बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

ग्रामीण जीवनातील उपेक्षित जगण्याचा सटीक "वणवा" ग्रामीण कथासंग्रह.:विद्रोही कवी साहेबराव मोरे* ग्रामीण जीवनातील उपेक्षित जगण्याचा सटीक "वणवा" ग्रामीण कथासंग्रह.:विद्रोही कवी साहेबराव मोरे*

 


     "वणवा"  हा तात्याराव पवार यांचा तिसरा कथा संग्रह . अस्सल ग्रामीण मातीतील गावरान जीवनानुभवांचा धांडोळा घेणारा हा लघुकथा संग्रह आहे.  कथेतील पात्रे वास्तव वाटणारी आहेत. कल्पित वास्तवदर्शीपणा अजिबात जाणवत नाही. ग्रामीण, आदिवासी, शहरी, बहुजन वर्गातील अतिउपेक्षित वर्गाच्या वेदनेला वाचा फोडणारे लक्षवेधक लेखन अलीकडे होत आहे.

 पवार यांच्या कथा भावघन अशा सामाजिक मनाचे चित्रण करणा-या आहेत. 

यातील कथांपैकी "माणुसकी" ही शेवटची कथा. बसचालक व‌ वाहकाच्या नोकरीवरील कर्तव्यापेक्षा माणुसकीला प्राधान्य देते .वृद्ध विधवा सरुआईच्या दयनीयतेची ही गोष्ट. नोकरीची पर्वा न करता मध्यरात्री दोघांनी म्हाताऱ्या आईला आडवळणी वस्तीवर सोडून एक आदर्श जीवनपाठ ठेवला आहे. तर काहीच दुसरी एक कथा खास उल्लेख करावी असी आहे,ती कथा म्हणजे

"नात्यातील सोयरीक". ही कथा काळाच्या कसोटीवर टिकणे किती कठीण आहे हे  सांगते. या कथेचा आशय असा, 'राघुची लेक, सून म्हणून करायची हे बालपणापासून ठरलेले. भाचा सदू ल्युशी नामक जाॅबमेट सोबत लग्न करून विदेशात स्थायिक होतो‌, हे बहिण भावाला ऐनवेळी पत्राद्वारे समजते‌. अन् दोन्हींच्या स्वप्नातील संसारात अंधार पसरतो'. हा कथा विषय, निवेदन शैलीमुळे कथाकार आपले लक्ष वेधून घेतो, तर कथानकाच्या शेवटा' ची एक निश्चित दिशा कळण्यास मदत करतो.

या पुष्ठ्यर्थ  "वडाचं वावर", "कपाशीची शिपणी, " संकट टळले"  "पिक विमा"  इ. या कथा विचारार्थ घेता येतील. या संग्रहात एकुण तेरा लघु कथांतून खेड्यातील शेतीबाडीशी निगडित प्रश्न, संसार - गाड्याचा संघर्ष, नात्यातील विस्कळीत संबंधाचा स्वंतत्र, सर्वस्पर्शी विचारपरामर्श आलेला आहे. 

        "दरोडा पडला", कथेत किडलेल्या मानसिकतेचा नजरीया अधोरेखित होताना दिसतो आहे. सिताई आपल्या उपवर मुलीच्या लग्नाविषयी अस्वस्थ असते, म्हणून नव-याला सोयाबीन व कपाशी विक्रीसाठी शहरात पाठवते.

 इकडे शेतात एकुलती तारा ना-याच्या वासनांध नजरेस पडते. काळोख्या रात्री झोपडीतून मित्रांसोबत तिला ज्वारीच्या पिकात उचलून नेतो .अवचीत संकटाने सिता भाबांवते, आक्रोश करते. बैलं दावं तोडून मारेकऱ्यांवर हल्ला करतात. हल्ल्यात त्याला ठार करतात.बैलांच्या प्रसंगावधानामुळे ताराची इज्जत वाचते , दरोडा पडला, पण चोरी झाली नाही. असा मन सून्न करणारा शेवट कथालेखनातील सुंदर आविष्कारणाची  साक्ष‌ देतो.

            "संकट टळले" ही त्याच धाटणीची कथा.निसर्गचक्रातील पशु,पक्षी व‌ माणसातील सख्य अंकीत करणारी दमदार कथा.एक शेतकरी कुटुंब शेती कामाचे वेळी तान्हं बाळ झोळीत झाडाला टांगून काम करत असते. बाजूलाच बाभळीच्या झाडाला सुगरणीचे खोपे  लटकलेले असतात. अंड्यासाठी साप  जातांना नेमका झोळीवर‌ लटकतो.पक्षी चिवचिवाट करून वानरांना सूचित करतात. वानरं फांदी हलवून सापाला खाली पाडदतात.बाळ सुखरूप.बाळाचे आईबाप हे सर्व पाहून स्तंभित होतात.

      "पिक विमा" ही शासकीय भ्रष्टाचाराची वाभाडे काढणारी वास्तव कथा आहे.यात लेखकाने शेतकऱ्यांच कष्टप्रद जीवन ताकदीने मांडले आहे. 

"ढाक उन्हात जमीनी तापत पडल्या होत्या" ".शिवार संजीव झाल‌ं होतं" असे प्रभावी शब्द चित्रण चित्त वेधून घेते.अवकाळी पावसाने घरं पडली, पिकं वाहून गेली. पंचनामे झालेत मात्र खरे लाभार्थी वंचितच  राहिलेत,उलट  नुकसानीशी सूतराम संबंध नसलेल्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. इ. वाक्य योजना काळीजाचा ठाव घेतात.



         असीच "वडाचं वावर" ही कथा आई वडिलांना घराबाहेर काढणा-या नासक्या मनोवृत्तीला हाणलेली एक जबरदस्त चपराक आहे. ही कथा तर आजच्या भरकटलेल्या पिढीच प्रतिनिधित्वच करते.दोन्ही मुलांना धडा शिकवण्यासाठी आप्पा शेत व घर्, आपलं म्हणून सांभाळ करणा-या त्यांचेकडे सालगडी असलेल्या नामदेवच्या नावे  करून‌ देतात. वाचकांच्या मनातील शेवट हे या कथेचं वैशिष्ठ्य आहे. सर्वच कथा या मनोव्यापाराचे बारकावे, अलंकारिक भाषा, ग्रामीण शब्दांचा चपखल वापर, सामान्यांच्या दैनंदिन जीवनातील कथाबीजं असलेली लक्षणीय कथा आहेत. 

     तसीच "भग"  कथेत अंधश्रद्धेवर नेमके बोट ठेवून पोलीस प्रशासन सजग जागल्या च्या भूमिकेतून काम करत असते. तेव्हा मोठा अनर्थ, गुन्हा टळतो. याचे प्रभावी चित्रण अनुभवण्यासाठी "भंग" ही कथा वाचावी लागेल. तर

बळीराजा प्रसंगी जीव धोक्यात घालून मालकाचे उपकार फेडतो. ही कथा   काळीज‌ तुटणारी आहे.धन्याचा जीव वाचवणारी  बैलजोडी "कपाशीवर शिपणी" कथेत भेटते. कोसळत्या पावसात झाडाखाली थांबलेल्या जोडप्याला ढकलून वीजेच्या धक्क्यापासून वाचवतात . वीज कोसळून आंब्याच्ं झाड जळून राख होतं. एक बैल भाजला जातो. सामाजिक आशय, दैनंदिन व्यवहार,खेड्यातील जीवनमान,नात्यातील विस्कळीत होत चाललेले स्नेहबंध.एकंदर ग्रामीण भागातील सामाजिक वास्तवाचे भान देणा-या या सर्व कथा आहेत, या सर्व कथा समाज प्रवाहाला समृद्ध करतात.

          'सवसार', 'पागुंट', 'थपाथपा', 'चौथी लोक ', 'चाळसी', 'वाटवंन', 'झुंजरकांच' , असे लुप्त होत चाललेले अस्सल ग्रामीण शब्द योजनू लेखक वाचकरूची वाढवितो.

       "वणवा" ही शीर्षक कथा, जंगलातील साधनसंपत्तीवर उदरनिर्वाह करणारे गाव, ठेकेदार वेठीस धरतो.डिंक,तेंदूपान,मध, जडीबुटी वर आपला हक्क सांगतो. संपूर्ण गावातील लोक भूकेनं कासावीस होतात. उठावानंतर शासनाच्या मदतीने पुन्हा चूल पेटते. आणि पुढे अकस्मात वणवा पेटतो . जंगल बेचिरा‌ख होते.वणव्यात गावाच्या पोटापाण्याचा आधार भस्म होतो.

कथाकाराने वास्तव रेखाटणारी व्यक्तीचित्रणं उभी केली आहेत. सामाजिक आशय, केंद्रस्थानी असलेली कथानकं,साधी सरळ अभिव्यक्ती असलेला एक सशक्त कथा संग्रह वाचकांच्या सेवेत रुजू केला आहे.गाववाडा 'संस्कृती जपणारी माणसं' हा तात्याराव पवार यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्याच अनुषंगाने त्यांचा "वणवा"   हा मराठी ग्रामीण कथा संग्रह आहे.त्यांच्या लघुकथेतील भावनाविष्काराचा खोलपणा संग्रहाची उंची वाढविणारा आहे. 

 ग्रामीण जीवनातील उपेक्षितांच्या जगण्यातील "वणवा"  वाचकांना खचितच अंतर्मुख करणारा आहे. 

             डॉ. कोंडबा हटकर यांनी प्रस्तावनेतून वणवा शीर्षकावर उचीत विवेचन केले आहे. "वणवा" म्हणजे रौद्र रूप धारण केलेली आग . ही आग सामाजिक व्यवस्थेततील विषमतेची आहे. त्याची प्रतिकात्मक धग पवार यांनी कथालेखनातूंन‌ जीवंत ठेवली आहे. कथा संग्रहाचे वास्तवदर्शी,बोलके मुखपृष्ठ पुस्तकाचे आशयमूल्य दृगोचर करते.हातात कोयता,कमरेवर तान्हं बाळ,चेहऱ्यावर ओसंडून वाणारी , प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देणारी धमक असलेली आई .पार्श्वभूमीवर आगीचे लोट, जळणारा निवारा.संसार उद्ध्वस्त करणाऱ्या सर्व वृत्ती विरोधात सरसावलेली रणरागिणी. हे सारं जीवंत वाटते आहे. वास्तवाची सजीव साक्ष वाटते आहे.



        गाझियाबाद येथील समदर्शी प्रकाशनाने उत्कृष्ट छपाई असलेला संग्रह प्रकाशित केलेला आहे. शेवटी,ग्रामीण जीवनाचा पट ताकदीने उभा करणा-या या लेखनासाठी मित्र तात्याराव पवार यांना मनापासून शुभेच्छा देत़ो. !!! 



समीक्षण: विद्रोही कवी साहेबराव मोरे. 

शब्द संवाद.-: ९४०४०४८६०१.

वणवा - : कथासंग्रह.

कथाकार:-  तात्याराव पुंजाबा पवार.

प्रकाशन : समदर्शी प्रकाशन गाझियाबाद .

किंमत ₹१८०/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...