गुरुवार, १९ मार्च, २०२६

महाड सत्याग्रह : सामाजिक क्रांतीची सोनेरी पहाट

 


"तहानलेल्या पाखरांवर, तुम्ही कसे उपकार केले

ओंजळीने पाणी पिताच, सारे तळे चवदार केले।"

बाबासाहेब म्हणजे विद्रोहाचा युटोपिया. बाबासाहेब म्हणजे क्रांती. जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले एक तडफदार, तेजस्वी आणि युगनिर्माण करणारे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्ञान, स्वाभिमान, धैर्य आणि परिवर्तनाची प्रचंड ऊर्जा सामावलेली होती. त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखवले.

याच बाबासाहेबांनी तहानलेल्यांना, भुकेल्यांना आणि शतकानुशतके अन्याय सहन करणाऱ्या समाजबांधवांना चवदार तळे येथे 20 मार्च 1927 रोजी आपल्या ओंजळीने पाणी पाजले. हा प्रसंग केवळ एका तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा नव्हता; तो मानवी अस्मितेचा, समानतेचा आणि स्वाभिमानाचा ऐतिहासिक उद्गार होता.

महाड सत्याग्रहाचा उद्देश केवळ पाणी मिळवणे हा नव्हता. तो होता — “आम्ही सुद्धा इतर माणसांप्रमाणे माणूस आहोत आणि आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे” हे ठामपणे जगासमोर सिद्ध करणे. त्या काळात अस्पृश्य म्हणून हिणवले जाणारे लोक समाजाच्या काठावर ढकलले गेले होते. त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा, विहिरीतून पाणी घेण्याचा, मंदिरात प्रवेश करण्याचा, शिक्षण घेण्याचा — अशा अनेक मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले गेले होते.



ज्यांना बहिष्कृत म्हणून ओळखले जात होते, ज्यांचे जीवन गावकुसाबाहेरच्या झोपड्यांत मर्यादित होते, ज्यांना स्पर्श करणेही पाप मानले जात होते — अशा लोकांच्या मनात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करणे अत्यंत आवश्यक होते. बाबासाहेबांनी याच गोष्टीचा विचार करून महाड येथे आंदोलन उभे केले.

“आम्हालाही पाणी पिण्याचा अधिकार आहे; तो मिळत नसेल तर आम्ही तो स्वतः मिळवू,” या निर्धाराने त्यांनी आपल्या समाजबांधवांसह चवदार तळ्याकडे कूच केली. हजारो लोक त्यांच्या मागे उभे राहिले होते. त्यांच्या डोळ्यांत आशा होती, मनात भीती होती; पण त्याहून मोठा होता स्वाभिमानाचा जाज्वल्य ज्वालामुखी.

या ऐतिहासिक कृतीपूर्वी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना उद्देशून एक प्रभावी भाषण केले. ते म्हणाले —

“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आपण अमर होणार नाही. आपण आतापर्यंत ते पाणी प्यायलो नव्हतो तरी आपण मेलो नव्हतो. आपण तळ्यावर जातोय ते केवळ पाणी पिण्यासाठी नाही, तर आपणही माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी आहे.”

या शब्दांनी उपस्थित जनसमुदायाच्या मनात नवी चेतना निर्माण झाली. बाबासाहेब पुढे म्हणाले की, समाजाची उन्नती करायची असेल तर प्रथम स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. स्वतःच्या विचारांत, वागण्यात आणि आचारात परिवर्तन केल्याशिवाय बाह्य बदल साध्य होऊ शकत नाहीत.

त्यांनी काही महत्त्वाच्या सामाजिक सुधारणांवर भर दिला —

मृत जनावरांचे मांस खाण्याची प्रथा सोडणे, इतरांनी टाकलेले उष्टे खाण्याची सवय सोडणे, आणि स्वतःच्या स्वाभिमानाची जाणीव ठेवणे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, उन्नतीसाठी तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत — स्वतःची मदत (Self-help), स्वाभिमान (Self-respect) आणि स्वज्ञान (Self-knowledge).

तसेच त्यांनी पालकांना उद्देशून सांगितले —

“जोपर्यंत पालकांना आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा चांगले जीवन जगावे असे वाटत नाही, तोपर्यंत त्या पालकांमध्ये आणि जनावरांमध्ये फारसा फरक राहणार नाही.”

ही वाक्ये केवळ टीका नव्हती; ती जागृतीची ठिणगी होती.

त्या काळातील सामाजिक परिस्थिती अत्यंत अमानवी होती. पाणी हे जीवनाचे मूळ आहे, परंतु अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना पाण्यालाही स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. नद्या, विहिरी, तळी — हे सर्व समाजाच्या उच्चवर्णीय घटकांच्या ताब्यात होते. एकीकडे जनावरे सहजपणे पाणी पिऊ शकत होती, तर दुसरीकडे माणसाला पाण्याचा थेंब मिळण्यासाठी अपमान सहन करावा लागत होता — ही किती मोठी शोकांतिका होती!

अशा परिस्थितीत, निसर्गदत्त संसाधनांवर सर्वांचा समान अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी महाड सत्याग्रह उभा राहिला.



20 मार्च 1927, दुपारची वेळ. सूर्यकिरणांनी उजळलेले चवदार तळे जणू एखाद्या नव्या युगाच्या साक्षीदारासारखे चमकत होते. त्या पाण्याकडे बाबासाहेब पुढे सरसावले. त्यांनी आपल्या ओंजळीत पाणी घेतले आणि ते प्राशन केले. हाच तो ऐतिहासिक क्षण होता, ज्याने सामाजिक क्रांतीला नवे वळण दिले.

या घटनेने माणूस आणि माणूस यांच्यातील भेदाभेद मोडून काढण्याचा मार्ग दाखवला. लाखो-कोट्यवधी लोकांच्या मनात स्वाभिमानाची जाणीव निर्माण झाली. बाबासाहेबांनी दिलेला संदेश स्पष्ट होता —

“हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.”

या सत्याग्रहात महिलांचाही मोठा सहभाग होता. त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह या लढ्यात भाग घेतला. हे आंदोलन केवळ पुरुषांचे नव्हते, तर संपूर्ण समाजाचे होते. महिलांनी दाखवलेले धैर्य आणि सहभाग ही या चळवळीची मोठी ताकद होती.

महाड सत्याग्रहानंतर समाजात प्रचंड खळबळ उडाली. उच्चवर्णीयांनी या घटनेचा विरोध केला, परंतु या विरोधामुळेच चळवळीला अधिक धार मिळाली. पुढे याच महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करण्यात आले, ज्यामुळे सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा अधिक तीव्र झाला.

बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले होते —

“तुम्ही अस्पृश्य आहात” ही मानसिकता सर्वात आधी सोडा.

कारण खरे स्वातंत्र्य हे मनातून सुरू होते.

त्यांच्या विचारांनी समाजबांधवांच्या रक्तात क्रांतीची बीजे पेरली. “समानता की जय, शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. हा केवळ आवाज नव्हता; तो स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा आणि नव्या जीवनाचा उद्घोष होता.

महाड सत्याग्रह हा गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचा पहिला मोठा टप्पा होता. तो केवळ पाण्यासाठी नव्हता; तो माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी होता. या आंदोलनाने दलित चळवळीला नवे स्वरूप दिले आणि पुढील अनेक सामाजिक चळवळींसाठी प्रेरणास्थान ठरले.

आज शंभर वर्षे उलटून गेली असली तरी जातिवादाचे विष अजूनही काही प्रमाणात समाजात दिसून येते. त्यामुळे महाड सत्याग्रहाचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

बाबासाहेबांनी सत्याग्रहाला शस्त्र म्हणून वापरले, पण ती लढाई अहिंसेची होती — स्वाभिमानाची होती. ती लढाई एका दिवसाची नव्हती, तर युगानुयुगे चाललेल्या अन्यायाविरुद्धची होती. त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणजे संघर्ष, शिक्षण आणि संघटन यांचा संगम.

त्यांचा स्पष्ट विचार होता — समानता आणायची असेल तर खालच्या स्तरावरच्या लोकांना वर आणले पाहिजे. समाजातील विषमता दूर केली पाहिजे. जातीभेद नष्ट केले पाहिजेत. आणि प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे.

महाड सत्याग्रह ही केवळ ऐतिहासिक घटना नाही; ती एक विचारधारा आहे, एक प्रेरणा आहे, एक क्रांतीची ज्योत आहे. ती आपल्याला सतत सांगते — अन्यायाविरुद्ध लढा द्या, स्वाभिमान जपा आणि समानतेसाठी प्रयत्न करा.

आजच्या पिढीने या सत्याग्रहाचा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. कारण समाजातील खरी प्रगती ही केवळ आर्थिक किंवा तांत्रिक प्रगतीने होत नाही; ती होते विचारांच्या परिवर्तनाने.

महाड सत्याग्रह आपल्याला शिकवतो की,

स्वाभिमानाशिवाय जीवन निरर्थक आहे आणि समानतेशिवाय समाज अपूर्ण आहे.



प्रा. डॉ. वैशाली धनविजय/डोंगरे

नागपूर

9423110813

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...