सामाजिक बांधीलकी आणि मानवतेला सर्वस्व समर्पित करून लेखन करणारे अहिल्यानगरचे आंबेडकरी विचारांचे लेखक आदर्श शिक्षक आयु. गोकुळ गायकवाड यांचा ताटातूट कथासंग्रह परीक्षणासाठी मिळाला. सदरच्या कथासंग्रहाला लेखक पंडित कांबळे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर या चार जिल्ह्यांच्या सीमेवरील एका अतिशय दुर्गम खेड्यामध्ये लेखकाचे जन्मस्थान आणि जडणघडण काळ असल्यामुळे सदरच्या कथासंग्रहात अवतीभवतीच्या बोलीभाषेचा कमी अधिक फरकाने प्रभाव आणि परिणाम दिसून येतो. आंबेडकरी विचारांमुळे भवताली घडून येणारा बदल, सूक्ष्म परीक्षणाच्या नोंदी, निष्कर्ष, संवाद कौशल्ये, पात्रांची निवड, पात्रांची भारदस्त ओळख, वातावरणनिर्मिती, कथानक, कथाबीज, सुत्रबध्दता, भाष्य, कथेची सुरूवात, मध्य, शेवट, लक्षवेधी परिवर्तनवादी भूमिका, हे बलस्थाने आणि तत्व कथासंग्रहात शेवटपर्यंत लेखकाने पालन केले आहे.
स्वानुभवातून, स्वयंप्रेरणेतून लेखकाने प्रस्तूत केलेल्या कथा वाचनीय आणि आस्वादक, संवादक, प्रवाही विचारांच्या आहेत.
मुखपृष्ठावरील चित्र विषयानुरूप समर्पित आहे. डॉ. सारीपुत्र तुपेरे यांचा मलपृष्ठावरील मजकूर देखील उत्तम आहे.
एकूण पंधरा कथांचा समावेश सदरच्या कथासंग्रहात केलेला आहे.
'पान्हा' या कथेतून मातृत्व शक्ती किती प्रेमळ अंत:करणाने आणि वैश्विक करूणेने भरलेली असते. याचा प्रत्तय सीताबाई या पात्राच्या माध्यमातून संवाद साधत लेखक वाचकांना करून देतो.
'राही' या कथेतील विधवा, निपुत्रिक स्त्री संपूर्ण आयुष्यात एकटी राहण्याचा निर्णय का घेते ? यासाठी वाचकांना कथासंग्रह वाचावा लागेल. राहीच्या व्यक्तीमत्वाचे सुरेख वर्णन लेखकाने बोलक्या भाषेतून केले आहे.
६५_७० वर्षांची, साडेचार फूट उंची, खैराच्या लाकडासारखे काटक दणकट पाय, सडपातळ बांधा, तीक्ष्ण नजर, रूंद कपाळ, दातवान चोळून काळेकुट्ट झालेले दात, अंगात चोळी, काटापदराची दंड घातलेली नऊवारी साडी. रंग काळाकुट्ट, केस पांढरेशुभ्र सहा सात इंच लांबीचे, त्याचा लिंबा एवढा बुचुडा, कमरेला पिशवी त्या पिशवीत अंबाडीच्या काटकीत खोचून ठेवलेली सुई आणि वरून दोरा गुंडाळलेला, तसेच बिब्बा, नाचकांड, चिनी मातीची तपकिरी ची डब्बी, हा सराजम, सर्वांगाचा तपकिरी सारखा कुबट वास. असं एकटा जीव सदाशिव, दुर्मिळातील दुर्मिळ व्यक्तीमत्व म्हणजे एक वयोवृद्ध राही !
(पृ.२३)
वरील शब्द शैलीतून राही पात्राचे केलेले वर्णन वाचकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ठरते. स्त्री केंद्री वर्तुळातील कथा आहे. स्त्री जीवनावर भाष्य करणारी कथा आहे. मनुवादी लादलेल्या संस्कृतीला नाकारणारी बंडखोर, निर्भिड स्त्री यात रेखाटली आहे. जगण्याचे संदर्भ स्वतंत्रपणे अधोरेखित करणारी स्त्री नायिका या कथेतून सकारात्मक दृष्टिकोन वाचकांना देऊन जाते. स्वाभिमानाने जगणाऱ्या स्त्रीचा मृत्यू देखील तिच्या पतीच्या घरी होतो. हा स्वाभिमान आणि निर्भिडपणे व्यवस्थेसमोर जगण्याचे मनोधैर्य, शीलाधार, उच्च नैतिक अवस्था या कथेतून उत्तम संवाद साधत लेखकाने गुणविशेष प्रस्तुत केले आहेत.
'विठोबा' या कथेतून स्त्री केंद्री वर्तुळातील शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले आहे.
"मला सांगा ? तुमाला कागुद वाचता येतो का ?"
"नाय बा !"
"लिव्हता येतोय ?"
"नाय !"
"म्हणून म्हणते आपल्या लेकरांना असं आपल्यावानी अडानी नगं ठेवायचं आपण एडं नाही पण अडाणी हायत का नाही ?"
(पृ.३०)
वरील वाक्यातून संवाद माध्यमातून मुलीच्या शिक्षणाचा ध्यास घेणारे पालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजात निर्माण झाले. १९५६ पासून आजपर्यंत विविध क्षेत्रात मुलींची आघाडी दिसून येते. या प्रगतीचे श्रेय बुध्द, फुले शाहू, आंबेडकर यांच्या कार्याला आहे. कारण वैचारिक वांझ मानसिकतेला चिरफाड करण्याचे सामर्थ्य ज्ञानात आहे. संदर्भ आणि नोंदी, पुराव्यात आहे. हा संशोधनाचा दृष्टिकोन रुजविण्यासाठी महापुरुषांनी सर्वस्व अर्पण केले. त्यामुळे आज स्त्रिया उच्च पदस्थ आणि स्थिरस्थावर आयुष्य स्वाभिमानाने जगत आहेत. ताराचे लग्न झाल्यावर मात्र मुलाच्या लग्नप्रसंगी काय अडचण निर्माण होते ? हे जाणून घेण्यासाठी वाचकांना कथासंग्रह वाचावा लागेल.
'बनवाबनवी' ही कथा देखील स्त्री केंद्री जगण्यावर भाष्य करणारी आहे. कोंडाबाई आणि दगडाबाई या दोन बहिणींची कथा आहे. माणूस मेल्यावर किती औपचारिकतेचा मुखवट्याआड मानवी प्रवृत्ती स्वतःला लपवते. याची जाणीव या कथेतून होते.
'सरपंच' या कथेतून घातक राजकारणात कोण बळी पडतो ? याचे उत्तर लेखकाने संवाद माध्यमातून दिले आहे.
मोलमजूरी करणारी अडाणी पारू ग्रामपंचायतचा कारभार करु शकेल का ? संविधानाने आम्हाला अनेक अधिकार दिले आहेत. पण खरचं त्या अधिकाराचा आम्हाला वापर करायला मिळतो आहे का ? प्रत्येक गावचे भाऊ, दादा, काका, नाना, पिढ्यानपिढ्या गावावर अधिसत्ता गाजवत आहेत. आम्हाला सत्ता कधी मिळेल ? राजकीय आरक्षण मिळून आमचा काय फायदा झाला ?
(पृ.४१)
वरील वाक्यातील प्रश्न वाचकांना अंतर्मुख करणारे ठरतात.
राजकीय वर्तुळातील गढूळ, अनैतिकतेचे राजकीय डावपेच माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही. हा ज्वलंत प्रश्न आज देखील समाजासमोर आहे. ईव्हीएम मशीन घोटाळा संपुर्ण देशात माहिती आहे. ज्याची सत्ता ते वाट्टेल ते घडवून आणू शकतात. हे देखील संपूर्ण देशात माहिती आहे. विचारवंतांसमोर अनेक आव्हाने देणारा वैचारिक आणीबाणीचा काळ देशात सध्या सुरू आहे. संघर्ष माणसाला जिवंत ठेवतो. या संघर्षात घडणारे आणि विवेकनिष्ठ असून विकले गेलेले लोक ही शोकांतिका या देशाची आहे. गटातटात विभागलेला समाज आज देखील बुध्द आणि आंबेडकरी तत्वाने भारावलेला असला तरी वर्तणुकीत आंबेडकरी विचार जगणारे फार कमी लोक दिसतात. हे मूल्यमापन जगण्याचे संदर्भ देत या कथेतून लेखकाने मांडले आहे. लेखनशैली साधी, सोपी, आशयसंपन्न, उल्लेखनीय, कौतुकास्पद आहे.
'ताटातूट' या कथेतून माय लेकरांची ताटातूट कोणत्या कारणाने होते ? याविषयी स्वानुभवातून, स्वयंप्रेरणेतुन मांडलेल्या संवेदना वाचकांना अंतर्मुख करतात.
स्त्री केंद्री वर्तुळातील निर्णय आणि मनोधैर्य दाखविणारी कथा मनाच्या लाजीरवाण्या अवस्थेतून पुढे जाते. याविषयी लेखकाचा पात्रांच्या माध्यमातून संवाद समर्पक ठरतो.
‘नवस’ ही कथा देखील स्त्री केंद्री जगण्यावर भाष्य करणारी आहे.
“लक्ष्ये !”
“कोण हाय ?”
“मी बानी हाय ! चल ना शाळेला जायला उशीर होतोय ?”
(पृ.५३)
वरील वाक्यातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
“नवस हा अघोरी प्रकार आहे ? देवाचा नवस फेडण्यासाठी आपल्या निष्पाप लेकीचा बळी देणार आहात का ?....
(पृ.५८)
समाजातील अनिष्ट रूढी, परंपरेविषयी जागृत करणारा शिक्षणाचा प्रवाह आणि मानवीजीवनाकडे बघण्याचा पिढ्यानपिढ्या संकुचित विचार आणि दृष्टिकोन या कथेतून डोकावतो.
‘तहान’ या कथेतून पिण्याच्या पाण्यासाठी नायकाचा संघर्ष अंतर्मुख करणारा ठरतो.
“आमिष” या कथेतून सखाराम या शेतकरी व्यक्तीच्या जीवनात आलेले आमिष आणि त्यामुळे घडत गेलेले बदल किती जीवघेणे ठरतात याचे विदारक वर्णन केले आहे. बेरोजगारी, अंधश्रद्धा यांचा समाजावर पगडा हे विचार देखील लक्षवेधी ठरतात.
‘बकुळा’ या कथेतील स्त्री वादी जीवनावर भाष्य करणारा निर्भीड विचार वाचकांना अंतर्मुख करणारा ठरतो. सावकाराच्या समोर बकुळाचे मनोधैर्य आणि स्वतःच्या लग्नाचा स्वतः निर्णय घेण्याची क्षमता, लादलेले विचार झुगारण्याची क्षमता कौतुकास्पद ठरते.
‘स्वाभिमानी भाऊराव’ या कथेतून भाऊराव आणि ताराबाई यांनी मुलासाठी केलेले कष्ट आणि मुलगा नोकरी करणारा असला तरी कर्जाच्या ओझ्यामुळे जीव देणारा बाप हे समाजातील अनुभव लेखकाने मांडले आहेत.
‘उचल’ या कथेतून ऊसतोडीची उचल घेऊन कर्ज मिटविणे हा जनाचा विचार नामदेवलाही पटत होता हा विषय घेऊन मांडलेली कथा सरतेशेवटी काय परिणाम सादर करते यासाठी वाचकांना कथासंग्रह वाचावा लागेल.
‘शिकाऱ्या’ ही कथा खूप सुंदर आणि आशयघन आहे.
“आरं तो आमच्या गिरलगावचा शिकाऱ्या हाय. लय बेणं वाईट हाय ! साडेतीन फूटच उंचीचा, सडपातळ बांधा, असलेला. नाकशार, मिशाचे आकडे, गोरापान, ठेंगणा गडी पण नागासारखा चपळ, वाऱ्याच्या वेगाने धावणारा, त्याचं काळीज वाघाचं. तर पाय काळविटासारखे राकट अन् मजबूत हायती. बालाघाट डोंगराच्या रांगेतील, सुतरमाळ, चांभारमाळ, बागाचा ओढा, आंब्याचा माळ, झिरीपदरा, बेलेश्वरदरी, काकरवाडी, या साऱ्या शिवाराचा तो राखणदार हाय. शिवारातील पशुपक्षी त्याला पाहून चळचळ कापतात.
(पृ.९१)
वरील वाक्यातून शिकाऱ्याची ओळख वाचकांना होते.
‘चंद्रा’ या कथेतून जिद्दी, धाडसी, आधुनिक विचारांच्या चंद्रासमोर काय आव्हाने उभे राहतात. यासाठी वाचकांना कथासंग्रह वाचावा लागेल.
‘एकदा मुंबई बघायचीच’ या कथेतून मुंबईत जगण्याठी आव्हान स्वीकार करणारे व्यक्ती आणि त्यांचा संघर्ष, आंबेडकरी विचारांसोबत जुळलेली नाळ आणि शिरपाच्या डोळ्यातील अश्रू वाचकांना अंतर्मुख करणारे ठरतात.
संपुर्ण कथासंग्रह वाचनीय, आस्वादक, संवादक आहे.
लेखकाला पुढील लेखनासाठी शुभेच्छा देते आणि साहित्य कृतीचे स्वागत करते.
▪️ लेखक: गोकुळ गायकवाड
▪️ पृष्ठे : ११२
▪️ किंमत: २०० रुपये
समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर
▪️ *परीक्षण* : प्रज्ञा हंसराज बागुल
दिग्रस जि यवतमाळ
मोबा : ७५५९१७७६०५


.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा