आज काही कविता आमच्या वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. आस्वाद घ्या आणि प्रतिक्रिया कळवा.
__________
*तूच निराकार*
पांडुरंग माझा/सावळा श्रीहरी/
उभा विटेवरी/युगे युगे//....१
तुच निराकार/आहेस रे देवा/
मनी तुझा ठेवा/देवराया/...२
भेटीसाठी तुझा/व्याकूळ मी झाले/
धावूनिया आले/चरणाशी/..३
रूप तुझे देवा/साठविले मनी/
नाही दुजा कुणी/तुझ्याविणा//...४
बनला आधारं/ठेवला विश्वास/
भक्ताचीच आसं/विठूराया//...५
जनाचा कैवारी/दिनाची सावली/
झाली ती माऊली/पांडुरंग //...६
धन्य धन्य झाले/अवघे जीवन/
धरले चरण /भगवंता//...७
✍️........
सौ.ज्योत्स्ना भास्कर बन्सोड
कुरखेडा,जि.गडचिरोली
___________
शब्दसुख
कवी मनाच्या
हळव्या कोपऱ्यातून
दाटून येतात
भावना जेव्हा ..
कागदावर अलगत
उतरताना होतो
आनंद तेव्हा ..
हेच शब्द सुख मला
श्वासागणिक
मिळावा...
अन कवितेचा सुगंध
माझ्या भोवती कायम
दरवळत राहावा ..
संगीता नागदिवे... सना
यवतमाळ
___________
*बंधुत्व फुलवू अंतर्मनी*
जननीची जननी वसुंधरा
ममतेने नटली ती छाना ।
दुर जाता, जवळ घेई
थोरवी तिची महान ।।
पाजीत पान्हा सुखवी सर्वा
कष्ट करीत जगी या ।
थकले जेही कुशीत घेई
गित अंगाई गावूनीया ।।
मुल्य तियेचे न जाणिती
कल्होळ सदाच घरी ।
पर्वा नच जीवा, जीवाची
उडती सुळाच्या लहरी ।।
असह्य स्थिती बघता आज
दिसती चिंताग्रस्त लेकरे ।
हिरोशीमा शहर आठवित
अंग अजुनीही थरथरे ।।
जन्म इथे मिळे एकदाच
कां नसावी जाण लेकरा ।
वैर फिरतो वायु वेगे
खेळ सृष्टीचा कसा हा न्यारा ।।
मुल्य ममतेचे उमजू सारे
बंधुत्व फुलवू अंतर्मनी ।
शांतविण्या तिज एकी ठेवू
धुळ चरणाची भाळी लावुनी ।।
-सौ.कोमलकांता बन्सोड
भिवापूर
भ्र.क्र.: 7447810764
________
*जागते रहो *
*स्मशान जागत आहे*
नरबळी मागत आहे
सत्तांध सैतान देशात
मनमौजी वागत आहे!
देशात सर्वोच्च पदी
भारतीय नारी आहे
द्रौपदीचे वस्त्रहरण
सांग कसे जारी आहे!
हीच का रे लोकशाही
इज्जतीचे तीन तेरा
ओरडून सांगा जगा
महान भारत मेरा!
कायदेही भ्रष्टाचारी
निर्भीड हे अत्याचारी
लाचार जनता होता
सैराटले दुराचारी!
स्वदेशात स्वैराचारी
न्यायलयी न्याय नाही
जखमांचे घाव ताजे
सुरक्षित माय नाही!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला
देशांतरी वाव नाही
स्वार्थी लोक प्रतिनिधी
सेवा धर्मी ठाव नाही!
स्त्री हत्याकांड सारे
देशात गाजत आहे
प्रतिनिधी सदनात
बसून लाजत आहे!
स्वदेशा तू मुर्दा नाही
थांबव नाटक सारे
उठलेल्या वादळात
जाळतील गाव तारे!
जात पात धर्म पंथ
मानव निर्मित आहे
अज्ञात माणूस कसा
फुकट गुर्मीत आहे!
बलिदानी देशा आता
लवकर तू जागा हो
आज रेशमी बंधनी
सुरक्षेचाच धागा हो!
*कृष्णा कुंभारे*
वरुड, जि.अमरावती.
_________
प्रेमाचं बदलतं स्वरूप
आजची पिढी म्हणते...
“आधी आम्हीं जगून पाहतो,
नंतर ठरवतो,एकत्र राहायचं
की नाही!”
इथेही प्रेम आहे,
पण ‘एक्झिट ऑप्शन’ सुद्धा,
नेहमी तयारच असतो…
आधीची पिढी म्हणायची...
“एकदा नातं जुडलं की,
मागे वळून पाहायचं नाही!”
पण तिथे अड्जस्ट जास्त होतं,
आणि सोडून जाणं,
खूप कमी होतं!
आज प्रेम मोकळं आहे,
आणि थोडं फ्रँगली सुद्धा…
पण लहानशा कारणाने
तुटतं...
आणि 'इगो' मध्ये
हळूच हरवून जातं...
कालपर्यन्तचं प्रेम बंधनात होतं,
पण त्यात सहनशीलता होती,
स्वतःला बदलण्याची तयारी होती
आणि “आपलेपण” जपण्याची
एक जिद्द होती!
आज आपण फ्रीडम शोधतो,
कालच्या लोकांनी
स्टेबीलिटी शोधली…
दोन्ही कदाचित बरोबरच आहेत
पण खरी गोष्ट इतकीच की,
नातं टिकवायला
आजही
तितकीच मेहनत लागते!...
- प्रतिक्षा कै.रामटेके
गंगासागर हेटी ता.नागभीड
जि.चंद्रपूर
मो:7666803405
__________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा