समाज म्हणजे नेमकं काय—जन्माने उभ्या राहिलेल्या भिंतींचं जाळं, की विचारांनी जोडलेली माणसांची साखळी? माणूस मोठा त्याच्या जातीने ठरतो, की त्याच्या कर्माने? आणि जर श्रमच जीवनाचं सत्य असेल, तर मग काही हात पूजनीय आणि काही हात तुच्छ का मानले गेले?
अशा असंख्य प्रश्नांनी जेव्हा समाजाची शांतता भंगली, तेव्हा त्या प्रश्नांना केवळ उत्तर देणारा नव्हे, तर प्रश्न विचारण्याची हिंमत देणारा एक विचारवंत उभा राहिला— जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज
बाराव्या शतकात जन्मलेले लिंगायत धर्माचे आद्य गुरु महात्मा बसवेश्वर हे एक मान समाजसुधार, तत्त्वज्ञ, कवी, विचारांची एक जिवंत चळवळ होते. लोक त्यांना 'बसवण्णा 'या नावानेही ओळखत होते.त्यांनी समाजाला आरसा दाखवला—ज्यात माणूस स्वतःच्या कृतींचं, आपल्या विचारांचं आणि अन्यायाच्या साखळ्यांचं भान ठेवू शकतो. त्यांनी परंपरांच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या भेदांच्या भिंतींना तडा दिला, पण संघर्षाचा मार्ग द्वेषाचा नव्हता; तो होता समतेचा, संवादाचा आणि विवेकाचा होता.
‘कायकवे कैलास’ ही त्यांची संकल्पना म्हणजे श्रमाला दिलेलं सर्वोच्च स्थान होय. त्यांनी श्रमाला केवळ उपजीविकेचं साधन न मानता, तो जीवनाचा उत्सव आहे असं सांगितलं. त्यांच्या दृष्टीने हातावरची घट्टे ही लाजेची नव्हे, तर अभिमानाची खूण होती. माणूस त्याच्या कर्तृत्वाने मोठा ठरतो, जन्माने नव्हे—हा त्यांचा ठाम संदेश समाजाच्या अंतरंगात खोलवर पोहोचला.
बसवेश्वरांनी ‘अनुभव मंटप’ या माध्यमातून विचारांची लोकशाही उभी केली. येथे प्रत्येकाला—स्त्री असो वा पुरुष, शेतकरी असो वा विद्वान—आपले विचार मांडण्याचा समान अधिकार होता. ही केवळ एक सभा नव्हती, तर विचारांची मुक्त विद्यापीठ होती. त्या काळात स्त्रियांना दिलेला समान सन्मान आणि सहभाग हा एक क्रांतिकारी टप्पा होता. त्यांनी केवळ समतेचा पुरस्कार केला नाही, तर तो प्रत्यक्षात जगून दाखवला.
स्त्रियांच्या सन्मानासाठी बसवेश्वरांची भूमिका अत्यंत प्रगत होती. त्यांनी स्त्रियांना शिक्षण, स्वातंत्र्य आणि निर्णयक्षमता दिली. स्त्री ही केवळ कुटुंबापुरती मर्यादित नसून समाजाच्या परिवर्तनाची शक्ती आहे, हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. आंतरजातीय विवाहांना त्यांनी दिलेला पाठिंबा हा त्यांच्या समतावादी दृष्टिकोनाचा ठोस पुरावा आहे.
त्यांचे ‘वचन’ साहित्य हे त्यांच्या विचारांचे सजीव प्रतिबिंब आहे. साध्या, सहज आणि परिणामकारक भाषेत त्यांनी जीवनाचे गूढ उलगडले. त्यांच्या वचनांमध्ये नैतिकता, प्रामाणिकपणा आणि मानवतेचा सुगंध आहे. त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणार्या अंधश्रद्धा, कर्मकांड आणि ढोंगीपणावर प्रखर टीका केली. त्यांच्या मते, खरा धर्म म्हणजे माणुसकी—जिथे करुणा, सत्य आणि न्याय यांना सर्वोच्च स्थान आहे.
बसवेश्वरांचा विचार हा केवळ एका युगापुरता मर्यादित नाही. आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या उंबरठ्यावर उभे असलो, तरी समाजात भेदभाव, अन्याय आणि विषमता अजूनही दिसून येते. अशा वेळी बसवेश्वरांचा विचार पुन्हा स्मरणात आणण्याची नव्हे, तर आचरणात आणण्याची गरज आहे. त्यांनी दिलेला समतेचा संदेश, श्रमाचा गौरव आणि मानवतेचा मार्ग आजच्या समाजासाठी दिशादर्शक ठरतो.
त्यांचा विचार हा केवळ ग्रंथात बंदिस्त राहणारा नाही; तो जगण्याची दिशा देणारा आहे. प्रत्येक माणसाने आपल्या कृतीतून, आपल्या व्यवहारातून समता आणि माणुसकी जपली, तरच बसवेश्वरांचा खरा सन्मान होईल. समाज बदलण्याची सुरुवात ही नेहमी व्यक्तीपासून होते—ही जाणीव त्यांनी दिली.
महात्मा बसवेश्वर हे माणुसकीचा धर्म खर्या अर्थाने प्रकाशमान करणारे विचारदीप होते. त्यांच्या विचारांनी समाजाला केवळ दिशा दिली नाही, तर माणूस म्हणून जगण्याची खरी ओळख दिली. त्यांच्या शिकवणीचा स्वीकार करून आपण अधिक समतामूलक, न्याय्य आणि संवेदनशील समाज घडवू शकतो. त्यांच्या विचारांचा प्रकाश आपल्या आचरणात उतरवणं—हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
- मनिषा आनंदराव कांबळे
यवतमाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा