बाया-मानसायनं अन् लेकरायनं गच्च भरेलं शहर. कुतरे , मांजरी, ऊंदर अन् कबूतरायनं गचागच दाटीवाटी केलेलं शहर. ऊच्ची ऊच्ची इमारती अन् झोपळ्यायलेही तीनं चार मजल्यावर पोहोचवनारं शहरं म्हन्जे बंबई. कोनी बंबई, कोनी मुंबई, कोनी मुमई, कोनी बाॅम्बे त कोनी तुंबई अस या या शहराले म्हनतात. भूकीनं अथिसा कोनीचं मरत नाह्यी... पन् जगोनारी अन् घळीक लोकलं अन् भरधाव रसत्यावर चिरळून मारनारी बंबई. पुलाखाली, झोपळीत, चाळीत अन् ऊच्ची ऊच्ची चाळीस चाळीस मजलीत राह्यनारे लोकायचं जगनं म्हनजे गजब अन् अफलातूनचं हाय.
मुंग्याची रांग लागव तशी हरेक ठिकानी...भाजीपाला घ्या..किराना घ्या...जेवाले हटेलात जा...मुतारीत मुता-हागाले जा...टिकट काहाळाले जा...कटिंगच्या दुकानात जा...अॅटो ची लाईनं, बेस्ट ची लाईनं
हरेक ठीकानी असते फकस्त अन् फकस्त लाईनं. म्हनूनसन्या अथिसा सारे लोकं असतेत घाईत. घरात झोप पुरी होत नाह्यी म्हनूनसन्या लोकलमंदी डुलक्या घेनारे चाकरमाने. अन् ह्या चाकरमान्यायले वक्तावर जेवाची शिदोरी पोचोनारे डबावाले.
घामात मिठ..गुदमरवनारी बंबई ..ऊभारनारी...ऊठोनारी..दाबनारी...बंबई. बंबई झोपत नाह्यी. रात असो दिस असो. जागनारे रस्ते. जागनारे घर. जागनारे हटेलं. जागनारे बार. जागनारे लोकं. एकदमच अफलातून बंबई.
ना जात. ना पात. ना नातं. ना गोतं माननारी बंबई. पैश्यात खेयनारी. पैसा है तो सिर्फ बंबई में. म्हनूनसन्या हिले देशाची आर्थिक राजधानी अस् म्हतल्या जाते. अवघ्या भारतातले लोकं. नशीब आजमावन्यासाठी अथिसा येतात. अन् कायमचे अथुल्लेच होवूनं जातात अथिसा जगतात अन् अथिसाच मरतात. फास्ट जिंदगी. दिस ऊगते कवा अन् मावळते कवा कायीचं कयत नाह्यी. भुलभुलैया बंबई कोनाले कवा भुलवूनं टाकनं काह्यी नेम नाह्यी बापा. कारन अथुल्ले रस्ते लवकर समजत नाही.
दहिहांडी ऊत्सव, गनपती ऊत्सव, नवरात्री ऊत्सव अथिसा साजरे होतात. गनपतीले, साईबाबाले , गजानन बाबाले माननारे अथिसा लोकं बंबाट हायेत. मुंब्राची मुंबादेवी, दादरचा सिध्दीविनायक, बान्दराचं अन् माहिम चा चर्च, दादरची चैत्यभूमी, बानगंगाचं मुंगसाजी महाराज समाधी स्थळ , महालक्षुमीचं देऊळ, हाजी अली शाह बुखारी चा दर्गा अथिसा सदाई लोकायची गर्दी पाहाले भेटले.
गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, माहिमची चौपाटी, बॅन्ड स्टॅन्ड, नरीमन पाॅईट अथिसा बारोमास लोकायचा गरदा दिसूनं येते.
हिंदी सिनेमातल्या हिरो हिरोन्यायचे बंबईतच घर हायेत. दगळी चाळ अजूनं आपला पाया घट्ट धरूनं ऊभी हायं.
गेट वे ऑफ इंडिया, ताज हटेल, शिवाजी महाराज टर्मिनलची रेल्वेची इमारत, बंबई मानगरपालीकेची टुमदार ईमारत अजूनही तशीच नवी नवरीवानी जवान अन् रूबाबदार आजही हायेत.
वळापाव अथुल्ल फेमस खानं. ईस सालं आंधी दोन रूपयाचा वळापाव आता दोन हजार ईस सालात दा रूपयावर येवूनं पोचला. पन्
आजही अथुल्ले लोकं भूक लागली की चालता बोलता दोही हातात धरूनं मोठ्या आवळीनं वळापाव खातानी दिसूनं येतात. अॅटो, टॅक्सी, ओला, ऊबेर, लोकलं, बेस्ट कुठीसाही येन्याजान्यासाठीचं महत्त्वाचं साधनं हायं.
रगळा पुरी, भेलपुरी, वळापाव, मिसळपाव, थालीपीठ, मेंदूवळा, ईडली, पुरीभाजी, समोसापाव, कांदाभजी, गोलभजी, पालकभजी, आलूभजी, पेटिस, पिझ्झा, बर्गर, मंचूरियन, चायनीज खानं, नुडल, केएफसी चिकनं मोठ्या आवळीनं लोकं अथिसा खातात.
गिरनी कामगारयचे, गोदीत काम करनारयचे हाल बेहाल करनारी बंबई . बंबई आमची म्हननारे हे इसरूनच गेले की बंबई हे जहाॅगीरीत भेटलेली जिन्नस नोय. पंधरा ऑगस्ट अन् स्व्वीस जानेवारीले मेरे देश की धरती सोना ऊगले ऊगले हिरे मोती अन् ऐ मेरे वतन के लोगो.. अशी देशभक्तीपर गीतं अन् जन गन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. हे भारतीय राष्ट्रगान म्हनतानी आपलीचं नव्हे त अवघ्या भारतीय जनतेची छातीन छाती देशप्रेमानं भरूनं फुगते. मंग बंबईवर मोजकेच लोकं हक्क कसे काय सांगतात. बंबई हे सा-यायचीच हायं. कोनीही म्हनू शकत नाह्यी फकस्त बंबई हे माहालावीचं हायं. मंग थे ऊत्तर प्रदेश चे असो, बिहार चे असो, आंध्र प्रदेश चे असो, राजस्थान चे असो की गुजरातचे. सैन्यदलात फकस्त एकाच राज्याचे लोकं नाहीत. भारत आपला हायं. मंग भारतीय मानूस कुठीसाही कवाही जावू फिरू शकते ना बापा.
संयुक्त महाराष्ट्राचा लढ्याची साक्ष देनारा धगधगती दिपस्तंभी जोत आजही मोठ्या दिमाखात भळकतानी व्हि.टी. ठेसना बाहेर दिसूनं येते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ययच गीत ' माझी मैना गावाकड राह्यली आजही गुनगुनल की संयुक्त महाराष्ट्र लढा डोयापुळे ऊबा होते. डांबरी अन् सिमेंटीच्या गुळगुळीत रसत्यावर धावनारे टांगे, टॅक्सी, दोन मजली बसा, लाखो करोळाच्या मोटारगाळ्याची रेलचेलं दिसरात दिसूनं येते.
सिग्नल सिग्नल् जौळ ऊली ऊली हार , पेन , रंगबेरंगी फुगे ईकनारे बाया, बाप्पे, पोट्टे, पोट्या दिसूनं येतात. ह्याच सिग्नलवर म्हतारे कोतारे एक विशिष्ट जमात भिक मांगतानी दिसूनं येते.
अवघ्या महाराष्ट्राचा कारोभार चालोनारं मंत्रालय, विधानसभा भवन, विधान परिशद भवन अथिसा हायं.
बंबईत कोनी एकट दुकट असल त थो अरबी ले दोस्त करूनं बाता करते.
झोपळपट्यातलीही कायनी लयचं अल्लग हायं. दिवसाढवळ्या रात सामटायनं पळते. गल्यागल्यात भरदिवसा लायटं लावले जाते. एखांदी ढेपशी बाई नाहित मानूस जर ह्या सांमटीत शिरला त आपल्याले आपले पावलं रिटनं मांग घ्या लागते. धारावी झोपळपट्टी, मानखुर्द झोपळपट्टी, गोवंडी झोपळपट्टी, बांदरा झोपळपट्टी, चेंबूर झोपळपट्टी, माहिम झोपळपट्टी. ह्या झोपळपट्टीत चालतात घरगुती गृह उद्योग जसे राखी बनवने, कपळ्यावरचं जरीचं काम, जनावराच्या चामळ्यापासूनं वस्तू बनवणे, कपळ्यायले रंग देणे.अशी हे बंबई म्हनजे बापा एक अल्लगच दुनिया हायं.
सात बेटाचं शहर म्हन्जे मुंबई. माहिम, वरळी, परळ, माझगाव, मुंबई, कुलाबा, छोटा कुलाबा ह्या छोट्या कुलाब्यालेच म्हातारीचं बेट असे सुध्दा म्हतल जाते. हे सात बेट म्हन्जे मुंबई. अरबी समुद्र हा ऊथय असल्यान जागोजागी खाजणे पडले होते. ओहटीच्या वेळेस बराचसा भाग ऊघडा पळत असे. आधी बोरीबंदर , नंतर व्हि.टी आणि आता १९९६ पासून शिवसेनेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे नाव पळले. मुंबईला बंबई, बाॅम्बे, बम्बई , तुंबई असे सुध्दा म्हटले जाते. देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई.
स्वप्नांचे शहर. भाकरीचे शहर. धकाधकीचे शहर. न झोपनारं शहर.
पहाटेचे चार वाजले होते. लोकलं धडाडत छपरी साकळ्या वाजवत धावत होत्या. ऊपनगर जाग झालं होतं. रस्ते, झोपड्या, घर, प्लॅट जागे झाले होते. अंधुकश्या प्रकाशात सार्वजनिक शौचालयांची दारे ऊघडत नी बंद होत होती आणि धडाडत होती. किशोर नेहमी प्रमाणे पाच वाजता ऊठला. डाव्या हातावर मंजन आणि दुस-या हातात वरच्या एका बाजूने कट केलेली पाच लिटरची पान्याची डबकी करंगळीत घेऊनं शौचालयात गेला. विविध प्रकारचे जिवघेणे वास शौचालयाभोवती वा-यावर तरंगत होते. किशोरचा जीव गुदमरत होता. नाकावर टाॅवेल घेत श्वास थांबवत त्याने प्रातःविधी आटोपला. चाळीतल्या घरात येऊन मोरीत साबनाने स्वच्छ हातपाय धुतले. पुन्हा हातावर बिटको मंजन घेऊनं दात हिरड्या घासल्या. जिभेवरचा जर अंगठ्याच्या ऊलट्या नखाने काढला. नरड्यात दोन बोटे घालूनं पित्त काढले. मोरीत जाऊनं आंघोळ केली. घरा शेजारच्या टपरीवरूनं कटिंग चहा आणि मस्का पाव मागवून घेतला. शर्ट पॅन्ट घालूनं तयार झाला. पाच पस्तीसची हारर्बर लोकल गोवंडी वरूनं पकडूनं बोरीबंदरला जायचे होते. दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर बरोबर पाच पस्तीसची लोकलं येऊनं थांबली. आज शनिवार असल्याने तुरळक लोकं सेकंड क्लास मधे किशोरला दिसत होती. फस्ट क्लासचे नरम शिट असलेले डबे पुर्णतः रिकामे होते.
किशोर लोकल मधे चढला. खिडकीची शिट पकडली. लोकलने झू ऽऽ झू ऽऽऽ करत जाग्यावरूनं स्पीड पकडली. किशोरची झोप पूर्ण झाली नव्हती. त्याला चार तासाची झोप सुध्दा पुरेशी. पण् तो रात्री दोन वाजता घरी पोहचला होता. तीनच तासाची झोप झाल्याने येणा-या वा-याच्या झुळकेने नकळत किशोरचे डोळे पुन्हा लागले. तीन तीन मिनीटांचे ऊपनगरीय स्टेशन चेंबूर, टिळक नगर गेले. लोकल कुर्ल्यात आल्याबरोबर एकच गलका ऊडला. बाया माणासांची डब्यात चढण्याची होड लागली होती. एकमेकांना दाबत, ढकलत , लोटत लोकं डब्यात चढत होती . काही मिनिटांपूर्वीच्या छपराला लोलकाप्रमाणे लोंबकळत वाजणा-या साखळ्यात हातं गुंतली गेली. साखळ्या अगदी शांत झाल्या. लोकलं पुढे धावत पळत होती. कुणी पेपर वाचण्यात गुंग तर कुणी पुस्तक वाचण्यात गुंग झाले होते. चुनाभट्टीत भजनी मंडळ डब्यात चढलं. त्यांनी खिडकीवर पांडूरंगाचा फोटो टांगला. एक छोटासा तबला-डग्गा थैलीतूनं बाहेर निघाला, पाच लोकांनी हातात टाळ घेतली. ' पांडूरंग हरी जय विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर माऊली की जय, तुकाराम महाराज की जय असा जयघोष करत गणाने सुरूवात झाली. डब्यात चैतन्य संचारल गेलं. किशोरची झोप दूर पळाली. टाळी न कळत पडायला लागली. लोकांच्या माना नकळत डुलायला लागल्या. स्टेशन भरभर चाल्ली होती. गुरू तेज बहादूर नगर, वडाळा, शिवडी, काॅटन ग्रीन, रे रोड, डाॅकयार्ड, सॅन्डहस्ट्स रोड, मशिद बंदर आणि शेवटचे स्टेशन बोरीबंदर बोरीबंदरचे कालांतराने नामांतर झाले. व्हि. टी. म्हणजे व्हिक्टोरिआ टर्मिनल आणि आता सी.एस. टी. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणून ओळखल्या जाते. हार्बर व सेन्टर्ल लोकल लाईन वरचे शेवटचे स्टेशन बोरीबंदर कधी आले ते किशोरला कळलेचं नाही. मरगळ झटकत किशोरने केसामधे हात फिरवत इतस्तत असलेले केस विना कंगव्याने सरळ केले . लोकांना जशी लोकलमधे चढायची घाई तशी ऊतरायची सुध्दा घाई. भल्यामोठ्या लांबलचक फलाटावर लोकल थांबली मुंग्याप्रमाणे फलाट माणसांनी तुडूंब भरून वाहत पुढे सरकत होता. बोरीबंदर ला ऊतरल्यावर चार रस्ते बाहेर पडायला. एक्सप्रेस ट्रेनच्या बाजूचा रस्ता, भुयारी रस्ता एक आराम हाॅटेल च्या बाजूने निघणारा आणि दुसरा आझाद मैदानावर निघणारा सेन्टर्ल रेल्वे इमारतीचा रस्ता, ब्रीजवरून जाणारा रस्ता आणि एक महानगरपालिका मुख्यालयापुढूनं निघणारा रस्ता.
किशोर भुयारी मार्गातून बाहेर पडला. गरमागरम वडे कढईतून निघतांना पाहूनं किशोरच्या जिभेखालूनं सहजतेने तोंडात पान्याची चिरकांडी निघाली. पावात लसनाची लाल नारंगी चटनी, हिरवी चटनी आणि गोड खारीक खटाई टाकत वडा पावाच्या पोटात दुमडून किशोरच्या ऊजव्या हातात आला. भल्यामोठ्या जल्मरच्या तबकडीतून एक तळलेली लवंगी मिरची हिरवी असून तीच्या अंगावर देखने सफेद डाग तळल्याने ऊठावदार दिसत होते. किशोरने डाव्याहातच्या दोन बोटाच्या चिमटीत मिरची ऊचलली. एक घास वडापावचा घेत मिरची पुढच्या दोन दातांनी तो कतरत होता. वडा फारच गरम असल्याने तो घास तोंडात जिभेने गरगर फिरवत होता. शबनमीतली पान्याची बाॅटल काढूनं त्याने ओठ न लावता वरून गटगटा पाणी पिले. एक कटिंग घेतला. टपरीवाल्या विक्रेत्याला पैसे देऊनं तो पुढे निघाला. हुतात्मा चौक लागला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचीशाठवण म्हणून अखंड जळणारी ज्योत बघत किशोर पुढे पायी चालला होता. चर्चगेट जवळ आल. त्याने ऑफिसमध्ये प्रवेश केला. काही क्षणातच खाडीलकर आॅफीसमध्ये आला. दोघांनी गरमागरम एक एक कटिंग मारली. खाडीलकर हा किशोरचा जिगरी मित्र. फावल्या वेळात दोघे खुप गप्पा मारत बसत. खाडीलकर तरूण, रूबाबदार आणि कामात तरबेज व इमानी असल्याने बाॅसने त्याचे लवकर प्रमोशन केले होते. खाडीलकरला किशोरची मस्करी करण्याची हुक्की आली.
" काय किशोर अजून तुझी अॅलिना क्रिस्ट्रोफर आली नाही. "
" येईल रे आणखी कुठे जाईल. जीना यहाॅ मरना यहाॅ" गाणं किशोर गुणगुणत होता.
" तुझे तिच्यावर खरे प्रेम आहे. मला ठावूक आहे. पण् तू बोलत का नाहीस. सर्व मनात दाबूनं ठेवतोस एक दिवस विस्फोट होईल बघ. मग आठवेल माझे शब्द तुला. "
" अरै यार कस सांगू तिला. ती समोर आली की, वाचाच जाते रे माझी. "
" अॅलिना मधे काय विषेशतः आहे रे. "
" अरे यार! तिचे करडे डोळे आणि तिचा लेणीसारखा रेखीव बांधा. मला फार भुरळ घालतो. "
" तीच्याशी एकदा बोलूनं तर बघ. तिच्या मनात काही फिलिंग्स असतील तर चित्र क्लीअर होईलं. नाही तर असाच चातका सारखा झुरत राहशील अगदी कायमचा."
" कस आणि काय बोलू मला कळत नाही रे खाडीलकर. साला बाॅस तीला नेहमी सोबत ठेवतो. "
" अरे ती पसर्नल असिस्टंट आहे ना बाॅसची. अपाॅईंटमेंट,मिटिंग्स सार काही तिलाच बघाव लागत. "
" साला दोन दोन दिवस तिला आऊट ऑफ मुंबई घेऊनं जातो. "
" जाणारचं ना यार. काम आहे ते. तुझी घुसमट मला बघवत नाही. तुझ्या मनातलं सर्व जळमट आज बोलूनं काढूनं टाक. आज कोणत्याही परिस्थितीत बोलूनं टाक. बघूया काय होते ते एस नाहीतर नो ...छापा नाही तर काटा. लंच टाईम मधे आपण तीघे व्हिटीच्या आराम हाॅटेल मधे जाऊ. तेथेच सर्व बोलूनं टाक. म्हणजे तुझी घालमेल तरी कमी होईल. ...आणि तीच्या मनात नक्की तरी काय आहे ते कळेलं. "
" ये बाबा नको रे मला भिती वाटते. "
" कशाची. "
" तिच्या नकाराची. "
" आणि होकार दिला तर. "
" होकार दिला तर या विश्वात माझ्या सारखा मीच..आणि तुला ताज मधे पार्टी. पूर्ण पगार खर्ची घालेल तुझ्यासाठी साल्या. "
" ऐ बाबा पूर्ण पगार एका दिवसात ऊडवशील तर महिनाभर काय खाशील. "
" तुझी पर्स माझीच ना रे. "
दोघेही हसत आपापल्या खुर्चीत विराजमान झाले. दोघेही कामात गुंग झाले. अॅलिना कधी ऑफिसमध्ये आली किशोरला कळले सुध्दा नाही. अॅलिनाने शिपायाला पाण्याकरीता आवाज लगावला. किशोरचे कान टवकारले गेले. त्याने काटकोनात मानं फिरवली. अॅलिना नजरेन दिसली. तसा खाडीलकर खाकरला. किशोरने आनंदाने हसत डोळे विस्फारले. खाडीलकरने घड्याळाच्या लोलकाप्रमाणे मान हलवत..." हं ऽऽऽऽ " असे केले. दोघेही हसले. खाडीलकर खुर्चितून ऊठला. अॅलिना जवळ गेला. आॅफीसच्या कामकाजा संदर्भात बातचीत केली आणि बोलला.
" अॅलिना ऊद्या संडे आहे. काय स्पेशल. "
" नथिंग. "
" उद्या लंच ला येशील. "
" तुझा बर्थ डे वगैरे आहे काय?"
" नाही गं! सहजच. "
" तुला जाॅब प्रिय नाही काय?"
" का ग?"
" अरे आपला बाॅस माझ्याशी लग्न करणार आहे. कालचं प्लाईट मधे त्यांनी मला प्रपोज केला. "
" मग तू होकार दिला काय?"
" नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. "
" का? "
" अरे खाडीलकर. बाॅस किती सुंदर, देखणा, रूबाबदार, ऊमदा, ऊंचपुरा आणि विशेषतः श्रीमंत. मग नकार कसा देऊ. "
" अग पण तुला एक गोष्ट सांगू काय?"
" बोल ना. "
" किशोर तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो ग पण् तुला कधी बोलला नाही. "
" हो बरोबर आहे तुझे. तो नेहमी मला एकटक बघतो . मला कळायच पण् फार डरपोक आहे तो. "
" अॅक्चुली त्यानेच इन्हाॅईट केले तुला. काय सांगू त्याला. "
" त्याला म्हण तुझं झोपडपट्टीत राहणं, तुझा तुटपुंज्या पगार आणि विषेशतः तुझी पर्सन्यालिटी मी न भेटण्याला कारणीभूत आहे. "
" अग! नकार द्यायचा आहे तर स्पष्ट नाही म्हण. हे भलतेच काय बोलतेस. "
" जे सत्य आहे तेच बोलते खाडीलकर. "
खाडीलकर किशोरला काहीच बोलत नाही. दिवसा मागून दिवसं भरभर निघूनं जातात. बाॅस गौतम आणि अॅलिना चे लग्न ठरते. दोघेही कोर्ट मॅरेज करतात. अॅलिना आता ऑफिसमध्ये येत नाही. काही दिवसातच ऑफिसमध्ये सर्व कलिग ला कळते बाॅसने अॅलिनाला फसवले. अॅलिनाच्या आधी सुध्दा एका
गर्भश्रीमंत मुलीशी गौतमचे लग्न झालेले होते.
किशोर बातमी ऐकून अचंबित होतो.... आणि रिझाईन देऊनं मुंबई सोडून आपल्या गावी जातो.
भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई. अरबी समुद्राची राणी म्हणजे मुंबई. चाकरमान्यांची स्ट्रगलर लाईफ म्हणजे मुंबई. भिकारी, गरीब, मध्यमवर्गीय व श्रीमंत, गर्भश्रीमंत लोकांच शहर म्हणजे मुंबई. लोकल, मेट्रो, मोनो, बेस्ट, टॅक्सी, ओला, ऊबेरनं धावनारं शहर म्हणजे मुंबई. धावणार, पळणार, न थांबणार, जागणार, जागोणार आणि जगवणार शहर म्हणजे मुंबई. किशोर आणि त्याची आई परत मुंबईला आले. गावात ना धड पगार ना राहण्याची सोय.
दोन हजार पाच साल ऊगवल. पहाटे पाचला किशोर ऊठला. डोळ्यातील चिपळासारखा आळस झटकत अगदी शुन्य मिनिटात त्याने अंथरूण सोडले. नेहमीप्रमाणे प्रातःविधी आटोपला.
" ये आई माझा डबा झाला का गं?" आईला हाका मारल्या.
" हो राजा झाला. आज तुझ्या आवडीची भाजी गोबी मसाला केली. खाशील. मित्रांना जास्त वाटत बसू नको. लोकांना तुपाशी आणि स्वतः मात्र ऊपाशी. अगदी तुकारामचं आहेस तू. "
" अग आई तुझ्या हातची भाजी माझ्या कलीगला आवडते. म्हणून ते आवडीने डबा ओढुन खातात. "
" बरं तु लग्नाबद्दल काय विचार केला आहेस...की, आयुष्यभर मीच ह्या किचनमधे मरायचे काय? "
" अग आई ऐवढी कसली घाई तुला. आता तर मी तीस वर्षांचा झालो. "
" मग म्हातारा झाल्यावर कर लग्न. "
नेहमीप्रमाणे आईची कटकट ऐकत किशोर घराबाहेर पडला. दाट लोकवस्ती कुर्ला मधे तो वडिलांशिवाय आई सोबत रहायचा. आर. के. ची रूम. साधारणपणे दिडशेचा एरिआ. असल्फा पार करत तो कुर्ला ऊपनगरीय स्टेशनला पोहचला. तेथून वडाळा आणि वडाळा वरून अंधेरीला त्याला जायचे होते. लोकल धडाडत आठ नंबरच्या हार्बर लाईनवर आली. किशोर बसला. लगेच पाच ते सात सेकंदात लोकलने स्पीड जागेवरून पकडली. चुनाभट्टीत दोन किन्नर साडी, ब्लाऊज घातलेले. तोंडावर अवाजवी किळसवाना मेकअप चढवलेला चढले. अतिशय घाणेरड्या पुरूषी आवाजात टाळी वाजवत त्याने म्हटले...
" ऐ चिकने , ऐ शायने चल दे ना बिस की पत्ती." किशोरची किन्नराच्या आवाजाने झोप उडाली होती आणि त्या आवाजाने काळजाची धडधड होत घाबरगुंडी ऊडाली होती. खिशात मोजकेच पैसे असल्याने किशोरने नजर डब्यातून खिडकीत वळवत न ऐकल्या व न पाहिल्यासारखे केले. अशी किशोरची कृती किन्नराला खटकली. त्याने किशोरच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. किशोरच्या अंगावर काटा ऊभा झाला त्याला अंत्यत किळसवानं फिलिंग्स होत अंग थरथरलं. हात झटकत किशोर बोलला...
" सबेरे सबेरे दिमाख का दही मत कर. चल सटक यहाॅ से. "
किन्नर बोटं मोडत काही तरी पुटपुटला आणि तेथून निघून त्यांचा मोर्चा दुस-या व्यक्तीकडे वळला.
आज आपला दिवस वाईट जाईल या विवंचनेत किशोर होता. कारण किन्नरांचा पहाटे पहाटे आशिर्वाद घ्यायचा असतो पण् आज त्याने पैसे न देता किन्नरला अपशब्द बोलला लाखोली वाहिली. जी. टी. बी. नगर पार करत वडाळा स्टेशन आले होते. वडाळ्याला माणसांची जत्रा पाहूनं किशोर शहारला. एक्सलेटरवरूनं वर दाद-यावर चढूनं एक नंबर प्लॅटफॉर्मवर ऊतरला. पनवेल गाडी तद्नंतर बेलापूर लोकल गेली. गोरेगाव इंडिकेटवर लागलं होतं. सीएसटी कडूनं येणारी लोकलं थोडी खाली होती पण् भरपूर गर्दी फलाटावर असल्याने एकच झुंबड ऊडाली. किशोर गर्दी पार करत कसातरी लोकलं मधे चढला. लोकलच्या दांड्याला धरून तो कसातरी ऊभा झाला. आतुन बाहेर प्रेशर येत होत. किशोर जीव मुठीत धरून कसातरी ऊभा होता. कुठल्याही क्षणी मृत्यू कवेत घेईल अशी अनामिक भीती त्याला वाटत होती. लोकलने जाग्यावरूनं ' झू ऽऽऽ झू ऽऽऽ ' करत स्पीड पकडली होती. लोकल हेलकावे खातं पुढे भरधाव धावत होती. पुढील स्टेशन किंग्स् सर्कल, माहिम, बांदरा, खार रोड, सांताक्रुझ , विर्लेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, राम मंदिर आणि शेवटचे स्टेशन गोरेगाव आले. किशोरचा हात खांबाला पकडल्याने लाल झाला होता. त्याने निश्वास टाकत सुटलो एकदाचा असा विचार करत ऑफीसच्या दिशेने मोठमोठे पाऊले टाकत निघाला. आईने पहाटे काढलेला विषय आता सत्यात ऊतरवला पाहिजे या विचाराने थोडेसे न दिसणारे स्मित करत किंचितसे गाल वर गेले. तो आज ऑफीसच्या दिशेने अगदी आतूरतेने पाऊले टाकत चालला होता.
ऑफीसच्या गेट जवळ पोहचला. लिफ्टने दहाव्या माळ्यावर आला. ऑफिसमध्ये आधीच सर्व कर्मचारी वर्ग आला होता. मुस्कान आपल्या ठरलेल्या खुर्चीत बसून फाईलीत डोक खुपसूनं होती. तिचे फक्त केस दिसत होते. किशोर खाखरत आपल्या खुर्चीत येवूनं बसला. मुस्कानने थोडे फाईलीतूनं डोके ऊचलूनं मान वळवूनं किशोरकडे पाहिले. हलकेसे स्मीत देऊनं ती फाईलीत पुन्हा गुंग झाली. आज प्रपोज डे असल्याने आपण मुस्कानला प्रपोज करू असा विचार कमलाकर करत होता.
लग्नानंतर खंडाळा किंवा लोणावळाला हनिमूनला जावू. दोनंच मुले होऊ देऊ. आईची नेहमीची कटकट बंद होईल. लोन घेऊन वन बि एच के घेऊ. घरात फ्रिज, वाॅशिंग मशीन, ए.सी. , कलर एलसीडी टिव्ही, सोफा, बेड हे सर्व हळूहळू घेऊ असा विचार किशोर करत भावी दिवा स्वप्न मनोमन रंगवत होता.
किशोरला बाॅसचे बोलावणे शिपाया मार्फत आले होते.
" किशोर सर आपणास जोशी सरांनी कॅबीनमधे अर्जंट बोलावले आहे. "
शिपाई गावकर बोलला.
" ओ.के. मामा येतो. लगेच. "
किशोर बोलला.
महत्त्वाच्या कामा संदर्भात किशोर आणि जोशी यांचे संभाषण झाले. किशोर कॅबीनच्या बाहेरं आला.
मुस्कान ला कसे बोलू या विवंचनेत तो पडला होता....
....काही क्षणातच असंख्य सवाल किशोरच्या हळव्या मनात तरंगासम ऊठले. आपला धर्म कोणता! तीचा धर्म कुठला. आई स्विकार करेल काय? तीचे कुटुंबीय मान्य करतील काय? लोकं काय म्हणणार. ....पण् सर्व प्रथम ती होकार देईल काय? हा मोठाच यक्ष प्रश्न होता.
आज आपण मनातले मुस्कानला सर्व सांगू. या विचाराने किशोर थोड्याच वेळात जागेवरून ऊठला. ऊठला पण् काही क्षणातच परत जागेवर बसला. लंच टाईम मधे बोलू असा त्याने विचार केला. थोड्याच वेळात
गौतम तीच्याकडे जातांना किशोरला दिसला. मुस्कानला गुलाबपुष्प देऊनं " आय लव्ह यू. यू विल बी मॅरी मी. " अस म्हणाला. मुस्कान गालात हसली . किशोरला सर्व ऐकू आले. तीने गुलाबपुष्प हातात घेतला. मानेने होकार दिला. गौतम खुप खुश झाला होता. हे किशोरने पाहिले. किशोर गपगार झाला होता. काही क्षण मेल्यागत त्याला वाटत होते. संपूर्ण शरीरात वात भरल्या सारखं त्याला वाटले. श्वासात अगतिकता वाढली होती. काळजाचे ठोके वाढत होते. छाती फुटूनं काळीज बाहेर येते की; काय असे त्याला वाटत होते. स्वप्नांचा चकनाचूर झाल्यासारखे वाटत होते. काही काम न करता तो तसाच एकटक संगणकाकडे पाहत होता. तितक्यात शिपाई आला.
" साहेब चहा आणू काय? "
मानेने नकार देत किशोर म्हणाला.
" नको. "
गौतम दिसायला गोरा, ऊंचपुरा, जिमची रेखीव शरीरयष्टी, माॅल मधले महागडे कपडे घालायचा. त्यामुळे मुस्कान त्याच्याकडे आकर्षित झाली होती. त्यामानाने किशोर जेमतेम पाच फूट तीनं इंच, साधे स्ट्रिटवरील स्वस्त कपडे, दिसायला साऊथ इंडियन सारखा सावळा. नाकडोळी छान होता .
लंच टाईम झाला. सर्व कलिगनी आपापले डबे खोलले. किशोर खुर्चीत बसलेला व टेबलावर मान टाकूनं निजलेला. सर्वांनी त्याला हाका मारल्या पण तो जागचा ऊठत नव्हता. शेवटी कंटाळून गौतम जवळ आला.
" अरे भाई निंद हुई होगी तो लंच को आ टिफीन लेकर. " अस म्हणत त्याने किशोरला हलवले तर किशोर खुर्चीतून खाली पडला. सर्वजण धावत आले काय झाले म्हणून . किशोर पूर्णपणे थंडगार झाला होता. श्वास घेणे बंद झाले होते. बहुतेक कमलाकर ऑफ झाला अशी शंका सर्वांना येऊनं गेली. बाॅसने तात्काळ अॅम्बूलन्स बोलावली. इस्पितळात दाखल केलं. डाॅक्टरांनी चेक केले. ओपीडी बाहेर सर्व कर्मचारी रडत होते. डाॅक्टर चेक अप रूम मधून बाहेर आले.
" साॅरी. ही ईज नो मोअर. " असे बोलले.
सर्व कर्मचारी जोरजोरात रडायला लागले.
किशोरच्या बाॅसने डाॅक्टरकडे विचारणा केली.
" डाॅक्टर हे कश्यामुळे झाले असे."
" बिग हार्ट स्ट्रोक. हार्ट अटॅक."
लेखक
सु.पुं.अढाऊकर
अकोला
९७६९२०२५९७



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा