(१० ऑक्टो. वाढदिवस विशेष)
एखाद्या गोष्टीचं वेड काय किंवा ध्यास काय यातील झपाटलेपण व्यक्तीला कधीच स्वस्थ बसू देत नाही कारण व्यक्तीच्या आत सुप्तावस्थेत असलेली सृजनशील प्रतिभा मूर्त रूपात बाहेर पडण्यासाठी नक्कीच धडपडत असते; अशी अस्वस्थ व्यक्ती एक-दोन नव्हे तर अनेक वाड्॰मयीन पातळ्यावर आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटत असेल तर त्यास सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाचा दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. असाच हिंदी-मराठीतील प्रतिभावंत लेखक व कवी, साक्षेपी संपादक, अभ्यासू पत्रकार, वेचक प्रकाशक, सहृदयी गजलकार व सर्जक स्तंभलेखक म्हणून महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात आपली नाममुद्रा नकसणारा कलाम अहमद खान याने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात नुकतेच पदार्पण केले आहे. यानिमित्ताने त्याच्या एकंदरीत जीवनप्रवासाला साहित्यिकदृष्ट्या अधोरेखित करण्यासाठी गौरवग्रंथाच्या निर्मितीचा हा अल्पसा प्रयत्न!
पंचेवीस वर्षापूर्वीचा म्हणजे तेव्हाचा पंचेवीशीतला तरुण, उमदा व अवलिया कलाम हा हिंदी भाषेबरोबर महाराष्ट्राच्या मराठी मातीशी, संस्कृतीशी इमान राखत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या ईर्ष्येने आजही अविरतपणे धडपडताना दिसतो. भाषा केवळ संवादाचं साधनच नाही तर तो अमूल्य असा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविला जातो; तो भाषेमुळेच! संस्कार, संस्कृती, सभ्यता हे सगळे भाषेतच सामावले असतात; म्हणूनच भाषेचे वृद्धीकरण करणे समाजहिताचे असते. अशा विकासवादातून कलामने नोव्हेंबर १९९५ या वर्षी नवोदित साहित्य सांस्कृतिक मंडळ, भिवापूर (जि. नागपूर)ची स्थापना केली. काखेत शबनम बॅग लटकवून सायकलने फिरस्ती करीत भिवापूर, उमरेड, कुही तालुक्यातील साहित्यविषयक जाणिवा असलेल्या रसिक, वाचक व नवोदितांना सर्वप्रथम मंडळाच्या छत्राखाली एकत्रित केले. महाराष्ट्राच्या अनेक खेडेगावात पत्र व्यवहाराच्या माध्यमातून शाखा उघडल्या. नवोदित व प्रथितयश साहित्यिकांच्या वैचारिक घुसळणीतून भाषिक मूल्यांचे पोषकतत्त्व बाहेर पडावे; या हेतुने कलाम अहमद खानने 'शब्दशिल्प' या अनियतकालिकाचे बीजारोपण केले. युवकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी व त्यांच्यात देशाभिमान जागविण्यासाठी काही वर्षे 'युवारत्न' हे मासिकही चालवले. विशेष दिनाचे औचित्य साधून अनेक 'विशेषांक' पण काढलेत.
१० डिसेंबर १९९५ ला कमला नेहरू महाविद्यालय सक्करदरा, नागपूर येथे विसासंच्या विदर्भ साहित्य संमेलनात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या हस्ते 'शब्दशिल्प'च्या प्रथमांकाचे मोठ्या थाटात प्रकाशन झाले. माझ्या संदर्भात 'शब्दशिल्प'विषयी सांगायचे झाल्यास, पूर्वीचे अनियतकालिक आजच्या पाक्षिकाएवढेच प्रतिष्ठापित व प्रेरक होते. 'शब्दशिल्प'चे नामसंस्करण, मुखपृष्ठ, पहिल्या अंकाची मांडणी, त्यातील सजावट व साहित्याची निवड हे सर्व सोपस्कार माझ्याकडून पार पडल्याचा आनंद मला आजही विस्मित करतो. ह्याच प्रथमांकाच्या प्रकाशन सोहळ्याला मी सपत्नीक जातीने हजरही होतो. आता तेच 'शब्दशिल्प' आपल्या रजतमहोत्सवी वर्षात तर संपादक कलाम पन्नाशीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याच्या अनुषंगाने गौरवग्रंथाचे संपादन करण्याची मोठी जबाबदारी मित्रपरिवाराने पुन्हा माझ्यावर सोपवली; हाही एक योगायोगच म्हणावा लागेल.
२० ऑक्टोबर २००७ ला नामवंत साहित्यिकांच्या व नवोदितांच्या पुस्तक प्रकाशनासाठी कलामने आर. के. प्रकाशनाची सुरुवात केली. आर. के. प्रकाशनाने आजवर सवलतीच्या दरात प्रकाशित ग्रंथांची शंभरी गाठली आहे. यात नव्या-जुन्यांचा मेळ साधून भाषिक मौलिकता जपली. यातील अनेक ग्रंथांना राज्यस्तरीय वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाले. काही पुस्तकांची व काव्यसंग्रहाची विद्यापीठ स्तरावर दखल पण घेतली गेली. समाजसेविका व सुप्रसिद्ध लेखिका डॉ. संध्या पवार यांचे पहिले पुस्तक 'भविष्य तुमच्या हाती' हे याच आर.के. बॅनरखाली सर्वप्रथम प्रकाशित झाले. या पुस्तकाला मुंबई येथे 'वाड्.मयसेवा पुरस्कार' प्राप्त झाल्याचे भाग्यही लाभले, तसेच प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त' यांचा 'ऊर्मी'' काव्यसंग्रह अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत होऊन सन् २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षात नागपूर विद्यापीठात तत्त्वज्ञान पारंगत (एम. फिल)च्या शोध प्रबंधासाठी पात्र ठरला. मा.माणिक वैद्य, सारिका कुर्वे यांच्यासारख्या इतरही कवी, लेखकांच्या ग्रंथांवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. अशाप्रकारे कलामने लिहू इच्छिणार्यांची प्रकाशनाद्वारे मराठी साहित्याची अतुट नाळ जोडली.
कलाम अहमद खान याने महाराष्ट्रातील व देशातील मान्यवरांचे हस्ते पुस्तके प्रकाशित केलेली आहेत; हे विशेष! २० नोव्हें. २००२ ला विश्वविख्यात मल्ल व अभिनेता मा. दारासिंग यांचे हस्ते भोला हुडकी, मांढळ येथे कलामच्याच 'तमन्ना' काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. २५ डिसें. २००८ ला कवी 'विश्वसुत' यांच्या 'वेदना' काव्यसंग्रहाचे विश्वकवी मा. सुधाकर गायधनी यांचे हस्ते प्रकाशन झाले. ५ नोव्हेंबर २००९ ला प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त' यांच्या 'ऊर्मी' हा काव्यसंग्रह सुप्रसिद्ध कवी व मराठी चित्रपट गीतकार प्रा.फ.मुं. शिंदे यांचे हस्ते राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय, कुही येथे प्रकाशित झाला. या व्यतिरिक्त प्रा.विजया मारोतकर, डॉ. हिरालाल मेश्राम, डॉ. राजन जयस्वाल, स्व. प्रा. डी. एन. तितरमारे, पत्रकार मा. पुरुषोत्तम भिसीकर, आमदार वसंतराव इटकेलवार, डॉ संध्या पवार, प्राचार्य गजानन मांडेकर, डॉ. मनोहर नरांजे या नावलौकिक मिळविलेल्या साहित्यिक, जनप्रतिनिधी, अभ्यासक व संशोधकांच्या हस्ते अनेक ग्रंथांचे लोकार्पण करण्यात आले आहे. कलामचा अशाप्रकारचा अथक कामाचा सपाटा व उच्चारलेल्या शब्दाचा आवाका प्रादेशिक सीमोल्लंघनाचे द्योतक आहे; हे त्याच्या चळवळ्या प्रवृत्तीवरून दिसून येते.
प्रकाशित केलेली पुस्तके थैलीत भरून हा कलाम महाराष्ट्रातील साहित्य संमेलनात विक्रीला ठेवतो. साहित्यिकांची साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहचवण्याचा व त्यातून थोडा फार वाटा मिळविण्याचा त्याचा आटापिटा अनेकदा परिहासाचा विषयही बनला. पण त्याने त्याची पर्वा केली नाही; उलट शब्दजागृतीच्या यज्ञकुंडास तेवतच ठेवले. प्रकाशनाच्या नावाखाली पैसा कमावण्यासाठी कराव्या लागणार्या क्ऌप्त्या त्याला अजूनही अवगत नाहीत. तरीही अत्यंत सचोटीनं व पराकाष्ठेच्या निष्ठेनं हा व्यवसाय सांभाळण्याचे धाडस करतो आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कथा, कविता उपयोगी पडत नाहीत; हे कळूनही कवीसंमेलने, साहित्य संमेलने, प्रकाशन सोहळे या धबडग्यात बिचारा कलाम वयाच्या पन्नाशीतही तितकाच तन्मयतेने व दृढ निश्चयाने कृतीशील आहे. हाच ध्यास त्याचा श्वास आहे, हेच त्याच्या जीवनाचे प्रयोजनही आहे. प्रकाशनाच्या अल्पशा मिळकतीतून आपल्या कुटुंबाचा जेमतेम निर्वाह करतो. कुटुंबाचा भार वाढत गेल्यावर त्याची सतत आर्थिक कोंडी होऊ लागल्याने दै.भास्कर, सा. विदर्भ वतन यांसारख्या मुद्रण माध्यमात मध्यरात्रीपर्यंत आपली सेवा पुरवतो. जगण्याचे संतुलन राखताना त्याला अशातर्हेच्या कसरती कराव्या लागतात. तो आजही नागपूरला किरायाच्या घरातच राहतो. दळणवळणाच्या आधुनिक युगातही भेटीगाठीसाठी, कौटुंबिक व इतर कार्यक्रमासाठी केवळ सायकलचाच वापर करणे, ही त्याची मजबुरी आहे. अशा खडतर जीवनानुभवाचा टप्पा पार करीत आपल्या अभावग्रस्त आयुष्याला कुठेच चाचपडू दिले नाही वा परिस्थितीसमोर शरणागतीही पत्करली नाही. ध्येय माणसाला जगण्याची रीत व कृतार्थ जीवनाची हमी देत असते. म्हणूनच कलाम आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठामपणे, अभेद्यपणे उभा राहिला. कलाम हा परिस्थितीने गांजला असला तरी इतरांना साहित्यिक म्हणून ओळख देण्याची श्रीमंती त्याच्यात आहे.
संमेलन हे साहित्य, समाज, संस्कृतीच्या चिंतनाचे सर्वश्रेष्ठ व्यासपीठ आहे. अशा संमेलनातून मराठी भाषेचा जागर व्हावा, वाचनसंस्कृती वाढीस लागावी, विचारमंथन व्हावे, अर्थातच सांस्कृतिक उन्नयनाचा हेतू साध्य व्हावा; याच उद्देशाने संमेलने भरविली जातात. शब्दस्नेही कलामनेसुद्धा कवितांच्या परिपोषणासाठी काव्योत्सव साहित्य संमेलने, लोककला जीवंत ठेवण्यासाठी शाहिरी संमेलने, गुजरात भूकंपग्रस्तांना मदत म्हणून 'उनकी याद में' यांसारखी विदर्भस्तरीय संमेलने, ग्रामीण-शहरी तसेच डोंगर-दर्याखोर्यांच्या कुशीत घेतली आहेत. इतकेच नव्हे तर, अनेक काव्यस्पर्धा घेऊन राज्यस्तरीय नवप्रभा काव्यपुरस्कार, काव्यप्रेरणा पुरस्कार अशा कित्येक पुरस्कारांनी कवी-कवयित्रींना प्रोत्साहित केले आहे. यातून त्याचे साहित्यप्रेम व तळमळ सुद्धा स्पष्ट होते. कलामचे महाविद्यालयीन वयापासूनचे सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक अशा सृजनकळा इतरांच्या अभिव्यक्तीच्या व उज्ज्वल भविष्याच्या सूचन करणार्या आहेत. खरंच, व्यक्तीने आपल्या जीवनात एखादी कृतिशीलता अशी जोपासावी की, त्यात रमताना प्रत्येकच दिवस एक सोहळाच असेल! अशा स्वानंद सोहळयातून कलाम अविश्रांत व मन:युत मुसाफिरी करताना दिसतो.
इतरांचे विचार, भावना व अभिव्यक्तीला कोर्या कागदावर रेखाटून 'शब्दशिल्पा'त अंकित करणारा 'कलमचा कारीगर कलाम'ने इतरस्त्र गुंत्यात गुंतूनही हिंदी-मराठीतून मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. 'तमन्ना', 'प्रीतगंगेच्या तटावर', 'शतक प्रीत फुलांचे', 'सुरुवातीच्या कविता'', '१११ हायकू', 'आभिसारिका', 'तेरा अहसास', ‘बिखरे मोती‘ व 'प्रेम पराग' असे ९ काव्यसंग्रह त्याच्या नावे जमा आहेत. ६ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. संथ, सखल व सवृत्तीक अशा सामाजिक अभिसरणाच्या त्याच्या कविता मानवी मूल्यावरील श्रद्धा प्रगट करतात. त्यात आर्त मनाची कोवळी व्यथाही दिसून येते. कवितेतील शब्दकळा कधी प्रीतीचा गुलमोहर फुलवते; तर कधी उपेक्षितांच्या वेदनेवर फुंकर घालते; कितीतरी समस्यांच्या मुळापर्यंत झिरपत जाते; भवतालच्या भयाण वास्तवतेचे दर्शनही घडवते. दै. निर्मल महाराष्ट्र, दै.लोकशाही वार्ता अशा दैनिकांतील स्तंभलेखनातून हिंदी-मराठी गायक-गायिका, अभिनेता-अभिनेत्री, संगीतकार, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक इ.च्या कलाविष्काराला दोन दशके रेखले आहे. सोबतच त्याने इतरही दैनिके, मासिके, पाक्षिके, साप्ताहिके, दिवाळी अंकातून लेख, कविता, जीवनपट, ललित, कथा, समीक्षण, पुस्तकपरिचय आदिंचेही विपुल लेखन केले आहे. त्याच्या साहित्याची दखल घेऊन 'भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आजाद' यांसारख्या पुरस्काराचा तो मानकरी ठरला आहे. अनेक वर्षे पत्रकारिता पण सांभाळली. आकाशवाणी व दूरदर्शनवरही साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. राज्यस्तरीय व अखिल भारतीय स्तरावर अनेक साहित्य संमेलनात आमंत्रित कवी म्हणून सहभाग नोंदविला आहे. यावरून कलामची साहित्यक्षेत्रातील गगनभरारी सुद्धा अनुपम अशीच प्रत्ययास येते.
माणूस जसजसा एखाद्या कार्यभागात समर्पित होत जातो; तसतशी त्याची तेजोवलयं वाढत जातात. त्या प्रकाशात कलामने आजच्या नामवंत व सुप्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षकांना घडवले, जोपासले, वाढवले आणि साहित्यिक दर्जाही मिळवून दिला. मायमराठीच्या विकासाच्या व संवर्धनाच्या दृष्टीने कष्टणार्या या शब्दवेड्या कलामने जात, धर्म, भाषा, पंथ ह्या भेदाभेदीपल्याड जाऊन आपल्या सात्त्विक वृत्तीतून, सम्यक कृतीतून, मृदू वाणीतून व व्यासंगी लेखणीतून अख्ख्या महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींचा मोठा गोतावळा तयार केला. उधाणल्या वादळासारखं जगलेल्या या कलासक्त भाषाप्रेमीने प्रज्ञा, प्रतिभा व परिश्रम यांच्या बळावरच हा व्याप सांभाळलेला आहे. अशा अथक व कष्टप्रद महत्कार्यातून त्याने आपले मोठेपण सिद्ध केले आहे. अक्षय ऊर्जेचा स्त्रोत व उत्साहाचे प्रतीक असलेल्या कलामच्या साहित्य चळवळीतील संघर्षतत्त्वाची दखल घेऊन विद्यापीठ व क्रमिक पुस्तकातील नामांकित कवी मा. अजीम नवाज राही व शिक्षणमहर्षी मा. घनश्यामजी धवड सर यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दिलेल्या शुभेच्छा जणू कलामच्या सृजनशीलतेला व उद्यमशीलतेला मिळालेली सकृत दर्शनी पावतीच होय; असे म्हणता येईल. कवी, लेखक, पत्रकार, प्राचार्य, प्राध्यापक, संपादक, वर्गमित्र, रसिकगण या मान्यवरांनी मानाचा मुजरा म्हणून कलामचे ध्येयसक्त व्यक्तीचित्रण, समग्र साहित्यदर्शन व भरविलेले साहित्य संमेलन यांचा प्रासादिक, तरल व चित्रदर्शी भाषाशैलीतून योग्यरीतीने वेध घेतला आहे. शब्दप्रेमी, रसिक, वाचकांनीसुद्धा सकस अभिप्रायातून 'शब्दशिल्प'च्या वाड्.मयीन मूल्यांची प्रशंसा केली आहे. यातून कलामचे साहित्यसंवेगी चरित्र जिवंतपणे व उत्कटतेने उभे करण्यात यशस्वी झाल्याचे दिसते.
कलामच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'शब्दशिल्पी' या गौरवग्रंथासाठी साहित्यिकांना, अभ्यासकांना व रसिकजनांना मी केलेल्या आवाहनानुसर महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून विपुल साहित्य प्राप्त झाले आहे. कलामविषयी वाटणारे प्रेम, जिव्हाळा, आस्था हे कृतज्ञतेतून निपजले असल्याने भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्या पूर्ततेचा असिम आनंद मिळाल्याचे मला खूप समाधान आहे. जसजसे साहित्य मिळाले त्या क्रमानुसारच समाविष्ट केले आहे. 'शब्दशिल्पी' हा गौरवग्रंथ केवळ वाचनीय नसून वाचक, रसिक, साहित्यिकांंच्या विचारांना प्रेरणादायी ठरेल; असा विश्वास व्यक्त करतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या उत्साही व आनंदी वातावरणात कलामच्या सुवर्णमहोत्सवासोबतच त्याने कोरलेल्या ‘शब्दशिल्पा‘चे रजतमहोत्सव या सिद्धि प्राप्त प्रसंगांना एकाचवेळी सार्थकी व अविस्मरणीय बनवणार्या सर्व मित्र-मैत्रिणींचे गौरवग्रंथाचा संपादक या नात्याने मन:पूर्वक आभार मानतो. तसेच साहित्यसेवाव्रती कलाम अहमद खानला सुवर्णमहोत्सवी वर्षात मुबारक प्रसंगी हार्दिक शुभेच्छा देतो व अल्लाहच्या कृपेने दीर्घायुरारोग्य लाभो; त्याच्या हातून निरंतर साहित्यसेवा घडो; अशीही प्रार्थना करतो. धन्यवाद!
- प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’, नागपूर
५२-ब, साईनगर, दिघोरी नाका,
नागपूर-४४००३४
(संवाद : ९४२१८०३४९८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा