पुस्तकाचे नाव - झिब्रा
प्रकार - बालकादंबरी
लेखक - संजय ऐलवाड
प्रकाशन -संस्कृती प्रकाशन, पुणे
पृष्ठे - ८०
मुल्य - २५०
समीक्षक - प्रा. रामदास केदार
छोट्या गोष्टीतून आनंद शोधणारी संवादात्मक कादंबरी : झिब्रा
संजय ऐलवाड यांची झिब्रा कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली.या कादंबरीची नायिका झिब्रा ही लेखकाची मुलगी आहे.झिब्राने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे गोष्टीच्या रुपातून लेखक आणि लेखकाची पत्नी देत असते.गोष्टीतल्या उत्तरातून समाधान झाले तरच झिब्राला आनंद होतो. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधणारी ही झिब्रा नायिका आहे. बालसाहित्यात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.संजयच्या लेखनात नायिका ही मुलगीच आहे.ही नायिका कल्पनेच्या जगात वावरणारी नसून भोवतालच्या अस्तित्वांचे अंतरंग आणि बाह्यरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करते.झिब्राच्या मनातील भावविश्व टिपलेला आहे. ही कादंबरी म्हणजे एक दिवसाची दिनचर्या आहे. कादंबरीत एकूण चार पात्र आहेत. झिब्रा, झिब्राचे वडील स्वतः लेखक, लेखकाची पत्नी आणि झिब्राचा भाऊ दादू या भोवतीच ही कादंबरी फिरते आहे. झिब्रा ही संवादात्मक कादंबरी आहे.बाल साहित्यात संजय ऐलवाड यांची या अगोदर पर्यावरणाशी निगडीत "झिब्राच्या कथा" हा संग्रह प्रकाशित झाला आता तीच नायिका कादंबरी रूपातून साकारलेली आहे .कथेतून निसर्गाला साद घातली आता "झिब्रा" कादंबरीतून लेखकाने झिब्राच्या मुख्य भूमिकेतून घराला आणि जीवन उपयोगी व्यावहार ज्ञानाला साद घातलेली आहे. दिवसभराच्या दिनचर्येत झिब्रा आपल्या आई आणि वडिलास कल्पनेच्या पलीकडचे प्रश्न विचारते.योग्य उत्तर मिळेपर्यंत ती प्रश्नांचा सुचकपणे भडीमार करते. समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत ती थांबत नाही. हे तीचे वैशिष्ट्ये आहे. घरातल्या प्रत्येक वस्तूला ती आपलसं करुन त्यासी संवाद साधते. स्नान करताना साबणालाही बाळ समजून स्नान घालते आणि झोपी घालते. फुलांच्या कळ्या झोपीत असतात त्याला हात लावून उठवू नका असे आई बाबाला सांगते. झिब्रा प्रश्नच अचंबित करणारे विचारत असते. बाबा नारळाला बाळू होतो का रे? आई वनभोजन म्हणजे काय गं? सांग ना आई झाड म्हतारे होते का? विमान ढगांना फोडून वर जाते का? मुले पळवणारी टोळी म्हणजे काय गं? बाबा बाजार म्हणजे काय? आई अधिवास म्हणजे काय? बाबा बिबट्या गावाकडे कसे आला? पोटातल्या बाळाला आई खाऊ कसा घालते? भूत म्हणजे नेमके काय? बाबा, दिवसा उजेड आणि रात्री अंधार का होतो? अशा छोट्या छोट्या गोष्टीतून झिब्रा उत्तर काढून घेत असते.भाषेतील नऊ रसांचा पुरेपूर उपयोग कादंबरीत केलेला आहे. वाढत्या वयाची छोटी मुलगी म्हणजे झिब्रा आहे. मैत्रीपण जपणारी झिब्रा आहे. वर्गातल्या मैत्रणिचा डब्बा सांडतो तेंव्हा ती स्वतः चा देते. तर वनभोजन ही कल्पनाच मुळात खेड्यात रुजवली जाते.निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन जेवणाचा आस्वाद घेणे. हा आनंद वेगळाच असतो. घरातला टी. व्ही. लावला की चोरांची टोळी हा शब्द कानावर पडतो.त्याचक्षणी झिब्राच्या डोक्यात प्रश्न निर्माण होतात आणि तीला "टोळी" या शब्दाचा अर्थ गोष्ट सांगून सांगावा लागतो.बाजार ही संकल्पना समजावून सांगावे लागते.
झिब्रा माणसांच्या भावनेला ही हात घालू पाहते. माणूस हव्यासापोटी कुठल्या थराला पोहचेल हे सांगता येत नाही. जंगल तोडल्याने अन्न पाण्याचा शोध घेत बिबट्या शहरात आल्याची चर्चा होते. हे झिब्राला कळते तेंव्हा बिबट्या शहरात का आला याचे उत्तर लेखकाकडू जाणून घेण्यासाठी ती प्रयत्न करते. उत्तर ऐकून चक्रावते. झिब्रा क्षणात उत्तर देते ते उत्तर माणसांच्या मनावर घाव घालणारे आहे. जंगलतोडीमुळे मुक्या जीवांची कोलाहल कशी होते हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना का कळत नाही? त्या बिबट्याला बोलता येत नसले तरी त्याचे भाव का कळत नसावे? माणसांना याची दया का येत नसावी? झिब्रा बिबट्याला माणसाच्या रुपात पाहत होती.प्राण्यांवरचे प्रेम दिसून येते.झिब्रा संवेदनशील व चाणक्ष बुद्धी असलेली मुलगी आहे.संवेदनशील मन झिब्राला प्रश्न निर्माण करायला भाग पाडते. " नाळ " या शब्दाचा अर्थ ती जाणून घेते. पोटात वाढत असलेल्या बाळाची आणि आईची नाळ एकच असते म्हणून आईने खालेला खाऊ बाळालाही मिळतो ही कल्पना झिब्राला समजावून सांगते. जन्माचं तत्वज्ञान ती आपल्या आईकडून शिकते. आणि ती शिकत नाही तर ते ज्ञान इतरांनाही अवगत करून देते.कादंबरी रंजक आहे. "भूत" ही कल्पनाच आहे ते माणसांने आणलेली आहे. हे झिब्रा जाणून घेते. घड्याळीचा काटा बारावर गेला की माणसं वाढदिवस साजरा करतात. हा प्रश्न झिब्राला पडतो आणि झिब्रा लेखकाच्या हाताला धरुन घड्याळीचाच बारा वाजता वाढदिवस साजरा करते. ही भन्नाट कल्पनाच विचार करायला लावणारी आहे. झिब्रा ही मोकळ्या मनाची मुलगी आहे.विज्ञानाच्या रंजक गोष्टीही ती जाणून घेते.
झिब्रा आणि दादू हे बहीण भावाचे नाते. ती प्रेमाने दादुल्या म्हणते. त्याच्यासोबत ही हट्ट करत मैत्री जपत ती त्याला बोलकं करते. बालसाहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक भारत सासणे यांनी झिब्राची प्रस्तावना लिहून व प्रतीक काटे यांनी रंगीत चित्रे आणि संस्कृती प्रकाशनाची उत्तम निर्मिती ,बजरंग लिंभोरेची मांडणी असल्यामुळे कादंबरीची उंची खूप वाढवणारी आहे. बालसाहित्य वाड:मयात झिब्रा ही कादंबरी वेगळेपण मांडणारी आहे लेखकाच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा!
*प्रा.रामदास केदार*
(समीक्षक व पटकथा लेखक)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा