‘गारपीट’ हा कवी खुशाल गुल्हाने यांचा दुसरा काव्यसंग्रह. २००४ मध्ये प्रकाशित ‘आकाशमाती’ या पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल एकवीस वर्षांनी दुसरा काव्यसंग्रह साहित्य विश्वात दाखल झालेला आहे. मुळात दोन काव्यसंग्रहामधील अंतर बघता, तब्बल दोन दशकात एकूणच मानवी जीवनात सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्तरांवर झालेल्या अनेक स्थित्यंतरांचा अवकाश कवेत घेताना, जीवनाच्या प्रत्येक अंगाला आपल्या प्रतिभास्पर्शाने काव्यरूप देऊन, आपल्या पुढ्यात कवी या काळाचं संचित मांडताना, अनेक ठिकाणी कणखर होतो, कधी हळवा होतो, तर कधी समुपदेशकाच्या भूमिकेतून निरोगी समाजासाठी जाणीव जागृती करतो. कवी एक आदर्श शिक्षक आहे, लेखक आहे आणि त्यांना उत्तम निवेदनाचं तंत्रही अवगत आहे. विविध प्रतिष्ठित संस्थाशी ते समर्पित वृत्तीने जुळलेले असून अनेक सामाजिक, सांस्कृतिक व्यासपीठांवरील त्यांचा कृतीशील वावर एक कार्यकर्ता माणूस म्हणूनही आपल्या संवेदनशील व्यक्तिमत्वासाठी ते परिचित आहेत.
प्रथमत: हा संग्रह आपले लक्ष वेधून घेतो ते मुखपृष्ठामुळे. मा.उद्धव शहाणे यांनी सूचकतेमधून साकारलेलं बोलकं मुखपृष्ठ गहिऱ्या रंगसंगतीने विषयाशी एकरूप होतं.
सिद्धहस्त साहित्यिका प्राचार्या डॉ.शोभा रोकडे यांनी आपल्या विस्तृत अशा मर्मग्राही प्रस्तावनेत कवित्वाच्या मुळाशी जावून उलगडत नेलेल्या कवीच्या सर्वंकष काव्यजाणीवा आणि त्यावर केलेले मार्मिक भाष्य, वाचक आणि कवी यामध्ये सहजभावाचा पूल बांधण्यास मोलाची भूमिका बजावतात. संग्रहाची वाट सुकर करतात. ही एक संग्रहाची मोठी उपलब्धी मानतो मी. प्रख्यात कवी स्व.डॉ. मिर्झा रफी बेग यांनी आपुलकीने केलेली काव्यात्मक पाठराखण संग्रहाच्या वैभवात नक्कीच भर घालतात.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, जेष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे यांनी,आपल्या शुभेच्छा संदेशात ' वऱ्हाडी कवितेचे शब्दप्रभु' म्हणून कविचा यथोचित गौरव केलेला असून, लोककवी तथा गायक रमेश ठाकरे यांनी 'कविची वऱ्हाडी बोलीभाषेबद्धलची भावना समस्त वऱ्हाडप्रेमींना सुखावणारी आहे,' असे प्रतिपादन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.
‘गारपीट’ हवामानशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर; गारा पडण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरतात, एक.. हवा जास्त उंचीपर्यत जायला हवी आणि दुसरी या हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असायला हवे.या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, त्याचं ढगात असणं, खाली पडणं, सारं काही अद्भूतच. गारा म्हणजे पावसाचाच एक प्रकार, परंतु गोठलेल्या स्वरूपात पडणारा. दुसऱ्या शब्दात सांगायचे, तर हा एक नैसर्गिकरित्या हवामानात झालेला बदल. अचानक आपले उच्चत्तम टोक गाठून बेसावध क्षणी मानवी जीवनाला खिंडीत पकडणारी घटना. तसे पावसाळ्यात गारपीट होणे आपल्या सवयीचे, मात्र आता भर उन्हाळ्यातही गारपीट व्हायला लागली आहे. कवीने हे शीर्षक का निवडले असावेत तर या साठीच, कि मानवी जीवनाचा इतिहास हा संघर्षाचा राहिलेला आहे. अनेक कसोट्यांवरून स्वत:ला सिद्ध करत चालत जाणे हे प्रत्येकाला न चुकलेले कर्म. जे दिसते, तसे खरोखर असते का? किंवा सर्व काही सुरळीत सुरु असताना, गारपीटसारख्या अनपेक्षित घटना, काही कळायच्या आत मानवी जीवन बाधित करतात, तेव्हा मनुष्य जसा निसर्गापुढे हतबल होतो, तसा तो सामाजिक जीवन जगताना अनेक पातळ्यांवर त्याच्या वाट्याला 'गारपीट' सारखे दाहक अनुभव येत असतात. त्या चटक्यामुळे तो हतबल होणे आलेच, त्यातून परात्मभावाची जाणीव व्हायला लागते. परंतु तो उठतो, लढतो. प्रतिक्रिया देतो. ही उमेद त्याला हा निसर्ग, ही मातीच देत असते. त्याच एका संवेदनशील मनाची ही कविता ‘गारपीट’.
कवीने आपल्या वाट्याला आलेल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून, मराठीसह बोलीभाषेचा एक सुंदर संगम साधला आहे. अगदी जी कविता मराठीत लिहायची ती मराठीतच लिहिली, उगाच तिला बोलीभाषेचा मुलामा चढविला नाही आणि जी बोलीभाषेत आहे, ती तिच्या संपूर्ण सौंदर्यस्थळांसह पूर्णत्वास नेली. आशयाचे साधर्म्य असलेल्या मराठी आणि वऱ्हाडी बोलीमधील खालील कविता याची साक्ष देतात.
'वस्तुनिर्माता मालक
ठरवितो तिचा भाव,
अपवाद एकमात्र
त्याचे शेतकरी नाव.' (जगाचा पोशिंदा )
माझ्या राजाच्या स्वराज्यी
होते शेतकरी सुखी,
राजा धावून जातसे
कुणी दिसताच दु:खी. ( राजा शिवाजी)
'कर्जातच जल्म झाला
कर्जातच थो मरन,
दिस माह्या हॊ बापाचे
सांगा कवा हे सरन' ?(शेतकरी बाप )
'लाखमोलाचं बियानं
सारं मातीत टाकलं,
हिर्व सपन जपत
वर कायीज झाकलं.' (पेरनी )
कवीचे आपल्या वऱ्हाड प्रांताच्या जन्मभूमीवर, इथल्या मातीवर, माणसांवर निस्सीम प्रेम आहे. या भूमीतील महापुरुषांबद्धल अपार श्रद्धा असून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना, शब्द आपोआपच भावनिक ओलाव्याने ओथंबून येतात.
'माह्या वऱ्हाड भूमीत
शोभे दीक्षाभूमी खासी,
महानुभाव पंथाची
हाये रिद्धपूर काशी.' (माह्या वऱ्हाड भूमीत )
'ग्रंथ रचिले अनेक
हिरा त्यात 'ग्रामगीता,'
सारे चर्चिले विषय
देव धर्म मातापिता.' ( राष्ट्रसंत तुकडोजी)
'माझ्या माहेरच्या लोका
नसे आपली परकी,
साऱ्या सासुरवाशीनी
मानी आपल्याच लेकी. (स्नेहझरा)
कवी व्यवसायाने शिक्षक असल्यामुळे सहाजिकच एखादी गोष्ट समजावून सांगण्याची, शिकविण्याची हातोटी बाळगून आहेत. कुठलाही विषय परिणामकरित्या पोहचविण्याकरिता कधी कधी कवी आपले समुपदेशनाचे अस्त्र बाहेर काढून शाब्दिक वाराने जाणीव जागृती करतात.
'प्रेम दया माया स्नेह
सदा वसे जिच्या ठायी,
रूप साक्षात देवीचे
असो कोणतीही बाई'. (नारी )
'पानी जमिनीत हाय
तेवढंचं तुमी घ्यान,
पानी जाईन सरून
सांगा मांग काय प्यान' ?(भविष्य )
भावाभावामंधी आमी भांडून राह्यलो असं,
देशाच्या इज्जतीचं दुकान मांडलं जसं.
असं वाट्टे सज्जन सारे काढून राह्यले झोपा,
म्हनून इथं दुर्जनाहिनं केला आता खोपा. (अंदाधुंदी)
'दारूपायी कैक संसारायची होऊन गेली माती,
शेती, ढोरं -वासरं गेले, कटोरं आलं हाती.' (सांगा करावं काय?)
'जागा नसेल रडाया
लावा संपत्तीला काडी,
काय कामाचा बंगला
सोनंचांदी शेतीवाडी.' (मंत्र आरोग्याचा)
विदर्भातील शेती आणि शेतकरी हा विषय प्रामुख्याने चर्चिला जातो ते शेतकरी आत्महत्यांमुळे, देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली ती विदर्भातच आणि हे सत्र वाढतच राहिले, अगदी सोन्याची कऱ्हाड असलेला संपन्न भूभाग,आज कोरडवाहू शेतीसह बेरोजगारी, कुपोषण, लोडशेडींग, सिंचन यासह अनेकविध समस्यांनी उग्र रूप धारण करीत असल्यामुळे कवीची अस्वस्थता शांत बसू देत नाही. कवी फक्त दुख:ला वाचा फोडून ते कुरवाळत न बसता त्यावर उपायही सुचवितो.
'असा नोयता पयले
आता काय झालं त्याले,
माती उलाया लागली
तूर पऱ्हाटीले बोले'. ( पावसाया )
'नाही इचारलं कोनं
दूध फेकावं लागलं,
कायं पिवयं पळून
किती अनाज डागलं.' (हिशेब)
'कायले रे शेतकऱ्या तू आत्महत्या करतं,
मर्दाची जात तुह्यी, अन जिंदगीले डरतं' (आत्महत्या)
शेतकरी चळवळीशी साहित्यिक अंगाने कवीचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून असलेला सहभाग,थेट शेतकऱ्यांचे पंचप्राण असलेले मा.शरद जोशी यांच्या शेती, अर्थ विषयक विचारांशी नाळ जोडण्याचे काम त्यांची कविता करते. या विषयीची कृतज्ञता त्यांच्या पंचप्राण ह्या कविते- मधून व्यक्त होते.
'अर्थशास्त्री कृषीशास्त्री
उद्योगाचा अभ्यासक,
बोले तैसा चालणारा
नेता शरद जोशी एक.'
'साहेबांच्या विचारांचा
मीही छोटासा पाईक,
शेतमाला रास्तभाव
हक्क माझा, नव्हे भीक'. (पंचप्राण )
समाजात वावरताना कवीला जे जे दिसते; तो त्या त्या विषयाकडे डोळसपणे बघताना अनेक ठिकाणी आपल्या विचारसरणीशी त्याचा अन्वयार्थ लावून बघतो. बऱ्याचवेळा अरे हे असं नको व्हायला, ते त्याप्रमाणे असायला हवं होतं. या दृष्टीकोनातून कवी काही घटनांना पुढील ओळींमधून प्रश्नांकित करतो, यातून कवीच्या सजग भानाचा प्रत्यय येतो.
'निळा भगवा हिरवा
घरी आपापल्या ठेऊ,
झेंडा आपला तिरंगा
त्याचे गुणगाण गाऊ'. (तिरंगा )
'सत्य अहिंसा शांतीला
जणू दिली मूठमाती,
बोकाळला भ्रष्ट्राचार
गेली देवाघरी नीती.' (बापू )
'नोका दुखवू मायले
माह्य तुमाले सांगनं,
शतायुस लाभो तिले
हेच देवाले मांगनं.' ( माय)
लौकिक अर्थाने साध्या लहान दुर्लक्षित वाटणाऱ्या गोष्टीतही एक सर्जनशील मन त्या पलीकडे जाऊन तेथील सुंदरतेचा वेध घेऊन, कलात्मकतेला जेव्हा शब्दाची जोड देतो,तेव्हा खरंच ती रचना वाचकाला वेगळी अनुभूती देण्याचं काम करीत असते.
'सुंदर असतो शेतकरी
काम करून शिणलेला,
सुंदर तो काडीकचरा
कुजून खत बनलेला.'
शिजत्या अन्नाखालचा
सुंदर असतो जाळ,
आईबापाविना जगणारे
सुंदर असते बाळ'. (सुंदरता)
नभी मंडप ढगांचा
शोभे कमान इंद्राची,
आले कृष्णमेघ खाली
शोभा बघाया सृष्टीची. (क्रीडाप्रणय)
कवी आपल्या कवितेत काव्याची लय सांभाळून असल्यामुळे, काव्यात गोडवा निर्माण होऊन नादमयतेमुळे त्या रचना लक्षात राहतात. प्रबोधनपर गीत, लावणी, भारुड, अभंग अशा अनेक रचना वाचायला मिळतात.
'देहात देव नांदे, ध्यानी मनी धरावे,
पाहून दु:ख दैना, डोळे सदा भरावे'. (देहात देव नांदे )
'पिते दारू आनंदुनी जात माणसाची,
मनी बेवड्यांच्या का रे भीती ना कुणाची
हातातल्या प्याल्यामाजी प्रपंच दिसावा' (अनेकांची प्यारी )
विश्वासाने फुले । संसाराचा मळा ॥
संवाद मोकळा । खतपाणी ॥ (अभंग)
काव्यसंग्रहाचे शीर्षक असलेली 'गारपीट' ही कविता आपल्या पुढ्यात दृष्यमयता निर्माण करून,मानवी जीवनावर निसर्गाच्या कोपाच्या गंभीर परिणामांसह त्याची भयावहता अधिक गडद करीत जाते. हाती आलेलं अचानक मातीमोल होणं काय असते, हे या कवितेमधून प्रत्ययकारीपणे कवी मांडतो.
एकूण ६८ कवितांची मेजवानी असलेल्या या संग्रहात
नौकरीसाठी, बुढिचं पान, औदाचं साल, अंधाधुंदी, निंदन, या सारख्या लक्षवेधी कविता असून वाचकाला वेगळी अनुभूती देउन काव्यानंद प्रदान करतात.
ज्ञानपथ पब्लिकेशनने अतिशय सुंदर, तांत्रिकदृष्ट्या दर्जात्मक पुस्तक प्रकाशित केले आहे. खुशाल गुल्हाने सर यांच्या पुढील सर्व साहित्य प्रवासास माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
रवींद्र अंबादास दळवी,
नाशिक.
'काहून' कवितासंग्रहाचे कवी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा