सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे
आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सणवार मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. भारताला सणावाराची सुंदर परंपरा लाभली आहे. नव्या वर्षातील "संक्रात" हा पहिला गोड सण. संक्रात हा सण आपण सर्वजण आनंदाने, प्रेमाने साजरा करतो. तिळगुळाप्रमाणे एकमेकांना प्रेमही वाटतो वा देतो. पण, हे केवळ त्या दिवसापुरतेच मर्यादित असते. परत एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल तिरस्कार, राग, द्वेष, मत्सर हे असतंच. हे कांही मुळासकट नष्ट होतंच नाही. पण, माणुसकीतला हा द्वेष कायमचा काढून टाकण्यासाठी प्रयत्न तर आपल्यालाच करावयाचे असतात. पण ते प्रयत्न सुद्धा कुणी करुन पाहत नाही. मग नात्यातील दुरावा वाढत वाढत वाढतंच जातो. आणि आपुलकीची नाती, प्रेम, माया, आपलेपणा क्षणार्धात नाहीसं होतं.
एकमेकांना वेळ न देणं, समजून न घेणं, गैरसमज, असमजूतदारपणा अजून अशी असंख्य कारणे आहेत. जी आपणंच निर्माण करत असतो. आज या धावपळीच्या जगात प्रत्येक जण फक्त पैशाच्याच मागे धावतो आहे. मी, माझं, मला या भोवतीच माणूस अडकला आहे. मग इतरांबद्दल थोडासा विचार करण्यासाठीही त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. मी पणातील अहंकारच माणसाला एकमेकांपासून दूर करण्यास कारणीभूत ठरतो आहे. कसं असतं ना माणूस जवळ येण्यासाठी आणि दूर जाण्यासाठी निमित्त लागतंच. मग जवळ येण्यासाठी चांगले निमित्तही आपणंच घडवून आणावे लागतात.
सणवार असतात कशासाठी तर आपल्या माणसांच्या, प्रियजनांच्या, आप्तेष्टांच्या भेटीगाठीसाठी सणवार असतात. सणावाराच्याच निमित्ताने आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांची ख्याल खुशाली विचारतो, सुख:, दु:खं वाटून घेतो. एकंदरीत काय तर सणावाराच्या निमित्ताने माणूस एकत्र येतो. संक्रात हा सण एकमेकांतील राग, द्वेष घालवण्यासाठी उत्तम सण आहे. त्या तिळगुळाच्या गोडव्या प्रमाणे आपल्या सर्वांच्या नात्यात कायम असाच गोडवा टिकून राहावा या साठी हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मग माणुसकीचे आणि नात्याचे प्रेमसंबंध दृढ होतात ते तिळगुळाच्या गोडीने. कारण, तीळगुळाच्याच गोडीने नात्यांची वीण घट्ट होते.
तीळ, गुळ हे एकत्र आल्यानंतर त्यात जसा गोडवा येतो. तसाच गोडवा आपण आपल्या गोड, मधाळ, रसाळ शब्दांतुन वाहवूया. म्हणून राग, द्वेष विसरून तीळ, गुळा सारखे एक होऊन नात्याची वीण, नात्यातील प्रेम, नात्यांचे आपुलकीचे धागे घट्ट करूयात. आकाशी उडणारी पतंग जशी मनमोकळे पणाने उडते. तशीच ती आपल्यालाही सांगते की सर्वांना सोबत घेऊन आनंदाच्या लहरी तयार करा. त्यांचा आनंद घ्या. तुमच्या नात्यातील गोडवा, प्रेम उंच आकाशी उडूदेत. नातं कोणतंही असुदेत त्या नात्यातील जुने, पुराने वैर विसरून आजच्या दिवशी एक व्हावे. तिळगुळाची देवाण घेवाण करताना हसत मुख चेहऱ्याने करा. तिळगुळात तर गोडवा आहेच. थोडंसं गोड आपणंही राहूया.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
सर्वांना मकर संक्रातीच्या
प्रेमळ, गोड शुभेच्छा.....!
सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे
देगलूर. 9960028899

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा