शब्दशिल्प/नागपूर_ विदर्भाच्या अकराही जिल्ह्यातील कवयित्रींचे विदर्भस्तरीय कविसंमेलन मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अंतर्गत विदर्भ संघटनामार्फत गुगल मीट वर ऑनलाईन संपन्न झाले.
वाशिम जिल्हा अध्यक्ष एड. मंगलाताई नागरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या विदर्भस्तरीय कवी संमेलनाला अमरावती येथील सुप्रसिद्ध कवयित्री मा. शुभांगीताई इंगोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. २०१८ पासून निर्माण झालेल्या विदर्भ लेखिका संघटनाच्या अध्यक्ष प्रा.विजया मारोतकर यांनी या कविसंमेलनाच्या आयोजनाची धुरा समर्थ पणे सांभाळत अकराही जिल्ह्यांमधील कवयित्रींना समाविष्ट केले. वैदर्भीय लेखिकांच्या लेखनाच्या कक्षा सातत्याने वृद्धिंगत होत राहाव्या आणि त्यांचे लेखन समाजापुढे येत राहावे या प्रयासातून या ऑनलाइन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.उर्मिला ठाकरे , खामगाव यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना समर्पित वंदना सादर केल्या नंतर कवी संमेलनाला सुरुवात झाली.
वर्धा जिल्हा अध्यक्ष जयश्री कोटगीरवार यांच्या "आठवडी बाजार "या वऱ्हाडी कवितेने कविसंमेलनाची सुरुवात झाली झाली .ज्यामध्ये त्यांनी सर्वांना आपल्या बालपणात नेऊन ठेवले. बाजारात जाणारे बाबा आणि आठवडी बाजारातून येताना घेऊन येणारे "भातक " याची आठवण सर्वांना करून दिली. तोच सूर पकडत वाशिम कारंजा लाडच्या राधा मुरकुटे यांनी "गणगोत" ही कविता सादर केली . अमरावतीच्या
प्रभाताई आवारे यांनी "यशोगाथा" मांडली तर विजयाताई कडू यांनी "अधिक मासा" बाबतचे मनोगत व्यक्त केले. तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. उषाकिरण आत्राम
यांनी "उन्हाळा" सुरेख रचना सादर करून रण रणत्या उन्हात गारवा निर्माण केला. चंद्रपूर च्या लीना भुसारी यांनी दुःखातही सावरता येते.. अशी सुरेख साद घातली .. तर डॉ.उर्मिला ठाकरे यांनी आपली दमदार गझल सादर केली . नागपूरच्या डॉ.अंजलीताई टाकळीकर यांनी मातीचे महात्म्य सादर केले तर डॉ.शील बागडे यांनी गौतम बुद्धाला समर्पित रचना सादर केली.
"राजपुत्र गौतमही,शिंपे सुखावरी पाणी
पिता हारे जिंके सत्य,ऋषी असितांची वाणी"
अमरावतीच्या शालिनीताई कावरे यांनी "मातीच्या माठा"चे महत्व विशद केले तर अकोल्याच्या लताताई थोरात यांनी स्त्री जीवनाचा आलेख मांडला. कारंजा लाड येथील
शारदा बंडे यांनी "शेतकऱ्याची व्यथा" व्यक्त केली तर यवतमाळच्या सुप्रिया पांडे यांनी सहजीवनात पती पत्नीच्या नात्याला" खमंग फोडणी " या कवितेतून सहजरित्या सादर करत कविसंमेलनात खसखस पिकविली. वर्धा येथील सरला कापसे यांनी "आई" कविता सादर करून सर्वांना अंतर्मुख केले तर आज माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे सोडून दिलेआहे .जातीपातीचे बंधन पदोपदी छळतात.. असे अनेक विषय भाव व्यक्त करणारी.." जगताना मन मरून गेले" ही डॉ.मोनाली कोपरे , नागपूर यांची कविता सुन्न करून गेली.. अमरावतीच्या पद्मा ताई येऊल यांनी लेकीच्या पाठवणीच्या वेळी आईच्या मनाची होणारी घालमेल व्यक्त करून सर्वांनाच हळवे केले. अकोला येथील उषाताई भोपळे यांनी "कुकु"ही वऱ्हाडी कविता सादर करून बाई व तिच्या कपाळी असलेल्या कुंकवाचा रूढी परंपरांच्या जोखडात बांधलेला अन्वयार्थ व्यक्त केला. नागपूरच्या कोकिळा खोदनकर यांनी स्त्री जीवनाची गाथा मांडली तर गडचिरोलीच्या यामिनी मडावी यांनी सुद्धा जगण्याचे विविध पदर उघडले ... बुलढाणा येथून वैशाली तायडे यांनी .. वारी ही कविता मिस्कीलपणे सादर करत .समाजातील नव्हे तर घराघरातील वास्तव विशद केले.
'एका स्त्रीने मला पंढरपूरच्या वारीला जायचे आहे 'असे म्हणताच तिच्या घरामध्ये कसे वादळ उभे होते ..?:याचे मार्मिक चित्रण आपल्या रंगतदार रित्या सादर केले. गोंदियाच्या शालू कृपाले यांनी विरही कविता सादर करत सन्नाटा निर्माण केला त्याच वेळेला उषाताई बुक्कावार , चंद्रपूर यांनी "आनंदाचे फेशियल" ही वेगळ्या धाटणीची कविता आणून सर्वांना मनमुराद हसविले ..
" कितीही करा खर्च,महागडे क्रिम वापरा
अंतरंगात नसेल शांती..तर बाह्यरूप कसे खुलणार?
आनंदाचे करा फेशियल..मस्त करा गप्पा टप्पा
बघातर करून सख्यांनो..हमखास रिझल्ट मिळतो..."
स्मिता खानाझोडे , नागपूर यांची जीवनाचा संदेश पेरणारी कविता सादर केली.. जे पेराल तेच उगवेल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे माणसाने जगताना कशाची पेरणी केली पाहिजे याचे सुंदर दाखले देणारी अर्थपूर्ण रचना सादर करताना यवतमाळच्या कविता शिरभाते म्हणाल्या....
केली पेरणी विद्येची
ज्ञानांकुर उगवले
उच्च नीच नाही कोणी
शिक्षणाने उमगले
अमिता घाटोळ, अकोला, प्रा.अनिता धुर्वे ,गोंदिया, निशा काळे वर्धा यांनी ही सुरेख कविता सादर केल्या तर वर्धा येथील कविता बेदरकर यांनी वेगळ्या धाटणीची कविता सादर करत अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली.. कारंजा लाड येथील गायत्री धर्माधिकारी यांनी "पुरुषोत्तम" ही कविता सादर केली....नयना देशमुख ,बुलढाणा यांनी आईवरची रचना सादर केली तर पद्मजा जोशी, यवतमाळ यांनी दुष्काळाचं वास्तव चित्र डोळ्यापुढे उभं केलं .. तोच सूर धरत रत्नमाला भोयर, चंद्रपूर यांनी "बळीराजाची व्यथा" मांडली. हिंगणघाटच्या मंजुषा चिटावर यांनी माणसाच्या अपेक्षांचा पाढा वाचला तर छाया राडे, वर्धा यांनी ग्रामीण वातावरणातील आमराई ,आजी-आजोबा हे वास्तव उभे केले. यवतमाळ जिल्ह्यातील शेंबाळपिंपरी या लहानश्या गावातून आमच्याशी जोडल्या गेल्या होत्या सविता देशमुख... यांच्याकडे व्यवस्थित नेटवर्क नव्हते .भर उन्हात घरावर उभे राहून त्यांनी "महागाईचा भूकंप " ही कविता पूर्ण ताकदीने सादर केली.. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.या कवितेतून जगतानाचा आक्रोश मांडताना त्या म्हणतात...
"काय खावं काय ल्यावं
कळेनासं झालं मला
महागाईच्या भूकंपाने
जीव माझा हादरला..."
जगताना असे चटके मिळत असताना... कविता दाते ,वर्धा ह्या भर उन्हातही मनात आल्हाद फुलवणारी "पळस" ही रचना घेऊन आल्या...रणरणत्या रानात उन्हात फुलणाऱ्या पळसाचे मनभावन अंतरंग उलगडले..नागपूरच्या डॉ.पद्मिनी दुरूगकर यांनी "झुरळ पार्टी" वरची कविता सादर करून वास्तवाचे भान दिले. डॉ. सविता बेदरकर, गोंदिया यांनी हिंदी रचना सादर केली .जग स्त्रीला अनेक प्रश्न विचारत असत ... परंतु तिच्या प्रश्नाचे उत्तर व्हायला कोणी का तयार नसत..? असा व्यवस्थेला जाब विचारणारी जबरदस्त हिंदी रचना सादर केली.
यवतमाळ जिल्हा अध्यक्ष निशा डांगे यांनी आपल्या बाबांच्या आठवणीत" दूर उडाली पाखरे" ही भावविभोर कविता सादर केली तर.डॉ साधना काळबांडे, अकोला यांनी स्त्री सुरक्षेचा ऐरणीवर असलेला प्रश्न सावित्रीमाई समोर मांडताना "साऊ"
या कवितेत म्हटले ..की..
"काय अन कस...तुला साऊ ग सांगू
एकाच पाटीवर जीवनाची..व्यथा कशी मांडू"
म्हणत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले.
चंद्रपूरच्यासंध्या वीरमलकर यांनी "रस्ता" यावरील आपली कविता सादर करून एकच वळण चुकलं तर जगणं कसं सैरभैर होत. याची कल्पना उभी केली .कोकिळा खोदनकर, नागपूर यांच्या कवितेने सर्वांना बांधून ठेवले.
अमरावतीच्या विजया भांगे यांनी आपली दर्जेदार रचना सादर केली. सुनिता तायडे यांनी लग्नांमध्ये आयोजित करण्यात आलेली बुफे पद्धती सुरेख रित्या कवितेतून मांडून जुनं ते सोनं म्हणायला भाग पाडलं तर प्रणोती कळमकर यांनी एकूणच आयोजनाचे आणि विजया मारोतकरांचे कौतुक करणारी कविता सादर केली. कार्यक्रमाच्या आयोजक प्रा.विजया मारोतकर यांनी सर्वांना धक्का देणारीच कविता सादर केली.
मी माझ्या प्रियकरा बद्दलची कविता सादर करत आहे . लक्षपूर्वक ऐका ... हा प्रियकर कोण..? हे तुम्हाला शेवटच्या कडव्याच्या शेवटच्या ओळीत कळेल ..असे म्हणाल्या... त्यामुळे अधीरतेने सर्वांनी जीवाचे कान करून ऐकले ..हा प्रियकर कोण ..? या प्रतीक्षेत असतानाच शेवटच्या क्षणात हा प्रियकर म्हणजे "अक्षर" होय हे सिद्ध झाले.
अक्षरांना समर्पित कवितेच्या शेवटी रहस्य उलगडताना त्या म्हणाल्या...
कधी एकांत.. कधी आकांत झेलत
लेखणीतून माझ्या उतरवलीस विराणी
तरी रे प्रत्येक वेळी..' अक्षरा '
गुलजार केलीस माझी कहाणी
सर्वांना हलकासा झटका मिळाला .विदर्भ स्तरीय रंगलेल्या या भव्य काव्य संमेलनाला उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथि अमरावतीच्या शुभांगीताई इंगोले यांनी आयोजनाचे तसेच सर्वांच्या कवितांचे खूप खूप कौतुक करत सर्व विदर्भ लेखिकांना समर्पित असे ....
" जीवनाच्या वाटेवर साथ तुमचीच आहे...
तुम्ही नसत्या तर ही जागा रिक्त राहे"
असे काव्य सादर करत..सारे श्रेय विदर्भ लेखिकांना दिले.. आणि प्रमुख अतिथी पद दिल्याबद्दल आभार मानले.स्वतः सर्व गुणसंपन्न ..उच्चविद्याविभूषित असताना त्यांचे अशा प्रकारे नम्रपणे व्यक्त होणे ...सर्वांना खूप भावले..
सर्वात शेवटी कवी संमेलनाच्या अध्यक्ष एड.मंगलाताई नागरे यांनी कवी संमेलनात सादर झालेल्या एकापेक्षा एक दर्जेदार कवितांचा आढावा घेत अल्पावधीत इतके भव्य दिव्य कविसंमेलन विदर्भ स्तरीय पातळीवर उभे करून सर्वांना आश्चर्याचा धक्का देणाऱ्या विजया मारोतकारांचे
कौतुक केले .. विदर्भातील शेकडो लेखिकांना एका रेशीम बंधात बांधून ठेवण्याची किमया विदर्भ लेखिका संघटनामार्फत होत आहे . या सातत्याला मला प्रणाम करावासा वाटतो. कितीही अडचणी आल्या तरी विजयाताई थांबत नाही आणि आपल्या सोबत मागे पडलेल्या कानाकोपऱ्यातल्या वैदर्भीय लेखिकांना पुढे आणण्यासाठी कायम धडपडत असतात ...त्यांच्या या धडपडीला पाहून आम्ही सतत त्यांच्या सोबत असतो..
आणि राहणार.. तुम्ही पण राहा असा संदेश देत
सर्वांच्या कवितांची दखल घेतली आणि
आपली" ऋण" ही कविता सादर केली
" दूर शहरी तुझ्या जीवनी
दंग आपल्या सुखात आहे
बघ गावाकडे रे जाऊनी
अजून सारे तसेच आहे"
खेड्याकडे पाठ करून शहरात सुखी संपन्न जीवन जगणाऱ्या समाजातील कितीतरी लोकांना चपराक देणारी त्यांची कविता ठरली.
बाहेर तप्त उन्हाळा असताना आपल्या घरी थंड हवेत बसून एकापेक्षा एक दर्जेदार कवितेचा आनंद देणाऱ्या या कवी संमेलनातील सर्व कवयित्रींच्या सादरीकरणाने एक वेगळाच आनंद प्राप्त झाला. या देखण्या कवी संमेलनाचे नेटके आणि दर्जेदार असे सूत्रसंचालन प्रणिती कळमकर ,नागपूर आणि सुनीता तायडे ,अमरावती यांनी केले ..तर आभार प्रदर्शन विजया भांगे, अमरावती यांनी केले ...
नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती ,अकोला ,भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर , बुलढाणा, आणि वाशिम अशा विदर्भाच्या 11 ही जिल्ह्यांमधून सहभाग असलेल्या 63 कवयित्रींच्या सहभागाने विदर्भ स्तरीय ऑनलाईन कवी संमेलन नितांत उत्साहात संपन्न झाले. जीवनाचे सारेच भाव या विविध अंगी कवितांमधून साकारल्या गेले.जीवनाचे वास्तव ,व्यथा ,वेदना यांचा आलेख मांडणाऱ्या कवितांसह अनेक प्रश्नांची उत्तर देणारी काव्य कधी गंभीर करून गेले तर त्या गंभीर झालेल्या वातावरणात खसखस पिकविणाऱ्या विनोदी कवितांनी
कविसंमेलन सातत्याने उंचीवर नेले.विदर्भस्तरीय ऑनलाईन कविसंमेलन यशस्वी झाल्याचे समाधान सर्वांनाच लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा