'तितिक्षा' हा नागपूर येथील सुदर्शन पनतोडे यांचा दुसरा कवितासंग्रह. पहिला कवितासंग्रह 'स्पर्शिका' हा मागील वर्षी प्रकाशीत झाला होता. त्यावरही मी लिहिले होते.या कवितासंग्रहाने कविला सन्मान मिळवून दिला. कवी पत्र सूचना कार्यालय, प्रकाशन विभाग,भारत सरकार येथे कार्यरत होते.शेवटी अप्पर महासंचालक ,पसूका,माहिती व प्रसारण मंत्रालय,छत्तीसगड येथून २०२० साली सेवानिवृत्त झालेत. 'तितिक्षा' या काव्यसंग्रहात हिंदी-७ मराठीतील-४८ काव्यरचनांचा समावेश आहे. त्यांच्या सर्व काव्यरचना या दोन ओळींचं कडवं असलेल्या मुक्तछंदातील आहेत. त्यांची कविता म्हणजे जीवनात अस्वस्थ करणा-या घटना आणि आंतर मनातील भाव-भावनांचं प्रकटीकरण आहे. त्यांनी जे अनुभवलं, त्यांनी अवती-भोवती जे बघितलं,अनुभवलेले मानवी स्वभावाचे विविध पैलू,स्वभाव, राहणीमान,वर्तन, कर्म, तसेच शासन,प्रशासन, व्यवस्था यांच्या कार्याचा संक्षीप्त आढावा घेतल्याचे जाणवते. विविध म्हणीचाही या कवितेत अंतर्भाव केलेला जाणवतो. कविची अभिव्यक्ती ही डोळसपणे मानवी जगणं अनुभवते. आणि अगदी मोजक्या शब्दात शब्दबद्ध करते.त्यांच्या रचनेतील काही शब्द जरा जड असल्याचे जाणवतात. तो त्यांचा अभ्यासाचा,चिंतनाचा व बुद्धिमत्तेचा भाग असावा. त्यामुळे कविता निश्चितच भारदस्त वाटते. आशय आकलनाच्या अनुषंघाने कधिकधी ती दुर्बोधतेकडे झुकतांना दिसते. गझलेच्या शेरासारखाच प्रत्येक दोन ओळीत वेगवेगळा आशय दडला असल्याचे जाणवते. कविने विविध विषयाला,आशयाला हात घातलेला आहे. कधी ते मानवी स्वभावाला, अवगुणाला हळूच चिमटा काढतांना दिसतात. ते कवितेत आक्रस्ताळेपणाने व्यक्त होत नाहीत. तर अगदी शांतपणे दोषांवर बोट ठेवतांना दिसतात. कवी जेव्हा एखाद्या विषयावर व्यक्त होतात, तेव्हा ते वाचकाला बोचतांना दिसत नाही. कविता शांतपणे व हळूवारपणे आपलं म्हणनं मांडत जाते.ती कुणालाही दुखवितांना दिसत नाही. कदाचित हा कविचा स्वभाव असावा. कधी कधी कविच्या स्वभावानुसार कविता शब्दांचा हात धरून प्रवास करीत असते. पनतोडे यांची कविता उताविळ नाही तर वैचारीक वर्तुळ असलेली, शांत स्वभावाची आशयघन कविता आहे. तिच्यात विद्रोह नाही. ती भूतकाळाचा परामर्श घेत वर्तमानाचा हात धरून चालते. अलिकडच्या विज्ञानयुगात, स्पर्धायुगात मानव यंत्र झाला असल्याचे निदर्शनात येते.आपल्या माणसांशी त्यांचा संवाद कमी झालेला आहे. लोक आपल्या कामात, आधुनीक यंत्रात, जसे मोबाईल,लॅपटाॅप, संगणक, नोकरी, पॅकेज यामध्ये हरवलेले दिसतात. तो घरातल्या घरात कुटुंबातील व्यक्तींशी बोलत नाही. संवाद साधत नाही. असे कविला वाटते.
"साधन संवादाचे असेल जरी शेजारी पाजारी
एका घरात चार खोल्या,अन् संवादाचा रथ होई भारी !" ( ढालकरी)
हे अलिकडच्या पिढीचे वास्तव चित्रण कवी आपल्या कवितेतून उजागर करतो. मानवी जीवनात,मानवी मनात क्षणोक्षणी विविध बाबतीतील इच्छा,आकांक्षा,अपेक्षा निर्माण होत असतात. आपण त्या सर्वच इच्छांना पूर्णत्वास नेवू शकत नाही. परंतु मनात नाना विचारांचे चक्र सारखे गतीमान होत असते. काही प्रश्न पडतात, काही समस्या उद्भवतात,काही घटना घडत असतात. या विषयीच्या विचाराने मानवी मन बेचैन होतं. योग्य कर्तृत्वाला चालना मिळत नाही. अशावेळी आपण भरकटत जातो. यावर कवी आपल्या कवितेतून प्रकाश टाकतांना दिसतो....
" आहे मनात जी तितिक्षा,करावी तिची प्रतीक्षा
आहे मनात जी अपेक्षा,करावी तिची समीक्षा !"
(तितिक्षा)
भ.बुद्धाने आपल्या प्रज्ञेने ,मानवाच्या दु:खमुक्तीचे कारण,उत्तर व प्रयत्नाचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण मिळविले, विजय मिळविला. बुद्धाने प्रज्ञेच्या भरवश्यावर आपले ध्येय गाठले आणि समस्त मानव जातीला कल्याणाचा मार्ग सांगीतला. कवी म्हणतात आपण अपेक्षांची समीक्षा करायला हवी. मन शांत करायला हवे. तरच आपल्याला आपल्या उत्थानाचा योग्य मार्ग गवसतो.
माय ही कुणाचीही असो. ती स्वाभिमानी असते, कष्टाळू असते, ती आपल्या कुटुंबाप्रती प्रामाणीक असते. ते मायविषयी नागपूरी भाषेतील 'बाबूच्या घरी' या कवितेत व्यक्त होतांना म्हणतात.
" आहो तोवर करीन मी कष्ट
एक करीन पक्क,खाईन नाही उष्ट!"
अशी स्वाभिमानी व कष्टाळू माय कविने रेखाटली आहे. कवी शब्दांना आभाळमाया प्रदान करणारा आहे. तो शब्दांचं सोनं करतो. अचूक मांडणी अचूक शब्दांद्वारे करतो. ज्याने भले केले त्याच्याविषयी कृतज्ञताभाव मनात जपला पाहिजे. कृतघ्न होऊ नये. कोणत्याही माणसाचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे नसावे, असे कविला वाटते. हा महत्वाचा संदेश आहे. पक्क(खरा) इतिहास विसरून जाऊन न्यूनगंडाचे भूत माणसा माणसाच्या मानगुटावर बसले की काय ? अशी भितीही कवी व्यक्त करतांना दिसतो. मानवाने वेळीच सजग झाले पाहिजे. प्रज्ञेचा सूर्य सदैव आपल्या विचारात नि कर्मात प्रकाशीत ठेवला पाहिजे. तरच तो तरतो. चिंता करून माणूस सुखी होत नाही. प्रत्येक समस्येवर,संकटावर,दु:खावर मार्ग ,उपाय आहे. विचलीत न होता ,धाडसाने सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे असे कवीला वाटणे स्वाभाविक आहे.
" आमंत्रण-निमंत्रण पाठवले,दिवस होते सुगीचे
खास मेजवानी म्हणून,घरच्यांनाच वगळले होते!
(दिव्याखाली अंधार)
काही लोकांना सुखात असले की,वाद-विवाद झाले की,आपल्याच माणसांचा त्यांना विसर पडतो. स्वार्थी बणतात. लोकांना खूप ज्ञान सांगतात.पण स्वत: मात्र तशी कृती करतांना दिसत नाहीत. यालाच दिव्याखालचा अंधार म्हणतात. कवी नेमकं मानवाच्या अशाच अवगुणांवर बोट ठेवतो. कविच्या काही रचनांमध्ये खयाल,आशय आकलनाच्या बाबतीत स्पष्टतेची जरी उणीव जाणवत असली तरी कवितेत सूचकभाव मात्र निश्चितच आहे.
'आदिकारण' ही रचना काही माणसांच्या स्वभावातील दुटप्पीपणा अधोरेखीत करते. आमच्या लोकांची कधी कधी फसगत होते. आम्ही आमचा मार्ग,हक्क,अधिकार विसरून कुणाच्या सांगण्यावरून भावनेच्या भरात वाहवत जातो. आणि आमचं नुकसान करून बसतो.आम्ही सदैव आमच्या ध्येयापुर्तीच्या मार्गावर चाललं पाहिजे. हेच कविला सुचवायचे आहे. प्रत्येक माणसात कमी-अधिक प्रमाणात प्रतिभा असते.विविध कला,विषय,क्षेत्रान्वये ती वेगवेगळी असू शकते. पण त्यात सुसूत्रता असली पाहिजे. भावभावनांचा कल्होळ होऊन ,अनाठायी शब्दांच्या भडिमारात प्रतिभेचा किंवा सर्जनाचा,नव कलाकृतीचा कोंडमारा होऊ नये.आत्मस्तुती ठरू नये. योग्य शब्दांच्या उपयोजनातून सकस आणि साजेशी कलाकृती जन्माला आली पाहिजे. आणि जो कलाकार यात यशस्वी ठरतो तोच खरा कलाकार.
कित्येक माणसं विज्ञानयुगात निसर्गाला कमी लेखतांना दिसतात. उन्मातामुळे त्याच्या चक्राकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. त्याचे विपरीत परीणाम कधी कधी समस्त मानव जातीला, पशू, पक्ष्यांना,झाडा-झुडपांनाही सहन करावे लागतात. निसर्गचक्रात आपण आवश्यकतेपेक्षा ढवळाढवळ करता कामा नये. परंतु निसर्ग सृष्टीचे अनंत उपकार आपण विज्ञानाने लावलेल्या शोधांमुळे, सुखसोईंमुळे विसरत चाललो आहोत.आपण सदैव निसर्गाशी मैत्रीचे नाते ठेवले पाहिजे. त्यातील घटकांचे आभार मानले पाहिजे.त्याच्याविषयी कृतज्ञ असलो पाहिजे. त्यांच्याविषयी आपल्या मनात मंगलमैत्री भावना बाळगली पाहिजे. आपण अकुशल कर्म केले तर दु:खच आपल्या वाट्याला येवू शकतात. आणि या स्पर्धेच्या युगात,स्वार्थाच्या बाजारात तुमच्या दु:खाला कुणीही विचारीत नाहीत. 'दु:खसमूह' यात कवी जनतेला सजगतेचा इशारा देतांना म्हणतात....
" ही माझी करणी कशी? नियतीनेही केला एक सवाल
सुख-दु:खाचे ओझे तुमचेच, मी कां वाहू माझ्या मनात ?" ( दु:खसमूह)
माणूस जीवनात हताश होतो. कारण त्याला आपल्या जीवनातील दु:खापेक्षा,विवंचनेपेक्षा, समस्या, संकटांपेक्षा काहीही महत्वाचं वाटत नाही. हळूहळू तो हतबल होत जातो. इथे असामान्य काहीतरी आहे, ध्येयाचं शीखर गाठायचं आहे, सुखाची सर त्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येवू पाहते. आयुष्यात बेरजेच्या क्षणांचे गणित करण्यापेक्षा तो आपल्या आयुष्यात काय गमावले या वजाबाकीचाच अधिक विचार करतो. मनात नकारात्मक भाव बाळगतो. त्यामुळे त्याची मती मंद होत जाते. क्रयशक्ती,विचारशक्ती कमी होत जाते. तो जेव्हा सकारात्मकतेचा विचार करण्यापेक्षा नकारात्मक विचार जास्त करतो. तेव्हा तो जीवनात यशस्वी होत नाही. याचं गमक कवी 'विप्रकृष्ट' या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. कविने आपली अभिव्यक्ती आपल्याला सोप्या वाटणा-या मनासारख्या प्रकरात व्यक्त करावी. पण कोणत्याही काव्यप्रकाराची हुजरेगिरी करू नये. असेही त्याला वाटते. कविच्या या मताशी मी सहमत आहो.
अलिकडे समाजात दुफळीचे,विभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शहाणे, दीड शहाणे ,कुणी कुणाचे ऐकूण घ्यायला तयार नाही. अनेक चळवळींना दुफळीने ग्रासले आहे. पण एकीने जे साध्य होईल ते बेकीने होणार नाही. असे परखड मतही कवी व्यक्त करतात. अशाच आशयाचा 'आनंदकंद' या कवितेत बाप-लेकाचा संवाद आपल्याला वाचायला मिळतो. याचबरोबर 'ओळखा बघू' या कवितेत मेंढरांप्रमाणे जगणा-या माणसांच्या मानवी प्रवृत्तीवरही प्रखर शब्दात कवी ताशेरे ओढतांना दिसतात.
" जे विसरले काळाची गरज,ती मेंढरं होती,
तेच छद्मी पशुपालक लबाडीने काहीतरी सोलत होती,
मेंढरेच ती आरामाने चारा खात होती,आरामाने अज्ञान रवंथ करीत होती !" (ओळखा बघू)
या ओळी वाचल्यावर ही कविता कुणासाठी आहे? हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या कुटुंबाची ,स्वत:ची चिंता ही प्रत्येकालाच असते, ती आयुष्याचा एक भाग झाली असून यापासून कुणीही सुटलं नाही. परंतु चिंता करून चितेवर जाण्याआधी आपण त्यातून जीवनाच्या यशस्वितेचा मार्ग शोधला पाहिजे. त्याविषयी हिंदी भाषेतील 'संभ्रम' या कवितेत कवी व्यक्त होतांना म्हणतात...
"चिंता है, पर चिंता से यहा कौन बचा
कारण कई, आपसी मनमुटाव से कौन बचा!"
पर्यावरणाच्याविषयी अलिकडे कुणी बोलत नाही. वाढत्या जल,वायू,ध्वनी प्रदुषणावर कुणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे आम्ही आपल्या जीवनात अनेक आजारांना निमंत्रण देत आहोत. वारेमाप कोणत्या ना कोणत्यातरी कारणावरून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वृक्षरोपण व वृक्षसंगोपणाकडे पद्धतशीर दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढले आहे. पशू पक्ष्यांचे जीवन अस्थीर झाले आहे.त्यांची संख्या कमी झाली आहे. निसर्गाचं चक्र बदललेलं आहे.वेळी- अवेळी पाऊस पडतो,उष्णतामान वाढले. त्यामुळे शेत पिकांची नासाडी होत असल्याने शेतक-यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागते. त्याचे जगणे असह्य झाले आहे. याबाबत कविच्या कवितेच्या दोन ओळी महत्वाच्या वाटतात....
" पेड़ की एक टहनीपर,किसी ने कुल्हाडी चलाई
किसी ने भी नही कहा,किस की शामत आई !"
(मूढ़ता)
एकूणच कवी संवेदनशील मनाचे आहेत. त्यांना मानवाच्या अतिरेकी वागण्याच्या प्रत्येक परीणामाची जाणीव आहे. याचा परीणाम भविष्यात कुणावर,किती,कसा होईल ? याची जाण आहे. त्यांनी आपल्या जाणीवा आपल्या वाचनातून,अनुभवातून, अवलोकन, चिंतन, मननाद्वारे कवितेमधून मांडण्याचा प्रामाणिक केलेला प्रयत्न. ही या कवितासंग्रहाची जमेची बाब आहे.दोन ओळीच्या चरणातील मुक्तछंदातून कमीत कमी शब्दात त्यांनी मानवी व व्यवस्थेतील अवगुणांचे प्रकटीकरण केले आहे. त्यांच्या कवितेत शब्दांचा पसारा दिसत नाही. अधिक विद्रोह किंवा आक्रोश,आक्रसस्ताळेपणा दिसत नाही. शांततेने ते व्यक्त होत जातात. ही विशेषता त्यांच्या कवितेची आहे. या कवितासंग्रहाची समर्पक व न्यायपुर्ण शब्दात प्रस्तावना जेष्ठ गझलकार,कवी प्रा. हृदय चक्रधर सर नागपूर यांनी लिहिली आहे. सदर पुस्तक शब्दशिल्प प्रकाशन,नागपूरचे कलाम अहमद खान यांनी प्रकाशीत केले असून पुस्तकाचा दर्जा आंतर-बाह्य अप्रतिम आहे. कवी सुदर्शन पनतोडे यांचे या सकस साहित्यकृतीसाठी अभिनंदन करतो व पुढील लेखनासाठी हार्दिक मंगलकामना देतो.
अरुण हरिभाऊजी विघ्ने
मु.रोहणा,आर्वी,जि.वर्धा



खूप छान पुस्तक झाले, कविचे आणि प्रकाशकांचे अभिनंदन. माझ्या समीक्षेस प्रकाशीत केल्याबद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवा