स्पर्शिका' हा सुदर्शन सीताराम पनतोडे,नागपूर यांचा पहिलाच मराठी-हिंदी-उर्दू भाषेतील मिश्र कवितांचा कवितासंग्रह आहे.यामध्ये एकूण ४७ मराठी भाषेतील व १८ हिंदी व उर्दू भाषेतील रचनांचा समावेश आहे. यात कौटुंबिक, सामाजीक आशयाच्या भावनिक स्वरुपाच्या रचना आहेत. मोजक्या व प्रभावी शब्दात,सयंमाने व्यक्त होण्याचा या कवितेचा स्थायीभाव आहे. तसेच सामाजीक विषमता,भेदभाव,मानवातील गुण-अवगुणावर परखडपणे भाष्य करते. यातील पहिली रचना 'ओनामा' ही विषमताच्छादित व्यवस्थेवर सयंतपणे प्रहार करणारी आहे. समाजात आपल्याला श्रीमंत-गरीब,उच्च-निचता हा भेदभाव दर्शविते. येथे मानवाच्या जीवनाशी सुप्तपणे कसा खेळ खेळल्या जातो ?,याचे विवेचन आहे. पण कवी या खेळातील प्रतिस्पर्धी खेळाडूला धिरगंभीरपणे आवाहन देतांना दिसतो.
" प्रारंभ मी केला, खेळ तू खेळावा
डावपेच वापरावे,पण खेळ पूर्ण करावा
प्रारंभ मी केला,शेवटही मीच करणार
फेकलेल्या छद्मी डावपेचाला,उत्तरही मीच देणार!"
(ओनामा)
साम,दाम,दंड,भेद या नितीवर मुठभरांचे बहुसंख्यांकावर चाललेल्या कुरघोडीला चिंतनशीलतेतून,सजग व सकस कृतीतून शह दिला पाहिजे. हा रडीचा डाव आम्ही हाणून पाडला पाहिजे,असे कवी सुचवितात.ज्या प्रमाणे एखाद्या खेळात जाणून-बुजून प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी कुटनितीचा अवलंब केला जातो. तसाच डाव मानवी जिवनातही खेळला जात आहे. त्याला कुठेतरी प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने निडरपणाने समोर आलं पाहिजे, असे कविला वाटते. दुसरी रचना 'स्थितप्रज्ञ' मानवी जीवनातील आंतर्द्वंद्वावर आधारीत आहे. चित्त,मन एकाग्र करून ,मनावर विजय मिळवून षड्विकारावर नियंत्रण मिळविले तर मानवाला दु:खमुक्त जीवन जगता येते. सर्व प्रकारच्या वासनेवर विजय मिळविता येतो.हा आंतरीक लढा आपण ध्यान साधनेद्वारा जिंकू शकतो, असा विश्वास कवी येथे व्यक्त करतांना दिसतात. 'कृतघ्न' ही रचना शोषितांवर,वंचितांवर झालेल्या अन्यायाची साक्ष देते. काही दिवसापुर्वी आमच्या जीवन जगण्याच्या मार्गावर काही अनाहूत लोकांचा पहारा होता,जणू त्यांनी आमची कोंडीच केली होती.स्वातंत्र्यावर,न्यायावर अंकुश लावला होता. एकूणच साध्याभोळ्या विशिष्ट लोकांच्या सभोवती उत्कर्ष खुंटविणारे,दडपशाहीचे 'वर्तुळ' आखले गेले होते. त्यातून जर आम्ही यशस्वीपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला की,लगेच आरडाओरड व्हायची. गावकुसाबाहेरच्या लोकांनी गावात येणे, हे काहींना मान्यच नव्हते . हा इतिहास आम्हाला सहजासहजी विसरता येणार नाही. विशिष्ट लोकांच्या मानेवर रूढी,परंपरांचं , जाती-धर्माचं, वर्णाचं ,अनिष्ट रीती-रिवाजाचं जोखड लादून बंदिस्त केल्या गेलं होतं. हे वास्तव विसरणे शक्य नाही. काही लोकांनी नानाविध भाककथांचा इतिहास रचला आणि त्याचा सर्वत्र उदोउदो सुरू झाला. परंतु दुसरीकडे आमचा इतिहास वास्तवावर आधारलेला असतांना त्याला विविध राजवटीत राजाश्रयात नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आम्ही आमचा इतिहास आमच्या लेखनीने पुन्हा जागविला पाहिजे. कवी पनतोडे आपल्या मुक्तछंदातील कवितेतून हळूनच मनुवादी व्यवस्थेवर आसूड ओढतांना दिसतात. हे करीत असतांना त्यांची कविता कठोर शब्दात आगपाखड करीत नाही. ती शांतपणे व्यक्त होते. आपला विचार,आशावाद, भावभावना ती शोषित समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतांना दिसते. त्याला जागविण्याचा प्रयत्न करते. त्यांची कविता मानवाच्या चंचल मनाविरुद्धचा लढा सुद्धा सकसपणे लढायला शिकविते. हे करीत असतांना ते शब्द मात्र तोलून मापून वापरतात.आपले हीत कशात आहे ? हे धिरगंभीरतेने समाजमनाला समजावून सांगते. मोजक्या शब्दात त्यांची कविता अधिक आशय मांडून जाते. ही त्यांच्या कवितेची जमेची बाजू म्हणता येईल.
कवी इतरांना भेदभाव विसरून बंधुभाव जपण्याचे आवाहन करतांना दिसतात. किती दिवस हा भेदभाव जपणार आहात? असा मार्मीक प्रश्नही ते करतात.
"एका कळपाचा मी,इतरांना करू कबंध
बंधुभाव म्हणता,मग कसा करू स्नेहबंध
कल्पना नव्हे विश्वास तयांचा,निर्माण होतील समता बंध
ये बाहेरी कळप सोडूनी,निर्माण करू सेतूबंध !"
(कवडसा)
समता,स्वातंत्र्य,बंधुभाव,न्याय या संवैधानिक मूल्यांची आपण जपणूक केली पाहिजे. बुद्ध,फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारांवर आधारीत वैचारीक लढा देणे गरजेचे आहे. आम्ही मैत्रीचा,बंधुभावाचा एक हात पुढे केला आहे. इतरांनीही आपला कळप सोडून, शिवाशिवेचा विचार त्यागून पुढे आले पाहिजे. तरच एकोपा निर्माण करता येईल. हा समतेचा,बंधुभावाचा, उदारमतवादाचा विचार कविची कविता समाजाला देऊ पाहते आहे. त्यामुळे विषमता नष्ट होण्यास मदत होऊ शकते. ही निर्मळ मनाची हाक आहे. 'व्याजस्तुती' या रचनेत कवी इतरांना अनेक रास्त प्रश्न विचारतांना दिसतात. तुम्ही तेच ते गढूळ विचार पुन्हा रुजवणार का?की निर्मळ मनाने शेजारधर्म पाळणार आहात ? एक पाऊल पुढे टाकून कवी समाजमनाला नवा परिवर्तनवादी विचार देण्याचा प्रयत्न आपल्या कवितेद्वारे करतांना दिसतात. एकूणच हा विचार भारतराष्ट्र नवनिर्माणाच्या, नवा इतिहास घडविण्याच्या, जपण्याच्या दृष्टीने कौतुकास्पद वाटतो. पनतोडे यांची कविता चिंतनशीलतेतून, डोळसपणातून,सकस सामाजीक जाणीवेतून, अनुभवातून,अभ्यासातून जन्माला आलेली आहे.
कविची कविता सामाजीक व चळवळीतील फुटीरतावादावर सुद्धा तितक्याच तन्मयतेने व्यक्त होतांना दिसते. चळवळीच्या आंतरीक परिस्थितीवर डोळसपणे भाष्य करतांना दिसते. चळवळीतील आंतरीक दुफळी ही समाजाच्या, चळवळीच्या -हासाला कारण ठरते आहे. हे वास्तव सहजतेने मांडून जाते.
"कधी कळणार,सरणार हे नाट्य फाटाफुटीचे
आहे ते आहे ज्वलंत हे नाट्य हरघडीचे
सांगितली एकी आणि करतो आपण बेकी
दुरावलो तर खेळवतील पुन्हा एकीबेकी !"(मर्मभेद)
'संधी' या कवितेतून हत्ती आणि मुंगी यांच्या गुणधर्माचे उदाहरणाद्वारे बहुसंख्य आणि अल्पसंख्य,श्रीमंत-गरीब यांच्यामधील विषमता अधोरेखीत करून हत्तीने मुंगीला कधिच कमजोर समजू नये. संधी मिळाली की, ती तिच्या हुशारीने हत्तीलाही जायबंद करू शकते. असा मार्मीक इशाराही ते देतात.चिरेबंद वाडा आणि झोपडीतील विषमतेचं वास्तव चित्रण विद्यार्थी व शिक्षकांच्या संवादातून मार्मीकपणे उभं करतात. मानवाने जीवन जगत असतांना अहंकारात कोणत्याही नियमाचे उल्लंघन करणे जीवावर बेतू शकते. असा सल्लाही ते द्यायला विसरत नाहीत. अलिकडे वाढते विविध प्रदुषण मानवी जीवनाला लागलेली कीड आहे,आरोग्यास धोका निर्माण करणारी आहे. अनेक आजारांना निमंत्रण देणारी अनावश्यक बाब आहे. हे ओळखून त्याला वेळीच आळा घातला पाहिजे. असेही ते सुचवितात. समाजमाध्यमावर अनेक लोक चुकीच्या पद्धीने व्यक्त होत असतात. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यापेक्षा आपसात वैचारीक समज ,संवाद वाढविणे गरजेचे असल्याचेही कवी सुचवितात. यासाठी आपण महामानवांचे विचार,शब्द अमलात आणले पाहिजे. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. असा ठाम विश्वास कविंना आहे . 'कधीतरी' या कवितेतून कवी हक्क,अधिकाराबरोबरच कर्तव्याचीही जाणीव लोकांनी ठेवली पाहिजे. असे सुचीत करतात.
हिंदी भाषेतील 'अभिलाषा और मै.' या कवितेतून त्यांच्या सम्यक इच्छा,आशा, आकांक्षा, मनिषा व्यक्त करतात. त्या म्हणजे - सद्गुण बाळगणे,सद्भाव जागवणे,सर्व जीवांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापीत करणे,स्वयंप्रकाशित होणे,पंचशीलेचे आचरण करणे इत्यादी. 'कालचक्र' या कवितेत माणसं कशी बदलत चालली आहेत? त्याचा मानवी जीवनावर काय विपरीत परिणाम होऊ शकतो? तेव्हा सर्वांनी सावध असणे गरजेचे आहे. त्यासाठी सूचक उदाहरण ते देऊन म्हणतात....
"हवाओं का रूख अब बदलने लगा है
इन्सान-इन्सान से अब घबराने लगा है!
दूर न रहो, अब इस ज्वाला से
चिंगारी से शोला, अब उगलने लगा है!"
मन हे नित्य इकडून तिकडे सैरभैर धावत असते.त्यामुळे अनेक विकारी विचार मनात येतात. त्याचेवर नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याचे मत ते 'झरोखा' या कवितेतून व्यक्त करतात. बहिणाबाई चौधरी म्हणतात...'मन वढाय वढाय,जसं उभ्या पिकातलं ढोर' . मन एका मोकळ्या सुटलेल्या जनावराप्रमाणे आहे.ते सर्वत्र सैराटपणे हुंदळत असते .त्याचप्रमाणे मनात असंख्य इच्छा उत्पन्न होतात,वासना निर्माण होतात. यापासून माणूस दु:खी होत जातो. बुद्धाने सुचीत केल्याप्रमाणे आपणाला मनावर विजय मिळविता आला पाहिजे. तरच आपण कुशल कर्म करू शकू. कुशल कर्माने जीवन सुखमय होवू शकते. असा ठाम विश्वास कविला वाटतो.
एकूणच कवी सुदर्शन पनतोडे यांची कविता विभिन्न अंगाने वाचकांसाठी मार्गदर्शक ठरते. या कवितेतून जीवनानुभव व्यक्त होतो. सजग सामाजीक जाणीवा व्यक्त होतात. विविध प्रकारच्या विषमतेवर,अनुचित बाबींवर, भेदा-भेदावर, राजकारणावर ,आपसातील फुटीरतेवर , मानवी अवगुणावर प्रखर भाष्य करते.तसेच जीवन जगण्याच्या चुकीच्या पद्धतीवरही बोट ठेवते. वैचारीक आंधळेपणावर, अधुपणावर सकस शब्दातून यशस्वीपणे प्रहार करते. कुठे ती कान धरते तर कुठे योग्य दिशा दाखविते. शब्द योजन शैली,कवितेची मांडणी कौतुकास्पद आहे. कवितेचे सौंदर्य वाढविणारी आहे.तिच्यात कुठेही फारसा विद्रोह जाणवत नाही.परंतु आपलं म्हणनं ती शांतपणे मांडून जाते. समाजाला जागृत करण्याचं काम त्यांची कविता करू इच्छिते. याबद्दल कविचे अभिनंदनच केले पाहिजे.कवी उच्चशिक्षीत आहेत. त्यांनी भारत सरकारच्या सेवेत असतांना विविध प्रदेशात आकाशवानी, दुरदर्शनवर ,प्रकाशन विभागात काम केले आहे. त्यामुळे त्यांची भाषा सौम्य जाणवते.
'स्पर्शिका' या कवितासंग्रहाला प्रख्यात कवी,गझलकार हृदय चक्रधर सरांची समर्पक व न्यायसंगत अशी प्रस्तावना लाभलेली आहे. हा कवितासंग्रह अनेक महत्वाच्या मुद्यांना स्पर्श करतांना दिसतो. सदर कवितासंग्रह शब्दशिल्प प्रकाशन,नागपूर यांनी छापून प्रकाशीत केलेला आहे. प्रा.नरेंद्र ल.माटे यांनी साकारलेले मुखपृष्ठ सुबक व आशयसंपन्न असेच आहे. कवितासंग्रहाचा आंतर बाह्य दर्जा उत्तम आहे. प्रत्येक रचनेबरोबर रेखाटलेले रेखाटन साजेसे,आशयसंपन्न, सुरेख व कवितासंग्रहाचे आकर्षण व सौंदर्य वाढविणारे आहे.एकूणच 'स्पर्शिका' ही साहित्यकृती दर्जेदार आहे. असेच म्हणावे लागेल.
पुढील लेखनासाठी पनतोडे यांना हार्दिक शुभेच्छा .
अरुण हरिभाऊजी विघ्ने
रोहणा,आर्वी,जि.वर्धा
____
✍️ कवितासंग्रहाचे नाव: 'स्पर्शिका'
✍️कविचे नाव :सुदर्शन सीताराम पनतोडे
✍️प्रकाशक :शब्दशिल्प प्रकाशन,नागपूर
✍️प्रस्तावना : प्रा.हृदय चक्रधर,नागपूर
✍️पृष्ठसंख्या : १२६
✍️ मूल्य : १८५/- रुपये


सुंदर लेख. अभिनंदन व शुभेच्छा कविला
उत्तर द्याहटवा