आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक ,समीक्षक, कवी, 'जागल', 'मी उजेडाच्या दिशेने निघालो' 'पिंपळ व्हायचंय मला' या कवितासंग्रहाने प्रसिद्धीरूपास आलेले मा. अरूण विघ्ने सरांची भेट संबोधी सभागृह भीमटेकडी अमरावती येथे पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने झाली. तेव्हा त्यांनी त्यांचा गझलसंग्रह ‘नभाला भिडावे निळ्या पाखरांनी’ भेट दिला.
सरांचा हा पहिलाच गझलसंग्रह असला तरी, या आधी ‘ पक्षी ‘, ‘ वादळातील दीपस्तंभ ‘, ‘ जागल ‘ ‘ मी उजेडाच्या दिशेने निघालो ‘, आणि ‘ पिंपळ व्हायचंय मला ‘ या द्वारे ते सर्वदूर परिचित आणि सुप्रसिद्ध आहेत.
त्यांची प्रत्येक कलाकृती बुद्ध, आंबेडकर विचारांशी जुळलेली असते आणि ‘नभाला भिडावे निळ्या पाखरांनी ‘ हा गझलसंग्रह त्याला अपवाद नाही.
पहिल्याच शिर्षक गझलेत ते लिहीतात
‘उपाशी रहा पण पुरेसे शिकावे
समजदार व्हावे निळ्या पाखरांनी’
शिक्षणाचे महत्त्व विषद करणारा हा शेर खरोखरीच बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारा आहे.
शिक्षणाविषयीचे महत्त्व सांगणारे हे शेर पहा..
‘घेऊन पेन हाती शोधून वाट घे तू
येतो प्रकाश भावा लावू नकोस दारे’.
ज्ञानरुपी प्रकाश हवा असेल तर शिक्षणाचे दार बंद करू नये असा सल्ला ते देतात.
‘सोडून दंगलीला हातात लेखणी घ्या
अज्ञान वागण्याने होतो बवाल आहे’.
शिक्षण घेतलेले हात दंगलीसारख्या गोष्टी करीत नाहीत,अशा वागण्याने फक्त ‘बवाल’ होतो ‘हासील’ काहीच होत नाही. हे त्यांनी मो'्या खुबीने येथे सांगितले आहे.
शहर आणि खेडे यामधील तफावत सर्वश्रुत आहे,कोठे शहरातील सोई सुविधा, झगमगाट, प्रगती आणि को'े गावातील असुविधा, दारिद्रय मागासलेपण.परंतु शहरे गावाच्या भरवशावर उभी आहे हे सत्य सांगतांना लिहितात,
‘चवदार माल पाणी खाऊन गावकीचा
फुगले शहर किती हे,खेडे बकाल आहे’.
गझलकार जरी पेशाने शिक्षक होते पण हाडाने शेतकरी कुटुंबातील आहेत, गाव-खेड्यात राहणारे असल्यामुळे शेतीवर त्यांचे निस्सीम प्रेम आहे .म्हणून शेतकर्यांची कैफियत मांडताना ते लिहितात
‘ मज भेटणार नाही ती चाकरी न भेटो
आहे सुपीक शेती थोडी मला कसू दे’.
‘माती महान आहे’ या गझलेत बळीराजाच्या दुष्काळाच्या दृष्टचक्राबद्ल ते लिहितात
‘ओला सुका तसाही दुष्काळ नित्य येतो
वाट्यास त्या बळीच्या तोटाच दान आहे’.
शेती कधी फायद्याची होत नाही हे निर्दय सत्य ते या शेरात मांडतात
‘शेतीप्रधान देशा तू भाषणात असतो
प्रत्यक्ष मात्र येथे शेती जुगार आहे.’
लोकशाहीत संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, नव्हे तो लोकशाहीचा आत्मा आहे. हे गझलकार जाणून आहेत. लोकशाही आणि संविधान यावरील एकाहून एक सरस शेर यात आहेत.
‘लोकशाही’ या गझलेत ते लिहितात,
‘जोवर असेल घटना तोवर असेल ग्वाही
देशात फक्त माझ्या नांदेल लोकशाही’.
त्याच अर्थाचा हा शेर..
‘जोवर असेल घटना नांदेल लोकशाही
समजू नये कुणीही मोकाट रान आहे’.
लोकप्रतिनिधीचे कार्य काय आहे, ते या शेरात सांगतात
‘समजून लोकसेवक जनतेस न्याय द्यावा
रुजवू नका कदापी देशात बादशाही.’
लोकशाहीत मतदार हा खरा राजा असतो त्यामुळे लोकशाही,संविधान टिकवून ठेवणे ही त्याचीही जबाबदारी आहे.
खालील शेरात ते लिहितात
‘हे संविधान अपुले रक्षा करू तयाची
एकेक पान त्याचे तर मुल्यवान आहे.’
तथागतांचे तत्वज्ञान सांगणारे शेर संग्रहाच्या पानोपानी सापडतात काही शेर पहा-
‘आजन्म धम्मतत्वे पेरू तथागताची
केव्हाच वेदनेचे पिकणार शेत नाही.’
दुखःमुक्तीवर धम्मतत्वे पाळणे हा एकमेव उपाय आहे .हेच यामधे ते विषद करतात.धम्माने काय दिले तर पाखंड, अवडंबर या पासून उपासकांना दूर नेले.
‘देऊन धम्मदीक्षा पाखंड मुक्त केले
आचार शुध्द झाले जीवन खुशाल झाले’.
धम्माचा मार्ग कोणी दाखवला हे या शेरात सांगतांना दिसतात,
‘धम्मामुळे मलीनता बर्फापरी वितळली
भीमा तुझ्यामुळे हा झाला सुधार सारा.’
पूर्ण संग्रहात बाबासाहेबांच्या विचारांचे बोट गझलकाराने कुठेही सुटलेले दिसत नाही. ‘रथ चळवळीचा’ या गझलेमधे ते लिहितात
‘ भीमास वाचतांना त्यागास जाणतो मी
अंगी विचार त्यांचे सारेच बाणतो मी.’
‘ कवितेत मावणारा नाही विषय जरीही
शब्दात बांधतांना मो'ाच माणतो मी.’
बाबासाहेबांचे आपल्या जीवनातील स्थान ते या शेरात व्यक्त करतात,
‘माय माझी रमा बाप माझा भिवा
कार्य त्यांचे तुम्ही जाणले पाहिजे.'
या द्वारे तमाम आंबेडकरी जनतेची भावनाच वरील शेरात व्यक्त करतांना आढळतात.
अशा या अनेक वैचारिक विषयांवर भाष्य करणार्या शेरांनी नटलेल्या या गझला अरूण विघ्ने सरांच्या प्रखर आंबेडकरवादी
वैचारिकता,व अभ्यासूवृत्तीची साक्ष देतात.वयाची पासष्ट वर्षे पुर्ण केल्यावरही,व पाच कवितासंग्रह प्रकाशित होऊन एकुण चवदा पुरस्कार प्राप्त केल्यावर सुध्दा गझल शिकून गझलसंग्रह काढण्याची जिज्ञासा दाखवणे यासा'ी त्यांना सलाम करावासा वाटतो.
शेतकरी, कामगार, शोषित, सामान्य माणसांच्या प्रश्नांना थेट भिडणारे शेर,गझला, पाखंडमुक्ती अंधश्रद्धा विरोधी भूमिका, विज्ञाननिष्ठता बाळगणारे शेर, लोकशाहीवादी भूमिका घेणारे लिखाण पुस्तकात जागोजागी आढळते त्यामुळेच सरांच्या गझला प्रखर आंबेडकरी गझला सिद्ध होतात.
प्रख्यात गझलकार, ज्यांची चाळीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत ,असे मा.सिराज सिकलगार सर यांनी संग्रहाला अतिशय समर्पक अशी प्रस्तावना दिली आहे. त्यांचेच प्रकाशन असलेले ‘बाजीगर प्रकाशन’ ने वरील गझलसंग्रह प्रकाशित केला आहे. संग्रहाची पा'राखण प्रसिद्ध साहित्यिक मा.भागवत बनसोडे सरांनी केली आहे.
अतिशय आकर्षक व आशयगर्भ मुखपृष्ठ असलेल्या शहात्तर गझलांचा हा संग्रह प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावा असा आहे.
तो प्रत्येकाने वाचावा अशी अपेक्षा करून, मी अरूण विघ्ने सरांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
अनिल अघम
जिजाऊ नगर,अमरावती.
९४२०७१५४३८
वाह! खूप सुंदर परीक्षण केलेत अघम सर आपण. थोडक्यात पण महत्वपूर्ण शेरांची निवड केली.धन्यवाद आपले मनस्वी.दै.शब्दशिल्पचेही धन्यवाद ! लेख प्रकाशीत केल्याबद्दल. 🙏🌹
उत्तर द्याहटवासर आपल्या या शब्दांनी लिहावयास आणखी बळ मिळते,आपले आणि शब्दशिल्पचे अनेक धन्यवाद🙏🙏
हटवा