हो, हो, मी तोच महाराष्ट्र जो संत महात्म्यांच्या आचार-वीचारांनी सजला आहे. होय ! मी तोच महाराष्ट्र बोलतो आहे. ज्यांच्यामुळे मी घडलो. माँ. जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी, माता रमाई, हिरकणी अशा कित्येक स्त्री विरांगना होऊन गेल्या त्यांच्यामुळे "महाराष्ट्र" ही माझी ओळख पडली. मला बोलायचंय तुम्हा सर्वांशी. कृपया ऐकून घ्या. अरे ! अरे ! काय हाल केलीये रे माझ्या शिवबाच्या महाराष्ट्राची?. काय महाराष्ट्र होता माझ्या शिवबाच्या काळात. घनदाट जंगले, सुंदर वनराई, सुरक्षित लेकीबाळी-स्त्रिया, माणसातली माणुसकी, सुख:, शांती, समाधान. माझ्या शिवबाच्या साम्राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मातील स्त्री जात सुखा:ने, गुण्या गोविंदाने नांदत होती. मायबापाला आपल्या लेकीबाळींची कसलीच चिंता नव्हती. कारण, त्या समस्त लेकीबाळींची काळजी वाहणारा एकटा माझा शिवबा होता रे.
पण, माझ्या शिवबानंतर आज माझ्या शिवबाच्या महाराष्ट्राची काय हाल केलीये तुम्ही. सांगा, आज याच महाराष्ट्रात मुली वा स्त्रीया स्वतंत्रपणे जगतायत का? कसलीच भीती न बाळगता त्या पोरीबाळी रात्री सात पर्यंत तरी घराबाहेर फिरू शकतात का? आहे याचं उत्तर. अरे, तुमच्याकडे कसं असेल उत्तर?. कारण, प्रश्नचिन्ह तुम्हीच तर निर्माण करता आहात. ना माता, ना भगिनी, ना दोन ते चार वर्षाची कोवळी चिमुरडी कोणीच सुरक्षित नाहीये आज. स्त्रीयांचा आदर तर तुम्हा लोकांना कदाचित माहितीच नसावा.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते,रमन्ते तत्र देवता: l
यत्रेतास्तु न पूज्यन्ते, सर्वास्तत्राफला: क्रिया: ll
स्त्री महती सांगणारा या श्लोकाचा किती गहण अर्थ आहे. माहितीये का. मग याप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही आचरण करता का? विचारा प्रश्न स्वतःला. अरे, आपण स्त्रीला लक्ष्मी स्वरूप मानतो. पण त्याच लक्ष्मी स्वरूप माता-भगिनींची तुम्ही काळजी घेता का?. रोज रोज बलात्कार होतायत. त्यांचा आकांत, आक्रोश ऐकायला येत नाही का?. आया-बहिणींची गय करा. त्यांचा सम्मान करा, त्यांचा आदर करा, त्यांना मान द्या. प्रत्येक स्त्रीला मान-सन्मानाने, ताठ मानेने जगू द्या. त्या नाजूक कळ्यांना उमलण्याआधी कुस्करू नका. वासनेच्या किळसवाण्या नजरेने कोणत्याच स्त्रीकडे बघु नका. कारण, जेव्हा स्त्री रडते तेव्हा माझा शिवबाही रडतो रे. त्या माता-भगिनींची हाल बघून.
अनंत कळा, यातना, वेदना, त्रास हसत सहन करुन ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्याच आईवरून तुम्ही गलिच्छ आणि जीव पिळवटून टाकणारी शिवीगाळ करता. अरे, कधी थांबवाल हे सगळं. तुम्हाला वाटत असेल की, एवढ्या रखरखत्या उन्हाळ्यात पाऊस का पडतोय?. अरे, तो पाऊस नाही. ते तर माझ्या शिवबाचे अश्रू आहेत. मेघ गर्जना करत माझा शिवबा ढसाढसा रडतोय रे.
तुम्ही थाटाममाटात माझ्या शिवबाची जयंती साजरी करता. पण, केवळ तो एकच दिवस तुम्ही माझ्या शिवबा राजाला स्मरता, माझ्या शिवबाची थोरवी गाता, विविध कार्यक्रम, सन्मान सोहळे सगळं कांही व्यवस्थित करता. पण, दुसऱ्या दिवसा पासून तुम्ही माझ्या शिवबा राजाचे सर्व विचार विसरता रे. नको अशी जयंती साजरी करू. जयंती साजरी करावयाचीच आहे तर मग असं प्रण घ्या. की, "मी छत्रपती शिवाजी महाराज यांना काळजातून मानतो. मी, त्यांच्या विचारांवर चालत राहीन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातील माता-भगिनींची मी सर्वतोपरी काळजी घेईन, स्त्री जातीचा सर्वोच्च मान ठेवीन, गोरगरीबांना मदत करीन, बलात्कार करणाऱ्यास कठोर शिक्षा देईन. मी माझ्या "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या संत-महात्मे यांच्या विचारांनी नटलेल्या, सजलेल्या महाराष्ट्राची मनापासून काळजी घेईन. मग बघा कसा खळखळून हसेल माझा शिवबा. लोकहो ! शिवबाने खुप दिलंय आपल्याला. त्याचं जतन करूया.
महाराष्ट्राला लाभलेली फार जुनी परंपरा, महाराष्ट्राला देणगी म्हणून मिळालेले थोर अशी संत-महात्मे, विविधतेने नटलेली, सजलेली महाराष्ट्राची संस्कृती, खानपान पद्धतीतील पुरणपोळीचा साज, वेशभुषेतील नऊवारीचा साज, विविध सणवार, अतिउच्च कोटीचा इतिहास, त्या इतिहासाच्या पाऊलखुणा, फार जुनी वटवृक्ष, पुरातन गड किल्ले, आपल्या शिवबाच्या महाराष्ट्राची शान "मायबोली मराठी". हे सगळं सौन्दर्य महाराष्ट्रात आहे. माझ्या शिवबाच्या मराठा, हिंदवी स्वराज्याची, साम्राज्याची भगवी पताका सदैव अशीच आसमंतात फडकत ठेवा.
लोकहो ! गोदावरी, भीमा, नर्मदा, कृष्णा या नद्या वाहताना सुद्धा "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे गीत गात वाहतात. आजही सह्याद्रीच्या कड्या-कपारी मधून, दऱ्या-खोऱ्यातून, काळ्या मातीतून, झाडे, वेली, पाने फुलातून एकच निनाद घुमतो. "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा".
जय महाराष्ट्र जय शिवराय !
जय महाराष्ट्र जय शिवराय !
सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे
देगलूर.जि.नांदेड. 9960028899
_________
थोरवी महाराष्ट्राची
धन्य जाहलो महाराष्ट्रात जन्मलो
सूर्याच्या तेजासम मी चमकलो
महाराष्ट्र म्हणजे आमुचा प्राण
महाराष्ट्र आमुची आन-बान-शान
महाराष्ट्र ही जन्मभूमी कर्मभूमी
प्राणाहून प्रिय महाराष्ट्राची धरणी
साज आपुल्या माय मराठीचा
आसमंती शोभे रंग भगव्याचा
गातो बलिदानाची शौर्य कथा
गातो विरांगनाची यशोगाथा
महाराष्ट्र आहे शिवराष्ट्र
महाराष्ट्र आहे संतांचे राष्ट्र
हिरवीशार वनराई, सह्याद्रीच्या
त्या कड्या-कपारी, भीमा,
नर्मदा, गोदावरी, सरस्वती
गातात महाराष्ट्राची गाणी
आसमंती घुमला निनाद
महाराष्ट्राला घालितो साद
जयघोष करितो मी
माझा महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र...!
सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे
देगलूर. जि. नांदेड 9960028899
_________
महाराष्ट्र माझा....!
1 मे 1960 रोजी
झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना
वसतो इथे छत्रपती शिवराया
महाराष्ट्राच्या तन-मना
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
महान योद्धे छत्रपती शिवाजी महाराज
करतात आजही महाराष्ट्रावर राज
छत्रपती शिवाजी महाराज,
गांधी, फुले, शाहु,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
टिळक, सावरकर ही रत्ने
महाराष्ट्राच्या मातीत जन्मली
चढूनी एक एक गड त्यांनी
इतिहासाची मुहूर्तमेढ रोवली
ना बाळगतो आम्ही भीती कुणाची
लेकरे आम्ही काळ्या धरणी माईची
सह्याद्री पर्वत रांगांमध्ये
सिंह गर्जतो
महाराष्ट्राचा मान-बहुमान
आजही शोभतो
जपतो आम्ही महाराष्ट्राची
जुनी परंपरा नि संस्कृती
नांदतात इथे आजही
धर्मनिरपेक्ष नातीगोती
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून,
दऱ्या-खोऱ्यातून, वाहणाऱ्या
नद्यांमधून, अथांग सागरातून,
गडगडणाऱ्या नभातुन
घुमतो एकच निनाद
जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा....!
समस्त महाराष्ट्र वासियांना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे
देगलूर. जि. नांदेड.9960028899


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा