बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

"किशोरावस्था" गरज त्यांना समजुन घेण्याची-सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे


    दहाव्या वर्गात शिकत असलेला रवी शाळेतून उशिरा रात्री साडेनऊ वाजता घरी आला. आणि रात्रीचे जेवण न करता त्याच्या खोलीत जाऊन मोबाईल पाहत बसला. आई जेवणासाठी त्याला बोलवायला गेली असता. आईला त्याच्या उशिजवळ झोपेच्या गोळ्या, सिगारेट, लायटर आढळले. आईने त्याला मोठ्या आवाजात विचारलं."हे काय आहे रवी"?. तो खाली मान घालून बसला. "अगं आई अभ्यासाचं खुप टेन्शन असतं. म्हणून याची गरज भासते. त्यात काय येवढं नवल. जा झोप तू". रागाच्या भरात आईने रवीला दोन फटके दिले. उलट उत्तर देत रवी आईला उंच व उर्मठ शब्दात बोलू लागला. सेकंदात रवीचे बाबाही खोलीत आले. सर्व सामान पाहताच त्यांचाही पारा चढला. त्यांनीही रवीला पट्यानी मारलं. तो केविलवाणा रडू लागला. 

      त्याची समजूत काढत आई त्याला जवळ घेत म्हणाली, "कुठल्या घाणेरड्या गोष्टींच्या, सवयींच्या आहारी गेलायस. अरे आम्ही काय कमी करतो तुला. म्हणेल ती गोष्ट तूझ्या हातावर असते. महागड्या शाळा, महागडी ट्युशन-क्लास, गाडी सगळं कांही मनासारखं असूनही कुठल्या नादाला लागला आहेस"?. आई बोलत असताना रवीच्या मित्रांचे फोनवर फोन व मेसेजस येऊ लागले. आईने त्याचा फोन बंद केला. फोन बंद करताच रवीला राग आला. आईचा हात झटकत तो आईबाबाला म्हणाला,"मला अक्कल शिकवू नका. मी लहान नाहीये. मी मोठा झालोय आता. मला सगळं कळतं". पुढे वाद वाढेल म्हणून आईवडील त्याच्या खोलीतून निघून गेले. दुसऱ्या दिवशी ट्युशन-क्लास, शाळा झाली. परत तोच प्रकार. रवीला समजावून सांगून आईवडील थकले. शेवटी त्याला समुपदेशनासाठी मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे न्यावे लागले. आता रवीच्या वागण्या बोलण्यात, अभ्यासात, सवयींमध्ये चांगला सकारात्मक फरक जाणवू लागला होता. आपलं मूल किशोरावस्थेत आहे. आता नैसर्गिकरित्या त्याच्याही कांही आवडीनिवडी असू शकतात. पण, मर्यादेची आणि संस्कारांची चौकट न ओलांडता आवड जोपासावी असं रवीच्या आईवडिलांना वाटत होतं. 


      "किशोरावस्था" म्हणजे अल्लड बालपण आणि प्रोढत्व यांच्यामध्ये सुमध्य साधणारा नैसर्गिक संक्रमाणाचा काळ असतो. या काळात किशोरवयीन मुलांमध्ये नैसर्गिकरित्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, लैंगिक बदल खुप वेगाने होत असतात. यामुळे आत्मविश्वास वाढतो, विश्वास बल वाढते, वैचारिक क्षमतेची उच्च पातळी वाढते, आत्मनिर्भरतेची जाण होते, समाजाबद्दलचे भान जपत व समजून घेत सामाजिक भावनिकता निर्माण होत असते. या अवस्थेला किशोरावस्था म्हणतात.

       किशोरावस्था ही अवस्था आपणा सर्वांच्याच आयुष्यातील खुप महत्वाचा व भरीव टप्पा असतो. या किशोरावस्थेत मुख्यत: शरीरात झपाट्याने वाढ होते. शरीरातील महत्वपूर्ण हार्मोन्सच्या वेगवान कार्यक्षमतेमुळे भावनिक, वैचारिक, लैंगिक, बौद्धिक परिपक्वता पक्की होत असते. किशोरावस्थेत बौद्धिक विकास वेगवान होत असतो. त्यामुळे या अवस्थेत वैचारिक क्षमतेची पातळी भरपूर प्रमाणात वाढत असते. आणि वैचारिक व बौद्धिक क्षमता वाढीस लागते. तसेच, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण कांही देणे लागतो. ही सह सामाजिक भावना वाढीस लागते. म्हणजे सामाजिक आत्मीयता निर्माण होते. यामुळे सामाजिक स्तरावरची कौशल्ये आणि नैतिक मूल्य चांगली विकसित होतात. 


       किशोरावस्थेत शरिरातील हार्मोन्सच्या बदलांमूळे शरीरात आणि मेंदूत खुप मोठ्या प्रमाणावर बदल घडत असतात. त्यामुळे या अवस्थेत किशोरवयींना योग्य मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक भेटणे फार गरजेचे असते. योग्य मार्गदर्शनाने मानसिक आणि बौद्धिक विकासात भर घातली जाते. किशोरावस्थेत भावनिक चढ-उतार खुप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. म्हणजे किशोरावस्था भावनिकतेचा अव्वल दर्जा गाठलेला असतो. या अवस्थेत भावनांची तीव्रता वाढते. प्रत्येक गोष्टींबद्दल विचार करताना भावना स्थिर नसतात. स्वतःसाठी काय चांगले काय वाईट यावर अगदीच सहजरित्या निर्णय घेतले जातात. एखादी व्यक्ती एखादी गोष्ट समजावून सांगताना त्या व्यक्तीचे म्हणने पटत नाही. त्या व्यक्तीच्या विचारांना व निर्णयांना सरळ सरळ डावलल्या जाते.  

       किशोरवयीन कुठल्याही गोष्टीचा खोलवर विचार न करता घाईगडबडीत त्याचे परीक्षण व निरीक्षण न करता निर्णय घेऊन मोकळे होतात. या वयात मुलांना घरातील वातावरणा पेक्षा बाहेरील वातावरण अधिकतर आवडते. मित्र-मैत्रिणींना वेळ देणे, त्यांना व त्यांच्या मतांना, विचारांना महत्व देणे. अशा किचकट किंवा गुंतागुंतीच्या गोष्टी तयार होतातच. त्यामुळे आपण मुलांवर ओरडतो, राग अनावर होत नाही तेव्हा मुलांवर हातही उचलला जातो. पण, मुलांच्या वैचारिक, भावनिक, बौद्धिक सर्व समस्या निट समजुन घेत त्यांना समजावून सांगणे खुप गरजेचे ठरते. अशावेळी त्यांना वैचारिक व भावनिक आधार व मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते. आईवडील आपल्या कामाच्या व्यापातून मुलांसाठी वेळ काढत त्यांच्याशी वेळोवेळी प्रत्येक गोष्टींवर चर्चा करत राहावी. 

     त्यांच्या आवडी निवडी, त्यांचा अभ्यास, त्यांचे ध्येय, त्यांची मन:स्थिती यावर मोकळे पणाने चर्चा करावीच. किशोरवयात मुलांना घरात खेळीमेळीच्या वातावरणाची अपेक्षा असते. म्हणून घरातील सर्व मोठ्या सदस्यांनी किशोरवयीन मुलांशी मित्रत्व या नात्याने संवाद साधने, आधी त्यांचे म्हणने पूर्णपणे ऐकून घेणे आणि मग त्यावर आपली प्रतिक्रिया देणे, आपला अंतिम निर्णय सांगणे वा दर्शविणे. त्यांची मते वा विचार चुकीची जरी असली तरी त्या मतांना व विचारांना न डावलता ते चुकीचे का आहे? हे शांतपणे समजावून सांगणे. मुले आपल्याशी बोलताना घरात सुरक्षित वातावरण निर्माण करणे. कारण हीच गोष्ट मुलांना अपेक्षित असते. मुलांच्या आवडीच्या गोष्टींना प्रथम प्राधान्य देत नेहमी त्यांना प्रोत्साहन देत रहावे. यामुळे मुलांच्याही मनात एखाद्या गोष्टीबद्दलची भीती वा न्युनगंड निर्माण होणार नाही. 



सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे 

देगलूर. Mo. 9960028899

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...