वाढदिवस विशेष...
मराठी भाषेला वाहिलेला अवलिया : कलाम खान
- विजया मारोतकर
साहित्य क्षेत्रातील एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व नजरेच्या टप्प्यात आले...आणि लगेच त्यांच्याकरीता आठवल्या या समर्पक ओळी..
कोई तूफां से कह दो
ना उलझो हमसे...
हमने तो रुख मोडा है
उठते हुये तूफानों का...
खरंच, जगण्याची लढाई लढताना प्रत्येक वेळी हातात शस्त्रच घेण्याची गरज नसते; तर ज्यांच्याकडे शब्दांचे शस्त्र घेऊन, संकटांवर मात करून पुढे जाण्याचे सामर्थ्य असते, अशा व्यक्ती शब्दांच्या वलयातून आपल्या जगण्याच्या वाटा शोधण्याचा कायमच प्रयास करीत असतात. अर्थात हे सर्वांनाच शक्य होतं असं नाही; परंतु अफाट पसरलेल्या या जगात केवळ शब्दांवर विश्वास ठेवून...उधाणलेल्या लाटांचे वादळ मनात पेलून...शब्दांच्याच आधारे 'शब्दशिल्प'च्या निर्मितीचा ध्यास मनात बाळगून नितांत शांततेने प्रशांत महासागराकडे वाटचाल करण्याचे ध्येय बाळगणारा एक ध्येयवेडा लेखणीचा उपासक पाहिला मी.
सभोवतालच्या अनेक कथा, कविता घेऊन जगणारा एक समृद्ध लेखक,कवी पाहिला मी.. आणि हे व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या वयाचे अर्धशतक पूर्ण करताना जगण्याच्या कॅनव्हासवर स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटविणारे कवी आहेत कलाम अहमद खान...!
आपण सारे साहित्याचे वारकरी आहोत. साहित्याच्या वर्तुळात वावरत असताना अनेक साहित्यिक, कवी, लेखक आपल्या संपर्कात येतात.परिचय होतो.पुढे जातो. काही नाती पुढे जातात तर काही थांबून जातात तर काही सुटत जातात....काहींना आपणच वेळ देऊ शकत नाही तर काही आपल्याकडे स्वतःहूनच दुर्लक्ष करतात; असे एक ना अनेक अनुभव येत असतात परंतु आपण ज्यांना जास्त वेळ देऊ शकलो नाही, तरी त्यांनी मात्र आपल्याला नितांत चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलेले आहे; असे लक्षात येते. त्यावेळी त्या व्यक्तीप्रति वेगळाच आदरभाव निर्माण होतो. असेच माझ्याकरता असलेले प्रतिभावंत साहित्यिक कलाम खान. यांना साधारणत: वीसेक वर्षापासून मी ओळखते. यवतमाळ येथे झालेल्या पाचव्या झाडीबोली साहित्य संमेलनाप्रसंगी दोन दिवस आम्ही सोबत होतो. त्या संमेलनात त्यांचे पुस्तक स्टॉल होते. डॉ. संध्या पवार यांच्यामुळे माझा त्यांच्याशी पहिला परिचय झाला. कलाम खान यांनी प्रकाशित केलेल्या डॉ.संध्या पवार यांच्या पुस्तकावर मी समीक्षा लिहिली. ती समीक्षा कलाम खान यांना खूपच भावली; त्यामुळे त्यांनी प्रकाशित केलेल्या काही पुस्तकांना मी प्रस्तावना लिहावी...असा आग्रह त्यांनी केला. माझ्या आठवणीप्रमाणे विजय गायकवाड यांचा 'भाकर' हा कथासंग्रह, कोमलकांता बनसोड यांची 'गोधडी' ही कादंबरी, अन्य काही काव्यसंग्रह, नाट्य लेखन या पुस्तकांना मी प्रस्तावना दिलेली आहे.
पुस्तक प्रकाशनाचा हा व्यवसाय खरोखर काटेरी वाट आहे; परंतु स्वतःतील प्रतिभेच्या आणि लोकांच्या विश्वासाच्या आधारे कलाम खान यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. अनेक अडचणी आल्या परंतु घेतलेला वसा मात्र टाकला नाही. ही त्यांची जिद्द, चिकाटी, नम्रता, सालसपणा पाहून आज त्यांचा साराच सभोवताल अचंबित आहे. खरे तर आयुष्य जगण्याकरीता पैसा नितांत गरजेचा असतोच असतो. तोच माणसाचे जगणे समृद्ध करत असतो. भौतिक सुखसोयी उपलब्ध करून देतो. परंतु गरजेपुरता पैसा असला आणि स्वत:च्या मनासारखे जगता आले; तर तेही जगणे खरे श्रीमंत जगणे असते, हे कलाम खान यांनी सिद्ध केलेले आहे. आपल्या अडचणींचा कुठेही बाऊ न करता.. पुढ्यात आलेल्या जगण्यावर मात करत... जगण्याच्या वाटा शोधत, अविरत साहित्यसेवा करीत राहिले. शब्दांप्रति त्यांची श्रद्धा नक्कीच विस्मित करते. त्यामुळे मला या ओळींचा उल्लेख करावासा वाटतो-
अनंत आमुची ध्येयासक्ती...
अन् अनंत आमुच्या आशा..
किनारा.. तुला पामराला...
जीवनात अशी आशा जिवंत ठेवताना...महाप्रलयातही स्थिर राहणे खरंच अशक्य असते...पण ज्याला हे जमते त्याला या प्रलयानंतरही आशेच्या बीजाला अंकुर आल्याचे दिसतेच.कारण नंतर पालवी फुटतेच आणि जीवनाचा वृक्ष पुन्हा बहरेलंच...यावर त्यांचा विश्वास असतो. याच मान्दियाळीतील कलाम यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातच भिवापूर येथे 'नवोदित साहित्य व सांस्कृतिक मंडळा'ची स्थापना केली. तेथूनच त्यांच्या शब्दशिल्पची सुरवात झाली. त्यानंतर नवोदितांचे साहित्य प्रकाशित व्हावे म्हणून आर. के. प्रकाशनाची निर्मिती केली. यामाध्यमातून शंभरच्यावर पुस्तके आजवर प्रकाशित केलीत. कलाम यांनी साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. 'शब्दशिल्प' चे संपादन करत वृत्तपत्राच्या जगामध्ये वाटचाल सुरू आहे. शब्दांनी माणसं जोडता येतात...जोडली जातात.नव्हे टिकतात आणि नुसतीच टिकत नाहीत तर त्यामुळे माणसाला माणसाच्या मनात घर बांधता येतं.यावर त्यांचा नितांत विश्वास आहे. पुस्तकांच्या जगातून बाहेर येत कवी संमेलने, साहित्य संमेलने, प्रकाशनाचे कार्यक्रम असे अनेक साहित्यिक उपक्रमांतून विविध स्वरूपात स्वतःच्या उपस्थितीसह इतरांना सहभाग प्राप्त व्हावा; याकरता धडपडत राहण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्यासारखी आहे.
आपल्याच विश्वात मग्न असणार्या लोकांच्या दुनियेत दुसर्यांचा विचार करणारा असाही एखादा अवलिया आहे.हे जाणवते; असा शब्दवेडा नजरेस पडतो, तेव्हा ते या काळातील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व अाहे; असे वाटल्याशिवाय राहत नाही. त्यांचं हे वेगळेपण अनेक माणसं जोडत गेलं.
जोडलेली नातीच
खरी नाती असतात
खर्या प्रेमामुळेच तर
ती जुळलेली असतात
ही खात्री पटली. जगण्याच्या रहाटगाडग्यात दिवस मावळतो परंतु जाता जाता मला काय करता आले याचं भान असलेले कलाम खान आज 'दैनिक भास्कर'सारख्या लोकमान्य आणि वैभवशाली वृत्तपत्रात उपसंपादक पदावर कार्यरत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. अनेक लोकांची पुस्तके प्रकाशित करणे, स्वतःचे शब्दशिल्प चालविणे आणि नोकरी करणे या सगळ्यांकरता त्यांना दिवसाचे २४ तास नक्कीच कमी पडताना दिसतात. परंतु त्या २४ तासांवर मात करत त्यांची सातत्याने सर्व धडपड सुरूच असते. याकरता लागणारी प्रचंड ऊर्जा मला माझ्या स्नेहीजनांकडूनच प्राप्त होते. त्यांचा स्नेह, जिव्हाळा हेच माझे भांडवल आहे. त्या बळावरच मी सारे किल्ले सर करत असतो, असे त्यांचे मानणे आहे.
मूलतः हिंदी भाषिक असूनही त्यांची मराठी शब्दकळा नितांत समृद्ध आहे. मराठी तसेच हिंदीतून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.त्यांना अनेक काव्यपुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कविता हा त्यांच्या लेखनाचा मूळ पिंड असून त्यातल्या त्यात प्रेयसभाव हा त्यांच्या लेखनाचा आत्मा असल्याचे लक्षात येते. खरेच, जगण्याला प्रेमाची नितांत गरज आहे.कारण प्रेम हेच जीवनाचा पाया आहे. जगण्यात प्रेमाचे संजीवन नसेल तर जगणे पुढे जाऊ शकत नाही. माणसाने माणसाशी प्रेमाने वागावे ही तत्त्वे सारेच सांगतात परंतु प्रत्यक्ष जगताना या गोष्टी बाजूलाच सारल्याचे दिसून येतात. कवी कलाम खान मात्र आपल्या आयुष्यातून प्रेमाला कधीच वजा करत नाही तर या एकाच भांडवलावर अनेक नाती जोडत जातात. माणसं गोळा करत जातात. गोळा झालेल्या माणसांचे घट्ट कुंपण त्यांच्या जगण्याला सुरक्षित करतात; यावर त्यांचा विश्वास आहे, नव्हे तर ते किती सत्य आहे याचा पडताळा या त्यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने लक्षात येतच आहे. त्यांच्या तीनही मुली नितांत हुशार असून त्या आपल्या वडिलांचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील; याची खात्री वाटते .
मला स्वतःला मुली खूप आवडतात. आजच्या या सामाजिक वावटळीत मुली सुरक्षित राहाव्यात, याकरिता माझी कायम धडपड सुरू असते. त्यामुळे कलाम खान यांच्या तिन्ही मुली आपल्या वडिलांच्या कार्याला आयुष्यभर उजाळा देतील याची शंभर टक्के खात्री आहे. जगामध्ये सारं काही मिळतं परंतु प्रेम मिळत नाही आणि लेक म्हणजे तर प्रेमाचा सागर असते; याबाबतीत कलाम खान फार श्रीमंत आहेत. एक नव्हे तर, तीन तीन लेकी त्यांच्याकडे आहेत. आयुष्याच्या खडतर वाटेवरती पावलोपावली साथ देणारी सहृदयी पत्नी त्यांना लाभलेली आहे. तिने प्रत्येक पावलावर... आहे त्या परिस्थितीमध्ये दिवस काढत कलाम खान यांना साथ दिलेली आहे.त्यामुळेच ते अशी यथार्थ वाटचाल करू शकलेत. कलाम खान यांच्याकडे असलेली प्रतिभा आणि ऊर्जा याची जगाने योग्य दखल घेतली नाही; असे मला तरी वाटत राहते परंतु काळही जास्त काळ कुणाची परीक्षा पाहू शकत नाही. काळाला सामर्थ्यापुढे आणि सदैव संकटे झेलणार्या सराईत योद्धापुढे मान खाली घालावीच लागते. त्यानुसार आता काळ पूर्णतः त्यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे.
पुढील वाटचाल ही अतिशय समृद्धपणे होत राहणार आहे. यात जराही शंका वाटत नाही. आज त्यांच्या आयुष्याचे अर्धशतक पूर्ण झालेले आहे. आयुष्याचा काळ व वेळ यांचा हिशोब केल्यास त्यांनी आपल्या आयुष्याच्या मानाने प्रचंड कार्य केलेले आहे, असे मला वाटते. ही ऊर्जितावस्था यापुढेही अशीच कायम राहो; नव्हे तर वृद्धिंगत होत राहो, अशी त्यांना मनोमन शुभेच्छा देते आणि थांबते.
अध्यक्ष :
भारतातील पहिले महिला
ओबीसी साहित्य संमेलन, नागपूर
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान,नागपूर
(मो.९८२३७०६५९०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा