बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

नाताळ- प्रेम, करुणा आणि माणुसकीचा सण-मनिषा आनंदराव कांबळे





नाताळ (ख्रिसमस) हा दरवर्षी 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्मीयांसाठी हा अत्यंत पवित्र दिवस असला तरी नाताळाचा संदेश सर्व मानव जातीसाठी समान आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनातून प्रेम, अहिंसा आणि समानतेचा संदेश दिला .एकमेकांवर प्रेम करा हा त्यांचा संदेश आजही तितकाच अर्थपूर्ण आणि आवश्यक आहे. नाताळ सणांची मुळे करुणा, क्षमा, सेवा आणि त्याग या मूल्यांमध्ये रुजलेली आहेत .म्हणूनच नाताळ हा सण केवळ धार्मिक चौकटीत मर्यादित न राहता प्रेम ,शांती, करुणा आणि सोहार्द मांडणाऱ्या प्रत्येकासाठी सामाजिक आणि मानवी मूल्यांचा उत्सव बनतो. आणि धर्म, जात, पंत ,भाषा या भिंती पलीकडे जाऊन माणुसकीची नाते जपायला शिकवतो. त्या काळात सर्वत्र एक आनंदी वातावरण निर्माण होते. क्रिसमस ट्री सजवली जातात .घराघरात तारे लावले जातात .चर्चमध्ये प्रार्थना केली जाते .आणि लहान मुलां मध्ये आनंद, उत्सुकता निर्माण करणारे संताक्लॉज -भेटवस्तू देणे- घेणे, केक वाटणे, मिठाई बनवणे ,या सगळ्या गोष्टी नाताळचा आनंद द्विगुणीत करतात. येशू ख्रिस्ताचा जन्म हा इतिहासातील एक पवित्र क्षण आहे .गोठ्यात जन्मलेले बालक पुढे जगाला प्रेम, क्षमा, दया, शांती ,करुणा आणि त्यागाचा मार्ग दाखवते .आणि त्यांच्या विचाराने जगाची दिशा बदलते. त्यांनी दिलेली ही शिकवण आजही तितकीच जिवंत आहे. नाताळ आपल्याला शिकवतो की "खरे वैभव संपत्तीत नसून संवेदनशीलतेत तिथे आहे". भेटवस्तू देण्यापेक्षा मनापासून दिलेलं शब्द, थोडा वेळ ,आणि निखळ प्रेम ,अधिक मोलाचे असते.

*नाताळ कथेची उत्पत्ती*

या ग्रंथानुसार येशूचा जन्म बेथलेहेम मध्ये मेरी आणि योसेफ यांच्या पोटी झाला .ही घटना देवदूतानी सांगितली .आणि मेंढपाळ आणि ज्ञानी पुरुषांनी साक्षीदार म्हणून सांगितली. जन्म म्हणून प्रसिद्ध असलेली ही  कथा जगभरातील नाताळ उत्सवाचा पाया रचते

*नाताळ चा अर्थ*

ख्रिसमस म्हणजे-' ख्रिस्त - मास'. 

किंवा ' ख्रिस्ताचा मास ' याचा अर्थ ख्रिस्तासाठी केलेली विशेष प्रार्थना असा होतो.जो येशू ख्रिस्ताचा जन्माचा उत्सव आहे. तो जगाला प्रेम शांती आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी आला असे मानले जाते .म्हणूनच त्याला "देवाचा पुत्र "असे सुद्धा संबोधले जाते.

*येशू ख्रिस्तांचा जन्म*

नाताळ हा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा स्मरण करणारा वार्षिक सण आहे .जो 25 डिसेंबर रोजी जगातील अब्जावधी लोकांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. येशूचा जन्म जरी गोठ्यात झाला असला तरी त्याच्या विचारांनी जगाची दिशा बदलली. 



*नाताळाचे मूल्ये*

येशूंचा जन्म साजरा करणारा, ख्रिश्चन परंपरेने नाताळ  हा सण प्रेम, आशा ,करुणा, मुक्ती या विषयांनी भरला आहे .जन्म कथेची सुरुवात गोठ्यात होती ज्यात नम्रता आणि जीवनाचे पावित्र्य या  सारख्या मूल्यावर भर देण्यात आला.

*मानवी संबंधाचा उत्सव*

अनेकांसाठी हे कुटुंब आणि मित्रांची जोडण्याच्या ,उत्सवाचा, परंपरांचा आनंद आणि ऋतूतील उबदार वातावरणाचा आनंद 

घेण्याची संधी आहे .सजावट, संगीत आणि सामायिक जेवनाचे आकर्षण ,धार्मिक सीमा ओलांडते. त्यामुळे नाताळ मानवी संबंधाचा उत्सव बनतो.

*नाताळ चे महत्व*

आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात माणूस एकाकी होत चालला आहे. अशा वेळी स्वतःकडे पाहायला आणि नात्यांना वेळ दयायला आणि संवेदनशील व्हायला नाताळ आपल्याला शिकवतो. "असण्यापेक्षा होणे महत्त्वाचे आहे".

*प्रेमाचा संदेश*

जगाला दिलेल्या मूल्या पैकीं प्रेम हा सर्वात मोठा संदेश आहे. आचरणात आणणे जरी कठीण असले तरीही नाताळ आपल्याला प्रेमाची जपवणूक करायला शिकवते" प्रेमाने जग जिंकता येते". असं म्हणतात ते उगीचच नव्हे.

*शांततेचा संदेश*

नाताळची शांतता केवळ चर्च, प्रार्थनागृहात मर्यादित न राहता ती समाजात, घराघरात ,नात्यात आणि प्रत्येकाच्या मनात पोहोचली पाहिजे .कारण आपले अंतकरण शांत असेल तरच बाह्य जग शांत होते.

*करुणा आणि सेवाभाव*

करूणा हीच खरी पूजा आहे. आणि सेवाभाव हाच खरा उत्सव आहे. भेटवस्तूपेक्षा गरजूसाठी उघडलेले मन अधिक मौल्यवान असते .भुकेलेला अन्न, गरजूंना कपडे , दुःखी माणसाला औषधे, हेच खरे उपहार आहे.

*नाताळ आणि सामाजिक  समरसता*

नाताळ हा कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नाही .तर तो जात ,धर्म ,पंथ ,भाषा ,वर्ग या पलीकडे जाऊन एकमेकांना स्वीकारण्याचा ,समजून घेण्याचा, सण आहे .तो माणसाला- माणसाची जोडणारा उत्सव आहे.


*एक संकल्प*

या नाताळ सणाला आपण एक संकल्प करूया अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा, आतला माणूस जागा करण्याचा, मदतीचा हात देण्याचा, मतभेद असूनही माणुसकी जपण्याचा, प्रेमाचा दिवा हृदयात लावण्याचा. 

"नाताळच्या शुभदिनी एकप्रार्थना

हृदयातला सांताक्लॉज जागवू दे 

दया, क्षमा, प्रेम ,शांति ,करुणेचा 

उगम माणसाच्या मनात उगवू  दे"

                                     आमेन


नाताळा हा एक दिवस नसून एक विचार आहे. प्रेमाचा ,करुणेचा आणि शांततेचा. जेव्हा आपल्या मनात माणुसकीचा जन्म होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने नाताळ साजरा होतो.


 शुभ नाताळ...




मनिषा आनंदराव कांबळे

Yawatmal

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...