सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

दुःखमुक्तीचे केंद्र-झानंभूमी 'मैत्रेय मेडिकल मेडिटेशन सेंटर'

 


महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चापर्डा येथे 'मैत्रेय मेडिकल मेडिटेशन सेंटर' आहे. या सेंटरद्वारे संचालित झानंभूमी हे एक भव्य आणि दिव्य मेडिटेशन केंद्र भंते मित्रबोधी डॉ. अशोक यांच्या अथक परिश्रमातून उदयास आले आहे. निसर्गाच्या कुशीत, चक्रवती नदीच्या काठावर वसलेले हे केंद्र डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.

येथे दर शनिवार ते बुधवार पाच दिवसांचे सक्रिय ध्यानसाधना आणि रोगमुक्ती शिबिर आयोजित केले जाते. यामध्ये दहा वर्षांवरील मुला-मुलींपासून ते स्त्री-पुरुषांपर्यंत कोणीही सहभागी होऊ शकते. हे पाच दिवसांचे शिबिर व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे बदलवते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



भंते मित्रबोधी डॉ. अशोक यांनी चाळीस वर्षांच्या अभ्यास, परिश्रम आणि कल्पकतेतून या केंद्राची निर्मिती केली आहे. त्यांनी आपले ऐषारामी जीवन आणि संपत्तीचा त्याग करून संपूर्ण आयुष्य आणि जमापुंजी झानंभूमीसाठी अर्पण केली. हे एक अद्भुत मॉनेस्ट्री आहे, जे चिकित्सक आणि विज्ञानावर आधारित आहे. ही वास्तू केवळ एक इमारत नसून शुद्ध प्राणवायू, मनाची शांती आणि सकारात्मकतेचे ऊर्जाकेंद्र आहे. हे शारीरिक आणि मानसिक दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग असून, 'माईंड, बॉडी, बॅलेंसिंग' साधना शिकवते. 

'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वावर आधारित ही भूमी समता, मानवता, एकात्मता आणि उदारतेचा संदेश देते. ही भूमी सर्व धर्मांसाठी खुली आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध, गुरुनानक, भगवान महावीर, प्रभू येशू, महंमद पैगंबर, संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक महामानवांनी जगाला दिलेली दया, क्षमा, शांती, प्रेम, मैत्री, करुणा आणि समता या मूल्यांचे पालन करणारी ही जागा आहे.



'झानंभूमी' हा शब्द प्राचीन पाली भाषेतील आहे; 'झानं म्हणजे ध्यान (समाधी) आणि 'भूमी' म्हणजे जागा. झांनभूमी ही ध्यानसाधनेची एक पवित्र जागा आहे. हे केवळ धार्मिक स्थळ किंवा ध्यान केंद्र नसून, समाज परिवर्तनाची एक मोठी चळवळ आहे. तथागत बुद्धांच्या ज्ञान आणि विज्ञान तत्त्वज्ञानावर आधारित हे केंद्र मानसिक शांती, आत्मसंयम आणि करुणामय जीवन जगण्याचा मार्ग दाखवते.

बुद्धांच्या काळापासून भिक्खू ध्यानासाठी स्वतंत्र विहार,    गुंफा किंवा जंगलाचा वापर करत असत. त्याच परंपरेवर आधारित भंते मित्रबोधी डॉ. अशोक यांनी 'मैत्रेय मेडिकल मेडिटेशन सेंटर'ची स्थापना केली. येथे ध्यानसाधनेसोबतच वैद्यकीय शास्त्राचे मार्गदर्शनही दिले जाते, जेणेकरून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा सुंदर समतोल साधला जाईल. वैद्यकीय शास्त्र आणि ध्यानसाधना यांच्या समन्वयातून मनुष्य केवळ स्वतःच्या दु:खातूनच नाही, तर समाजासाठीही एक करुणामय दीपस्तंभ ठरू शकतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. हिरवीगार झाडे, शांत आणि प्रसन्न अल्हाददायक वातावरण तसेच निर्मळ व शुद्ध हवा यामुळे झानंभूमी ध्यानसाधनेसाठी एक आदर्श जागा आहे.



डॉ. भंते मित्रबोधी अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान करणे म्हणजे सुखाची पर्वणीच आहे. ध्यान एक अशी साधना आहे जी माणसाला बाहेरील जग, गर्दी, आवाज, मोह-माया, लोभ आणि भीतीपासून मुक्त करून त्याच्या आतील शांतीशी जोडते. ध्यान म्हणजे अंतर्मनाची ती पवित्र अवस्था, जिथे साधक आपल्या स्वतःच्या चेतनेशी एकरूप होतो आणि बाह्य दुःखाला जागा राहत नाही.

तथागत भगवान बुद्धांच्या चार आर्यसत्यांपैकी पहिले आर्यसत्य आहे की, 'सर्व जग दुःखमय आहे.' मानवी जीवनात दुःख ही एक सार्वत्रिक गोष्ट आहे. दुःखाचे मूळ कारण तृष्णा आहे आणि त्यावर मात करण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग . बुद्धांनी दुःखाच्या निर्मूलनासाठी जो मार्ग दाखवला, त्यातील एक मुख्य साधन म्हणजे ध्यान. ध्यान हे आत्मशांती, आत्मज्ञान आणि दुःखमुक्तीच्या दिशेने जाणारा मार्ग आहे.मनुष्य आनंदाच्या शोधात सतत धावत असतो. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात सुख, समाधान, शांती आणि प्रेम अनुभवू इच्छितो, परंतु ज्या प्रमाणात माणूस सुख शोधतो, त्याच प्रमाणात त्याला दुःखही अनुभवावे लागते—कधी शारीरिक, कधी मानसिक, कधी सामाजिक तर कधी बौद्धिक पातळीवर. संपूर्ण मानवजातीला भेडसावणारे दुःख, तणाव, असुरक्षितता आणि नैराश्य यावर बुद्धांनी एकच प्रभावी उपाय सांगितला, तो म्हणजे धम्म आणि ध्यानसाधना.

आधुनिक जगात विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत असले, तरी मानसिक शांतीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. स्पर्धा, नोकरीतील ताण आणि नात्यांमधील तणावामुळे मानसिक आजार वाढत आहेत. अशा परिस्थितीत काही दूरदृष्टी असलेले व्यक्ती विज्ञान आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडवून आणतात. यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे भंते मित्रबोधी डॉ. अशोक. ते व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी डॉक्टर आणि प्राध्यापक असूनही, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बौद्ध साधना आणि धम्म प्रसाराला वाहिले आहे. भिक्खू जीवनशैली स्वीकारून त्यांनी वैद्यकीय शास्त्र आणि बौद्ध साधना यांचा सेतू बांधला आहे. बुद्धांचा धम्म आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम घडवून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'प्रबुद्ध भारता'चे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत अाहेत. जगातील सर्व मनुष्यांना सुखी, समृद्ध आणि प्रबुद्ध बनवणे ही त्यांची मनीषा आहे.ध्यानाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की, 'ध्यानातून ज्ञान होते, ज्ञानातून अतिक्रमण होते, अतिक्रमणामुळे रूपांतर होते, आणि या रूपांतरणामुळे मनुष्य पशुतुल्य जीवनातून मुक्त होतो.त्याच्यातील माणूस जागा होतो आणि तो सर्व दुःखातून मुक्त होतो.' या ज्ञानातून मनुष्य सुखी, शीलवान, सदाचारी, समृद्ध, सामर्थ्यवान आणि प्रबुद्ध बनू शकतो. कारण प्रबुद्ध माणूस चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटे बोलत नाही किंवा दारू-गुटखा-तंबाखूचे सेवन करत नाही. यामुळे तो एक सुखी आणि आदर्श जीवन जगू शकतो.

जगातील सर्व लोकांना सुखी, समृद्ध, प्रबुद्ध आणि संपन्न बनवण्यासाठीच झांनभूमीची निर्मिती झाली आहे. तथागत भगवान बुद्धांनी सांगितले होते की, 'माझी कोणीही पूजा करू नये किंवा प्रार्थना करू नये. ध्यान करावे, ज्ञान प्राप्त करावे आणि दुःखी, कष्टी, हीन-दीन लोकांची सेवा करावी. हीच माझी खरी पूजा आहे.' जर आपण बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चाललो, तर या पृथ्वीवरील सर्व लोक सुखी आणि प्रबुद्ध होऊ शकतात. 

आज प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाच्या जाळ्यात आणि 'माझी गाडी, घोडी, माडी' यामध्ये मग्न आहे. त्याचे स्वतःकडे, कुटुंबाकडे किंवा इतर कुणाकडेही लक्ष नाही. या सामाजिक परिस्थितीचे चित्र समोर ठेवून, बुद्धांची करुणा, मैत्री आणि दया हृदयात जागवून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुखी आणि सुदृढ भारताचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून,भंते मित्र बोधी डॉ. अशोक यांनी आपले वैद्यकीय ज्ञान समाजासाठी वापरण्याचे ठरवले. त्याला त्यांनी धम्माची जोड दिली. परिणामी, आज झानंभूमी हजारो लोकांसाठी मानसिक शांती, आध्यात्मिक विकास आणि सामाजिक जागृतीचे केंद्र बनले आहे. आपल्या प्रभावी वाणीतून ते ध्यान आणि त्याचे महत्त्व समजावून सांगतात. ते म्हणतात की, 'फक्त डोळे मिटून बसणे म्हणजे ध्यान नव्हे, तर आपल्यातील बोधीचक्षू जागृत करून स्वतःच्या चेतनेशी एकरूप होणे म्हणजे ध्यान होय.' यथार्थ ज्ञान दर्शन म्हणजे बोधी प्राप्त होणे. साक्षीभाव नेहमी जागृत ठेवणे हे सर्व ध्यानातून प्राप्त होते. ज्ञानामुळे जीवनातील अज्ञान आणि अंधार दूर होतो.

त्यांच्या चाळीस वर्षांच्या अभ्यासातून विकसित केलेली सक्रिय ध्यानसाधना, योग आणि प्रवचन या पाच दिवसांमध्ये साधकाचे आंतरिक आणि बाह्य जीवन पूर्णपणे बदलून टाकतात. झानंभूमीमध्ये येणार्‍या साधकांना शांती, स्थिरता आणि आत्मविश्वास मिळतो. येथे येणारा प्रत्येकजण सर्व दुःखातून मुक्त होईल, कारण दुःखमुक्ती हेच झानंभूमीचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी भंते मित्रबोधी डॉ. अशोक लोकांना आवाहन करतात की त्यांनी येथे यावे. ही भूमी सर्वांसाठी खुली आहे. ध्यान करावे, ज्ञानाला आत्मसात करावे आणि सुंदर जीवन जगावे. कारण प्रत्येक मनुष्याला स्वस्थ, सुंदर, सुदृढ आणि समृद्ध जीवन जगण्याचा अधिकार आहे.

या पाच दिवसांत कसे वागावे, कसे जगावे याचे ज्ञान मिळते. येथे प्रत्येक गोष्टीचे 'मेडिटेशन' शिकवले जाते—उदाहरणार्थ, चहा पिणे, जेवण करणे, पाणी पिणे, बसणे, झोपणे, चालणे, उठणे इत्यादी सर्व गोष्टी शास्त्रीय पद्धतीने कशा कराव्यात हे शिकवले जाते. योगाद्वारे शरीर आणि मनातील तणाव दूर केला जातो. विविध प्रकारची 'अत्तदीप भव' साधना शिकवली जाते. सक्रिय ध्यानसाधनेद्वारे मन आणि शरीराचा समतोल साधला जातो. प्रवचनातून मनातील संभ्रम, अज्ञान आणि दुःख दूर होण्यास मदत मिळते.

शरीर, मन, विचार आणि भावना यांच्या असंतुलनामुळे असंख्य आजार निर्माण होतात, हे आपल्याला ध्यानातून समजते. ध्यान केल्याने अज्ञान दूर होते आणि आपल्याला सजगतेची व सत्याची जाणीव होते. त्यामुळे आपण संतुलन साधू शकतो. ध्यानातून ज्ञान होते, आणि ज्ञानातून मैत्री, समता, बंधुता, न्यायपूर्ण अवस्था येते. ध्यानातून 'सम्यक दृष्टी' प्राप्त होऊन स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याची करुणामय दृष्टी निर्माण होते. हृदयात प्रेम आणि मैत्रीची भावना निर्माण होते आणि मनुष्याला जागृत अवस्था प्राप्त होते. या जागृत अवस्थेमुळे त्याला दुःखमुक्त होण्यास मदत मिळते.

जेव्हा मनुष्य ध्यान करतो आणि ध्यान कसे करावे हे त्याला समजते, तेव्हा त्याला आंतरिक समज प्राप्त होते. त्यातून तो आपले आंतरिक आणि बाह्य जीवन सुखी-समृद्ध करू शकतो. शरीराचे आणि मनाचे संतुलन साधले जाते, आतील भेदभाव नष्ट होतो आणि एक स्वस्थ शरीर व मन तयार होते. मनाला सुख, शांती आणि आनंद प्राप्त होतो व मनुष्य दुःखमुक्त होतो. ध्यानातून करुणा जागृत होते आणि करुणेतून प्रबुद्ध समाज निर्माण होतो.

ध्यानाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की, ध्यान हे मानवी जीवनाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैज्ञानिक भाग आहे. ते दुःखमुक्तीची गुरुकिल्ली आहे. आधुनिक जगातील तणावग्रस्त जीवनशैलीसाठी ध्यान हा सर्वोत्तम उपाय आहे. नियमित ध्यानधारणेमुळे अनेक फायदे होतात: मन शुद्ध आणि शांत होते, तणाव कमी होतो, लोभ, राग, मोह, हिंसा आणि मत्सर नष्ट होतात. करुणा, शांती आणि समाधान वाढते, तसेच सर्व जीवजंतू व प्राणीमात्रांप्रति प्रेमभाव विकसित होतो. 

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'मीच दुःखाचा निर्माता आहे आणि मीच त्यावर उपाय करू शकतो', याची जाणीव होते. त्यामुळे खर्‍या अर्थाने दुःखमुक्ती प्राप्त होते. जेव्हा मन्ाुष्य स्वतःकडे पाहतो, तेव्हा त्याला कळते की दुःखाचे मूळ त्याच्या मनात आहे आणि मनाला नियंत्रित केल्यास दुःख नाहीसे होते. म्हणूनच, असे म्हणता येईल की ध्यान हेच खरे औषध आहे आणि झानंभूमीमध्येच खरी दुःखमुक्ती दडलेली आहे. 



- मनीषा आनंदराव कांबळे, 

यवतमाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...