गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

फ्युरियस ड्रॅगन : वैचारिक विद्रोहाचा संयमी आविष्कार -डॉ फुला बागूल



चाळीसगाव येथील ज्येष्ठ कवी साहेबराव मोरे यांचा "फ्युरियस ड्रॅगन"  हा काव्यसंग्रह चाळीसगाव येथील शब्द संवाद प्रकाशनाने 2011 मध्ये प्रकाशित केला .

काव्यसंग्रहाचे नाव इंग्रजी असले तरी या कवितेतून निळ्या जाणिवांचा विधायक विद्रोह अधोरेखित होत असल्याचे प्रस्तावनेतून डॉ .भगवान ठाकूर यांनी म्हटले आहे .

.प्रस्तुत संग्रहात 51 कविता आहेत .


'वेदनेचा हुंकार फ्युरियस ड्रॅगन रूपाने संवेदन जाणीव होऊन प्रकटला' असे कवीने प्रारंभी म्हटले आहे .

कवीची विद्रोही भूमिका , खरे तर ती विधायक अधिक आहे ती 'ड्रॅगन प्रतिज्ञा' या पहिल्याच कवितेतून उमटली आहे, कवी यात म्हणतो,

 "मुंगीस साखर आणि माणसाला पाण्यापासून वंचित ठेवून / तडफडून मारण्याची प्रस्थापित परंपरा / समूळ नष्ट करण्या मी सदैव प्रयत्नशील राहीन"( पृ .१)

कवी यालाच मानव पूजा म्हणतो .

मानव मुक्तीचे उद्गाता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेंचा कवी पाईक आहे कवीला जाती तोडून समाज जोडायचा आहे जी संस्कृती अमानवी आहे ती कवी नाकारतो .सर्वच देश बांधव मला बांधव मानत नाही ही खंत देखील कवी व्यक्त करतो .

'प्रकाश पेरली वाट' या कवितेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त झाला आहे .माणसांना माणूस पण बहाल केल्याबद्दलची ही कृतज्ञता आहे

"माझं जगणं कुणासाठी कशासाठी?"  या कवितेतून कवी आपला जीवन दृष्टिकोन स्पष्ट करतो -

" मानवतेचा मार्ग दाखवण्यासाठी/ सत्शीलाचा शांती मार्ग दाखवण्यासाठी / प्रस्थापितांना वठणीवर आणण्यासाठी / प्रशासनरुपी जिवाणू विषाणूस कर्तव्यदक्षतेची लस टोचण्यासाठी"(३)

डॉक्टर बाबासाहेबांच्या या शिलेदाराची लाईन ऑफ थिंकिंग स्पष्ट आहे .जे जे अमंगल आहे ते ते नष्ट करण्यासाठी मी जगेन ही ती विचार धारा आहे . भवतु सब्ब मंगलम या बौद्ध तत्त्वज्ञानाशी ही संलग्नता आहे .

प्रशासनातले जंतू वंचितांना न्याय देत नाहीत . भ्रष्टाचाराने ते व्याप्त आहेत . त्यांच्या शून्य कार्यक्षमतेमुळे वंचितांना हक्कांच्या  परिघाबाहेर राहावे लागते . कवी त्यांना कार्यतत्पर करण्यासाठी जगणार आहे .

प्रशासनास कवी पुन्हा

 जबाबदार धरत म्हणतो की, 

"बेजबाबदार प्रशासनाचे आच्छादन / 

हरामखोर नराधमांचे करते रक्षण"(४)

मुंबईच्या दंगलीवरही कवी भाष्य करतो .

अद्वैत कवितेतून प्रतीकात्मकता झळकते .

" अनीतीचा असभ्य सोपान / 

आलिशान नीतीची सिडी / 

नतभ्रष्ट वाळवी "(६) ही ती प्रतिकात्मकता आहे .

परंपरेने आम्हांवर आमच्या भगिनींवर अत्याचार होत गेले .

तुम्ही कुंटणखाने जोपासले त्यात आमच्या भगिनी पोटुशा राहत गेल्या . देवदासी देखील आमच्याच . आम्ही समतासूर्याचे वंशज आहोत . आम्ही बुद्धिष्ट का झालो याचे उत्तर कवी असे देतो -

"स्वातंत्र्य समता बंधुत्व शिलालेखाच्या / स्वप्नपूर्ती स्तव आम्हास बुद्धिस्ट व्हायचं / सामाजिक समतेस्तव आम्हास /बुद्धिष्ट व्हायचं"(७/८)

याच कवितेत  प्रस्थापितांना आवाहन करतो की -

"भोंगळ्या संस्कृतीला बेगड/ चिकटवण्यापेक्षा दिशा बदलवा"(८)

डॉक्टर बाबासाहेब यांच्यानंतरची पिढी त्यांच्या विचारांवर चालत नाही हे बघून कवी लिहितो

" तू माणसातला माणूस जागवलास / तुझ्या मागे त्याच माणसाने / माणुसकी पुरून / समता गाडून थडगे उभारले /

 सत्ताधारी पक्षाचा  तुकडा चघळतांना / तुझ्या स्वप्नांची पायमल्ली करत आहेत / पंच शीलाच गलबत ह्यांच्या भडवेगिरी मुळे / आजही /

 समता किनारा गाठू शकलं नाही "( पृ .११/१२)

हा स्वजनांच्या कृतघ्नतेवरील आक्रमक संताप आहे . डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर  न चालणाऱ्या स्वार्थी वृत्तीच्या स्वजनांवर ही परखड टीका आहे त्यातून क्रोध आणि खंत व्यक्त झाली आहे .

राज्यकर्तेच गुंड असल्याची शंका गुंड कवितेत व्यक्त होते . ध्यासवेडा , शांतिदूत , प्रजासत्ताकाचा पुरस्कर्ता , अशी कवीची भूमिका सौदा कवितेत येते .

कलावंतीनीच्या भांगेतला सिंदूर ही  उपमा एका विशिष्ट विकृत संस्कृतीसाठी कवीने योजली आहे . " क्रांती "ही कविता देखील याच आशयाची आहे .

मायभूमीच्या मुक्तीसाठी जे खपले ते देशद्रोही म्हणून गणले गेल्याची खंत फ्रिडम फायटर कवितेत येते,

"मनुवादी झेरॉक्स पिलावळ / ई-मेलने येत आहे / आरक्षित झोनच्या सीमारेषेवर प्रिंट व्हायच्या आत / वळ चणीतले हत्यार परजून घ्या"( पृ .२४)

अशा शब्दात प्रस्थापितांचे कावे उघड करून स्वजनांना सावध करण्याचे ,त्यांच्यात विद्रोहाचे बीज पेरण्याचे कार्य कवी येथे करतो .

भ्रष्ट फायदा अनिष्ट वायदा /

 मतांचा जोगवा सत्तेस्तव फायदा /

 झुंड निघाली देश विकण्या / 

सत्तेची झुल परदेश जाण्या / 

देऊन जीव घेण्या भुलथापा  देशी/

स्विस बँकेची लॉकर भरलीत विदेशी/"(२५))ही वास्तवता लुटारू कवितेत कवी मांडतो ही कविता मुळीच कालबाह्य झालेली नाही .साधारण पंधरा वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली ही कविता व त्यात वर्णित देशस्थिती  आजही बदलली आहे असे वाटत नाही .




"अस्वस्थ वास्तव"  या कवितेतून साहित्य संमेलनाचे वास्तव मांडले आहे. तेथील परिसंवाद, कथाकथन, काव्यसंमेलनं, निमंत्रित वक्ते व त्यांचा थाटमाट या गोष्टी सामान्यांच्या व्यथावेदनांपासून पुष्कळ लांब असतात .वक्ते कोरडा गहिवर काढतात .नवोदित फक्त उष्ट्या पत्रावळी गोळा करण्यासाठी असतात .सर्व प्रकारचा मलिदा आणि मानसन्मान प्रस्थापितांनाच मिळतो हे साहित्य क्षेत्रातले वास्तव ही कविता मांडते .

कवी आया बहिणींना रखेल म्हणून ठेवणाऱ्या बदफैली वृत्तीच्या लोकांचा , सोफेस्टिकेटेड सौदागरांचा ,लोकशाही तुडवणाऱ्या बाहुबली नेत्यांचा , इतिहासाला बदनाम करणाऱ्या संशोधकांचा , संस्कृतीच्या नावाखाली माणसांना नागवणाऱ्या धर्म मार्तंडांचा आणि वेदांचाही निषेध "थुंकतो आम्ही"  या कवितेत  करतो .

"धर्मांधतेचा वनवा " या कवितेला गौतम बुद्धाची मूर्ती उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या घटनेची प्रेरणा आहे .

स्वातंत्र्याची अमुक अमुक वर्षे ओलांडल्यानंतरही सुरक्षेची गरज देशवासीयांना वाटते हा लेखाजोखा स्वातंत्र्याचा कवीने मांडला आहे .


बुद्धी भ्रष्ट बहुजन नेतृत्वाचा बुरखा फाडणारी 'आता 'ही कविता आहे .बाबांचा कायदा हाती घेऊन हैदोस घालणाऱ्यांना कवी अजिबात पाठीशी घालत नाही . हे या कवीचेही वेगळेपण आहे

"भरकट" या कवितेत रस्ते व त्यांची स्थिती , रस्त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती अतिशय मार्मिकपणे येते .शहरी रस्ते , राजधानीचे रस्ते ,हम रस्ते असे रस्त्यांचे प्रकार आणि रस्त्यांच्या प्रवृत्ती कवी निर्देशित करतो .कवितेच्या शेवटी महत्त्वाचे विधान कवी करतो -

"रस्त्यांचा रस्त्यांवरचा भरोसा उडालेला /

 सेमी गुरुकुलातील द्रोणाचार्यांसारखा"( पृ .३१)आधुनिक शिक्षण प्रणाली. त्यात कावळ्यांच्या छत्र्यासारख्या उगवलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा व एकूणच तेथील शैक्षणिक परिस्थिती यावर मार्मिक भाष्य करणाऱ्या या ओळी आहेत

"राजद्रोही"  या कवितेला काही पैलू आहेत .

त्यातला एक पैलू म्हणजे ऊसतोड शेतमजूर स्त्री चा नादान मुलगा झोपडीत असताना भाजतो .झोपडीची आग विझवण्यासाठी तराळाची पत्नी विहिरीवरच्या ब्राह्मणाला पाणी मागते ते तो देत नाही .यातलं कारुण्य कसे वर्णावे ?

दहशतवाद किंवा विद्रोह हा देशाशीयांच्याच संवेदन शुन्यतेमुळे जन्मला आहे हा कवीने मांडलेता सिद्धांत हा दुसरा पैलू ! तर कवितेच्या शेवटी येणारा तिसरा पैलू लोकमान्य टिळकांनी केलेले विधान . एकूण कविता लक्षणीय आहे .

भ्रष्ट निवडणुका  ,भ्रष्ट लोकशाही , गुणशून्य नेतृत्व , याचा परिणाम म्हणून' कुबेरा हाती सत्तेची नाडी ' असा आपल्या लोकशाहीचा एकूण परिपाक कवी मांडतो .

कवितेत कवी देशाची स्थिती मांडतो

" ज्ञानगंगेची सूत्रे निरक्षरा हाती / शासनाची नाडी दलाला हाती /

 कलावंत धनिकांचे गुलाम /

 बुद्धिजीवींना संस्था सम्राटांचे लगाम/"(३७) अत्यंत मार्मिकपणे कवीने हे निरीक्षण नोंदवले आहे . देश स्थिती आज सुद्धा यापेक्षा वेगळी नाही .



नोकरीच्या जाहिरातीत कशा कशाला प्राधान्य दिलेली असते आजपर्यंत अशी एकही जाहिरात आली नाही की ज्याच्यामध्ये माणूस जातीस प्राधान्य असे लिहिले असेल ."प्रतीक्षा"  कवितेत आलेला हा आशय विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे

"घातक चष्मा"  या कवितेत ऑफिस टू ऑफिस राबणाऱ्या विद्वानांचं काय करायचं ?हा अतिशय भेदक प्रश्न कवी उपस्थित करतो.

वेश्येने दिलेल्या उत्तरांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न "अर्थासाठी" या कवितेत येतो, तो विषण्ण करतो .

" मॅनमेड पाऊस" ही या संग्रहातील सर्वोत्कृष्ट कविता आहे . पाऊस जर माणूस राहिला असता तर त्यांनेही गरिबांवर अन्याय केला असता असा या कवितेचा सार आहे .रसिकांनी ही कविता मुळाबरहुकूम वाचावी .

"क्रांतीज्योत"  कवितेत कवी सखीला आपल्या सदैव वंचित वस्तीत येण्यापूर्वी काय काय करून ये हे सांगतो .

शेवटी तो म्हणतो ,

"यायचेच तर होण्या ये रक्तिमा / 

नको येऊस होऊन प्रियतमा/"( पृ ४९)

घरटे प्रस्थापित व्यवस्थेने उद्ध्वस्त केल्यावर या स्थलांतरितांना कुठे कुठे आणि कशा कशा अवस्थेत राहावे लागते त्याचे वर्णन " घरटं"  या कवितेमध्ये येते .

या देशातील दलित, गरीब, शोषित ,वंचित यांना कधीही लक्झरी लाईफ मिळाले नाही .


कवी लिहितो -

"निंबोणीच्या झाडामागे/ कधीच  चंद्र झोपी गेल्याचं आठवत नाही /

 कातर वेळेपर्यंत कणसं कुठून काट्या बणग्यांनी लदबदलेल्या कुशीत / भुकेने कासावीस पोटात /

 खूपणार्या डोळ्यात डोळ्यात कसली झोप?"(५३)

स्वातंत्र्यदिनाने वंचितांच्या झोळीत काहीही टाकले नाही .त्यांची वंचना दूर झाली नाही .भलेही लाल किल्ल्यावरून कितीही घोषणा झाल्या असोत .

" १५ ऑगस्ट?  या कवितेत कवी म्हणतो -

" ज्यांच्या श्रमात सूर्य भिजवण्याचं सामर्थ्य आहे/ 

त्यांच्या  बाहूत फडकावा तिरंगा"(५६)

अब्राहम लिंकनच्या धर्तीवर कवी साहेबराव मोरे यांनी 'मास्तर त्याला चक्रव्यूह भेदायला शिकवा  'ही फार मार्मिक  कविता लिहिली आहे .

समाज वास्तव , शालेय वास्तव  ,प्रशासनाची दृष्टी ,बालकांचे बदललेले मानसशास्त्र ,मूल्य व्यवस्थेचा ऱ्हास असे अनेक पैलू या कवितेला आहेत .


अशा रीतीने "फ्युरीयस ड्रॅगन"  हा काव्यसंग्रह समाज स्थितीवर मार्मिक भाष्य करतो . वंचितांच्या वेदनेने कळवळतो . माया मावल्यांच्या अत्याचाराने तो क्रोधित होतो . इतिहासाच्या अन्यायाने विषण्ण होतो .व्यवस्थेला संयमाने जाब विचारतो .

स्वजनांच्या कृतघ्नतेला उघडे पाडतो . डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी बांधिलकी मानत इतरांनाही अशी बांधिलकी मानण्याचा आग्रह धरतो .स्वातंत्र्याचा लेखाजोखा मांडतो . काही ठिकाणी भयानक संतापलेला पौराणिक प्राणी ( फ्युरियस ड्रॅगन ) होऊन चवताळत प्रस्थापितांना धारेवर धरतो .

काही दोष स्थळे या कवितेत अशी आहेत -

प्रमाण लेखनाकडे कवीचे दुर्लक्ष झाले आहे .

काही चुकीचे शब्द कवितेत येतात .त्यामुळे तेथे अर्थ अनाकलनीय होतात .दोन कवितांचा अपवाद सोडल्यास संपूर्ण संग्रह मुक्तछंदात आहे .प्रयोगांचे वैविध्य आढळत नाही .बहुसंख्य कवितांच्या प्रेरणा या नैमित्तिक  आहेत .अर्थात कवीचा हा पहिलाच काव्यसंग्रह असल्याने त्या स्वाभाविकही ठरतात . तथापि ही कविता वंचितांच्या साहित्य प्रवाहात एक लक्षणीय कविता आहे एवढे मात्र निश्चित .

- - - - - - - - - - - - - - 



समीक्षण : डॉ.फुला बागुल.

-६८ / श्रृतकीर्ती / पित्रेश्वर कॉलनी / शिरपूर मो. 9420605208/9822934874

1 टिप्पणी:

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...