आई... आज दोन जून,. आई तुझा आज वाढदिवस..... असायचा. मी नेहमी तुझ्या वाढदिवसाला धावत ,पळत यायची वाढदिवस साजरा करायची. पण आज...?
आई ,मनातून वाटतं माझ्या आईने देवाघरी जाण्याची खरंच घाई केली काय ?थोडे महिने राहिली असती तर नातीचे लग्न बघितले असते. आजचा वाढदिवस झाला असता.... आई तुझ्या गेल्याने माझे खूप नुकसान झाले गं. या जगात मी एकटी पडली .तुझ्या प्रेमळ कौतुकाच्या थापेला मुकले गं.आता माहेरी कोणीच नाही .फक्त कर्तव्य अपेक्षित आहे .तू होती तर ..मायेचा ओलावा होता .माझ्या पायांना तुझ्या भेटीची ओढ होती गं. तुला डोळे भरून पाहिले की धन्य वाटायचे, समाधान वाटायचे .तू माझा एक माहेरी जोडलेला दुवा होती. तुझा सकाळ संध्याकाळचा नित्यनेमाने येणारे फोन मला माझ्या आईच्या घरात सोबत जोडून ठेवायचं .परंतु आता...? तू निघून गेली आणि माझा दुवा संपला. जवळपास माहेर संपले असेच म्हणावे लागेल. हक्क , हट्ट त्यासाठी जागाच नाही. शब्द गोठले गं आई .आयुष्यभर जबाबदाऱ्या पेलता पेलता खूप थकले ग .आयुष्यात जेव्हा कधी संकटे आली तेव्हा तू धावून आली .ऋतुजाच्या जन्मानंतर प्रकृतीच्या अडचणी , ननंदेच्या लग्नाच्या वेळेस आर्थिक मदत, माझ्या कमरेच्या त्रासाच्या वेळेस तुझी मदत ,मला सर्वाइकल स्पॉंडिलायटिसचा सिवीअर अटॅक असायचा तेव्हा ब्रेन हॅमरेज होईल का असे वाटायचे आणि त्या दुखण्यामध्ये मी तुझ्याकडे तशीच यायची व तू खूप खूप वेळ डोके दाबून दुःख कमी करून द्यायची आणि माझ्या त्रासामुळे तू पण दुःखी व्हायची .माझ्या बी एड नंतर मला नोकरी करताना मेहनतीसाठी तुझ्याकडून मिळालेल्या शब्द प्रेरणेने आयुष्य बदलून गेले. प्रत्येक वेळी तुम्ही दोघेही खंबीरपणे पाठीशी उभे होते. त्यावेळी त्या समस्या समस्या न राहता त्यावर उपाय मिळाले. आई तुझ्या शब्दात धीर होता ग .परंतु आता मला कोणीच नाही ग . फक्त मायेची एक पणती पेटती आहे.या व्यवहारी जगात मायेचे आता कोणीच नाही .फक्त कोलुचा बैल बनुन स्वतःच्या वेदना दाबून कार्य करत राहायचे ,स्वतःच्या छंदामध्ये जेवढे जास्त जमेल तेवढे गुंतून राहायचे, चेहऱ्यावर हास्य ठेवून मी खूप यशस्वी आहे ते ढोंग करायचे ,आपल्या शारीरिक वेदना, दुःख बाजूला सारून इतरांच्या गरजा पूर्ण करायच्या ...काय सांगू ?किती सांगू? कुणाला सांगू? कशी सांगू ?कुणी समजणारे उरलेच नाही ग. सर्वांना माझ्याकडे बघून वाटतं काय मस्त जीवन आहे. फक्त वही पेन घेते, मस्त लिहित राहते .परंतु मनातील कोंडमारा प्रगट करण्यासाठी असलेले माझे हेच माध्यम आहे .
जगायचं राहून गेलं असं वाटू नये म्हणून जी जी आवड आहे ती जोपासते आहे. पण आई आज तुझ्या मायेची उब पूर्णपणे गमावली ग. लोक म्हणतात की आयुष्यात कोणी एक व्यक्ती निघून गेल्यावर आयुष्य थांबून जात नाही. पण हे कोणालाच कळत नाही की लाखो लोक आपल्या आयुष्यात येतील जातील पण त्या एका आईची उणीव कोणीही पूर्ण करू शकत नाही. आई गेल्यावर आयुष्य चालू राहतं, पण मन मात्र तिथेच थांबते.
आई ,आता चेहऱ्यावर हास्य आणून उगाच दिखावा करते .परंतु मन, हृदय एकटेपणाने आक्रंदत असते. आई तुझ्यामुळे माहेरपण होते.यावर्षीचा अधिक मास माझा सुना सुना गेला. माझ्या नोकरीचा, आर्थिक प्रगतीचा, साहित्य निर्मितीचा तुला अभिमान होता .परंतु आता तू नाही ...तर डोळ्यात नकळत पाणी दाटून आले. तू असती तर असे झाले असते.. तू असती तर असे घडले असते.. बस एवढाच विचार येतो.आई आज जिथे कुठे आहे तुझ्या वाढदिवसाला खूप खुप आठवण येत आहे ग.
तुझी लेक
सौ प्रणोती कळमकर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा