शुक्रवार, २४ एप्रिल, २०२६

एक होता सुभाष...(व-हाडी कथा..)


   मुंबईचा अरबी खवळला होता. त्याच्या लाटा एकावर एक आदयत, ऊखयत फेस  काळत होता. लाटा एकमेकीशी कुस्तमकुस्त्या खेयत होत्या. काठावर येवून रेतीत ईरघयत होत्या. गरम झालेली काठावरची रेती थन्ड अन् वली होत होती. चटईवाला चटया काखित दाबूनं फेरफटका मारत ईकळे तिकळे फिरत हिंडत होता. रेतीवर बसलेल्या लोकायले 'चटई मिलेगा दस रूपये घंटा, चटई ले लो दस रूपया घंटा... अस म्हनत होता. चहावाला कॅटली घेऊन गीरगावच्या चौपाटीवर " च्यां ऽऽऽ च्यां ऽऽʼऽ दो रूपया कटिंग" 

अस् बारीक अवाजात म्हनत कप कपावर आदयत वाजवत होता. " बंबई की चौपाटी की थंन्डी थंन्डी कुल्फी लो जो गलेको थंन्डक पहुचाती है." अस महन्त लोखंडी डब्बा घेवूनं पीतयीची हातघंटी वाजवत फिरत होता. लाल,गुलाबी, पिव्वी ,पांढी, केसरी अन् तांबूस कांडी लहान लेकरायले आकर्षीत करत होती. गॅसचे फुगे ईकनारी बाई हटकून लेकराय जौळ येवूनं रंगबेरंगी फुगे दाखवत होती. धागा खाली ओहळून अखीन हात सैल करे. त कानातला मय काहाळनारा बाप्या ऊल्शी पेटी खांद्याले टांगून अरधाक फूट लंबी तार अन् काहीतरी ऊल्श्या बाटलीत लिक्विड घेवून फिरत म्हनत होता. " कान का मैल निकालकर मिलेगा भैय्या. तीन रूपया का दो कान, तीन रूपया का दो कानं."अस म्हनत फिरत होता.

      सुभाष समिंदरच्या काठावर बसून दूरचं क्षितिज  पाह्यत होता. भरती ओहटीनं जीते असलेले शंख शिंपले काठावर येत होते. सुभाष रेतीत पाय रूतवून बसला होता. लहान पोरं कल्लाहल्ला करत समुद्राच्या लाटासोबत खेयत होते. तेयच्या चड्ड्या भिजत होत्या. थकले की थे रेतीचे घर बांधत होते. घर बांधताना रेती ऊकरल्यावर खाली पानी लागत होतं. विहिरीले पानी लागल्यागत थे हरकिजान पाह्यत होते. एक नव जोडप बिलगून बसल होतं. थे तेयच्याच तंद्रीत रममान होतं. सुभाष थे सारं शुन्य नजरेनं पाह्यत होता. समुद्र जसा सुभाष सोबत बोलत होता. 

अल्लादी दिवस कलाले लागला होता. सूर्य समुद्रात बुळून राह्यला की काय लोकायले वाटत होतं. केशरी रंगाची चादर पसरवत सूर्य अस्ताले गेला. समुद्र केसरी झाला होता. रसत्यावर वाहनाची वर्दळ वाहाळली होती.सुभाष एका विचारात गुतला होता. मुंबईत येवून आपन एकट झालो. गावात किती ओयखी पायखी घरामधून बाहेर निघालो की रामराम करत हात वरच राह्याचा. लंगोटी यार भेटाचे. तेयच्या सोबत फाट्यावरल्या टपरीवर चा पेनं, बिळी फुकनं, दंगामस्ती करनं. मायच्या हातची गरमागरम चुलीवरची भाकर मटन मासोया खानं. बापाच्या रूबाबाखाली जगनं. भूलीचं थे मनमोहक हासनं.हिवायात हुळ्ळा, ऊंब्या, हुया, बोरं, ऊस खानं. आंगनात बाजीवर वाकय टाकूनं झाळावरच्या पाखरायची किलकिल आयकत निचंत झोपन. रेडीओ वरच्या बातम्या, किर्केट समालोचन आयकनं. सुभाष जुन्या गोष्टी आठवत होता. सुभाष अखिनच भूतकाळात शिरला. पंधराक वरषाचा असन तव्हा सुभाष.  एका रोजी सुभाषची माय वावरात गेली. तिन सुभाषसाठी दोन भाकरी दवळीत ठेवल्या अन् गंजूलीत  हलक्या मटनाची तर्रीबाज भाजी ठुवून थे वावरात निंदाले गेली होती. गावातली कबरी कुतरी दाराच्या फटीतून आंग चोरून  घरात शिरली अन् गंजूली ऊबळून तीनं मटन खाल्ल, दवळीतल्या दोही भाकरी सुंवा केल्या अन् कापसाच्या गंजीवर जावूनं निचंत निझली. सुभाष शाळेतून घरी आला. गंज पाह्यते त काय रिकामा. दवळीत चांदकही नाही अन् ऊंड्याची लक्षूमीही नाही. सुभाष ऊपाशीच पोट्यायसंग सुरपारंबी खेयाले गेला. दिवसभर खेवून थकून गेला. मंग दोयपारी पंचफूला भोयीनच्या घरी गेला. भट्टीच्या वर ठुयलेल्या रेवाच्या कळईतून पोंगें टरटर फुगून वर येत होते अन् पंचफूलाबाई फोळलेले पोंगे काहाळून पोत्यावर टाकत होती. तीन हेरलं सुभाषले भूक लागली म्हनूनसन्या." कारे पोंगे खात काय?"


पंचफूलाबाई म्हनली.

 सुभाषन होकारात्मक मान डोलवली.

" घेनं मंग तासकीत तुले लागनं तेवळे खाय. पन् खानं झाल्यावर तुराट्या भट्टीत लोटू लाग."

पंचफूलाबाई बोल्ली.

" हव आजी." अस म्हनून सुभाष सन्नावूनं भिळ्ळा. पोट भरूनं कचरकचर पोंगे खाल्ले अन् बोंदरी लावलेल्या घळ्ळीतलं पोटभर पानी पेला अन् तुराट्या भट्टीत सरकवू लागला. दिवस कल्ला. सयसंध्याकाय झाली. सुभाषची माय जिजाबाई घरी आली. दवळी गंज हुसकून पाह्यला. सारं सफाचक. सुभाष घरी आला.

" कारे बाबू भाकर अन् मटन खाल्ल काय?"

" नाही व माय. दवळीत त कुटका नोता. अन् गंजूली त रिकामीच होती."

" अव्व माय! कुतरं गीतर घुसल असनं घरात. चल तुले पटकन एक भाकर टाकूनं देतो अन् मंग तू जेवं. "

अस् जीजा बोलूनं घोय खोसूनं भाकर कराले हातपाय न धुता बसली. तीनं कोपर घेतला. चायनीनं पिठ गायलं. पिठात चिमूटभर मिठ टाकलं. घळाळीतलं पानी तांब्यात घेतलं. तावा चुलीवर ठुयला. चूलीच्या तोंडात तु-हाट्या खोसल्या. चिळी पेटोली. सौद्याचा कागद चुलीत टाकला. अंगारडब्बीन चूल भळकोली. ऊंडा चुरला. हातावर भाकर थापली. ताव्यावर पान्याचा शिपका मारला अन् रप्पकन भाकर ताव्यावर टाकली. भाकर दोही बाजूनं भाजली.आर बाहेर ओहळला. भाकर आरावर ऊभी केली. अन् भाकरीचा कुटका दवळीत टाकूनं भाकर तासकीत देल्ली.

" घे मा खाय भाकरं."

अस जिजाबाई बोलली.

सुभाषनं तासकी घेतली. तासकीत भाकर घेतली. भाकरीवर लाल चटनी घेतली. चटनीच आय केल. आयात पानी वतलं. अन् सुभाष म्हनते कसा.

" मा हे भाकर म्हनजे तू अन् हे चटनी म्हनजे तुया माथ्यावरलं कुकू."

" बापा बापा एखांद्या लेखका सारखाच बोल्त तू."

" मा मले लय मोठा लेखक बनाच हाय."

" मंग शिका लागनं तुले. पुस्तक वाचा लागनं."

"हव मा मी लेखकच बननं."

   अस् सार सुभाषले समुद्राच्या काठावर बसून आठोत होतं. आज सुभाष ऊपाशी होता. पन् पटकन भाकर करून द्याले माय नोती.


लेखक 

सु.पुं.अढाऊकर 

अकोला 

९७६९२०२५९७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...