२०२६ ची सुरुवात माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा विभागांतर्गत बारामती (पुणे) येथे तिसरे पाचदिवसीय विद्यार्थी करिअर संसद अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात माझ्या महाविद्यालयातील ११ विद्यार्थी पदाधिकारी व २ समन्वयक सहभागी झाले होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व सुनियोजित होते. मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, तसेच शिक्षक व शिक्षिकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली होती.
दि. ३ जानेवारी रोजी अधिवेशनाचे उद्घाटन उच्च शिक्षण संचालक मा. श्री. शैलेंद्र देवळणकर यांच्या हस्ते पार पडले. त्याच दिवशी सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालयांचा पुरस्कार वितरण समारंभही आयोजित करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मार्गदर्शक तज्ज्ञांची व्याख्याने घेण्यात आली. प्रत्येक व्याख्यानात विषय मांडल्यानंतर प्रश्नोत्तरांची संधी देण्यात येत असल्यामुळे विद्यार्थी संपूर्ण वेळ सजग व सक्रिय होते.
याच कालावधीत प्राध्यापकांसाठी पाचदिवसीय AI Teacher Faculty Induction Program (FDP) आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची स्वतंत्र सत्रे सुरू होती. या पाच दिवसांत प्राध्यापक व विद्यार्थी प्रामुख्याने जेवणाच्या वेळी किंवा रात्रीच एकमेकांना भेटत होते.
प्राध्यापक म्हणजे केवळ शिक्षक नसून त्यांच्या मागे एक संवेदनशील माणूस आहे आणि सोबत आणलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारीही त्यांच्यावर आहे, याची जाणीव प्रत्येक प्राध्यापकाला या अधिवेशनात प्रकर्षाने होत होती. विद्यार्थ्यांना पाहताच प्राध्यापक आत्मीयतेने त्यांची विचारपूस करत होते. कधी विद्यार्थी उत्साहात असत, तर कधी काहींना बौद्धिक सत्रे व तेथील कडक शिस्त अवघड वाटत होती. तरीही “दिलेलं कार्य पूर्ण करायचंच” ही मानसिकता निर्माण करून शिक्षक विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवसासाठी तयार करत होते. एखादा विद्यार्थी आपल्या ओळखीचा शिक्षक दिसताच समस्यांची यादीच मांडायचा; पण शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक बाजू समजून घेतल्या आणि गरज भासल्यास त्या समस्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या. विद्यार्थ्यांचे जेवण वेळेवर झाले आहे का, कोणी आजारी आहे का, त्यांना औषधोपचार मिळतात का, नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना मानसिक आधार देणे, विशेषतः मुलींच्या अनेक खाजगी व संवेदनशील समस्यांचे निराकरण करणे—अशा असंख्य जबाबदाऱ्या शिक्षकांवर होत्या.
याच दरम्यान एक प्रसंग घडला. संध्याकाळी सांस्कृतिक सत्र सुरू असताना एका विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडली. इतर विद्यार्थिनींनी तत्काळ महिला शिक्षिकांना फोन केला. ती विद्यार्थिनी खूप घाबरलेली होती व रडत होती. शिक्षिका येईपर्यंत ती कुणाचेही ऐकत नव्हती. तिच्या महाविद्यालयाच्या शिक्षिका जवळ येताच ती त्यांना पाहून अधिकच ढसाढसा रडू लागली. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. दिवसभराच्या कामामुळे शिक्षिकाही अत्यंत थकल्या होत्या; तरीही त्यांनी परिस्थिती अत्यंत शांतपणे हाताळली. विद्यार्थिनीला आत्मीयतेने समजावून तिला शांत करण्यात आले. तोपर्यंत स्वयंसेविकांनी ॲम्बुलन्स बोलावली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रात्रीचे दीड वाजले होते. इतक्यावरच कार्य थांबले नाही. विद्यार्थिनी अजूनही घाबरलेली असल्यामुळे त्या शिक्षिकेने तिला स्वतःजवळ दिलेल्या खोलीमध्ये दोघी शिक्षकांच्या मध्ये झोपवीले.
या एका प्रसंगातून मला एका शिक्षिकेमधील आई दिसली. ती स्वतः आपल्या मुलांपासून पाच दिवस दूर होती; परंतु जबाबदारी ही प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या नात्यांतून आपले कर्तव्य पार पाडण्यास प्रेरित करते—हे या अधिवेशनात पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
००००००


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा