगतीच्या नावाखाली मानवाने निसर्गावर घाला घातला आहे.विवेक हरवून बसलेल्या आजच्या माणसांना वनराई उध्वस्त करण्याचे उधाण आले आहे.मोठमोठ्या इमारती, बांधण्यासाठी वनराई उध्वस्त करताना दिसत आहे.रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी हिरवीगार शेती उध्वस्त झाली.हे पाहिले की वाटते स्वतःच्या स्वार्थासाठी मनुष्य किती अविचारी बनला आहे.थोडा विचार केला असता तर कदाचित वनराई हिरवीगार दिसली असती . आणि म्हणूनच निसर्ग जणू मानवाला सांगत असतो की, अरे मानवा, हे वृक्ष ही वनराई वर्षानुवर्ष जंगलात उपलब्ध आहे.ती तुमच्यासाठीच ना.खरं तर ताठ मानेने उभे राहून उन्हाळ्यात स्वतः जळून हे वृक्ष आपल्याला उपयोगी पडतात.आपल्याला सावली देतात. पशुपक्ष्यांना निवारा देतात.मानवाजवळ भेदभाव असेल पण वृक्षाजवळ मुळीच नाही.ते समान वागणूक देतात . म्हणूनच संत तुकोबारायांचे अभंग पर्यावरण समृद्ध जीवनासाठी महत्वाचे ठरते . म्हणूनच पाच जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना आपण झाडे लावण्याचा संकल्प करू.स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ ठेवू. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या मातृसमान वसुंधरेची काळजी घेऊ. . झाडे लावून आणि वृक्षतोड थांबवून पर्यावरण दिन साजरा करू.
संगीता नागदिवे...सना
यवतमाळ


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा