शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

असा 'माणिक' होणे नाही...- संजय गोडघाटे

 असा 'माणिक' होणे नाही...- संजय गोडघाटे



अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन


   एखादी व्यक्ती आपल्या जीवनात येते आणि आपल्या जीवनाचा अतूट भाग होऊन जाते असे सहसा होत नाही,  क्वचीतच वेळी असे होत असावे. असा दुर्मिळ क्षण सर्वांच्या वाट्याला येत   नाही.पण माझ्या वाट्याला अनेकदा असा दुर्मिळ क्षण आला आहे. कवितेच्या आणि सामाजिक क्षेत्रात माझा वावर असल्यामुळे मला अनेक जीवाभावाची माणसं भेटली. काळजाच्या खोल कप्प्यात रुतून बसली. अश्या माझ्या अनेक सहहृध्यी मित्रांपैकी एक मित्र म्हणजे माणिक खोब्रागडे. मी    त्यांना सर म्हणतो. ते माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने, शिक्षणाने आणि मानाने मोठे आहेत. त्यांना सर म्हणण्याचे हेच कारण आहे.

मी ज्यांना ज्यांना सर म्हणून संबोधतो त्याचे ही हेच कारण आहे.

' हॅलो...काय चाललं भाऊ '

'Ok,Thanku'

हे त्यांचे शब्द हर दोन तीन दिवसात कानावर पडतात. कानाला या शब्दांची सवय झाली आहे माझ्या. माणिक    सरांचा फोन यायला जर का उशीर झाला तर चुकल्या चुकल्या सारखे वाटते. माझे बरेचसे मित्र माणिक खोब्रागडे यांना ओळखतात.पण नवीन वाचकांना वाटेल कोण हे माणिकराव खोब्रागडे. तर आता त्यांच्या एकूणच व्यक्तीमत्त्वाबाबत      सांगतो.

रांगडा गडी, साधारण उंची, रुबाबदार चेहरा, चेहर्‍यावर स्मित आणि गंभीरता यांचं सदोदित मिश्रण. कधी सफारी ड्रेस तर कधी साधाच शर्ट पँट घालून  भेटणारे पण त्याही कपड्यात आकर्षक दिसणारे माणिकराव.एकदम भारी माणूस.बहुजन सौरभच्या कार्यालयात त्यांनी माझी पहिली तोंडओळख झाली. नेहमी प्रमाणे औचारिक बोलणे झाले.

बोलताना कळलं की हा माणूस वाडी वरून आल्याय. माझ्या मनात आलं ,कश्याला इतक्या दुरून आलाय हा म्हातारा माणूस. हा विचार येण्याचं कारण असं की अलीकडे अनेक म्हातारे नोकरीनंतर  रिटायरमेंट घेतल्यावर कवी झाले सामाजिक कार्यकर्ते झाले. पण ते दिसत कुठच नसतात.पत्रीकेत नाव असेल तर येतील नाही तर रसिक म्हणून यायला  ही त्यांची मानसिकता नसते. पण माणिक नावाच्या ह्या अफलातून माणसाशी जशी जशी ओळख वाढत गेली. भेटीगाठी, चर्चा होत गेल्या तसतस् त्यांचं व्यक्तिमत्व अधिक अधिक खुलत गेलं. या माणसात दिखावा नाही सच्चेपणा आहे. यांचं पाणीच वेगळं आहे. असं जाणवू लागलं आणि कवी म्हणून, कार्यकर्ता म्हणून,' इसमे कुच तो खास हैं बॉस ' ही जाणीव मला त्यांच्या जवळ घेऊन गेली. आमच्यातील कवी एकमेकांना भेटला, आमच्यातील कार्यकर्ता एकमेकांना भेटला, नदीला नदी भेटल्यासारखा आणि  'हम दोस्त बन गये'.

   हल्ली मुक्कामी वाडी येथे राहणारे माणिकराव यांचा जन्म मौजा गूजगव्हाण, जिल्हा चंद्रपूर येथला.घरी शेतीवाडी, बर्‍यापैकी समृध्दी.लाडात बालपण गेले. चारगाव येथे प्राथमिक शिक्षण झाले. वरोर्‍यावरून मॅट्रिक झाले. शिक्षणाची आवड , नाही शिकले तर बाप शेती करायला लावेल वगैरे  कारणांमुळे ते आणखी शिकले . पुढे ते कृषी अधिकारी झाले.

   नौकरी करताना त्यांना जे अनुभव आले, सामाजिक कामे करताना जे अनुभव भेटले, त्या अनुभवांचे सर हरेक भेटीत बखान करतात. एक एक अनुभव इतक्या रोचक पणे सांगतात की आम्हाला आणखी आणखी ऐकावेसे वाटते. त्यांच्या हृद्ययाच्या खोल डोहात खूप अनुभव साठलेले आहेत. हरेक भेटीत ते नवा, वेगळा अनुभव आमच्यापुढे ठेवतात. अनुभव सांगताना ते फार गंभीर होतात. असे वाटते की गतकाळ त्याच्या डोळ्यापुढे पुन्हा आलेला आहे. 

    माणिकराव नावाचा हा अवलिया माणूस आज जरी चिंतनशील आणि प्रगल्भ वैचारिक असला तरी शालेय जीवनात, कॉलेज जीवनात खूप खोडकर होता. असे मी म्हणत नाही,तेच सांगतात. एक आठवण सांगताना माणिक सर म्हणाले की मी वर्गात मुलींच्या बेंच मागे बसायचो आणि हळूच त्यांच्या वेण्या एकमेकांना बांधायचो. आणि त्या उठल्या की मग एकमेकांना ओढल्यागत व्हायच्या. वर्गात हसू पिकायचा. मजा यायची.

   बरं.. माणिक सर वेण्याच नाही बांधायचे तर ते शब्दही बांधायचे. कविता करायचे. प्रसंग पाहून त्यांच्यातील कवी प्रेरित व्ह्यायचा आणि कविता मनातून कागदावर यायची. कवितेबद्दल एक अनुभव माणिक सरांनी सांगितला. कॉलेज मधील माणिक सरांचे मित्र   त्यांना बॅरिस्टर म्हणायचे . हे माणिक सरांचे  मित्र  आपल्या मैत्रिणीस भेटायला जाताना माणिकराव कडून कविता लिहून घेवून जायचे.त्याकाळी ही माणिक सर कवितेच्या बदल्यात मानधन म्हणून,' खारा, मिठा, चाय, सिनेमा' घ्यायचे. (आणि आजचे कवी पहा, आपल्याच पैशाने विना मानधन कविता म्हणायला जातात...)

    कवितेचे हे बीज त्यांच्या मनात शालेय जीवनात रुजले, कॉलेज जीवनात त्याला बहर आला. आणि वयोपरत्वे तो वाढत वाढत गेला. जीवनात आलेले अनुभव ' काट्याने दिले शहाणपण ' या कवितेच्या रूपाने त्यांनी जगापुढे ठेवले.वयाच्या बाविसाव्या वर्षी माणिक सरांचे लग्न झाले असे सर सांगतात. त्यांच्या पत्नी बद्दलच्या आठवणी,    सहजीवनातील अनुभव, भोगलेले दुःख, कष्ट यांच्यावरील कविता या संग्रहात आहेतच शिवाय समाज जीवनातील कडू गोड प्रसंगांनी हा कविता संग्रह समृध्द झाला आहे.माणिक सरांच्या मनातील तिजोरीत अफाट अनुभव जमा आहेत. कालच संजय सायरे आणि मी त्यांचे सोबत होतो तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीच्या जिवघेण्या बिमारी बद्दल, त्यांच्या उपचारासमंधी केलेले कार्य सांगत होते आणि आम्ही ते गहिवरून ऐकत होतो.पत्नीच्या इलाजासाठी गुगलवर तज्ञ डॉक्टर शोधणे. त्यांचेशी संभाषण करणे, सांगितलेल्या टेस्ट करणे आणि नंतर औषधोपचार करणे यात किती वेळ गेला किती पैसा गेला हे ऐकून आणि अवाक झालो. 

   वडिलांवर, पत्नीवर, आणि स्वतःच्या मुलांवर माणिक सरांनी सारखेच प्रेम केले.स्वतः उच्चशिक्षित असल्यामुळे  त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते, म्हणून त्यांनी आपल्या मुलांनाही उच्चशिक्षण दिले. आज त्यांची चार ही मुलं चांगल्या पदावर आहेत. माणिक सरांनी मुलांना काय शिकायचे ही मुभा दिली होती.त्यांच्यावर कोणतेही बंधन लादले नव्हते. म्हणून मुलं आपल्या आवडीप्रमाणे शिकली आणि उच्चपदावर विराजमान झाली.आज ते सारेच मस्त जीवन जगत आहेत.

   साधारणपणे असे पाहण्यात येते की निवृत्त्ती नंतर माणसं मॉर्निंग / एविनींग वॉकिंग करण्यात, कुत्रे फिरवण्यात, झोपण्यात वेळ दवडतात. पण माणिक सर वेगळ्या मातीचे आहेत. तरुण पणात ते बॉमसेफ मध्ये सक्रिय होते. मीटिंग, सभा , धरणे,  मोर्चे, आंदोलने यात ते आपला वेळ द्यायचे. ऑफीस मधील कोनत्याही कर्मचार्‍यावर जर अन्याय होत असेल तर ते चिडून जायचे. त्याला कायद्याने न्याय मिळवून द्यायचे. त्यावेळी त्यांच्या काळजात घर करून बसलेल्या विद्रोही कार्यकर्ता आज ही तसाच आहे. सज्ज आहे. सजग आहे.

   खरा कार्यकर्ता अस्वस्थ असतो.  काहीतरी सजातीय उपक्रम करत राहणे हे तो कार्यकर्ता मान्य करतो. घरी बसून राहणे, खाणे पिणे झोपणे  त्याला मान्यच नसते. माणिक सरांनाही असे निष्क्रिय जीवन जगणे मान्य नाही. म्हणून ते अनेक संघटनांशी अजूनही जुळून आहेत. धम्मकिर्ती नगर येथील विहारात, वाचनालयात ते नेहमीच काही ना  काही उपक्रम राबवित असतात.आताच अलीकडे माणिक सरांनी २७/१/२०२४ ते ५/२/२०२४ असे दहा दिवस आंबेडकर भवन मुक्ती आंदोलनाचा लढा लढविला आणि यशस्वी पण केला. ज्या वयात लोक चारोधाम करतात त्या वयात हा 'तरुण' माणूस रस्त्यावर उतरून आंदोलन करतो.

  माणिक सर सिर्फ बोलघेवडे कार्यकर्ता नाहीत तर त्यांच्या बोलण्याला कृतीची जोड असते. ते पेंशनर  आहेत तरी ही आपल्या पेन्शन मधला एक ठराविक अमाऊंट ते सामाजिक उपक्रमात दान करतात. धम्मकीर्ती नगर येथील वाचनालयाला त्यांनी आलमारी ,खुच्या पुस्तकं दान केली आहेत. अनेक कविसंमेलन, साहित्य संमेलन यांना त्यांनी दान स्वरूप रोख रक्कम दिली आहे. त्यांच्या या दानशुर पणाचा अनेक मुखवट्याच्या संस्थांनी गैर फायदा  घेतला, काहींनी घेण्याचा प्रयत्न केला.  पण अनेक महनीय अनुभवांची शिदोरी जवळ असलेल्या माणिक सरांनी वेळीच त्यांचे मुखवटे फाडले. प्रसंग स्वरूप माणसे ओळखणे, त्यांना विशिष्ट अंतर राखून ठेवणे, ह्या गोष्टी माणिक सर नियमाने पाळतात. आणि आम्हालाही अशीच समज देतात. त्यांच्या अनुभवामुळे आम्हीही समृध्द होत आहोत. हे सांगणे न्यायोचित होईल.


कवी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज माणिक सरांची ख्याती आहे. मानसन्मान आहे. कवी म्हणून त्यांना अनेक संमेलनात निमंत्रित कवी, अध्यक्ष म्हणून आग्रहाने बोलाविले जाते.त्यांच्या ' माय' या कवितेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. अनेक मासिक, दैनिक, दिवाळी अंकात त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहे.सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक सभा, धरणा, मोर्चा येथे त्यांची आजही सक्रिय उपस्थिती राहते . त्यांच्यातील तरुण कार्यकर्ता पाहून आम्हालाही कधी कधी वाटते की ही ऊर्जा त्यांच्यात येते कोठून?अभ्यासाअंती उत्तर मिळाले. त्यांच्यातील ऊर्जेचे, उत्साहाचे कारण आहे त्यांच्या मन , मेंदू आणि रक्तात एकजीव झालेले डॉ बाबासाहेबांचे विचार.जुनाट रूढी परंपरेतून मुक्त करून नवजीवन देणार्‍या बाबांचे विचार माणिक सरांची ताकद आहे.हीच ताकद आणि जिद्द त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात त्यांना साथ देत आहे .

  एका सामान्य शेतकर्‍याच्या मुलाने, छोट्याश्या गावातून शिक्षण घेऊन, पुढे कृषी अधिकारी होऊन नाव मिळविले.कवी आणि सामाजिक कामे करताना नावाला जपले. आयुश्यातील अनेक प्रश्नांना भिडत संसाराकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आज नागपूर मुक्कामी आपल्या गोड आणि विनम्र स्वभावाने मोठा मित्र परिवार गोळा करून सन्मानाने जीवन  जगणारे माणिक खोब्रागडे सर खर्‍या अर्थाने  'माणिक' आहेत. मी त्यांच्या सोबत अनेक कविसंमेलनात , कार्यक्रमांत सोबत असतो. नागपूर शिवाय बाहेर गावी पण आम्ही सोबत सोबत अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या त्यावेळच्या सहवासात ते खूप बोलत असतात, छान छान अनुभव कथा सांगत असतात. त्यावेळी आम्ही वेळेचे आणि काळाचे भान हरवून जातो.

  सात सप्टेंबरला त्यांच्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण होत  आहे. त्या निमित्त आम्ही मित्रांनी ङमाणिक खोब्रागडे अमृत महोत्सव समिती ङस्थापन करून त्यांच्या स्वागत सत्काराचा कार्यक्रम घेण्याचे योजिले आहे.

या सत्कार समितीत त्यांनी मला प्रसिध्दी प्रमुख पद देवून माझा सन्मानच केला आहे. सर्वांना आपलंस करणारा. मित्रांवर जीव लावणारा असा माणिक विरळाच.' असा माणिक होणे नाही'.



- संजय गोडघाटे

जयभीम नगर

नागपूर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...