पूर्व विदर्भातील लोकमाणसाची जी मायबोली आहे त्या झाडीबोलीला सन्मान मिळावा म्हणून झाडीबोलीला आपला श्वास मानून अविरत खपणारे, झाडीबोलीचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी सदा तत्पर असणारे आचार्य ना.गो.थुटे सर जाणे म्हणजे झाडीबोली बरोबरच संबंध बोली चळवळीची, बोली माणसांची कधीही भरुन न निघणारी हाणी आहे.झाडीबोलीशी सलगी करुन जमेल ते आयुष्य खर्ची घालण्याचे काम त्यांनी केले.बोलीमहर्षी डॉ.हरिश्चंद्र बोरकरांसोबत सुसंगत घडवून आपल्याला व पर्यायाने अनेक कवी,लेखकांने घडविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.अँड लखनसिंह कटरे,डॉ.राजन जयस्वाल,हिरामण लांजे,अंजनाबाई खुणे या पहिल्या फळीतील आचार्य ना.गो.थुटे होते.झाडीबोलीला उंचीवर नेण्यासाठी व झाडी माणसांचा स्वाभीमान जागृत करण्यासाठी या आचार्यांनी दिवस रात्र एक केले.बोली संगठन करुन एक मोट बांधली.मातीचा गंधाला सुंगंधीत करुन झाडीबोलीला अव्वल स्थानावर पोहचविण्या-यांमध्ये आचार्य ना.गो.थुटे सर नेहमी अग्र राहिले.ही त्यांची अविरत कार्यकुशलता अनेकांनी मान्यही केली आहे. झाडीबोली चळवळीला सतत बळ देवून गतीमान करण्याचे काम त्यांनी आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत केले.त्यांचे साहित्य मानवतावादी असून बोलीचा सुगंध ते चौफेर उधळत असत.झाडीबोली आपली माय आहे,तिचे रक्षण-संवर्धन करायचे ! हा पण त्यांनी आयुष्यभर पाळला.आमच्यासारख्या कित्येकांना त्यांनी मायेचा हात देऊन लेखनप्रवृत्त केले. झाडीबोली साहित्य मंडळ असो,सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच असो,अक्षर साहित्य मंडळ असो, फिनिक्स साहित्य मंडळ असो किंवा विदर्भ साहित्य संघ असो ते सा-या संस्थेशी बांधीलकी ठेवून होते. 'कविता' साहित्यप्रकार त्यांचा मुख्य पिंड असला तरी इतरही वाड्मयप्रकारात ते लिलया संचार करत. कवितेबरोबर कथा, व्यक्तिचित्रे, कादंबरी,ललित गद्यातही त्यांनी आपल्यापरिने भर टाकली. आपल्या लेखनीने,कार्याने व निरागस स्वभावाने ते सर्वांचे पितामह झाले होते.कुठेही आणि केव्हाही साहित्य व्यवहारासाठी ते सदा तत्पर राहिलेत.किंतु-परंतुचा जंतू कधी त्यांना शिवला नाही. जीवनव्यवहारात साहित्योपचार किती महत्वपूर्ण आहे,हे ते जाणून होते.सततच्या लेखन व चिंतनाने त्यांची जीवनदृष्टी समृध्द झाली होती.
माझ्या ४८ व्या वाढदिवसी त्यांनी वरो-याहून येऊन मला अनेक आशीर्वाद दिल्याचे आठवते.गळाभेट घेऊन प्रेमाचा वर्षाव करत छोटेखानी कार्यक्रमाची आखणी आमच्या घरी त्यांनी केली होती.एका पितामह साहित्यमहर्षीने माझ्यासारख्या एका फकिराची केलेली वाहवा संस्मरणीय राहिली.अतिशय नम्र स्वभाव,लाघवी बोलणे, शालिन वागणे असे वलयाकिंत व्यक्तित्व आणि सहज सुलभ मैत्रीभाव दृढ करणारे गेल्याची वार्ता कळली आणि मन सुन्न झाले.माणसं जन्माला येतात आणि जातात,अनेक स्मरणातही राहत नाही. आचार्य थुटे सर शरिराने गेले पण आपल्या कार्याने सर्वांच्या मनात कायम राहतील.त्यांच्या कीर्तीची पतंग दिंगतात उडत राहणार आहे,हे नक्की!
तसे पाहिले तर आचार्य ना.गो.थुटे सर अनेक साहित्य संस्कृती मंडळाचे प्राचार्यच होते.त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांना लिहते केले. आयोजन,नियोजन कसे करायचे,ते त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.काटली येथील ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनासाठी त्यांनी भ्रमणध्वनीवरुन अध्यक्ष झाल्याच्या अनेक शुभेच्छा मला दिल्या होत्या. साहित्यासाठी व माणसं जोडण्यासाठी आपला संबंध जीवन समर्पित करणारे, चळवळीचे मर्म जाणून गतीचक्र फिरविणारे, अंत:करणात 'शुध्दतेचा वाहता झरा ' ठेवणारे आदर्श स्फूर्तीपुंज म्हणजे आचार्य थुटे सर होत.झाडीबोली क्षितीजा मंडळावरचा एक स्फुर्तीपुंज तारा गळून पडल्याचे अतीव दुःख आहे.या उमदया, क्रियाशील व ऊर्जावान व्यक्तिमत्वाला आपण आज मुकलो आहोत.सर सतत स्मरणात राहतील.शिक्षकी क्षेत्र आणि साहित्य विश्व पुलकित करणा-या या सारस्वत पूत्राला माझी विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली
: डॉ. धनराज खानोरकर, ब्रह्मपुरी.जि-चंद्रपूर
काटली येथील ३३ वे झाडीबोली साहित्य संमेलन अध्यक्ष
मो.९४०३३०४५४३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा