-- "किनारे सरकत आहेत" (गझलसंग्रह)-नंदकिशोर दामोधरे 'नंदा '--
डॉ.नंदकिशोर दामोधरे यांचा नवा करकरीत ९६गझलांचा गझलसंग्रह म्हणजे आंबेडकरी जाणिवांचा अक्षरप्रकाश "किनारे सरकत आहेत" या गझलसंग्रहाला सदिच्छा देते हा गझलसंग्रह पुर्ण महाराष्ट्राभर ख्यातनाम होवो हीच मंगलमय शुभेच्छा!!
नंदा यांनी मनोगत व्यक्त करताना लिहिले की माझी गझल सर्वसामान्य माणसाच्या उत्थानासाठी, त्यांच्या परिवर्तनासाठी, संविधानिक मार्गाने वाटचाल करणारी, बहुजन हिताय बहुजन सुखाय यास्तव जागर करणारी आहे असे त्यांना मनोमन वाटते.आणि एकदम खरे आहे गझलकार लिहितो....
फक्त लिहिले नाव संगर झोपडीवर
कैक झाले घाव नंतर झोपडीवर
कायद्याचे राज्य आहे बोलता मी
कैक आले धोंड कंकर झोपडीवर
या गझलेतून सामान्य माणसाच्या स्वाभिमानावर जो प्रहार केला गेला त्याबद्दल तळमळ व्यक्त करणारी आणि वास्तव जागर करणारी ही गझल आहे,हे दिसून येते.
नंदकिशोर दामोधरे यांचा जीवनप्रवास पाहिला तर ते पशु चिकित्सक अधिकारी होते सेवानिवृत्ती नंतर त्यांनी साहित्य क्षेत्रात उंच भरारी घेतली. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर आहेत.त्यानी गझल अनुभवली गझलेचे तंत्र अवगत केले.चिकित्सक दृष्टीने समाजाकडे बघून समाजात आजही पाळल्या जाणाऱ्या वर्ग संस्थाचा आपल्या समाजाला होत असलेला त्रास ,कायदा अस्तित्वात असूनही सामान्य माणसाला छळण्यात पाय मागे खेचणारे समाजकंटकांवर निळ्या शाईने नस दाबली आहे.त्यांच्यात असलेल्या प्रतिभेनी गझल लेखनास ते प्रवृत्त झाले. आणि एकापेक्षा एक अशा सरस गझल लिहिल्या. ते लिहितात....
मी भारतीय आहे इतकेच भान ठेवा
माझ्या शवाबरोबर हे संविधान ठेवा
माणूस धर्म व्हावा प्रत्येक माणसाचा
देशाप्रती हमेशा सच्चे इमान ठेवा
एकाच मायभूचे असणार लेकरे तर
व्यवहार आपसाचे मग समसमान ठेवा
( मी भारतीय आहे)
नंदा यांच्या गझलेमधून येणारी भाषा सर्वसामान्य माणसाची आहे.ते स्वतः कास्तकार आहे त्यांना शेतकरी जीवनातील अडचणी माहिती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न, नैसर्गिक आपत्ती शासनाने केलेले दुर्लक्ष.त्यानी आपल्या गझलेतून मांडतांना लिहितात...
अवकाळी पावसाने डोळ्यात झोप नाही
जागून बघ बळीसह ती रात माणसा तू
(राहू नकोस कुठल्या )
कापसाला पिकवणारा अर्धपोटी
चिरकुटाने झाकलेली लाज आहे
(मोजक्यांचे लादलेले)
तूर सोयाबीन गेले कापसाचे हाल झाले
पावसाने नाश केला शेतकीचे ताल झाले
(तूर सोयाबीन गेले )
पाहू कसा मजेने गोत्यात कास्तकारी
राहू असा सुखाने तोट्यात कास्तकारी
(पाहू कसा मजेने )
नंदा यांनी बरेच विषय हाताळले आहेत. सामाजिक कार्य करतांना त्यांना चळवळीचे काय हाल झाले.आपलेच लोक कसे फितूर झाले.इथे गझलकार वामनदादा कर्डक यांची प्रकर्षाने आठवण येते.
चळवळीचे काय हाल झाले. सत्तेला, घाबरून हतबल करण्याची ताकद चळवळीत आहे.पण स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी चळवळ मजबूत न होता फाटाफूट झाली आहे.जो दरारा होता तो कमकुवत झाला आहे याची जाणीव ठेवून नंदा लिहितात....
आज आम्ही हाल येथे काय केले चळवळीचे
दुश्मनाच्या पायरीवर पाय नेले चळवळीचे
(आज आम्ही )
नको झाड तोडू गड्या चळवळीचे
फळे चाखण्याची सबर का नसावी
(इथे भावनांची)
या जगात घेण्यासारखी कोणती अनमोल गोष्ट असेल तर ती आहे धम्म ज्ञान.बुध्द आणि धम्म वाचकाला पूर्णपणे समजू शकते इतकी सखोलता नंदा यांच्या गझलेमधून दिसते. बुध्द धम्मात आचरणाला महत्व आहे.आपले आचरण शुद्ध ठेवणे गरजेचेआहे.मानवी दुःखाचे कारण तृष्णा.जगात सर्वत्र भांडण होतात त्याचे महत्वाचे कारण म्हणजे तृष्णा होय.तृष्णेपायी मानवाला दुःख भोगावे लागतात.त्यासाठी बुध्दांनी मार्ग दाखविला आहे.
बुध्दाविषयी ते लिहितात.....
मी पंचशील आणिक अष्टांग मार्ग झालो
रस्ता अधोगतीचा धरला अजून नाही
(संघर्ष भाकरीचा)
युद्धास टाळणारा शांतीत नांदणारा
हा धम्म माणसाला ठेवी सुखात आहे
(वाणी तथागताची)
होतो कधी कफल्लक सांगू नका जगाला
धनवान धम्म दिधला सिध्दार्थ गौतमाने
(हृदयात बुद्ध असता)
बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्ण जग symbol of knowledge म्हणून ओळखतो. बाबासाहेब हे प्रखर देशभक्त होते.दुसऱ्या गोलमेज परिषद मध्ये गांधी व जिना यांना उद्देशून म्हणतात I am no workshiper of idols. I dislike them. I do not heat them. It is because I love India more.
व्यक्तीपेक्षा देश हा महान असतो आणि मी सर्वप्रथम माझ्या देशावर निस्सीम प्रेम करतो.
अशा प्रथमतः अंतिमतः भारतीय असणाऱ्या बाबासाहेबांवर आमचं खुप प्रेम आहे कारण We are because he was. बाबासाहेब आमच्या साठी काय आहे हे नंदा जागृतपणे जाणतात आणि बाबासाहेबावर लिहितांना मोठ्या आत्मविश्वासाने लेखणीला ज्ञानाने परजून लिहितात....
तुझ्या या सूर्य वाटेवर विचारांचा प्रवाहक मी
तुझ्या तत्वास जगणारा तुझ्या सम्यक प्रचारक मी
(तुझ्या या सूर्य वाटेवर )
केवढी ही जात जहरी भोवताली वाढली
आजही त्यांच्या जिव्हारी झोंबतो आंबेडकर
(आजही हृदयात आम्ही )
रक्तात भीम माझ्या श्वासात भीम आहे
प्रत्येक माणसाच्या घासात भीम आहे
(रक्तात भीम आहे)
'व्हेअर इज द भिडे वाडा' या लघुचित्रपटाचे नंदकिशोर दामोधरे निर्माते आहे.कलास्नेह फिल्म प्राॅडक्ट या संस्थेतर्फे निर्मिती केली आहे या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल त्यांना बाबुराव पेंटर पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यांचा लेखनाचा आवाका खूप मोठा आहे. त्यांची कविता साधी सोपी वाटली तरी त्याला लय आहे.विषयातही विविधता आहे.जीवनातील कटू अनुभव आहे.राजकीय संदर्भ आहे.समाजातील वृत्तीमुळे मनाला येणारी हतबलता आहे.मानवी प्रवृत्ती वरही लिहितात. जे वाट्याला आले आहे ते स्वीकारुन संघर्ष करुन स्वतःच स्वतःच्या वाटा शोधणे वाटा निर्माण करणे हे आंबेडकरी कार्यकर्त्यांचे वैशिष्ट्ये आहे.
या गझलसंग्रहाच्या माध्यमातून पद, प्रतिष्ठा किंवा पैसा कमावणे हा उद्देश निश्चितच नाही.पण आजपर्यंत एकीने लढणाऱ्या समाजाची सामाजिक, आर्थिक, राजनैतिक गुलामगिरी कडे होणारी वाटचाल थांबविने यासाठी आहे.
आंबेडकरी गझल क्षेत्रात मा.सिध्दार्थ भगत, प्रमोद वाळके,सुदाम सोनुले, प्रकाश बनसोड,संजय घरडे, हृदय चक्रधर, मसूद पटेल,प्रसेनजित गायकवाड,विद्यानंद हाडके, किरणकुमार मडावी,रमेश बुरबुरे, अशोक बुरबुरे, रोशन गजभिये, संदिप वाकोडे,एजाज शेख इ.अनेक गझलकार आपल्या मुशाफिरीने आंबेडकरी गझल लोकांच्या मनामनात पेटवत आहे.त्यात नंदकिशोर दामोधरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नंदा आपल्या मनोगतात लिहितात संग्रहात काही उणिवा असू शकतात याची मला जाणीव आहे.रसिक, वाचक स्नेहजनांनी यातील उणिवांची जाणीव करून द्यावी.
पुस्तक मुद्रित करतांना पुस्तकाचे पेपर दर्जेदार घ्यायला पाहिजे होता. दोन ओळी म्हणजे एक शेर त्या दोन ओळींमध्ये एक कविता सामावलेली असते.दोन ओळी नंतर व्यवस्थित स्पेस असायला हवी होती.स्पेस कमी असल्यामुळे गझल कविता सारखी वाटते.पुढील आवृत्तीत ही सुधारणा करावी.गझलसंग्रहात दोन चार रेखाटने टाकली असती तर वाचकांना चित्रांचा आनंद लुटता आला असता. अधिक टोकदार,अधिक दर्जेदार गझल करण्यासाठी सुक्ष्म निरीक्षण करणे आवश्यक आहे. माझ्या लहानशा बुद्धिला या मुद्रणाच्या उणिवा जाणवल्या त्या जाणीवेने मांडल्या.
पाठराखण सुदाम सोनुले यांनी केली आहे.ते म्हणतात "मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे.माणसाच्या अवतीभवती घडणाऱ्या घटना जर माणसाच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी अवरोध ठरत असतील तर त्यावर भाष्य करणे हे माणूस म्हणून
जगण्याऱ्या माणसाचे कर्तव्य आहे.विविध जाती, धर्माच्या समाजात माणसाच्या अस्तित्वाला नाकारले जात असेल त्याच्या स्वातंत्र्यावर बंधने लादली जात असतील तर त्याच्या विरोधात व्यक्त होणे गरजेचे आहे.नंदकिशोर दामोधरे यांचा किनारे सरकत आहेत.या गझलसंग्रहातील गझल याची प्रचिती देते.
प्रस्तावना मा.प्रमोद वाळके 'युगंधर' यांनी समर्पक शब्दांत केली आहे. प्रकाशक डिऑन पब्लिशिंग हाऊस नागपूर.मुखपृष्ठ भाऊ दांदडे यांनी त्यांच्या कुंचल्यातून सुंदर साकारलेले आहे. हा देखणा गझलसंग्रह आंबेडकरवादी गझलेचे आद्य गझलकार वामनदादा कर्डक यांच्या गझलेतील आंबेडकरी चळवळीच्या निष्ठावान व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना अर्पण केलेला आहे...गझल प्रांतात दमदार प्रवेश केला आहे. गगनचुंबी उंची गाठेल यात शंका नाही.
©️®️ रत्ना यशवंत मनवरे
अमरावती
मो.नं 7350592336
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा